Saturday 31 August 2019

शेवटच्या टप्प्यात... विनीत वर्तक ©

शेवटच्या टप्प्यात... विनीत वर्तक ©

३० ऑगस्ट २०१९ ला चंद्रयान २ ने चंद्राच्या भोवती फिरत असताना आपली कक्षा पुन्हा एकदा कमी करत चंद्रावर उतरणाच्या दृष्टीने शेवटच्या प्रवासाला सुरवात केली आहे. ११५५ सेकंद आपलं इंजिन चालू केल्यावर त्याने चंद्रयानाची कक्षा कमी करत त्याला १६४ किमी एपोजी ( चंद्रापासून सगळ्यात जास्ती अंतर ) गुणिले १२४ किलोमीटर पेरोजी ( चंद्रापासून सगळ्यात कमी अंतर) अश्या कक्षेत स्थापन केलं आहे. आता शेवटचा कक्षा बदल १ सप्टेंबर ला केल्यावर चंद्रयान २ ची कक्षा अजून कमी करून चंद्रावर उतरणाच्या घडामोडीनां सुरवात होईल. चंद्रयान २ हे १२१ किमी गुणिले १२५ किमी च्या कक्षेत आल्यावर इसरो महत्वाच्या अश्या शेवटच्या टप्प्याला सुरवात करेल.

शेवटच्या कक्षेत आल्यावर विक्रम रोव्हर आपल्या आत असलेल्या प्रग्यान रोव्हर सह चंद्रयान २ च्या ऑर्बिटर पासुन विलग होईल. एकदा विलग झाल्यावर विक्रम ल्यांडर चंद्रावर उतरण्यासाठी मार्गक्रमण करेल तर ऑर्बिटर (१०० किमी गुणिले १०० किमी ) त्या कक्षेत पुढील वर्षभर फिरत राहून चंद्राचा अभ्यास करत राहील. ऑर्बिटर पासुन रोव्हर विलग होण्याची प्रक्रिया सुरु होण्यासाठी इसरो च्या कमांड सेंटर मधुन निर्देश दिले जातील. अवघ्या काही मिलिसेकंदात कमांड मिळाल्याबरोबर रोव्हर ऑर्बिटर पासुन विलग होऊन चंद्राच्या भोवती फिरत राहील. ३ सप्टेंबर ला इसरो रोव्हर च्या सगळ्या सिस्टीम तपासुन त्याची कक्षा अजून कमी करण्याचे निर्देश देईल. त्या सोबत रोव्हर ची कक्षा कमी होतं रोव्हर चंद्रावर उतरण्यासाठी मार्गस्थ होईल.

विक्रम रोव्हर उतरणाच्या दोन जागा इसरो ने निश्चित केल्या आहेत. पहिली जी जागा आहे तिला पी.एल.एस.( प्रायमरी ल्यांडींग साईट) ५४ असं नाव असून ही जागा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या ऐटकेन बसीन पासून साधारण ३५० किलोमीटर लांब उत्तरेकडे आहे. ही जागा चंद्रावरील दोन विवरे मांझीनस सी आणि सिमपेलियस एन ह्यांच्या मधोमध आहे. ही जागा इसरो ने निवडण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत. पहिलं प्रमुख कारण म्हणजे ही जागा साऊथ पोलार रिजन मध्ये आहे. ह्याचा अर्थ चंद्राच्या ध्रुवीय भागात ह्या जागेचा समावेश होतो. ह्याच भागात बर्फाच्या स्वरूपात पाणी असल्याचं संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. दुसरं कारण म्हणजे ही जागा पृथ्वीच्या दिशेने असुन ह्या जागेचा चढ - उतार १५ डिग्री पेक्षा कमी आहे. ( चंद्रयान २ ला सरळ उतरण्यासाठी १२ डिग्री पेक्षा कमी चढ- उताराच्या जमिनीची गरज आहे. )  तिसरं कारण म्हणजे ह्या जागेत असलेले खडक हे ५० से.मी. पेक्षा कमी जाडीचे आहेत. त्यामुळे इथला बराचसा भाग समतल आहे. अजुन एक कारण म्हणजे इकडे असणारा सूर्यप्रकाश. इकडे सूर्याच्या किरणांना अडवेल अशी रचना कमी आहे त्यामुळे चंद्रयान २ ला ब्याटरी चार्ज होण्यासाठी १४ दिवस (पृथ्वीवरील ) सौर ऊर्जा मिळत राहणार आहे. चंद्रावर उतरण्याची दुसरी जागा आहे ए.एस.एल. ०१ ( एल्टरनेटिव्ह ल्यांडींग साईट) ह्या दोन्ही जागा चंद्राच्या एल.क्यू ३० चा भाग आहे. (चंद्राच्या भागाचं ३० भागात विभाजन केलं आहे. ह्या दोन्ही जागा चंद्राच्या ३० व्या भागाचा भाग आहेत. )

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेलं ऐटकेन बसीन हे आपल्या सौर मालेमधील अशनी च्या धडकेने झालेलं सगळ्यात मोठं विवर आहे. ह्याचा विस्तार सुमारे २५०० किलोमीटर इतका प्रचंड असून ह्याची खोली सुमारे १३ किलोमीटर इतकी प्रचंड आहे. हे विवर सगळ्यात मोठं, सगळ्यात जुनं, सगळ्यात खोल असलेलं विवर मानवाला ज्ञात आहे. ह्याच्या आकारामुळे इथे झालेला एखाद्या अशनी चा प्रहार किती प्रचंड असेल ह्याचा विचार आपण करू शकत नाही. तसेच इतक्या प्रचंड धडकेने चंद्राच्या आतील भूभागाच्या रचनेचा भाग असणाऱ्या अनेक गोष्टी इकडे ह्याच्या पृष्ठभागावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा भाग आजवर संशोधनाच्या दृष्टीने अजुन अलिप्त राहिलेला आहे.

भारताचं चंद्रयान २ ह्याच भागात उतरणार असल्याने पूर्ण जगाचं लक्ष त्या कडे लागलेलं आहे. नुकतंच नासा चा अंतराळवीर डोनाल्ड थॉमस हा भारताच्या दौऱ्यावर असताना त्याने केलेलं विधान हे खुप सूचक आहे. डोनाल्ड म्हणतो,

"The learning from the mission is of great interest to NASA because it is where NASA plans to land astronauts five years down the lane. They would be interested in knowing what the surface of the moon would be like, presence of minerals and chemicals and availability of of ice. Not just NASA, but the whole world would be interested in knowing about moon and the universe by following Chandrayaan -2"

आता भारताच्या चंद्रयान २ मोहिमेचा शेवटचा टप्पा सुरु झाला असून येते काही दिवस अतिशय महत्वाचे असणार आहेत. ह्या सगळ्यातून जर चंद्रयान २ सुखरूप चंद्रावर उतरलं तर पुर्ण जगाच्या अवकाश संशोधनात खूप मोलाची भर टाकणारा देश म्हणुन भारताची नोंद होणार आहे हे निश्चित. तूर्तास पुढल्या परीक्षेसाठी इसरो च्या वैज्ञानिक आणि संशोधकांना शुभेच्छा.

माहिती स्रोत:- गुगल, विकिपीडिया

फोटो स्रोत :- गुगल (फोटोत  ऐटकेन बसीन आणि चंद्रयान २ उतल्यावरचं काल्पनिक चित्र)

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Friday 30 August 2019

फुलराणी मानसी जोशी... विनीत वर्तक ©

फुलराणी मानसी जोशी... विनीत वर्तक ©

फुलाची आणि तिची मैत्री तशी जुनीच. वयाच्या ६ व्या वर्षी तिने हातात रॅकेट पकडली. रॅकेट च्या उंचीपेक्षा लहान असणाऱ्या तिला हे फुल आपलं आयुष्य बदलवुन टाकेल ह्याची पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती. वडील भाभा अणुसंशोधन केंद्रात वैज्ञानिक आणि अणुशक्तीनगर मधल्या बॅडमिंटन कोर्टवर तिने पहिल्यांदा त्या फुलाशी मैत्री केली. पहिल्यांदा एक आवड म्हणुन सुरु झालेला प्रवास आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल ह्याचा विचार न तिने कधी केला होता न तिच्या कुटुंबियांनी. इलेक्ट्रॉनिक्स शाखेतुन अभियांत्रिकीची पदवी घेतल्यावर तिने सॉफ्टवेअर च्या क्षेत्रात प्रवेश केला. एटॉस सारख्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील नामांकित कंपनी मधुन आपलं सर्व सामान्य आयुष्य जगत असताना अचानक आयुष्याच्या प्रवासात एक काळकुट्ट वळण आलं.

२ डिसेंबर २०११ ला ऑफिस ला जाताना तिच्या स्कुटर ला एका भरदाव वेगाने येणाऱ्या ट्रक ने धडक दिली. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागला नाही. हॉस्पिटल मध्ये नेईपर्यंत पायातुन खूप रक्तस्त्राव झाला होता. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण मानसी चा पाय वाचवू शकले नाहीत. मानसी ला वाचवण्यासाठी तिचा एक पाय शरीरापासुन वेगळा करावा लागला. जवळपास ४५ दिवस हॉस्पिटल मध्ये घालवल्या नंतर मानसी ची हॉस्पिटल मधुन सुटका झाली पण आयुष्य बदललेलं होतं. आयुष्याचे सगळे संदर्भ आता मानसी साठी बदलून गेले होते. पण ती हार मानणारी नव्हती. जखम भरल्यावर कृत्रिम पाय तिला बसवण्यात आला. आपलं शरीर बदल लगेच स्वीकारत नाही. त्यामुळे ह्या बदलांना स्वीकारणं मानसी आणि तिचं शरीर दोघांनाही जड गेलं. पण हे बदल स्विकारण्याशिवाय पर्याय कोणताच पर्याय तिच्यासमोर नव्हता.

एक पाय जरी तिने गमावला तरी ती मनातुन हरली नव्हती. नवीन पाय बसवून ८ महिने उलटुन गेल्यावर तिने आधाराशिवाय चालायला आणि आपलं फुलाशी असलेलं नातं तिने खुलवायला सुरवात केली. आपण पुन्हा बॅडमिंटन खेळु शकु असा आत्मविश्वास तिला मिळाला तो २०१२ साली. एटॉस मधल्या अंतर्गत स्पर्धेत ती सहभागी झाली. एका पायाची कमी आपल्याला फुलराणी बनण्यापासून रोखू शकत नाही हे तिला उमगलं. त्या स्पर्धेत तिने आपल्या खेळाची छाप पाडली. अगदी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते आपले सहकारी सगळ्यांनी तिला प्रोत्साहन दिलं. हा क्षण तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. ह्या नंतर तिने मागे वळुन बघितलं नाही. सुरु झाला एक नवीन खडतर प्रवास जिद्द, मेहनत ह्याच्या जोडीला रोज व्यायाम, सरावं करत आपलं बॅडमिंटन मधील कसाब तिने अधिक उंचीवर नेलं. अनेक स्पर्धांमधुन भाग घेताना एका व्यंग असलेल्या एका बॅडमिंटन खेळाडूने तिला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची सूचना केली.

