अंधारातला बाण डार्ट... विनीत वर्तक ©
सूचना :- ही पोस्ट (विनीत वर्तक ©) कॉपीराईट असून नाव काढून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होईल ह्याची नोंद घ्यावी.
अनेक अब्ज वर्ष आपली वसुंधरा म्हणजेच पृथ्वी आकाशातून होणाऱ्या अशनींच्या अपघाताला मूकपणे सहन करत आली आहे. ह्या अब्ज वर्षांच्या कालावधीत पूर्ण पृथ्वीचा चेहरामोहरा ह्या अशनींच्या आघाताने बदलेला आहे. डायनासोरसारखे अजस्त्र प्राणी पृथ्वीच्या पटलावरून नष्ट होण्यामागे हेच कारण आहे तर लोणारसारखं बेसाल्ट दगडातील विवर तयार होण्यामागेही ह्या अवकाशातून होणाऱ्या अशनींचाच हात आहे. आजच्या दिवशी प्रत्येक क्षणाला हा धोका पृथ्वीला आहे. माणूस ज्याचं अस्तित्व पूर्ण पृथ्वीवर पसरलेलं आहे; त्याला एका क्षणात होत्याचं नव्हतं करण्याची ताकद एका अशनीच्या धडकेमध्ये आहे. आजवर ह्या अशा धडकेची कुणकुण कोणाला कधी लागत नव्हती. (विनीत वर्तक ©) काही कळेपर्यंत होत्याच नव्हतं झालेलं असायचं. पण आता माणसाने तंत्रज्ञानात इतकी प्रगती केली आहे की आज आपण आकाशातील अशा धोकादायक लघुग्रहांचा शोध सुरु केला आहे. ( पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणाऱ्या दगडांना उल्का असं म्हणतात. ज्या अनेकवेळा वातावरणात जळून नष्ट होतात. जमिनीवर जेव्हा त्यांचा आघात होतो तेव्हा त्यांना अशनी असं म्हणतात. )
आज माणसाने आपलं तंत्रज्ञान पुढे नेऊन त्यांचा शोध घेण्यास सुरवात तर केली आहे. पण समजा असा एखादा अवकाशातील धोकादायक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने प्रवास करत असेल तर पुढे काय? आपण पृथ्वी आणि त्या लघुग्रहाची टक्कर टाळू शकतो का? टाळू शकतो तर कशी? ह्यावर अनेक वर्ष वैज्ञानिक आणि संशोधक ह्यांचं संशोधन सुरु होतं. अशा एखाद्या टकरीपासून बचावाचे अनेक मार्ग समोर असले तरी जे सध्याच्या तंत्रज्ञानाने प्रत्यक्षात उतरवू शकतो असे खूप कमी आहेत. (विनीत वर्तक ©) ह्यातला एक मार्ग आहे तो म्हणजे अशा एखाद्या लघुग्रहावर आण्विक बॉम्बस्फोट करून त्याचा मार्ग बदलवणे अथवा त्याला नष्ट करणं,जो सध्यातरी दृष्टीक्षेपात नाही. (आर्मागेडन चित्रपटात ह्याच मार्गाचा अवलंब करून पृथ्वीला वाचवण्यात येते असं दाखवलं गेलं होतं.) अवकाशात सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे फिरणारे हे लघुग्रह प्रचंड वेगात जात असतात. साधारण ३० किलोमीटर / सेकंद इतक्या प्रचंड वेगात पृथ्वीवरून एखादं आण्विक क्षेपणास्त्र सोडून त्याला बरोबर नष्ट करणं तितकंच कठीण आहे;पण अशक्य नक्कीच नाही!
ह्याबरोबरच अजून एक मार्ग जो शक्य आहे तो म्हणजे पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या अशा लघुग्रहांवर जर एखादं यान प्रचंड वेगात आदळलं तर ह्या टक्करीमुळे त्याच्या कक्षेत होणारा बदल पृथ्वीसोबत होणारी टक्कर टाळू शकेल. (विनीत वर्तक ©) अवकाशात वेगामुळे मिळणाऱ्या कायनेटिक बलाचा वापर करून अशी टक्कर अवकाशात घडवून आणली जाऊ शकते.परंतु ह्यात ही एक मेख आहे ती म्हणजे ही टक्कर इतकी ही जोरात नको की त्या लघुग्रहाचे अनेक बारीक तुकडे होतील आणि ते तुकडे मग सांभाळणं आपल्याला कठीण जाईल. येणाऱ्या लघुग्रहाचं आकारमान, त्याचा वेग ह्याचा अंदाज घेऊनच ह्या यानाच्या टक्करीचं गणित जुळवून आणावं लागेल. पृथ्वीवर हे सगळं जुळवलं तरी प्रत्यक्षात अवकाशात हे जुळवून आणणं शक्य होईल का? हे तपासण्यासाठी नासा आणि अप्लाईड फिजिक्स लॅबोरेटरी ह्यांनी मिळून एक मिशन हाती घेतलं आहे. त्याच नावं आहे डार्ट (Double Asteroid Redirection Test).
