Monday 30 May 2022

रक्ताने माखलेल्या शाळा... विनीत वर्तक ©

 रक्ताने माखलेल्या शाळा... विनीत वर्तक ©

शाळा म्हणजे विद्येच माहेरघर असं म्हंटल जाते. पण अमेरिकेत आता शाळा म्हणजे रक्ताने माखलेल्या भिंती अशी म्हणायची वेळ आलेली आहे. काही दिवसांपूर्वी टेक्सास राज्यात शाळेत झालेल्या गोळीबारात १९ विद्यार्थ्यांना तर दोन शिक्षकांना असं मिळून २१ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही काही अमेरिकेच्या इतिहासातली पहिली घटना नाही. उलट २०१२ पासून तब्बल ५४० अश्या घटनांची नोंद अमेरिकेत झालेली आहे. गेल्या १० वर्षात ५४० पेक्षा जास्ती घटनांमध्ये शाळेत गोळी चालवून त्यात कोणीतरी जखमी अथवा मृत्युमुखी पडलेलं आहे. एकूणच काय तर हे आकडे अमेरिकेतील रक्ताने माखलेल्या शाळांचं चित्र पुरेसं स्पष्ट करत आहेत. या सगळ्या घटनांचा मागोवा घेतला तर त्यामागची कारणं समोर येतात. ती कोणती आणि त्या सर्वांचा भारतावर किंवा एकूणच भारतीयांवर कसा नकळत परिणाम पडतो तसेच या सगळ्यातून आपण काय शिकलं पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. 

शाळेत होत असलेल्या या घटनांच मूळ हे अमेरिकेच्या समाजव्यवस्थेत दडलेलं आहे. मी, माझं, स्वतःचा स्व जपण्यासाठी अमेरिकन माणूस कोणत्याही थराला जाण्याच्या मनस्थितीत असतो. अगदी इतपर्यंत की आपल्या जागेत चुकून पाय ठेवलेल्या व्यक्तीवर गोळी झाडण्याचा अधिकार हा त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो. जगाला माणुसकीची भाषा शिकवणारी अमेरिकन व्यवस्था आणि संस्कृती आपल्या स्वतःच्या घरात मात्र संपूर्णपणे या बाबतीत अपयशी ठरलेली आहे. इतिहास हेच दाखवतो की अगदी रेड इंडियन पासून ते आजपर्यंत बंदूक ही अमेरिकन समाज व्यवस्थेचा अविभाज्य भाग राहिलेली आहे. बंदूक बाळगणं आणि त्याचा वापर करण हे आजही अमेरिकन माणसाला लोकशाहीने दिलेला मूलभूत अधिकार वाटतो. सुरक्षेसाठी अतिशय आग्रही असणारा अमेरिकन समाज याच सुरक्षिततेच्या अति वापरापायी त्याच्याखाली कोलमडून पडताना आज दिसतो आहे. 

आज मिसरूड फुटलेला कोणीही अगदी एखाद्या मॉल मधून कायदेशीररित्या आणि सहजपणे सेमी ऑटोमॅटिक ते ऑटोमॅटिक गन विकत घेऊ शकतो. टेक्सास मधे झालेल्या घटनेत वापरण्यात आलेली ए.आर. १५ रायफल ही सेमी ऑटोमॅटिक पद्धती मधील होती. याचा अर्थ फक्त नेम धरून चाप ओढला की ही रायफल एका मिनिटात १०-१२ गोळ्या डागू शकते. एका मॅगझीन मधे साधारण ३० राउंड असतात. याचा अर्थ दोन मिनिटात जवळपास ३० गोळ्यांचा वर्षाव या रायफल मधून केला जाऊ शकतो. हा हल्ला करणारा साल्वाडोर रामोस याने आपल्या १८ व्या वाढदिवसाची आठवण म्हणून ही रायफल आणि जवळपास ३०० गोळ्या खरेदी केल्या होत्या. हा सगळा सौदा त्याला अवघ्या २००० अमेरिकन डॉलर ला पडला. या सर्व गोष्टी त्याने कायदेशीर बाबींची पूर्तता करून घेतलेल्या होत्या. त्यामुळे लोकांना यात संशय यावं असं काहीच वाटलं नाही. १८ वर्षाच्या साल्वाडोर च्या हातात ऑटोमॅटिक रायफल सुरक्षिततेच्या दृष्टीने असणं हे अमेरिकन संस्कृतीने स्वीकारलेलं आहे. यात राजकारण, गन लॉबी, रिपब्लिकन सिनेटर च पाठबळ या सर्व गोष्टी गृहीत धरल्या तरी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकन व्यवस्था यातून आपल्या रक्ताने माखलेल्या हाताची सुटका करू शकत नाही. हे वास्तव स्विकारणं हेच जड जाते आहे. 

अमेरिकेतील गन लॉबी जन्माला घातली ती अमेरिकन लोकांनीच. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात एक पुसटशी रेषा असते ती त्यांनी कधीच ओलांडली आहे. आज नवीन तयार होणारी पिढी एक वैफल्यग्रस्त पिढी म्हणून समोर येते आहे. ड्रग्स, सेक्स, पार्टीज, हिंसाचार, वंशवाद, बुलिंग, रॅगिंग अश्या अनेक रस्त्यांनी ती निराशेच्या गर्तेत लोटली जात आहे. तिला सावरणारी बालक- पालक कुटुंब व्यवस्था संपूर्णपणे आज अमेरिकेत संपुष्टात आलेली आहे. आपला पाल्य कोणासोबत असतो, तो/ ती काय करते, मित्र- मैत्रिणी कोण?, त्याची / तिची मानसिक अवस्था काय?, त्याच्या/ तिच्या आयुष्याची ध्येये काय? अश्या सर्व गोष्टींपासून कुटुंबव्यवस्था आज वेगळी आहे. एकटेपणाची भावना, टोकाची निराशा, आयुष्याची धूसर स्वप्न अश्या सगळ्या गोष्टींच्या निराशेतून त्यांचा प्रवास एका गुन्हेगारी प्रवृत्तीकडे होताना स्पष्ट दिसत आहे. मग त्यातून मी नाही तर कोणीच नाही. हातात सहज मिळालेला बंदुकीचा चाप त्यातून अश्या घटनांना खतपाणी घालतो आहे. हे सगळं करताना आपलं नाव इतिहासाच्या पानात वाईट घटनेने का होईना कोरण्यासाठी किंवा आपल्यावर झालेला अन्याय, छळ आणि अपमान याला वाचा फोडण्यासाठी साहजिक टार्गेट बनल्या त्या शाळा. 

शाळेतील हिंसाचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही घसरत्या समाज व्यवस्थेचं एक प्रतिबिंब आहे. आज एक साल्वाडोर रामोस मेला तरी असे अनेक साल्वाडोर अमेरिकेत तयार होत आहेत. कुठे, कुठे आणि किती अमेरिकन लोक आपल्या पुढल्या पिढीची सुरक्षा करणार आहेत? आज महत्वाचा प्रश्न बाजूला राहतो तो म्हणजे असे साल्वाडोर रामोस तयार होऊ नयेत म्हणून आपण काय करू शकतो? बंदुकीचा कायदा बदलून अश्या घटनांवर अंकुश नक्कीच बसेल पण हा प्रश्न सुटणार नाही. आता अनेक थिअरी या घटनेतून बाहेर येतील. राजकारण केलं जाईल आणि शेवटी लोक सगळं विसरून पुन्हा एकदा कामाला लागतील. पण त्या १०-११ वर्षांच्या मुलांच्या बालमनावर या घटनेचे उमटलेले प्रतिसाद मात्र आयुष्यभर त्यांच्या सोबत राहतील. 

भारताने आणि भारतीयांनी यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. अपयशाचा लवलेशही आपल्या पाल्याच्या जवळ येऊ न देणाऱ्या आजच्या पिढीला आपण मी, माझं यात गुंतवत चाललेलो आहोत. परस्थिती अगदी अमेरिकेसारखी बिघडलेली नसली तरी त्याची सुरवात मात्र झालेली आहे. सुख आणि आनंद देण्याच्या नादात आपण पुढल्या पिढीचं जगणं एक प्रकारे निष्क्रिय करत जात आहोत. आपल्या समाजव्यवस्थेच्या साखळ्या हळूहळू तुटायला सुरवात झाली आहे. ती बंधन योग्य का अयोग्य हे आपण त्याचा कसा वापर करतो यावर अवलंबून असणार आहे. आपल्या शाळा अमेरिकेप्रमाणे रक्ताने माखू द्यायच्या नसतील तर काळाची पुढली पावलं आपण वेळीच ओळखायला हवीत. नक्कीच या पावलांच स्वरूप कदाचित आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने येईल पण त्याची मूळ मात्र आपल्याच समाजव्यवस्थेत असतील हे मात्र नक्की. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



Sunday 22 May 2022

२९ वर्ष युद्ध लढलेल्या सैनिकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

 २९ वर्ष युद्ध लढलेल्या सैनिकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

'हिरो ओनोडा' हे नाव आपल्यासाठी नवीन असेल. कोण आहे हा हिरो ओनोडा? एक, दोन वर्ष नाही तर तब्बल २९ वर्ष दुसरं महायुद्ध लढणारा हा जपान चा सैनिक इतिहासाच्या पानात आज लुप्त झालेला असला तरी त्याने आपल्या समोर मांडलेला निष्ठा, अभिमान, निर्धार आणि वचनबद्धता यांचा आदर्श जगातील येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. या हिरो ओनोडा ने नक्की असं काय केलं? कसा लढा दिला? कसा तो शरण आला? या सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या तर हिरो ओनोडा च आयुष्य आपल्यासमोर अनेक पदर उलगडेल ज्यातून आपण खूप काही शिकू शकतो. 

हिरो ओनोडा ची गोष्ट सुरु होते जपान ने अमेरिकेच्या पर्ल हार्बर वर केलेल्या हल्यापासून. यानंतर अमेरिका आणि जपान यांच्यात दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजले. याच्या एक वर्ष आधीच १८ वर्षाचा तरुण हिरो ओनोडा जपान च्या सैन्यात दाखल झाला होता. आधीपासून काटक, हुशार, चपळ असलेल्या हिरो ओनोडा ची निवड कमांडो ट्रेनिंगसाठी झाली. त्यात त्याला गोरीला युद्धकौशल्य, तोडफोड, काउंटर इंटिलिजन्स तसेच अतिशय विपरीत परिस्थिती मधे लढा कसा सुरु ठेवायचा याच प्रशिक्षण देण्यात आलं. १९४२ मधे जपान ने फिलिपाइन्स च्या अनेक बेटांवर कब्जा केला होता. पण अमेरिका च्या साह्याने जेव्हा फिलिपाइन्स सेनेने १९४४ च्या सुरवातीला युद्ध सुरु केलं तेव्हा जपानी सेनेला पराभूत होण्याची नामुष्की आली. अमेरिकेच्या सेनेला थोपवण्यासाठी हिरो ओनोडा ला फिलिपाइन्स च्या 'लुबंग' बेटावर पाठवण्यात आलं. 

गोरीला युद्धाच (ज्याची तुलना गनिमी काव्याशी होऊ शकेल) प्रशिक्षण घेतलेल्या हिरो ओनोडाला आपण समोरासमोरील युद्धात हरणार हे लक्षात आलं. त्याने आपल्या सांगण्याप्रमाणे अमेरिका आणि फिलिपाइन्स च्या सैन्याला रोखण्यासाठी गनिमी काव्या प्रमाणे युद्ध करण्याची कल्पना मांडली. पण त्याच्या सिनिअर ऑफिसर ने ती ऐकली नाही. २८ फेब्रुवारी १९४५ ला जपान च सैन्य हरलं. पण हिरो ओनोडा ने आपल्या ३ साथीदारांसह शरण येण्यास नकार देत गनिमी पद्धतीने आपला लढा सुरु ठेवला. तो आणि त्याचे साथीदार जंगलात लपून बसत आणि अचानक तिकडे तैनात असलेल्या सैनिकांवर हल्ला करून जंगलात पसार होत. ऑगस्ट १९४५ मधे जपान ने अमेरिकेपुढे शरणागती पत्कारली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. पण संपर्काच्या कोणत्याही साधनाविना जंगलात लढणाऱ्या हिरो ओनोडा आणि त्याच्या साथीदारांना याची काहीच कल्पना नव्हती. त्यांच्या दृष्टीने युद्ध अजून सुरूच होतं. अमेरिकेला या बेटावर लपून बसलेल्या काही जापनीज सैनिकांची कल्पना होती. त्यांना युद्ध संपल्याचं कळवण्यासाठी अमेरिकेने सगळे प्रयत्न केले. आकाशातून जपान ने शरणागती पत्करलेला कागद ही अनेक ठिकाणी जंगलात टाकण्यात आला. पण हिरो ओनोडा चा यावर विश्वास बसला नाही. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या ओनोडाला हे पचवणं कठीण जात होतं की आपला देश शत्रूपुढे तलवार म्यान करेल. 