स्वतःला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार करताना तिने हैद्राबाद च्या प्रतिष्ठित अश्या पुलेला गोपीचंद बॅडमिंटन एकेडमी मध्ये प्रवेश घेतला. मानसी जोशी ने डिसेंबर २०१४ ला पहिलं राष्ट्रीय रौप्य पदक मिळवलं. ह्या स्पर्धेत ती अर्जुन पुरस्कार विजेती पारुल परमार सोबत खेळली होती. सप्टेंबर २०१५ मध्ये तिने मिक्स डबल वर्ल्ड बॅडमिंटन स्पर्धेत इंग्लंड इकडे रौप्य पदक पटकावलं. २०१८ साली एशियन पॅरा गेम्स - जकार्ता, इंडोनेशिया इकडे बॅडमिंटन मध्ये कांस्य पदकाची कमाई भारतासाठी केली. ह्या यशाने हुरळून न जाता फुलराणी मानसी जोशी ने आपल्या खेळात सतत सुधारणा केल्या. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर,

"This sport is really close to me. It has made me what I am today. I will love to give it more time and push myself to the next level. My goal is to be world number one." 

हे स्वप्न नुसतं तिने बघितलं नाही तर ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा तिने केली. आठवड्यात रोज दोन तास तर आठवड्याच्या शेवटी रोज चार तास सराव, योगा ह्या सगळ्यांसोबत आपलं करियर ही तिने पुढे चालू ठेवलं. नुकत्याच झालेल्या पॅरा बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत तिने सुवर्ण पदकाची कमाई केली. आपल्या स्वप्नाला मुर्त स्वरूप देताना जागतिक क्रमवारीत तिने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आपल्या अपंगत्वाला आपली अडचण न बनवता भारताच्या ह्या फुलराणीने सगळ्यांच भारतीयांपुढे आपला आदर्श ठेवला आहे. तिचं कौतुक करताना पंतप्रधानांनी ट्विट केलं होतं.

"130 crore Indians are extremely proud of the Indian Para-Badminton contingent, which has brought home 12 medals at BWF World Championship 2019.Congratulations to the entire team,whose success is extremely gladdening and motivating. Each of these players is remarkable!"

फुलराणी मानसी जोशी चा हा पराक्रम अनेकांना प्रोत्साहन देणारा आहे. आयुष्यात कधी काय होईल हे कोणीच सांगु शकत नाही. आयुष्यातलं एखादं वळण काय वेळ आपल्यावर आणेल ह्याचा विचार पण आपण करू शकत नाही. ह्या सगळ्यात आपण काय करायचं हा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य मात्र त्याने आपल्याला दिलं आहे. तुम्ही रडत बसा किंवा ह्याच वळणाला आपल्या स्वप्नांच मुर्त स्वरूप द्या हे आपण ठरवायचं असते. फुलराणी मानसी जोशी हरळी नाही ती आपलं स्वप्न जगली त्यामुळेच आज पॅरा बॅडमिंटन विश्वातली जगातील एक नामवंत खेळाडू बनली आहे. हे करताना आपल्यासोबत आपल्या देशाचं नावं ही तिने उज्ज्वल केलं आहे. तिच्या ह्या पराक्रमाला माझा कुर्निसात.

माहिती स्रोत :- गुगल, बेटर इंडिया, विकिपीडिया

फोटो स्रोत :- गुगल



Wednesday 28 August 2019

हेरगिरीचा सुपरमॅन मिर डगन... विनीत वर्तक ©

हेरगिरीचा सुपरमॅन मिर डगन... विनीत वर्तक ©


मिर डगन  हे नाव भारतीयांसाठी अपरिचित असेल पण जगातील अनेक देशांनी ह्या नावाचा धसका घेतला होता. हा धसका घेण्यामागे कारण ही तसचं होतं. हेरगिरी आणि गुप्त मिशन तसेच गनिमी काव्या प्रमाणे हल्ला करून शत्रूला नमोहरम करता येऊ शकते हे ज्या संस्थेने पूर्ण जगाला दाखवलं आणि शिकवलं त्या संस्थेच्या जडणघडणीत मिर डगन ची भुमिका महत्वाची होती. कोण होता हा मिर डगन? ज्याच्या नावाने भल्या भल्या देशांना घाम फुटत असे अश्या मोसाद ह्या इस्राईलच्या गुप्तचर संस्थेचा अध्यक्ष तो होता. मिर डगन हा इस्रायली गुप्तचर संघटना 'मोसाद' चा २००२ ते २०११ पर्यंत अध्यक्ष होता. मोसाद हे नाव ऐकताच पुर्ण जगातील सगळ्यांच्या भुवया उंचावतात आणि ह्याला कारण ही तसेच आहे. मोसाद ने पुर्ण जगात केलेल्या मिशन चा अभ्यास केला तर मोसाद चं नाव ऐकताच सगळे देश ह्याचा धसका का घेतात हे आपल्याला कळून येईल. 'मोसाद' आजही जगातील सर्वोत्तम गुप्तचर संघटना आहे. मोसाद ला सर्वोत्तम बनवण्यात मिर डगन चा सिंहाचा वाटा आहे. 

मिर डगन चा जन्म ३० जानेवारी १९४५ ला आत्ताच्या युक्रेन मध्ये झाला. १९५० ला त्याच्या कुटुंबाने इस्राईल ला स्थलांतर केलं. १९६३ ला मिर डगन ने इस्राईल आर्मी मध्ये प्रवेश केला. १९६७ मध्ये अरब - इस्राईल युद्धात मिर डगन ने कंपनी कमांडर म्हणून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या बहादुरीने इस्राईल च्या आर्मी मध्ये वर वर जात मिर डगन १९९५ ला इस्राईल आर्मी मधून मेजर जनरल ह्या पदावरून निवृत्त झाला. मिर डगन ला हातात ग्रेनेड असलेल्या एका मोस्ट वॉन्टेड अतिरेक्याशी निडरतेने दोन हात करण्यासाठी प्रतिष्ठित अश्या मेडल ऑफ ऑनर ने १९७१ ला सन्मानित करण्यात आलं. मिर डगन ला नंतर इस्राईल पंतप्रधान एरिअल शेरॉन ह्यांनी त्यांची नियुक्ती देशाचे सुरक्षा सल्लागार म्हणून केली व नंतर त्यांची नियुक्ती मोसाद चे अध्यक्ष म्हणून केली गेली. 

मिर डगन नी मोसाद ची सुत्रे हातात घेताच संघटने मध्ये अभुतपुर्व बदल केले. मोसाद ला फक्त देशा पुरती मर्यादित न ठेवता त्यांनी त्याची व्याप्ती जगात वाढवली. इस्राईलसाठी धोकायदाक असणाऱ्या प्रत्येक अतिरेक्याला ते जिथे असतील तिकडे ठेचून मारण्याची रणनिती मोसाद ने आखली. साम, दाम, दंड, भेद अश्या सगळ्या गोष्टींचा वापर करत अश्या अतिरेक्यांना मारण्याच्या अनेक गुप्त मिशनला मोसाद ने मुर्त रूप दिलं. मिर डगन ह्यांनी मोसाद चं अध्यक्षपद सांभाळल्यावर अवघ्या २ वर्षात ४ परदेशी अतिरेक्यांना मारलं गेलं तसेच इस्राईल वर होणाऱ्या तीन अतिरेकी कारवायांना मोसाद ने आधीच ओळखून त्यांना वेळीच रोखलं. 

मिर डगन च सगळ्यात मोठं क्रेडिट म्हणजे इराण च्या अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नांना लागलेली खिळ. मिर डगन च्या नेतृत्वाखाली मोसाद ने इराण च्या अणुबॉम्ब बनवण्याच्या स्वप्नांना खिंडार पाडलं. असं म्हंटल जाते की मिर डगन जर नसता तर कदाचित २० वर्षांपूर्वी इराण अणवस्त्रधारी राष्ट्र झालं असतं. मिर डगन च्या नेतृत्वाखाली मोसाद ने गुप्ततेने इराण च्या अतिशय महत्वाच्या अश्या पाच अणुसंशोधकांची हत्या घडवून आणली. तसेच इराण च्या अनेक प्रकल्पात अनेक विघ्न उभी केली. मोसाद ने इराण च्या अणुप्रकल्पाच्या कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये व्हायरस सोडून पूर्ण प्रकल्प बंद केला. ह्या सगळ्यामुळे इराण ला एनरिच युरेनियम तयार करण्यात अपयश आलं जे अणुबॉम्बसाठी गरजेचं होतं. मोसाद ने ह्या सगळ्या हमल्याची जबाबदारी घेतली नसली तरी ह्या सगळ्यामागे मोसाद चे अध्यक्ष मिर डगन च डोकं होतं असल्याचं म्हंटल जाते. २००८ ला मिर डगन च्या नेतृत्वाखाली सिरिया च्या डिफेन्स चे नेतृत्व करणारे इमाद मोर्निना आणि मोहम्मद सुलेमान ह्यांची हत्या करण्यात आली. ह्या नंतर हमास चा कमांडर मोह्हमद अल मेहमूद दुबई मध्ये हत्या करण्यात आली. ह्या हत्यामागे मोसाद चा हात असल्याचं चौकशीत पुढे आलं पण कुठेच मोसाद चा एकही गुप्तहेर पकडला गेला नाही.       

चारही बाजूने अरब राष्ट्रांनी वेढलेला आणि सतत धार्मिक अतिरेक्यांच्या रडारवर असलेला इस्राईल सारखा देश आज ह्या सगळ्यांना पुरून उरला आहे तो त्याच्या मजबूत असलेल्या गुप्तहेर संघटनेमुळे. मोसाद ह्या इस्राईल च्या गुप्तचर संघटनेने आपली ताकद पूर्ण जगाला दाखवून दिली. आपली ताकद फक्त अतिरेकी कारवाईपुरती मर्यादित न ठेवता सायबर क्राईम, तसेच शत्रु राष्टांची चुकीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीवर पण आपण प्रतिबंध करू शकतो हे मिर डगन च्या नेतृत्वाखाली मोसाद ने दाखवून दिलं. मोसाद मध्ये ७००० पेक्षा जास्त लोकं काम करत असून मोसाद चे गुप्तहेर पुर्ण जगात पसरलेले असुन सतत अश्या देशविरोधी कारवाईवर लक्ष ठेवुन असतात. 

