बदललेले निकाल... विनीत वर्तक
१९९० चा काळ आणी २०१६ चा काळ या मद्धे शाळेत काय फरक पडला? अस कोणी मला विचारल तर माझ उत्तर असेल शाळा तीच आहे. अभ्यास पण तोच आहे. बदलल काही असेल तर निकाल आणी त्यात असणाऱ्या अपेक्षांचं ओझ. १९९० साली जी लोक दप्तर घेऊन शाळेत जात होती. ती आता पालकांच्या भूमिकेत आहेत. गेल्या २५-२६ वर्षात ह्या दोन्ही भूमिकेत वावरताना तेच जे ह्या ओझ्याखाली दबले गेले होते . तेच आता अजून जास्ती आपल्या मुलांना त्या खाली दाबत आहेत.
मला अजून आठवते माझ्या १३ वर्षाच्या शालेय कारकिर्दीत अनेक उतार- चढाव आले. असाही मी खूप हुशार नसल्याने उतारच जास्ती आले ते काही वेगळ सांगायला नकोच. पण इतक असून सुद्धा मला आठवत नसेल कि ४-५ पेक्षा जास्ती वेळा माझ्या आई- वडिलांना शाळेत यायची गरज भासली होती. स्पर्धा त्या वेळी हि होती. परीक्षा, गेम , सांस्कृतिक कार्यक्रम , चित्रकला, हस्तकला आणी स्पर्धा परीक्षा. १९९० च्या काळात परीक्षा, निकाल होते. आता २०१६ साली पण सगळ तेच आहे. त्यातली स्पर्धा, मज्जा आजही आणी तेव्हाही तीच होती. पण आज बदलेल त्याच स्वरूप म्हणजे बदललेले निकाल.
१९९० च्या काळात म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो. तेव्हाचा काळ आणी त्याच्या आसपास. स्पर्धांची मज्जा ही विद्यार्थान पर्यंत मर्यादित होती. त्यातल हरण, जिंकण हे त्यांच्या पर्यंत. मला नाही आठवत माझ्या पालकांनी कधी काय रे? ह्या वर्षी कब्बडी कोणती इयत्ता आणी तुकडी जिंकली? किंवा धावण्याच्या शर्यतीत कोण पहिला आला किंवा आली? ह्या वर्षी तू तिसराच का? असले प्रश्न विचारले. ह्याचा अर्थ मुलांच्या जडणघडणी मद्धे त्याचं लक्ष नव्हत अस नव्हता न. जर तस असत तर हा लेख लिहण्याइथवर मी पोहचलो नसतो. टिळक महराष्ट्र विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा किंवा तत्सम स्पर्धेत सर्टिफिकेट मिळाल म्हणून पालकांनी कधी एवढ का? तेवढ का? किंवा चांगले मार्क मिळाले म्हणून गवगवा केला नव्हता. रिझल्ट च्या दिवशी पण माझ्या शिक्षकांना माझे पालक कधी भेटल्याच आठवत पण नाही मला. अमुक एका तुकडीत का टाकल? किंवा अमुक एकाच्या बाजूला का बसवलं? तुला त्यांनी का मारल? शिक्षा का दिली? असले विषय तर घरपर्यंत जात पण नसत. गेले तरी मीच काहीतरी चुकीच केल असणार म्हणून शिक्षकांनी शिक्षा दिली असेल हे त्याचं मत मला त्यावेळी जरी चुकीच वाटल तरी आज मागे वळून बघताना बरोबर वाटल.
अस म्हणतात की १९९० च्या काळातील विद्यार्थी सगळ्यात जास्ती स्थित्यंतरा मधून गेले. मोकळी अर्थव्यवस्था, कॉम्प्युटर चा झालेला प्रवेश, पेजर, मोबाईल ह्यांचा नकळत झालेला घरापर्यंतचा प्रवेश. त्या योगे निर्माण होणाऱ्या संधी, स्पर्धा ह्या सगळ्याच बदलांना ही पिढी पुरून उरली. मग शाळेत अश्या निर्णयात लक्ष न देणाऱ्या पालकांनी पिढी घडवली की नाही? ह्याच उत्तर त्या वेळी विद्यार्थी दशेत पण आता पालकांच्या भूमिकेत असणाऱ्या पिढीने द्यायचं आहे.
काही महिन्यांपूर्वी सई च्या शाळेत रिझल्ट निमित्ताने जाण झाल. पहिलीतील मुल सगळी पण सगळ्यांचे आई- बाबा बऱ्याच टेन्शन मध्ये दिसत होते. म्हणजे आता त्यांच्या मुलाला बी, सी ग्रेड मिळाली. तर आयुष्य संपल असाच काय तो चेहऱ्यावर अविर्भाव. माझ्या नावाची मुलाने लाज काढली अश्या समजुतीतून काही पालक मुलांवर ओरडत होते. तर काही सगळ्यात ए मिळाल म्हणून त्यांची छाती ५६ इंचाची झाली होती. मुलांना त्याच काही सोयरसुतक नसल तरी निरागस, कोवळी मन मात्र बावरलेली होती. काय होणार? रिझल्ट काय लागणार? वय वर्ष ५-६ वयात जर आपण मुलांच्या मनात रिझल्ट च टेन्शन निर्माण करायला लागलो. तर दहावीत जाऊन त्यांनी आत्महत्या केली तर त्यात काही वावग वाटणार नाही.
मी स्वताला एक पालक म्हणून प्रश्न विचारतो. १९८५-८६ साली मी जेव्हा पहिलीत होतो. तेव्हा मला कोणती ग्रेड होती? किती टक्के मार्क्स होते? अगदी १० वी च्या आधीचे कोणतेच मार्क किंवा नंबर माझ्या लक्षात नाहीत. मग त्या निरागस जिवाकडून मी कोणत्या अधिकाराने मार्कांची आणी ग्रेडची अपेक्षा करत आहे. १९९० ते २०१६ नक्कीच काळवेळ बदलला. परीक्षा, स्पर्धा ह्याच स्वरूप बदलल म्हणून ते निरागस जीव नाही न बदलले. दप्तरांच्या ओझ्याखाली दबून सुद्धा त्या वेळी आपल्या पालकांनी आपल्याला, आपल्या पद्धतीने निरागस आयुष्य जगण्याची मोकळीक दिली. मग आपण २०१६ मद्धे ते आयुष्य कोणत्या अधिकाराने ह्या निरागस जिवांकडून खेचून घेतो आहोत? प्रत्येक पालकाने ह्याचा विचार करावा.
अभ्यास, स्पर्धा सगळ असावं पण निकालंवर स्वताची इमेज मोठी होताना बघण हा त्या निरागस मनांवर केलेला अन्याय आहे. आपण सगळेच जास्ती लांब नाही एक २५-३० वर्षापूर्वी त्याच भूमिकेतून गेलो आहोत. आपल्या आईवडिलांनी लक्ष नाही दिले म्हणून आज आपण जे आहोत ते आहोत. कदाचित जास्ती लक्ष दिले असते तर उमलायच्या आधीच त्याची फुल बाजारात विकायला ठेवली असती. आपण उमलण अनुभवल मग तीच संधी आपल्या मुलांना आपण कधी देणार आहोत? बदललेले निकाल बदलवण्याची संधी आपण त्यांना कधी देणार आहोत? सगळ्यांनी विचार करा. निदान १९९० ते २०१६ असा प्रवास केलेल्या सगळ्यांनी..
No comments:
Post a Comment