Wednesday 18 December 2019

ए. बी. सी. डी. ची भाषा... विनीत वर्तक ©

ए. बी. सी. डी. ची भाषा...  विनीत वर्तक ©

संवादाची सगळ्यात प्रभावी भाषा ही आपली मातृभाषा असते. मातृभाषा ही राष्ट्रीय भाषा अथवा प्रांतीय भाषा असायला हवी ह्याची काही गरज नसते. अगदी आपल्या बोलीभाषेतील संवाद सगळ्यात जास्ती प्रभावीपणे मांडता येतो. पण जेव्हा आपण स्थानिय किंवा देशांच्या भिंती बाहेर काम करत असतो तेव्हा आपल्याला एका समान भाषेत संवाद साधण्याची गरज पडते. वैश्विक पटलावर गेल्या काही शतकात झालेल्या घडामोडींमुळे संवाद साधण्यासाठी इंग्रजी तर व्यवहार करण्यासाठी अमेरीकन डॉलर हे सर्वसाधारणपणे संपुर्ण जगात मापदंड झाले आहेत. अर्थात जगातील काही भागात अजुनही त्यांना मान्यता नाही तरीपण जगातील ८०% वर लोक संवादासाठी इंग्रजीच्या ए. बी. सी. डी. वर अवलंबुन असतात.

भारतावर ब्रिटिशांनी जवळपास १५० वर्ष राज्य केल्याने भारतीय लोकांनी सहजरीत्या इंग्रजी भाषेला आपलसं केलं किंबहुना त्यावर प्रभुत्व मिळवलं. आधी वैश्विक पटलावर गरज म्हणुन शिकली जाणारी इंग्रजी भाषा आता स्टेटस सिम्बॉल बनली. इंग्रजी सहजरीत्या बोलणारे आणि त्यावर प्रभुत्व असणारे लोकं हुशार पठडी मधे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बनत गेला. ह्याचा परीणाम असा झाला की संवादाचं सगळ्यात प्रभावी माध्यम असणारी मातृभाषा मागे पडत गेली. मातृभाषे मधे बोलणं, लिहिणं, विचार व्यक्त करणं म्हणजे मागासलेपणाचे किंवा इंग्रजी भाषा येत नसल्याने कमीपणाचे लक्षण ठरवण्याचा ठेका आपल्याच समाजाने आणि सो कॉल्ड बुद्धीजीवी लोकांनी घेतला. ह्या सगळ्यात सर्वाधिक नुकसान आणि हानी आपलीच झाली आहे. ह्याचा अंदाज यायला कदाचित अजुन काही कालावधी लागेल.

वेगळ्या देशात असताना जरी इंग्रजी ही सर्वसाधारण संवादाची भाषा असली तरी जेव्हा वेगळ्या देशात आपल्या प्रांतातील कोणी आपल्याला भेटते तेव्हा आपल्या राष्ट्रीय भाषेत, मातृभाषेत अथवा बोलीभाषेत खरे तर संवाद करण्याची  एक वेगळी मज्जा असते. घरापासून लांब अनोळखी देशात, वेगळ्या संस्कृतीत, इतर लोकांच्या गराड्यात जेव्हा कोणी आपल्या देशातील कोणी अचानक समोर येते तेव्हा त्या आपलेपणात भाषेच्या, प्रांतांच्या, राज्यांच्या भिंती खरे तर वितळून जायला हव्यात. पण तसं खुप क्वचित वेळा होते. अमेरीकेत असताना माझ्या सोबत एक अमेरीकन भारतीय मुलगा होता. त्याचा जन्म अमेरीकेचा आई - वडील भारतीय पण कामाच्या निमित्ताने अमेरीकेत स्थायिक झालेले. त्यामुळे घरी भारतीय वातावरण. त्याला हिंदी अस्खलित बोलता येतं होतं. आम्ही दोघं एकाच ट्रेनिंग मधे असल्याने नकळत मी अनेकदा हिंदी मधे त्याच्याशी बोलायचो. एकदा मला बाजुला बोलावून तो म्हणाला, 'आप सबके सामने मुझसे हिंदी मैं बात मत करो. मेरा स्टेटस कम हो जाता हैं, मैं अभी अमेरीकन अंग्रेजी एक्सेंट का क्लास कर रहा हूं. यु स्पिक इन इंग्लिश विथ मी.... मी मान डोलावून होकार दिला. नंतर त्याच्या सोबत काम करणाऱ्या अमेरीकन मित्राने त्याचा एक किस्सा सांगितला व तो म्हणाला,

We called them ABCD. (American Born Confused Desi). They are trying to be part of us but they are neither American nor Indian.

एकदा दुबई मधल्या सगळ्यात मोठ्या मॉल म्हणजेच 'द दुबई मॉल' मधे फेरफटका मारत होतो. दुबई फेस्टिवलमुळे मॉल मधे बरीच गर्दी होती. अचानक चालत असताना काही पुसटशे शब्द माझ्या कानावर पडले. ते शब्द वसई- विरार भागात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेचे होते. ह्या भागात प्राबल्य असलेल्या वाडवळ, सामवेदी, ख्रिश्चन लोकांमध्ये बहुतांश संवाद आजही तिथल्या बोलीभाषेत केला जातो. माझं बालपण ह्या भागात गेल्यामुळे मला जरी ह्या बोलीभाषा बोलत्या येत नसल्या तरी मला त्यांच्यातील संवाद पुर्णपणे कळतात. वसई मधील दोन ख्रिश्चन माणसं अटे-तटे बोलत असल्याचं माझ्या कानांनी लगेच हेरलं. मी त्यांचा शोध घेऊन त्यांना जाऊन भेटलो. तुम्ही वसईचे का? ह्या एका प्रश्नावर माझी ओळख झाली होती. त्या अनेक देशांच्या नागरीकांच्या गर्दीने ओथंबुन वाहणाऱ्या दुबई मॉल मधे बोलीभाषेच्या गोडव्याने आपल्या माणसांना बरोबर हेरलं होतं.

दोन वेगवेगळे प्रसंग पण भाषेची  ए. बी. सी. डी. शिकवून जाणारे. एकात आपल्याच मातृभाषेत संवाद साधण्याची लाज वाटत होती आणि दुसऱ्या भाषेतील  लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधुन जोडण्याची केविलवाणी धडपड सुरु होती. ज्यांच्यासाठी त्याची ही धडपड होती तेच लोकं त्याला आपला मानत नव्हते. न घर का ना घाट का अश्या द्वंदात तो अडकला होता तर दुसऱ्या प्रसंगात आपल्या बोलीभाषेत संवाद करण्यासाठी देशांच्या भिंती आड येतं नव्हत्या. त्यात कोणता कमीपणा नव्हता. संवादाची भाषा जरी दुसरी असली तरी आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान नक्कीच बाळगायला हवा आणि जिकडे शक्य होईल तिकडे मातृभाषा, बोलीभाषा ह्यांना जिवंत ठेवण्यासाठी त्या मधुन संवादाला, लिखाणाला प्राधान्य द्यायला हवं. ए. बी. सी. डी. ची भाषा जरी आज जगमान्य संवादाची भाषा असली तरी आपल्या मातृभाषेतील गोडवा त्यात येतं नाही हे तितकचं खरं.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Tuesday 17 December 2019

घुंघट की आड से... विनीत वर्तक ©

घुंघट की आड से... विनीत वर्तक ©

भारतात शहराचा भाग सोडला तर अनेक भागात स्री ने इतर लोकांच्या समोर (इतर म्हणजे कौटुंबिक व्यक्ती सोडुन ) डोक्यावरून पदर, दुपट्टा किंवा इतर गोष्टींच्या साह्याने डोकं आणि अनेकदा चेहरा झाकण्याची पद्धत आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यात हरियाणा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश ह्या ठिकाणी आजही स्री पर पुरुषांसमोर येताना घुंघट घेऊन समोर येते. अर्थात ही पद्धत किती चुकीची / बरोबर अथवा स्री स्वातंत्र्याचा गळा घोटणारी की संस्कृती च रक्षण करणारी ह्या वादात मला जायचं नाही. कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजु असतात व प्रत्येक जण आपल्या समोर जी बाजु येते त्याला योग्य मानत असतो. आपलं जडणघडण ज्या पद्धतीने झालं आहे आणि आपल्या विचारांवर ज्या गोष्टींचा पगडा आहे तिचं योग्य असं समजुन आपण पुढे जातं असतो. पण ते करताना आपण विरुद्ध अथवा दुसऱ्या बाजुच्या विचारांची पायमल्ली तर करत नाही नं ह्याचं भान ही आपण राखायला हवं. ज्या गोष्टी आपल्या धर्मात / समाजात / संस्कृतीत रुजलेल्या आहेत त्या कदाचित आपल्याला बरोबर वाटत असतील पण इतर संस्कृती / समाजाच्या मानाने ती व्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली असु शकते. त्यामुळे तटस्थपणे आपण काही गोष्टींकडे बघायला हवं.

आज ह्या गोष्टींची प्रकर्षाने आठवण ह्याचसाठी की सध्या कामाच्या निमित्ताने मलेशिया ह्या मुस्लिम धर्माचं प्राबल्य असलेल्या देशात आहे. माझ्या सोबत असलेले इतर सहकारी मलेशिया चे नागरिक आहेत. मलेशिया मधे जवळपास ९०% मुस्लिम स्त्रिया ह्या हिजाब वापरतात. हिजाब म्हणजे डोकं आणि छातीचा भाग झाकण्यासाठी असलेलं वस्र. परपुरुषांच्या (परपुरुष म्हणजे कौटुंबिक व्यक्ती सोडुन ) समोर हिजाब वापरला जातो. अनेकदा बुरखा, हिजाब अथवा नकाब घालणाऱ्या स्त्रियांच व्यक्ती स्वातंत्र्य हे धर्माच्या नावाखाली नाकारल्याचं एक चित्र नेहमीच दाखवलं जाते. अनेक वेळेला ते योग्य असेल ही पण ह्याचा अर्थ असा होतं नाही की सरसकट ही गोष्ट लादली गेलेली आहे. अर्थात काही राष्ट्रात तसा कायदा ही आहे जसे सौदी अरेबिया आणि इराण. पण इतर अनेक मुस्लिम राष्ट्रात हिजाब, नकाब, बुरखा घालणं एक चॉईस आहे. माझ्या टीम मधे दोन मलेशियन मुस्लिम स्री अभियंता पेट्रोनास ह्या बलाढ्य ऑईल कंपनीसाठी काम करत आहेत. ह्यातल्या एकीने पेट्रोलियम इंजिनिअरिंग मधे ऑस्ट्रेलिया मधुन पदवित्तुर शिक्षण घेतलं आहे. तर दुसरी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधली पदवीधर आहे. दोन्ही टीम मेंबर सोबत काम करताना एकुणच मलेशियाच्या संस्कृती बद्दल खुप काही गोष्टी समजल्या.

हिजाब विषयी त्या दोघींशी बोलताना एक गोष्ट एकदम स्पष्ट होती ती म्हणजे ते त्या घालतात कारण हा त्यांचा चॉईस / निर्णय आहे. समाजात हिजाब न घालणं हे सहजगत्या स्विकारलं जात नसलं तरी त्यांच्यावर तो घालण्याचं कोणतच बंधन नव्हतं. आपल्याकडे ही लग्न झाल्यावर मंगळसुत्र न घालणं हे समाजात/ कुटुंबात सहजगत्या स्विकारलं जातं नाही. पण मंगळसुत्र न घालणं अथवा घालणं आज निदान शहरी भागात तरी चॉईस म्हणुन स्विकारल गेलेलं आहे. हिजाब घालणं हे आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आणि चॉईस असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं किंबहुना आज अनेक मुस्लिम स्त्रियांची ती एक चॉईस आहे. आपल्या कुटुंबात कोणी श्रेष्ठ व्यक्ती आल्यावर त्यांच्या पाया पडणं अथवा घुंघट डोक्यावरून घेणं जर संस्कृतीचा भाग असेल आणि त्यात आपली भावनिक आणि सांस्कृतिक गुंतवणूक असेल तर दुसऱ्या संस्कृतीत हीच गुंतवणुक वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली जाऊ शकते ह्याचं भान आपण नक्कीच ठेवायला हवं.

घुंघट असो वा हिजाब ह्या गोष्टी संस्कृती / प्रथा / पद्धती ह्या त्या धर्माच्या विचारसरणी चा भाग आहेत. त्या बरोबर किंवा चुक ह्यावर मतांतरे असु शकतात. ती मते बरोबर ही असतील. पण सरसकट कोणत्याही संस्कृतीला समजुन न घेता त्याला स्री स्वातंत्र्याचं लेबल चिकटवणं हे चुकीचं आहे. कोणत्या तरी मंदीरात प्रवेश केला म्हणुन जर भारतातील स्री स्वातंत्र्य होतं नसेल तर हिजाब न घालता केसं मोकळे सोडुन स्री स्वातंत्र्याची व्याख्या केली जाऊ शकत नाही.

घुंघट की आड से........ जर आपल्या संस्कृतीचा भाग आहे जर लग्न झालेल्या स्री ने टिकली लावणं, मंगळसुत्र घालणं संस्कृतीचं लक्षण आहे तर हिजाब ही कोणासाठी तरी त्यांच्या संस्कृतीचं लक्षण आहे हे समजुन घेण्याची आपली मानसिकता झाली तर स्री स्वातंत्र्याच्या बाबतीत आपण एक पाऊलं पुढे टाकलं असं मी म्हणेन.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

फोटो स्रोत :- गुगल 


Thursday 12 December 2019

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व्हिक्टोरिया क्रॉस मिळालेले नामदेव जाधव... विनीत वर्तक ©

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व्हिक्टोरिया क्रॉस मिळालेले नामदेव जाधव... विनीत वर्तक ©

मराठा साम्राज्याची किर्ती त्या काळात अटकेपार पोहचली होती. मराठी साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा पराक्रम आजही लोकांना  स्फूर्ती देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध नितीत आमुलाग्र बदल करताना गनिमी काव्यात हुशार असणाऱ्या पराक्रमी अश्या मावळ्यांची फौज उभी केली. हे मावळे कोणी लढाई शिकलेले नव्हते तर सामान्य घरातील लोकांमध्ये पराक्रम, शौर्य, निष्ठा हे गुण निर्माण करून त्यांनी मराठा साम्राज्य उभे केले. काळाच्या ओघात युद्ध बदललं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवलेली पराक्रमाची ज्योत आजही तशीच आहे. ह्याच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे भारतीय सेनेतील 'मराठा पायदळ' (Maratha Light Infantry). महाराष्ट्रातील ह्याच मावळ्यांनी बनलेलं १७६८ मध्ये भारतीय सेनेचा भाग झालेलं मराठा पायदळ हे भारतीय सेनेचं सर्वात जुनं पायदळ आहे. आपल्या शौर्याने, पराक्रमाने भारतीय सेनेत सगळ्यात जास्ती ६० पेक्षा जास्ती युद्ध पदकं मराठा पायदळाला मिळालेली आहेत.