या नंतर ४ वर्ष हिरो ओनोडा आणि त्याचे तीन साथीदार जंगलात लपून आपल्या भागाचं रक्षण करत होते. फक्त ४ लोक अजूनही फिलिपाइन्स आणि अमेरिकेविरुद्ध युद्ध लढत होते. त्यांचा एक साथीदार युईची अकात्सु याने मार्च १९५० ला कंटाळून फिलिपाइन्स सैन्यापुढे शरणागती पत्कारली. त्याच्या शरणागती नंतर संपूर्ण जगाला हिरो ओनोडा आणि त्याचे साथीदार अजूनही लुबंग च्या जंगलात लपून युद्ध करत असल्याचं कळालं. अमेरिकेने पुढाकार घेऊन या तिन्ही लोकांच्या घरातील माणसांन कडून पत्र लिहून त्यांना शरणागती पत्करण्याची विनंती केली. ही पत्र पुन्हा एकदा फिलिपाइन्स च्या त्या बेटावर पसरवण्यात आली. हिरो ओनोडाला ती पत्र मिळाली पण हे सगळं अमेरिकेचं कुटील कारस्थान आहे यावर तो ठाम होता. आपला देश कधीच पराभूत होऊ शकत नाही असा दुर्दम्य आशावाद त्याच्या मनात तब्बल ५ वर्षानंतर पण होता. त्याला वाटलं की सगळी पत्र अमेरिकेने त्याच्या कुटुंबावर जबरदस्ती करून लिहून घेतली आहेत. ज्याच्यामुळे आपण शरण येऊ. पुढली २० वर्ष हिरो ओनोडा आणि त्याचे साथीदार फिलिपाइन्स सैनिकांना आपलं लक्ष्य बनवत राहिले. वेळप्रसंगी त्यांनी तिथल्या गावकरी लोकांवर ही हल्ले केले. 

१९७२ पर्यंत त्याचे राहिलेले दोन्ही साथीदार फिलिपाइन्स पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. पण तरीही हिरो ओनोडा डगमगला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मातृभूमी साठी लढण्याचा त्याचा निर्धार पक्का होता. तब्बल २० वर्ष देशासाठी फिलिपाइन्स च्या जंगलात लढा देत असलेल्या हिरो ओनोडा ची गोष्ट जपान मधे सर्वांना माहित झाली होती. जपान मधील एक साहसी तरुण नोरिओ सुझुकी याने त्याला भेटायचं ठरवलं. त्याचा मागोवा घेत तो चक्क लुबंग च्या जंगलात जाऊन पोहचला त्याने तिकडे हिरो ओनोडा ची भेट घेऊन त्याला सगळी परिस्थिती कथन केली. त्याने हे ही त्याला सांगितलं की जपानचे लोक आणि जपानचे राजे यांना त्याची काळजी आहे. तू इकडे अजून युद्ध का करतो आहेस? तू शरणागती पत्करायला काय करणं गरजेचं आहे? त्यावर त्या वेळी ही एखाद्या सैनिकाप्रमाणे ड्युटी वर असणाऱ्या हिरो ओनोडा ने स्पष्ट शब्दात सांगितलं. जोवर माझे कमांडिंग ऑफिसर मला शस्त्र खाली ठेऊन शरणागती पत्करायला सांगत नाहीत तोवर माझा लढा सुरु राहणार. 

नोरिओ सुझुकी ने हा सगळा वार्तालाप जपान सरकार समोर सादर केला. जपान सरकारने तत्परतेने हिरो ओनोडा च्या त्याकाळी असणाऱ्या कमांडिंग ऑफिसर चा शोध घेतला. सैनिकी सेवेतून निवृत्त होऊन एक पुस्तकाचं दुकान चालवणाऱ्या आणि हिरो ओनोडा चे कमांडिंग ऑफिसर त्याकाळी असणाऱ्या मेजर योशिमी तानिगूची यांना ताबडतोब हजर राहण्याचे आदेश दिले गेले. जपान शिष्टमंडळ मेजर योशिमी तानिगूची यांना घेऊन लुबंग, फिलिपाइन्स इकडे पोहचलं. आपल्या कमांडिंग ऑफिसर चा आदेश ऐकण्यासाठी हिरो ओनोडा २९ वर्षानंतर जंगलातून बाहेर आला. बाहेर येताना पण त्याला यात काहीतरी खोटं असल्याचं वाटत होतं म्हणून तो पूर्ण तयारीनिशी समोर आला. त्याची रायफल, ५०० जिवंत काडतूस, सैनिकी तलवार, चाकू अश्या संपूर्ण सैनिकी वेशात त्याने आपल्या कमांडिंग ऑफिसर च्या आदेशानंतर फिलिपाइन्स चे तत्कालीन राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस यांच्या समोर ११ मार्च १९७४ ला आपली सैनिकी तलवार त्यांना देऊन आपण शरण येत असल्याचं मान्य केलं. आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाला त्याने सॅल्यूट केला. पण कुठेतरी जपान हे युद्ध हरला हे मानायला तो आयुष्याच्या शेवटपर्यंत तयार नव्हता. जपान मधे त्याच प्रचंड स्वागत झालं. त्याच्या देशभक्तीला जपान ने ही तर संपूर्ण जगाने सॅल्यूट केला. 

वयाच्या ९१ व्या वर्षी ६ जानेवारी २०१४ ला हिरो ओनोडा इतिहासाच्या पानात लुप्त झाला. पण आपल्यामागे अनेक पिढयांना मार्गदर्शन करेल असं आयुष्य जगून गेला. देशभक्ती, निष्ठा, निर्धार, वचन काय असते याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच 'हिरो ओनोडा'. तो नावाप्रमाणेच जगला. आपला देश हरला याच मारताना ही  त्याला सगळ्यात जास्त दुःख होतं. जपान मधे परत आल्यावर पण त्याने जपान ने पुन्हा एकदा युद्ध करून आपली गमावलेली पत पुन्हा परत घेतली पाहिजे यासाठी तो आग्रही राहिला. हिरो ओनोडा एक दंतकथा बनला. तब्बल २९ वर्ष जंगलात राहून तो फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी लढला. त्याच्या या वृत्तीला सॅल्यूट करताना फिलिपाइन्स च्या राष्ट्रपती नी त्याच्यावर असलेल्या अनेक फिलिपिनो लोकांच्या हत्येसाठी आणि सैनिकांच्या आरोपातून त्याला दयेच्या अधिकाराने माफ केलं. देशभक्ती आणि पराक्रमाची एक वेगळीच गाथा लिहणाऱ्या पराक्रमी हिरो ओनोडाला माझा कडक सॅल्यूट. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   




Friday 20 May 2022

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २२)... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २२)... विनीत वर्तक ©

सध्या भारतासह संपूर्ण जगावर आर्थिक संकट घेऊन येणारे खारे वारे वहात आहेत. पुढे येणाऱ्या अनेक गोष्टींची चाहूल या वाऱ्यांनी द्यायला सुरवात केलेली आहे. त्याची काही ताजी उदाहरणं आपल्या समोर आहेत. आर्थिक वादळात रूपांतरित होऊ पाहणाऱ्या या खाऱ्या वाऱ्यांना मतलई वाऱ्यांची ही साथ मिळताना दिसत आहे. एकूणच काय की येणारा काळ कठीण असणार आहे. गेल्या काही वर्षात जगभर झालेल्या उलथा पालथीमुळे अश्या प्रकारचं संकट येणार याची शक्यता जगातील अनेक अर्थ तज्ञ आणि आर्थिक विश्लेषण करणाऱ्या संस्थांनी मांडलेली होती. या आर्थिक संकटाला अनेक कारणं असली तरी येत्या काळात घडलेल्या काही गोष्टींनी त्याच स्वरूप रौद्र केलं आहे. या कोणत्या गोष्टी आहेत? आणि या वादळाचा आपल्या आयुष्यावर काय परीणाम होणार आहे? हे आपण समजून घेतलं पाहिजे.   

कोविड च्या साथीने हादरलेली जगाची घडी रुळावर येत असताना रशिया- युक्रेन युद्धामुळे पुन्हा एकदा ती संपूर्णपणे विस्कटली आहे. गेली २ वर्ष कोव्हीडमुळे जगातील अनेक देशांच आर्थिक नियोजन संपूर्णपणे बिघडवलेलं आहे. विशेष करून ज्या देशांची आर्थिक भिस्त पर्यटनावर होती. त्यांना याचा सगळ्यात मोठा फटका बसला आहे. त्याच सोबत जागतिक राजकारणात 'फुकट' या शब्दाने केलेला प्रवेश. जगातील अनेक राजकारण्यांनी, त्यांच्या पक्षाने आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी फुकट आणि सवलत या दोन गोष्टींचा वापर उदार हस्ते करायला सुरवात केली. जगात काहीच फुकट मिळत नसताना लोकांना फुकट मिळण्याची केलेली व्यवस्था आणि सवय देशाच्या आर्थिक ताळेबंदावर विपरीत परीणाम करायला लागली. सवलत हा त्याचा दुसरा भाऊ. लोकांना सवलतीत गोष्टी उपलब्ध करताना सवलतीसाठी लागणारा पैसा आणि त्याच नियोजन याबद्दल कोणताही विचार न करता लोकांच्या भावना सुखावणारे निर्णय घेऊन त्याचा अधिभार देशाच्या आर्थिक स्थितीवर पडायला लागला. याच सगळ्यात स्पष्ट उदाहरण म्हणजे 'श्रीलंका'. 

आर्थिक नियोजन हे देशाचं करायचं असते हा विचार राजकारण्यांनी बाजूला ठेवला. अचानक उद्भवलेले कोविड संकट, रशिया- युक्रेन युद्ध यामुळे नियोजनाचं आधीच रुतलेले चाक अजून खोल रुतत गेलं. ही अवस्था एका देशाची नाही तर जगातील ६९ देश या आर्थिक चक्रात संपूर्णपणे रुतल्याच आता स्पष्ट होते आहे. जगातील प्रत्येक ५ माणसांमागे १ माणूस आज आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. हे ६९ देश श्रीलंके प्रमाणे आर्थिक दिवाळखोरी आणि संपूर्णपणे अराजकतेत अडकतील असा अहवाल जागतिक बँकेने सादर केलेला आहे. पाकिस्तान ने आर्थिक दिवाळखोरी जवळपास जाहीर केली आहे. पाकिस्तानकडे सध्या फक्त १०.५ बिलियन अमेरीकन डॉलर च परकीय चलन आहे. जे फार फार तर जून २०२२ पर्यंत गरज भागवू शकेल. त्या नंतर पाकिस्तान ची अवस्था श्रीलंकेसारखी झाल्यास मला तरी आश्चर्य वाटणार नाही. आज डॉलर च्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची किंमत २०० रुपया पर्यंत घसरलेली आहे. पाकिस्तान पाठोपाठ नेपाळ आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. फक्त ६ महिने पुरेल इतकच परकीय चलन नेपाळकडे आहे. भारताची स्थिती मजबूत असली तरी भारताला याचे चटके बसत आहेत. भारताचं परकीय चलन जवळपास ६०० बिलियन अमेरिकन डॉलर इतकं असल तरी गेल्या काही महिन्यात आपण जवळपास ३ बिलियन अमेरीकन डॉलर गमावलेले आहेत. 

कोविडमुळे एकीकडे जिकडे आर्थिक नाकाबंदी झाली त्याचवेळी रशिया- युक्रेन युद्धामुळे ऊर्जा आणि अन्नधान्य यांची नाकाबंदी झालेली आहे. त्यात वाढलेलं तापमान, पूर आणि एकूणच जागतिकारणाचे झालेले परीणाम  यामुळे संपूर्ण जग एकप्रकारे कोंडीत सापडलेलं आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसल्या तरी काही गोष्टी आपल्यामुळे घडलेल्या आहेत. या देशांच आर्थिक नियोजन फसलं ते फुकट आणि सवलतींमुळे. भारतातील काही राज्यांची स्थिती अशीच आहे. लाईट, पाणी, गॅस आणि इतर गोष्टी फुकट देण्याची आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या नेत्यांनी राज्यांच्या आर्थिक नियोजनाची संपूर्णपणे वाताहत केलेली आहे. आज भारतातील पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश सारखी राज्य आज आर्थिक दिवाळखोरीच्या रस्त्यावर आहेत. तरी तिथले नेते आज ३०० युनिट वीज मोफत, गॅस सबसिडी, शेतकऱ्यांची कर्जे माफ करत आहेत. त्यामुळे उद्या येणाऱ्या आर्थिक दिवाळखोरीकडे वेगाने वाटचाल करत आहेत. 

