Monday 31 January 2022

लिजेंड... विनीत वर्तक ©

 लिजेंड... विनीत वर्तक ©


Not every legend is a myth, some are flesh and blood. Some legends walk among us, but they aren't born, they're built.


- Arnold Schwarzenegger


काल याच वाक्याचा प्रत्यय आला. जो कोणी टेनिस प्रेमी आहे त्याच्या प्रत्येकाची भावना हीच असेल. कारण काल झालेला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचा अंतिम सामना असाच होता. स्पर्धेच्या मध्यापर्यंत डॅनियल मेदवेदेव हा रशियन खेळाडू २-६,६-७ आणि तिसऱ्या निर्णायक सेट मधे २-३ अश्या गेम सह चौथ्या गेम मधे ३ सर्विस ब्रेक पॉईंट सह आघाडीवर होता. त्याच्या समोर होता राफेल नादाल हा स्पॅनिश खेळाडू. 


राफेल वय वर्ष ३५ आणि दुखापतींनी ग्रस्त आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणारा तर डॅनियल वय वर्ष २५ आणि आपल्या करिअरच्या सर्वात उंच टप्यावर असणारा खेळाडू पण अश्या परिस्थिती मधे सुद्धा राफेल ने आपल्या अप्रतिम खेळाने ऑस्ट्रेलियन स्पर्धा २-६,६-७, ६-४,६-४,७-५ अशी जिंकत एक इतिहास रचला. 


खेळाच्या एका टप्यावर कोणीच नादाल जिंकेल असा विचार पण करू शकत नव्हता पण म्हणतात न, 


Legends are not born – they are created... Ricky Pierce. 

  

अश्याच एका लिजेंड चा खेळ काल जगातील तमाम टेनिस शौकिनांनी अनुभवला. अक्षरशः रोमांच उभे करणाऱ्या या सामन्यासाठी नादाल ला माझा सलाम. 


फोटो शोध सौजन्य :- गुगल 


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Sunday 30 January 2022

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १८ )... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १८ )... विनीत वर्तक ©

सध्या जगाच्या नकाशावर युद्धाच वादळ घोंघावू लागलेलं आहे. पुन्हा एकदा जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जाते आहे की  काय अशी भीती जगातल्या अनेक तज्ञांना वाटत आहे. या वाऱ्याची झळ अजून भारतापर्यंत पोहचली नसली तरी भारत जागतिक मंचावर अतिशय धोकादायक स्थितीतून प्रवास करत आहे. नक्की हे वादळ काय आहे? त्याची कारणं? नक्की पुढे काय होणार? जागतिक राजकारणावर आणि एकूणच भारतीयांवर या गोष्टींचा कसा प्रभाव पडणार आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण संपूर्ण जगाच्या आर्थिक स्थितीची उलथापालथ करण्याची क्षमता या वादळाची असणार आहे. एक काळ असा होता जेव्हा अमेरिका आणि रशिया एकमेकांसोबत कोल्ड वॉर मधे अडकले होते. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात अनेकांना त्याची झळ सोसावी लागली होती. १९९१ मधे सोव्हियत युनियन च्या विघटनानंतर १५ देश हे रशियापासून वेगळे झाले आणि आताच्या रशियाची निर्मिती झाली. सोव्हियत युनियन च्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली युरोपियन देशांनी १९४९ North Atlantic Treaty Organization (NATO) ची स्थापना केली. नाटो च्या फौजा एकत्र येऊन सोव्हियत युनियन च्या विरुद्ध कोल्ड वॉर च्या काळात शड्डू ठोकून उभ्या राहिल्या होत्या. 

१९९१ नंतर रशियाच्या विघटनानंतर जे १५ देश रशियाकडून वेगळे झाले त्यांना जवळ करण्यासाठी अमेरिकेने नाटो च्या नावाने आपलं जाळ फेकायला सुरवात केली. हे सर्व देश रशियाचा आधी भाग होते त्यामुळे त्यांची सीमा आजही रशियाशी जुळते. जर आपण या देशांना जवळ केलं म्हणजेच नाटो चा सदस्य केलं तर आपण रशियाच्या अगदी सीमेलागत आपलं सैन्य, सैनिकी तंत्रज्ञान पाठवू शकतो हे अमेरिकेला चांगल माहित होतं. अमेरिकेने आणि पर्यायाने नाटो ने याच देशांना नाटो च सदस्य बनवलं. पुन्हा एकदा अमेरिका आणि रशिया मधे संघर्षाची ठिणगी पडली. नाटो चा रशियाच्या क्षेत्रात वाढता प्रभाव कुठेतरी रशियाला अस्वस्थ करत होता. त्यातच अमेरिकेने युक्रेनकडे आपली नजर वळवली. युक्रेन आणि रशिया यांचे खूप जुने घनिष्ठ संबंध आहेत. त्याचा इतिहास कित्येक शतका आधीचा आहे. युक्रेन च्या संस्कृतीवर रशियाचा प्रभाव खूप आहे. युक्रेन क्षेत्रफळाच्या मानाने युरोपात रशियाच्या खालोखाल आहे. युक्रेनची २२९५ किलोमीटर इतकी प्रचंड लांब सीमा रशियासोबत जोडलेली आहे. आज जरी युक्रेन रशियाचा भाग नसला तरी युक्रेन मधील अनेक लोकांना रशियाचा भाग होण्याची आजही इच्छा आहे. त्यामुळेच पूर्वेकडील युक्रेन च्या भागात आज बंडखोर लोकांच वर्चस्व आहे. हे बंडखोर लोकं युक्रेन सरकार विरुद्ध रशियात जाण्यासाठी आजही युद्ध आणि उठाव करत आहेत. 

युक्रेन जर नाटो चा सदस्य झाला तर रशियाच्या अगदी खोलवर नाटो आणि पर्यायाने अमेरिकेला शिरता येणार आहे. हेच रशियाला नको आहे. कारण युक्रेन जर नाटो च्या अमिषाला बळी पडला तर अमेरिके सारख्या शत्रू राष्ट्राला आपलं शेजारी करणं हे रशियाला परवडणारं नाही. अमेरिका आणि युरोपियन संघाच्या आर्थिक बंधनामुळे रशियाची अर्थव्यवस्था सध्या गडबडली आहे. रशियाच्या चलनाचे मूल्य जवळपास ५०% नी कमी झालं आहे. एकीकडे आर्थिक विवंचनेत सापडलेला रशिया युक्रेन नाटो च्या जवळ जाण्याने पेटून उठला आहे. रशियाने अमेरिकेच्या आणि नाटो च्या पावलांना वेळीच ओळखून युक्रेन च्या सरहद्दीवर जवळपास १ लाख सैन्याची जमवाजमव केली आहे. त्याच सोबत एस ४००, रणगाडे, मिसाईल, लढाऊ विमाने तैनात केली आहेत. युक्रेन च्या काही राजकीय नेत्यांनी रशियाच्या या पावलांना युक्रेन वर रशिया हल्ला करणार आणि पुन्हा एकदा रशियात समाविष्ट करणार असं म्हणून जगाकडे मदतीची याचना केली. रशियाच्या मानाने युक्रेनकडे असलेली सैन्य क्षमता खूप कमी आहे. मिसाईल, लढाऊ विमान, रणगाडे या सर्व बाबतीत युक्रेन रशियाची बरोबरी करू शकत नाही. 

युक्रेन ने रशियाच्या विरुद्ध आपली फौज उभारण्यासाठी नाटो कडून मदत मागितली. युक्रेनला रशियन फौजांना रोखण्यासाठी अमेरिकेकडून स्ट्रिंगर, टॉमहॉक सारखी मिसाईल हवी आहेत. नाटो आणि अमेरिकेने युक्रेनला रशियाच्या विरुद्ध शस्त्रास्त्रे द्यायला सुरवात केली आणि जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा युद्धाचं वादळ घोंघावू लागलं आहे. रशियाने एकीकडे आपलं सैन्य तयार ठेवलं आहे तर दुसरीकडे युक्रेन ने कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे. २०१४ पासून अनेक युक्रेन च्या नागरिकांनी आपले प्राण या अशांततेत गमावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा असा नरसंहार होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अमेरिकेला या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा नाही. अमेरिकन सैनिकांना पुन्हा एकदा वेठीस धरण्याची मानसिकता अमेरिकन नागरिकांची नाही. त्यामुळेच बायडेन प्रशासनाला अमेरिकन सैन्य युक्रेन मधे उतरवायचं नाही. पण त्याचवेळी नाटो च्या माध्यमातून रशियावर वचक ही ठेवायचा आहे. त्यामुळे अमेरिका नाटो च्या आडून युक्रेन ला मदत करत आहे. फेब्रुवारीत रशिया युक्रेनवर हल्ला करेल असा अंदाज आहे. यामागे ही कारणे आहेत. रशिया युरोप ला मोठ्या प्रमाणावर नॅचरल गॅस चा पुरवठा करते. आता थंडीची सुरवात झाली की रशियाकडून जर हा नॅचरल गॅस चा पुरवठा थांबला तर युरोपला ऊर्जेची गरज भागवणे कठीण जाणार. तसं होऊ नये म्हणून रशियाच्या युक्रेन वरच्या हल्याला युरोपियन राष्ट्र जास्ती विरोध करणार नाहीत हे रशियाला चांगलं माहित आहे. 

अमेरिकेसाठी सुद्धा रशियापेक्षा आज चीन च संकट अमेरिकेपुढे जास्त आहे. रशियाच्या मागे आपली आर्थिक, सैनिकी शक्ती वाया घालवणं अमेरिकेला परवडणारं नाही. त्यामुळे अमेरिका फक्त आग लावून बाजूला होणार हे उघड आहे. इकडे चीन ने रशियाच्या बाजूने पवित्रा घेतला आहे. तर या सगळ्यात अडचणीत सापडलेला आहे तो भारत. भारताचे राजनैतिक आणि सैनिकी असे दोन्ही संबंध अमेरिका आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांशी अतिशय जवळचे आहेत. त्यामुळे कोणत्याही बाजूला भारत झुकला तर त्याचे विपरीत परिणाम हे होणार आहेत. रशिया आणि भारताची मैत्री सर्वश्रुत आहे. त्याचवेळी भारतासाठी अमेरिका खूप महत्वाची आहे. त्यामुळेच भारताची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे. भारताने तूर्तास कोणतंही भाष्य यावर करण्याचं टाळलं आहे. रशियाने जर युक्रेनवर सैनिकी कारवाई केली तर हे युद्ध दोन्ही देशांना खूप महागात पडेल. रशियाची आर्थिक स्थिती आणखीन खालावेल. युरोपियन देशांसोबत असलेले आर्थिक आणि इतर संबंधांवर अंकुश लागेल. युरोपियन राष्ट्र आणि नाटो ला ही त्याची झळ पोहचेल. एकूणच जगाची आर्थिक स्थिती अजून खालावेल. याचे चटके जगासह भारताला ही बसतील. ज्याप्रमाणे इराण ला वाळीत टाकण्यासाठी भारताची कोंडी अमेरिकेने केली. तशी कोंडी अमेरिका भविष्यात रशियावर दबाव टाकण्यासाठी भारताची करू शकते. 