 १९४५ चा तो काळ होता. जगात दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजत होते. ब्रिटिश इंडियाचा भाग म्हणुन भारतीय सेनेतील ५ मराठा पायदळाला जर्मनी विरुद्ध लढण्याचा आदेश मिळाला. नामदेव जाधव हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमज गावचे. अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आल्यामुळे शिक्षण ही त्यांना घेता आलं नव्हतं. पैसे कमावण्यासाठी इतर लोकांप्रमाणे त्यांनी सैन्य भरतीत भाग घेतला. शेतीत काम केल्यामुळे कसलेले शरीर आणि प्रवरेच्या पात्रात पट्टीचा पोहणारा हे गुण त्यांना ५ मराठा पायदळात शिपाई म्हणुन नियुक्त करून गेले. ५ मराठा पायदळाचा भाग म्हणुन त्यांना इटली ला जर्मनीच्या सेनेचा प्रतिकार करण्यासाठी पाठवलं गेलं. ९ एप्रिल १९४५ ला नामदेव जाधव ह्यांच्या तुकडीला सिनोई नदीकाठच्या जर्मन तळावर हल्ला करण्याचा हुकूम मिळाला. सिनोई नदीच्या दोन्ही बाजुला ४० फुट उंच काठ. पात्रात ४ ते ५ फुट खोलीच पाणी त्यात एका बाजुला जर्मन सेनेचे तिन बंकर होते तर दुसऱ्या बाजुला ५ मराठा पायदळ त्यात तिसऱ्या बाजुने जर्मन सेनेने सगळीकडे सुरुंग पेरून समोरा समोर लढाईचा एकच मार्ग खुला ठेवला होता.

समोरून हल्ला करण्या पलीकडे ब्रिटिश सेनेला दुसरा पर्याय नसताना त्यांनी नदी ओलांडण्याचा आदेश आपल्या सेनेला दिला. जर्मन सेनेच्या तिन्ही बंकर मधुन मशिनगन आग ओकायला लागल्या. शिपाई नामदेव जाधव ह्यांच्या तुकडीतील अनेकजण मृत्युमुखी पडले. जर्मन सेनेच्या मशिनगन यमाच्या रूपात त्यांच्यावर बरसत होत्या. आपला कंपनी कमांडर आणि इतर अनेक सहकारी जखमी होऊन युद्धभूमीवर पडले असताना ही शिपाई नामदेव जाधव विचलित झाले नाहीत. जखमी अवस्थेत पडलेल्या आपल्या कमांडर आणि सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी शिपाई नामदेव जाधव ह्यांनी गोळ्यांच्या वर्षावात पाण्यात  घेतली. आपल्या कंपनी कमांडर ला त्यांनी आपल्या पाठीवर घेऊन अलीकडच्या काठावर आणलं. त्या काठावर जर्मन सैनिकांनी सुरुंग पेरले होते. त्या सुरुंगातून रांगत त्यांनी आपल्या कमांडर ला सुरक्षित स्थळी पोहचवले. त्या नंतर पुन्हा एकदा पलीकडच्या तटावर त्यांनी कुच केले. तिथुन आपल्या एका जखमी सहकाऱ्याला पाठीवर घेऊन पाण्यात उडी घेतली. ह्या वेळेस जर्मन सेनेने त्यांच्यावर तुफान गोळीबार केला. पाण्यात त्यांच्यावर अनेक मोर्टार टाकले पण सगळ्या माऱ्यापासून आपला आणि आपल्या जखमी सहकाऱ्याला वाचवत त्यांनी सुरक्षित स्थळी नेलं. आपल्या सहकाऱ्यांची अशी क्रुरपणे केलेल्या हत्येचा बदला म्हणुन नामदेव जाधव एकटे जर्मन सेनेच्या एका बंकरवर तुटून पडले.

नामदेव जाधव ह्यांच्याकडे एक साधी टॉमी गन होती तर समोरून मशिनगन आणि मोर्टार चा वर्षाव चालू होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा गनिमी काव्या प्रमाणे ह्या बंकर तुटून पडला. अतीतटीच्या लढाईत शिपाई नामदेव जाधव ह्यांनी बंकर वर कब्जा मिळवला. पण ह्यात त्यांच्या हाताला गोळ्या लागल्या. एका बंकर वर कब्जा मिळवला तरी अजुन दोन बंकर आग ओकत होते. हाताला लागलेल्या गोळ्यांमुळे त्यांना आपल्या बंदुकी मधुन गोळ्या चालवणं अशक्य झालं होतं. पण हा मावळा डगमगला नाही. जर्मन सेनेचे दोन्ही बंकर नष्ट करण्याचा चंग त्यांनी बांधला. आपल्या जवळ असलेल्या ग्रेनेड ने त्यांनी उरलेल्या बंकरवर हल्लाबोल केला. आपल्या कडचे ग्रेनेड संपत आहे हे बघुन पुन्हा रांगत जाऊन त्यांनी आपल्या पोस्ट वरून ग्रेनेड आणले. आपल्या पराक्रमाने त्यांनी दोन्ही बंकर नेस्तनाबुत केले. तिन्ही बंकरवर कब्जा केल्यावर शिपाई नामदेव जाधव ह्यांनी पोस्टच्या एका उंचीवर उभं राहुन "बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशी आरोळी ठोकली. शिवगर्जनेचा तो आवाज इटली च्या सिनोई नदीच्या आसमंतात गरजला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याने पुर्ण जर्मन सेनेचा खात्मा केला होता. पलीकडच्या तिरावर मागे असलेल्या ब्रिटिश सेनेच्या कानात ती शिवगर्जना विजेसारखी कडाडली. ५ मराठा पायदळाचे ब्रिदवाक्य हे तेच असल्याने आपल्या सैनिकाने लक्ष्य पुर्ण केल्याची ती गर्जना होती. ह्या विजयाने पुर्ण युद्धाचा रोख पालटला. ब्रिटिश सेनेने जर्मन सैन्याला माघार घ्यायला लावताना इथल्या पुर्ण परिसरावर आपला कब्जा केला.

शिपाई नामदेव जाधव ह्यांना त्यांच्या अतुलनीय पराक्रम, शौर्यासाठी ब्रिटिश सेनेच्या सर्वोच्च सैनिकी पुरस्काराने गौरवण्यात आलं. शिपाई नामदेव जाधव ह्यांनी नुसत्या आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवला तर आपल्या एकट्याच्या पराक्रमाने पुर्ण युद्धाचं स्वरूप त्यांनी बदलवलं. ब्रिटीश राज्यकर्ते त्यांच्या पराक्रमाने अवाक झाले होते. १९५३ ला ब्रिटिश राणी एलिझाबेथ हिच्या राज्यरोहण सोहळ्यात त्यांना "शाही पाहुणे" म्हणुन अगत्याचं आमंत्रण होतं. ह्या शिवाय दर दोन वर्षांनी त्यांना राणीच्या स्वागत सोहळ्यासाठी इंग्लंड वरून खास आमंत्रण येत असे. महाराष्ट्रातल्या एका गरीब कुटुंबात जन्माला येऊन इटली मध्ये आपल्या पराक्रमाने त्यांनी आपल्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जगात अजरामर केलं. अश्या ह्या पराक्रमी सैनिकाचा, मावळ्याचा  २ ऑगस्ट १९८४ ला पुणे इथे वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची आठवण म्हणुन ९ एप्रिल २०१७ ला इटली सरकारने त्याच सिनोई नदीच्या काठी जिकडे शिपाई नामदेव जाधव ह्यांनी आपला भिमपराक्रम केला तिकडेच त्यांच्या स्मारकाच उदघाटन केलेलं आहे. खंत एकच ज्या मातीत ते जन्माला आले त्याच मातीतील किती लोकांना त्यांचं नाव आणि त्यांच्या भिमपराक्रमाची माहिती आहे हा अभ्यासाचा विषय असेल. आपल्या पराक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव साता समुद्रापार पोहचवणाऱ्या ह्या मावळ्यास माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार.. 

(खाली लंडन गॅझेट मधील काही अंश.  कंसात लिहलेलं ब्रिद वाक्य समजण्यासाठी लिहिलं आहे. लंडन गॅझेट चा ते भाग नाही. )

The KING has been graciously pleased to approve the award of the VICTORIA CROSS to:—

No. 18706 Sepoy Namdeo JADHAO, 5th Mahratta Light Infantry, Indian Army.

In Italy, on the evening of the 9th April, 1945, a Company of the 5th Mahratta Light Infantry assaulted the east floodbank of the Senio river, north of S. Polito.

Having silenced all machine gun fire from the east bank, he then climbed on to the top of it and, in spite of heavy mortar fire, stood in the open shouting the "Mahratta war cry" ( बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय) and waving the remainder of the Companies across the river.

This Sepoy not only saved the lives of his comrades, but his outstanding gallantry and personal bravery enabled the two Companies to hold the river banks firmly, and eventually the Battalion to secure a deeper bridgehead, which in turn ultimately led to the collapse of all German resistance in the area.

— London Gazette, 15 June 1945.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

फोटो स्रोत :- गुगल, लोकमत

Friday 6 December 2019

लॅरी आणि सर्जी चं गुगल... विनीत वर्तक ©

लॅरी आणि सर्जी चं गुगल... विनीत वर्तक ©

काही दिवसांपूर्वी गुगल चे निर्माते लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन ह्यांनी आपल्या अल्फाबेट ह्या कंपनीची सुत्र भारतीय वंशाच्या आणि सध्या गुगल चे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या सुंदर पिचई कडे देऊन एक प्रकारे एका दंतकथेचा शेवटचा अध्याय लिहिला असं म्हंटल्यास चुकीचं ठरणार नाही. २०१५ ला जेव्हा गुगल ला अल्फाबेट च्या छत्रछायेखाली आणलं गेलं तेव्हाच ह्या अध्यायाची सुरवात झाली होती. गुगल च्या रोजच्या कामातुन ह्या दोघांनी हळूहळू अंग काढुन घ्यायला सुरवात केली होती. गुगल २१ वर्षाच झाल्यावर ज्या प्रमाणे एखाद्या मुलाला त्याचे पालक त्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतात त्याच प्रमाणे आपलं मुलं असल्या प्रमाणे ह्या दोघांनी गुगल मधुन आपलं अंग काढुन गुगल च्या पुढच्या वाटचालीत आता पालकाची तटस्थ भुमिका स्विकारली आहे.

२१ वर्षांपूर्वी मेनलो पार्क, कॅलिफोर्निया इथे लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन ह्या दोघांनी ४ सप्टेंबर १९९८ ला एका गॅरेज मध्ये गुगल ची स्थापना केली. हे दोघेही स्टॅनफर्ड विद्यापीठात पी.एच.डी. शिकत होते. जेव्हा गुगल च्या सर्च इंजिन ची स्थापना झाली तेव्हा इंटरनेट च्या बाजारात याहू सर्च इंजिन चं साम्राज्य होतं आणि त्या सोबत अल्टा विस्टा आणि आस्क जिवास सारखी छोटी मोठी सर्च इंजिन होती. पण ही सगळी सर्च इंजिन रिव्हेलन्स पद्धतीने काम करत असत. (जी गोष्ट तुम्ही शोधत आहात त्याच्याशी मिळती जुळती गोष्ट तुमच्या सर्च मध्ये दिसत असे.) पण गुगल सर्च इंजिन मात्र शोधकर्त्या समोर प्रसिद्ध असलेल्या वेब साईट आणत होतं. ह्या पद्धतीमुळे गुगल ने सर्च इंजिन च्या क्षेत्रात क्रांती आणली. 'गुगल' हा पुर्ण जगात इंटरनेट चा आरसा झालं. आजच्या क्षणाला सुद्धा गुगल जगातील सगळ्यात जास्ती भेट देण्यात येणारी वेब साईट आहे. गुगल सर्च इंजिन इंटरनेट वरील ७५% टक्के सर्च इंजिन चा हिस्सा आहे ह्याशिवाय मोबाईल सर्च इंजिन मध्ये हाच हिस्सा ९०% इतका प्रचंड आहे. आज गुगल ज्या अल्फाबेट कंपनीच्या छत्रछायेखाली आहे त्याच मार्केट कॅपिटल ९३० बिलियन अमेरीकन  डॉलर पेक्षा जास्ती आहे. आज अल्फाबेट मध्ये १ लाख पेक्षा लोक काम करतात. अवघ्या २१ वर्षात गुगल ने केलेला प्रवास थक्क करणारा आहे.

लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन ह्यांनी जरी जरी गुगल च्या रोजच्या कामातुन निवृत्ती घेतली असली तरी अल्फाबेट चे ५१% शेअर ह्या दोघांकडे आहेत ज्याची आजमितीला किंमत १०० बिलियन डॉलर पेक्षा जास्ती आहे. अल्फाबेट ही कंपनी वर्षाला २५% वेगाने वाढते आहे. लॅरी पेज कडे आज ६२ बिलियन  डॉलर ची संपत्ती तर सर्जी ब्रिन कडे ६१ बिलियन डॉलर ची संपत्ती आहे. गुगल च्या ह्या अफाट वाढीला ह्या दोघांची दुरदृष्टी कारणीभुत आहे. एका साध्या गॅरेज मधे सुरु झालेल्या गुगल ने सुरुवातीपासुन इंटरनेट ची ताकद ओळखुन पावलं टाकली. गुगल ने आपलं तंत्रज्ञान आपल्या वस्तु मधे आणण्यासाठी  छोट्या, मोठ्या स्टार्ट अप कंपनी विकत घेतल्या. २००५ मध्ये १.६५ बिलियन डॉलर ला यु ट्युब विकत घेतलं. २०१४ मध्ये सोंगझा नावाची कंपनी विकत घेऊन गुगल ने बाजारात गुगल प्ले आणलं. बाजारात चालेल्या हवेचा रोख ओळखुन गुगल ने २००८ मध्ये गुगल क्रोम ब्राऊझर बाजारात आणला. आपल्या सेवा सर्व स्तरावर आणण्यासाठी गुगल ने सगळ्या बाजुने आपल्या वस्तु बाजारात आणल्या जसं गुगल च्या मेल अकाउंट वरून तुम्ही सगळ्या सर्विसेस वापरू शकता. गुगल मॅप्स, गुगल प्ले, गुगल क्लाउड, गुगल डॉक्स, गुगल शिट ते एनरॉईड. एकाच जागेवरून सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार गुगल प्रत्येक गोष्टीच केंद्रस्थान झालं त्यामुळेच गुगल आज प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालं आहे. तुम्ही कुठे न कुठे गुगल शी जोडलेले असता.