आर्थिक नियोजन हा मुद्दा कोणत्याही देशासाठी आणि राज्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आपण आपल्याला झेपेल इतकच कर्ज घेतलं पाहिजे. वेळ प्रसंगी कठोर आर्थिक निर्बंध ही काळाची गरज बनते. आज रशिया- युक्रेन युद्धामुळे जगातील बाजारात क्रूड तेलाचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. या भावात सरकार मग ते कोणतंही असो सबसिडी देत गेलं तर सबसिडी चा पैसा देश कुठून उभा करणार? म्हणजे तो पैसा उभा करायला कर्ज घ्या. ते कर्ज फेडायला अजून कर्ज घ्या पण आपल्या लोकांकडून त्याचा मोबदला घेण्याची मानसिकता सरकारची नसेल तर तो देश किंवा राज्य आर्थिक दिवाळखोरीत जाणार हे स्पष्ट आहे. यासाठी कोणत्या अर्थ तज्ञाने इशारा देण्याची गरज नाही. श्रीलंकेत लोकांना हेच आमिष दिलं गेलं. आज त्या फुकट च्या मोहापायी चार- पाच पट  जास्ती पैसे देऊन सुद्धा अन्न मिळण्याचे वांदे झाले आहेत. आज फुकट देणारे बिळात लपले आहेत. देश विकला गेला आहे. सगळीकडे अराजकता माजलेली आहे. करणारे बाजूला झाले भोगावं तिथल्या जनतेला लागत आहे. हिच परिस्थिती येत्या काही महिन्यात पाकिस्तान आणि नेपाळ ची होणार आहे. 

जितकं जास्ती काळ रशिया- युक्रेन युद्ध सुरु राहणार तितके जास्ती देश या वादळात उध्वस्थ होणार आहेत. जे देश फुकट आणि सवलती च्या रस्त्याने पुढे जाणार ते आता नाही तर पुढे नक्कीच गोत्यात येणार आहेत. हे सगळं दुष्टचक्र थांबवायचं असेल तर आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही. फुकट, सवलत, आरक्षण हे सगळ्याच क्षेत्रात बंद करण्याची गरज आहे. कारण त्यातून विलासीवृत्ती, चंगळवाद , कर्तृत्व शून्यता अश्या वृत्ती जोपासल्या जातात. भ्रष्टाचार वाढत जातो. समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक, वित्तीय आणि शैक्षणिक सहाय्य हा भारताच्या लोकशाहीचा मूलभूत पाया असला तरी त्याचा फायदा ज्या पद्धतीने समाजातील विकसित आणि पुढारलेले लोकं घेत आहेत त्यावर अंकुश ठेवणं काळाची गरज आहे. 

एक साधं उदाहरण आज कोव्हीड लस जी जास्तीत जास्त १००० रुपयाला उपलब्ध होती. जी भारतातील जवळपास ७०% ते ८०% लोकं पैसे मोजून घेऊ शकत होते. त्यांनी ती फुकट मिळावी म्हणून किती अट्टाहास केला. आज ती अनेकांनी फुकट टोचली पण असा विचार केला की त्याला लागणारे पैसे एक राष्ट्र म्हणून भारताला मोजावे लागले. अर्थात हा विचार आणि तो अमलात आणण्याची वृत्ती आज आपल्या खरे तर संपूर्ण जगात याची कमतरता आहे. त्यामुळेच आर्थिक दिवाळखोरी या सर्व राष्ट्रांच्या उंबरठ्यावर आहे. तूर्तास यातून शिकून आपण आर्थिक नियोजन येत्या येणाऱ्या वादळासाठी करण्याची नितांत गरज आहे. पेट्रोल-डिझेल सह, अन्नधान्य आणि एकूणच राहणीमानाचा स्तर राखणे कठीण होणार आहे. तेव्हा या बदललेल्या वाऱ्यांची दिशा ओळखून आपण सावध झालं पाहिजे. 

जय हिंद!!!

क्रमशः 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   



Wednesday 18 May 2022

डेफलिम्पिक... विनीत वर्तक ©

 डेफलिम्पिक... विनीत वर्तक ©

डेफलिम्पिक हा शब्द अनेक भारतीयांसाठी नवा असेल. आत्ता कुठे क्रिकेट सोडून आमचं लक्ष गेल्या काही वर्षात ऑलम्पिक स्पर्धांकडे वळाल. त्यातून मग भारताने पॅराऑलम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यावर आमच्या लक्षात आलं की अश्या पद्धतीचं पण ऑलम्पिक असते. हाच विचार अनेकांच्या मनात आला असेल. १४० कोटी लोकसंख्या असणारा देश क्रिकेट सारख्या खेळात इतका गुंतलेला असतो की त्या शिवाय दुसरं काही खेळात करीअर नाही अशीच भावना अनेक भारतीयांची काही वर्ष आगोदर होती. पण क्रिकेट पलीकडे जेव्हा इतर खेळांच्या मूलभूत विकासासाठी लक्ष दिलं गेलं. त्याचे परीणाम आता दिसायला लागले आहेत. २०२० मधे झालेल्या ऑलम्पिक आणि त्या पाठोपाठ झालेल्या पॅराऑलम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा चढता आलेख या खेळांकडे भारतीयांना खिळवून ठेवून गेला. हळूहळू का होईना भारतीय प्रेक्षक आणि भारतीय खेळाडू आता क्रिकेट च्या गर्तेतून बाहेर पडून खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धांना जागतिक म्हंटल जाते त्याकडे लक्ष द्यायला लागले आहेत. त्याचाच एक पुढला टप्पा म्हणजे 'डेफलिम्पिक'. 

डेफलिम्पिक ही इंटरनॅशनल ऑलम्पिक कमिटी म्हणजेच (IOC) कडून आयोजित केली जाणारी जागतिक स्पर्धा आहे. यात ज्या व्यक्तींना ऐकू येत नाही. शिटी, बंदुकीच्या गोळीचा आवाज, हॉर्न अश्या कोणत्याही आवाजाला पकडण्याची क्षमता नाही अश्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. १९२४ पासून प्रत्येक ४ वर्षांनी ही स्पर्धा होत असते. आजवर भारतीय खेळाडूंचा यातील प्रभाव एक प्रकारे दुर्लक्षित होता. खेळाडू, क्रीडा मंत्रालय, सरकार आणि एकूणच राजकीय पातळीवर अश्या स्पर्धांकडे लक्ष दिलं जात नव्हतं. अर्थात याकडे दुर्लक्ष होण्याचा सगळ्यात मोठा वाटा भारतीयांचा आहे. कारण जगात क्रिकेट सोडून कोणते खेळ आणि स्पर्धा असतात हेच इतके वर्ष त्यांच्या ध्यानीमनी नव्हतं. गेल्या काही वर्षात मात्र अश्या स्पर्धांकडे आणि खेळांकडे सरकारी पातळीवर लक्षणीय बदल झाला. अश्या स्पर्धांमधे भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी आणि तसे खेळाडू घडवण्यासाठी पावलं टाकली गेली. त्याचाच परीणाम नुकत्याच पार पडलेल्या डेफलिम्पिक या जागतिक स्पर्धेत दिसून आला आहे. 

भारताने कॅक्सिस डो सुल, ब्राझील इकडे पार पडलेल्या डेफलिम्पिक स्पर्धेत ८ सुवर्ण पदकं , १ रोप्य पदक तर ९ कांस्य पदकांची कमाई केली आहे. हे भारताचा या स्पर्धेतील आजवरच सगळ्यात चांगल प्रदर्शन राहिलेलं आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ६५ भारतीय खेळाडू पात्र ठरले जे आजवरचे सगळ्यात जास्त आहेत. भारताने एकूण २१ पदकांची कमाई केली. ज्यात बॅडमिंटन सांघिक विजयाची पदके आहेत. भारतीय खेळाडूंनी ११ वेगवेगळ्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. भारताने पदतालिकेत आजवरचा सगळ्यात चांगला क्रमांक म्हणजेच ९ व स्थान पटकावलं. ५ मेडल भारताला शूटिंग मधे तर ४ मेडल बॅडमिंटन मधे मिळाली आहेत. जर्लीन अनिका या एकटीने बॅडमिंटन खेळात ३ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. माझ्या मते तीन ऑलम्पिक मेडल मिळवणारी  पहिली भारतीय खेळाडू असेल. 

२१ मे ला भारतीय पंतप्रधानांनी संपूर्ण डेफलिम्पिक खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांच अभिनंदन आणि भारताच्या तिरंग्याची शान जागतिक स्पर्धेत वाढवल्याबद्दल सर्वाना त्यांच्या निवासस्थानी जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. ही भेट या सर्वच खेळाडूंना एक नवीन आत्मविश्वास देईल या बद्दल माझ्या मनात शंका नाही. सरकारी पातळीवर हे बदल नक्कीच आनंददायी आहेत पण त्याच सोबत आपण भारतीयांनी क्रिकेट इतर खेळंबद्दल असलेल्या दृष्टिकोनात बदल करण्याची गरज आहे. हा बदल जेव्हा होईल तेव्हा ऑलम्पिक सारख्या जागतिक स्पर्धेत भारत एक नवीन उंची गाठेल असं मला मनापासून वाटते. 

डेफलिम्पिक स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंच अभिनंदन आणि त्यांच्या पुढल्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Tuesday 17 May 2022

विजयाचे शिल्पकार... विनीत वर्तक ©

 विजयाचे शिल्पकार... विनीत वर्तक ©

रविवारी भारताने अतिशय प्रतिष्ठेचा आणि बॅडमिंटन या खेळातील वर्ल्ड कप मानल्या गेलेल्या थॉमस कप स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. भारताच्या या विजयाची तुलना १९८३ साली भारताने जिंकलेल्या क्रिकेट विश्वकप स्पर्धेशी करता येईल. या स्पर्धेअगोदर पर्यंत भारतीय क्रिकेट संघ क्रिकेट च्या क्षितिजावर कुठेच नव्हता. काही चांगले खेळाडू भारतीय क्रिकेट मधे झाले होते आणि त्या वेळेस संघाचा भाग होते. पण एक संघ म्हणून भारत क्रिकेट जगतात कुठेच नव्हता. अगदी तशीच परिस्थिती आज भारताची बॅडमिंटन स्पर्धेत होती. बॅडमिंटन च्या इतिहासात काही निवडक खेळाडू जसे की प्रकाश पदुकोण, पी. गोपीचंद, सायना नेहवाल आणि व्ही. सिंधू ते आता संघाचा भाग असलेला कधी काळी जागतिक मानांकन स्पर्धेत क्रमांक एक राहिलेला के.श्रीकांत. पण या सगळ्यांन पलीकडे भारतीय बॅडमिंटन संघ अशी दखल कोणीच घेतली नव्हती. १९८३ च्या विजयानंतर भारतीय क्रिकेट ला जी कलाटणी मिळाली आज तीच कलाटणी भारतीय बॅडमिंटन ला रविवारच्या विजयामुळे मिळाली आहे. त्यामुळेच या विजयाचे अनेक शिल्पकार आहेत. काही पडद्यासमोरचे तर काही पडद्यामागचे. त्या सर्वांच आपण भारतीय म्हणून अभिनंदन केलं पाहिजे. 

१९०० साली जॉर्ज ऍलन थॉमस या ब्रिटिश खेळाडूने बॅडमिंटन या खेळासाठी फुटबॉल विश्वचषक आणि टेनिस मधील डेव्हिस कप प्रमाणे सांघिक स्पर्धा जागतिक स्तरावर घेण्यात यावी अशी कल्पना मांडली. १९४८ साली त्याच्या कल्पनेला मूर्त स्वरूप मिळालं. त्याच्याच नावाने हे बक्षीस द्यायचं निश्चित केलं गेलं. प्रत्येक दोन वर्षांनी ही स्पर्धा होते व यात जगातील १६ देशांचे संघ भाग घेतात. आजवर झालेल्या ३२ स्पर्धांपैकी फक्त १३ वेळा भारत या शेवटच्या १६ संघात पात्र ठरला होता. याही वर्षी सामील झालेला भारतीय संघ हा एकमेव असा संघ होता ज्याचा खर्च कोणीही स्पॉन्सर केलेला नव्हता. त्यांच्या टी शर्ट अथवा पॅन्ट किंवा रॅकेट वर कोणत्याही स्पॉन्सर च नाव नव्हतं. यावरून लक्षात यावं की क्रिकेटमुळे इतर खेळांवर किती अन्याय भारतात केला जातो. त्यामुळेच भारतीय बॅडमिंटन संघ अंतिम फेरी पर्यंत जाईल असा कोणी स्वप्नात पण विचार केला नव्हता. 