काही लोकं भारताने अमेरिकेचा विचार करू नये रशियासोबत जावं असं म्हणतील. पण ते तितकं सोप्प नाही. भारतासाठी आज दोन्ही देश तितकेच महत्वाचे आहेत. कोल्ड वॉर सोबत रशियावर अवलंबून असलेला भारत आता जागतिक स्पर्धेत सर्व देशांशी संबंध सांभाळून आहे. त्यामुळे कोण्या एका देशाची मक्तेदारी अथवा मैत्री ही भारताची आजची गरज नाही. अमेरिकेचं नको तिकडे नाक खुपसणं हे सगळ्या जागतिक त्रासाचं मूळ आहे. जर अमेरिकेने नाटो च्या माध्यमातून युक्रेन मधे इतकी घुसखोरी केली नसती तर रशियाला आज सैनिकी कारवाईचा विचार करावा लागला नसता. एकेकाळी आपला असलेला आपला शेजारी देश  आपल्याच शत्रूला राहायला जागा देतो हे शांतपणे बघणं रशियाला नक्कीच आवडणारं आणि परवडणारं नाही. पण त्याचवेळी या सगळ्यातून निष्पन्न काही झालं तरी अमेरिकेला त्याचा काही त्रास होणार नाही पण युरोपियन देश मात्र  होरपळून निघतील. यात चीन चा पुन्हा एकदा फायदा होईल आणि भारतासाठी तारेवरची कसरत. 

हे घोंघावणारं वादळ सध्या तरी शांत वाटते आहे. पण ही शांतता त्याच्या येण्यापूर्वीची आहे की ते शांत झाल्याची वर्दी आहे हे वाहणारे वारे ठरवतील. तूर्तास या वाऱ्यांची दिशा लवकर ओळखून होणाऱ्या परिणामांसाठी आपण तयार रहाणं हेच आपल्या हातात आहे.   

फोटो शोध सौजन्य :-  गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Wednesday 26 January 2022

एक पत्र... विनीत वर्तक ©

 एक पत्र... विनीत वर्तक ©

काल २६ जानेवारी २०२२ रोजी भारताच्या पंतप्रधानांनी भारताशी कोणत्यातरी कारणाने जोडलं असलेल्या दिग्गज लोकांना व्यक्तिगत पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत. याच सोबत भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य वर्षाच्या निमित्ताने भारताच्या पुढच्या वाटचालीत एकत्र येण्यासाठी साद घातलेली आहे. यातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात खूप उंचीवर आहे. त्यांच्या कर्तृत्वाची दखल नुसती भारताने नाही तर जगाने घेतलेली आहे. 

अश्या सर्व दिग्गज व्यक्तींना भारताच्या प्रजासत्ताक दिवशी व्यक्तिगत पत्र पाठवून भारताच्या पंतप्रधानांनी एक वेगळाच पायंडा पाडला आहे. ट्विटर आणि इतर सोशल मिडियावर यातील प्रत्येकांनी या पावलाच प्रचंड कौतुक केलं आहे. इकडे एक लक्षात ठेवलं पाहिजे की या लोकांना फॉलो करणारे लोकं हे जगातील कानाकोपर्यातील आहेत. या अश्या छोट्या कृतीतून भारताची छबी एकप्रकारे संपूर्ण जगात उंचवली आहे. यातील काही लोकांचा परिचय खाली संक्षिप्त रूपात देतो आहे.  

जोंटी रोड्स:- जोनाथन नील "जोंटी" रोड्स हा दक्षिण आफ्रिकेचा व्यावसायिक क्रिकेट समालोचक आणि माजी कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. १९९२ ते २००३ दरम्यान तो दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाकडून खेळलेला आहे. जगातील सर्वोत्तम फिल्डर म्हणून आजही ओळखला जातो. 

अमृता नारळीकर :- अमृता नारळीकर या जर्मन इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल अँड एरिया स्टडीजच्या अध्यक्षा आणि जर्मनीच्या हॅम्बर्ग विद्यापीठातील आर्थिक आणि सामाजिक विज्ञान विद्याशाखेतील आंतरराष्ट्रीय संबंधांच्या प्राध्यापक आहेत.

विवेक वाधवा :-  विवेक वाधवा हे अमेरिकन तंत्रज्ञान उद्योजक आहेत. ते सिलिकॉन व्हॅली येथील कार्नेगी मेलॉन स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्रतिष्ठित फेलो आणि सहायक प्राध्यापक आहेत आणि हार्वर्ड लॉ स्कूलमधील लेबर आणि वर्कलाइफ प्रोग्राममध्ये डिस्टिंग्विश्ड फेलो आहेत.

क्रिस्टोफर गेल :- क्रिस्टोफर हेन्री गेल, ओडी हा जमैकाचा माजी क्रिकेटपटू आहे ज्याने १९९८ ते २०२१ या कालावधीत वेस्ट इंडिजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. एक विध्वंसक फलंदाज, म्हणून गेलला ट्वेंटी-२० क्रिकेट खेळलेल्या महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जाते.

अनुराधा दोड्डाबल्लापूर :- अनुराधा दोड्डाबल्लापूर ही एक जर्मन-भारतीय हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी शास्त्रज्ञ आणि क्रिकेटपटू आहे.  जी सध्या जर्मनीच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची कर्णधार म्हणूनही काम करते. ती सध्या बॅड नौहेममधील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर हार्ट अँड लंग रिसर्चमध्ये पोस्ट डॉक्टरल संशोधन शास्त्रज्ञ आहे.

जेकब जांडा :- जेकब जांडा हे झेक राजकारणी आणि माजी स्की जम्पर आहेत. स्की जंपिंगमध्ये त्यांनी १९९६ ते २०१७ पर्यंत स्पर्धेत भाग घेतला होता, २००५/०६ विश्वचषक आणि २००५/०६ फोर हिल्स टूर्नामेंट तसेच २००५ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य आणि कांस्य पदके जिंकलेली आहेत. 

ऍशले रिंड्सबर्ग:- ऍशले रिंड्सबर्ग हा एक अमेरिकन कादंबरीकार, मीडिया समालोचक, निबंधकार आणि इस्रायलमधील पत्रकार आहे. रिंड्सबर्गचे सर्वात अलीकडील पुस्तक, द ग्रे लेडी विंक्ड, हे न्यूयॉर्क टाइम्सचे अन्वेषण आहे. रिंड्सबर्गचे पहिले पुस्तक म्हणजे तेल अवीव स्टोरीज नावाचा लघुकथांचा संग्रह आहे.

गाड साद:- गाड साद हे कॉनकॉर्डिया युनिव्हर्सिटीच्या जॉन मोल्सन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये लेबनीजमध्ये जन्मलेले कॅनेडियन प्रोफेसर आहेत जे मार्केटिंग आणि ग्राहक वर्तन समजून घेण्यासाठी 'उत्क्रांतीवादी मानसशास्त्र' चा वापर करण्यासाठी ओळखले जातात.

माचेल मॉन्टेनो:- माचेल मॉन्टेनो एक त्रिनिदादियन सोका गायक, अभिनेता, रेकॉर्ड निर्माता आणि गीतकार आहेत. त्यांना उच्च उर्जा, वेगवान आणि अनेकदा स्टेजवरील अप्रत्याशित कामगिरीसाठी ओळखलं जाते. ते जगातील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत.

अनुराग मैरल:- अनुराग मैरल हे स्टॅनफोर्ड येथे सल्लागार सहयोगी प्राध्यापक आहेत त्याशिवाय ऑर्बीज मेडिकलमध्ये कार्यकारी उपाध्यक्ष आहेत. जानेवारी २०१३ ते फेब्रुवारी २०१५ दरम्यान ते PATH येथील टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रोग्रामचे जागतिक कार्यक्रमाचे नेते होते. त्यांनी पीएच.डी. बोल्डर येथील कोलोरॅडो विद्यापीठातून  रासायनिक अभियांत्रिकी विषयात आणि बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजीमधून रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि रायपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

क्रिझिस्टोफ इवानेक:- क्रिझिस्टोफ इवानेक, पीएचडी. इंडोलॉजिस्ट आणि इतिहासकार, वॉर्सा येथील वॉर अकादमीच्या सिक्युरिटी रिसर्च सेंटरमधील एशिया रिसर्च सेंटरचे प्रमुख, पोलंड आणि परदेशात प्रकाशित झालेल्या भारताच्या परराष्ट्र आणि देशांतर्गत धोरणावरील असंख्य प्रकाशनांचे लेखक. 

केन झुकरमन:- केन झुकरमन हे आज सादर करणाऱ्या उत्कृष्ट सरोद कलाकारांपैकी एक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. त्यांनी भारतातील दिग्गज सरोदवादक, उस्ताद अली अकबर खान यांच्या कठोर शिस्तीत तीस वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि युरोप, भारत आणि युनायटेड स्टेट्समधील असंख्य मैफिलींमध्ये उस्ताद खान यांच्यासोबत सादरीकरण केले आहे.

मॅक्स अब्राम्स:- मॅक्स अब्राम्स नॅशविले, अमेरिका. टीएन आधारित सॅक्सोफोनिस्ट आणि रेकॉर्डिंग कलाकार आहेत. त्यांना संपूर्ण यूएस, कॅनडा आणि युरोपच्या भागात ऐकलं जाते. स्वतःच्या ६ एकट्या अल्बम व्यतिरिक्त, मॅक्सने द मॅवेरिक्स, बेन रेक्टर, ग्रेग ऑलमन, ख्रिस स्टॅपलटन, लिओनेल रिची, ल्यूक ब्रायन, वाइडस्प्रेड पॅनिक, लिटल बिग टाउन, क्लिफ रिचर्ड्स अश्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलेले आहे. 

