Tuesday 26 February 2019

सर्जिकल स्ट्राईक २ करणारे मिराज २०००... विनीत वर्तक ©
गेल्या काही महिन्यात भारताने खरेदी केलेल्या डसाल्ट राफेल विमानांवरून खूप रणकंदन झालेलं आहे. ३६ राफेल विमान सरकारने खरेदी करण्याचा करार नाहक वादात गोवला गेला. अजूनही त्यावर राजकारण होतं असलं तरी हे विमान बनवणारी डसाल्ट कंपनी भारतीय वायू सेनेसाठी नवी नाही. डसाल्ट एविएशन ह्या फ्रांस च्या कंपनीने बनवलेलं ४ थ्या पिढीतलं मिराज २००० आज प्रत्येक भारतीयाच्या तोंडी आहे. आज कौतुकाचा विषय बनलेलं मिराज २००० हे डसाल्ट एविएशन च लढाऊ विमान भारतीय सेनेत दाखल होणाऱ्या राफेल विमानांचा थोरला भाऊ म्हंटल्यासं वावगं ठरणार नाही. कारण मिराज २००० च्या ६०० पेक्षा जास्ती विमानांकडे जगातील ९ देशांच्या हवाई संरक्षणाची जबाबदारी आहे. फ्रांस, तैवान, इजिप्त, ब्राझील, पेरू, यु.ए.ई. सह भारताचा समावेश ह्यात आहे. काय कारण आहे की भारताने सर्जिकल स्ट्राईकसाठी मिराज २००० वर विश्वास ठेवला जेव्हा की भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात सुखोई एम.के.आय. ३० आणि मिग २९ सारखी पुढल्या पिढीतील लढाऊ विमाने आहेत? जाणून घेऊ या ह्या मल्टीरोल मिराज २००० लढाऊ विमानाविषयी. (विनीत वर्तक ©)
मिराज २००० हे चौथ्या पिढीतील लढाऊ विमान असून भारताच्या वायू सेनेमधील बहुआयामी आणि खतरनाक असं लढाऊ विमान आहे. १९७८ साली पहिल्यांदा उड्डाण भरलेलं आणि १९८४ साली फ्रांस च्या हवाई दलाचा भाग झालेलं विमान भारताने पाकिस्तान च्या एफ १६ च्या विरोधात फ्रांस सरकारकडून खरेदी करण्याचा करार केला. ह्या विमानांनी आपली उपयुक्तता १९९९ च्या कारगिल युद्धात सिद्ध केल्यावर भारत सरकारने अजून १४ विमानांची ऑर्डर डसाल्ट एविएशन ला दिली. ह्यामुळे आज ५० डसाल्ट मिराज २००० भारतीय वायू सेनेचा भाग आहेत. ह्या विमानांना अपग्रेड करून ह्याचं आयुष्य आता २०३० पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. ह्याच डसाल्ट एविएशन ने आता राफेल ची निर्मिती सुरु केली असून त्याच धर्तीवर भारताने ३६ राफेल विमान खरेदी करण्याचा करार केला आहे.
मिराज २००० हे एक पायलट असलेलं लढाऊ विमान असून दोन पायलट मध्ये ते बदलवता येऊ शकते. हे विमान लांबीला १४.२६ मीटर असून आपल्या पंखानोबत ह्याची रुंदी ९१.३ मीटर आहे. ह्या विमानाच वजन ७५०० किलोग्राम असून १७,००० किलोग्राम वजन घेऊन उड्डाण भरण्यास सक्षम आहे. मिराज २००० ची सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे तो म्हणजे ह्याचा वेग. हे विमान ध्वनीच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने म्हणजे २.२ माख ( २३३६ किमी/ तास ) ह्या वेगाने प्रवास करण्यास सक्षम असून एका फेरीत १५५० किमी. अंतर कापण्याची ह्याची क्षमता आहे. हवेतून ५९,००० फुट (१७ किलोमीटर ) उंचीवरून हे विमान उड्डाण करू शकते. ह्यावर फ्लाय बाय वायर कंट्रोल सिस्टीम असून लेझर गायडेड बॉम्ब ( जे आज पाकिस्तानात अतिरेक्यांवर डागले गेले आहेत ) तसेच एअर टू एअर, एअर तो सरफेस क्षेपणास्त्रे घेऊन जायची ह्याची क्षमता असून रडार डॉपलर मल्टी टार्गेट रडार ह्यावर बसवलेलं आहे. जे ठरवून दिलेल्या लक्ष्याच सर्वनाश करण्यात सक्षम मानलं जाते. (विनीत वर्तक ©)
सुखोई एम.के.आय ३० आणि मिग २९ सारखी अत्याधुनिक लढाऊ विमान आपल्या ताफ्यात असताना भारतीय वायू सेनेने मिराज २००० ची निवड करण्यामागे काही कारणे आहेत. एकतर १९९९ च्या युद्धात ह्या विमानांनी आपल्या चपळता, अचूकता आणि वेगाने युद्धाच पारड भारताच्या बाजूने वळवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांच्या क्षमतेवर जास्ती विश्वास होता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्जिकल स्ट्राईक सारख्या ठिकाणी अचूकता, वेग, वेळ ह्या तीन गोष्टीना अतोनात महत्व असते. काय होतं आहे हे कळायच्या आधी आपलं काम फत्ते करून आपल्या घरी परतायचं असते. जोवर शत्रू जागा होतो तोवर सगळं संपलेलं असते. मिराज २००० चा वेग हा सुखोई ३० एम.के.आय. पेक्षा जास्ती आहे. सुखोई ३० एम.के.आय. २१२० किमी/ तास ह्या वेगाने उड्डाण भरू शकते जो वेग जवळपास २०० किमी/तास ने मिराज २००० पेक्षा कमी आहे. तसेच एम.के.आय. ३० आणि मिग २९ वजनांनी जड आहेत. ह्यामुळे अचूकता, वेग आणि चपळता ह्या बाबतीत सर्जिकल स्ट्राईक सारख्या मिशन मध्ये मिराज २००० हे सर्वोत्तम पर्याय भारतीय वायू सेनेकडे होतं. (विनीत वर्तक ©)
१२ मिराज २००० विमानांनी जेव्हा उड्डाण भरलं तेव्हा काही विमानांन मध्ये लेझर गायडेड बॉम्ब बसवण्यात आले होते. अवघ्या २१ मिनिटांच्या हल्यात मिराज २००० नी पाकिस्तान च्या हद्दीत घुसून ३०० पेक्षा जास्ती अतिरेक्यांना ठार केलं. पाकिस्तान च्या एअर बेस आणि एफ १६ ला ह्या हल्याचा सुगावा लागला परंतु भारतीय मिराज २००० विमानांच्या चपळता आणि शक्ती पुढे आपली खैर नाही हे लक्षात आल्याने मुग गिळून गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. उरलेली विमान स्ट्राईक करणाऱ्या विमानांना कव्हर देत होती. ह्यामुळे पाकिस्तानला काहीच करण्याची संधी मिळाली नाही. (विनीत वर्तक ©)
ह्या सगळ्यात मोठा भाग हा भारतीय हवाई दलाच प्लानिंग, विमान चालवणारे पायलट ह्यांचा असला तरी मोक्याच्या क्षणी धोका न देता शत्रूला चारी मुंड्या चीत करणाऱ्या मिराज २००० लढाऊ विमानांचा ही वाटा मोठा आहे. डसाल्ट एविएशन च पुढच पाउल किंवा तंत्रज्ञानात अजून प्रगत असलेल्या राफेल विमानांच्या येण्याने पाकिस्तान च्या तोंडच पाणी पळाल आहे ते उगाच नाही. ही एक सुरवात आहे. भारताने अजून आपल्या पुढल्या फळीतील सुखोई एम.के.आय. ३० आणि मिग २९ विमानांचा वापर केलेला नाही जे मिराज २००० पेक्षा अत्याधुनिक असून ब्राम्होस सारखं जगातील सगळ्यात वेगवान क्षेपणास्त्र हवेतून डागण्यात सक्षम आहेत. तूर्तास सर्जिकल स्ट्राईक २ मध्ये भाग घेतलेल्या सगळ्याच सैनिकांना माझा सलाम. जय हिंद.
सूचना :- ही पोस्ट (विनीत वर्तक ©) कॉपीराईट असून नाव काढून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होईल ह्याची नोंद घ्यावी.
माहिती स्त्रोत :- गुगल, न्यूज १८
फोटो स्त्रोत :- गुगल