मिर डगन ने २००२ ते २०११ पर्यंत मोसाद च नेतृत्व केलं ह्या पूर्ण काळात मोसाद ने अनेक मोहिमा आखल्या. आपली क्षमता इस्राईल पुरती मर्यादित न ठेवता मिर डगन ने मोसाद ला पूर्ण जगात एक मानाचं स्थान आणि अतिरेक्यांच्या मनात एक भिती निर्माण केली. मिर डगन ने हेरगिरीचे अनेक संदर्भ आपल्या कर्तृत्वाने बदलवून टाकले. इस्राईल आणि मोसाद ला एका वेगळ्या उंचीवर नेणारा हेरगिरीचा सुपरमॅन मिर डगन १७ मार्च २०१६ ला काळाच्या पडद्याआड गेला. इस्राईल च्या ह्या हेरगिरीच्या सुपरमॅन मिर डगन ला माझा कुर्निसात. 

माहिती स्रोत :- गुगल 


फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday 25 August 2019

मंगळाचे मिशन मंगळ... विनीत वर्तक ©

मंगळाचे मिशन मंगळ... विनीत वर्तक ©

भारताचे मंगळयान अर्थात मॉम मंगळाच्या कक्षेत विराजमान व्हायला आता ५ वर्ष येत्या २४ सप्टेंबर ला पूर्ण होतील. मंगळावर भारत स्वारी करू शकतो हा विचारच ज्याकाळी पुर्ण जगासाठी एक धक्का होता तेव्हा तो भारतीयांसाठी पण होता. इसरो आपल्या स्वबळावर मंगळावर स्वारी करू शकते ह्याचा विश्वास न भारतीयांना होता ना खुद्द इसरो ला. २४ सप्टेंबर ला पंतप्रधान जेव्हा मंगळाच्या कक्षेत मॉम स्थापन होणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते तेव्हा खुद्द तत्कालीन इसरो चिफ के. राधाकृष्णन ह्यांनी त्यांना ह्या यशाबद्दल आपण सांशक असल्याचं कळवलं होतं. अपयशाची शक्यता जास्ती असुन भारत हे मिशन यशस्वी करू शकेल ह्याची शक्यता कमी असल्याचं म्हंटल होतं. पण इसरो ने जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवलं.

ह्या मोहिमेच्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार झालो होतो. मग ते मॉम च भारतातून उड्डाण असो वा मंगळाच्या कक्षेत स्थापन होणं असो. ह्या प्रत्येक क्षणाला मी लाईव्ह अनुभवलं होतं. आज पुन्हा एकदा मिशन मंगळ बघताना त्याचा अनुभव आला. भारतीय प्रेक्षक जो प्रेमाच्या बाहेर जाऊन विचार करत नाही. चाकोरीबद्ध चित्रपटा पलीकडे जाऊन सिनेमागृहात चित्रपट बघत नाही अश्या वेळेस मंगळ मिशन सारख्या वैज्ञानिक घटनेवर आधारीत असलेल्या चित्रपटासाठी हाऊस फुल चा बोर्ड नक्कीच कुठेतरी सुखावणारा होता. बऱ्याच संख्येने नवीन पिढीने ह्या चित्रपटासाठी गर्दी केली होती. वैज्ञानिक आशय असलेल्या चित्रपटात मनोरंजन होईल असं काय असेल? असा एक प्रश्न मनात आला पण चित्रपट बघताना विज्ञाना सोबत मनोरंजन मसाला चित्रपटात नक्कीच आहे ह्याचा अनुभव आला.

मुळातच भारताच्या वैज्ञानिक प्रगतीवर एखादा बॉलिवूड चित्रपट येणं हे एक धाडस आहे. युरोप च्या देशात आणि खान लोकांच्या प्रेमात डुबलेल्या भारतीय प्रेक्षकाला काहीतरी वेगळं लवकर सहसा पचनी पडत नाही असा अनुभव आहे. हिरो ह्या शब्दाच्या संकल्पना इतक्या स्वप्नवत आहेत की त्याच्या इमेज ला लागलेला धक्का त्याला सहन होतं नाही. त्यामुळेच मिशन मंगळ हा एक धाडसी प्रयोग होता. चित्रपट म्हंटला की त्यात अतिशियोक्तीपणा आलाच काही गोष्टींना विनोदात, गाण्यात बसवण्याचा केलला प्रयत्न ही आलाच. त्यामुळे चित्रपट कुठेतरी पकड सोडून दुसरीकडे जातो आहे असं वाटत असताना पुन्हा एकदा चित्रपट मुळ विषयाकडे वळतो. इसरो च यश हे त्यांच्या सामान्य असणाऱ्या वैज्ञानिक, संशोधक ह्यामुळे मिळालेलं आहे. आपण कसं दिसतो? आपल्याबद्दल लोकं काय विचार करतात? ह्या पेक्षा आपण काय करू शकतो ह्याचा विचार करणारे १७,००० पेक्षा जास्ती लोकांची इसरो टीम ह्या मोहिमेसाठी झटली होती. पैसे किती मिळणार? आपला काय फायदा? ह्या पेक्षा आपण देशाचं नाव पुढे नेऊ शकतो. आपलं स्वप्न जगू शकतो ही भावना इसरो मध्ये मोठी होती म्हणून इसरो आपल्या पहिल्या प्रयत्नात मंगळावर स्वारी करू शकली. (विनीत वर्तक ©)

मिशन मंगळ ह्या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे रॉकेट लॉंचिंग चे इफेक्ट्स. रॉकेट उड्डाण बघताना अंगावर अक्षरशः शहारे उभे राहतात. मंगळ यानाचा प्रवास अजून चांगल्या पद्धतीने नक्कीच दाखवता आला असता. शेवटच्या क्षणी चित्रपट आटोपलेला वाटला. पब मधल्या सिन पेक्षा रॉकेट च्या प्रवासावर जास्ती वेळ द्यायला हवा होता. चित्रपटातील पात्र योग्य आणि अयोग्य ज्याला जसे वाटेल तसे त्याने ठरवावे. चित्रपटात थोडा बाज आणण्यासाठी दिलेला धर्माचा रंग, तरुण, देवावरील श्रद्धा ते पर्सनल लाईफ मधील घटनांचा संबंध हे प्रेक्षकांनी बघताना ह्या विज्ञान कथेचा एक भाग म्हणून घेतले तर तितकासा त्रास होतं नाही. महत्वाचं होतं ते आपण अशी एखादी मोहीम यशस्वी करू शकतो आणि ते करताना येणाऱ्या अडचणींवर भारतीय वैज्ञानिकांनी शोधलेली उत्तरे. भारताचा मंगळ प्रवास किती अडचणींचा होता हे पोहचवण्यात चित्रपट यशस्वी होतो ह्यात शंका नाही. ह्या चित्रपटात सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे चित्रपटाचा शेवट झाल्यावर भारताच्या सर्व टिम ला दिलेली एक पोचपावती. चित्रपटातील प्रत्येक हिरो आणि हिरोईनची नाव तोंडपाठ असणारी पिढी भारताच्या पडद्यामागे राहून काम करणाऱ्या वैज्ञानिकांना ओळखत नाही. त्यांची ओळख ह्या निमित्ताने ह्या सगळ्या लोकांना झाली हे नसे थोडके.

थोडक्यात काय तर मंगळाचे मिशन मंगळ नक्कीच एक चांगला प्रयत्न आहे. येत्या २४ सप्टेंबर रोजी मंगळयान आपल्या ५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. आजवर ह्या मोहिमेतून १००० पेक्षा जास्त मंगळाची छायाचित्र मॉम ने इसरो ला पाठवली आहेत. ६ महिन्यांचं आयुष्य असणारं मॉम आज ५ वर्ष झाली तरी काम करत आहे. ह्यातून इसरो च्या अभियांत्रिकी दर्जाचा आपण अंदाज बांधु शकतो. २०१४ ला कक्षेत स्थापन होताना मॉम वर ३२ किलोग्रॅम इंधन बाकी होतं. आपली कक्षा सुरळीत ठेवण्यासाठी मॉम ला वर्षाला फक्त २ किलोग्रॅम फ्युल लागते. ह्याचा सरळ अर्थ आहे की मॉम जवळपास पुढली १५ वर्षापेक्षा जास्ती काळ मंगळाच्या कक्षेत फिरत राहू शकते. पण ह्यावरील उपकरणं अवकाशातील रेडिएशन तसेच ह्यावरील ब्याटरी किती तग धरते ह्यावर ते किती काळ इसरो शी संवाद करू शकेल हे अवलंबून आहे. आज ५ वर्ष उलटून गेल्यावर ही ह्यावरील उपकरणं व्यवस्थित काम करत असून इसरो ला माहिती पाठवत आहेत. मंगळ मिशन हा एक चित्रपट म्हणून न पाहता इसरो च्या अविश्वसनीय अश्या प्रवासाचा साक्षीदार होण्याची संधी काही प्रमाणात आज आपल्याला मिळत आहे. त्या संधीचा उपभोग आणि फायदा प्रत्येक भारतीयांनी न चुकता घ्यावा.


सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Wednesday 21 August 2019

मी येतोय... विनीत वर्तक ©

मी येतोय... विनीत वर्तक ©

भारताच्या वायु दलाला मजबुत करणारं आणि किमतीवरून बहुचर्चित असणाऱ्या राफेल विमानांचे आगमन येत्या २० सप्टेंबर पासून होते आहे. फ्रांस च्या डसाल्ट कंपनी कडून ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा सरकारी करार भारताने फ्रांस सरकारशी केला होता. ह्या करारानुसार तयार होणाऱ्या राफेल विमानांमधील पहिलं राफेल विमान भारताला पुढल्या महिन्यात मिळते आहे. ह्या विमानांच्या किमतीवरून तसेच ऑफसेट क्लॉज मधून अनिल अंबानी च्या कंपनीला ह्याचं काम देण्यावरून बरच राजकारण निवडणुकीच्या काळात भारतात झालं. दोन्ही बाजूने वार केले गेले पण आता हा धुराळा निवडणूक संपताच संपला आहे. भारताच्या वायु दलासाठी अतिशय महत्वाचं असलेलं आणि गरजेचं असलेलं हे विमान भारताच्या हवाई हद्दीला एक अभेद्य मजबुती देणार आहे.