ही काही उदाहरणं आहेत. अश्या अजून कित्येक दिग्गज लोकांना कालच्या दिवशी भारताच्या पंतप्रधानांच व्यक्तिगत पत्र गेलेलं आहे. नक्कीच अश्या पावलांमुळे भारताची एक वेगळी प्रतिमा जगात निर्माण होते आहे. या बद्दल माझ्या मनात शंका नाही. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :-  ट्विटर 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.







Sunday 23 January 2022

Our Beloved Summer... विनीत वर्तक ©

 Our Beloved Summer... विनीत वर्तक ©

नात्यांची परीभाषा अनेकदा शब्दात व्यक्त करता येत नाही. ते कधी सुरु होते, कधी आपल्या मनाचा ठाव घेते, कधी हसवते, कधी रडवते, कधी विचार करायला भाग पाडते तर कधी विचार न करताच निर्णय घ्यायला लावते. असं सगळं असताना पण आपल्याला ते नात हवं असते. कधी भांडलो असू, कधी हसलो असू, कधी मत्सर वाटला असेल, कधी राग आला असेल आणि कधी प्रेम जाणवलं असेल. काहीही असलं तरी ते क्षण आपलेच असतात. आयुष्याच्या प्रवासात अनेकदा अश्या नात्यांचे रंग उडणाऱ्या फुलपाखरा प्रमाणे हातावर रंग सोडून दूर निघून जातात. कधी आपण बाजूला होतो तर कधी परिस्थिती तशी असते. काहीही असलं तरी ते आपलं असते म्हणून ते क्षण त्या दोघांच्या आयुष्यात नेहमीच जोडलेले राहतात. जेव्हा पुन्हा एकदा लांब गेलेलं ते फुलपाखरू आपल्या आयुष्याच्या एका अपरिचित वळणावर समोर येत तेव्हा आपल्याला जाणवत की बाहेरून किती द्वेष केला, कितीही राग आला तरी आतून कुठेतरी एक कोपरा आजही फक्त त्या व्यक्तीसाठीच राखीव असतो. 

अलगद, हळुवार मनाच्या आठवणींच्या कोपऱ्यात कोरलेले ते क्षण जेव्हा पुन्हा समोर येतात तेव्हा आपली अवस्था आपल्यालाच कळत नाही. कुठेतरी नको पण कुठेतरी हवं वाटणार सगळच आपल्याला गोंधळात टाकतं. अनुभवलेले ते रंग पुन्हा सजीव होतात, काही खपल्या पुन्हा ओल्या होतात तर काही क्षण पुन्हा सजीव होतात. या सगळ्यात आपण काय करावं हेच सुचत नाही. हे सगळं पुन्हा एकदा का? कशाला? कुठे घेऊन जाणार? असे प्रश्न मनाचा नकळत ठाव घेतात. पण कसं असते ना आपण दाखवलं नाही तरी ती व्यक्ती आपल्याशी कुठेतरी जोडलेली असते. भले आपण पुन्हा सोबत जाऊ किंवा लांब जाऊ पण अनुभवलेले ते क्षण मात्र त्या दोन व्यक्तींचेच असतात. आयुष्यात नात्यांची होणारी ही घालमेल सध्या एका सिरीज मधून अतिशय सुंदर, तरल पद्धतीने समोर आलेली आहे. अतिशय सुंदर कथा, पटकथा, त्या कथेचा फ्लशबॅक ते वर्तमानात होणारा प्रवास, खूप खूप सुंदर अभिनय, शब्दांची उंची, सुंदर संगीत, अतिशय सुंदर असा  बॅकग्राउंड साउंड, सुंदर सिनॉमेटोग्राफी आणि संवादाशिवाय मनात असणारा गुंता समोर ठेवण्याचं कसब या सगळ्या पातळ्यांवर अगदी सर्वोत्तम बसेल अशी ही सिरीज म्हणजेच 'Our Beloved Summer'. 

आयुष्यात प्रत्येकजण या अनुभवातून गेलेला असेल. तारुण्याच्या त्या उंबरठ्यावर प्रत्येकाने 'क्रश' हे अनुभवलेलं असतेच. ज्यावर ते असते त्याला आपण कधी सांगून मोकळे होतो तर कधी ते शेवटपर्यंत अव्यक्त रहाते. कधी त्याच्या प्रवासाला सुरवात होते, तरी कधी ते शेवटपर्यंत आपल्याच सोबत असते. पण अनेकदा आयुष्याच्या प्रवासात ते धागे अर्धवट तुटतात. चूक का बरोबर असा निर्णय त्यात घेता येत नाही. कधी काही गोष्टी आपण ठरवलं तरी सांगूच शकत नाहीत. तर कधी परिस्थिती अशी असते की आपण फक्त त्याच्यासोबत पुढे जात रहातो. शेवट काहीही असो पण जगलेले, अनुभवलेले, उमललेले ते क्षण प्रत्येकाच्या मनात शेवटपर्यंत कोरलेले राहतात. ही सिरीज बघताना आपण अगदी सहज आपसूक त्याच्या सोबत पुन्हा एकदा जोडले जातो. इतक्या सुंदर पद्धतीने त्या क्षणांशी जोडताना आपल्यालाच आपल्या हातून निसटून गेलेल्या काही गोष्टी गवसतात. कधी आपल्या चुकांची जाणीव होते तर कधी समोरच्याच्या परिस्थितीची जाणीव होते. ते क्षण आपण आपसूक पुन्हा एकदा जगतो. इतक्या सहजतेने ही सिरीज आपल्याला आपल्याशी जोडते. 

 'Our Beloved Summer' सारख्या नितांत सुंदर मालिका आपल्याकडे का निर्माण होत नाही हे कोड मला अजूनही उलगडलेलं नाही. प्रेमासारखी तरल भावना त्याच तरलतेने समोर आणली तर ती जास्ती खोलवर रुजते. बटबटीतपणा, ओंगळवाण प्रदर्शन, नात्यांच उदात्तीकरण, संस्कृती चे बुरखे याचा सतत तोच तोच भडीमार करणाऱ्या मालिका बघितल्या तर समाज म्हणून आपण कुठे मागे पडतो आहोत याचा अंदाज येतो. या बाबतीत साऊथ कोरियन संस्कृती खूप वरती आहे या बद्दल माझ्या मनात शंका नाही. नात्यांचे पदर हे हळूच उलगडायचे असतात. त्यातले धागे उसवले तरी ते शिवता येतात. अगदी नाहीच शिवले तरी बाकीचे जपता येतात. दहा वेळा प्रेम आहे हे सांगून प्रेम मोठं होत नाही. तर ते न सांगताही मोठं करता येतं. स्पर्शाची अनुभुती फक्त सेक्स मधून जाणवून द्यायची नसते तर अलगद गुंफलेली बोटं सुद्धा अनेकदा त्या पलीकडे घेऊन जातात. 

'Our Beloved Summer' बघताना मी जे अनुभवलं त्यातलं थोडं इकडे लिहिलं आहे. ही सिरीज कॉमेडी प्रकारात मोडते पण प्रत्यक्षात खूप अंतर्मुख करून जाते. असं मी तरी अनुभवलं. एखादी व्यक्ती अशी का असते? याची उत्तर आपल्याला अनेकदा मिळत नाहीत. पण ते जाणून घेण्यासाठी आपण त्या पद्धतीने विचाराचं करत नाहीत हे या सिरीज मधून जाणवलं. आपण गोष्टी बघतो, ऐकतो, समजतो त्या पलीकडे एक वेगळी बाजू असते जी जाणून घेतली तर कदाचित ते आपले क्षण अजून नक्कीच सुंदर झाले असते किंवा होतील याची जाणीव मला झाली. 

पुन्हा एकदा Our Beloved Summer ही एक अतिशय सुंदर सिरीज ज्यांना खरच आपल्या प्रेमाच्या पदरांना पुन्हा एकदा हळुवार स्पर्श करायचा आहे त्यांनी नक्कीच बघा. नेटफ्लिक्स वर ही सिरीज उपलब्ध आहे. प्रेक्षकांच्या मतानुसार तिला ४.९ स्टार मानांकन आहे. ( ५ पैकी) तर आय.एम.डी.बी. नुसार ८.८ मानांकन असलेली ही सिरीज चुकवू नये अशीच आहे. 

फोटो शोध सौजन्य :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Friday 21 January 2022

ब्राह्मोस ई.आर. एक पाऊल पुढे... विनीत वर्तक ©

 ब्राह्मोस ई.आर. एक पाऊल पुढे... विनीत वर्तक ©

दोन दिवसांपूर्वी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने ब्राह्मोस ई. आर. या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्ती ची यशस्वी चाचणी केली. मुळात ई. आर. काय प्रकार आहे? या चाचणीने काय साधलं हे जाणून घेणं महत्वाचं आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे मुळात सुपरसॉनिक क्षेपणास्त्र म्हणून भारत आणि रशियाने संयुक्तिकरित्या विकसित केलं. जेव्हा ब्राह्मोस च्या चाचण्या झाल्या तेव्हा अश्या पद्धतीच्या तंत्रज्ञानात भारताने कमालीचं वर्चस्व मिळवलं. सुपरसॉनिक क्षेपणास्त्रात सगळ्यात महत्वाची असते ती अचूकता. ब्राह्मोस च्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याची अचूकता आहे १ मीटर. याचा अर्थ काय तर ब्राह्मोस ३०० किलोमीटर लक्ष्य हे १ मीटर च्या व्यासात अचूकतेने भेदू शकते. ब्राह्मोस चा स्वनातीत वेग आणि त्याची अचूकता त्याला जगातील सगळ्यात भयंकर असं क्षेपणास्त्र बनवतात. 