Thursday 21 February 2019

एक छोटीसी लव्ह स्टोरी... विनीत वर्तक ©

एक छोटीसी लव्ह स्टोरी... विनीत वर्तक ©

प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडतंच!कधी ते प्रेम आपल्या आयुष्याचा भाग बनतं तर कधी अव्यक्त रहातं... कोणाला तरी 'आय लव्ह यू' बोलणं जितकं कठीण असतं त्याहीपेक्षा त्या शब्दांना आयुष्यभरासाठी निभावणं हे शिवधनुष्य अनेकांना पेलणं जड जातं. सगळं काही व्यवस्थित असतानाही एकेकाळी हवंहवसं वाटणारं प्रेम अचानक अचानक निरस होऊन जातं. आधी सहजरित्या न आवडणाऱ्या गोष्टी पण पचत असतात परंतु जशी वेळ जाते तसं आवडणाऱ्या गोष्टी पण डोक्यात जायला लागतात. उसवलेले धागे मग उसवतच जातात ते अगदी ताटातूट होईपर्यंत!! (विनीत वर्तक ©)

परंतु,काही नाती ह्या पलीकडे असतात. ती प्रेमाच्या वेगळ्या धाग्यांनी जोडलेली असतात. व्यवहारी आयुष्य जगणाऱ्या अनेकांना ही नाती न कधी समजत न कधी पचनी पडत...

आयुष्यात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात तसे त्या तीन शब्दांना आपलं आयुष्य मानणाऱ्यांचे पण असतात. आयुष्यात कितीही बाका प्रसंग आला तरी त्या तीन शब्दांना तो ह्या आयुष्यातून निघून गेल्यावर पण तोडू शकत नाही इतके ते प्रेमाचे बंध मजबूत असतात. अशीच एक छोटीसी लव्ह स्टोरी आपल्याला खूप काही शिकवून जाते.(विनीत वर्तक ©)

तुमच्या-आमच्यासारखी ह्या कथेतली दोन पात्रं; पण त्याचं प्रेम हे जगावेगळं. पहिल्यांदा बघता क्षणी एकमेकांत एकरूप झालेली ती दोन मनं आयुष्याच्या सगळ्या त्सुनामीत तशीच राहिली. सगळ्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजावून गेली.