आजवर फक्त दोन ऑल इंग्लड चॅम्पियन्स आणि दोन ऑलम्पिक मेडल जिंकलेल्या भारतातून जगातील या खेळात वरचढ आणि रँकिंग मधे अव्वल असलेल्या देशांना भारतीय संघ मात देईल हा विश्वास खुद्द भारतीय संघाला नव्हता. पण म्हणतात न जेव्हा गमावायचं काही नसते तेव्हा सर्वस्व पणाला लावायला माणूस कचरत नाही. एक- एक गेम जिंकत भारताची वाटचाल पुढे सरकत राहिली. प्रत्येक गेम नंतर आत्मविश्वास वाढत गेला. लक्षात घ्या की या स्पर्धेत विजय मिळवला म्हणून त्यांचे रँकिंग वाढणार नव्हतं की त्यांना भरघोस रक्कम पुरस्कारातून मिळणार होती. फक्त एकच लक्ष्य की तो तिरंगा एकदा फडकवायचा आणि ट्रॉफी भारतात आणायची. मलेशिया आणि डेन्मार्क सारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना मात दिल्यावर अंतिम फेरीत गाठ होती ती गतविजेता आणि तब्बल १४ वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या इंडोनेशिया शी. इंडोनेशिया ची टीम जबरदस्त होती. त्यांचा धाक इतका होता की प्रतिस्पर्ध्याला स्पर्धेआधीच पराभवाची चाहूल लागावी. मोहम्मद एहसान आणि केविन संजया यांनी भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज राणिकारेड्डी यांना तब्बल ११ - ० अशी मात दिल्याचा इतिहास दाखवत होता. त्यामुळे भारतीय बॅडमिंटन टीम अंडर डॉग वगरे पण नव्हती. फक्त या वेळेस किती फरकाने हरणार याची वाट जगातील बॅडमिंटन तज्ञ बघत होते. 

सांघिक स्पर्धेत तुम्हाला स्वतःचे इगो बाजूला ठेवून खेळ खेळायचा असतो. वेळ प्रसंगी आपल्या जोडीदाराला एक पाऊल पुढे जायला द्यायचं असते. जेव्हा ही भावना प्रबळ होते तेव्हा आणि तेव्हाच संघ म्हणून तो देश जिंकतो. सिंगल, डबल अश्या दोन्ही वेळेस प्रत्येकाने आपलं सर्वोत्तम द्यायचं असते. पण भारतात बॅडमिंटन खेळाडू बनणं इतकं सोप्प आहे का? एक काळ होता जेव्हा भारतीय संघाचा राष्ट्रीय प्रशिक्षक पी.गोपीचंद सामना झाल्यावर कोर्टवर पडलेली शटर्स गोळा करून त्याचा वापर शिकण्यासाठी करत असे. त्या दिवसात देशाचं प्रतिनिधित्व स्वखर्चातून करावं लागत होतं. तुम्ही जिंकलात तर ते देशासाठी आणि हरलात तर स्वतःसाठी स्वखर्चाने. पी. गोपीचंद ला इंग्लड ला पाठवण्यासाठी त्याच्या आईला दागिने विकावे लागले. वडिलांनी वडिलोपार्जित जमीन विकली, कर्ज काढलं. पी. गोपीचंद ची आई स्वतः कॉल करून टी. व्ही. आणि न्यूज चॅनेलला त्याच्या खेळाची माहिती देत असे. पण टी.आर.पी. साठी चालणारा मिडिया दखल सुद्धा घेत नव्हता. इतकच काय तर खेळाडूंना घेण्यासाठी भारतातल्या क्रीडा मंडळाचे कोणतेच प्रतिनिधी हजर नसत. पण पी. गोपीचंद ने जिद्द न हारता आपल्या डॉक्टर ला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी ऑल इंग्लड चॅम्पियन्स जिंकून दाखवलेली होती. 

खेळातून निवृत्त झाल्यावर बॅडमिंटन या खेळाला देशात नाव देण्यासाठी त्याने मनापासून प्रयत्न केले. एक बॅडमिंटन अकॅडमी उघडण्यासाठी सगळ्या लाल फितीच्या अडचणी आणि अक्षरशः प्रत्येक वीट बांधत त्याने ती उभी केली. एक कोच म्हणून पी. गोपीचंद ने बॅडमिंटन कसा प्रोफेशनली खेळायचं हे भारताच्या नवीन पिढीला शिकवलं. त्याचाच परीणाम म्हणजे आज जगातील पहिल्या सर्वोत्तम ३० खेळाडूंपैकी ७ खेळाडू हे त्याच्या अकॅडमी मधून तयार झालेले आहेत. रविवारी जिंकलेल्या थॉमस कप स्पर्धा जरी भारतीय खेळाडूंनी जिंकली असली तरी पडद्यामागे सिंहाचा वाटा पी. गोपीचंद चा आहे. आज एकापेक्षा एक बॅडमिंटन खेळाडूंचा उदय भारतीय क्षितिजावर होतो आहे. बॅडमिंटन खेळाला करीअर म्हणून स्वीकारणारे जवळपास ३००० नव्या दमाचे खेळाडू पी. गोपीचंद च्या अकॅडमी मधे तयार होत आहेत. त्यांच्यासाठी भारताचा हा विजय पुढे येणाऱ्या एका सुवर्ण काळाची एक सुरवात आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 

आज भारताच्या बॅडमिंटन असोसिएशन ने १ कोटी रुपयांच बक्षीस भारतीय चमू ला तर २० लाख रुपयांच बक्षीस सपोर्ट स्टाफ ला जाहीर केलं आहे. क्रिकेट मधे खेळल्या जाणाऱ्या जुगारापेक्षा ही रक्कम कुठेच नाही. एक आय. पी.एल. खेळाडू काहीच न करता १० ते १५ कोटी कमावतो. पण देशासाठी बॅडमिंटन स्पर्धेत जिंकलेल्या सर्वांसाठी एक कोटी रुपये ही रक्कम निश्चित कमी आहे. पण मला कुठेतरी आशा आहे की चक्र फिरायला लागलं आहे. या विजयानंतर १९८३ सारखा बदल बॅडमिंटन च्या वाट्याला नक्कीच येईल. के. श्रीकांत, लक्ष्य सेन, चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज राणिकारेड्डी ही नाव भारतीयांच्या मनावर आता अधिराज्य करतील असं मला मनापासून वाटते.

राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गोपीचंद, टीम मॅनेजर विमल कुमार आणि या स्पर्धेत भाग घेऊन भारताचा तिरंगा पहिल्यांदा फडकवणाऱ्या सर्व बॅडमिंटन खेळाडूंना माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या पुढल्या प्रवासासाठी शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   





Saturday 14 May 2022

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २१)... विनीत वर्तक ©


 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २१)... विनीत वर्तक ©

"We have urged for a ceasefire. No one will win this war. All will lose. That's why, we are in favour of peace," ... नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत  

जर्मनी च्या दौऱ्यावर असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिन, जर्मनी इकडे भारताची भुमिका स्पष्ट केली होती. रशिया- युक्रेन मधील युद्धाची सुरवात यापेक्षा रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारी २०२२ मधे आक्रमण केलं असं लिहिणं जास्त संयुक्तिक राहील. आज या घटनेला जवळपास ३ महिन्यांचा कालावधी होत आला पण नक्की हे युद्ध कोण जिंकणार किंवा कधी संपणार याबद्दल आजही जग सांशक आहे. कारण सध्या असलेली परिस्थिती अतिशय किचकट आहे. काही थोर अभ्यासकांनी भारताने रशियाची साथ सोडावी, युक्रेनला पाठिंबा द्यावा अश्या आशयाची मांडणी केली. कारण भारताने तसं केलं तर हेच अभ्यासक ७० वर्षाची काही पूर्व राजकारण्यांनी रशियाशी केलेली मैत्री कशी पाण्यात घालवली यावर रकाने भरून लेख लिहतील. रशिया सोबत राहिलं तर मानवतेच्या दृष्टिकोनातून राजकारण्यांनी विचार केला नाही अशी आवई उठवतील. या सर्वावर बर्लिन इकडे भारतीय पंतप्रधानांनी केलेलं वक्तव्य अतिशय सूचक आहे. आम्ही कोणाच्या बाजूने नाहीत. या युद्धातून कोणीच जिंकणार नाही आणि सगळेच हरतील. मुळात सद्य परिस्थितीच आकलन सगळ्यात चांगल्या पद्धतीने भारताने केलं आहे. ते का? आणि कस हे इकडे आपण समजून घेणं गरजेचं आहे. 

१) रशियाने युक्रेन सोबत युद्ध केलं कशाला? 

या आधीच्या लेखात मी लिहिलं होतं की युद्धाची कारणं काय होती. युक्रेन ने नाटो सोबत जाणं रशियाला अजिबात मान्य नव्हतं आणि तोच सगळ्यात मोठा अडसर आजही आहे. युक्रेन असाही आधी रशियाचा भाग होता. तो आजही ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि समाजाने एकमेकांशी जोडलेला आहे. त्यामुळे रशियाच युक्रेन च्या राजकारणात तिथल्या परिस्थितीवर एक अदृश्य प्रभाव राहिलेला आहे. हाच प्रभाव अजून वाढवण्यासाठी, युक्रेनला युरोपियन आणि अमेरिकेपासून दूर करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी एक आरपार ची कारवाई करण्याचं ठरवलं आणि ती प्रत्यक्षात अमलात आणली. 

२) या युद्धात कोण बरोबर कोण चुकीचं? हे युद्ध कोण जिंकेल? 

असं म्हणतात युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असते. त्यामुळे कोण बरोबर आणि कोण चूक या विचाराला काही अर्थ नसतो. पण या युद्धाने दोन्ही देशातील फरक मात्र उघडे केले आहेत. रशिया जिकडे तात्विक दृष्ट्र्या बरोबर आहे तिकडेच सैनिकी दृष्टीने बघता संपूर्णपणे चुकलेली आहे. जेव्हा हे युद्ध सुरु झालं तेव्हा मी लिहिलं होतं की फार फार तर ७२ तासात रशिया युद्धापेक्षा आपली सैनिकी कारवाई पूर्ण करेल. हा अंदाज जगातील युद्ध क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांचा ही होता. या अंदाजाला काही कारणं होती. ती म्हणजे रशिया आणि युक्रेनची सैनिकी शक्ती. कागदावर रशिया ची सेना त्यांची आयुध, मिसाईल, लढाऊ विमान, रणगाडे इत्यादी बाबतीत युक्रेन जवळपास कुठेच बसत नव्हता. रशियाच वायू दल युक्रेनपेक्षा १० पट मोठं आहे. जेव्हा लाखो सैनिक युक्रेन च्या सरहद्दीवर उभे राहून युक्रेन मधे प्रवेश करतील तेव्हा अवघ्या काही तासात युक्रेन च्या तटबंद्या ढासळतील असा अंदाज पुतीन, जगातील संरक्षण क्षेत्रातील विश्लेषक या सर्वांना होता. पण एका गोष्टीच आकलन करण्यात सगळेच कमी पडले. 

जवळपास ४५० वर्षापूर्वी महाराष्ट्रात औरंगजेब ही असच सैन्य घेऊन उतरला होता. आपणही बघता बघता महाराष्ट्रावर एकछत्री अंमल प्रस्थापित करू असा त्याचा अंदाज होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली अवघ्या काही शेकडो मावळ्यांनी त्याच्या लाखाच्या सैन्याची वाताहात केली. आज हे सगळं सांगण्याचं कारण इतकच की आज रशिया- युक्रेन युद्धात कागदावर अतिशय वरचढ असणारा रशिया प्रत्यक्ष युद्धात चाचपडताना दिसतो आहे. रशियाने जरी युक्रेनमधील काही प्रांत जिंकला असला आणि युक्रेनच मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं असलं तरी विजयापासून रशिया आणि त्यांच सैन्य खूप लांब आहे. 