गुगल च्या केंद्रस्थानी झालेल्या ह्या प्रवासाने गुगल जरी मोठं झाली तरी ह्या केंद्रस्थानामुळे माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गुगल साठी अडचणीचा ठरला आहे. गुगल ला युरोपियन युनियन ने १.३ बिलियन पाउंड चा दंड केला आहे. २०१७ ला २.४ बिलियन पाउंड चा दंड तर २०१८ ला ५ बिलियन डॉलर चा दंड गुगल ला माहितीच्या सुरक्षितता आणि इतर इ- कॉमर्स मधील चुकीच्या गोष्टींसाठी केला गेला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीनंतर गुगल थांबलेली नाही. गुगल ह्या पुढच्या काळात घडणाऱ्या बदलांवर काम करत आहे. ज्यातील एक महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे ड्राइव्हर नसणारी कार. गुगल सध्या ह्या तंत्रज्ञानावर काम करत असुन येत्या काळात स्वप्नवत वाटणारी गोष्ट जगाच्या रस्त्यांवर खरोखरचं वास्तव असणारं आहे. अश्या बदलांच्या काळात गुगल ची निर्मिती करणाऱ्या लॅरी आणि सर्जी ह्या दोघांनी एकप्रकारे निवृत्ती घेऊन गुगल च्या सुकाणु ची जबाबदारी भारतीय वंशाच्या सुंदर पिचईकडे देताना एक वेगळा पायंडा जागतिक बाजारात घातला आहे. एका स्वप्नाला प्रत्यक्षात आणुन पुर्ण जगाची दिशा बदलावताना अश्या सुंदर अनुभुती पासुन निवृत्ती घेणं हे लॅरी आणि सर्जी जाणोत.

भारतात आपल्या घराण्याचा वारसा चालवण्यासाठी कंपनीची मालकी आणि सत्ता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यासाठी रस्सीखेच सुरु असताना जगातील नावाजलेल्या पहिल्या १० कंपन्यांन मधे असलेली आणि जवळपास १००० बिलियन अमेरीकन डॉलर चं मार्केट कॅप असलेली गुगल एका दुसऱ्याच नेतृत्वाकडे देऊन लॅरी आणि सर्जी ने स्विकारलेली पालकांची भुमिका नक्कीच गुगल ला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाईल.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Saturday 30 November 2019

हावभाव (Gesture)... विनीत वर्तक ©

हावभाव (Gesture)... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात मलेशियाच्या अनेक शहरांमध्ये माझं कामाच्या निमित्ताने फिरणे सुरु आहे. मलेशियाच प्रसिद्ध असं कौलालंपुर शहर असो वा मलेशियाच्या एका दुसऱ्या बेटावर वसलेलं सारावाक राज्यातील मिरी सारखं छोटं शहर असो काही हावभाव (Gesture) हे दोन्ही ठिकाणी जाणवले. सध्या कामानिमित्त मलेशियाच्या पुर्व किनाऱ्यावर वसलेल्या केरते ह्या शहरात आहे. प्रत्येक वेगवेगळ्या शहरात जाणवलेली एक गोष्ट मात्र इथल्या लोकांबद्दल खुप काही सांगुन जाणारी आहे. ती म्हणजे हावभावांची (Gesture ) जपणुक. अनेक छोट्या घटनांमधून आपल्याला जसं लोकांनबद्दल अंदाज येतो तसाच वेगळ्या देशात तिथल्या लोकांचे हावभाव (Gesture) आपल्याला खुप काही शिकवुन जातात. ह्या सगळ्या शहरांमधुन फिरताना प्रकर्षाने जाणवलेला एक हावभाव म्हणजे काही वस्तू खरेदी केल्यावर उरलेले पैसे देण्याची पद्धत.

एखादा मोठा मॉल असो वा एखादी छोटी टपरी, उरलेली रक्कम पुन्हा आपल्याला देण्याची पद्धत मलेशियात सगळ्या ठिकाणी सारखीच जाणवली. पैसे परत देताना देणाऱ्या हाताला दुसऱ्या हाताचा स्पर्श करून आपलं डोकं थोडं खाली झुकवून मग समोरच्याला ते पैसे परत केले जातात. ( सत्यनारायणाच्या पुजेवर अक्षदा टाकताना जसा आपण उजव्या हाताला डाव्या हाताने स्पर्श करतो अगदी तसंच काहीसं ). ते परतीचे पैसे घेताना का कोणास ठाऊक पण एक वेगळं समाधान मला प्रत्येकवेळी जाणवलं. पैसे हातात घेताना हा छोटासा हावभाव पण एक अदृश्य आपलेपण देऊन गेला. प्रत्येकवेळी चेहऱ्यावर एक स्मितहास्याची रेषा घेऊनच प्रत्येकवेळी दुकानाच्या बाहेर मी पडलो. पैसे परत देणारी व्यक्ती म्हातारी असो वा तरुण पण त्या हावभावांमध्ये मला फरक जाणवला नाही. ही खूप छोटी गोष्ट असली तरी ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नकळत, सहजतेने दिली गेली आहे. त्यात कुठेही येणारी पिढी ह्याला मागासलेपणा अथवा आदल्या पिढी ची गोष्ट मानत नाही. हे करताना एक आनंद त्यांच्या चाऱ्यावर तर असतोच पण तो आनंद आपसुक ह्या छोट्या हावभावातून समोरच्या पर्यंत ही पोहचतो.

भारतात एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करण्याची पद्धत होती. पण नवीन पिढीला त्यात आज मागासलेपणा वाटतो आणि त्या बदली शेक हॅन्ड करण्याची पद्धत आज भारतात प्रचलित झाली आहे. खरे तर दोन्ही हात जोडुन नमस्कार करताना त्यातुन मिळणारा आपलेपणा आजच्या शेक हॅन्ड मध्ये जाणवतं नाही हे कोणी पण सांगेल. नमस्कार करताना समोर असलेल्या व्यक्तीला आपण स्वतःपेक्षा श्रेष्ठ अथवा कनिष्ठ न मानता प्रत्येकाच्यामध्ये देवाचा अंश आहे त्याला आपण एक प्रकारे सन्मान करतो असा एक अदृश्य संदेश आपल्या हावभावातून समोरच्या पर्यंत जातो. पण आपल्याच देशातील परंपरांना किंवा हावभावाच्या पद्धतींना मागासले पणाच लक्षण आहे असं आजची पिढी मानायला लागली आहे हा आपला एक पराभव आहे हे नक्की. खरे तर अश्या छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याची ताकद असते हे जेव्हा कोणीतरी विदेशी व्यक्ती आपल्याला सांगते तेव्हा ते आपल्याला पटायला लागते.

यु ट्यूब वर बेलिंडा गुडरीच चा एक व्हिडीओ आहे. पहिल्यांदा ही बेलिंडा गुडरीच कोण ते जाणून घेऊ. बेलिंडा गुडरीच एक लेखक, बिझनेस वूमन, शिक्षिका  आणि एक स्पीकर अशी चतुरस्त्र स्त्री आहे. बेलिंडा जगातील पहिली स्री आहे जिने पाच प्रोजेक्ट मॅनेजमेण्ट चे क्रेडेन्टिअल्स केले आहेत.

 (The first woman in the world to achieve the original five PMI Project Management Credentials: Project Management Professional (PMP), Program Management Professional (PgMP), Risk Management Professional (PMI-RMP), Scheduling Professional (PMI-SP), and Certified Associate in Project Management (CAPM))

बेलिंडा ने ७०० मिलियन अमेरिकन डॉलर चे प्रोजेक्ट १० पेक्षा अधिक देशात पुर्ण केले आहेत. ५०० पेक्षा जास्ती प्रोजेक्ट मॅनेजर तिच्या हाताखाली शिकलेले आहेत. बेलिंडा गुडरीच जगात तिच्या प्रोजेक्ट मॅनेजमेण्ट स्किल साठी खुप नावाजलेली व्यक्ती आहे.

हे सगळं बेलिंडा बद्दल सांगण्याचं कारण इतकचं की एकदा कामासाठी ती भारतात बंगळुरू इकडे आली असताना गर्दीने फुललेल्या बाजारातील एका गरीब, म्हाताऱ्या गजरा बनवणाऱ्या बाईच्या हावभावातून तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आपला पैसा, स्टेटस, बिझनेस पोझिशन ह्याचा एक अभिमान बाळगुन त्यात रमणारी एक कॉर्पोरेट वूमन बेलिंडा गुडरीच बंगलोर च्या बाजारात आपल्या पॉकेट मधले पैसे काढून त्या गजऱ्या बनवणाऱ्या बाईला तिच्या बद्दल सहानभुती वाटुन भिक दिल्यासारखे द्यायला लागली. तेव्हा ती गरीब बाई दोन्ही हातानी नको म्हणुन आपल्या पुढ्यात असलेला सगळ्यात सुंदर गजरा तिच्या केसात माळते. बेलिंडा भिक देतं असताना त्याच वेळेस त्या गरीब स्री चे हावभाव (Gesture) बेलिंडा ला कळेनासे झाले. पुन्हा एकदा बेलिंडा आपल्या पॉकेट मधुन पैसे काढून तिला पैसे देण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा ती म्हतारी बाई दोन्ही हातानी नको, नको म्हणते. ह्या सर्व प्रसंगाने ओशाळलेली बेलिंडा आपल्या गाईड ला बोलवून तिच्याशी संवाद साधते. गाईड जे सांगतो ते ऐकल्यावर तिचा आयुष्याकडे बघण्याचा पुर्ण दृष्टिकोन बदलुन जातो.(गाईड तिला सांगतो की तिचे गजरे विकत घेण्याच्या तुझ्या इच्छेमध्ये तिला सगळं मिळालं. तिला पैसे नको आहेत. तुझा हिशोब चुकता झाला.). ह्या अनुभवानंतर एकेकाळी कॉर्पोरेट शिड्या, पगार, स्टेटस ह्या सगळ्यासाठी दिवस रात्र एक करणारी बेलिंडा आपला जॉब सोडुन आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर,

I was defining my value by what i earn not by who i was serving, when we put money before honor we are not going to go too far, but when we honor people for there time, service and money we will be rich. A women who had nothing is the wealthiest person i ever met in my life. 

गजरे माळणाऱ्या एका गरीब स्री ने आपल्या हावभावातुन आयुष्याचा अर्थ बेलिंडा ला समजावला असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. अश्या छोट्या हावभावातुन आपण कधी कधी मोठे अडथळे पण बाजुला काढू शकतो. मलेशियात जाणवलेला हा एक छोटा हावभावाचा भाग मला खुप काही शिकवून गेला. कोणाला तरी आपलं करण्यासाठी मोठ्या मोठ्या शब्दांची गरज नसते आपल्या छोट्या छोट्या हावभावातुन ते आपण समोरच्या पर्यंत शब्दांपलीकडे पोहचवू  शकतो. असं म्हणतात,

कुछ बातें ऐसीं होती है
जो कहीं नहीं जाती...
सिर्फ़ समझी जाती हैं.

खाली बेलिंडा गुडरीच च्या व्हिडीओ ची यु ट्युब लिंक शेअर करत आहे. 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

https://www.youtube.com/watch?v=qWi9Z37AEuQ

Friday 29 November 2019

एक कप चहा... विनीत वर्तक ©

एक कप चहा... विनीत वर्तक ©

चहा म्हणजे माझा विक पॉईंट असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. कामाच्या धावपळीत असो वा घरी आराम करत असो. जगाच्या पाठीवर फिरत असो किंवा मुंबईत असो कुठेही असलो तरी एक कप चहा लागतोच. चहाच्या त्या एका घोटात मला पुन्हा एकदा ताजतवानं करण्याची ऊर्जा नक्कीच आहे. कामाच्या निमित्ताने फिरताना एक कप चहाचे अनेक स्वाद मी अनुभवले आहेत. अगदी मुंबईतल्या अतिशय प्रसिद्ध अश्या कटिंग चहा पासुन ते अगदी आसामच्या चहाच्या मळ्यात वसलेल्या चहाच्या टपरी पर्यंत. प्रत्येक चहाच्या कपाचा आपला एक स्वाद आणि बाज आहे. चहासाठी लागणाऱ्या गोष्टी एक असल्या तरी तो बनवण्याची पद्धत भारतातल्या भाषेप्रमाणे प्रत्येक १०० किलोमीटर ला बदलत जाते. प्रत्येक ठिकाणच्या चहाची एक खासियत असते. तो पिताना एक वेगळं स्वर्गीय सुख मिळते ते इकडे शब्दात मांडता येणार नाही त्यासाठी अनुभवायला हवा एक कप चहा.

मुंबईतला टपरीवरचा चहाचा जसा एक वेगळा रंग आहे तसाच जगातल्या प्रत्येक ठिकाणाच्या चहाचा आहे. जगात कोणत्याही कोपऱ्यात गेलो तरी जिकडे चांगला चहा मिळतो अश्या जागांचा शोध घेऊन तिकडे जाऊन त्याचा आस्वाद घेतलेला आहे. एकदा दक्षिण भारतात असताना बंटुमल्ली नावाच्या गावात जाताना एका टपरीवरचा चहा खुप प्रसिद्ध आहे असं माझ्या ड्राइवर ने मला सांगितलं. त्या चहावाल्याची चहा बनवण्याची पद्धत काही वेगळीच होती. चहाच्या पावडरीत उकळून झालेल्या ते लालसर रंगाच पाणी ग्लास मध्ये ओतुन मग त्यात साखर आणि दुध घालुन तो चहा बनवत असे. आसाम ला असताना चहाच्या मळ्यांच्या मध्यभागी आमची रीग होती. रीग च्या बाहेर एक टपरी होती त्यांच्याकडे एकदम स्पेशल लाल रंगाचा आसामी चहा मिळत असे. दुध नसलेल्या त्या आसामी चहा ची चव आजही जिभेवर आहे. अबुदाभी, दुबई ला असताना बकरीच्या दुधापासुन बनवलेला चहा ची चव आजही आठवते. अमेरीकेत खास चहा पिण्यासाठी २० डॉलर खर्च करून एका ठिकाणी गेलो होतो. आजही तो प्रसंग आठवला की चहाच माझं व्यसन किती आत भिनलेलं आहे ते जाणवते. 