मेजर 'शशिधरन व्ही. नायर' भारतीय सेनेचा शूरवीर अधिकारी! पुण्याच्या नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या शशी नायर ला लहानपणापासून सैन्यात जायचं होतं. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना त्याने २००७ साली भारतीय सेनेची 'सी.डी.एस.' ही परीक्षा उत्तीर्ण केली. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण आयुष्यात काहीतरी बनवून दाखवण्याची जिद्द त्याला 'एन.सी.सी.' मध्ये घेऊन आली. त्यासाठी रोज सकाळी ६ वाजता फर्ग्युसन कॉलेजमधील एन.सी.सी.च्या क्लास ला हजर राहण्यासाठी २० किलोमीटर सायकल चालवून तो शार्प ६ वाजता कॉलेजला पोहचत असे. त्याची शारीरिक कणखरता खूप चांगली होती. आपल्यासोबत तो इतरांना ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी प्रोत्साहन देत असे. (विनीत वर्तक ©)

२००७ साली मेजर शशिधरन नायर ह्यांची ओळख त्यांच्या एका मित्राने तृप्तीशी करून दिली. बघताक्षणीच तृप्ती आणि शशिधरन नायर एकमेकांच्या प्रेमात पडले. तृप्तीने कॉम्प्यूटर एप्लिकेशन मधून आपलं मास्टर पूर्ण केलं होतं. 'लव्ह एट फर्स्ट साईट' अशा वेगळ्या प्रेमकथेत दोघांनाही कळून चुकलं की 'अपनी जोडी तो उसने बनाई है।' ६ महिन्यानंतर दोघांनी एंगेजमेंट केली. आयुष्याच्या एका वळणावर अवचित भेटलेल्या दोघांनी आपल्या प्रेमाला आयुष्यभर जोडीदार बनून निभावण्याचा निर्णय घेतला.

पण नियतीच्या मनात काही वेगळचं होतं. एंगेजमेंटनंतर अवघ्या ८ महिन्यात तृप्ती ला एका दुर्धर आजाराने वेढलं. तृप्ती ला 'मल्टीपल आर्टिरिओस्क्लेरोसिस'असल्याचं निदान झालं. त्यामुळे तृप्तीला व्हीलचेअरचा आसरा पूर्ण आयुष्यभर घ्यावा लागणार हे नक्की झालं. नुकतीच कुठे मेजर नायर आणि तृप्ती ह्यांची एक छोटीसी लव्ह स्टोरी सुरु झाली होती. पण त्याला असं ग्रहण लागलं ज्यात पुन्हा ते सुटण्याची कोणतीच चिन्ह दिसतं नव्हती.

मेजर शशिधरन नायर ह्यांच्यापुढे प्रसंग बाका होता. एक निर्णय त्यांना घ्यावा लागणार होता; ज्यावर पूर्ण आयुष्याची वाटचाल अवलंबून असणार होती. तृप्ती च्या अशा दुर्धर आजारानंतर अनेकांनी मेजर नायर ह्यांना वेगळ्या पर्यायाचा विचार करण्यास सांगितलं. पण म्हणतात नं,

'साथ छोडने वालों को तो एक बहाना
चाहिए, वरना निभाने वाले तो,
मौत के दरवाजे तक साथ
नहीं छोडते!'

पहिल्या क्षणात आपली झालेल्या तृप्ती ला साथ द्यायचा निर्णय त्यांनी घेतला. एका सैनिकाचा तो शब्द होता. देशासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायला मागे पुढे न हटणाऱ्या मेजर शशिधरन नायर ह्यांनी आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या सगळ्या अडचणींना त्याच निर्धाराने तोंड देण्याचा निर्धार केला. २०१२ मध्ये मेजर शशीधरन नायर आणि तृप्ती विवाहबंधनात अडकले. पण नियती इकडे ही आडवी आली. लग्नानंतर काही दिवसात स्ट्रोक चा झटका आला. ज्यात तृप्ती ची कंबरेखालचं पूर्ण शरीर हे अधू झालं. नियतीने समोर आणलेल्या अशा अनेक आघातांचं दु:ख, शशी नायर ह्यांनी कधीच सगळ्यांसमोर आणि त्यांच्या प्रेमात आणलं नाही. आपल्या बायकोला कधी व्हील चेअर घेऊन तर कधी आपल्या हातात उचलून अनेक पार्टींना तसेच इतर अनेक कार्यक्रम, गेट टू गेदर सगळीकडे नेत असे. त्यांचं प्रेम हे त्या शरीरापलीकडे होतं, व्यावहारिक जगाच्या गणितापलीकडे होतं!! त्यांची छोटीसी लव्ह स्टोरी कुठेतरी सगळ्यांना पुन्हा एकदा खरं प्रेम दाखवून देत होती. (विनीत वर्तक ©)

नियतीला हे मान्य नव्हतं. मेजर शशिधरन ह्यांचं पहिलं प्रेम आपला देश होता. मातृभूमी च्या रक्षणासाठी आपला जीव देण्याची तयारी अगदी लहानपणापासून त्यांनी केली होती. कदाचित नियतीने त्यांची परीक्षा पाहिली. त्यांची पोस्टिंग काश्मीरच्या 'नौशेरा' सेक्टरमध्ये झाली. तृप्तीच्या मनात कुठेतरी शंकेने घर केलं. पण कर्तव्य पहिलं मानलेल्या सैनिकाला देश सगळ्यात जास्त प्रिय असतो. २ जानेवारी २०१९ ला मेजर शशीधरन नी तृप्तीला देशाची सेवा करायला जाताना बाय म्हंटलं ते शेवटचं नसू दे इतकीच प्रार्थना तृप्तीने केली. पण नियती इथेही आडवी आली. ११ जानेवारी २०१९ ला नौशेरा इकडे झालेल्या आय.ई.डी. च्या स्फोटात मेजर शशिधरन नायर ह्यांना वीरमरण आलं. नियतीने एका छोट्या लव्ह स्टोरीचा असा अचानक शेवट केला. पण नियती त्या दोघांचं प्रेम मात्र तोडू शकली का? नाही! त्यांचं प्रेम अमर झालं,त्या अमर जवान सैनिकांसारखंच. (विनीत वर्तक ©)

'मेजर शशिधरन नायर' आणि 'तृप्ती' ह्यांची एक छोटीसी लव्ह स्टोरी येणाऱ्या कित्येक पिढ्यांना खऱ्या प्रेमाची आठवण करून देत राहील ह्यात शंकाच नाही!