ह्या ३६ विमानांच्या करारानंतर अजून ३६ राफेल विमाने देण्यासाठी फ्रांस सरकार आणि भारत सरकार ह्यांच्यात पंतप्रधानांच्या जी ७ दौऱ्याच्या वेळी करार होण्याची दाट शक्यता आहे. हा करार झाल्यास पुढली ६ वर्ष प्रत्येक महिन्याला एक ह्या प्रमाणे राफेल विमानं भारताच्या वायु दलात दाखल होतील. राफेल विमानं दाखल झाल्याने पाकिस्तान ची अवस्था खूप वाईट होणार आहे. भारताकडे जुनी होतं चाललेली आणि दुसऱ्या पिढीतील लढाऊ विमानं आपल्या एफ १६ समोर म्हंटल तांत्रिक दृष्ट्या कमी आहेत अश्या भ्रमात पाकिस्तान होता. पण राफेल करारा नंतर भारताने रशियाशी केलेल्या एस ४०० कराराने पाकिस्तान सोबत चीन च्या तोंडच पाणी पळवलं आहे. सुखोई ३० एम.के.आय. सोबत राफेल आणि भारताच्या हवाई क्षेत्रावर परींद्याला पण येऊ न देणारी एस ४०० सिस्टीम हे  तिन्ही मिळून भारताचं पूर्ण हवाई क्षेत्र पाकिस्तानी साठी अभेद्य किल्ला बनला आहे.

राफेल लढाऊ विमान हे दोन इंजिन असलेलं मल्टी रोल कॉमब्याट लढाऊ विमान आहे. राफेल ओमनीरोल करण्यास सक्षम आहे. ओमनीरोल ह्याचा अर्थ होतो अनेक गोष्टी एकाच वेळेस. तसेच हे विमान आपल्या आत मध्ये ऑक्सिजन बनवू शकते. ह्यामुळे विमानतळावर पुन्हा फ्युल ज्यात ऑक्सिजन ही समाविष्ट असतो ते भरण्याचा किंवा ऑक्सिजन चा पुरवठा करण्याची गरज भासत नाही. राफेल हे ७०% कम्पोझिट मटेरीअल नी बनवलेलं आहे. पूर्णतः स्टेल्थ नसलं तरी शत्रूच्या रडार वर राफेल दिसणं हे तितकच कठीण आहे. ह्याशिवाय राफेल स्काल्प आणि मेटोर क्षेपणास्त्र नी सुसज्ज आहे. ह्यातलं मेटोर हे क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत मारा करणार जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्र समजलं जाते. मेटोर हे रडार गायडेड बियॉंड व्हिज्युअल रेंज एअर तो एअर मिसाईल आहे ह्याच्या बाजूचं  १०० किमी च्या क्षेत्र हे 'नो एस्केप झोन' आहे. ह्याचा अर्थ होतो की १०० किमी च्या क्षेत्रातील कोणतंही लक्ष्य ह्यांच्यापासून वाचू शकत नाही. आपल्या लक्ष्याकडे ते माख ४ (ध्वनीच्या वेगाच्या ४ पट वेगाने) कुच करण्यास सक्षम असून ३०० किलोमीटर वरून पण डागता येऊ शकते. ह्याचा अर्थ भारतात राहून पण पाकिस्तान च्या कोणत्याही अतिरेकी अड्ड्यावर भारतीय वायू दल हल्ला करण्यास सक्षम असेल. बालाकोट च्या वेळी ही क्षमता नसल्याने आपल्याला पाकिस्तान च्या हद्दीत जाऊन बॉम्ब टाकावे लागले होते. स्काल्प हे एअर लॉन्च फायर आणि फर्गेट श्रेणीतील मिसाईल असून ह्याची क्षमता ५६० किलोमीटर पर्यंत मारा करण्याची आहे. हे मिसाईल १००० किलोमीटर/ तास ह्या वेगाने आपल्या लक्ष्याकडे कूच करण्यास सक्षम आहे.

जगातील सर्वोत्कृष्ठ लढाऊ विमानातल एक अस ज्याला गणल जाते. २१२० किमी/ तास वेगाने हवेत ३००० किमी चा पल्ला गाठण्याची क्षमता असलेल आणि पुगाचेव कोब्रा सारखी प्रचंड कठीण कसरत करण्यात माहीर असलेल भारताच सुखोई ३० एम के आय वर जेव्हा जगातील सगळ्यात वेगाने जाणार आणि ज्याला रडार पण पकडू शकत नाही अस ब्राह्मोस मिसाईल बसवलेलं आहे. ब्राह्मोस मिसाईल ध्वनीपेक्षा ३ पट वेगात लक्ष्यावर हल्ला करते. शत्रूला काही कळायच्या आत शत्रूचा सुपडा साफ झालेला असतो. ब्राह्मोस ची मारा करण्याची क्षमता २९० किमी इतकी आहे. ब्राह्मोस चा वेग ब्राह्मोस ला अजून घातक बनवतो. हे मिसाईल छोट असूनही त्याच्या वेगामुळे प्रचंड अशी कायनेटिक उर्जा उत्पन्न करते. त्यामुळेच ह्याचा वार हा लक्ष्याचा अंत समजला जातो.

एस ४०० ची एक बटालीयन म्हणजे शत्रूच्या चारी मुंड्या चीत. ह्या सिस्टीम मध्ये ३ प्रकारची मिसाईल वापरली जातात. सगळ्यात दूरवर मारा करणारी ४० एन ६, दूरवर मारा करणारी ४८ एन ६ तर जवळ मारा करणारी ९ एम ९६ मिसाईल. ही तिन्ही मिसाईल सुपर सॉनिक व हायपर सॉनिक वेगाने म्हणजे तब्बल १४ माख वेगाने ( ध्वनीपेक्षा १४ पट जास्ती वेगाने) १७,००० हजार किमी / तास वेगाने शत्रूकडे झेपावतात. एक उदाहरण द्यायचं झाल तर हलवारा एअर बेस मध्ये असलेल्या एस ४०० कडून निघालेलं क्षेपणास्त्र पाकिस्तान मधल्या लाहोर वर उडणाऱ्या एफ-१६ विमानाचा फक्त ३४ सेकंदात वेध घेऊ शकते.
१२० ते ६०० किमी पर्यंतच्या टप्यात येणार कोणतही विमान, क्षेपणास्त्र किंवा ड्रोन ह्याच्या पासून वाचू शकत नाही. एकाच वेळी ६०० किमितील ३०० वेगवेगळी टार्गेट शोधून तब्बल ८० टार्गेट वर एकाच वेळी खातमा करू शकते. १६० वेगवेगळ्या मिसाईल न एकाच वेळी गाईड करू शकते. ह्यातील स्याम सिस्टीम एफ-३५ सारख्या पाचव्या पिढीतील स्टेल्थ ( रडार वर न दिसणाऱ्या ) फायटर प्लेन ला सुद्धा मारू शकते.

राफेल च्या येण्यानं भारतीय वायु दलाच्या ताकदीत कमालीची वाढ होणार आहे. राफेल विथ स्काल्प-मेटोर क्षेपणास्त्रे, सुखोई ३० एम.के.आय. विथ ब्राह्मोस मिसाईल आणि ह्या सगळ्यांवर कढी करणारी रशियाची एस ४०० सिस्टीम मिळून भारताचं हवाई क्षेत्र आता पाकिस्तानसाठी अभेद्य किल्ला झाला आहे. कालच पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांनी फ्रांस ला फोन करून काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्या विनंतीला केराची टोपली दाखवत फ्रांस ने काश्मीर भाग हा भारताची अंतर्गत बाब आहे म्हणत पाकिस्तान ला त्याची जागा दाखवली. फ्रांस ह्या पुढे जाऊन अजून ३६ राफेल विकण्यासाठी तयार झाला असुन पंतप्रधानांच्या येत्या दौऱ्यात ह्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तुर्तास २० सप्टेंबर ला राफेल च्या येण्यानं भारताच्या हवाई सुरक्षितेत प्रचंड भर पडणार हे निश्चित...

माहिती स्रोत :- गुगल

फोटो स्रोत :- गुगल


Tuesday 20 August 2019

चंद्रयानाचा गृहप्रवेश... विनीत वर्तक ©

चंद्रयानाचा गृहप्रवेश... विनीत वर्तक ©

आज ठरल्या प्रमाणे भारताच्या चंद्रयान २ ने चंद्राच्या घरात प्रवेश केला. जवळपास ३.८४ लाख किलोमीटर च अंतर पृथ्वीपासून पार केल्यावर आज ही घटीका कोणत्याही विघ्नाशिवाय ठरलेल्या मुहूर्तावर संपन्न झाली. ह्यासाठी इसरो आणि चंद्रयान २ च्या पुर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन. चंद्रयान २ च्या ह्या पुर्ण प्रवासाचे सारथ्य भारताच्या दोन महिला वैज्ञानिक एम. वनीथा आणि रितु करधाल करत आहेत. चंद्राच्या घरात प्रवेश केला म्हणजे नक्की काय केलं ह्यासाठी आपण नेमकं गृहप्रवेश म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे.

कोणत्याही ताऱ्या भोवती अथवा ग्रहाभोवती त्याच स्वतःच गुरुत्वाकर्षण क्षेत्र असते. ह्या क्षेत्राची तीव्रता आणि क्षेत्र प्रत्येक ग्रह व ताऱ्या प्रमाणे बदलत असते. जसं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आहे तसच चंद्राचं ही आहे. त्याच गुरुत्वाकर्षणाचा परीणाम म्हणजे आपण पृथ्वीच्या समुद्रात होणारी भरती,ओहोटी स्वरूपात बघु शकतो. तर जेव्हा एखादं यान,वस्तू ह्या कक्षेत येते तेव्हा चंद्र किंवा इतर कोणताही ग्रह/तारा त्याला आपल्याकडे खेचून घेतो. जर का वस्तूचा वेग किंवा त्या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण ह्या पैकी आपण एक गोष्ट नियंत्रित  केली तर आपण ते यान,वस्तु त्या ग्रहाभोवती फिरवत ठेवू शकतो नाहीतर, त्या ग्रहावर कोसळवू शकतो किंवा त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीला भेदून पुढे जाऊ शकतो. अर्थात गुरुत्वाकर्षण शक्ती मानवी नियंत्रणातील नाही म्हणजे ज्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो तो म्हणजे त्या वस्तुचा वेग.