२०१६ मधे जेव्हा भारत एम.टी.सी.आर. चा सदस्य झाला तेव्हा ३०० किलोमीटर अंतराची मर्यादा मोडीत निघाली. ब्राह्मोस ची क्षमता वाढवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला. पण इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळात क्रूझ क्षेपणास्त्र ही महत्वाची असतात ती अचूकतेसाठी. त्यामुळेच ते जी अंतर कापतात ती लहान असतात. कारण आपण जसजशी अंतराची मर्यादा वाढवत नेऊ तसतशी त्यांची अचूकता कमी होते जाते. जरी तुमचं क्षेपणास्त्र खूप लांब गेलं तरी अचूकतेने लक्ष्याचा खात्मा करेल याची शाश्वती देता येत नाही. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) पुढे हेच आव्हान होतं. जर ब्राह्मोस ची क्षमता वाढवायची तर त्याची अचूकता वाढवण्यासाठी लागणार तंत्रज्ञान पण विकसित करावं लागणार होतं. 

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करताना संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने ब्राह्मोस च्या नेव्हिगेशन प्रणालीत आमूलाग्र बदल केले. ब्राह्मोस जी. पी. एस., ग्लोनास आणि नाविक अश्या तिन्ही उपग्रह प्रणालींचा वापर करते. त्यातून आपलं लक्ष्य अचूकतेने भेदते. याच प्रणालीचा विकास भारताच्या संशोधक आणि वैज्ञानिक यांनी यशस्वीरीत्या केल्यावर ब्राह्मोस च्या मर्यादेत आता वाढ करण्यात आली आहे. याआधीच ब्राह्मोस ने ४५० किलोमीटर चा टप्पा पार केला होता. परवा झालेल्या चाचणीत ब्राह्मोस ने तब्बल ७००- ८०० किलोमीटर चा टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. हा टप्पा पार करणं म्हणजे फक्त तितकं अंतर त्याने कापणं नव्हे. तर त्या अंतरावर असलेल्या लक्ष्याचा अचूकतेने वेध घेणं हे तितकं महत्वाचं आहे. त्यात ब्राह्मोस ई.आर. म्हणजेच ब्राह्मोस एक्क्सटेंडेड रेंज यशस्वी ठरलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) झपाट्याने ब्राह्मोस ला विकसित करत आहे. ब्राह्मोस ई. आर. हे तब्बल १५०० किलोमीटर पर्यंत अचूकतेने लक्ष्य भेदण्यासाठी त्याच्या तंत्रज्ञानात बदल केले जात आहेत. त्याचाच एक भाग परवाची चाचणी होती. ज्यात ८०० किलोमीटर चा टप्पा पार केला गेला. पुढला टप्पा कदाचित १००० किलोमीटर, त्यानंतर १२०० किलोमीटर आणि त्यानंतर १५०० किलोमीटर चा असेल. 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ब्राह्मोस ला आता अग्नी सिरीज प्रमाणे विकसित करत आहे. ३०० किलोमीटर पासून १५०० किलोमीटर पर्यंत कोणत्याही टप्यात लक्ष्य भेदणारं सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल असणारा भारत एकमेव देश असेल. त्यात ब्राह्मोस ची अचूकता आणि वेग याची तुलना जर अशीच राहिली तर ब्राह्मोस ला १५०० किलोमीटर पर्यंत रोखणं जगातल्या कोणत्याही मिसाईल डिफेन्स सिस्टीम ला शक्य होणार नाही. त्यात एकाचवेळी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) 'ब्राह्मोस के' च निर्माण करत आहे. जे की ध्वनी च्या ७-८ पट (९६०० किलोमीटर / तास ) वेगाने जाऊ शकणार आहे. त्याचा ही मारक क्षमता १००० किलोमीटर ची असणार आहे. ज्याप्रमाणे भारताने टप्या टप्याने अग्नी ला विकसित करत त्याची क्षमता आज ८००० किलोमीटर पर्यंत नेली आहे. ब्राह्मोस जर अश्या पद्धतीने येत्या काही वर्षात विकसित झालं तर पाकिस्तान आणि चीन सोबत भारतावर वाईट नजर ठेवणाऱ्या सर्वांवर वचक बसेल. 

तूर्तास परवाच्या ब्राह्मोस ई. आर. चाचणीच्या यशासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), वैज्ञानिक, अभियंते, कामगार, ब्राह्मोस एरोस्पेस आणि इतर सर्व संलग्न उद्योगांच अभिनंदन 

 जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Thursday 20 January 2022

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १७ )... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १७ )... विनीत वर्तक ©

महत्वाकांक्षी चीन चे छुपे मनसुबे आता जगासमोर उघडे पडत आहेत. खरे तर त्याचा अंदाज किंबहुना चीन ची ही चाल भारताने कधीच जगापुढे मांडली होती. पण समोर दिसणारा पैसा कोणाला नको असतो. तसेच भारताला पुढे न येऊ देण्यासाठी आणि चीन च्या विरोधात न जाण्यासाठी अनेक राष्ट्रांनी या विषयावर मौन पत्कारलं होतं. चीन ज्या पद्धतीने लहान राष्ट्रांना गिळंकृत करण्यासाठी विकास करण्याचं आमिष दाखवत होता. त्याला बळी न पडण्याचं आवाहन भारताने केलं होतं पण पैश्याच्या लोभाने अनेक लहान मोठ्या राष्ट्रांनी भारताचं न ऐकता चीन सोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता जेव्हा विकासाचे बुरखे फाटले आणि मतलई वाऱ्यांनी जेव्हा खाऱ्या वाऱ्यांची दिशा घेतली तेव्हा सत्य परिस्थिती या राष्ट्रांच्या समोर आलेली आहे. पण आता खूप उशीर झालेला आहे. एकेकाळी भारताला मुर्खात काढणारे देश आज स्वतःच्या अस्तित्वासाठी तडफड करत आहेत. अश्या वेळेस त्यांना फाट्यावर मारत चीन ने आपले मनसुबे स्पष्ट केले असताना पुन्हा एकदा भारतच त्यांच्या मदतीला उभा राहिलेला आहे.  

चीन च्या विस्तारवादी धोरणाला अनेक देश बळी पडलेले आहेत. सध्या भारताचा सगळ्यात शेजारी देश अतिशय खडतर परिस्थितीतून जात आहे. भारताशी जुने संबंध असणारा हा देश म्हणजेच श्रीलंका. श्रीलंकेवर सध्या दिवाळखोरी चे वारे घोंघावत आहेत. एकीकडे श्रीलंकेतील महागाई दर ११.१% ला जाऊन पोहचला आहे तर श्रीलंकेकडील परकीय चलनाचा साठा जवळपास संपण्याची स्थिती आलेली आहे. श्रीलंकेकडे गेल्या वर्षाच्या शेवटी अवघे १.६ बिलियन अमेरिकन डॉलर्स शिल्लक होते. जे की संपूर्ण देशाची फक्त एक महिन्याची गरज भागवण्यास पुरेसे होते. दुसरीकडे २०२२ या एका वर्षात ४.५ बिलियन अमेरिकन डॉलर्स च्या कर्जाचा हफ्ता श्रीलंकेला चुकता करायचा आहे. हे फक्त सरकारी कर्ज आहे. खाजगी वित्तीय संस्थांचा कर्जाचा आकडा लक्षात घेतला तर हा आकडा ७.५ बिलियन अमेरिकन डॉलर्स च्या घरात जातो. श्रीलंकेला या वळणावर आणून सोडण्यासाठी चीन हा जबाबदार आहे. चीनकडून घेतलेल्या कर्जामुळे श्रीलंका पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे. एक कर्ज चुकवण्यासाठी श्रीलंकेला दुसरं कर्ज उचलावं लागत आहे. श्रीलंकेला फेडाव्या लागणाऱ्या कर्जाचा हफ्ता हा श्रीलंकेच्या सकल उत्पनाच्या ४२% पर्यंत आहे. याचा अर्थ सरकारला मिळत असलेल्या उत्पनातून अर्ध उत्पन्न हे फक्त कर्जाचा हफ्ता देण्यात जाते आहे. त्यामुळे देश चालवण्यासाटी लागणारा पैसाच श्रीलंकेकडे सध्या उपलब्ध नाही. 

श्रीलंकेची आजची स्थिती का झाली आणि चीन कसा या गोष्टीला जबाबदार आहे हे समजण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. साधारण गेल्या दशकात चीन ने Belt and Road Initiative (BRI) च्या नावाखाली कर्जाचा एक सापळा लहान देशांसमोर टाकला. ज्याला अनेक देश बळी पडले. तर चीन ने विकासाचं गाजर दाखवत खूप मोठ्या प्रमाणात कर्ज द्यायला सुरवात केली. हे ज्या नाक्यावर जाहिराती लागतात की कोणतीही कागदपत्र न देता १५ मिनिटात कर्ज त्याच प्रमाणे होतं. चीन पुढली १० वर्ष काहीच न मागता आपल्याला फुकट पैसे देणार, आपल्या देशाचा विकास होणार वगरे स्वप्न चीन ने या देशांना विकली. श्रीलंका हा असाच एक देश होता. हिंद महासागरात आपलं स्थान बळकट करायचं असेल तर श्रीलंका आपल्या सापळ्यात येण्यासाठी चीन ने अजून गाजर श्रीलंकेला दाखवलं. या गाजराला तिथलं सरकार बळी पडलं. भारताने या बाबतीत श्रीलंकेला सावध करूनही त्यांनी चीन सोबत जाण्याचा निर्णय घेतला. चीन ने श्रीलंकेतील विमानतळ, बंदरं , रस्ते, रेल्वे यासाठी मोठमोठी कर्ज दिली. खरे तर हे सगळे प्रोजेक्ट पांढरे हत्ती होते. चीन ला चांगलं माहित होतं की आपण या प्रोजेक्ट मधून दाखवलेली कमाई कधीच करू शकणार नाहीत. पण याचा भार श्रीलंकेला कर्जाच्या जाळ्यात अधिक अडकवत जाईल. 

विकास होण्यासाठी केलेल्या प्रोजेक्ट मधून दहा वर्षांनी इतकं उत्पन्न मिळेल अश्या दाखवलेल्या काल्पनिक आकड्यांचा फुगा जेव्हा प्रत्यक्षात फुटला तेव्हा हे पांढरे हत्ती निर्माण करण्यासाठी आणि ते पोसण्यासाठी श्रीलंकेला अजून कर्जाची गरज भासत गेली. एकीकडे चीन ने आपले हफ्ते चुकवले तर ती जागा आणि ते संपूर्ण प्रोजेक्ट आपल्या हातात घ्यायला पावलं उचलली. डोळ्यावर पट्टी लावून सह्या केलेल्या करारांमुळे श्रीलंकेला आपलं हंबनटोटा हे बंदर चीन ला ९९ वर्षासाठी गहाण द्यायची नामुष्की ओढवली. या बंदरात कोणतं जहाज येणार? कधी जाणार? त्यातून काय माल येणार? ते सगळच चीन च्या घश्यात गेलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे श्रीलंका हा देश त्यांच्याच लोकांनी चीन ला विकला असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. या गोष्टी जेव्हा श्रीलंकेच्या सरकारला समजायला लागल्या तेव्हा त्यांचे डोळे उघडले पण तोवर खूप उशीर झाला होता. 