सध्या कामाच्या निमित्ताने मलेशिया इकडे आहे. इकडेही चहा हा भारताप्रमाणे इथल्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. खरे तर चहा ला मलेशियात प्रसिद्धी देण्यात भारतीयांचा हात आहे. दुसऱ्या  महायुद्धाच्या काळात भारतातुन आलेल्या मुसलमान लोकांनी इकडे बनणाऱ्या रबराच्या शेतापुढे चहाचे स्टॉल लावले होते. इथे काम करणारे कामगार लोकं विश्रांतीच्या काळात येऊन चहाचा आस्वाद घेऊ लागले. तेव्हापासुन इथल्या लोकांमध्ये चहा प्रसिद्ध झाला तो आजतागायत. चहा ला मलेशिया (इथल्या बोलीभाषेत म्हणजेच मलय भाषेत)  मध्ये 'तेह तारीक' असं म्हणतात. 'तेह' चा अर्थ होतो चहा तर 'तारीक' चा अर्थ आहे 'खेचलेला'. चहा बनवताना वाफाळलेला असताना चहा कपात ओततात त्यासाठी त्याला 'तारीक' असं म्हंटल जाते. 'तेह तारीक' (चहा) हे मलेशियाच राष्ट्रीय पेय आहे.

मलेशियात अनेक ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने बनवलेला चहा मिळतो. कामाच्या निमित्ताने एका ठिकाणी गेलो असताना तिथे अप्रतिम चहाचा आस्वाद घ्यायला मिळाला. चहाच्या स्वादासोबत त्याची देण्याची पद्धत मला खुप आवडली. इकडे चहा हा ज्या कपात देतात ते कप आकाराने खुप खोलगट असतात. भारतातला २-३ कप चहा म्हणजे मलेशिया मधला एक 'तेह तारीक'. इथल्या चहाला एक वेगळी चव आहे. चहा पिताना जिभेला ती अगदी जाणवते. कदाचित ती इथे तयार होणाऱ्या चहात असावी कारण मी अजून ५-६ ठिकाणी चहा प्यायलो पण प्रत्येक ठिकाणी ती वेगळी चव जिभेला सारखी जाणवली. चहा देण्याची पद्धत ही खुप मस्त आहे. मी जिकडे चहा प्यायलो त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने तो चहा समोर ठेवला की त्याचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. ह्या पोस्ट च्या खाली तो फोटो देतो आहे. एक कप चहा जरी सगळीकडे वेगळा असला तरी त्याने मिळणारा आनंद मात्र जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सारखाच असतो. तेह तारीक हे नावं वेगळं असलं तरी त्या एक कप चहाची ओढ तशीच कायम आहे. 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Tuesday 26 November 2019

आकाशातील डोळे... विनीत वर्तक ©

आकाशातील डोळे... विनीत वर्तक ©

भारताच्या सिमांवर आपल्या सैन्याला २४ तास डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवावे लागते. भारताच्या शेजारी असणारं राष्ट्र काहीतरी करून अतिरेकी कारवायांना पुर्णत्त्वास नेण्यासाठी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असते. आपल्या भागावर आपण जमिनीवरून लक्ष ठेवू शकतो पण शत्रूच्या हद्दीत काय चालू आहे ह्याचा सुगावा जर आधीच लागला तर आपण सतर्क राहून त्यांच्या ह्या कारवायांचा बिमोड करू शकतो. आजवर भारतीय सेनेला गुप्तचर खात्याकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबुन रहावं लागत होतं. पण ही माहिती किती भरवशाची तसेच नेहमी योग्य मिळेल अशी शाश्वती नव्हती. अश्या कारणांसाठी शत्रूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी भारताला डोळ्यांची गरज होती जे डोळे शत्रुला मागोवा लागू न देता शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवुन राहतील. अवकाश अशी एक जागा होती की जिकडुन भारताला शत्रुवर नजर ठेवता येणार होती. भारताने तंत्रज्ञानात प्रगती केल्यावर अवकाशातुन शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी इसरो च्या सहकार्याने भारताने आपले डोळे अवकाशात प्रक्षेपित केले. हे डोळे म्हणजेच इसरो चे कार्टोस्याट श्रेणीतील आणि इतर पाळत ठेवणारे उपग्रह. ह्या उपग्रहांचा उपयोग आणि त्यांच महत्व सर्जिकल स्ट्राईक च्या वेळी भारताला दिसुन आलं. ह्यासाठी भारताने अवकाशातुन शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या डोळ्यांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी काम सुरु केलं.

दिवस असो वा रात्र, ऊन असो वा पाऊस अश्या सगळ्या परीस्थितीत पण शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी भारताने आपल्या डोळ्यांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी भारत इसरो च्या साह्याने येत्या काळात ३ सैनिकी उपग्रह अवकाशात पाठवत आहे. २७ नोव्हेंबर २०१९ ला सकाळी ९ वाजुन २८ मिनिटांनी इसरो कार्टोस्याट ३ चं प्रक्षेपण आपल्या वर्कहॉर्स पी.एस.एल.व्ही. रॉकेट च्या साह्याने करणार असुन त्या सोबत १३ परदेशी नॅनो उपग्रहांचं प्रक्षेपण ही केलं जाणार आहे. कार्टोस्याट ३ हा ५०९ किलोमीटर च्या कक्षेत प्रक्षेपित केला जाणार असुन त्याच आयुष्य ५ वर्षाचं असणार आहे. कार्टोस्याट ३ हा तंत्रज्ञानात अतिशय प्रगत असा उपग्रह असुन त्याच रिझोल्युशन २५ सेंटीमीटर इतकं आहे. (ह्याचा अर्थ होतो की २५ सेंटीमीटर वरील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये फरक करण्याची त्याची क्षमता आहे.)

ह्या शिवाय यात मल्टीस्पेक्ट्रल तसेच हायपर स्पेक्ट्रल कॅमेरे आहेत जे की इलेक्ट्रोम्याग्नेटीक स्पेक्ट्रम मधील कोणत्याही प्रकाशाचा वेध घेऊ शकतात. (ह्याचा सरळ अर्थ आहे की अगदी काना कोपऱ्यात लपलेला शत्रु ह्याच्या नजरेतुन सुटू शकत नाही). नोव्हेंबर मध्ये ह्या उपग्रहाचे प्रक्षेपण केल्यावर अजुन दोन प्रक्षेपण इसरो करणार असुन त्यातुन आर.आय.स्याट १ आणि आर.आय. स्याट २ चं प्रक्षेपण केलं जाणार आहे. ह्या दोन्ही उपग्रहांची क्षमता अतिशय उच्च असुन ढगाळलेल्या वातावरणात अथवा अगदी रात्रीच्या वेळी सुद्धा ह्यांची फोटो घेण्याची क्षमता आहे. (अवकाशातुन हे दोन्ही उपग्रह ढगांच्या मधुनपण जमिनीवर काय सुरु आहे ह्याचा वेध घेऊ शकतात. ) हे तिन्ही उपग्रह अवघ्या एका महिन्यात इसरो अवकाशात सोडत असुन ह्यांचा उपयोग सैनिकी कामासाठी होणार आहे.

कार्टोस्याट ३ आणि आर.आय. सिरीज मधील उपग्रहांनी भारताच्या नजर ठेवण्याच्या क्षमतेत कमालीची वाढ होणार आहे. ह्या तिन्ही उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी इसरो च्या वैज्ञानिक, अभियंते आणि संशोधक ह्यांना खुप शुभेच्छा.


सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Monday 25 November 2019

देशांपलीकडली नाती... विनीत वर्तक ©

देशांपलीकडली नाती... विनीत वर्तक ©

देश विदेशात अनेकदा कामाच्या निमित्ताने फिरत असताना अनेक अनुभव येतात. जगाच्या प्रवासात आपलं अस्तित्व अनेकदा खूज वाटतं राहते. आपली ओळख सुरु करताना आपली सुरवात ही नावावरून होते. आपल्या शहरात/ गावात असताना नाव आणि आडनावावरून आपण आपली ओळख जमावतो. हे अमुक आडनाव म्हणजे तु ह्या जातीचा किंवा तुझं गांव इथलं असेल असा आराखडा आपल्यापैकी अनेक लगेच मनात बांधतात. हाच प्रवासाचा पल्ला आपल्या शहरातुन, गावातुन निघुन जेव्हा राज्यावर येतो तेव्हा हीच ओळख जिल्ह्यावर येऊन थांबते. आपल्या बोलणाच्या शैलीवरून तु कोकणातला, घाटावरचा की विदर्भातला असे आखाडे मनात बांधले जातात. हा प्रवास जेव्हा देशावर जातो तेव्हा ही ओळख राज्यावर येऊन थांबते. महाराष्ट्रातला माणुस मग आपल्याला आपला वाटायला लागतो. जेव्हा विदेशात आपण फिरतो तेव्हा हीच ओळख देशावर येऊन थांबते. एक भारतीय भेटला तरी तो आपला वाटतो. कधी कधी तर अवस्था अशी असते की अगदी आशियाई माणूस असेल तरी तो आपल्याला आपल्याच माजघरातला वाटतो.

सध्या कामाच्या निमित्ताने मलेशियात प्रवास सुरु आहे. एका ट्रेनिंग च्या निमित्ताने मलेशियातल्या शहरांपलीकडे माझा प्रवास सुरु होता. आपल्या इकडे जेवढा फरक शहरात आणि गावात दिसुन येतो तेवढाच फरक मलेशियात ही आढळतो. माझं ट्रेनिंग दुपारी असल्याने साधारण दुपारी १ च्या वेळेस मी तिकडे पोहचलो. सकाळपासुन मेडिकल आणि प्रवास झाल्याने थोडा थकलेला होतो. भुक तर लागलेली होती आणि ट्रेनिंग च्या ठिकाणी जेवणाची सोय ही होती. पण ते जेवण बघुन त्याच्या वासाने अन्न पोटात घेण्याची इच्छा झाली नाही. फक्त भात मी घेतला खरा पण त्यावर डाळ अथवा कोणतीही कढी नव्हती. दुसऱ्या सर्व गोष्टी मटण, बीफ अश्या असल्याने ते खायची सोय नव्हती. माझी ही अडचण जेवणाचं बघणाऱ्या 'इबरार' च्या लक्षात आली. त्याच्या चाणाक्ष नजरांनी माझी घालमेल ओळखली. लगेच तो हिंदीत म्हणाला, "साहब अपने घर का खाना यहा कहा, आप थोडा चिकन खालो" पण मला ते खायची इच्छा नव्हती. प्लेट परत ठेवून मी नंतर खाईन असं त्याला सांगितलं.

मी जेवत नाही हे बघून इबरार लगेच माझ्याकडे आला आणि म्हणाला. "साहब क्या हुवा? आपको दाल चाहिये क्या?' त्याच्या ह्या प्रश्नाने मी लगेच म्हंटल आपको कैसे पता चला? तर त्यावर म्हणाला "सर जी आप ओर मैं एकी मिट्टी से तो आते हैं, हम लोगो के खाने का स्वाद इनको क्या समझेगा, आप रुको आप के लिये मैं दाल लेके आता हुं" मी नको म्हणण्याचा लटका प्रयत्न केला. प्रत्यक्षात पोटात कावळे ओरडत होते. थोडं वरण भात म्हणजे माझ्या पोटाला संजीवनी मिळाली असती. कारण पुढे परत विमानात प्रवास करायचा होता. इबरार पाच मिनिटात कुठून तरी दोन पिशव्या घेऊन आला. माझ्या पुढे एका वाडग्यात डाळ तर दुसऱ्या वाडग्यात कांदे-बटाट्याची भाजी त्याने आणुन ठेवली. मी त्याला लगेच विचारलं अरे इतक्या लगेच कुठून आणलस? तर तो म्हणाला, 'साहब यहा कुछ इंडियन खाना बनाते हैं, वहीं से लेके आया आपके लिये, अब आप बिना कुछ पूछे पेहले खा लो, बादमे बाते करते हैं. माझ्यासाठी इबरार देवापेक्षा कमी नव्हता. पुढल्या १० मिनिटात मस्त पैकी डाळ आणि भाताने मी पोटभर जेवलो.

जेवण झाल्यावर माझ्या आणि इबरार च्या गप्पा सुरु झाल्या. मी म्हंटल अरे कशाला खर्च केलास, ह्याचे पैसे माझ्याकडुन घे, तर तो म्हणे क्या साहब अब रुलाओगे क्या? आप तो हमारे भाई हैं, भाई से कोई पैसा नहीं लेता, मुझे पता होता तो आपके लिये पेहले से सब रेडी रखता, जब भी कोई अपने वतन से आता हैं तो मैं ये सब उनके लिये रेडी रखता हूं. अपने घर के खाने स्वाद इनके खाने मैं कहा. मी निशब्द झालो आणि त्याला मिठी मारली. त्याला म्हंटल आजचं जेवण मला आयुष्यभर लक्षात राहील. हे उधार राहिलं माझ्याकडे. आपण परत भेटू नक्की.