डार्ट (Double Asteroid Redirection Test) ह्या मिशनमध्ये नासा एक यान बायनरी ( बायनरी म्हणजे एका लघुग्रहाभोवती दुसरा लघुग्रह फिरत आहे. ) लघुग्रहांवर पाठवत आहे. ह्यातला मोठा लघुग्रहाचं नाव आहे 'डीडेमॉस ए'. हा ७५० मीटर व्यासाचा असून ह्याच्या भोवती एक छोटा लघुग्रह ज्याला 'डीडेमॉस बी' किंवा 'डीडेमून' असं म्हंटल जातं तो परिक्रमा करत असून त्याचा व्यास १६० मीटरचा आहे. हे लघुग्रह निवडण्यामागे काही कारणं आहेत. (विनीत वर्तक ©) लहान असलेला डीडेमून ११.९ तासात आपल्या मोठ्या भावाभोवती प्रदक्षिणा घालतो. नासाचं यान ५०० किलोग्रॅम वजनाचं ६ किलोमीटर / सेकंद ह्या वेगाने डीडेमून वर टक्कर मारेल. ह्या टक्करीमुळे डीडेमून च्या कक्षेत अर्ध्या मिलीमीटर / सेकंदाचा फरक पडेल. ह्यामुळे त्याच्या डीडेमॉसभोवती परिक्रमेचा वेग १० मिनिटांनी कमी होईल. अर्थात हा फरक खूप कमी वाटत असला तरी असा फरक मिलियन किलोमीटर च्या अंतरात पृथ्वीशी टक्कर ते पृथ्वी ला कोणताही धोका नाही इतका फरक ही टक्कर करू शकते. हे दोन्ही लघुग्रह पृथ्वीच्या रस्त्यात येतं नाही किंवा यायची शक्यता नाही. त्यामुळे समजा हे मिशन विफल झालं तरी पृथ्वीला त्याचा कोणताही धोका उद्भवणार नाही.
डार्ट, डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ पर्यंत पृथ्वीवरून उड्डाण भरेल. अवकाशातील आपला प्रवास पूर्ण करत डार्ट डीडेमून ला ७ ऑक्टोबर २०२२ रोजी टक्कर देईल. (विनीत वर्तक ©) डार्ट सोबत पिगी बॅग म्हणून इटालियन स्पेस एजन्सी आपले दोन क्यूब सॅट पाठवत आहे. टक्कर मारण्याच्या थोड्याआधी हे डार्ट पासून विलग होतील.डार्टची डीडेमूनशी होणारी टक्कर बंदिस्त करून ती पृथ्वीकडे परत पाठवतील. ह्या नंतर युरोपियन स्पेस एजन्सी “हिरा” नावाचं एक यान डीडेमून कडे पाठवत आहे. हे यान ह्या टक्करीनंतर डीडेमून च्या कक्षेत झालेल्या बदलांचा अभ्यास करेल.
डार्ट मोहिमेचा मुख्य उद्देश आपण एखाद्या लघुग्रहाची कक्षा बदलवू शकतो का? ह्या प्रश्नाच उत्तर शोधणं आहे. पृथ्वीवर पुढे जर एखादा लघुग्रह रस्त्यात येत असेल तर आपल्याकडे उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान आणि गणित ह्याचा वापर करून आपण त्याचा रस्ता बदलवून पृथ्वीवर असलेल्या मानवजातीचं संरक्षण करू शकतो का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या मोहिमेने मिळणार आहे.'डार्ट' अंधारात सोडलेला एक बाण जरी असला तरी त्याने विज्ञानाच्या अनेक प्रश्नांचा वेध घेतला जाणार आहे;ज्यात आपल्या पुढच्या अस्तित्वाचा प्रश्न ही समाविष्ट आहे!
सूचना :- ही पोस्ट (विनीत वर्तक ©) कॉपीराईट असून नाव काढून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होईल ह्याची नोंद घ्यावी.
माहिती स्त्रोत :- नासा
No comments:
Post a Comment