श्रीलंकेपुढच्या अडचणी वाढत होत्या. जगण्यासाठी लागणारं इंधन,दूध, भाजीपाला, साखर या गोष्टी खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैश्याची वानवा झाली. कर्जाचे हफ्ते द्यायचे की लोकांना खाण्यासाठी अन्न अश्या कचाट्यात तिथलं सरकार सापडलं आहे. खालावत चाललेल्या आर्थिक स्थितीमुळे अजून कर्ज मिळण्याचे रस्ते बंद झालेले आहेत. तर पर्यटनावर अवलंबून असलेल्या श्रीलंकेच्या उत्पनाची कोरोना ने पूर्णपणे वाट लावलेली आहे. अश्या वेळेस चीन ला हफ्ते भरण्यासाठी मागितलेली मुदतवाढ सुद्धा चीन ने धुडकावून लावली आहे. कोणताही मार्ग दिसत नसताना शेवटी श्रीलंकेने भारताचे दरवाजे ठोठवले आहेत. भारतासाठी चीन ने अश्या प्रकारे श्रीलंकेवर कब्जा मिळवणं परवडणारं नाही. त्यामुळेच भारताने संधीचा फायदा घेत श्रीलंकेला ताबडतोब त्यांच्या नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टींसाठी ९०० मिलियन अमेरिकन डॉलर ची मदत दिली तर त्याच सोबत तब्बल १.५ बिलियन अमेरिकन डॉलर ची आर्थिक मदत कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी जाहीर केली आहे. या सोबत इंधन, बंदर विकास आणि इतर क्षेत्रात भारताने श्रीलंकेला सावरण्यासाठी करार केले आहेत. 

भारताने पुन्हा एकदा वाऱ्यांची दिशा बदलवली आहे. पण हे बदल श्रीलंकेला तात्पुरता दिलासा देणारे आहेत. श्रीलंकेला जर चीन च्या विळख्यातून सुटायचं असेल तर एकच देश मदत करू शकतो तो म्हणजे 'भारत'. पण त्या बदल्यात श्रीलंकेला त्याची किंमत नक्कीच मोजावी लागणार आहे. कारण भारत जरी ही मदत आपला शेजारी देश आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून करत असला तरी श्रीलंकेची चीन शी जवळीक जोवर तुटत नाही तोवर भारताची मदत ही मर्यादित राहणार हे स्पष्ट आहे. आपल्याला कोणते वारे चांगले याचा निर्णय श्रीलंकेने घ्यायचा आहे. भारत का चीन कोणासोबत जायचं हे श्रीलंकेने ठरवायचं आहे. खूप कमी वेळ त्यांच्या हातात आहे. गेल्या २ वर्षात ५ लाख लोकं श्रीलंकेत गरिबीत ढकलली गेली आहेत. ही संख्या सध्या वेगाने वाढते आहे. या एका वर्षात श्रीलंकेला २० बिलियन अमेरिकन डॉलर ची गरज आपल्या लोकांना जिवनावश्यक गोष्टी पुरवण्यासाठी लागणार आहे तर त्याच सोबत कर्ज फेडण्यासाठी ७.५ बिलियन अमेरिकन डॉलर ची गरज लागणार आहे. त्यामुळे अश्या विचित्र आणि कठीण परिस्थितीत श्रीलंका कोणत्या वाऱ्यांची साथ धरतो यावर खूप काही अवलंबून असणार आहे. 

तळटीप :- १ मिलियन = १० लाख, १ बिलियन = १०० कोटी 

फोटो शोध सौजन्य :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Wednesday 19 January 2022

हुंगा टोंगा हुंगा हापाई... विनीत वर्तक ©

 हुंगा टोंगा हुंगा हापाई... विनीत वर्तक ©

'हुंगा टोंगा हुंगा हापाई' हे नाव वाचून आपल्यापैकी अनेकजण बुचकळ्यात पडू. खरे तर हे नाव आहे पॅसिफिक महासागरात असलेल्या एका ज्वालामुखीचे. टोंगा हा देश अनेक बेटांचा समूह बनून बनलेला आहे. फिजी बेटांपासून ८०० किलोमीटर तर न्यूझीलंड या देशापासून २३८० किलोमीटर अंतरावर ही बेटं आहेत. या देशाची लोकसंख्या फक्त १ लाख आहे. हा देश जगातील 'रिंग ऑफ फायर' या अतिशय संवेदनशील ठिकाणी वसलेला आहे. याच टोंगा देशातील 'हुंगा टोंगा हुंगा हापाई' या ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक झाला आहे. हा उद्रेक हजारो वर्षातून होणारा एखादा उद्रेक असल्याचं अनेक संशोधकांच म्हणणं आहे. या उद्रेकाची व्याप्ती, त्याची कारणे. त्याचे परिणाम हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. त्याच सोबत 'रिंग ऑफ फायर' म्हणजे काय? हुंगा टोंगा हुंगा हापाई ज्वालामुखी ने नक्की काय समीकरणं बदलली आहेत हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. 

टोंगा हा देश वर लिहिलं तसं 'रिंग ऑफ फायर' वसलेला आहे. 'रिंग ऑफ फायर' या प्रदेशाला का म्हणतात त्यासाठी आपण थोडा भूगोल समजून घेऊ. पॅसिफिक महासागरात पृथ्वीच्या अनेक टेक्टोनिक प्लेट्स एकत्र येतात. या प्लेट्स एकमेकांवर कुरघोडी करतात म्हणजे काय तर एकमेकांच्या अंगावर चढतात. त्यामुळे एखादी प्लेट दुसऱ्या प्लेट च्या खाली दबली जाते. यामुळे हे क्षेत्र भौगोलिक दृष्ट्या अतिशय संवेदनक्षील आहे. प्लेट च्या हालचालीमुळे जगात माहित असलेल्या ज्वालामुखी पैकी ४५० ज्वालामुखी या प्रदेशात आहेत. जवळपास ४०,००० किलोमीटर च क्षेत्र या 'रिंग ऑफ फायर' चा भाग आहे. त्यामुळे या भागात ज्वालामुखीचे उद्रेक, भूकंप, त्सुनामी या नेहमीच होत असतात. वर्षाला १ ते २ इंच या प्लेट्स सरकतात. पण ही लहान हालचाल पण खूप काही विध्वंस करण्यास सक्षम असते. टोंगा या देशाच्या भागात पॅसिफिक प्लेट ही इंडो- ऑस्ट्रेलियन प्लेट च्या खाली चिरडली जाते आहे. साहजिक या हालचालीत पृथ्वीच्या अंतर्भागात असलेला लाव्हा / मॅग्मा हा वर ढकलला जातो. 

टोंगा इकडे १५ जानेवारी २०२२ रोजी 'हुंगा टोंगा हुंगा हापाई' ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक झाला आणि शांत असलेल्या टोंगा बेटांकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं. हा ज्वालामुखीचा उद्रेक मध्यम स्वरूपाचा असला तरी यातून निघालेल्या शॉक व्हेव, त्सुनामी आणि विजांच्या कडाडण्याने संपूर्ण जगाला स्तिमित केलं आहे. या स्फोटातून निर्माण झालेल्या शॉक व्हेव चक्क अलास्का पर्यंत पोहचल्या आणि त्यातून निर्माण झालेल्या त्सुनामी ने जगाच्या अर्ध्या किनाऱ्यांवर धडक दिलेली आहे. त्यामुळेच हा ज्वालामुखीचा उद्रेक संपूर्ण जगात अभ्यासला जातो आहे. टोंगा देशाची राजधानी 'नुकुअलॉफ' च्या ६५ किलोमीटर अंतरावर हुंगा टोंगा आणि हुंगा हापाई ही समुद्राच्या वर साधारण १०० मीटर असलेली दोन बेटं आहेत. याच बेटांच्या खाली पाण्यामध्ये लपलेला आहे तब्बल १८०० मीटर उंच आणि २० किलोमीटर लांब असलेला 'हुंगा टोंगा हुंगा हापाई' ज्वालामुखी. या बेटावर मनुष्यवस्ती नाही कारण गेली काही दशके इकडे ज्वालामुखीचे छोटे, मोठे उद्रेक हे सुरूच असतात. १५ जानेवारी ला झालेला स्फोट हा १००० वर्षातून एकदा होतो असं वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. 

संपूर्ण ज्वालामुखी हा पाण्यात असताना पण त्याचा उद्रेक का होतो? हे समजून घेण्यासाठी एकूणच त्याची रचना समजून घेतली पाहिजे. लाव्हारस ज्याला 'मॅग्मा' असं म्हणतात तो जमिनीखालून वर येत असताना त्याचा संपर्क समुद्राच्या पाण्याशी थेट येत नाही. १२०० डिग्री सेल्सिअस इतकं प्रचंड तपमान असलेला मॅग्मा आणि थंड असलेलं समुद्राचं पाणी या दोघांच्या मधे वाफेचा एक पडदा तयार होतो जो की अवरोधकाच काम करतो. बाहेरून जरी मॅग्मा थंड वाटला तरी आत तो त्याच्या प्रचंड तपमानाला उकळत असतो. हा जो मॅग्मा असतो तो दोन प्रकारचा असतो एक जो अधिक द्रवरूप असतो किंवा आपण त्याला 'पातळ' असं म्हणू. दुसरा असतो तो थोडा 'जाड' असतो जो एखाद्या तुपासारखा असतो. मॅग्मा जर पातळ आणि प्रवाही असेल तर त्यातले गॅसेस हे बाहेर फेकले जातात किंवा लाव्हारस पाण्याप्रमाणे वाहू लागतो. जसं आपण हवाई बेंटांवर बघतो. पण जेव्हा हा मॅग्मा जाड असतो तेव्हा त्यात तयार झालेले गॅसेस हे त्यात अडकून राहतात. एखाद्या सोड्याच्या बॉटल प्रमाणे. हळूहळू त्या गॅस वरील दाब वाढत जातो. अशी एक वेळ येते जेव्हा त्याचा आतील दाबामुळे उद्रेक होतो. या उद्रेकात अजून एक गोष्ट घडते ती म्हणजे मॅग्मा आणि समुद्राचं पाणी यात जे वाफेच आवरण तयार झालेलं असते ते उध्वस्थ होते. आतला १२०० डिग्री सेल्सिअस तपमान असणारा मॅग्मा समुद्राच्या पाण्याशी संयोग करतो. यामुळे एक प्रकारे रासायनिक प्रक्रिया अतिशय वेगाने घडते. जशी एखाद्या बॉम्ब ब्लास्ट मधे घडते. त्याचा स्फोट होतो. या स्फोटात पुन्हा एकदा मॅग्मा आणि पाण्याचा संयोग घडतो आणि पुन्हा एकदा स्फोट होतो. अशी स्फोटांची मालिका सुरु होते. 