हा इबरार कोणी भारतीय नव्हता तर तो होता पाकिस्तान मधला. इबरार चं मूळ गाव इस्लामाबाद च्या जवळ आहे. पोटापाण्यासाठी इबरार मलेशियात काम करतो. माझ्या चेहऱ्यावरून त्याने मी भारतीय आहे हे ओळखलं आणि त्याच्या संवादाची सुरवात हिंदी मधुन केली. मी भारतीय आणि तो पाकिस्तानी, मी हिंदू तर तो मुस्लिम पण जातीच्या, धर्माच्या आणि देशांच्या भिंती आज गळून पडल्या होत्या. "सर जी आप ओर मैं एकी मिट्टी से तो आते हैं!" हे त्याच वाक्य मला निशब्द करून गेलं. त्या वेळेस तो मला भावासारखा वाटला अगदी स्वतःच्या लहान भावासाठी एक छोटा वाटा आपल्या तटातून काढून त्याने मला दिला होता. इबरार सारख्या व्यक्ती पुन्हा एकदा माणुसकी वरचा विश्वास वाढवतात. काय भारत, काय पाकिस्तान आपण एका मातीतुन आलो आणि आपल्या मसाल्यांची, जेवणाची चव ह्यांना काय कळणार? ह्यात त्याने मला जी आपुलकीची जाणीव एका वेगळ्या देशात करून दिली तो अनुभव माझ्यासाठी एक अविस्मरणीय असाच होता. घाईघाईत त्याचा फोटो नाही काढता आला पण मलेशियात असलो तर इबरार ला पुन्हा एकदा नक्की भेटीन आणि ह्या वेळेस माझ्या ताटातलं त्याच्यासाठी थोडं बाजूला काढून ठेवीन.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Wednesday 20 November 2019

खड्डे बुजवणारे दादा (दादासाहेब बिल्होरे)... विनीत वर्तक ©

खड्डे बुजवणारे दादा (दादासाहेब बिल्होरे)... विनीत वर्तक ©

बाहेर गेली होती मी, आणण्यासाठी दो चार लिंबू ब्रिज पडला आल टेम्बू,
उरात होते धड धड जेव्हा बारिश सुरु झाली,
बस कुछ घंटे मैं मुंबई पाण्याखाली आली,
कुठे रस्त्याची लागली वाट,
ट्राफिक मध्ये हुई दिन की रात,
फक्त दो घंटे मैं खडी होती आमची मुंबई कि खाट,
कुठे पडलाय पुल, रस्ता हैं गुल, वाकडी झाली खाट,
गेली गेली गेली मुंबई खड्यात.........

काही वर्षापुर्वी रेडिओ जॉकी 'मलिष्का' ने मुंबईच्या रस्त्यातल्या खड्यांवर केलेलं हे गाणं खुप लोकप्रिय आणि त्याचवेळी टीकेचा विषय झालं होतं. त्यातला राजकारणाचा, गाण्याचा भाग जरा बाजुला ठेवला तर त्या शब्दात व्यक्त केलेली स्थिती प्रत्येक मुंबईकर आणि मुंबईत राहणाऱ्या, प्रवास करणाऱ्या सगळ्यांनी अनुभवलेली नक्कीच आहे. प्रत्येक पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांची होणारी हालत प्रत्येक वर्षी अजून जास्ती खराब होतं जाते आहे. त्याला भरीस भर म्हणुन इलेक्ट्रिक, टेलिफोन, नेटवर्क ते गॅस च्या कामासाठी खोदलेले खड्डे न बुंजवता वर्षभर चालणारी काम. लाच देऊन काम मिळवणारे कंत्राटदार आणि त्यांना मदत करणारे सगळेच हे मुंबई पालिकेच्या कारभारातील ओपन सिक्रेट आहे. पण ह्याच खड्यांमुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दादासाहेब बिल्होरे ह्यांना आपल्या मुलाला मुंबईच्या खड्यांमुळे गमवावं लागलं. उमद्या वयात असलेल्या आपल्या मुलाला मुंबई पालिकेच्या गचाळ कारभारामुळे गमावल्यावर कोणीही बाप आयुष्यात हतबल झाला असता. मुलाच्या वियोगाच्या दुःखात रडत बसला असता पण दादासाहेब बिल्होरे यांनी मात्र त्याचवेळेस एक निश्चय केला की आपल्याने जेवढे होतील तेवढे मुंबईच्या रस्त्यांवर असलेले खड्डे बुजवायचे. आपला मुलगा तर परत येणार नाही पण आपण निदान दुसऱ्यांच्या मुलाला मरणापासुन वाचवू शकतो. हीच खरी श्रद्धांजली आपल्या मुलाला असेल.

२०१५ चा जुलै महिना होता. १६ वर्षाचा मुसरूड फुटलेला प्रकाश बिल्होरे ने १० वी ची परीक्षा नुकतीच पास केली होती. कॉलेज च्या त्या मयूरपंखी दिवसांची स्वप्न बघणारा प्रकाश खूप आनंदी होता. भांडुप इथल्या कॉलेज मध्ये प्रवेशप्रक्रिया पुर्ण करून तो व त्याचा भाऊ राम गोरेगाव इथल्या घरी बाईक वरून परत येत होते. परत येताना खूप जोराचा पाऊस सुरु झाल्यावर त्यांनी पवई इकडे आडोश्याला काहीवेळ आसरा घेतला. मुंबईचा जुलै महिन्यातील पाऊस पुर्ण जगात गाजलेला आहे. अवघ्या काही मिनिटात नेहमीप्रमाणे मुंबई पाण्यात बुडाली. पाऊस थांबल्यावर दोघांनी जे.व्ही.एल.आर. वर आपला प्रवास सुरु केला. सिप्झ इकडे आल्यावर रस्त्यावर पाणी साचलेले होते. गढूळ पाण्यात मुंबईच्या रस्त्यांवर असलेले खड्डे न दिसल्यामुळे त्यांची बाईक अश्याच एका खड्यात अडकून पडली. काही कळायच्या आत दोघेही खाली पडलेले होते. राम च्या डोक्यावर खरचटलं पण त्याचवेळी प्रकाश मात्र ह्या आघाताने कोमात गेला होता. रस्त्यावरून येणारे जाणारे त्यांचे फोटो काढण्यात गुंग होते तर तिकडे हे दोघे मृत्यूशी लढत होते. त्या ही प्रसंगात राम ने दादासाहेब ना फोन करून अपघाताची माहिती दिली. हॉस्पिटल ला पोहचे पर्यंत आपल्या काळजाचा तुकडा मुंबईच्या खड्यांनी कायमचा दूर नेल्याचं दादासाहेब ह्यांना कळून चुकलं. (विनीत वर्तक ©)

दुःखाचा डोंगर बिल्होरे कुटुंबावर कोसळला होता. एकीकडे आपल्या मुलाला गमावल्याचे दुःख तर दुसरीकडे आपल्या पत्नीला सांत्वन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. अश्या परिस्थितीत कोणताही बाप कोलमडला असता पण दादासाहेब ह्यांच्या मनात वेगळचं सुरु होतं. ज्या मुंबईच्या खड्यांनी त्यांच्या मुलगा त्यांच्यापासुन हिरावला होता त्या खड्यांना जबाबदार असणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई तर करायची पण ह्या खड्यांनी अजून कोणाचा बळी घेऊ नये म्हणुन त्यांनी आपल्या परीने हे खड्डे बुंजवण्याचं काम सुरु केलं. ज्यांनी हे खड्डे बनवले ते कंत्राटदार मात्र कायद्याचा फायदा घेत सुखरूपपणे जामिनावर बाहेर आले पण तरीही हार न मानता दादासाहेबांनी आपली लढाई सुरु ठेवली आहे. तुटलेले पेव्हर ब्लॉक, फावडे, खडी, दगड, माती असं सामान गोळा करून त्यांनी दिसतील ते खड्डे भरायला सुरवात केली. ते खड्डे भरल्यावर त्यावरून व्यवस्थितपणे बाईक जाताना बघुन आपण कोणाचा तरी जीव वाचवल्याचं समाधान त्यांना मिळत गेलं. रस्त्यावर असलेल्या खड्यात कोणी आपला जीव गमावत नाही किंवा त्यावर एफ.आय.आर. दाखल होतं नाही तोवर मुंबई पालिका प्रशासनाला जाग येतं नाही. कागदांच्या फाईल भरल्यानंतर मग कुठेतरी हालचालींना सुरवात होते पण तोवर १०-१५ दिवसांचा कालावधी गेलेला असतो. त्या दिवसात अजून कित्येक लोकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. प्रशासनाच्या अनास्थेला बाजुला ठेवुन दादासाहेब बिल्होरे ह्यांनी ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. सुरवातीला कुतुहलाने बघणारे मुंबईकर त्यांच्या ह्या कामात जोडले गेले आणि ‘Fill in the Potholes Project’ ची स्थापना झाली. (विनीत वर्तक ©)

आजवर ६५० पेक्षा जास्ती खड्डे मुंबईच्या रस्त्यांवर दादासाहेब बिल्होरे ह्यांनी भरून काढले आहेत. ज्यामुळे नक्कीच कितीतरी लोकांचा जीव वाचला आहे. एक साधा भाजी विक्रेता असणाऱ्या दादासाहेबांच्या आयुष्यातला एक दुःखद अनुभव एका चांगल्या गोष्टीची सुरवात करून गेला. आज ४ वर्ष त्या घटनेला उलटुन गेली तरी आपलं कार्य त्यांनी सुरु ठेवलं आहे. दरवर्षी खड्ड्यात जाणाऱ्या मुंबईला बाहेर काढणाऱ्या आणि अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या खड्डे बुंजवणाऱ्या दादांना (दादासाहेब बिल्होरे) एक मुंबईकर म्हणुन कडक सॅल्युट.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Monday 18 November 2019

#सॅल्युट वर्दीतला माणुस (डी.सी.पी. विशाल ठाकुर)... विनीत वर्तक ©

#सॅल्युट वर्दीतला माणुस (डी.सी.पी. विशाल ठाकुर)... विनीत वर्तक ©

सामान्य माणसांच आणि पोलिसांच नातं थोडं वेगळचं असते. एकीकडे एक दरारा, वचक तर दुसरीकडे अनामिक भिती. त्यामुळेच सामान्य माणुस वर्दीतल्या लोकांपासुन थोडा लांबच राहणं पसंद करतो. सण, समारंभ, लोकशाहीने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना ह्या सगळ्यात कोणाच्या ही भावना, आनंद ह्यांना गालबोट न लावता ह्यामध्ये मिसळलेल्या वाईट प्रवृत्ती आणि त्या अंगिकारणाऱ्या लोकांपासुन समाजाचं रक्षण जबाबदारी 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' असणाऱ्या पोलिसांवर असते. त्यात अडचणीला भरीस म्हणुन समाजाने आखुन दिलेल्या भिंती ज्यात धर्म, जात, उच्च, निच्च असे अनेक पदर असताना त्यात भेदभाव न करता त्यातल्या प्रत्येकाला आपलं मानुन त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलीस उचलत असतो. सैन्यात काम करणाऱ्या सैनिकांचा  शत्रु समोर असतो. त्यामुळे गोळी चालवताना विचार नाही करावा लागतं. पण घरभेदी असणारे शत्रु हे समाजाच्या साच्यात फिरत असतात त्यामुळे बंदुक जरी सोबतिला तरी तिचा वापर मात्र करताना खुप विचार करावा लागतो. त्यातही आपल्याला आखुन दिलेला भाग नक्षलक्षेत्र असेल तर ती जबाबदारी अजुन वाढते. महाराष्ट्र मधील काही भाग आजही नक्षल क्षेत्र आहे. खरे तर मुंबई, पुणे, नागपुर, सोलापुर, कोल्हापुर असा महाराष्ट्र ओळखणाऱ्या अनेकांना ह्याची माहिती नाही. भामरागड- गडचिरोली सारख्या नक्षल ठिकाणी एक-दोन नाही तर तब्बल तिन वर्ष तिथल्या पुर्ण भागाची सुरक्षा सांभाळून नक्षलवाद मोडुन काढून त्याच्या नंतर मुंबई सारख्या शहराच्या गुन्ह्यातील एक शाखा ज्याचं अस्तित्व आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे अश्या 'सायबर क्राईम' विभागाचे 'डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस' म्हणुन जबाबदारी स्विकारणाऱ्या विशाल ठाकुर ह्यांचा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी असा आहे.

   
डी.सी.पी. विशाल ठाकूर मुळचे धुळे, महाराष्ट्र इथले असुन २०१० साली महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत 'डेप्युटी सुप्रिटेंडन्ट ऑफ पोलीस' म्हणुन पदभार स्वीकारला. लहानपणापासुन युनिफॉर्म ची आवड त्यांना होती व आवडीतुन त्यांनी एन.सी.सी. मध्ये प्रवेश घेतला होता. आपली पहिली दोन वर्ष सातारा इकडे काम केल्यावर त्यांनी महाराष्ट्रातील सुरक्षतेतीच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असणाऱ्या गडचिरोली- भामरागड इकडे २०१२ साली पदभार स्विकारला. भामरागड आज सगळ्यांना माहित आहे ते हेमलकसा इकडे असणाऱ्या लोकबिरादरी प्रकल्पामुळे. आमटे कुटुंबीयांनी इकडे केलेलं कार्य मांडायला शब्द पण कमी पडतील. पण आजही हा भाग नक्षल कारवायांनी धुसमुसत असतो. भामरागड ह्या परिसरात प्रचंड पाऊस पडतो. पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती, प्राणहिता, वैनगंगा ह्या नद्या  काळात दुथडी भरून वाहतात. भामरागड-आलापल्ली या ६५ किमीच्या मार्गावरील सर्व पूल पाण्याखाली अनेकदा जातात त्यामुळे तालुक्यांमधील १२५ पेक्षा जास्त गावांचा संपर्क पुर्ण जगाशी तुटतो. ह्या काळात इथल्या सुरक्षततेची जबाबदारी सहाजिक इकडे असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर येते. ह्यात भरीस भर म्हणुन नक्षल कारवाया ही ह्या भागात सुरु असतात. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, कोसळणारा पाऊस,  बंद पडलेले फोन आणि मोबाईल टॉवर, इलेक्ट्रिसिटी नसताना दिव्यांच्या प्रकाशात जाणारी रात्र, मर्यादित असणारा इंधनाचा पुरवठा आणि जगाशी पूर्णपणे तुटलेला संपर्क जो परत केव्हा सुरु होईल ह्याची शाश्वती नसताना आपलं कर्तव्य पुर्ण जबाबदारीने आणि साहसाने पुर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी तब्बल तीन वर्ष पुर्ण केली.