कोणत्याही सैन्यासाठी सगळ्यात महत्वाचं असते ते त्याच मनोबल. त्याच खच्चीकरण झालं की अर्ध युद्ध तिकडेच हरतो. रशियन सैन्याला कोणतीही तयारी न करता पुतीन यांनी युक्रेनवर ताबा घेण्याचे आदेश दिले. आपण कारवाई कशी करणार? नक्की काय त्यातून मिळवायचं आहे? त्या आक्रमणाची व्यूहरचना कशी  असेल? युद्धात सैन्याला इंधन, दारुगोळा आणि अन्न याची व्यवस्था काय असेल? जर युक्रेन ने प्रतिकार केला तर आपली व्यूहरचना कशी असेल? जर आपल्याला एखाद्या ठिकाणी माघार घ्यायला लागली तर त्यासाठी प्लॅन बी काय असेल? सगळ्यात महत्वाचं आपण नक्की लढाई कुठपर्यंत आणि कितीवेळ चालू ठेवायची? याचा कोणताही अभ्यास न करता सैन्याला पुढे जाण्याचे आदेश दिले गेले. 

रशियन सैन्य मजबूत असताना पण आपण आपल्याच लोकांवर गोळ्या का चालवतो आहोत? आपण नक्की एखाद्या शहरावर आक्रमण करून जिंकल्यावर काय करायचं? याची कोणतीच कल्पना त्यांना नव्हती. सगळ्यात मोठी अडचण ठरली ती रसद. पुढे गेलेल्या रशियन सैन्याला रसद मिळायला अडचणी सुरु झाल्या. रणगाडा घेऊन आलो तर युक्रेन मधे पण त्याला लागणारं डिझेल नसेल तर रणगाडा युक्रेन च्या रस्त्यावर सोडून रशियन सैन्य माघारी फिरत होतं. हिच अवस्था बाकीच्या बाबतीत. पेट्रोल,डिझेल, टायर, गोळ्या, जेवण, पाणी या गोष्टींची रसद त्यांच्या पर्यंत पोचवायला अडचणी यायला लागल्या. याच वेळी युक्रेन सैन्याने रशियन सैन्याचे कच्चे दुवे ओळखून तिकडेच संघर्ष केला. मैदानात समोरासमोर लढण्यापेक्षा त्यांना शहरात येऊन मग त्यांच्यावर गनिमी पद्धतीने हल्ले सुरु केले. युक्रेन च्या सैन्याला तिथल्या गल्ली बोळांची अचूक माहिती होती तर रशियन सैन्य या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ होतं. युक्रेन सैन्याने रशियन सैन्याच्या रसदीवर आक्रमण केलं. त्यांची रसद थांबवली. याचा परीणाम म्हणजे अनेक ठिकाणी जिंकलेला भूभाग सोडून रशियन सैन्याला माघारी परतावं लागलं. 

युक्रेन ला जरी नाटो ने आपल्यात स्थान दिलं नसलं तरी अमेरिका सह इतर नाटो राष्ट्रांनी रशियाला थोपवून धरण्यासाठी आपली हत्यार अक्षरशः युक्रेन मधे ओतली. अमेरिकेने दिलेल्या गन आणि अँटी टॅंक मिसाईल सिस्टीम नी रशियाच्या रणगाड्यांची अक्षरशः धूळधाण उडवलेली आहे. रशियाच वायू दल अद्यावत लढाऊ विमान असताना सुद्धा एअर सुप्रीमसी मिळवण्यात अयशस्वी ठरलं. रशियाची लढाऊ विमान एन्टी एअरक्राफ्ट मिसाईल ची लक्ष्य झाली. आत्तापर्यंत ७००० रशियन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर जवळपास २०,००० ते ४०,००० रशियन सैनिक जखमी झाले आहेत. हा आकडा अमेरिकेने गेल्या २० वर्षात अफगाणिस्तान मधे गमावलेल्या सैनिकांन इतका आहे. रशियाने २० वर्षातले सैनिक दोन महिन्यात गमावलेले आहेत. जवळपास जनरल लेव्हल च्या ७ रशियन सैन्य अधिकाऱ्यांचा यात मृत्यू झाला आहे. याचा अर्थ रशिया हरते आहे असा नाही. 

रशियाने तोडीस तोड नुकसान युक्रेन च केलं आहे. आत्तापर्यंत ४ मिलियन ( ४० लाख ) युक्रेन नागरिकांनी देश सोडला आहे. रशियाने मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. ज्यात शहराच्या शहर बेचिराख झाली आहेत. युक्रेन मधील त्या शहरात पुन्हा लोकवस्ती होऊ शकणार नाही इतकं नुकसान झालेलं आहे. जवळपास ४००० युक्रेनियन सैनिक मारले गेले आहेत. कित्येक हजारो जखमी आहेत. २००० पेक्षा जास्त निष्पाप युक्रेनचे नागरिक यात मारले गेले आहेत. प्रत्येक दिवशी या आकड्यात वाढ होते आहे. रशियन सैन्याने आपली स्ट्रॅटर्जी आता बदललेली आहे. पण त्यांची आगेकूच चालू आहे. युक्रेन त्यांना तोंड देतो आहे. एकूणच काय तर कोणा एका राष्ट्राचा यात विजय होणं ही शक्यता जवळपास संपुष्टात आलेली आहे. जोवर हे युद्ध सुरु राहणार तोवर दोन्ही बाजूने नुकसानीचे आकडे वाढत जाणार. 

३) यात भारत  कुठे आहे? भारताच्या दृष्टीने हे युद्ध  चांगलं की वाईट? भारताची भुमिका योग्य की अयोग्य? 

भारताची भूमिका यात अतिशय योग्य आहे असं माझं वयक्तिक मत आहे. आपण कोणाची बाजू घ्यायची तशी गरज नाही. युद्ध वाईट आहे. चालू असलेला नरसंहार थांबवावा हीच भारताची भूमिका आहे. कारण या युद्धात कोणीच जिंकणार नाही हे स्पष्ट आहे. पण या युद्धामुळे जागतिक अर्थ व्यवस्थेची घडी मात्र रुळावरून घसरलेली आहे हे निश्चित आहे. रशिया, युक्रेन हे दोन्ही देश गहू आणि सूर्यफूल या दोघांच्या निर्यातीत जगात खूप वरच्या क्रमांकावर आहेत. साहजिक तिकडून यांची निर्यात थांबल्याने त्याचा फटका भारताला बसणार आहे. गव्हाच्या किंमतीत खूप वाढ झालेली आहे. त्यामुळेच भारताने गव्हाच्या निर्यातीवर प्रतिबंध लावले आहेत. खनिज तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेत वाढल्या आहेत. रशिया खूप मोठा पुरवठादार असल्याने आवक कमी आणि मागणीत वाढ झाली आहे. जरी भारताने रशियाकडून स्वस्त दरात क्रूड ऑइल घ्यायला सुरवात केली तरी ते भारताच्या एकूण गरजेचा १% हिस्सा व्यापत. त्यामुळे भारतात पेट्रोल, डिझेल दरवाढ होणं अपेक्षित आहे. 

हे युद्ध थांबवण्याचे सगळे प्रयत्न भारत करत आहे. तिकडे अमेरिका हे युद्ध भडकवत आहे. समोरून रशियाने मानवतेची पायमल्ली केली अशी ओरड करायची आणि मागच्या दराने शस्त्रास्त्रांचा साठा युक्रेन मधे ओतायचा. एकीकडे युरोपियन युनियन, अमेरिका भारतावर रशिया विरोधी भूमिका घेण्यासाठी दडपण आणत आहेत. पण भारताने मांडलेली चर्चेची भूमिका त्यांना नको आहे. हे युद्ध थांबेल ते फक्त आणि फक्त तह होऊन. एकतर रशिया लढून लढून थकेल. स्वतःच जिंकलेला भूभाग घेऊन तात्पुरती युद्धबंदी करेल. कारण रशियाची अथवव्यस्था जास्ती काळ हे युद्ध सहन करू शकणार नाही. दुसरा पर्याय म्हणजे युक्रेन आणि रशियाने आपापसात चर्चा करून एक पाऊल मागे घेऊन युद्ध थांबवावं. या शिवाय अन्य कोणताही पर्याय सद्यस्थितीला शक्य दिसत नाही. 

त्यामुळेच भारतीय पंतप्रधानांनाच सूचक वक्तव्य संपूर्ण जगासाठी आत्ताच्या परिस्थितीच योग्य वर्णन आहे. भारताची या सगळ्यात भूमिका मला तरी खूप पटलेली आहे. येत्या काळात गोष्टी कश्या घडतील यावर वाऱ्यांची दिशा बदलू शकेल. पण तूर्तास जगाच्या डोक्यावर घोंगावणाऱ्या वादळाने शांत होण्यासाठी खारे आणि मतलई वाऱ्यांनी शांत होण्याची गरज आहे. त्यांना शांत करण्यात भारत येत्या काळात निर्णायक भूमिका बजावू शकतो. तसं झालं तर जागतिक पटलावर भारताचं स्थान अधिक मजबूत होईल यात शंका नाही. 

जय हिंद!!!

क्रमशः 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





Friday 13 May 2022

#अवकाशाचे_अंतरंग भाग ३... विनीत वर्तक ©

 #अवकाशाचे_अंतरंग भाग ३... विनीत वर्तक ©

१०,००० लोकांची गेली १० वर्ष अहोरात्र मेहनत आणि तब्बल १० बिलियन अमेरिकन डॉलर ( १ बिलियन =१०० कोटी) किंमत असलेली जेम्स वेब नक्की काय उलगडा करणार आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला असेल. अनेकजण हा पण विचार करत असतील की कशाला इतके पैसे खर्च केले? गरिबांना दिले असते? किंवा त्यांना घर देता आलं असतं? प्रत्येकजण आपल्या कुवती प्रमाणे विचार करतो. मला त्यात जायचं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेम्स वेब मुळे आपण अवकाशाच्या अंतरंगात नक्की काय बघणार आहोत ते जाणून घेणं मोठं रंजक आहे. 

जेम्स वेब सद्या कार्यरत असणाऱ्या हबल दुर्बिणीची जागा घेणार असा एक गैरसमज अनेकांचा आहे. जेम्स वेब दुर्बीण आणि हबल दुर्बीण पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यांची कार्यपद्धती बघितली तर असं लक्षात येईल की जेम्स वेब हबल कडून तिच्या क्षमतेमुळे निसटलेल्या रहस्यांचा वेध घेणार आहे. आपलं विश्व इतकं मोठं आणि व्यापक आहे की त्यातील अनेक रहस्य आपल्याला उलगडायची आहेत. या विश्वाच्या एका कुठल्या वाळूच्या कणा एवढ्या भागात आपला सूर्य कसा जन्माला आला? आणि त्यातून आपल्या पृथ्वीसह संपूर्ण सौरमालेची कशी निर्मिती झाली? आपल्याच सारखे अजून कोणते ग्रह, तारे या विश्वाच्या अथांग पसरलेल्या वाळूच्या कणात आहेत का? असले तर तिकडे आपल्यासारखं कोणी आहे का? नक्की हे सगळं कसं निर्माण झालं? या पसरलेल्या विश्वाची व्याप्ती किती? या विश्वातील असे अनेक प्रश्न ज्याला मूलभूत प्रश्न म्हणता येतील ते आजही मानवासाठी एक कोडं आहेत. माणूस तंत्रज्ञानातील प्रगतीचा आधार घेत याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे 'जेम्स वेब दुर्बीण'.

जेम्स वेब दुर्बीण विश्वातील अनेक रहस्य येत्या काळात उलगडणार आहे. पण तिची निर्मिती करताना काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तर शोधण्यासाठी तिचं  निर्माण केलं गेलं ते प्रश्न होते, 

१) आकाशगंगा बनतात कश्या? त्यांची वाढ कशी होते? 

मानवाने बनवलेल्या दुर्बिणी खरे तर एक प्रकारच्या टाइम मशीन आहेत. टाइम मशीन का? तर त्या विश्वाच्या अनंतात भूतकाळात जाऊन बघतात. विश्वाची अंतर इतकी मोठी आहेत की ते निर्माण झालं त्याच्या निर्मिती नंतरच्या काही प्रकाशवर्ष काळातील निघालेला प्रकाश आत्ता कुठे पृथ्वीपर्यंत येऊन पोहचतो आहे. पण काय आहे की इतकी बिलियन प्रकाशवर्ष ( शेकडो कोटी प्रकाशवर्ष) प्रवास करून आलेला प्रकाश अंधुक झालेला आहे. असं आपण त्याला आपल्या भाषेत म्हणू. अश्या प्रकाशाला बघण्यासाठी ज्या प्रमाणे एखादी सूक्ष्म वस्तू डोळ्याला भिंग लावून गोष्ट त्यातून मोठी करून बघता येते. तसच त्या अंधुक प्रकाशात काय आहे ते बघण्यासाठी आपल्याला दुर्बिणीची गरज लागणार होती. त्याच सोबत इतक्या अंधुक प्रकाशाचं अस्तित्व पकडायचं असेल तर आजूबाजूला काळोख पण हवाच. त्यामुळेच जेम्स वेब ला पृथ्वीपासून लांब पाठवलं गेलं आहे. 