सूचना :- ही पोस्ट (विनीत वर्तक ©) कॉपीराईट असून नाव काढून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होईल ह्याची नोंद घ्यावी.

माहिती स्त्रोत :- गुगल

फोटो स्त्रोत :- गुगल

Tuesday 19 February 2019

बलात्कार झालेल्या स्त्रियांना जीवनदान देणारे 'डॉक्टर काँगो'... विनीत वर्तक ©



बलात्कार झालेल्या स्त्रियांना जीवनदान देणारे 'डॉक्टर काँगो'... विनीत वर्तक ©
जगाच्या इतिहासात सगळ्यात जास्त नरसंहार झालेल्या युद्धात 'काँगो' युद्धाचा समावेश होतो. जवळपास ५.४ मिलियन लोकांचा ह्यात जीव गेला आहे. ह्याला 'आफ्रिकेचं वर्ल्ड वॉर' असंही म्हंटलं जातं. ह्या युद्धात स्त्रीचा युद्धाचं शस्त्र म्हणून उपयोग केला गेला. इथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराचं स्वरूप इतकं मोठं होतं की 'युनायटेड नेशन' च्या काही अधिकाऱ्यांच्या मते काँगो हे जगात होणाऱ्या बलात्काराचं केंद्रबिंदू होतं. बलात्कार करताना पण त्यात आपण विचार करू शकत नाही इतकी कौर्याची सीमा गाठली जायची. झाडाला बांधून सगळ्यांनी एकदा, दोनदा नव्हे तर चार पाच दिवस केलेला बलात्कार असो वा स्त्रियांच्या जननेन्द्रियांना चटके देणं ते जाळणे असो वा बंदुकीच्या गोळ्यांनी जखमी करणं असो बलात्काराच्या घटनांमध्ये पुरुषाच्या अमानुषता गाठलेल्या कौर्याने पूर्ण जग हादरून गेलं होतं. (विनीत वर्तक ©)
ह्या सर्व घटना काँगो सारख्या देशात घडत असताना पूर्ण जग मूग गिळून गप्प होतं. लढाईत स्त्रीचा शस्त्र म्हणून केलेला वापर दिसत असतानासुद्धा जगाने डोळे मिटून घेतले होते. काँगो मधल्या क्रूरतेने माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टींनाही लाज वाटेल इतकी मजल गाठली होती. काँगो मधल्या स्त्रियांना कोणीच वाली नव्हता; पण त्यांच्या ह्या अमानुष अत्याचाराला वैद्यकीय मापदंडातून, माणुसकीच्या दृष्टीकोनातून ज्यांनी वाचवलं ते म्हणजेच ज्यांना डॉक्टर काँगो म्हणलं जातं ते, अर्थात डॉक्टर 'डेनिस मुकवेगे.'
डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी काँगो युद्धात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या ५०,००० हून अधिक स्त्रियांना नुसतं वाचवलं नाही, तर त्यांना एक आयुष्याची एक नवीन पहाट दाखवली. डॉक्टर मुकवेगे हे इथवर थांबले नाहीत तर स्त्रियांवर होणाऱ्या ह्या अमानुष अत्याचाराला त्यांनी जागतिक पटलावर वाचा फोडली. स्त्रियांचा युद्धात शस्त्र म्हणून होणारा वापर त्यांनी युनायटेड नेशन ते इतर मार्गाने जगापुढे मांडला. हा वापर रोखण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी जगापुढे जेव्हा आपले अनुभव सांगितले तेव्हा माणूस इतक्या नीच पातळीला जाऊ शकतो हे सिद्ध झालं. डॉक्टर मुकवेगे काँगो मधील स्त्रियांचा अत्याचार मांडताना म्हंटल होतं, (विनीत वर्तक ©)
“There used to be a lot of gorillas in there, but now they’ve been replaced by much more savage beasts.”
डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांचा जन्म १ मार्च १९५५ साली काँगो इथल्या 'बुकावू' इथे झाला. आपल्या नऊ भावंडाच्या मोठ्या कुटुंबात लहानपणीच 'डेनिस मुकवेगे' ह्यांनी आपल्या वडिलांकडून स्फूर्ती घेऊन डॉक्टर बनायचं ठरवलं होतं. आपल्या गावाच्या बाजूला असणाऱ्या 'बुरांडी' मधून त्यांनी मेडिसिन ची पदवी घेतली. पुढील पदवी त्यांनी फ्रान्स मधून गायनेकॉलॉजी मध्ये घेतली. १९९८ ला दुसरं काँगो युद्ध सुरु झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या देशाची वाट धरली. 'बुकावू' मध्ये परत आल्यावर स्त्रियांवर झालेले अत्याचार बघून त्यांनी तिकडे 'पांझी हॉस्पिटल' ची स्थापना १९९९ साली केली. दिवसाला १७ तास काम करून ते दिवसाला १० पेक्षा जास्ती शस्त्रक्रिया अशा स्त्रियांवर करत होते ,ज्या तिथल्या पुरुषांच्या क्रूरतेच्या अत्याचाराला पाशवी लैंगिक अत्याचाराला बळी पडत होत्या. ह्या अमानुष अत्याचाराची पातळी इतकी खालची होती की ह्या स्त्रिया हॉस्पिटलमध्ये येताना विवस्त्र येत असतं तर कधी कधी अक्षरशः त्यांच्या जननेन्द्रियांतून रक्ताची धार वहात असे. डॉक्टर डेनिस मुकवेगे सांगतात की एकदा तर एका ३ वर्षाच्या मुलीवर केलेले अत्याचार बघून त्याचं मन विषण्ण झालं!
पांझी हॉस्पिटल हे नावाला हॉस्पिटल होतं. खाट, जमीन, व्हरांडा जिकडे मिळेल तशी जागा पकडून शस्त्रक्रिया होत होत्या. रक्त, लघवी, पसरलेली असताना त्या अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांचा आक्रोश!! ह्या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी आपलं माणुसकीचं काम सुरु ठेवलं. ज्या ठिकाणचं वर्णन वाचून आपल्याला शब्द नकोसे वाटतील, भावना गोठ्तील त्या परिस्थितीत डॉक्टर डेनिस मुकवेगे दिवसाला १० पेक्षा जास्त अशा अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांवर शस्त्रक्रिया करत होते. समोरचं मन विषण्ण करणारं दृश्य बघून कोणता डॉक्टर शांत डोक्याने आपल्याला उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये शस्त्रक्रिया करू शकेल ह्याचा विचार करताना मी निशब्द झालो. (विनीत वर्तक ©)
डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर,
“When the victims come, you can tell by the wounds where it happened, In Bunyakiri, they burn the women’s bottoms. In Fizi-Baraka, they are shot in the genitals. In Shabunda, it’s bayonets.”
“Some of these girls whose insides have been destroyed are so young that they don’t understand what happened to them,” “Why would you ever rape a 3-year-old?”
डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांच्या कामाची व्याप्ती वाढत जात होती. आजूबाजूच्या शहरातून ही ह्या अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रिया आता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये यायला लागल्या. अत्याचार करणाऱ्या लोकांना हे सहन झालं नाही. त्यांनी डॉक्टर मुकवेगे ह्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या मुलीला बंधक बनवून त्यांनी डॉक्टर मुकवेगे ह्यांच्यावर गोळी झाडली. जमिनीवर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यानंतर त्यांनी काही काळासाठी युरोप मध्ये आश्रय घेतला. पण ह्या सगळ्याचा परिणाम पांझी इथल्या हॉस्पिटल वर झाला. तिथल्या स्त्रियांना कोणी वाली उरला नाही. पण बुकावू इथल्या स्त्रियांनी एकत्र येऊन त्यांना परत येण्यासाठी साद घातली. सगळ्या स्त्रियांनी अननस आणि कांदा विकून त्या पैशातून त्यांच्या तिकिटाचा खर्च उचलला.


डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरवात केली. आता फक्त उपचारांवर न थांबता त्यांनी ह्या अन्यायाला आंतरराष्ट्रीय मंचावर वाचा फोडली. त्यांच्या ह्या माणुसकीच्या कार्याची दखल आंतराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. २००८ ला त्यांना 'यु.एन. ह्युमन राईट्स' तर २००९ मध्ये आफ्रिकन ऑफ दी इअर ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. २०१६ ला 'टाईम' अंकाने जगातील सगळ्यात प्रभावशाली पहिल्या १०० व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला. तर २०१८ साली त्यांना सर्वोच्च मानाच्या नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आलं. २०१८ ला नोबेल शांती पुरस्काराची घोषणा झाली तेव्हा पण ते एका शस्त्रक्रियेत व्यस्त होते. त्यांच्या पांझी हॉस्पिटल मधून आजवर ८२,००० पेक्षा जास्त स्त्रियांवर उपचार केले गेले आहेत. (विनीत वर्तक ©)
डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी ज्या परिस्थितीत स्त्रियांवर उपचार केले आहेत त्याचा विचारदेखील आपण करू शकत नाही. उपचार करणं इतकं भयावह असेल तर त्या स्त्रियांना च्या अमानुषतेला बळी पडावं लागलं असेल ते शब्दांपलीकडचं आहे. त्याचं कार्य वाचताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी अशी अवस्था होते; तर ज्यांनी ते भोगलं असेल त्या स्त्रियांच्या त्रासाची कल्पनाही करवत नाही. युद्धात बंदुकीतल्या गोळ्यांना पण पैसे लागतात, पण स्त्री ही फुकट असते ह्या पद्धतीने काँगोच्या युद्धात स्त्री चा वापर केला गेला. आज डॉक्टर मुकवेगे सारखे लोकं तिकडे नसते तर ह्यात मृत्युमुखी पडलेल्या स्त्रियांची संख्या कैक पटीने वाढली तर असतीच पण हा अमानुष अत्याचार त्या देशात लपून राहिला असता. कोणतीही अपेक्षा न करता लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांना माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत करून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या 'डॉक्टर काँगो' अर्थात डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांना माझा साष्टांग नमस्कार!!!

सूचना :- ही पोस्ट (विनीत वर्तक ©) कॉपीराईट असून नाव काढून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होईल ह्याची नोंद घ्यावी.

माहिती स्त्रोत :- गुगल, न्यूयॉर्क टाईम्स

फोटो स्त्रोत :- गुगल



Monday 11 February 2019

अंधारातला बाण डार्ट... विनीत वर्तक ©

अंधारातला बाण डार्ट... विनीत वर्तक ©

सूचना :- ही पोस्ट (विनीत वर्तक ©) कॉपीराईट असून नाव काढून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होईल ह्याची नोंद घ्यावी.