चंद्रयान २ जेव्हा पृथ्वीभोवती प्रक्षेपित केलं तेव्हा त्याचा वेग कमी असल्याने त्याला पृथ्वीच्या कक्षेत फिरवण्यात आलं. प्रत्येक वेळी त्याचा वेग फिरवत फिरवत वाढवला गेला. अशी एक वेळ आली की त्या वेगाच्या जोरावर आपण पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदून चंद्रयान २ ने अवकाशात प्रवेश केला. अवकाशातून जाताना वातावरणाचा अडथळा नसल्याने चंद्रयान २ सुसाट वेगात चंद्राच्या दिशेने पुढे जातं होते. ह्याच वेगाने जर आपण जात राहिलो असतो तर जिकडे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याला थांबवू शकलं नाही तर चंद्राचं ही थांबवु शकलं नसतं. आपलं चंद्रयान २ मग चंद्राचं यान सोडून अंतराळात अनंताच्या प्रवासाला निघुन गेलं असतं. जर आपल्याला त्याला चंद्रावर उतरवायचं आहे तर त्याला चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अधिपत्याखाली येणं गरजेचं होतं.

अडचण अशी होती की पृथ्वीवरून लांब जाण्यासाठी बल देणार इंजिन हे चंद्रयानाच्या मागच्या बाजूला होतं. हे इंजिन जर तसच चालवलं तर आपण अजून वेग पकडला असता. ह्यावेळी वेग कमी करण्यासाठी इंजिन ला विरुद्ध दिशेने म्हणजे १८० डिग्री अंशात फिरवून पुढल्या बाजूने आणलं गेलं. चंद्रयानाने ह्या सुसाट वेगात अर्धी गिरकी स्वतःभोवती घेतली. मग हेच इंजिन चालू केल्यावर ते जाणाऱ्या दिशेच्या विरुद्ध दिशेने बल निर्माण करायला लागलं. ज्या इंजिनाने वेग दिला तेच इंजिन आता ब्रेक मारण्याचं काम करत होतं. आता हे सगळं वाचायला सोप्प वाटलं तरी प्रत्यक्षात ही सगळी कवायत पृथ्वीपासून एक, दोन नाही तर लाखो किलोमीटरवर रिमोट ने किंवा ऑटोमेशन ने घडवून आणणं गरजेचं असते.

पृथ्वीवर ऑफिस मध्ये केलेलं गणित आणि प्रत्यक्षात चंद्रयान २ चा वेग ह्यात प्रचंड तफावत होऊ शकते. तसेच ज्या रस्त्याने ठरवलं तो रस्ता डावीकडे, उजवीकडे कधीही सरकू शकतो. अश्या वेळेस ब्रेक कधी, कसा, कुठे आणि कोणत्या वेळेला मारायचा ह्यावर पुढे काय होणार हे अवलंबून असणार होतं. आधी दहा मिनिटांचा ब्रेक बरोबर असेल तर आता तो बारा मिनिटांचा किंवा आठ मिनिटांचा ही होऊ शकतो. म्हणून प्रत्येक क्षणाक्षणाला चंद्रयान २ चा वेग, त्याची दिशा ह्यांचं आकलन करून मग आपल्याला नक्की किती उंचीवर यान थांबवायचं आहे?, त्याची कक्षा कशी असेल? ह्या सगळ्यांची गणित मांडून मग त्या प्रमाणे आज चंद्रयान २ चे ब्रेक मारून त्याचा वेग इतका कमी केला की त्याचं आगमन बरोबर चंद्राच्या दरवाज्यासमोर वाजत गाजत होईल.

आज चंद्रयान २ चं इंजिन विरुद्ध दिशेने १७३८ सेकंद प्रज्वलन करून त्याला ११४ किमी गुणिले १८,०७२ किमी च्या कक्षेत चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने पकडलं. आता हळूहळू पुन्हा इंजिन योग्य त्या वेळी प्रज्वलन करून त्याची कक्षा १०० किमी गुणिले १०० किमी अशी केली जाईल. ह्याच कक्षेत मग चंद्रयान २ चं ऑर्बिटर आपलं पुर्ण आयुष्य घालवेल. तर ल्यांडर आणि रोव्हर आपल्या पुढल्या ठरलेल्या मार्गावर निघतील आणि ७ सप्टेंबर रोजी पहाटे भारताचा तिरंगा चंद्राच्या मातीत आपलं अस्तित्व दाखवत असेल. आजच्या गृह्प्रवेशाने इसरो ने एक मोठा टप्पा पार केला असला तरी सगळ्यात कठीण वेळ अजून यायची आहे. घरात शिरल्यावर नेमकं काय असणार आहे ह्याचा अंदाज आपण बांधलेला आहे. तो जर योग्य निघाला तर चंद्राची ही स्वारी भारताच्या अवकाश कार्यक्रमाची दिशा बदलवणारी असेल. तूर्तास ह्या गृह्प्रवेशासाठी सर्व भारतीयांकडून इसरो चं अभिनंदन.

माहिती स्रोत:- इसरो

फोटो स्रोत :- गुगल 


Sunday 18 August 2019

तिसऱ्या नजरेने ... विनीत वर्तक ©

तिसऱ्या नजरेने ... विनीत वर्तक ©

गेल्या काही  महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान ची हालत अतिशय बिघडलेली आहे. त्याची वाटचाल आता स्वतःच्या सर्वनाशाकडे सुरु झाली असली तरी त्याचे बरेचसे परीणाम भारताच्या वाटेला ही नकळत येणार आहेत. भारताने ३७० आणि ३५ अ कलम रद्द केल्याने मुळात काश्मीर हा विवादाचा भाग राहिलेला नसून भारताचं अविभाज्य अंग होणाच्या प्रक्रियेला सुरवात झालेली आहे. ह्याचे चांगले, वाईट दोन्ही परीणाम येत्या काळात आपल्याला दिसणार असून उताविळपणा न करता परिस्थिती चं आकलन खूप महत्वाचं असणार आहे. कारण ह्याचे जेव्हढे चांगले परीणाम  शक्यता आहे तेवढीच वाईट परिणामांची पण आहे. कारण जेव्हा हरणाऱ्याला आपला पराजय समोर दिसतो तेव्हा समोरच्याला जिंकून न देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याची तयारी असते अथवा तशी निर्मिती केली जाते. ह्यात हरणाऱ्याच वाटोळं झालं तरी त्याची झळ जिंकणाऱ्याला पण बसते.

गेल्या काही वर्षात जागतिक घडामोडींचे परीणाम पाकिस्तान च्या अर्थव्यववस्थेला भोगावे लागतं आहेत. विचार न करता आपले दिवसं ढकलण्यासाठी जनतेला फसवून सर्व जगाकडून कर्ज घेऊन त्याच पैश्याने स्वतःची तसेच अतिरेक्यांची, सेनेची पोट भरण्याचे परिणाम आता कर्ज चुकवताना दिसू लागले आहेत. आपल्या क्षमतांचा अंदाज न घेता सिपेक सारखा प्रकल्प दुसऱ्या देशाचे मनसुबे राखण्यासाठी आपल्या देशात राबवताना स्वतःच्या देशाच्या हिताचा विचार न पाकिस्तानी सरकारने केला ना जनतेला ह्याचा काही अंदाज आला. आता जेव्हा पाणी डोक्यावरून वाहू लागलं आहे तेव्हा सगळीकडे वाचवण्यासाठी धडपड सुरु झालेली आहे . नुकत्याच समोर आलेल्या आकडयात पाकिस्तान च्या डोक्यावर ९० बिलियन अमेरिकन डॉलर च कर्ज आहे हा आकडा दिवसेंदिवस जातो आहे. पाकिस्तान आपल्या कमाई मधील जवळपास ४२% टक्के हिस्सा हा फक्त कर्जाचे हफ्ते चुकवण्यात घालवतो आहे. हे वाचून काही भारतीयांना आनंदाची उकळी फुटली तरी हे चित्र भारतासाठी सगळ्यात जास्ती भयावह होऊ शकते. कारण पाकिस्तान त्याच्या कमाईचा फक्त १०% हिस्सा हा तिथल्या लोकांसाठी असलेल्या सरकारी योजनांसाठी खर्च करू शकत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गरीबी, बेरोजगारी वाढत जाते आहे. त्यातच पाकिस्तानी रुपयाचं अवमूल्यन आणि डॉलर च्या तुलनेत होणारी घसरण रोजच्या रोज लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढवत आहेत.

पाकिस्तान ची ढासळणारी अर्थव्यवस्था भारतासाठी चिंतेचा विषय ह्यासाठी आहे की ह्याचे दूरगामी परिणाम भारतावर होणार आहेत. पाकिस्तान ची हीच अशिक्षित जनता पैश्याच्या मोहाने धर्मांध लोकांच्या जाळ्यात अलगद सापडली जाते. 'जेहाद' च्या नावाखाली त्यांना अतिरेकी कारवाईसाठी प्रोत्साहन दिलं जाते. काश्मीर आपल्या हातून गेल्याची भावना ही पाकिस्तानी जनतेच्या मनात ह्या वेळेस तयार झाली आहे. युनायटेड नेशन मध्ये तोंडावर आपटलेला पाकिस्तान त्यात भारताने आता बोलणीमध्ये पाक व्याप्त काश्मीर चा फक्त विषय असेल तसेच पहिल्यांदा अण्वस्त्र वापर हा भारताच्या बाजूने ऑफेन्सिव्ह डिफेन्स असला तरी पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहे. ह्या गोष्टीचे परीणाम दोन्ही बाजूने अतिशय खोलवर जाऊ शकतात. कदाचित पाकिस्तान ह्या सगळ्यामुळे जागतिक पातळीवर एकटा पडला आहे त्यात त्याची घसरणारी अर्थव्यवस्था ज्यात युद्ध किंवा कोणतीही सैनिकी कारवाई झाल्यास मुळासकट रसातळाला जाण्याची शक्यता आहे.

ह्या सगळ्या गडबडीत पाकिस्तान चं नुकसान होणार किंबहुना त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न जागतिक पटलावर निर्माण होईल हे येत्या काही वर्षात ठरलेलं आहे. पण ह्या भारताचे ही हात ह्यात गरज नसताना होरपळून निघणार आहेत. ते केव्हा,कसे, कितपत हे येणारा काळ ठरवेल पण ह्या सगळ्यात एक देश मात्र विन- विन बाजूने आहे. तो म्हणजे चीन. दोन्ही बाजूने ढोलकी वाजवून चीन ला कोणीही जिंकलं आणि हरलं तरी फायदा होणार आहे. ह्या भांडणात भारताची नष्ट होणारी शक्ती , पैसे  हे चीन ला हवे आहेत. त्याचवेळी जागतिक पटलावर पाकिस्तान ची बाजू घेऊन आपली ६५ बिलियन अमेरिकन डॉलर गुंतवणुकीचा परतावा तो सुनिश्चित करत आहे. पाकिस्तान ला सिपेक साठी दिलेलं कर्ज हे 'प्रोडक्टीव्ह लोन' प्रकारातील आहे. त्यामुळे ते जरी सरळ पैश्याचा स्वरूपात परत करायचं नसलं तरी त्यामुळे पाकिस्तान ला आपलं विदेशी मुद्रा भांडार खर्च करावं लागतो आहे. जर निर्यातीपेक्षा आयात जास्त राहिली तर पाकिस्तान कडे सामान आणण्यासाठी विदेशी मुद्राच राहणार नाही. ही परिस्थिती अजून भयंकर असेल कारण त्यानंतर चीन आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी तिथल्या एकूण उद्योगधंदे, शेती, जमिनी ह्यावर एक प्रकारे हक्क सांगू शकणार आहे. चीन चा हा छुपा अजेंडा श्रीलंका, तजाकिस्तान ह्या देशांनी अनुभवलेला आहे.