जेम्स वेब पृथ्वीवर आत्ता कुठे पोहचत असलेल्या आणि आजवर मानवासाठी अदृश्य असलेल्या अंधुक प्रकाशातून चित्र दाखवणार आहे त्या तरुण आकाशगंगाच  ज्या विश्व निर्मिती नंतर लगेच जन्माला आल्या होत्या. त्याची स्थिती आणि त्यांच बदलणारं स्वरूप त्या अदृश्य प्रकाशातून जेम्स वेब जेव्हा उलगडेल तेव्हा आपल्याला एकूणच त्यांची निर्मिती कशी होते, वाढ कशी होते या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. 

२) पृथ्वी शिवाय अजून कोणत्या ग्रहावर सजीवसृष्टी आहे का? 

पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण होण्यासाठी दोन प्रमुख कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे पृथ्वी च सूर्यापासून असलेलं अंतर. पृथ्वी सूर्याच्या हॅबिटायटल झोन मधे येते. हॅबिटायटल झोन म्हणजे सूर्यापासून इतक अंतर जिकडे सूर्याचा दाह जाणवणार नाही आणि त्याचवेळी अगदी थंडी पण नसेल. दुसरं म्हणजे पृथ्वीवर सजीव सृष्टीसाठी गरजेची असलेली मूलद्रव्य जशी ऑक्सिजन, कार्बन डाय ऑक्साइड आणि इतर. तर या आधीच्या मोहिमांमधून मानवाने काही हजार ग्रह पृथ्वीसारखे शोधलेले आहेत. ज्याला 'एक्सोप्लॅनेट' असं म्हणतात. जे साधारण गुरु किंवा नेपच्यून ग्रहाच्या आकाराचे आणि त्यांच्या ताऱ्याच्या हॅबिटायटल झोन मधे आहेत  किंवा त्याच्या आसपास आहेत. पण हबल किंवा इतर दुर्बिणी त्यावर कोणत्या प्रकारची मूलद्रव्ये असू शकतात यावर प्रकाश टाकू शकत नव्हत्या. एकतर असे ग्रह लांबवर आहेत. हबल पृथ्वीजवळ असल्याने आणि तिची इन्फ्रारेड प्रकाश तरंगलांबी बघण्याची मर्यादा असल्याने आजवर आपल्याला अश्या ग्रहांवर काय वातावरण असू शकेल याचा अंदाज येत नव्हता. 

या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जेम्स वेब मधे तशी रचना केली गेली. जेव्हा असा एखादा ग्रह आपल्या ताऱ्यासमोरून परिवलन करत असतो. तेव्हा काही वेळेसाठी त्याचा प्रकाश अंधुक करतो. याच वेळी त्या प्रकाशात त्या ग्रहावर असणारा इन्फ्रारेड प्रकाश उत्सर्जित होत असतो. जर का आपण हा इन्फ्रारेड प्रकाश पकडला तर आपण त्यावर कोणती मूलद्रव्य आहेत यावर शिक्कामोर्तब करू शकू. एकदा हे स्पष्ट झालं की तो ग्रह त्याच्या ताऱ्याच्या हॅबिटायटल झोन मधेही आहे आणि त्यावर ऑक्सिजन, कार्बन डाय ऑक्साइड सारखी मूलद्रव्य आहेत. तर त्यावर सजीव सृष्टी असण्याची शक्यता प्रचंड आहे. येत्या काळात वैज्ञानिक त्यांना जास्ती शक्यता वाटत असलेल्या ग्रहांवर म्हणजेच एक्सोप्लॅनेट वर जेम्स वेब रोखून ठेवणार आहेत. जेम्स वेब मधील तंत्रज्ञान उत्सर्जित होणारा इन्फ्रारेड प्रकाश बघण्यासाठी तयार केलं गेलं आहे. जर का पृथ्वी सारखी मूलद्रव्य या ग्रहावर मिळाली तर दुसऱ्या पृथ्वीचा शोध लागण्याची शक्यता प्रचंड वाढणार आहे. उदाहरणासाठी ट्रॅपिसाट नावाची एक सौरमाला आपल्याच सारखी आपल्यापासून ३९ प्रकाशवर्ष लांब आहे. या सौरमालेत ७ ग्रह त्याच्या ताऱ्या भोवती परिवलन करत आहेत. त्यातील ३ ग्रह हे त्याच्या हॅबिटायटल झोन मधे आहेत. पण त्याच्यावर कोणती मूलद्रव्य आहेत हे स्पष्ट न झाल्याने पुढला अंदाज येत नव्हता. यातील 'ट्रॅपिसाट १ जी' हा ग्रह सगळ्यात लक्षवेधी आहे. कारण यावर पाणी असल्याचं वैज्ञानिकांच म्हणणं आहे. पाणी म्हणजेच जीवन. जर जेम्स वेब ने यातील मूलद्रव्यावर शिक्कामोर्तब केलं तर आपण दुसरी पृथ्वी शोधलेली असेल. 

३) तारे जन्माला कसे येतात? 

आपला सूर्य जन्माला कसा आला? नक्की त्यात काय काय प्रक्रिया घडल्या हे आपल्याला अजूनही नीट माहित नाही. अवकाशात तारे निर्माण करण्याचे अनेक कारखाने चालू आहेत. जसे की आपल्याला नुसत्या डोळ्याने दिसणारा 'क्रॅब नेब्युला'. इकडे खूप नवीन तारे जन्माला येत आहेत पण ताऱ्यांचा जन्म धूळ आणि वायूंच्या ढगांमधून होतो. या ढगात दिसणारा प्रकाश अडकलेला रहातो. त्यामुळे आपल्याला त्याच्या आत काय चालू आहे हे स्पष्टपणे दिसत नव्हतं. पण आता त्याच्या आत काय चालू आहे ते जेम्स वेब च्या इन्फ्रारेड कॅमेरा मधून बघता येणार आहे. त्यातून एकूणच ताऱ्यांची निर्मिती कशी होते हे समजायला मदत होणार आहे. 

खाली फोटोत इगल नेब्युलाचे दोन फोटो शेअर केलेले आहेत. एकात दृश्य स्वरूपात तो कसा दिसतो आणि दुसऱ्या फोटोत इन्फ्रारेड मधून तो कसा दिसतो ते आहे. नुसत्या फोटोमधून आपल्याला कळून चुकेल की आपल्यापासून आजवर काय लपून राहिलेलं आहे आणि जेम्स वेब आपल्यापुढे कोणता खजिना उघडणार आहे. 

४) कृष्णविवराचा वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास होऊ शकतो का? 

कृष्णविवर म्हणजेच ब्लॅकहोल आजही खूप उत्सुकता असलेला विषय आणि प्रश्न आहे. कृष्णविवरातून प्रकाश पण बाहेर पडू शकत नाही मग त्याला ओळखायचं कस? तर त्याच अस्तित्व आपल्याला कळून येते ते त्यात ओढल्या जाणाऱ्या वस्तुमान म्हणजेच ग्रह, तारे जे त्यात ओढले जाऊन विलुप्त होतात त्यांच्या शेवटच्या क्षणातील बदलांमुळे. आजवर आपण हबल च्या माध्यमातून आणि इतर दुर्बिणी च्या माध्यमातून या वस्तुमानाकडे बघत आलेलो आहेत आणि त्यावरून आपण काही ठोकताळे मांडलेले आहेत. पण जेम्स वेब आपल्याला याच विलुप्त होणाऱ्या वस्तुमानाकडे इन्फ्रारेड मधून बघण्याची दृष्टी देणार आहे. त्यातून अजून काही रहस्यांचा पडदा नक्कीच येत्या काळात उघडणार आहे. 

शेवटी या पलीकडे असे काही प्रश्न आहेत जे आपल्याला आजवर पडलेच नाहीत. कारण त्या बद्दल आपल्याला अजून काही माहितीच नाही. अशी नवीन कोरी दालन पण जेम्स वेब दुर्बीण आपल्या समोर उघडणार आहे. एकूणच काय तर येत्या काही वर्षात मानवाच्या अवकाशाच्या अंतरंगा बद्दल असलेल्या ज्ञानाला एका वेगळ्या पातळीवर नेण्याची किमया जेम्स वेब येत्या काळात करणार आहे. तेव्हा आपल्याला एक सामान्य मानव म्हणून जरी विज्ञान आणि त्यातली सूत्र यांचा उलगडा नाही झाला तरी जेम्स वेब च्या इन्फ्रारेड कॅमेऱ्यातून समोर येणारं विश्व बघायला विसरू नका. कारण त्यात विश्वाच्या या अथांग स्वरूपाची नवीन क्षितिज खुणावणारी असणार आहेत.

या भागात जेम्स वेब वरील सिरीज समाप्त करतो. पुढल्या भागात अवकाशातील असेच वेगळे अंतरंग घेऊन आपल्यासमोर ही सिरीज येईल. 

क्रमशः 

फोटो शोध सौजन्य :- गुगल, नासा 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   




Thursday 12 May 2022

हत्ती आणि मुंगीची गोष्ट... विनीत वर्तक ©

 हत्ती आणि मुंगीची गोष्ट... विनीत वर्तक ©

एक मस्तवाल हत्ती उन्मत्त होऊन आवेशात सगळीकडे भटकत असतो. आपल्याकडे असलेल्या शक्तीचा त्याला खूप गर्व झालेला असतो. त्याच्या जोरावर तो जो कोणी समोर येईल त्याला उद्वस्थ करत किंवा दडपशाही करत पुढे जात असतो. त्याला असं वाटते की आपल्याला कोणी पराभूत करू शकत नाही. त्याच्या समोर एक छोटीशी मुंगी येते. ती त्याला म्हणते इतका मस्तवाल होऊ नकोस. तुला जमिनीवर लोळवायला मी एकटी पुरेशी आहे. हत्ती ते ऐकून हसायला लागतो. कारण त्याच्या गर्वाचा फुगा खूप फुगलेला असतो. ती मुंगी हळूच त्याच्या अंगावर चढून त्याच्या कानात पोहचते ते त्याला कळत पण नाही. कारण एवढ्या महाकाय देहापुढे ती मुंगी दिसणार तरी कशी? मुंगी गुपचूप हत्तीला कळू न देता त्याच्या कानात एक कडकडून चावा घेते. या एका हल्याने हत्ती बेजार होतो. जमिनीवर गडबडा  लोळायला लागतो. अक्षरशः जीव जाण्याच्या यातनांनी त्याच तेच महाकाय शरीर अगदी निपचित जमिनीवर कोसळलेल असते. हत्ती मुंगी ला विनंती करतो, बाई ग! दुसरा चावा घेऊ नको नाहीतर मला मृत्यूपासून कोणीही वाचवू शकणार नाही. 

शालेय जिवनात आपल्यापैकी प्रत्येकाने ही गोष्ट वाचली किंवा कुठेतरी ऐकलेली असेल. पण तुम्ही विचार करत असाल की आजच्या हायटेक युगात या गोष्टीचा संदर्भ कुठे येतो. याचा संदर्भ आहे भारत आणि चीन या दोन देशांशी. यातील मदमस्त आणि गर्वाने मोठा झालेला हत्ती आहे तो चीन आणि त्याच्या समोर मुंगी होऊन उभा आहे तो भारत. निळ्याशार समुद्रावर आज चीन ची वाटचाल अशीच गर्वाने मस्तवाल झालेल्या हत्तीप्रमाणे सुरु होती. जवळपास ५३० पेक्षा अधिक लढाऊ जहाज ज्यात दोन विमानवाहू नौका, पाणबुड्या, फ्रिगेट, डिस्ट्रॉयर अश्या अनेक नौका समाविष्ट आहेत. या जहाजांच्या मदतीला असलेली ६०० पेक्षा जास्त लढाऊ विमान, ३ लाख पेक्षा सैनिक चीन च्या नौदलाला जगातील एक सामर्थ्यवान नौदल म्हणून ताकद देतात. त्यात २०३५ पर्यंत चीन तब्बल ६ विमानवाहू नौकांची बांधणी करत आहे. ज्यातील अनेक या आण्विक आहेत. ज्या की अनेक वर्ष कोणतंही इंधन न भरता समुद्रात राहू शकतात. याच्या जोरावर चीन ने साऊथ चायना समुद्रात आपली दादागिरी सुरु केली. भर समुद्रात बेट निर्माण करून त्याच्या आजूबाजूच्या समुद्रावर आपला हक्क सांगायला सुरवात केली. तिथल्या देशांनी काही विरोध केला तर आपल्या नौदलाच्या ताकदीने त्यांना गप्प करत चीन हळूहळू हिंद महासागरात येऊन पोहचला. 