टोंगा इकडे १५ जानेवारी २०२२ झालेल्या स्फोटात अश्याच प्रकारे 'चेन रिएक्शन' ज्याला म्हणतात ती घडली आणि अभूतपूर्व असा विस्फोट झाला. या स्फोटात निर्माण झालेल्या शॉक वेव्ह ने ३०० मीटर / सेकंद या वेगाने प्रवास करत अर्ध्या जगाला आपली नोंद घ्यायला लावली. या स्फोटातून निघालेली राख, धूळ ही आकाशात तब्बल २० किलोमीटर पर्यंत फेकली गेली. ज्वालामुखीच्या उद्रेकापासून जवळपास २६० किलोमीटर क्षेत्रावर या राखेच अस्तित्व दिसून आलं. जेव्हा अश्या प्रकारे गरम वाफ, राख वातावरणात अतिशय उंचावर फेकली जाते. तेव्हा यातील गरम कणांचा संबंध वातावरणातील बर्फाच्या आणि थंड अश्या बाष्पातील कणांशी आल्याने प्रचंड प्रमाणात विजा कडाडतात. एका अंदाजानुसार 'हुंगा टोंगा हुंगा हापाई' मधील उद्रेकात जवळपास ४ लाखापेक्षा जास्ती वेळा विजेच्या लोळाने तिथल्या जमिनीला आणि समुद्राला झोडपून काढलेलं आहे. एखाद्या वेळेस जर तिकडे मनुष्य वस्ती असती तर विज अंगावर पडण्याने सगळ्यात जास्ती मृत्यूची नोंद झाली असती. या उद्रेकाचा आवाज अगदी अलास्का पर्यंत ऐकायला गेलेला आहे. हा उद्रेक इतका प्रचंड होता की जपान च्या किनाऱ्यावर आलेल्या त्सुनामी च्या लाटा १० मीटर तर अमेरिकेच्या किनाऱ्यावर धडकलेल्या लाटांची उंची ४ मीटर होती. सध्या या सर्व भागावर राखेच साम्राज्य पसरल्याने नक्की किती नुकसान झालं किंवा या बेटांच्या ठिकाणी आता काय परिस्थिती आहे याबद्दल काहीच सांगता येत नाही आहे. 

'हुंगा टोंगा हुंगा हापाई' च्या उद्रेकाने पुन्हा एकदा पृथ्वीच्या गर्भात सुरु असलेल्या हालचालींबद्दल आपलं ज्ञान किती तोकडं आहे याची पुन्हा एकदा जगाला जाणीव झाली आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर उद्रेकाचा प्रभाव जाणवण्यासाठी खूप प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागलेली आहे. एका मध्यम स्वरूपाच्या ज्वालामुखी उद्रेकातून जर इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रभाव जाणवू शकतो. तर 'रिंग ऑफ फायर' मधे असलेल्या देशांच्या जवळ असा एखादा स्फोट काय प्रलय आणू शकतो याची चुणूक बघायला या स्फोटाने मिळाली आहे. अजूनही या स्फ़ोटावर संशोधन सुरु आहे. हा शेवट होता की ही सुरवात आहे याबद्दल ही वैज्ञानिक स्पष्ट काहीच सांगू शकत नाहीत. भविष्यात सुद्धा 'हुंगा टोंगा हुंगा हापाई' पुन्हा एकदा आपलं रौद्र स्वरूप दाखवेल असा अनेक वैज्ञानिकांना वाटते. 

फोटो शोध सौजन्य :-  गुगल.  पहिल्या फोटोत हुंगा टोंगा हुंगा हापाई ज्वालामुखी आणि दुसऱ्या फोटोत रिंग ऑफ फायर.    

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Friday 14 January 2022

एका वर्षानंतर... विनीत वर्तक ©

 एका वर्षानंतर... विनीत वर्तक ©

मे २०२१ मधे जेव्हा कोरोना रुग्णसंख्येने भारतात प्रत्येक दिवशी ४ लाख रुग्णांचा आकडा ओलांडला तेव्हा जागतिक मिडिया, भारतीय मिडिया, भारतातील स्वतःला अतिज्ञानी म्हणवणारे वरिष्ठ पत्रकार, पुरोगामी राजकारणी ते पांढरपेशा समाजातील अनेकांनी भारताच्या तेव्हाच्या परिस्थीती वर अगदी कोकलून भारताची इज्जत वेशीवर टांगली. भारतात जळणाऱ्या चिता, हॉस्पिटल बाहेर लागलेल्या रांगा, मृतदेहांचा खच यावर अगदी मसाला थापून त्याच्या बातम्या केल्या. काही अग्रगण्य मासिकांनी यावर स्पेशल एडिशन म्हणून आपले अंक छापले. भारत सरकार कसं अपयशी आहे? भारतीय लोक हेच जागतिक कोरोना लाटेला कसे कारणीभूत आहेत हे सांगून अनेक देशात भारतीयांना जाण्यासाठी मज्जाव टाकण्यात आला. एकूणच काय तर कोरोना जगात कुठे अस्तित्वात आहे किंवा पसरतो आहे तो भारतीयांमुळे असं एक चित्र जगापुढे ठेवलं गेलं. या सगळ्यासाठी आपल्याच देशातील गद्दार, आपल्याच देशातील राजकारणी आणि आपल्याच देशातील मिडिया कारणीभूत होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 

आज १५ जानेवारी २०२२ रोजी मात्र हेच सर्व शेपूट गुंडाळून गप्प बसून आहेत. गेल्या २४ तासात एकट्या अमेरिकेत ८ लाखांपेक्षा जास्ती नवीन कोरोना रुग्ण नोंदवले गेले आहेत. यु.के. मधे हीच संख्या १ लाखाच्या घरात आहे. भारतात ही जवळपास २ लाख ६७ हजार नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. पण जर आपण १० लाख लोकांमागे किती रुग्ण याची सरासरी काढली तर अमेरिकेची १ लाख ९८ हजार आहे. तर यु.के. ची २ लाख २० हजार आहे. या तुलनेत भारत कुठे आहे. तर भारतात दर १० लाख लोकांमागे फक्त २७ हजार रुग्ण आहेत. भारतात ही रुग्ण संख्या दुप्पट जरी मानली तरी हा आकडा या देशांच्या मानाने पुष्कळ कमी आहे. मग असं असताना भारतातल्या कोरोना लाटेवर गेल्या वर्षी स्पेशल एडिशन छापणारे आता यावर काही लिहणार आहेत का? प्रश्न हा नाही की संख्येच्या खेळात कोण पुढे आणि कोण मागे? प्रश्न हा आहे की भारताबाबत दुट्टपी धोरण का?  

८ डिसेंबर २०२० चा दिवस होता. जेव्हा जगातील कोरोना लसीकरणाची सुरवात ब्रिटन ने केली होती. तर १२ डिसेंबर २०२० रोजी अमेरिकेने आपल्या कोरोना लसीकरणाची सुरवात केली. जेव्हा जगातील प्रगत राष्ट्र स्वतःच्या लोकसंख्येला लसीकरण करून सुरक्षित करत होते तेव्हा भारताचं काय होणार? असा प्रश्न अनेक जागतिक आणि भारतातील विचारमंतांना पडला होता. अनेकांनी भारताला लस कोण देणार? लसीसाठी लागणारे पैसे, नियोजन कसं करणार? राज्य आणि केंद्र सरकारात वाद ही कारणं पुढे करत लसीकरणाचं शिवधनुष्य भारताला पेलवणारं नाही. भारतात मृत्यूचं तांडव कोरोना करेल असं भाकीत केलं. तर लस ही एका पक्षाची असल्याचं सांगत काही राजकारण्यांनी त्याला पक्षीय रंग देण्याचं ही काम केलं. पण या सर्वांवर मात करत अनेक अडचणींवर मात करत भारताने १६ जानेवारी २०२१ रोजी जगातल्या सगळ्यात मोठ्या कोरोना लसीकरणाची सुरवात केली. 

१४० कोटी लोकांच लसीकरण ते ही दोन वेळा हे नक्कीच सोप्प लक्ष्य नव्हतं. अडचणी मोजल्या तर कमी पडतील इतक्या होत्या. सगळ्यात मोठी अडचण होती लसींच निर्माण आणि त्यांचा अखंडित पुरवठा. इतक्या प्रचंड प्रमाणावर लसींची निर्मिती करण्यासाठी उद्योजक, त्यांना लागणारा कच्चा माल आणि तयार झालेल्या लसींचा पुरवठा हे खूप मोठं आव्हान एकूणच सरकार, वैद्यकीय मंत्रालय, याच्याशी संबंधित सर्वच लोकांवर होतं. त्यात भरीस भर म्हणून लोकशाही रचना ही एक मोठी अडचण होती. कारण प्रत्येक प्रदेशात असलेली राज्य सरकार, त्यांचे कायदे, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या सूचना या सर्वाना एकाच पातळीवर आणून त्यांच्यात समन्वय साधणं हे सगळ्यात मोठं कठीण काम होतं. यात अनेक अडचणी आल्या. लसींची कमतरता, राज्य सरकारच्या भुमीका, केंद्र सरकारचा दुजाभाव, राज्य आणि केंद्र यांच्या मधील समन्वय या सगळ्याचा खूप मोठा त्रास सर्वानांच झाला यात कोणाचं दुमत नसेल. पण कुठेतरी मार्ग काढत जेव्हा पुढे जाण्याचा रस्ता मोकळा झाला तेव्हा दुसरी मोठी अडचण आ वासून समोर उभी होती. 

