एस ४००.. विनीत वर्तक
एस ४०० ट्रायम्फ ही सिस्टम भारताने तब्बल ४०,००० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत रशियाकडून घेण्याचा नुकताच करार केला. नक्की काय आहे ही सिस्टीम की जिच्यासाठी भारताने इतके रुपये मोजले आहेत. एस ४०० ही जगातील नावाजलेली एअर डिफेन्स सिस्टीम आहे. कोणत्याही विमान, ड्रोन, बॉम्बर ला उध्वस्त करण्यात अचूक समजली जाते.
एस ४०० ची एक बटालीयन म्हणजे शत्रूच्या चारी मुंड्या चीत. ह्या सिस्टीम मध्ये ३ प्रकारची मिसाईल वापरली जातात. सगळ्यात दूरवर मारा करणारी ४० एन ६, दूरवर मारा करणारी ४८ एन ६ तर जवळ मारा करणारी ९ एम ९६ मिसाईल. ही तिन्ही मिसाईल सुपर सॉनिक व हायपर सॉनिक वेगाने म्हणजे तब्बल १४ माख वेगाने ( ध्वनीपेक्षा १४ पट जास्ती वेगाने) १७,००० हजार किमी / तास वेगाने शत्रूकडे झेपावतात. एक उदाहरण द्यायचं झाल तर हलवारा एअर बेस मध्ये असलेल्या एस ४०० कडून निघालेलं क्षेपणास्त्र पाकिस्तान मधल्या लाहोर वर उडणाऱ्या एफ-१६ विमानाचा फक्त ३४ सेकंदात वेध घेऊ शकते.
१२० ते ६०० किमी पर्यंतच्या टप्यात येणार कोणतही विमान, क्षेपणास्त्र किंवा ड्रोन ह्याच्या पासून वाचू शकत नाही. एकाच वेळी ६०० किमितील ३०० वेगवेगळी टार्गेट शोधून तब्बल ८० टार्गेट वर एकाच वेळी खातमा करू शकते. १६० वेगवेगळ्या मिसाईल न एकाच वेळी गाईड करू शकते. ह्यातील स्याम सिस्टीम एफ-३५ सारख्या पाचव्या पिढीतील स्टेल्थ ( रडार वर न दिसणाऱ्या ) फायटर प्लेन ला सुद्धा मारू शकते.
अश्या पाच बटालियन त्याच्या तब्बल ६००० हजार मिसाईल सकट भारताने रशियाकडे ऑर्डर केल्या आहेत. आधी अश्या १२ बटालियन खरेदी करण्याचा भारताचा विचार होता. पण भारताच्या खर्च आणी गरजा ह्यांचा ताळमेळ साधत ही संख्या ५ वर कमी केली गेली. ह्यातील ३ बटालियन भारताच्या पश्चिम सरहद्दीवर तर २ बटालियन पूर्व सरहद्दीवर तैनात करण्यात येतील. ही अशी सिस्टीम आहे की हवेतून परिंदा भी पर मारने के पेहले १००० हजार बार जरूर सोचेगा.
पाकिस्तान, चीन अश्या दोन्ही अतिशय तणावात असणाऱ्या सरहद्दीवर एस ४०० म्हणजे कोणत्याही हवाई हल्यापासून आपल अभेद्य संरक्षण. त्याचसोबत सरहद्दीवर तैनात केल्यामुळे शत्रूच्या हद्दितले ६०० किमी च्या टप्प्यातले सगळे हवाई तळ, क्षेपणास्त्र ही बेकार होणार आहेत. कारण ह्या पट्ट्यातील कोणतीही हवेत झेपावलेली वस्तू क्षणार्धात टिपण्याची एस ४०० ची क्षमता आहे. ४०,००० कोटी हे जास्ती वाटत असले तरी भारताच्या सामरिक शक्तीत एस ४०० ने कमालीची वाढ होणार आहे. आपली एअर फोर्स वय झालेल्या आणी रिटायर होणाऱ्या विमानांमुळे शक्तिहीन होत आहे तिला पुन्हा एकदा जोमाने तंदुरुस्त करण्याचं टॉनिक म्हणून एस ४०० कडे बघितलं जात आहे.
२०१९ च्या आसपास ही सिस्टीम भारतात डिप्लोय होईल. सीमेवर किंवा भारताच्या कोणत्याही शहरात ही सिस्टीम डिप्लोय केल्यास त्याच्या आजूबाजूच्या जवळपास ६०० किमी च्या पट्यात कोणत्याही हवाई हल्याला ही सिस्टीम हवेतच गारद करू शकेल. अशी सिस्टीम रशिया कडून घेणारा चीन नंतर भारत दुसरा देश आहे. रशियन हत्यार, आयुध ही भारताच्या अनेक युद्धात सिद्ध झालेली आहेत. भारताने लढलेल्या सगळ्या युद्धात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे त्यामुळे एस ४०० येत्या काळात रशियाचा आपला पारंपारिक मित्र व सखा असलेला दर्जा पुन्हा एकदा सिद्ध करेल ह्यात शंका नाही.
No comments:
Post a Comment