एक पोलीस पण माणुस असतो हे अनेकदा आपण विसरतो. त्याला ही घरदार, कुटुंब, भावना असतात ह्या सगळ्यांमध्ये आपलं कर्तव्य त्याला पुर्ण करायचं असते. डी.सी.पी. विशाल ठाकूर ह्यांनी ते पुर्ण करताना त्यांनी व त्यांच्या टीम ने एक- दोन नाही तर सात नक्षली अतिरेक्यांचा खात्मा केला. भामरागड सारख्या अतिशय दुर्गम, संवेदनशील भागात सुरक्षा, शांतता राखण्यासाठी तसेच नक्षलांपासुन तिथल्या लोकांच संरक्षण करण्यासाठी त्यांना २०१३ साली राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आलं. (The President's Police Medal for Gallantry is awarded for, "gallantry in saving life and property, or in preventing crime or arresting criminals."). अतिशय निभिर्डतेने आपलं कर्तव्य पुर्ण करताना त्यांनी ३ वर्षाचा आपला पुर्ण कार्यकाळ नक्षल क्षेत्रात पुर्ण केला. त्यांना २०१४ मध्ये 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' (DGP's Insignia), २०१५ मध्ये 'स्पेशल सर्विस मेडल' तर २०१७ साली 'आंतरिक सुरक्षा मेडल' ने गौरवण्यात आलं. शहापूर- ठाणे इकडे आपला पुढला कार्यकाळ पुर्ण केल्यावर २०१८ मध्ये त्यांची नियुक्ती सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय किचकट पण त्याचवेळी प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्याला कळत- नकळत स्पर्श करणाऱ्या 'सायबर क्राईम' विभागात डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस म्हणुन झाली आहे. मुंबई सारख्या ठिकाणी जिकडे करोडो लोकं सोशल मीडिया, इंटरनेट, बँक सिस्टीम, तसेच ई कॉमर्स सारख्या पद्धतीने जोडलेली आहेत. ही सर्वच जण बँक, क्रेडिट कार्ड, सोशल मिडिया अश्या सर्वच ठिकाणी  पैश्याचे व्यवहार करतात. तसेच एम.एम.एस., पॉर्न व्हिडीओ ह्या सारख्या पद्धतीने आभासी जगात होणाऱ्या गुन्ह्यात कमालीची  वाढ झालेली आहे. ह्या सर्वांवर वाचक ठेवण्याच आपलं कर्तव्य डी.सी.पी. विशाल ठाकूर आजही पुर्ण करत आहेत.

आपल्या समाजात लपलेल्या, मिसळलेल्या वाईट प्रवृत्तीच्या माणसांचा वेध घेताना पण त्याचवेळी संवेदनशील मनाने आपल्या टीम, आपल्या भागाची काळजी कधी एक आठवडा तर कधी २५ दिवस जगापासुन तुटलेल्या अवस्थेत त्यांनी घेतली आहे. भामरागड सारख्या ठिकाणी आपल्याच माणसात लपलेला शत्रु तर मुंबई सारख्या शहरात आभासी जगातील शत्रुचा  वेध घेऊन तमाम मुंबईकरांना सायबर सुरक्षा देणाऱ्या डी.सी.पी. विशाल ठाकूर ह्यांचा प्रवास सगळ्यांना प्रेरणा नक्कीच देईल. त्यांच्या कर्तुत्वाला माझा कडक सॅल्युट.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Friday 15 November 2019

चंद्रयान..एक नवीन आशा... विनीत वर्तक ©

चंद्रयान..एक नवीन आशा... विनीत वर्तक ©

चंद्रयान २ ही मोहीम सुरु असताना चंद्रयान ३ ची बीज रोवली गेली होती. विक्रम ल्यांडर ला आलेल्या अपयशानंतर इसरो एक पाऊल मागे गेली असली तरी विक्रम ल्यांडर चा अनुभव इसरोच्या सर्वच वैज्ञानिक आणि संशोधकांना खुप शिकवून गेला आहे. पंतप्रधान म्हणाले तसं, "विज्ञानात अपयश नसते.  असतो तो अनुभव". एकीकडे ह्याच अपयशातील प्रत्येक गोष्टीचा अभ्यास होतं असताना दुसरीकडे इसरो ने पुन्हा नव्या जोमाने चंद्रावर भारताचं पाऊल टाकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. ह्या वेळेस चंद्रावर आपलं पाऊल टाकण्यास उत्सुक असलेले दोन देश एका तिसऱ्या देशासोबत एकत्र येण्यासाठी बोलणी सुरु आहेत. २०१७ ला जपान ची स्पेस एजन्सी जॅक्सा आणि भारताची इसरो ह्यांनी चंद्राच्या संशोधनासाठी एकत्र येऊन काम करण्याचा करार केला. जपान आणि भारत हे दोन्ही देश चंद्रावर आपलं पाऊल ठेवण्यासाठी प्रयत्नशील असताना ह्या दोघांसोबत जगातील अग्रगण्य स्पेस एजन्सी अमेरिकेची 'नासा' ही ह्यामध्ये भाग घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.

चंद्रयान ३ मोहीम नोव्हेंबर २०२० पर्यंत चंद्रावर स्वारी करेल अश्या बातम्या येत असल्या तरी त्यावर तुर्तास कोणीही अधिकृतरीत्या पुष्टी केलेली नाही. असं असलं तरी जॅक्सा आणि इसरो हे चंद्रयान मोहिमेवर काम करणार असल्याचं दोघांनी मान्य केलं आहे. जॅक्सा च्या मते चंद्रयानाला पाठवणार रॉकेट आणि रोव्हर जपान बनवणार असुन ल्यांडर हे इसरो बनवणार आहे. विक्रम ल्यांडर मध्ये राहिलेल्या प्रत्येक त्रुटीवर इसरो मेहनत घेतं असुन ह्या कामात अमेरिकेची नासा आपलं ह्या क्षेत्रातील ज्ञान दोन्ही देशांना देण्याच्या दृष्टीने चर्चा सुरु आहेत. नोव्हेंबर २०२० पर्यंत इसरो चंद्रयान ३ मोहीम पाठवणार का? पाठवणार तर त्यात इतर देशांचा सहभाग असणार का? भारत, जपान आणि अमेरिका असे तीन देश मिळुन अवकाशात चीन च्या महत्वकांक्षेला रोखणार का? असे अनेक तर्क- वितर्क सध्या बांधले जात आहेत. पण एक मात्र नक्की आहे की इसरो ने चंद्रयान ३ च्या मोहिमेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली असुन येत्या काही महिन्यात चित्र स्पष्ट होईल.

चंद्रयान ३ मोहिमेत नक्की कोणते वैज्ञानिक उपकरणं असणार? ह्या मोहिमेचा कालावधी, खर्च आणि इतर सर्वच गोष्टी सध्यातरी नक्की झालेल्या नाहीत. आधी सांगितलं तसं जर का नासा ह्या मोहिमेत सहभागी झाली तर ल्यांडर- रोव्हर चं तंत्रज्ञान भारत /जपान ला देण्याच्या बदल्यात नासा आपली उपकरणं चंद्रयान ३ वर पाठवू  शकेल. असं जर का झालं तर ही गोष्ट तिन्ही देशांसाठी चांगली असेल. नासा च तंत्रज्ञान इसरो जसाच्या तसं न वापरता त्याचा वापर करून भारतीय ल्यांडर बनवेल. ह्याचवेळी २०२४ च्या मोहिमेसाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करण्यासाठी नासा ला वेगळं मिशन पाठवायला लागणार नाही. अर्थात ह्या सगळ्या जर - तर च्या गोष्टी आहेत. चंद्रयान ३ मोहीम आपल्या स्वबळावर ही इसरो करू शकेल. पुढील चंद्रयान मोहिम अनेक देशांसोबत आखली जाईल.

कोणी म्हणेल की भारत चंद्रयान मोहिमांनी नक्की काय साधतो आहे? अवकाशात पुन्हा चंद्र का? ह्याच वैज्ञानिक उत्तर मी आधीच्या लेखात दिलेलं होतं पण त्या पलीकडे चंद्रयान २ मोहिमेने काय साधलं ह्याचा जर लेखाजोखा घ्यायचा असेल तर इसरो चे डायरेक्टर के. सिवन ह्यांना पंचायत शाळेतील मुलांनी काही पत्रे लिहली होती. त्यात ७, ८ वी च्या विद्यार्थ्यांनी चंद्रयान २ मोहिमेने त्यांना आयुष्याचं लक्ष्य मिळाल्याचं नमूद केलं आहे. त्याच सोबत इसरो ला आलेल्या अपयशातुन इसरो सावरून पुन्हा एकदा भरारी घेईल असं म्हंटल आहे. त्यांच्या पत्राला उत्तर (हे पत्र खाली फोटो मध्ये दिलं आहे. तमिळ भाषेतुन त्यांनी उत्तर दिलं आहे. ) देताना के.सिवन ह्यांनी इसरो पुन्हा एकदा लवकरचं चंद्रावर पाऊल टाकेल असं नमुद करताना ह्या विद्यार्थ्यांचं पाठबळाने आपला आत्मविश्वास वाढल्याचं सांगितलं आहे. चंद्रयान मोहिमांनी अनेक तरुण मन प्रज्वलित केली आहेत जे काही दशकापुर्वी अमेरिकेत अपोलो मिशन ने केलं होतं. ह्याचे दुरगामी परिणाम आपल्याला येत्या काळात नक्कीच बघायला मिळतील.

चंद्रयान ३ मोहीमेबद्दलची उत्सुकता आत्तापासुन वाटत आहे. जर ह्या मोहिमेत जॅक्सा, नासा सारख्या स्पेस एजन्सी एक घटक झाल्या तर ह्या मोहिमेचं जागतिक पातळीवरील महत्व कैक पटीने वाढेल. मला नक्की खात्री आहे की ह्या वेळेस इसरो पहिल्यापेक्षा अजुन चांगल्या पद्धतीने चंद्रावर भारताचा तिरंगा फडकवेल.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
 

Monday 11 November 2019

अनंताच्या प्रवासाला (भाग २)... विनीत वर्तक ©

अनंताच्या प्रवासाला (भाग २)... विनीत वर्तक ©

आपल्या सौरमालेतील दूरवरच्या सगळ्या ग्रहांना भेटी दिल्यानंतर आणि आपली प्राथमिक सर्व उद्दिष्ठ पुर्ण केल्यावर व्हॉयजर १ आणि व्हॉयजर २ ह्यांनी आपआपल्या रस्त्याने आपला प्रवास अनंताकडे तसाच सुरु ठेवला आहे. व्हॉयजर २ ला अवकाशात सोडुन जवळपास ४२ वर्ष २ महिने १८ दिवसाचा कालावधी लोटला असुन ते ५७,८९० किलोमीटर / तास ह्या वेगाने पृथ्वीपासुन दुर अनंताकडे जात असुन सद्य स्थितीला ते पृथ्वीपासुन १२२ ए.यु. (१.८३ गुणिले १० चा १० वा घात इतक्या किलोमीटर अंतरावर आहे.) ( १ ए.यु. (एस्ट्रोनिमिकल युनिट) म्हणजे सुर्य आणि पृथ्वी ह्यांच्यामधील सरासरी अंतर आहे. साधारणतः ते १५० मिलियन किलोमीटर इतकं असते.) व्हॉयजर १ ला अवकाशात सोडुन जवळपास ४२ वर्ष २ महिने ३ दिवसांचा कालावधी लोटला असुन ते ६२,१४० किलोमीटर / तास ह्या वेगाने अनंताचा प्रवास करत आहे. सद्य स्थितीला ते पृथ्वीपासुन जवळपास १४७ ए.यु. ( २२ बिलियन किलोमीटर) अंतरावर आहे. मानवाने विश्वाच्या न संपणाऱ्या पोकळीत केलेला हा सगळ्यात लांबचा प्रवास आहे.

युरेनस, नेपच्युन आणि आधीचा प्लुटो पलीकडे ही सूर्याचं अस्तित्व असते. सुर्यापासून प्लाझ्मा च्या स्वरूपात निघणारे सोलार विंड आपल्या सौरमालेच्या भोवती फुग्याच्या आकाराचं एक सुरक्षा कवच बनवतात. ह्या सुरक्षा कवचामुळे आपली पृथ्वी, सौरमाला ह्यांचं विश्वाच्या पोकळीतुन येणाऱ्या वैश्विक किरणांपासून रक्षण होते. सूर्याच्या सोलार विंड च हे सुरक्षा कवच सूर्यावर होणाऱ्या उलथापालथीमुळे कमी जास्त होतं असते. तसेच ह्या कवचात ही दोन भाग पडतात. एक आतला भाग जिकडे ते अतिशय प्रभावी असते (ज्यात आपली पुर्ण सौरमाला आणि त्या पलीकडील काही भाग येतो). त्याच्या बाहेर असणारा दुसरा भाग ज्याला ट्रान्झिशन झोन म्हंटल जाते. इकडे ह्या सोलर विंड ची क्षमता कमी होतं जाते आणि वैश्विक किरणांचा प्रभाव वाढत जातो. एक हद्द अशी येते की जिकडे सूर्याचा म्हणजेच सोलार विंड चा प्रभाव पुर्ण संपतो आणि वैश्विक किरणांची अमर्याद सत्ता सुरु होते. त्या हद्दीला 'हेलिओपॉझ' असं म्हणतात. ह्या हद्दीनंतर जे अवकाश आहे त्याला इंटरस्टेलर असं म्हंटल जाते.

२५ ऑगस्ट २०१२ ला व्हॉयजर १ ने इंटरस्टेलर माध्यमात प्रवेश केला. मानवाच्या इतिहासात पहिल्यांदा एका मानवनिर्मित वस्तु ने सुर्याच्या अस्तित्वाबाहेर पाऊल टाकलं. हा क्षण पुर्ण मानवजातीसाठी अभुतपुर्व असा म्हणावा लागेल. आपल्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत व्हॉयजर २ ने ही ५ नोव्हेंबर २०१८ ला इंटरस्टेलर माध्यमात प्रवेश केल्याचं नासा च्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं. दोन्ही यानांनी वेगवेगळ्या दिशेने जवळपास सारख्या अंतरावरून इंटरस्टेलर माध्यमात प्रवेश करणं हे सुर्याच्या प्रभावाची वेस ही सारखी असल्याचं स्पष्ट करते. इंटरस्टेलर माध्यमातुन अजून अनंताच्या प्रवासाला जात असलेली दोन्ही यान नासाच्या संपर्कात अजुन ही आहेत. डिसेंबर २०१७ ला नासा ने व्हॉयजर १ मधील इंजिन १९८० नंतर पुन्हा एकदा यशस्वी रीतीने चालु केली. तब्बल ३७ वर्षानंतर अवकाशात अनंताचा प्रवास करणारी ही यंत्रणा पृथ्वीवरून इतक्या कालावधी नंतर चालु करून नासा ने आपल्या तंत्रज्ञानाची कार्यक्षमता पुर्ण जगाला दाखवून दिली आहे. व्हॉयजर १ वरून निघालेल्या संदेशाला पृथ्वीवर पोहचायला २० तासापेक्षा जास्त कालावधी लागतो आहे. इतक्या प्रचंड अंतरावरून संदेश पाठवून त्यावरील यंत्रणा आपल्याला हवी सुरु करणं हे खरचं रॉकेट सायन्स आहे. त्यासाठी नासा ला कुर्निसात. नासा च्या मते ह्या इंजिनांनी केलेल्या योग्य बदलामुळे व्हॉयजर १ चं आयुष्य वाढलं असुन अजून पुढली ३ ते ४ वर्ष ते पृथ्वीच्या संपर्कात राहील.