हिंद महासागरात त्याच्या समोर होता भारत आणि भारतीय नौदल. त्याला पण आपण सहज पराभूत करू अश्या माजात असलेल्या चीन समोर भारताने एक मुंगी सोडली. ती मुंगी आपलं काय बिघडवणार अश्या थाटात असलेला चीन आज त्याच मुंगीमुळे संपूर्णपणे बॅक फुटवर तर गेलाच आहे. पण ज्या ताकदीचा त्याला माज होता आणि त्याच्यासाठी त्याने कित्येक बिलियन डॉलर खर्च केले तो सगळा पैसा आज पाण्यात स्वाहा झाल्यात जमा आहे. भारताने अशी कोणती मुंगी चीन समोर उभी केली आहे. जिच्या नुसत्या नावाने चीन घाबरतो. त्या मुंगीच नाव आहे 'ब्राह्मोस'. 

ब्राह्मोस बद्दल या आधी अनेकवेळा लिहून झालं आहे. पण चीन च्या नौदलाला ब्राह्मोस चा एवढा धसका का आहे? याचा विचार आपण कधी केला तर आपल्या देशातील संशोधक, अभियंते आणि डी.आर.डी.ओ. सोबत रशिया बद्दलचा आदर अधिक वाढेल. चीन च्या एका विमानवाहू नौकेला पाण्यात बुडवण्यासाठी किती ब्राह्मोस लागतील याचा आपण विचार केला तर उत्तराने आपण चकीत व्हाल. चीन च्या एका विमानवाहू नौकेला जलसमाधी द्यायला फारफार तर दोन ब्राह्मोस पुरेशी आहेत. एका ब्राह्मोस मधे चीन ची विमानवाहू नौका संपूर्णपणे निकामी होऊ शकते तर दुसऱ्या हल्यानंतर तीच पाण्यावरच अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. ब्राह्मोस चा वेग त्याला प्रचंड गतिशील ऊर्जा देतो. त्यात ब्राह्मोस अक्षरशः पाण्यावरून लक्ष्याकडे कूच करू शकते. एक अंदाज द्यायचा झाला तर तुम्ही जमीनीवर उभे आहात आणि बिल्डिंग च्या पहिल्या मजल्यावरून ब्राह्मोस उड्डाण करते. इतक्या जवळून उड्डाण केल्यामुळे ब्राह्मोस जगातील कोणत्याही रडार यंत्रणेला चकवा देऊ शकते. त्या शिवाय ब्राह्मोस एका सरळ रेषेत हल्ला करत नाही. ब्राह्मोस शेवटच्या टप्यात इंग्रजी S प्रमाणे रस्ता बदलते. समजा एखाद्या कार वर आपण समोरून ब्राह्मोस सोडलं. तर ते कारला समोरून धडक देण्याऐवजी अचानक वरती जाईल आणि ५-६ मजले उंचीवर जाऊन कारच्या दिशेने सरळ खाली येऊन कारच्या मध्यभागी हल्ला करेल. यालाच S मॅन्युअर असं म्हणतात. ही दिशा, उंची, कोन, जागा या सर्व गोष्टी ब्राह्मोस स्वतः ठरवते. याचा अर्थ हल्ला कुठून होणार याचा अंदाज शत्रूला लावता येत नाही. 

ब्राह्मोस स्वनातीत वेगाने प्रवास करते. वर लिहिलं तसं ब्राह्मोस चा वेग आणि उंची जगातील कोणत्याही मिसाईल डिफेन्स सिस्टीम ला पकडता येत नाही. त्यामुळे ब्राह्मोस रडारवर अदृश्य असते. मित्र राष्ट्रांसोबत झालेल्या युद्ध अभ्यासात सुद्धा जगातील सर्वोत्तम असणाऱ्या एस ४०० प्रणाली ला ब्राह्मोस ने चकवा दिलेला आहे. लक्षात घ्या की हे सगळं ब्राह्मोस नुसतं रडारवर दिसणं इथपर्यंत येऊन थांबते बाकी त्याचा वेध आणि निष्प्रभ करणं अजून जगातील कोणत्याच प्रणाली ला जमलेलं नाही. हे झालं एका ब्राह्मोस च पण दोन किंवा जास्त ब्राह्मोस जर असतील तर लक्ष्याचा अंत ठरलेला आहे. कारण ही दोन्ही ब्राह्मोस एकाच ठिकाणावरून सुटली असली तरी लक्ष्याकडे वेगवेगळ्या मार्गाने झेपावण्यात सक्षम आहेत. याचा अर्थ ब्राह्मोस कुठून येऊन हमला करेल याचा काहीच अंदाज शत्रूला येत नाही. ब्राह्मोस हल्ला केल्यावर जवळपास १५-१६ मीटर वर्तुळाकार भागात असलेलं सगळं काही नष्ट करते. 

आता विचार करा की एखाद्या विमानवाहू नौकेवर अथवा फ्रिगेटवर ब्राह्मोस आपलं S मॅन्यूवर करत जेव्हा मधोमध इतका मोठा खड्डा करेल तेव्हा त्या बोटीचं अस्तित्व संपूर्णपणे नष्ट होईल. विमानवाहू नौका एका हल्यात फक्त पाणी भरण्याच्या कामाची राहील. तिला परत नेणं पण शक्य होणार नाही. त्यात दुसरं ब्राह्मोस आदळलं तर मग तिथल्या तिथे तीचा गेम ओव्हर. चीन च्या विमानवाहू युद्धनौकांची किंमत जवळपास ९ बिलियन अमेरिकन डॉलर आहे. ( १ बिलियन १०० कोटी ) आणि ब्राह्मोस ची किंमत आहे ५ मिलियन अमेरिकन डॉलर ( १ मिलियन १० लाख ). एक ५० लाख डॉलर किंमत असलेलं ब्राह्मोस ९०० कोटी डॉलर च्या युद्धनौकेला रसातळाला न्यायला पुरेसं आहे. हे गणित चीन ला अक्षरशः गडाबडा जमिनीवर लोळवते आहे. त्यात भारत दिवसेंदिवस ब्राह्मोस च्या ताकदीत भर टाकत चालला आहे. ब्राह्मोस चा वेग आणि अंतर यात भारताने ज्या गतीने प्रगती केली आहे. त्यामुळे चीन च्या हत्तीला घाम फुटला आहे. 

सद्यस्थितीला ब्राह्मोस जगातील सर्व देशांच सगळ्यात आवडत मिसाईल म्हणून जागतिक बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. फिलिपाइन्स ने तब्बल ३७५ मिलियन डॉलर खर्च करून अगदी २९० किलोमीटर च का होईना पण ब्राह्मोस खरेदी केलं आहे. कारण ब्राह्मोस नुसतं जवळ आहे यानेच चीन ची जहाज फिलिपाइन्स पासून वचकून राहणार आहेत याची पूर्ण खात्री फिलिपाइन्स ला झालेली आहे. चीन च्या मस्तवाल हत्तीची नशा आणि झिंग भारताच्या मुंगीने म्हणजे ब्राह्मोस ने उतरवली आहे. गेल्या महिन्यात चुकून पाकिस्तानात घुसलेल्या ब्राह्मोस चा अंदाज पाकिस्तान मधील एकाही रडार यंत्रणेला आला नाही यावरून ब्राह्मोस ची ताकद स्पष्ट होते. ते जमिनीवर पडल्यावर तिथल्या स्थानिक लोकांनी प्रशासनाला कळवल्यानंतर तिथल्या यंत्रणांना ब्राह्मोस पाकिस्तान मधे धडकल्याचं लक्षात आलं. या गोष्टींनी चीन अजून जास्ती अस्वस्थ झाला आहे कारण पाकिस्तान मधे चीन च मिसाईल डिफेन्स यंत्रणा कार्यंवित आहे. जिला थोडापण अंदाज आलेला नव्हता. 

हत्ती आणि मुंगीची गोष्ट इकडे संपत नाही तर इकडून चालू होते. सद्या मुंगीने फक्त आपण काय करू शकतो हे दाखवलेलं आहे. हत्ती जर असाच आपल्या नशेत चालत राहिला तर एक कडकडून चावा घेतल्यावर त्याला अक्कल येईल अशी अपेक्षा आहे. 

जय हिंद!!! 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   




Wednesday 11 May 2022

आणि बुद्ध पुन्हा एकदा हसला... विनीत वर्तक ©

आणि बुद्ध पुन्हा एकदा हसला... विनीत वर्तक ©

१९९५ च वर्ष होतं. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी आण्विक चाचणी घेण्यासाठी भारतीय संशोधकांना परवानगी दिली. १९७४ च्या पोखरण येथील पहिल्या अणु चाचण्यांनंतर भारताने तंत्रज्ञानात खुप प्रगती केली होती. त्या प्रगतीतून आलेले निष्कर्ष पडताळून बघण्याची गरज भारतीय संशोधकांना वाटत होती. त्यामुळेच भारताने पुन्हा एकदा पोखरण इकडे अणु चाचणीसाठी काम सुरु केलं. अमेरिकेच्या टेहळणी करणाऱ्या उपग्रहांनी पोखरण इकडे चालू असलेली लगबग ओळखली. अमेरिकेच्या सी.आय.ए. ने याचा अहवाल तत्कालीन क्लिंटन प्रशासनाला दिल्यानंतर त्यांनी सर्व मार्गाने भारतावर आणि राव प्रशासनावर दबाव टाकला. भारताला त्यामुळे माघार घ्यावी लागली. पण या निमित्ताने भारताला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे भारताच्या प्रत्येक हालचालींची होणारी टेहाळणी. १९९६ ला जेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान म्हणून निवडून आल्यावर त्यांनी राष्ट्रासाठी महत्वाच्या असणाऱ्या या अर्धवट राहिलेल्या कामाला कोणत्याही परिस्थितीत तडीस नेण्याचा पण केला. याची जबाबदारी त्यांनी भारताचे मिसाईल मॅन आणि त्यावेळचे डी.आर.डी.ओ. चे अध्यक्ष डॉक्टर अब्दुल कलाम आणि अणू ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आर. चिदंबरम यांच्यावर सोपवली. त्यांना दीड वर्षाचा वेळ ही चाचणी करण्यासाठी देण्यात आला. 

भारताला पुन्हा एकदा अणुचाचणीची गरज ही फक्त तांत्रिक क्षमता साध्य करण्यासाठी नव्हती तर संपूर्ण जगात भारताची एक नवीन प्रतिमा बनवण्यासाठी होती. या चाचण्या करण्यामागे तीन मुख्य उद्दिष्ट होती. एक म्हणजे नवीन तंत्रज्ञानाची पडताळणी, दुसरं म्हणजे भारत आता आण्विक क्षमता आणि अस्त्र असलेला देश आहे याची जगाने नोंद घेण्यास भाग पाडणे. तिसरं म्हणजे भारत एक शांतताप्रिय पण त्याच सोबत जबाबदारीने आण्विक शस्त्र हाताळणारा देश आहे याची जाणीव करून देणे. १९९५ साली आलेल्या अनुभवावरून अतिशय गुप्तपणे या गोष्टी करण्याच्या सुचना संशोधकांना देण्यात आल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत भारत असं काही करणार आहे याची थोडी सुद्धा कल्पना जगाला येता कामा नये असं एक आव्हानात्मक लक्ष्य डॉक्टर कलाम आणि त्यांच्या टीम ला देण्यात आलं होतं. 

भारताने या काळात अवकाश क्षेत्रात मजल मारली होती. भारताचे स्वतःचे टेहाळणी उपग्रह अवकाशात होते. त्यामुळे अवकाशातुन ते काय टिपू शकतात आणि काय नाही तसेच कोणत्या वेळी या सर्वाचा अभ्यास केला गेला. अमेरिकन टेहाळणी उपग्रहांची क्षमता, त्यांच्या भारतावरून परिवलन करण्याच्या वेळा या सर्वांचा अगदी बारकाईने अभ्यास केला गेला. त्या नंतर या कामासाठी योग्य वेळ काय ती निश्चित करण्यात आलं. काम करत असताना भारतीय संशोधक एकाचवेळी एका ठिकाणी जमलेले दिसू नये म्हणून अनेक उपाय योजना केल्या गेल्या. रेडिओ संदेश वहनात त्यांची नाव गुप्त राहतील अशी व्यवस्था केली गेली. कोड वर्ड वापरले गेले जसे की व्हाईट हाऊस, विस्की, ताज महाल. डॉक्टर कलाम बनले मेजर जनरल पृथ्वी राज तर आर. चिदंबरम 'नटराज'. 