भारतातील लोकांमध्ये लसी बद्दल असलेली नकारत्मका. वैद्यकीय क्षेत्रातील 'ग' माहित नसलेल्या राजकीय नेत्यांनी अकलेचे तारे तोडत आपली पक्षीय पोळी भाजून घेण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न, लसीबद्दल पसरवलेली नकारत्मका, कोणत्याही फेसबुक, व्हाट्स अप फॉरवर्ड ला जागतिक प्रबंध मानून त्याच्या मागे धावणारी स्वतःला सुशिक्षित मानणारी भारतीय जनता. आयुर्वेदाचे, कोणत्यातरी काढ्याचे नाव घेऊन बिनधास्त कोणत्याही पुराव्या शिवाय आपल्याकडे आलेला कचरा पुढच्याकडे ढकलून देण्यात सराईत असलेले सुशिक्षित लोक यामुळे कुठेतरी लसीबद्दल अविश्वास जनमानसात निर्माण झाला. त्याला दूर करून स्वच्छेने लस घेण्यास भारतीयांना प्रवृत्त करणे हे ही खूप मोठं कठीण काम होतं. पण म्हणतात ना काळ माणसाला शिकवतो. मे २०२१ च्या लाटेत ज्या पद्धतीने कोरोना ने लोकांची वाताहत केली ते बघितल्यावर लस हीच आपल्या आणि मृत्यूच्या मधे उभी आहे हे भारतीयांना कळून चुकलं. त्यानंतर जे झालं तो इतिहास आहे. एका दिवसात तब्बल २.५ कोटी लोकांच लसीकरण ते १०० कोटी लोकांच लसीकरण करत आज पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं आहे. 

आज हा लेख लिहीपर्यंत १५५ कोटी पेक्षा जास्ती लस भारतीयांना दिल्या गेल्या आहेत. जवळपास ६५ कोटी लोकांच दुहेरी लसीकरण पूर्ण झालं आहे. तर तिसऱ्या बूस्टर डोस तसेच १५-१८ वर्ष वयोगटातील जवळपास ४० लाख पेक्षा जास्त मुलांना कोरोना लस देण्यात आली आहे. उद्या भारताच्या लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण होतं आहे. या एका वर्षात आपण अनेक बदलातून गेलो आहोत आणि जात आहोत. आज कोरोना पुन्हा एकदा वेगाने पसरत असला तरी त्याची दाहकता कमी झालेली आहे. आजही भाताचा मृत्युदर जगात अतिशय कमी आहे. कोरोना ची दाहकता कमी जाणवण्यामागे गेल्या एका वर्षात ज्या पद्धतीने सर्व भारतीयांच लसीकरण झालं त्याचा मोठा वाटा आहे. 

भारताने आपल्या लसींनी फक्त भारतीयांना नाही वाचवलं तर आपल्याच घरात लढत असताना भारताने जगातील तब्बल ९६ देशांना ११ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त लसींचा पुरवठा केला आहे. हा आकडा ३१ डिसेंबर २०२१ चा आहे. ज्यात अजून भर पडत आहे. अजून एक मोठी गोष्ट म्हणजे भारताने या लसी मदत किंवा गिफ्ट म्हणून दिलेल्या आहेत. एकीकडे चीन जिथे पाकिस्तान ला मदत करताना सुद्धा तुम्हाला लसी हव्या असतील तर तुमचे विमान पाठवा, आमचा टॅक्स भरा. आम्ही फक्त लस देऊ ती घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची आहे असं सुनावतो. तिकडे भारताने ९७ देशांना गिफ्ट कसं द्यायचं असते ते दाखवून दिलं आहे. कारण भारताने या सर्व लसी आपल्या 'एअर इंडिया' च्या विमानाने कोणताही कर अथवा छुपा अधिभार न लावता त्या देशात नेऊन त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या आहेत. गिफ्ट आणि मदत देण्याचे वेगळे पायंडे भारताने जागतिक मंचावर पडले आहेत. ज्याचे दूरगामी परिणाम आपल्याला येत्या काळात दिसतील. ही राष्ट्र कदाचित जगाच्या नकाशावर अगदी छोटी असतील त्यांच महत्व ही कदाचित जागतिक राजकारणाच्या दृष्टीने नगण्य असेल. पण भारत रंग, आर्थिक सुबत्ता, स्वतःचा फायदा हे बघून मदत करत नाही तर त्या देशात राहणारे ही माणसं आहेत आणि त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे हा खूप मोठा संदेश जगात गेला आहे. याचा फायदा भारतीय जेव्हा जेव्हा या देशात जातील तेव्हा तिथल्या लोकांच्या दृष्टिकोनातून तो त्यांना नक्कीच जाणवेल या बद्दल माझ्या मनात शंका नाही. 

जगातील कोणतीही लस कोरोना होण्यापासून संरक्षण करत नाही. पण नक्कीच ती आपल्या आणि मृत्यूच्या मधे उभी रहाते. त्यामुळेच आज भारतीय सुटकेचा निश्वास सोडत आहेत. पण ही लढाई अजून सुरु आहे. आपण पहिला किल्ला सर केला म्हणजे स्वराज्याची निर्मिती होत नसते तर शत्रू अजून वेगळ्या रूपात समोर येतो. त्यामुळे गाफील न राहता. कोरोना ला थांबण्यासाठी योग्य ती काळजी घेणं प्रत्येक भारतीयांच कर्तव्य आहे. ते आपण सर्व भारतीय पूर्ण करूयात. आज लसीकरणाच्या एक वर्षाच्या पूर्वसंध्येला मी समस्त भारतीयांतर्फे सर्व डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, सेवाभावी संस्था, लसींचे निर्माते, त्याचे पुरवठादार, पोलीस, सेवाभावी माणसं, प्रशासकीय अधिकारी त्यांचा कर्मचारी वर्ग, हेल्थ मिनिस्ट्री, राज्य सरकारे आणि केंद्र सरकार या सर्वांचा मनापासून आभारी आहे. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :-  गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Thursday 13 January 2022

एक नवा उदय... विनीत वर्तक ©

 एक नवा उदय... विनीत वर्तक ©

आजवर इतर देशांकडून शस्त्रास्त्रे विकत घेणारा भारत आज क्षेपणास्त्र निर्यात करणारा देश म्हणून जगाच्या क्षितिजावर उदयाला आला आहे. भारत- रशिया यांनी संयुक्त रित्या निर्माण केलेलं आणि भारताच्या ब्रह्मपुत्रा नदीच्या नावावर असलेलं जगातील सगळ्यात वेगवान आणि अचूक स्वनातीत क्षेपणास्त्र 'ब्राह्मोस' च्या खरेदीची ऑर्डर फिलिपाइन्स ने भारताकडे दिलेली आहे. 

फिलिपाइन्स ने २ बॅटरीची ऑर्डर भारताला दिलेली आहे. एका बॅटरी मधे ४ लॉन्चर असून एका लॉन्चर मधे ३ ब्राह्मोस क्षेपणास्त्र असतात. अश्या २४ ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसाठी फिलिपाइन्स ने तब्बल ३७४,९६२,८०० अमेरिकन डॉलर मोजलेले आहेत. या शिवाय अजून ब्राह्मोस खरेदी करण्याचा मार्ग ही मोकळा ठेवला आहे. 

भारतासाठी ब्राह्मोस हुकमाचा एक्का ठरला आहे. एकट्या फिलिपाइन्स सोबत झालेला करार हा ३७४ मिलियन अमेरिकन डॉलर चा आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात परकीय चलन भारताला यामुळे मिळणार आहे. भारत फिलिपाइन्स ला देत असलेल्या ब्राह्मोस ची क्षमता ही २९० किलोमीटर पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. फिलिपाइन्स हा एम.टी.सी.आर. Missile Technology Control Regime (MTCR) चा सदस्य नसल्याने ३०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरची क्षेपणास्त्र भारताला विकता येणार नाहीत. 

या कराराचे अधिकृत पत्रक पोस्ट च्या खाली जोडत आहे. फिलिपाइन्स कडे ब्राह्मोस च्या येण्याने साऊथ चायना सी मधे चीन च्या वर्चस्वाला खूप मोठा धक्का मानला जात आहे. हा करार रोखण्यासाठी चीन ने केलेले सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. फिलिपाइन्स पाठोपाठ जवळपास १०-१२ देश ज्यातील ७०% पूर्व आशियामधील आहेत. त्या सर्वानी ब्राह्मोस च्या खरेदीसाठी रांगा लावल्या आहेत. 

चीन च्या समुद्रावरील वर्चस्वाला आव्हान जर का क्षमतेने देता येत नसेल तर त्याला प्रतिकार करण्याची क्षमता एकट्या ब्राह्मोस कडे आहे. कारण ब्राह्मोस ला रोखण्याच किंवा त्याचा रस्ता अडवण्याचं कोणतही तंत्रज्ञान चीन काय अजून जगातील कोणत्याच देशाकडे उपलब्ध नाही. एकाचवेळी ३ पेक्षा जास्ती ब्राह्मोस ना एकाच वेळी रोखण्यात जगात सर्वोत्तम मानली गेलेली एस ४०० ही प्रणाली ही निष्प्रभ ठरते. तिकडे इतर प्रणाली बद्दल न बोललेलं बर . 

एकूणच ब्राह्मोस च्या या कराराने भारताच्या क्षितिजावर एका नव्या सूर्याचा उदय झाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- ट्विटर 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Wednesday 12 January 2022

बलसागर भारत... विनीत वर्तक ©

 बलसागर भारत... विनीत वर्तक ©

गेल्या काही महिन्यात भारताकडे जगातील सर्व देशांच लक्ष लागलेलं आहे. त्यात एक प्रकारचा दुस्वास ही आहे आणि पोटदुखी ही आहे. त्याला कारण म्हणजे संरक्षण क्षेत्रात भारत ज्या पद्धतीने पुढे जातो आहे. ते जगातील प्रगत राष्ट्रांना पचनी पडणार नाही. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ज्या वेगाने भारताला संरक्षणाच्या बाबतीत आत्मनिर्भर करत आहे. तो वेग थक्क करणारा आहे. उदाहरण द्यायचं झालच तर एकट्या डिसेंबर २०२१ या महिन्यात डी.आर.डी.ओ. ने तब्बल ९ वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत. यात अगदी पिनाका रॉकेट पासून ते अग्नी प्राईम या २००० किलोमीटर अंतरावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. एकाच वेळी इतक्या वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या भारताची संरक्षणा बाबतीत होणारी वाटचाल संपूर्ण जगाला नोंद घेण्यास भाग पाडत आहेत. अजूनही या चाचण्या थांबलेल्या नाहीत तर डी.आर.डी.ओ. अजून वेगाने स्वयंसिद्धतेकडे वाटचाल करते आहे. 