व्हॉयजर २ जवळपास २०२५ पर्यंत पृथ्वीच्या संपर्कात राहील असं नासा ला वाटते. वयाची ४२ वर्ष पुर्ण केल्यावर ही अजुन हे यां पुढली ५ ते ७ वर्ष पृथ्वीवर संदेश पाठवत राहील. ह्या दोन्ही यानावरील काही वैज्ञानिक यंत्रणा त्यांच्या बॅटरी ची शक्ती वाचवण्यासाठी बंद करण्यात आलेल्या आहेत. ह्या दोन्ही यानांना पृथ्वीशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्यावरील इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आणि कॉम्प्युटर ला ऊर्जा देणार हृद्य म्हणजे आर.टी.जी. ( radioisotope thermoelectric generators (RTGs). व्हॉयजर यानात बसवण्यात आलेल्या आर.टी.जी. मध्ये प्लुटोनियम २३८ चे २४ युनिट बसवलेले आहेत. प्लुटोनियम २३८ मध्ये सतत  अणुविखंडन सुरु असुन ह्यातुन निघणाऱ्या उष्णतेचा वापर विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. ह्यात थर्मोइलेक्ट्रिक डिव्हाईस असुन दोन्ही बाजुला असणाऱ्या तापमानातील बदलाचा वापर करून ह्यात ऊर्जा निर्मिती होत आहे. प्लुटोनियम २३८ चं अर्धआयुष्य जवळपास ८७.७ वर्षाच आहे. २०१९ ला व्हॉयजर  यानात साधारण ७०% प्लुटोनियम २३८ बाकी असुन २०५० पर्यंत ते ५०% च्या आसपास उरलेलं असेल.

नासा च्या मते आर.टी.जी. ( radioisotope thermoelectric generators (RTGs) व्हॉयजर १ आणि २ चा संपर्क पृथ्वीशी २०२२ ते २०२५ पर्यंत होऊ शकेल इतकी ऊर्जा त्यातल्या उपकरणांना देऊ शकतील. त्यानंतर मात्र ही ऊर्जा कमी होईल. असं झालं तरी अनंताकडे निघालेल्या ह्या दोन्ही यानाचा प्रवास असाच अनंताकडे सुरु राहील. व्हॉयजर १ आपल्या बाजूच्या घरात म्हणजेच उर्ट क्लाउड मध्ये ३०० वर्षांनी प्रवेश करेल. कोणतीही अडचण अथवा टक्कर झाली नाही तर त्यात ते जवळपास पुढली ३०,००० वर्ष प्रवास करत राहील आणि ४०,००० वर्षांनी ग्लिसे ४४५ ताऱ्याजवळुन जाईल. तर तिकडे व्हॉयजर २ जवळपास ४२,००० वर्षाचा प्रवास करून रॉस २४८ ताऱ्याजवळ पोहचेल. ह्या दोन्ही यानांवर नासाने सोन्याने मढवलेली एक ऑडिओ - व्हिजुअल डिस्क लावलेली आहे. ज्यात ५५ वेगवेगळ्या जगातील प्रमुख भाषेतील संदेश, पृथ्वीवरील प्राण्यांचे, लहान मुलांच्या रडण्याचा आवाज तसेच अनेक संगीतकारांच्या रचना बंदिस्त केलेल्या आहेत. ह्या शिवाय युनायटेड नेशन च्या अध्यक्षांच्या आवाजातील आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या आवाजातील संदेश ही ह्यावर रेकॉर्ड केलेला आहे. ह्या मागचा उद्देश पृथ्वी सारखी वस्ती जर का ह्या अनंताच्या प्रवासाला निघालेल्या यानांना कुठे रस्त्यात मिळाली. जर का त्यांची यंत्रणा पृथ्वीसारखी प्रगत असेल तर त्यावरून त्यांना पृथ्वीवर माणुस असल्याचा शोध लागेल.

अवकाश क्षेत्रातील प्रगती फक्त २० वर्षाची असताना निघालेल्या ह्या दोन्ही यानांनी तंत्रज्ञानातील मैलाचे दगड पार केले आहेत. ४२ वर्षापेक्षा जास्त काळ अवकाशात राहुनपण ह्यावरील यंत्रणा सुस्थितीत आहेत. अनंताच्या प्रवासाला जरी ही दोन्ही यान जात असली तरी त्यांनी आपल्या सोबत पुर्ण मानवाचा इतिहास बंदिस्त करून नेला आहे. व्हॉयजर १ आणि २ हे अवकाशातील नुसती यान नसुन माणसाच्या स्वप्नातील गोष्टींना दिलेलं एक मुर्त स्वरूप आपण अनंताच्या प्रवासाला पाठवून दिलं आहे. ह्या दोन्ही यानांच्या निर्मितीत असणारे नासा चे वैज्ञानिक, संशोधक, वैज्ञानिक आणि सध्यापण ह्याच्याशी संपर्क ठेवुन संशोधन करणारी नासा ची टीम ह्या सर्वाना माझा कुर्निसात.

समाप्त.

फोटो स्रोत :- गुगल


Friday 8 November 2019

अनंताच्या प्रवासाला (भाग १)... विनीत वर्तक ©

अनंताच्या प्रवासाला (भाग १)... विनीत वर्तक ©

रात्रीच्या अंधारात दिसणाऱ्या असंख्य ताऱ्यांना झाकुन टाकणारा एकमेव तारा म्हणजेच सुर्य. सूर्याच्या प्रकाशापुढे सगळेच तारे झाकले जातात. त्याचा अस्त जेव्हा मावळतीच्या क्षितिजावर होतो तेव्हा एका वेगळ्या विश्वाचा उदय आपल्या आकाशात होतो. मानवी डोळ्यांना दिसणारे असंख्य तारे, ग्रह, धुमकेतू, उल्का, तारकापुंज ह्यांनी भरलेलं आकाश प्रत्येक मानवाचं एक कुतूहल नेहमीच बनुन राहिलं आहे. विश्वाच्या करोडो वर्षाच्या भुतकाळात आज आपण पृथ्वीच्या कोणत्याही भुभागावरून डोकावून बघू शकतो. तंत्रज्ञान, विज्ञान ह्यांच्यात झालेल्या प्रगती नंतर विश्वाच्या ह्या पोकळीत आपल्या सारखं कोणी आहे का? ते आपल्या पृथ्वी चे भाऊबंध असणारे इतर ग्रह नक्की कसे आहेत? ह्याची उत्तर शोधण्याची ओढ माणसाला अश्या एका मोहिमेला जन्म देऊन गेली. त्या मोहिमेचं नावं होतं "व्हॉयजर मोहीम" आपल्यापासुन लांब कित्येक किलोमीटर लांब पण आपल्याच सौरमालेचे भाऊबंध असणाऱ्या ह्या भावांना जवळुन बघण्यासाठी आणि त्याही पलीकडे शक्य झालचं तर आपल्या घराच्या कुंपणाबाहेर काय जग आहे? ह्याची ओळख करून घेण्यासाठी अमेरिकेच्या 'नासा' ने ही मोहीम हाती घेतली होती.

२० ऑगस्ट १९७७ ला व्हॉयजर २ तर त्याच्या दोन आठवड्यानंतर ५ सप्टेंबर १९७७ ला नासाने विश्वाच्या पोकळीत माणसाच्या तंत्रज्ञानातील आविष्काराला, त्याच्या प्रगतीला एका अनंत प्रवासावर पाठवून दिलं. व्हॉयजर मोहीम आखताना नासा चा मुळ उद्देश सूर्याला खुप लांबुन परीक्रमा करणाऱ्या गुरु, शनी, नेपच्यून, युरेनस ग्रह आणि ह्या सर्वांचे ज्ञात आणि अज्ञात उपग्रहांचा अभ्यास करणं हा होता. त्या पलीकडे शक्य झालचं तर आपल्या सौरमालेच कुंपण किती लांब आणि त्या पलीकडे असणार असणारं अज्ञात विश्व ह्यांचा अभ्यास करणं हा होता. व्हॉयजर मोहिमेच्या उड्डाणाची तारीख आणि दोन्ही यानांचा प्रवासाचा रस्ता हा खुप अभ्यास करून आखला गेला होता. जवळपास १७६ वर्षांनी येणाऱ्या एका योगाला नासा ने आपलं लक्ष्य केलं होतं. यानाचा वेग आणि पृथ्वीच्या भोवती फिरताना ह्या ग्रहांचा मार्ग ह्याच गणित करून रस्ता असा बनवला गेला की ही दोन्ही यान आपल्या प्रवासात ग्रहांच्या जवळुन प्रवास करतील आणि त्या सोबत ह्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून दुसऱ्या पुढल्या ग्रहाकडे आपोआप ढकलले जातील. एकाचवेळी सगळ्या ग्रहांना असं लक्ष्य करणं शक्य झालं नसतं म्हणुन 'व्हॉयजर १' ने गुरु आणि शनी चा अभ्यास करून आपलं मार्गक्रमण पुढे केलं तर 'व्हॉयजर २' ने त्याचवेळी युरेनस आणि नेपच्युन चा अभ्यास केला.

इतक्या लांबच्या प्रवासात नासा ला काही धोका पत्करायचा नव्हता. नासा आपल्या मोहीम आखताना नेहमीच 'प्लॅन बी' चा विचार करत असते. त्यानुसार ह्या दोन्ही यानाच्या कक्षा ठरवण्यात आल्या होत्या. व्हॉयजर २ ने जरी आधी उड्डाण केलं तरी त्याचा अनंताचा प्रवास हा व्हॉयजर १ च्या पाठीमागे सुरु झाला. काही कारणाने जर का व्हॉयजर १ वरील वैज्ञानिक उपकरणं खराब झाली अथवा यानाकडून संदेश येणं बंद झालं तर गुरु आणि शनी ग्रहाचा अभ्यास शक्य नव्हता. अश्या वेळेस त्याच्या मागोमाग प्रवास करणाऱ्या व्हॉयजर २ चा रस्ता बदलवून युरेनस, नेपच्युन पेक्षा गुरु, शनी ग्रहाचा अभ्यास करता आला पाहिजे असा नासा ने प्लॅन बी आखला होता. पण तसं करण्याची गरज नासा ला भासली नाही. दोन्ही व्हॉयजर नी आपलं काम चोख पुर्ण करताना आपल्याला आपल्याच घराबद्दल असलेल्या माहितीत खुप मोलाची भर टाकली. (विनीत वर्तक ©)
व्हॉयजर १ आणि व्हॉयजर २ दोन्ही मोहिमांनी गुरु आणि शनी बद्दल अनेक रहस्यांचा उलगडा केला आणि अनेक नवीन शोध लावले. व्हॉयजर १ ने गुरु ग्रहाच पहिलं चित्र १९७८ मध्ये १२६ मिलियन किलोमीटर वरून पृथ्वीवर पाठवलं. १९७९ ला त्याने गुरु ग्रहाच्या भोवती असणाऱ्या एका रिंग चा उलगडा शास्त्रज्ञांना केला. त्याचसोबत गुरु चे उपग्रह थेबे आणि मेटिस चा शोध लावला. व्हॉयजर २ ने आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत गुरु ग्रहाची अनेक छायाचित्र घेताना त्याचा उपग्रह युरोपा ची अनेक छायाचित्र जवळुन बंदिस्त केली. त्या नंतर दोन्ही यानांनी आपला मोर्चा शनी ग्रहाकडे वळवला. व्हॉयजर १ ने शनी च्या दोन उपग्रह प्रोमॅथुरेस आणि पंडोरा ह्यांचा शोध लावला. ह्याशिवाय त्याने शनी च्या भोवती असणाऱ्या 'जी' कडीचा ही शोध लावला. ह्यानंतर व्हॉयजर २ ने ही शनीचा अभ्यास करताना अनेक सुंदर छयाचित्रात ह्या ग्रहाला आणि त्याच्या उपग्रहांना बंदिस्त केलं. (विनीत वर्तक ©)

व्हॉयजर १ ने त्याला नेमुन दिलेलं संशोधनाच काम संपवून आपल्या घराच्या कुपणांकडे म्हणजेच सौरमालेच्या टोकाकडे आपला प्रवास सुरु केला. तर तिकडे व्हॉयजर २ ने त्याच्या कामाची सुरवात केली. १९८६ साली युरेनस जवळुन जाताना व्हॉयजर २ ने युरेनस चं वातावरण ८५% हायड्रोजन तर १५% हेलियम ने बनलेलं असल्याचं सिद्ध केलं. ह्या शिवाय युरेनस च्या भोवती कडी असल्याच तसेच त्याच्या १० नवीन उपग्रहांन सोबत युरेनस च्या विचित्र असणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचा शोध लावला. हे चुंबकीय क्षेत्र युरेनस ग्रहाच्या मध्यरेषेपासुन ५५ डिग्री कोनात कललेलं आहे. ह्या नंतर व्हॉयजर २ ने नेपच्युन ग्रहावर आपलं संशोधन सुरु ठेवलं. १९८९ ला त्याने ह्या ग्रहाच्या जवळुन जाताना नेपच्युन ग्रहाचे ५ नवीन उपग्रह आणि त्याच्या भोवती असलेल्या ४ कड्यांचा शोध लावला. नेपच्युन ला भेट देऊन व्हॉयजर २ ने ही आपल्या घराच्या कुंपणाकडे म्हणजेच सौरमालेच्या टोकाकडे प्रवास सुरु केला.