अनेक अब्ज वर्ष आपली वसुंधरा म्हणजेच पृथ्वी आकाशातून होणाऱ्या अशनींच्या अपघाताला मूकपणे सहन करत आली आहे. ह्या अब्ज वर्षांच्या कालावधीत पूर्ण पृथ्वीचा चेहरामोहरा ह्या अशनींच्या आघाताने बदलेला आहे. डायनासोरसारखे अजस्त्र प्राणी पृथ्वीच्या पटलावरून नष्ट होण्यामागे हेच कारण आहे तर लोणारसारखं बेसाल्ट दगडातील विवर तयार होण्यामागेही ह्या अवकाशातून होणाऱ्या अशनींचाच हात आहे. आजच्या दिवशी प्रत्येक क्षणाला हा धोका पृथ्वीला आहे. माणूस ज्याचं अस्तित्व पूर्ण पृथ्वीवर पसरलेलं आहे; त्याला एका क्षणात होत्याचं नव्हतं करण्याची ताकद एका अशनीच्या धडकेमध्ये आहे. आजवर ह्या अशा धडकेची कुणकुण कोणाला कधी लागत नव्हती. (विनीत वर्तक ©) काही कळेपर्यंत होत्याच नव्हतं झालेलं असायचं. पण आता माणसाने तंत्रज्ञानात इतकी प्रगती केली आहे की आज आपण आकाशातील अशा धोकादायक लघुग्रहांचा शोध सुरु केला आहे. ( पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणाऱ्या दगडांना उल्का असं म्हणतात. ज्या अनेकवेळा वातावरणात जळून नष्ट होतात. जमिनीवर जेव्हा त्यांचा आघात होतो तेव्हा त्यांना अशनी असं म्हणतात. )

आज माणसाने आपलं तंत्रज्ञान पुढे नेऊन त्यांचा शोध घेण्यास सुरवात तर केली आहे. पण समजा असा एखादा अवकाशातील धोकादायक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने प्रवास करत असेल तर पुढे काय? आपण पृथ्वी आणि त्या लघुग्रहाची टक्कर टाळू शकतो का? टाळू शकतो तर कशी? ह्यावर अनेक वर्ष वैज्ञानिक आणि संशोधक ह्यांचं संशोधन सुरु होतं. अशा एखाद्या टकरीपासून बचावाचे अनेक मार्ग समोर असले तरी जे सध्याच्या तंत्रज्ञानाने प्रत्यक्षात उतरवू शकतो असे खूप कमी आहेत. (विनीत वर्तक ©) ह्यातला एक मार्ग आहे तो म्हणजे अशा एखाद्या लघुग्रहावर आण्विक बॉम्बस्फोट करून त्याचा मार्ग बदलवणे अथवा त्याला नष्ट करणं,जो सध्यातरी दृष्टीक्षेपात नाही. (आर्मागेडन चित्रपटात ह्याच मार्गाचा अवलंब करून पृथ्वीला वाचवण्यात येते असं दाखवलं गेलं होतं.) अवकाशात सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे फिरणारे हे लघुग्रह प्रचंड वेगात जात असतात. साधारण ३० किलोमीटर / सेकंद इतक्या प्रचंड वेगात पृथ्वीवरून एखादं आण्विक क्षेपणास्त्र सोडून त्याला बरोबर नष्ट करणं तितकंच कठीण आहे;पण अशक्य नक्कीच नाही!

ह्याबरोबरच अजून एक मार्ग जो शक्य आहे तो म्हणजे पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या अशा लघुग्रहांवर जर एखादं यान प्रचंड वेगात आदळलं तर ह्या टक्करीमुळे त्याच्या कक्षेत होणारा बदल पृथ्वीसोबत होणारी टक्कर टाळू शकेल. (विनीत वर्तक ©) अवकाशात वेगामुळे मिळणाऱ्या कायनेटिक बलाचा वापर करून अशी टक्कर अवकाशात घडवून आणली जाऊ शकते.परंतु ह्यात ही एक मेख आहे ती म्हणजे ही टक्कर इतकी ही जोरात नको की त्या लघुग्रहाचे अनेक बारीक तुकडे होतील आणि ते तुकडे मग सांभाळणं आपल्याला कठीण जाईल. येणाऱ्या लघुग्रहाचं आकारमान, त्याचा वेग ह्याचा अंदाज घेऊनच ह्या यानाच्या टक्करीचं गणित जुळवून आणावं लागेल. पृथ्वीवर हे सगळं जुळवलं तरी प्रत्यक्षात अवकाशात हे जुळवून आणणं शक्य होईल का? हे तपासण्यासाठी नासा आणि अप्लाईड फिजिक्स लॅबोरेटरी ह्यांनी मिळून एक मिशन हाती घेतलं आहे. त्याच नावं आहे डार्ट (Double Asteroid Redirection Test).

डार्ट (Double Asteroid Redirection Test) ह्या मिशनमध्ये नासा एक यान बायनरी ( बायनरी म्हणजे एका लघुग्रहाभोवती दुसरा लघुग्रह फिरत आहे. ) लघुग्रहांवर पाठवत आहे. ह्यातला मोठा लघुग्रहाचं नाव आहे 'डीडेमॉस ए'. हा ७५० मीटर व्यासाचा असून ह्याच्या भोवती एक छोटा लघुग्रह ज्याला 'डीडेमॉस बी' किंवा 'डीडेमून' असं म्हंटल जातं तो परिक्रमा करत असून त्याचा व्यास १६० मीटरचा आहे. हे लघुग्रह निवडण्यामागे काही कारणं आहेत. (विनीत वर्तक ©) लहान असलेला डीडेमून ११.९ तासात आपल्या मोठ्या भावाभोवती प्रदक्षिणा घालतो. नासाचं यान ५०० किलोग्रॅम वजनाचं ६ किलोमीटर / सेकंद ह्या वेगाने डीडेमून वर टक्कर मारेल. ह्या टक्करीमुळे डीडेमून च्या कक्षेत अर्ध्या मिलीमीटर / सेकंदाचा फरक पडेल. ह्यामुळे त्याच्या डीडेमॉसभोवती परिक्रमेचा वेग १० मिनिटांनी कमी होईल. अर्थात हा फरक खूप कमी वाटत असला तरी असा फरक मिलियन किलोमीटर च्या अंतरात पृथ्वीशी टक्कर ते पृथ्वी ला कोणताही धोका नाही इतका फरक ही टक्कर करू शकते. हे दोन्ही लघुग्रह पृथ्वीच्या रस्त्यात येतं नाही किंवा यायची शक्यता नाही. त्यामुळे समजा हे मिशन विफल झालं तरी पृथ्वीला त्याचा कोणताही धोका उद्भवणार नाही.