भारतासाठी  हेच महत्वाचं आहे की अश्या स्थितीत कोणत्याही गोष्टीचा उदो- उदो न करता शांतपणे, संयमाने आपल्या सीमेमधील परिस्थिती हाताळताना त्याच वेळेला शत्रूवर योग्य वचक ठेवणं. काही थोडेफार झटके लागणार आहेत कारण आपण आपला शेजारी बदलू शकत नाही. पण त्या परिस्थितीत जगातील बाकीच्या देशांची साथ भारताला जमवून आणावी लागणार आहे. कारण युद्ध पाकिस्तान शी नाही तर आपल्यापेक्षा दहा पट मोठ्या असलेल्या चीन शी आहे. ते ही छुपं आहे. ह्यासाठी 'दुश्मन का दुश्मन दोस्त' ह्या प्रमाणे चीन वागत असेल तर भारताने 'दुष्मनो के दुष्मनो से यारी करनी चाहिये' ही काळाची गरज आहे. जपान, इस्राईल, अति पूर्वेकडील देश ज्यात व्हियेतनाम, थायलंड तसेच म्यानमार, भुतान अश्या देशांची सोबत भारतासाठी खूप महत्वाची आहे. कारण हे सगळेच देश ह्या न त्या कारणाने चीन च्या वाढत्या सामर्थ्याला बळी पडत आहेत. अमेरिका ह्या सगळ्यात वरवर जरी भारताच्या बाजूने असली तरी तटस्थ राहण्यात ती एक सेकंदाचा विचार करणार नाही. रशिया सारखा मित्र मात्र भारताने जपायला हवा. कारण जोवर हे देश भारताच्या बाजूने उभे राहतील तोवर  चीन आणि पाकीस्तान दोघेही जगाच्या पुढे तोंडावर आपटत राहणार. चीन च्या छुप्या अजेंडाला चीन ला पुढे नेणं तितकंच कठीण होणार आहे. तूर्तास ह्या सगळ्या घडामोडीवर नजर ठेऊन आपला विकास करत राहणं हे भारतासाठी सगळ्यात महत्वाचं आहे.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Friday 16 August 2019

एक थरार... विनीत वर्तक ©

एक थरार...  विनीत वर्तक ©


२७ फेब्रुवारी २०१९ चा तो दिवस भारतासाठी नाही तर पूर्ण जगासाठी एक थराराचा दिवस होता. २६ फेब्रुवारी ला भारताने पाकिस्तान मधील बालाकोट इकडे हवाई हल्ला करून अतिरेकी तळ उध्वस्थ केल्यावर पाकिस्तान काही न काही कारवाई करेल ह्याचा अंदाज भारतीय सैन्याला होता. २७ फेब्रुवारी ला अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारताच्या दिशेने कूच केले. ४ थ्या पिढीतील एफ १६ विमानांनी भारताच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले करण्याच्या पाकिस्तानी स्वप्नांना भारतीय हवाई दलाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. भारतीय हवाई दलाच्या रडारवर लाल टिपके दिसताच भारताच्या सुखोई एम.के.आय. ३० आणि मिग बायसन २१ विमानांनी उड्डाण केलं. भारताच्या सुखोई, मिग च्या फळीपुढे आपण तग धरू शकणार नाही ह्याची कल्पना येताच पाकिस्तानी विमानांनी पुन्हा पाकिस्तानकडे कूच केलं पण तोवर ते भारतीय हवाई हद्दीत घुसले होते. विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान ने आपल्या शत्रूला कोंडीत पकडताना एका अविश्वसनीय थरारात पाकिस्तान च्या एका एफ १६ विमानाला नष्ट केलं. विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान आणि त्याला ह्या थरारात सहकार्य करणारी स्क्वार्डन लीडर मिंटी अग्रवाल ह्या दोघांना नुकतंच बहादुरीसाठी सैन्य पादकांनी गौरवण्यात आलं. विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान ह्याला वीर चक्र तर स्क्वार्डन लीडर मिंटी अग्रवाल हिला युद्ध सेवा मेडल देण्यात आलं. स्क्वार्डन लीडर मिंटी अग्रवाल हे मेडल मिळवणारी पहिली महिला आहे. 

२७ फेब्रुवारी चा हा थरार भारत आणि पाकिस्तानसाठी मर्यादित राहिला नाही तर पूर्ण जगाने त्याची नोंद घेतली. हि नोंद कशासाठी? नक्की हा थरार काय होता? ह्यात विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान आणि स्क्वार्डन लीडर मिंटी अग्रवाल ह्यांची बहादुरी समजून घेणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. २७ फेब्रुवारी चा हा थरार समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान ज्या विमानाचं सारथ्य करत होता ते होतं मिग बायसन २१. मिग २१ हे दुसऱ्या पिढीतील लढाऊ विमान असून ह्याचा जन्म ६ दशके आधी १९५९ ला रशियात झाला होता. ५६ वर्षांपूर्वी भारताने ही विमाने रशियाकडून खरेदी केलेली आहेत. खरे तर एवढ्या काळ सेवा देत असलेली ही विमान अमेरिकेच्या चौथ्या पिढीतील अग्रगण्य मानल्या गेलेल्या एफ १६ समोर कुठेच बसत नाहीत. ह्यांची तुलना करणं म्हणजे मारुती ८०० ची तुलना मर्सिडीझ बेंझ शी करणं ज्यात सगळ्याच पातळीवर मारुती ८०० कुठेच बसतं नाही. मग असं काय घडलं होतं की एका दुसऱ्या पिढीतील मिग बायसन २१ विमानाने एफ १६ चा वेध घ्यावा. ह्याच कारणासाठी २७ फेब्रुवारी चा थरार हा अमेरिके सोबत पूर्ण जगातील युद्ध नीतीच्या अनेक लोकांनी अभ्यासला. 

अमेरिकेचं एफ १६ हे लढाऊ विमान फ्लाय बाय वायर सिस्टीम मधील विमान आहे. ह्याचा अर्थ होतो की ह्याच रडार, मिसाईल, एव्हीओनिक्स हे अतिशय उच्च दर्जाचं असून लक्ष्यावर नेम धरण्यासाठी पायलट ची गरज भासत नाही. म्हणजे आपलं लक्ष्य ते स्वतःच टार्गेट करून लॉक करू शकते.  त्या तुलनेत मिग २१ जरी खूप जुनं लढाऊ विमान असलं तरी भारताने त्यात त्याची बॉडी आणि इंजिन सोडून सगळ्या गोष्टींवर बदल केलेले आहेत. मिग बायसन २१ व्हर्जन मध्ये नवीन रडार, मल्टी फंक्शन डिस्प्ले स्क्रीन, आर ७२ एअर टू एअर सरफेस मिसाईल तसेच एडव्हान्स हेल्मेट बसवलेलं आहे. ह्या हेल्मेट मध्ये अशी क्षमता आहे की विमानाला शत्रूच्या विमानाचा रोख पकडण्याची गरज नाही. बस पायलट ने त्या लक्ष्याकडे बघितलं की ते टार्गेट लॉक होऊन त्या लक्ष्याकडे विमानातील मिसाईल कूच करते. अश्या विविध अपग्रेडमुळे मिग बायसन २१ ची क्षमता कमालीची वाढली आहे. त्यामुळे एफ १६ च्या आसपास ते पोहचू शकते. 

मारुती ८०० ला कितीही नवीन पार्ट्स बसवले तरी तिची क्षमता मर्सिडीझ बेंझ पेक्षा कमी राहणार हे सर्वश्रुत आहे. पण नुसती गाडी चांगली असली म्हणजे शर्यत जिंकता येते असं होतं नाही. ह्या सगळ्यात एक भाग असतो चालकाचा. असं म्हणतात की, "चांगला खेळणारा खराब पत्ते असताना सुद्धा बाजी आपल्या बाजूने उलटवू शकतो". जो चालक चांगला, ज्याला आपल्या गाडीचे कच्चे,पक्के दुवे ठाऊक आहेत तो बाजी कधीही पलटवू शकतो. तब्बल ५० वर्षापेक्षा जास्ती काळ मिग बायसन २१ चे सगळेच दुवे भारतीय पायलट ना माहित आहेत. आपली क्षमता कुठे जास्त आणि कुठे कमी ह्याचा पूर्ण अंदाज सरावामुळे त्यांना आहे. ह्यामुळेच मिग बायसन २१ हाताळण्याचं त्यांचं कौशल्य सर्वोत्तम आहे. ह्याची कल्पना अमेरिकेला २००४ सालीच आली होती जेव्हा कोप इंडिया जॉईंट एक्सरसाइज मध्ये भारताने ९:१ अश्या विक्रमी आघाडीने अमेरिकेला धूळ चारली होती. आपल्या एफ १६ ला ६० वर्ष जुनं मिग २१ काय टक्कर देणार ह्या भ्रमात अमेरिका आणि त्यांचे पायलट होते. पण तेव्हा मिग बायसन २१ च्या हवेतील चालवण्याच्या कौशल्याने अमेरिकेने तोंडात बोटे घातली होती. २००५ साली पुन्हा एकदा अमेरिका सरावाने उतरली पण तेव्हा ही भारताच्या सुखोई ३० एम.के.आय.आणि मिग बायसन २१ ह्यांनी त्यांना चांगलीच धूळ चार्ली. सलग दोन वर्ष हा पराभव त्यांना इतका जिव्हारी लागला की पेंटागॉन ला विशेष बैठक बोलावून एफ १६ च्या निर्मात्यांना खडे बोल सुनवावे लागले होते. ६० वर्ष जुनं तंत्रज्ञान वापरून पण रशियाने बनवलेली सुखोई, मिग विमानं आपल्या विमानांना टक्कर कशी काय देऊ शकतात? असा सवाल पेंटोगॉन ने एफ १६ च्या निर्मात्यांना केला होता.  