क्रमशः

(भाग २ मध्ये अनंताच्या प्रवासाला निघालेल्या ह्या दोन्ही यानांची सद्यस्थिती, त्यांचा विश्वाच्या पोकळीत होणार प्रवास, तसेच जवळपास ४२ वर्षानंतर ह्या यानांना चालु ठेवणारी यंत्रणा तसेच त्यांचं भविष्य ह्याचा वेध घेणार आहे. )

फोटो स्रोत :- गुगल.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Wednesday 6 November 2019

के ४ ... विनीत वर्तक ©

के ४ ... विनीत वर्तक ©


पाकिस्तान, चीन सारखे शेजारी असणाऱ्या भारताला आपल्या संरक्षण सिद्धतेत नेहमीच सज्ज रहावे लागते. इच्छा असो वा नसो पण आपल्या सिमांच संरक्षण करण्याची जबाबदारी भारतावर येते. पाकिस्तान सारखं राष्ट्र एक दमडीची किंमत नसताना रोज अणुबॉम्ब हल्ला करण्याची पोकळ धमकी देतं असताना असल्या राष्ट्राला त्याची जागा दाखवण्यासाठी भारताला आपलं स्थान दाखवुन द्यावं लागते. पाकिस्तान रोज अणुबॉम्ब टाकु अश्या वल्गना करतं असलं तरी भारताची ताकद पाकिस्तान ओळखुन आहे. विशेषतः समुद्रात असलेलं भारताचं नौदल पाकिस्तान च्या नौदलापेक्षा कित्येक पटीने वरचढ आहे. आज स्थिती अशी आहे की भारताने अशी क्षेपणास्त्र बनवली आहेत की पाकिस्तान कडे त्याच कोणतचं उत्तर नाही. 

८ नोव्हेंबर २०१९ ला भारताने आपल्या भात्यातील एका शक्तीशाली क्षेपणास्त्राची परीक्षा करण्याचं ठरवलं आहे. ह्या शक्तीशाली क्षेपणास्त्राचे नाव आहे के-४. के-४ ह्या क्षेपणास्त्राचा पल्ला ३५०० किलोमीटर असुन हे मध्यम पल्याच क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र पाणबुडी वरून डागता येते. हे क्षेपणास्त्र हायपरसॉनिक (हायपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या ५ पट किंवा त्याहुन अधिक वेगाने) वेगाने आपल्या लक्ष्याकडे झेपावते. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र नेण्यास सक्षम असुन त्या शिवाय हे क्षेपणास्त्र एम.आय.आर.व्ही. तंत्रज्ञान असलेलं आहे. (मल्टीपल इंडिपेंडन्टली टार्गेटेबल री एंट्री वेहकल ज्याचा अर्थ होतो हे एक क्षेपणास्त्र डागल्यावर एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणांना लक्ष्य बनवता येते.) ह्याच्या अश्या तंत्रज्ञानामुळे हे क्षेपणास्त्र शत्रूवर बसवण्यात खुप महत्वाची भुमिका निभावते.

के ४ हे क्षेपणास्त्र १२ मीटर लांब १.३ मीटर व्यास असलेलं असुन ह्याच वजन साधारण १७-१९ टनाच्या आसपास आहे. (१७,००० ते १९,००० किलोग्रॅम). २५०० किलोग्रॅम वजनाची अण्वस्त्र वाहुन नेण्याची ह्याची क्षमता आहे. समुद्राच्या पाण्याखालुन डागल्यावर ३५०० किलोमीटर चा पल्ला गाठत त्यातील कोणत्याही लक्ष्याचा वेध घेऊ शकते. के ४ सोबत भारत अरिहंत श्रेणीतील पाणबुडीसाठी बी.ओ.- ५ नावाचं क्षेपणास्त्र ही बनवतं असुन त्याचा पल्ला जवळपास ७०० किलोमीटर चा आहे. के ४ च्या यशस्वी चाचणी नंतर भारताची पाणबुडी समुद्राच्या पाण्यातील आंतराष्ट्रीय सिमांमध्ये राहुन पाकिस्तान मधील कोणत्याही शहराला, भागाला आपलं लक्ष्य बनवू शकते. डागल्यावर मिसाईल डिफेन्स सिस्टीम ला ही चकवा देण्यासाठी आपल्या रस्त्यात बदल करून लक्ष्यावर हमला करू शकते. रोज उठून अणुबॉम्ब ची धमकी देणाऱ्या पाकिस्तान चे धाबे ह्या चाचणीमुळे दणाणले आहेत. कारण पाकिस्तान ने नजर वाकडी करण्याचा प्रयत्न केला तर जमीनीवरून नाही तर पाण्याखालुन पण पाकिस्तान च स्थान जगाच्या नकाशातुन नष्ट करण्याची क्षमता भारताकडे येणार आहे.

विशाखापट्टणम जवळच्या समुद्रात पाण्याखाली असलेल्या एका गुप्त जागेवरून हे मिसाईल डागण्यात येणार असुन भारताने आंतरराष्ट्रीय निकषाप्रमाणे NOTAM (Notice to Airmen) आणि मरीन वॉर्निंग बंगालच्या उपसागरात सुरु केल्या आहेत. ह्याचा अर्थ असतो की येत्या दिवसात भारत क्षेपणास्त्र चाचणी कधीही करणार असुन ह्या मार्गातील सर्वच नौका, विमाने ह्यांना हा सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे. डी.आर.डी.ओ. के ४ च्या पुर्ण पल्याची चाचणी करणार का? हे अजुन गुलदस्त्यात असलं तरी जगातील ह्या भागातुन वाहतुक करणाऱ्या सगळ्यांना दिलेला इशारा सूचक आहे. ह्या पाठोपाठ भारत अग्नी ३ आणि ब्राह्मोस ह्या अण्वस्त्र वाहुन नेणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी पण येत्या काही आठवड्यात करणार आहे.

रोज उठून गरळ ओकणाऱ्या पाकिस्तान ला ह्या तीन चाचण्या त्याची जागा नक्कीच दाखवतील. जमीन, वायु, पाण्याखालुन अश्या सर्व ठिकाणांहून ३००० पेक्षा जास्त अंतरावरून स्वनातीत वेगाने जाणारी भारताची अण्वस्त्र वाहुन नेणारी क्षेपणास्त्र नक्कीच पाकिस्तान ला चारी मुंड्या चित करतील ह्यात मला शंका नाही. तूर्तास के ४ च्या चाचणीसाठी डी.आर.डी.ओ. च्या वैज्ञानिक, संशोधक आणि अभियंते ह्यांना खुप खुप शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल 


Monday 4 November 2019

#सलाम आय.पी.एस.अधिकारी हर्ष पोद्दार... विनीत वर्तक ©

#सलाम आय.पी.एस.अधिकारी हर्ष पोद्दार... विनीत वर्तक ©

जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो…
साचले मोहाचे धुके घनदाट हो …
आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती.....

महाराष्ट आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील तरुण वर्ग धर्माच्या, जातीच्या, राजकारणाच्या दुहीने पोखरून निघाला असताना नक्की कुठे जावे? काय करावे? ह्या गोंधळात हा वर्ग चुकीची वाट निवडत आहे. National Crime Records Bureau (NCRB) च्या मते कायद्याला आव्हान देणाऱ्या घटनांमध्ये विशेषतः तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात सर्वप्रथम आहे. ह्याचा सरळ अर्थ आहे की महाराष्ट्राची पुढली पिढी कुठेतरी चुकीच्या वाटेने पुढे जात आहे. ह्यावर कुठेतरी नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नकळत महाराष्ट्रासाठी 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' ज्याचा अर्थ ( To protect Good and to destroy Evil) असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांवर आहे. चुकीच्या मार्गाकडे वळणाऱ्या ह्या तरुण पिढीला योग्य मार्गाकडे नेण्यासाठी महाराष्ट्रातील एका पोलीस अधिकाऱ्याने एक वेगळा उपक्रम ह्या भरकटलेल्या आणि त्या वळणावर जाणाऱ्या तरुण पिढीसाठी सुरु केला. एकेकाळी प्रायोगिक तत्वावर सुरु केलेल्या ह्या उपक्रमाने तरुणांच्या मानसिकतेत केलेले बदल लगेच दिसुन आले. ह्या उपक्रमाची व्याप्ती पुर्ण महाराष्ट्रभर नेण्यात आली. आज महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील २,००,००० पेक्षा जास्त तरुणांच्या मानसिकतेत बदल झालेला आहे. ह्या उपक्रमामागे ज्यांची दूरदृष्टी होती ते म्हणजे आय.पी.एस. अधिकारी हर्ष पोद्दार. नागपुरच्या डेप्युटी कमिशनर ह्या पदानंतर सध्या बीड जिल्ह्याचे 'सुप्रिटेंडन्ट ऑफ पोलीस' म्हणुन नुकताच कार्यभार स्विकारलेल्या हर्ष पोद्दार ह्यांनी महाराष्ट्रातील तरुणांना योग्य दिशा दाखवण्याचं काम तर केलचं आहे पण त्याही पलीकडे पोलीस आणि सामान्य नागरिक ह्यांच्यात समन्वय साधण्याचं शिवधनुष्य लिलया पेललं आहे. (विनीत वर्तक ©)

आय.पी.एस. हर्ष पोद्दार ह्यांनी National University of Juridical Sciences (NUJS) कोलकत्ता इथुन आपलं पदवी शिक्षण पुर्ण केल्यावर आपलं पुढलं शिक्षण Balliol College of the University of Oxford.इकडे पुर्ण केलं. तिकडे त्यांना अतिशय प्रतिष्ठेच्या Chevening Scholarship (a scholarship awarded by the UK government to outstanding students with leadership potential) ने सन्मानित करण्यात आलं. आपलं शिक्षण झाल्यावर त्यांनी लंडन मध्ये आपली वकीली सुरु केली. पैसा, पद, प्रतिष्ठा असं सर्व मिळाल्यावर पण आपण जिथुन आलो त्या लोकांसाठी काहीतरी काम करण्याची इच्छा स्वस्थ बसुन देतं नव्हती. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर,

“I wanted to be a civil servant, I wanted to be a part of policy-making in India.”

२०१० साली लंडन मधली वकिली सोडून त्यांनी भारताचा रस्ता धरला. भारतात आल्यावर लोकसेवायोगाची परीक्षा पहिल्या प्रयत्नात त्यांनी पास केली. आय.आर.एस. होण्याची संधी असताना ही त्यांनी २०१३ मध्ये पुन्हा लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली त्यात त्यांचा ३६१ नंबर देशातुन आला व सोबतच आय.पी.एस. बनण्याचं त्यांच स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात रुजू झाल्यावर धार्मिक द्वेषातुन गुन्ह्यांनकडे वळणाऱ्या तरुणाईला रोखण्यासाठी त्यांनी एका वेगळ्या कल्पनेला जन्म दिला. महाराष्ट्राच्या करवीर इकडे ए.सी.पी. असताना त्यांनी Aurangabad’s Nath Valley School (NVS) and Aurangabad Police Public School (APPS) इथल्या तरुणांना एकत्र करून आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी काय करता येईल ह्यासाठी टीम तयार केली. भ्रष्टाचार, नक्षल, टेररिस्ट ते सेक्सुअल ऑफेंस अश्या विविध गुन्ह्यांना रोखण्यासाठी त्यांनी काय योगदान दिलं आणि अजून चांगल्या पद्धतीने त्यावर वचक बसवण्यासाठी काय करता येईल ह्याबद्दल त्यांच्या कल्पना समोर मांडण्यात आल्या. गरीब आणि साधारण घरातुन येणाऱ्या ह्या मुलांच्या मनावर केलेल्या योग्य संस्कारामुळे ते रहात होते त्या भागातील गुन्ह्यांन मध्ये लक्षणीयरीत्या घट झाल्याचं नंतर झालेल्या अभ्यासात समोर आलं. जबाबदार झालेले हे तरुण गुन्हा रोखण्यासाठी घेतलेला पुढाकार हा हिंसक नसुन आपल्या कुटुंबातील, आजूबाजूच्या लोकांना योग्य दिशा दाखवणारा होता. (विनीत वर्तक ©)

आय.पी.एस. हर्ष पोद्दार ह्यांच्या कल्पनेने गुन्ह्या मुळापासुन रोखण्यास मदत होत होती. Youth Parliament Championship ही त्यांची पुर्ण संकल्पना महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात राबवण्यात आली. आज २,००,००० अधिक तरुण ह्यामुळे पोलिसांशी जोडले गेले आहेत. सहाजिक ह्याचा प्रभाव महाराष्ट्रातील गुन्ह्यांवर नियंत्रण तसेच तरुणांना योग्य रस्ता दाखवण्यासाठी होतो आहे. आय.पी.एस. हर्ष पोद्दार ह्यांचं कार्य इकडेच थांबत नाही तर त्यांनी महाराष्ट्रातील गावागावातील अनेक पोलीस स्टेशन च्या कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल केले. त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच आय.एस.ओ. मानांकन मिळवण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील अनेक पोलीस स्टेशनांना आज आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळालेलं आहे. ह्याशिवाय 'उडान' ह्या योजनेअंतर्गत कोणतेही पैसे ना घेता गावातील तरुणांना लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आय.पी.एस. बनण्यासाठी उद्युक्त केलं आहे. काही वर्षापुर्वी भिमा-कोरेगाव ह्या जातीय उद्रेगात त्यांच्यावर अतिसंवेदनशील अश्या मालेगाव ची जबाबदारी होती. हिंदू, मुस्लिम, दलित अश्या तिन्ही समाजाचं प्राबल्य असलेल्या भागात जातीय सलोख्या राखण्यात त्यांचं कुशल नेतृत्व कामी आलं होतं. तळागाळात असलेलं खबरींच जाळ, दंगल सांभाळण्यासाठी करायच्या उपाययोजनांचा सराव, ह्याशिवाय समाजात काय चालू आहे ह्यावर जातीने लक्ष ह्या सगळ्यांमुळे भिमा-कोरेगाव जातीय दंगलीच्यावेळी मालेगाव शांत होतं.

एक सुखवस्तु आयुष्य पायाशी लोळण घेतं असताना ते सर्व सोडून लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आय.पी.एस. परीक्षा पास होतं, महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या उभारणीत आपल्या कल्पक नेतुर्त्वाने चुकीचं वळण घेतलेल्या तरुणाईला योग्य दिशा दाखवत, समाजात शांतता, सलोखा, सर्वधर्म सहभाव रुजवण्यास मदत करणाऱ्या आय.पी.एस. हर्ष पोद्दार ह्यांना माझा सलाम व त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.