११ मे १९९८ दुपारी पावणे चार च्या सुमारास अमेरिका, सी.आय.ए. आणि संपूर्ण जगाला वेड्यात काढत पोखरण च्या त्या वाळवंटात बुद्ध पुन्हा एकदा हसला... 

 आज या घटनेला २४ वर्षाचा काळ लोटून गेला. पण आजही १९९८ च्या पोखरण अणू चाचण्या अमेरिकेच आणि त्यांच्या गुप्तचर संघटनेचं सगळ्यात मोठं अपयश मानलं जाते. भारताने अमेरिकेच्या नाकावर टिच्चून या चाचण्या केल्या. संतापलेल्या अमेरिकेने भारतावर अनेक बंधन टाकली. जगाने आक्रोश केला पण भारताच जागतिक पटलावर एक सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून झालेलं आगमन ते थोपवू शकले नाहीत. आज भारत आणि अमेरिका कधी नव्हे इतके जवळ आहेत. अमेरिका आज भारताला आपला जवळचा मित्र, भागीदार मानते. एकेकाळी साप आणि गारुडी लोकांचा देश म्हणून भारताला हिणवणारा ब्रिटन आणि युरोपातील अनेक राष्ट्र ज्यात जर्मनी, फ्रांस, इटली सह अनेक देशांचा सहभाग आहे. भारताला आपला सोबती मानतात. याला एक कारण भारताची आर्थिक क्रयशक्ती असली तरी त्यामागे भारताची आण्विक शस्त्रसज्जता आणि तांत्रिक क्षमता तितकीच आहे. 

आज भारत जबाबदारीने आपल्या आण्विक क्षमतेत भर टाकत आहे. पण ही भर कोणाला दाखवण्यासाठी, कोणाला खिजवण्यासाठी, कोणत्या राष्ट्राला भिती दाखवण्यासाठी किंवा त्याच्या जोरावर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी कधीच करत नाही. त्यामुळे आज एक पाकिस्तान सोडला तर भारताच्या आण्विक क्षमतेची भिती कोणत्याच लहान- मोठ्या, जवळच्या किंवा लांबच्या राष्ट्राला वाटलेली नाही. हेच आपलं सगळ्यात मोठं यश आहे. आपल्या हातात असलेली तलवार कधी आणि कोणावर वापरयाची याची जाणीव भारताला आहे. पण ही तलवार आपल्या म्यानातून काढून जगाला त्याची नोंद घ्यायला लावणारी घटना आजच्या दिवशी घडली होती. 

तेव्हा ही बुद्ध हसला होता आणि आजही बुद्ध पुन्हा एकदा हसतो आहे...... 

भारताला आजच्या दिवशी एक नवीन प्रतिमा देणारे पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आर. चिदंबरम, भाभा अणू संशोधन केंद्र इथले संशोधक, अभियंते आणि कर्मचारी, भारतीय सेना आणि त्यांचे अधिकारी सैनिक तसेच या चाचण्या यशस्वी करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचललेल्या सर्वांना माझा कडक सॅल्यूट. 

ता.क. :- १९९८ साली मी ही भाभा अणू संशोधन केंद्रात कामाला होतो. मला सांगायला अभिमान वाटतो की पोखरण इथले अणूबॉम्ब हे आमच्याच विभागातून पोखरणसाठी रवाना झाले होते. ज्या व्यक्तींनी हे बॉम्ब आणि साधनं योग्य रीतीने पोखरण इकडे पाठवली अश्या लोकांसोबत काम करण्याचं भाग्य मला लाभलं. या घटनेच्या अनेक गोष्टी माहित आहेत पण त्या इकडे मांडणं योग्य राहणार नाही. पण नक्कीच त्या आठवणी माझ्यासाठी स्पेशल आहेत.    

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Tuesday 10 May 2022

'अस्त्र' एक अमोघ शस्त्र... विनीत वर्तक ©

 'अस्त्र' एक अमोघ शस्त्र... विनीत वर्तक ©

२७ फेब्रुवारी २०१९ चा दिवस होता. आदल्या दिवशीच भारताने पाकिस्तान मधल्या 'बालाकोट' इकडे हवाई हल्ला करत शेकडो आतंकवाद्यांचा खात्मा केला होता. पाकिस्तान कडून काहीतरी प्रत्युत्तर येणार याची कल्पना भारताला होती. त्यामुळे भारताचे हवाई दल अश्या कोणत्या हल्यासाठी तयार होतेच. पाकिस्तान पाठीतून खंजीर खुपसण्याच्या आपल्या मिठाला जागला. त्याने याच दिवशी सकाळी आपली लढाऊ विमाने भारताच्या दिशेने पाठवली. पण भारताच्या हवाई दलाची तयारी लक्षात येताच त्यांनी लांबूनच ६ Beyond-Visual-Range Missile (BVRM) बी. व्ही. आर. एम. AIM-१२०C भारतीय विमानावर डागली. भारतच्या सुखोई ३० आणि मिग २१ ने त्याला चकवा दिला. पण पाकिस्तान ने एका मिग २१ ला लक्ष बनवलं. पुढे काय झालं तो इतिहास आहे. पण या सगळ्यात भारतीय वायू दलाची एक बाजू उघडी पडली ती म्हणजे भारतीय विमान अशी बी. व्ही. आर. एम. डागु शकली नाहीत आणि पाकिस्तानी विमानांचा खात्मा करू शकली नाहीत. हेच कुठेतरी या सगळ्यातून आपण शिकलं. त्यामुळेच राफेल आणि त्यांच्या सोबत येणारं Meteor मिसाईल तातडीने भारतीय वायू दलात दाखल करण्यात आलं.

भारतीय पंतप्रधानांनी त्यावेळी एक सुचक वक्तव्य केलं होतं, 'भारताकडे त्याकाळी राफेल असतं तर चित्र संपूर्णपणे वेगळं असतं'. ते फक्त राफेलसाठी नव्हत तर Meteor साठी पण होतं. कारण भारताकडे जर हे मिसाईल असतं तर पाकिस्तानच्या एकाही विमानाने पुन्हा कधीच पाकिस्तान ची जमीन बघितली नसती. त्यामुळेच भारताला बी. व्ही. आर. एम. मिसाईल ची गरज लक्षात आली. आज राफेल मधे Meteor असल तरी जवळपास १६ कोटी रुपयांचे हे एक मिसाईल आहे. भारताला या बाबतीत आत्मनिर्भर करण्यासाठी डी.आर. डी. ओ. ने तातडीने पावलं उचलली त्याच फलित म्हणजे 'अस्त्र'.

अस्त्र मिसाईल बनवण्याची सुरवात जरी २००१ मधे झाली असली तरी ते अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडत होतं. जवळपास २०१३ पर्यंत डी.आर. डी. ओ. ला अपयशाचा सामना करावा लागला. २०१३ मधे त्याच्या डिझाईन मधे बदल करून त्याला नवीन साज देण्यात आला. २०१७ मधे त्याची निर्मिती करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला. भारतीय हवाई दलाने आणि नौदलाने जवळपास २९८ 'अस्त्र मार्क १' मिसाईल ची ऑर्डर दिली. अस्त्र मार्क १ हे १०० किलोमिटर पर्यंत मारा करणारं बी. व्ही. आर. मिसाईल आहे. 

अस्त्र १ जरी भारताकडे आलं तरी इतर देशांच्या मिसाईल सोबत तुलना करताना त्याच्यावर मर्यादा येत होत्या. २०१९ च्या घटनेनंतर तातडीने जागतिक दर्जाचं अस्त्र मिसाईल तयार करण्यासाठी डी.आर. डी. ओ. ने कंबर कसली. त्याचच फळ म्हणजे आता येत असलेले आणि येत्या वर्षाअखेर पर्यंत येणारं अस्त्र मार्क २ आणि मार्क ३ मिसाईल. अस्त्र मार्क २ ची क्षमता १६० किलोमिटर असणार आहे. यात ड्युल फेज सॉलिड रॉकेट मोटार आहे. (अस्त्र मार्क १ मधे सिंगल फेज मोटार आहे). त्या शिवाय यातील रशिया च्या मदतीचा भाग कमी करण्यात आला आहे. याची चाचणी या महिन्यात कधीही होईल आणि भारताच्या सुखोई ३०, मिग २९, तेजस अश्या सर्व लढाऊ लढाऊ विमानांवर ते बसवण्यात येणार आहे. 

राफेल वर असणारं Meteor आज जगात सर्वश्रेष्ठ बी. व्ही. आर. एम. का आहे? तर त्याच उत्तर आहे त्याच इंजिन. Meteor मधे रॅमजेट इंजिन आहे. ज्याच्या वापरामुळे मिसाईल शेवटच्या टप्प्यात सुद्धा आपला वेग आणि ऊर्जा कायम ठवते. जशी आपण मिसाईल ची क्षमता अंतरात वाढवत जाऊ तसं शेवटच्या टप्यात त्याची मारक क्षमता कमी होते. त्यामुळे लक्ष्याला त्याला चुकवण्यासाठी वेळ मिळतो. पाकिस्तान विमानांनी २०१९ मधे डागलेल्या मिसाईल ला याच कारणाने भारताच्या सुखोई आणि मिग विमानांनी चकवा दिला होता. पण Meteor तसं नाही. या मिसाईल चा वेग आणि ऊर्जा अगदी शेवटच्या क्षणात पण सारखी असल्याने याचा नो एस्केप झोन खूप मोठा आहे. याचा अर्थ या झोन मधे जर विमान आलं तर तुम्ही कितीही गटांगळ्या खा, वर- खाली, डावीकडे उजवीकडे विमान न्या हे मिसाईल तुम्हाला लक्ष्य बनवून शांत होणार. भारताने हेच नेमकं ओळखलं की आपल्याला Meteor सारखं किंवा त्यापेक्षा अधिक शक्तिशाली अस्त्र बनवायचं असेल तर आपल्याला रॅमजेट तंत्रज्ञान शिकणं  गरजेचं आहे. त्यामुळेच भारताने एस. एफ. डी.आर. म्हणजेच Solid fuel ducted ramjet तंत्रज्ञान रशिया सोबत विकसित केलं. याची पहिली चाचणी सुद्धा भारताने ५ मार्च २०२१ ला घेतली. दुसरी चाचणी ८ एप्रिल २०२२ मधे घेऊन भारताने 'अस्त्र मार्क ३' ची घोषणा एकप्रकारे जगाच्या पातळीवर केली आहे. 

अस्त्र मार्क ३ ची चाचणी या वर्षाअखेर पर्यंत अपेक्षित असून ती यशस्वी झाली तर बी. व्ही. आर. मिसाईल मधील सगळ्यात शक्तिशाली मिसाईल तंत्रज्ञान जगात भारताकडे असेल. अस्त्र मार्क ३ मधील इंजिन Solid fuel ducted ramjet तंत्रज्ञानावर आधारित असणार असून याची क्षमता ४.५ मॅक वेगाने तब्बल ३५० किलोमिटर अंतरावर मारा करण्याची असणार आहे. त्या तुलनेत Meteor फक्त १२० किलोमिटर अंतर कापू शकते. या तंत्रज्ञानात ऑक्सिडायझर नेण्याची गरज भासत  हवेतील ऑक्सिजन हा प्रज्वलनासाठी वापरला जातो. त्यामुळे जास्ती इंधन आणि वॉरहेड आपण नेऊ शकतो. वर लिहिलं तसं या तंत्रज्ञानामुळे अस्त्र मार्क ३ चा नो एस्केप झोन खूप जास्ती असणार आहे. चीन च्या पी एल १५ भारताच्या अस्त्र मार्क ३ या बी. व्ही. आर एम. ची क्षमता सहा ते आठ पट जास्त असणार आहे. अस्त्र मार्क १, मार्क २, Meteor आणि येणारं अस्त्र मार्क ३ या सगळ्या बी. वी.आर. एम. मुळे भारताच्या हवाई दलाला आणि नौदलाला पाकिस्तान आणि चीन या दोन्ही पेक्षा अधिक उंची मिळाली आहे. जी भविष्यात या दोन्ही देशांना गाठणं कठीण होणार आहे. 

येत्या महिन्याभरात डी.आर. डी. ओ. पाच ते सहा वेगवेगळ्या मिसाईल चाचण्या करणार असून ब्राह्मोस च्या धक्याने अजून सुतकात असलेल्या पाकिस्तान आणि चीनवर अजून संकटांचा डोंगर कोसळणार असल्याचं तूर्तास स्पष्टपणे दिसत आहे. 

भारताच्या अस्त्र ला शस्त्र बनवणाऱ्या सगळे अभियंते, डी.आर. डी. ओ., त्यांच्याशी संलग्न प्रायव्हेट इंडस्ट्री, तिथले कामगार या सर्वांना माझा कडक सॅल्यूट.

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.