अमेरिकेला एक कळून चुकलं होतं ते म्हणजे ह्या विमानांच सारथ्य करणारं "एक्स फ्याकटर" म्हणजेच भारतीय पायलट. भारतीय वायू दलातील जांबाज, बहादूर आणि कमालीचं ट्रेनिंग असलेल्या पायलटमुळे ६० वर्ष जुनं विमानं ही आपल्याला भारी पडतात. २७ फेब्रुवारी २०१९ च्या थरारात पुन्हा एकदा ते स्पष्ट झालं. विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान चं  ट्रेनिंग आणि खडतर प्रसंगात निर्णय घेण्याची क्षमता त्याच्या जोडीला स्क्वार्डन लीडर मिंटी अग्रवाल ने दिलेला ग्राउंड सपोर्ट, रडार माहिती हे ह्या थरारात भारताची जमेची बाजू ठरले. निर्णय घेणारा जर विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान होता तर त्याला रस्ता दाखवणारी स्क्वार्डन लीडर मिंटी अग्रवाल होती. म्हणून भारताच्या मिग बायसन २१ ने भूतो न भविष्यती कामगिरी करताना पाकिस्तान च्या एफ १६ ला गारद केलं. त्यामुळेच हा थरार जगाच्या इतिहासात एक अभ्यासाचा विषय म्हणून समाविष्ट झाला. काल ह्या दोघानांही भारत सरकारने त्यांच्या अत्युच्य कामगिरीसाठी रक्षा पदक देऊन त्यांचा गौरव केला. प्रत्येक भारतीय नागरिकाने त्यांच्या ह्या बहादूरीला सलाम करायलाच हवा... ह्या दोघांना माझा सलाम आणि कडक सॅल्यूट. 

माहिती स्रोत :- गुगल 

फोटो स्रोत :- गुगल ( पहिल्या फोटोत मिग बायसन २१ आणि एफ १६, दुसऱ्या फोटोत विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान, तिसऱ्या फोटोत स्क्वार्डन लीडर मिंटी अग्रवाल) 

  सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Thursday 15 August 2019

वसुधैव कुटुंबकम... विनीत वर्तक ©

वसुधैव कुटुंबकम... विनीत वर्तक ©


आज भारताने ७३ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या दिमाखात साजरा केला. १५ ऑगस्ट १९४७  भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत हालाखीच्या परिस्थितीत होता. तब्बल १००० वर्ष भारताच्या संस्कृतीने आणि देशाने जगाच्या व्यापारावर वर राज्य केले होते. १००० साली भारत जागतिक व्यापाराचा ३०% हिस्सा आपल्याकडे राखून होता. हळूहळू  वाटचाल तळाच्या दिशेने सुरु झाली आणि  भारतात आल्यावर भारत आपलं अस्तित्व जगाच्या पटलावरून  बसला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश सत्तेची वाताहत सुरु झाली होती. अश्या वेळेस कंगाल बनलेला भारत त्यांच्यासाठी पांढरा हत्ती बनला होता. म्हणून ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देताना त्याचे दोन तुकडे करत हे तुकडे आपसात नेहमी भांडत बसून भारत पुन्हा कधी ह्यातून उभारी घेऊ शकणार नाही अशी व्यवस्था करून ठेवली होती.

१९५० च्या आसपास रसातळाला असलेल्या भारताच्या इकोनॉमी ने हळूहळू उभारी घ्यायला सुरवात केल्यावर ही वाढ अतिशय संथ होतं होती. किंबहुना भारत जागतिक पातळीवर कधी उभारी घेऊ शकतो हे  त्याकाळच्या अर्थशास्त्रींना वाटत होतं. २१ व शतक उजाडताना जागतिक व्यापाराचे संदर्भ अचानक बदलून गेले. चीन आणि भारत ह्या दोन्ही देशांनी एके काळी जागतिक व्यापारावर राज्य केले होते. त्यांचे दिवस पुन्हा बदलले. चीन ह्या काळात प्रचंड मुसंडी मारत अग्रस्थानाकडे वाटचाल सुरु केली तर भारत संथ कासवाप्रमाणे पुढे जात होता. २००३ नंतर मात्र भारतीय अर्थव्यस्थेने जो वेग घेतला त्याने भारत पुन्हा एकदा जागतिक व्यापारात लक्षणीय भागीदार झाला. २०५० च्या आसपास भारत जगातील ३ री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनेल असं भविष्य आजकाल सगळेच अर्थशास्त्री आता व्यक्त करत आहेत.

जगातील मोठ्या अर्थव्यस्थेचा देश म्हणून उदयास येत असताना पण जगासाठी असलेलं आपलं कर्तव्य भारत विसरलेला नाही. भारतासाठी पूर्ण जग हे "वसुधैव कुटुंबकम" राहिलेलं आहे. त्याचाच  भाग म्हणून आज जग भारताकडे एक दानशूर देश म्हणून बघतं आहे. आपल्या शत्रूच्या अडचणीच्या काळात पण भारत खंबीरपणे मागे उभा राहिलेला आहे. जमिनीवरील प्रदेश वादाचा विषय असू शकेल पण त्यात राहणारी माणसं ही आपल्या नागरिकांसारखीच आधी एक माणूस आहेत ह्याचा अनुभव भारताच्या शत्रूंनी घेतलेला आहे. २००५ साली पाकिस्तान ला भूकंपाचा तडाखा बसला. भारताने आपल्या शत्रू देशाला तब्बल २५ मिलियन अमेरिकन डॉलर चं  आर्थिक सहाय्य दिलं. २०१० पाकिस्तना ला पुराचा तडाखा बसला ह्यावेळेस ही भारताने तब्बल २५ मिलियन अमेरिकन डॉलर ची मदत पाकिस्तान ला केली.  २००६ साली चीन ला एका मोठ्या भूकंपाने तडाखा दिला भारताने लगेच ५ मिलियन अमेरिकन डॉलर ची मदत चीन ला दिली. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती मध्ये भारत माणुसकी म्हणून चीन च्या सोबत उभा राहिला. 

२००५ ला भारतीय एअर फोर्स च एक विमान अमेरिकेत २५ टन वजनाच साहाय्य घेऊन उतरलं. कॅटरिना चक्रीवादळात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी भारताने हे साहित्य अमेरिकेला दिलं होतं .आजवर भारताने श्रीलंकेला वेगवेगळ्या आपत्ती मध्ये जवळपास १२० मिलियन डॉलर ची मदत केली आहे. भारताला बाकीच्या देशांकडून नैसर्गिक आपत्ती मध्ये जितकी मदत मिळाली आहे त्यापेक्षा कैक पट जास्ती मदत भारताने जगाला दिली आहे. २००४ ला आलेल्या त्सुनामी मध्ये आपल्या पूर्व तटावर लोकांना मदत करताना पण भारतीय नौदलाने आपली मदत इंडोनेशिया, श्रीलंका सारख्या देशांना देताना १२ बोटी, १००० पेक्षा जास्त सैनिक माणुसकीच्या दृष्टिकोनातून तैनात केले होते. ज्यांनी कित्येक लोकांचे प्राण वाचले आहेत. देश, पंथ, शत्रू, मित्र असा कोणताही भेदभाव ना करता भारत कोणत्याही नैसर्गिक अथवा कृत्रिम आपत्ती च्या वेळी सगळ्यात आधी उभा राहिला आहे.

२०१० येमेन यथे युद्ध सदृश्य परिस्थितीत भारताने एक, दोन नाही तर तब्बल २५ देशांच्या नागरिकांना सुखरूप युद्ध भूमीवरून बाहेर काढलं होतं. ज्या प्रदेशात जायला दुसऱ्या कोणत्याही देशाची विमानं घाबरत होती त्या वेळेस भारताची एअर फोर्स आणि एअर इंडिया भारतीय नेव्ही च्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचवत होतं. ह्या २५ देशात जर्मनी, अमेरिका, फ्रांस सकट पाकिस्तानी नागरिक ही होते. ह्या व्यतिरिक्त भारताने वेगवेगळ्या गरीब देशांना जे की आफ्रिका, लॅटिन अमेरिका, कॅरेबियन येथिल आहेत अश्या देशात त्यांची प्रगती होण्यासाठी अर्थसहाय्य दिलं आहे. जवळपास २७९ लाईन्स ऑफ क्रेडिट देताना ६३ देशांना २८ बिलियन डॉलर ची मदत केली आहे. ह्या पलीकडे जाऊन भारताने गल्फ ऑफ एडन जो की समुद्री चोरांचा भाग आहे अश्या भागातून भारतासह इतर देशांच्या १५०० पेक्षा जास्ती व्यापारी नौकांना जवळपास ३० युद्धनौका तैनात करून सुरक्षित प्रवास करून दिला आहे. भारतीय नौदलाच्या ह्या कामगिरीमुळे जवळपास ३० पेक्षा जास्ती व्यापारी बोट लुटण्याचे प्रयत्न विफल झाले आहेत.

जेव्हा जगात अतिरेकी कारवायांचा बिमोड करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रश्न येतो तेव्हा ही भारत मागे राहिलेला नाही. युनायटेड नेशन च्या पिस किपींग मिशन मध्ये भारतीय सैनिकांची कामगिरी अत्युच्य आहे. आजवर २ लाखापेक्षा जास्त सैनिकांनी ४९ पेक्षा जास्त मिशन मध्ये आपलं रक्त सांडून जागतिक शांतता नांदवण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावलेली आहे. आज इंडियन आर्मी च्या सैनिकांना जगात सगळ्यात जाती मानाचं स्थान त्यांच्या ह्या मिशन मधील बहादुरी सोबत माणुसकीच्या दर्शनासाठी मिळालेलं आहे. दुसऱ्या देशांच्या पकडलेल्या सैनिकांना तसेच इतर लोकांना जिवंत असताना किंवा मृत्युमुखी पडल्यावर ही त्यांच्या शरीराला भारत ज्या पद्धतीने सन्मानीय वागणूक देतो त्याचा आदर्श जगातील इतर देशांनी घ्यावा असं युनायटेड नेशन ने जगातील सगळ्याच देशांना सांगितलेलं आहे. हे सगळं करताना आपलं साम्राज्य विस्तारणाच्या महत्वाकांशा भारताने कधीच दाखवलेल्या नाहीत. भूतान सारखा लहान देश असो वा पाकिस्तान सारखा शत्रू भारताने कधीच त्यांच्या अंतर्गत कारभारावर पकड घेण्याच्या दृष्टीने कोणतीच मदत केलेली नाही. चीन च्या छुप्या अजेंड्या सारखा भारताने मदत करताना कोणताच अजेंडा ठेवलेला नाही. भारताने आपल्या संस्कृती मधील एका वाक्यावर हा प्रवास केला आहे ते म्हणजे "वसुधैव कुटुंबकम"

आज भारत ७३ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आहे. गेल्या सात दशकात भारताने मारलेली मजल मोठी असली, तो पुन्हा एकदा जागतिक महासत्तेच्या दृष्टीने वाटचाल करू लागला तरी भारताने आपलं आचरण जगात आदर्शवत ठेवलेलं आहे. भारताच्या ह्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आहुती दिलेली आहे. त्यांचं स्मरण करताना भारताचं हे आचरण ह्यापुढेही २१ व्या शतकात पुढे नेण्याची जबाबदारी तुमच्या, आमच्या ह्या पिढीची आणि येणाऱ्या पुढल्या पिढीची आहे. कारण देश, खंड, धर्म, जात हे सगळं वेगळं असलं तरी "वसुधैव कुटुंबकम" मानणारा आमचा देश हा एकमेव आहे. ह्या देशात जन्माला आल्याचा अभिमान आज प्रत्येक भारतीयाला असलाच पाहिजे.