डार्ट, डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ पर्यंत पृथ्वीवरून उड्डाण भरेल. अवकाशातील आपला प्रवास पूर्ण करत डार्ट डीडेमून ला ७ ऑक्टोबर २०२२ रोजी टक्कर देईल. (विनीत वर्तक ©) डार्ट सोबत पिगी बॅग म्हणून इटालियन स्पेस एजन्सी आपले दोन क्यूब सॅट पाठवत आहे. टक्कर मारण्याच्या थोड्याआधी हे डार्ट पासून विलग होतील.डार्टची डीडेमूनशी होणारी टक्कर बंदिस्त करून ती पृथ्वीकडे परत पाठवतील. ह्या नंतर युरोपियन स्पेस एजन्सी “हिरा” नावाचं एक यान डीडेमून कडे पाठवत आहे. हे यान ह्या टक्करीनंतर डीडेमून च्या कक्षेत झालेल्या बदलांचा अभ्यास करेल.

डार्ट मोहिमेचा मुख्य उद्देश आपण एखाद्या लघुग्रहाची कक्षा बदलवू शकतो का? ह्या प्रश्नाच उत्तर शोधणं आहे. पृथ्वीवर पुढे जर एखादा लघुग्रह रस्त्यात येत असेल तर आपल्याकडे उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान आणि गणित ह्याचा वापर करून आपण त्याचा रस्ता बदलवून पृथ्वीवर असलेल्या मानवजातीचं संरक्षण करू शकतो का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या मोहिमेने मिळणार आहे.'डार्ट' अंधारात सोडलेला एक बाण जरी असला तरी त्याने विज्ञानाच्या अनेक प्रश्नांचा वेध घेतला जाणार आहे;ज्यात आपल्या पुढच्या अस्तित्वाचा प्रश्न ही समाविष्ट आहे!

सूचना :- ही पोस्ट (विनीत वर्तक ©) कॉपीराईट असून नाव काढून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होईल ह्याची नोंद घ्यावी.

माहिती स्त्रोत :- नासा

फोटो स्त्रोत :- नासा


Sunday 10 February 2019

चिनुक सी एच ४७ आकाशातला उजवा हात... विनीत वर्तक ©


चिनुक सी एच ४७ आकाशातला उजवा हात... विनीत वर्तक ©


हॉलीवूड मधल्या युद्धावर आधारित चित्रपट बघताना त्यात दिसणार दोन टोकावर चक्राकार फिरणारी पाती  असणारं हेलिकॉप्टर नेहमीच माझं लक्ष वेधून घ्यायचं. आजवर हेलिकॉप्टर वर मध्यभागी अशी पाती प्रत्यक्षात फिरताना बघितली होती. (पुढे कामाच्या निमित्ताने जवळपास १०० पेक्षा जास्त वेळा हेलिकॉप्टर मध्ये बसण्याचा अनुभव आला तो भाग वेगळा.) पण असं दोन टोकावर पाती असणारं हेलिकॉप्टर मला आजही तितकंच आकर्षित करत होतं. पुढे ह्या बद्दल वाचल्यावर ह्या हेलिकॉप्टर ची माहिती मिळाली आणि अवाक झालो. ह्या वेगळ्या हेलिकॉप्टर चं नावं होतं बोईंग चिनुक सी एच ४७. (विनीत वर्तक ©)


१९६० सालापासून अमेरिकी सैन्याचा भाग असलेलं आणि आजवर अनेक युद्धात ज्यात व्हिएतनाम, अफगाणीस्तान, लिबिया ही अमेरिकेने लढलेली युद्ध समाविष्ट आहेत. चिनुक ने आपलं महत्व सिद्ध केलेलं आहे. त्याशिवाय अनेक नैसर्गिक दुर्घटनांच्या वेळी लोकांना वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावलेलं चिनुक हेलिकॉप्टर हे जगातील एक नावाजलेलं हेलिकॉप्टर आहे. आता हे हेलिकॉप्टर भारतीय सैन्याचा भाग बनत आहे. भारताने अश्या १५ हेलिकॉप्टर ची ऑर्डर २०१५ साली बोईंग ला दिली होती. गेल्या आठवड्यात ह्यातली पहिली खेप ४ हेलिकॉप्टरांची गुजरात च्या मुंद्रा बंदरात आली आहे. भारतीय हवाई दलाला अश्या दमदार हेलिकॉप्टर ची प्रचंड गरज जाणवत होती. त्याला कारण म्हणजे भारतीय हवाई दलाकडे अजस्त्र किंवा मोठे हेलिकॉप्टर ची कमतरता होती जे की सामानाची ने आण, युद्धाच्या वेळी अवघड ठिकाणी सैन्याची कुमक, दारुगोळा किंवा तोफा तसेच नैसर्गिक आणिबाणीच्या वेळी जास्त लोकांना एअर लिफ्ट करू शकते. भारताकडे रशियन बनावटीची ४ मिग २६ हेलिकॉप्टर होती पण त्यातलं सध्या एकच सर्विस मध्ये आहे. ही कमतरता भरून काढण्याची क्षमता चिनुक सी एच ४७ ची आहे. (विनीत वर्तक ©)

