Sunday, 22 January 2017

भरलेल्या जागा... विनीत वर्तक
आयुष्य परिपूर्ण नसतेच त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात गाळलेल्या जागा असतातच. त्या भरण्यासाठी प्रत्येक जण त्याला हवा तसा शोध घेत असतोच. मग तो आयुष्याचा साथीदार असो वा फेसबुक मित्र / मैत्रीण. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या गाळेलेल्या जागा समोर येतात. जस वय वाढते तश्या त्या वाढत जातात. वयाच्या उत्तरार्धात मात्र भरलेल्या जागा पुन्हा रिकाम्या होतात. ह्या रिकाम्या झालेल्या जागा पुन्हा भरत तर नाहीच. पण त्यांनी निर्माण केलेली पोकळी ही प्रचंड अस्वस्थ करणारी असते.
पण अशी ही एक वेळ येते जेव्हा भरलेल्या जागांमध्ये पोकळी निर्माण होते किंवा त्या जागेसाठी अनेक दावेदार आपल्या आयुष्यात येतात. एकच व्यक्ती आयुष्याच्या सगळ्याच टप्प्यावर सगळ्याच जागा भरू शकेल अस खूप कमी वेळा होते. अनेकदा अनेक व्यक्ती आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर भरलेल्या जागा पुन्हा भरतात. त्या प्रत्येक व्यक्तीच स्वताच अस स्थान किंवा वैशिष्ठ असते. कोणीच परिपूर्ण नसल तरी सगळेच अपूर्ण असतात असा त्याचा अर्थ होत नाही. वेगवेगळ्या काळाच्या प्रवासात असणारी सोबत सेम असेल अस आपण गृहीत कस काय धरू शकतो? पडणारा पाउस दरवर्षी सारखा नसतो तर आयुष्याच्या भरणाऱ्या जागेतील माणसे कशी सारखी असतील? नक्कीच काही गोष्टी ह्याच्या पलीकडे असतात. काळाच्या परिणामांचा त्यावर काहीच असर होत नाही. इंद्रधनू सारखे त्यांचे सातही रंग सगळ्याच उन पावसात सारखे राहतात.
काही जागांना वेगवेगळे पर्याय ही असू शकतात. एकाच वेळी ते सगळे पर्याय योग्य असू शकतात. प्रत्येक पर्याय हा जागा भरण्यासोबत एक वेगळी अनुभूती देत असतो. म्हणून तर प्रत्येक माणूस एकमेव असा आहे. एकाच वेळी भरलेल्या प्रत्येक जागेची अनुभूती वेगळी यायला जागा भरणारी माणस कारणीभूत असतात. माणूस समृद्ध होतो म्हणजे काय तर एकाच वेळी वेगवेगळ्या अनुभूतींची जाणीव तो अंगिकारु शकतो. अस अनेकदा अनेक गाळलेल्या जगात होऊ शकते. ह्याचा अर्थ प्रत्येक वेळी नाविन्य असा कोणी काढू नये आणी अस स्वीकारणारा स्वैराचार करणाराच किंवा करणारीच असते असा ही काढू नये.
मला एक ओळ ह्या निमित्ताने आठवली “No matter how good you are, You can always be replaced” हे आयुष्यातील एक सत्य आपण नेहमी डोळेझाक करतो. अगदी काही हाताच्या बोटावर मोजणाऱ्या जागा सोडल्या तर सगळीकडे रिप्लेसमेंट होऊ शकते. डिव्हाईन अशी नाती खरे तर ती आधी जागा भरायला काहीतरी स्पेशल लागते. ती सहजा सहजी होत नाहीत. अशी नाती इंद्रधनू प्रमाणे असतात काळाच्या पलीकडे असणारी पण बाकी पावसा सारखी काळाप्रमाणे रिप्लेस होणारी. हे माहित असून सुद्धा आपल मन स्वताला स्पेशल समजत. मग सुरु होतो एक खेळ जिकडे भरलेल्या जागेवर दुसऱ्या कोणाला न येऊ देण्याचा. शेअरिंग आपल्याला जमत नाही. वरच वाक्य कितीही माहित असल तरी आपण स्वताला प्रत्येक गाळलेल्या जागेत इंद्रधनू समजतो. प्रत्यक्षात त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी आपण असल्यावर सुद्धा जागा रिकामी असू शकते. ती कोणीतरी भरू शकते हे समजण्याची प्रगल्भता किती मनात आणी लोकात असते.
कोणत्या जागा रिकामी ठेवायच्या कोणत्या भरायच्या आणी कोणत्या भरून सुद्धा रिकामी ठेवायच्या ह्याचा निर्णय प्रत्येक जण आपआपल्या परीने घेतो. जो भरलेल्या जागेत राहून सुद्धा नवीन आलेल्या पावसासाठी जागा देऊ शकला तो जिंकला. इंद्रधनू व्हायला त्याला उतरावं लागते. तो नेहमीच नाही उतरत तेव्हा भरलेली जागा पण रिकामी असू शकते हे वास्तव स्विकारायची मानसिकता आपण बनवायला हवी. नाही का?

No comments:

Post a Comment