जय हिंद.....

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

माहिती स्रोत :- गुगल, विकिपीडिया

फोटो स्रोत :- गुगल



Saturday 10 August 2019

#मंदिरांचं_विज्ञान भाग १७... विनीत वर्तक ©

#मंदिरांचं_विज्ञान भाग १७... विनीत वर्तक ©

मराठीत एक म्हण आहे "खाकेत कळसा आणि गावभर वळसा" अशीच परिस्थिती आज भारतीयांची आहे. दुसऱ्या देशातील गोष्टी बघण्यासाठी आपण हातचे पैसे खर्च करून तिकडे भेट देतो त्याचे फोटो टाकतो. तिथल्या मेलेल्या लोकांसाठी बांधलेल्या गोष्टी पण जागतिक आश्चर्य बनतात. पण आपल्या भारतीय संस्कृती चे दाखले बघायला मात्र कोणाकडे वेळ नसतो किंवा त्या बद्दल आजवर कोणी हा वारसा आपल्या येणाऱ्या पिढीकडे देण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसतं नाही. आपली संस्कृती किती उच्च होती ह्याचा मोठा दाखला म्हणजे भारतीय मंदिरे. पाश्चात संस्कृतीत मेलेल्या लोकांसाठी संस्कृतीचे दाखले देणाऱ्या कलाकृती बनवल्या गेल्या तर भारतात सृष्टीची रचना करणाऱ्यानां अमर केलं गेलं. हे करताना त्याला मानवाला त्या काळी माहित असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यात बसवलं गेलं मग ते स्थापत्यशास्त्र, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, विज्ञान काहीही असो. ह्यांची सरमिसळ करताना पौराणिक गोष्टी, देव, देवता त्यांच्या शक्ती, त्यांची श्रद्धा ह्या सगळ्यांना तसूरभर ही धक्का लागणार नाही ह्याची काळजी घेतली गेली.

ह्या सगळ्या शाखांना एकत्र आणून अश्या अजोड कलाकृती निर्माण करण्यात आल्या की ज्यात ह्या सगळ्या शाखांना योग्य ते महत्व दिलं जाईल त्याच सोबत त्यांचं स्वतःच असं अस्तित्व दिसतं राहील आणि ह्या सगळ्यामध्ये भक्तिभाव, श्रद्धा ह्या भावनांना पण धक्का लागणार नाही. हे सगळं पेलणं तितकं सोप्प नाही. कलाकृती निर्माण केल्यावर ती सगळ्या नैसर्गिक प्रकोपावर मात करत टिकून राहील ह्यासाठी जागेची निवड, बांधण्याची पद्धत, बांधकामाचं साहित्य ह्या सगळ्याचा खोलवर विचार करून मग त्याच निर्माण केलं गेलं आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर कैलास मंदिरासाठी वेरूळ ची निवड करताना इथल्या दगडाचा अभ्यास नक्की केला गेला आहे. मंदिर कळसापासून पायापर्यंत उलट बांधलं आहे. समजा पायाकडच्या दगडात भेग अथवा फॉल्ट निघाला तर अनेक वर्षांची , कारागिरांची मेहनत लयाला जाण्याचा धोका. ह्याचसाठी प्रत्येक छोट्या, मोठ्या गोष्टीचा विचार प्रत्येक कलाकृतीच्या निर्मिती मध्ये केला गेला आहे.

भारतीय संस्कृतीत विज्ञान - तंत्रज्ञान, गणित, स्पेस- टाइम, ग्रह - तारे ह्या सगळ्या गोष्टींना महत्व दिलेलं आहे. प्रत्येक मंदिराच्या निर्मितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्या अभ्यासाचा वापर केला गेला आहे. आपले पुर्वज आधीपासून आकाशाकडे त्यातल्या ग्रह ताऱ्यांकडे आकर्षित झाले होते. इतर कोणत्याही संस्कृती च्या इतिहासात ग्रह ताऱ्यांचा सखोल अभ्यास सुरु होण्याआधी भारतीय संस्कृतीत रात्रीच्या आकाशात लुकलुकणाऱ्या ताऱ्यांची तसेच त्यांच्या वेगवेगळ्या पुंजक्यांची नोंद केली गेली होती. वर्षाच्या पूर्ण कालावधीत कोणते पुंजके दिसतात आणि त्यांच्या एकत्र दिसणाऱ्या आकारावरून त्यांना नावं दिली गेली. चंद्राचं पूर्ण वर्षातील भ्रमण ज्या आकाशाच्या भागातून होते त्या रस्त्यावर जे तारकापुंज येतात त्यांना नक्षत्र आणि राशीत बसवलं गेलं. २७ नक्षत्र आणि १२ राशी मिळून पूर्ण वर्षाचं गणित मांडलं गेलं. १२ राशींना माणसाच्या स्वभावाशी जोडताना प्रत्येक राशीत भूतलावरची निदान भारतीय संस्कृती मधील सगळी लोकं त्यात बसवली गेली. मला राशीभविष्य ह्या मध्ये जायचं नाही. हे सगळं सांगण्याचं कारण इतकचं की ह्या १२ राशींच महत्व सांगणार आणि त्याचा संदर्भ सूर्याच्या भ्रमणाशी जोडून पुढच्या पिढीकडे राशी अभ्यासाचा वारसा सोपवलेलं एक मंदिर भारतात आहे. जवळपास ८०० वर्ष जुनं असलेलं हे मंदिर भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाचा एक अभिजात कलाविष्कार तर आहेच पण त्याचसोबत विज्ञान, तंत्रज्ञानाचा एक वारसा आहे. (विनीत वर्तक ©)

कर्नाटक राज्यात श्रींगेरी इकडे विद्याशंकरा हे मंदिर आहे. १३५७-५८ च्या काळात विजयनगर साम्राज्याच्या वेळेस ह्या मंदिराचं निर्माण केलं गेलं आहे. हे मंदिर होयसळ आणि द्रविडी स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. भारतातील इतर मंदिरा प्रमाणे ह्याच बांधकाम, कलाकुसर ह्यावर लिहायला घेतलं तर शब्द कमी पडतील इतकी सुंदर ह्याची रचना आहे. पण इकडे दोन गोष्टी भारतातील विज्ञान, तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास आजही आपल्याला दाखवतात. पहिलं म्हणजे इकडे असलेली १२ राशी खांबांची रचना. इथल्या पूर्वे कंदील मंडपात १२ खांब असून ह्यातील प्रत्येक खांब हा प्रत्येक राशीला वाहिलेला आहे. प्रत्येक खांबावर त्या त्या राशीला दर्शवणाऱ्या चित्रांची कलाकुसर केलेली आहे. पण ह्यांची रचना अश्या पद्धतीने केली आहे की सूर्य ज्या राशीत असेल त्या राशीच्या खांबावर त्या वेळेला सूर्याची किरणे पडतील. सूर्याच्या एका वर्षातील पूर्ण भ्रमणाचा अभ्यास करून तो कोणत्या राशीत कधी असेल ह्याचं गणित करून तसेच किरणे कश्या पद्धतीने प्रवेश करतील ह्या सगळ्यांची आकडेमोड करत त्याला कलेची, श्रद्धेची साथ देण्यात आली आहे. १२ खांबाच्या मध्ये गोलाकार रेषेत लाईन्स असून त्यावर सूर्याची सावली कशी पडेल हे दर्शवण्यात आलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मंडपाच्या बाहेर असणारी आणि आजही दिसणारी दगडी चेन. ह्या चेन मध्ये अनेक लूप एकमेकात अडकवले असून ही चेन जणू काही छताच्या दगडाला वेल्डिंग करून चिकटवलेली आहे. दगडाच वेल्डिंग होऊ शकते ह्यावर आपण आज विश्वास ठेवू शकणार नाही. पण त्याकाळी रॉक मेल्टिंग टेक्नोलॉजी सारखं तंत्रज्ञान अस्तित्वात असल्याशिवाय ह्या दगडी चेन ची निर्मिती अशक्य आहे. (विनीत वर्तक ©)

परकीय आक्रमणात ह्या दगडी चेन नष्ट केल्या गेल्या पण त्या बनवण्याचं तसेच त्यांना मुळ बांधकामाशी जोडण्याचं तंत्रज्ञान मात्र परकीय चोरून नेऊ शकले नाहीत. काळाच्या ओघात रॉक मेल्टिंग टेक्नॉलॉजी नष्ट झाली असली तरी ही दगडी चेन भारतीय संस्कृतीच्या तंत्रज्ञानातील प्रगती मधील एक मैलाचा दगड आहे. ताजमहाल च्या सौंदर्यामध्ये कला असेल तर ह्या दगडी चेन असलेल्या मंदिरात कलेचा आत्मा आहे कारण ते बनवताना किती बारीक,सारीक गोष्टींचा विचार केला गेला असेल हे कळण्यासाठी कशी बनवली गेली असेल ह्याचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने करावा. १२ राशी स्तंभ असो वा दगडी चेन ह्यातील प्रत्येक गोष्ट ही अवर्णनीय अशी आहे. ज्याचा आस्वाद आपण तिकडे जाऊनच घेऊ शकतो. दुसऱ्या संस्कृतीत जागतिक आश्चर्य शोधून त्याचा अभ्यास नक्की करावा त्यांना नक्की भेट द्यावी पण त्याच सोबत आपल्या घरात असलेल्या मंदिराच्या विज्ञानाला ही समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

माहिती स्रोत :- गुगल
फोटो स्रोत :- गुगल.