चिनुक सी एच ४७ हे हेलिकॉप्टर चं नाव हे अमेरिकेतल्या वॉशिंग्टन इथे आधी राहणाऱ्या चिनुक लोकांच्या जमातीवरून दिलं गेलं आहे. ह्याची निर्मिती बोईंग कंपनी ने केली आहे. आजवर १२०० पेक्षा जास्त चिनुक ची निर्मिती झालेली आहे. चिनुक हे वेगवेगळी पाती आणि रोटर असणारं हेलिकॉप्टर असून दोन्ही पाती शक्तिशाली अश्या टी ५५ – जीए- ७१४ए इंजिनांनी फिरवली जातात. दोन्ही इंजिन मिळून चिनुक तब्बल ९.६ टन (९६०० किलोग्राम ) वजन उचलू शकते. ज्यात माणसं, दारुगोळा, तोफा, इंधन, पाणी, इतर सर्व रसद असणाऱ्या गोष्टी समाविष्ट आहेत. इतकं वजन उचलून ३०० किमी./ तास ह्या वेगाने हवेतून मार्गक्रमण करून एकाच उड्डाणात ६५० किलोमीटर च अंतर कापण्यात सक्षम आहे. ह्यावर एम २४० मशीनगन असून शत्रूचा वेध घेण्यात अचूक मानली जाते. ह्यावर च्याफ बसवलेले असून ह्याचा उपयोग रडार पासून लपून राहण्यासाठी केला जातो तसेच ह्यात फ्लेअर्स बसवलेले असून क्षेपणास्त्रांना चुकवण्यात ह्यांचा उपयोग केला जातो.

चिनुक हेलिकॉप्टर ला अधिक वेगळं बनवतात ते त्याची दोन इंजिन आणि दोन वेगळे रोटर,पाती. चिनुक ची हीच खासियत त्याला इतकं प्रचंड वजन वाहून नेण्यात सक्षम बनवते. कोणत्याही हेलिकॉप्टर ला हवेत उभं करण हे सगळ्यात कठीण मानलं जाते. कारण हवेत शांत स्थितीत सेंटर ऑफ ग्राव्हीटी संभाळण हे सगळ्यात कठीण असते. हवेतील हालचालीमुळे हेलिकॉप्टर ची सेंटर ऑफ ग्राव्हीटी बदलत असते. जितकं वजन जास्ती तितकचं त्याला हवेत स्थिर करण कठीण असते. ज्यावेळी हेलिकॉप्टर च वापर हा समान, लोक नेण्यासाठी युद्धात केला जातो. तेव्हा सामानाची चढ उतार हवेतल्या हवेत करताना हेलिकॉप्टर च्या वजनात आणि त्याजोगे सेंटर ऑफ ग्राव्हीटी मध्ये कमालीचा फरक पडत असतो. अश्या वेळेस त्याला स्थिर ठेवताना पायलट आणि इंजिन ह्याच्या वर कमालीचा दबाव असतो. चिनुक चे दोन वेगळे रोटर आणि इंजिन अश्या महत्वाच्या वेळी चिनुक ला एक कमालीची स्थिरता देतात. हे दोन्ही इंजिन वेगवेगळ्या वेगात पाती फिरवून सेंटर ऑफ ग्राव्हीटी होणारा फरक जाणवू देत नाहीत. तसेच एखादं इंजिन निकामी झाल्यास एका इंजिन वरून पण दोन्ही रोटर फिरवण्याची क्षमता चिनुक ला एक वेगळीच क्षमता देते जी जगातल्या इतर हेलिकॉप्टर मध्ये नाही. (विनीत वर्तक ©)


चिनुक सी एच ४७ हेलिकॉप्टर भारतात येण्याने भारतीय हवाई दलाच्या क्षमतेत कमालीची वाढ झाली आहे. चिनुक हिमालय तसेच अतिपूर्वेकडील खडतर सिमावर्ती क्षेत्रात सैनिक, दारुगोळा, इंधन, इतर रसद ह्याची ने आण करण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. ह्या मध्ये ३३ सैनिक एका वेळेस एअर लिफ्ट होऊ शकतात. तर सैनिकी जिप, १०५ मिमी. हॉवीत्झर तोफ त्याच्या सगळ्या टीम सह उचलून नेण्याची ह्या हेलिकॉप्टर ची क्षमता आहे. भारताचा हिमालयीन भाग हा हेलिकॉप्टर चालवण्याच्या दृष्ट्रीने खूप खडतर मानला जातो. अश्या भागात दोन वेगवेगळे रोटर असलेलं चिनुक भारताच्या रसद पुरवठ्यामध्ये खूप सहजता आणणार आहे. चिनुक सी एच ४७ हेलिकॉप्टर त्याच्या कामगिरीमुळे भारतीय सैन्याचा आकाशातला उजवा हात बनल्यास आश्चर्य वाटायला नको. (विनीत वर्तक ©)        


सूचना :- ही पोस्ट (विनीत वर्तक ©) कॉपीराईट असून नाव काढून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होईल ह्याची नोंद घ्यावी.


माहिती स्त्रोत :- गुगल, विकिपीडिया, बिझनेस इनसायडर

फोटो स्त्रोत :- गुगल, इकोनॉमिक टाईम्स