दोन दिवसांपूर्वी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ब्राह्मोस या जगातील एकमेव सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल ची पुन्हा एकदा चाचणी घेतली आहे. ही चाचणी अनेक अर्थाने वेगळी आहे. हिंद महासागरात चिनी नौदलाची ताकद वाढलेली असताना भारतीय नौदलला तोडीस तोड क्षमता देण्यासाठी ही चाचणी अतिशय महत्वाची होती. ब्राह्मोस बद्दल अनेकवेळा लिहिलं गेलं आहे. ३४५० किलोमीटर / तास या स्वनातीत वेगाने झेपावणारे ब्राह्मोस जगात प्रसिद्ध आहे ते त्याच्या अचूकतेसाठी. वेगासोबत जमीन अथवा पाण्याच्या अतिशय जवळून ते आपल्या लक्ष्याकडे झेपावते. या शिवाय ब्राह्मोस हे फायर एन्ड फर्गेट पद्धतीचे क्षेपणास्त्र आहे. याचा अर्थ आहे की एकदा लक्ष्य त्याला आखून दिलं की त्या लक्ष्याने आपल्या वेगात, जागेत, दिशेत बदल केला तरी ब्राह्मोस स्वतःच्या रस्त्यात स्वतःच बदल करून लक्ष्यभेद करण्यास सक्षम आहे. ब्राह्मोस चा वेग आणि त्याच वजन हे प्रचंड प्रमाणात गतिशील ऊर्जा (कायनेटिक एनर्जी) उत्पन्न करतात. त्यामुळे ब्राह्मोस मधील स्फोटकांच प्रमाण कमी असलं तरी त्याने होणारी हानी मात्र कित्येक पट असते. 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आता केलेल्या ब्राह्मोस च्या चाचणीत समुद्रातून समुद्रात लक्ष्य भेदण्यात आलं. आय.एन.एस. विशाखापट्टणम ही नौका काही महिन्यांपूर्वी नौदलात दाखल झालेली आहे. तिच्यावरून ब्राह्मोस ला डागण्यात आलं. ब्राह्मोस च लक्ष्य होतं तब्बल ४०० किलोमीटर दूरवर समुद्रात असलेली एक नौका. लक्षात घ्या की ब्राह्मोस हे चालत्या जहाजावरुन पण डागता येते आणि ते चालत्या जहाजाला लक्ष्य करू शकते ते ही ४०० किलोमीटर लांब अंतरावर. या चाचणीत ब्राह्मोस च्या पुढल्या व्हर्जन ने आय.एन.एस. विशाखापट्टणम उड्डाण केलं आणि ४०० किलोमीटर च अंतर ३४५० किलोमीटर / तास वेगाने ७ मिनिटापेक्षा कमी वेळात कापत त्या बोटीच्या चिंधड्या उडवल्या. हा स्फोट इतका प्रचंड होता की क्षणात बोटीचे तुकडे होऊन तिला जलसमाधी मिळाली. ब्राह्मोस ला संपूर्ण जग वचकून आहे त्याच मूळ कारण त्याच्या वेगापेक्षा त्याची अचूकता आणि त्याच्या स्फोटामुळे होणारं नुकसान हे आहे. या आधीही ब्राह्मोस च्या आधीच्या चाचण्यात फक्त एका ब्राह्मोस च्या वाराने जहाजांची शकले उडत अक्षरशः दोन तुकडे होत जलसमाधी मिळताना जगाने बघितलेलं आहे. ब्राह्मोस च लक्ष्य हे रडार च्या पल्यापेक्षा लांब होतं. जो काही निर्णय लक्ष्याच्या बाबतीत घ्यायचा होता तो ब्राह्मोस ला रस्त्यात घ्यायचा होता. त्याच्याकडे अवघी काही मिनिटे त्यासाठी होती. आता लक्ष्याच्या बाजूने विचार केला तर जेव्हा ब्राह्मोस त्याच्यावर चालून येते आहे हे त्याला समजेल तोवर त्याच्याकडे उत्तर द्यायला फार फार तर १५-२० सेकंदाचा अवधी असेल. कारण ब्राह्मोस अवघ्या १० मीटर उंचीवरून प्रवास करते. या उंचीवरून रडार च्या टप्यात येत नाही. त्यामुळेच ब्राह्मोस एकप्रकारे स्टेल्थ क्षेपणास्त्र आहे. 

या वर्षीच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिवसाचं औचित्य साधत भारताने भारतात बनवलेली विमानवाहू नौका आय.एन.एस. विक्रांत भारतीय नौदलात समाविष्ट होते आहे. तिच्या चाचण्या सध्या सुरु असून आय.एन.एस. विक्रमादित्य आणि विक्रांत साठी लढाऊ विमान विकत घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. आय.एन.एस. विक्रमादित्य वर जरी मिग २९ लढाऊ विमान असली तरी त्यांच आयुष्य जवळपास संपलेलं आहे. गेल्या २ वर्षात ३ लढाऊ विमानांना नौदलाने गमावलेलं आहे. त्यासाठी २०१७ मधे भारतीय नौदलाने ५७ लढाऊ विमानाचं टेंडर काढलं होतं. पण आता ही संख्या २७ पर्यंत कमी करण्यात आली आहे. यासाठी सध्या दोन लढाऊ विमान स्पर्धेत आहेत. एक म्हणजे अमेरिकेचं एफ १८ सुपर होर्णेट तर दुसरं म्हणजे डसाल्ट च राफेल एम. कोणत्याही विमानवाहू नौकेवरील लढाऊ विमानासाठी अतिशय महत्वाचं असते ते त्याच उड्डाण आणि लँडिंग. कारण इकडे धावपट्टी ही हलती असते आणि त्याची लांबी ही कमी असते. सो अश्या छोट्या धावपट्टी वरून उड्डाण आणि लँडिंग करता येणं हे अतिशय महत्वाचं असते. त्यासाठीच या दोन्ही लढाऊ विमानांच्या चाचण्या गोवा इकडे सुरु आहेत. 

अमेरिका जे एफ १८ विमान देणार सांगत आहे. ते त्या विमानाचं सगळ्यात एडव्हान्स व्हर्जन आहे. त्या शिवाय एफ १८ ला अमेरिकन विमानवाहू जहाजांवर अनेक वर्ष वापरण्यात येते आहे. या अमेरिकन विमानाच्या जमेच्या बाजू असल्या तरी फ्रांस च्या राफेल एम पुढे सध्यातरी ते फिकं पडते आहे. राफेल एम च्या छोट्या आकारामुळे विक्रांत च्या डेकवर एकाचवेळी १४ राफेल एम बसू शकतात. तर एफ १८ जास्तीत जास्त १० बसू शकतात. या शिवाय वायू दलात आधीच राफेल असल्याने त्याचा मेन्टनन्स, ट्रेनिंग आणि स्पेअर पार्टस अश्या सर्व गोष्टी एकमेकांसोबत वाटता येतील. त्यामुळे भारताच्या खर्चात बचत होईल. फ्रांस ने या आधीच भारत जेवढी मागेल तेवढी राफेल अगदी तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याच्या अटीसह मान्य केलं आहे. (जर भारताने ११४ विमानांची ऑर्डर दिली तर तंत्रज्ञान हस्तांतरण समाविष्ट आहे.) राफेल एम भारतीय नौदलाच्या स्टोबार चाचणीत यशस्वी ठरलं आहे. STOBAR (Short Take-Off But Arrested Recovery). येत्या मार्च महिन्यात एफ १८ च्या चाचण्या होतील. त्यानंतर भारतीय नौदल यातून एकाची निवड करेल. जी पुढल्या काही महिन्यात अपेक्षित आहे. 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने बंगाल च्या उपसागरात पुन्हा एकदा १९ ते २१ जानेवारी २०२२ साठी नोटॅम प्रसिद्ध केला आहे. हा नोटॅम ७८०  किलोमीटर अंतरासाठी लागू आहे. या काळात कोणत्याही जहाजाला, विमानांना, ड्रोन किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या समुद्रातील हालचालींना बंधन टाकण्यात आलेलं आहे. या काळात डी.आर.डी.ओ. ब्राह्मोस च्या इ. आर. (एक्स्टेंडेड रेंज) किंवा Hypersonic Technology Demonstrator Vehicle (HSTDV) ची चाचणी घेण्याची शक्यता आहे. चीन ने नुकतीच हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्यावर हायपरसॉनिक तंत्रज्ञान लवकरात लवकर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित करण्याचं सुतोवाच भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी केलं होतं. त्या धर्तीवर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था हायपरसॉनिक तंत्रज्ञानाची चाचणी करेल असा कयास आहे. भारत ब्राह्मोस २ किंवा ज्याला ब्राह्मोस के (भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ याच्या नावाच्या पुढे 'के' हे अक्षर लावण्यात आलं आहे.) असं म्हंटल जातं त्याची निर्मिती करत आहे. याचा वेग मॅक ८ (ध्वनीच्या ८ पट) म्हणजे जवळपास ९८०० किलोमीटर / तास इतका प्रचंड असणार आहे. तसेच १००० किलोमीटर वरील कोणत्याही लक्ष्याचा खात्मा करण्याची याची क्षमता असणार आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार भारत २०२५ पर्यंत 'ब्राह्मोस के' प्रत्यक्षात वापरात आणेल असा अंदाज आहे. अजून जगाला ब्राह्मोस ला रोखण्याचं उत्तर मिळालेलं नाही तोवर भारताने हायपरसॉनिक तंत्रज्ञानात केलेली प्रगती अनेक देशांच्या डोळ्यात खुपणारी आहे. 

भारताला संरक्षण क्षेत्रात समृद्ध आणि आत्मनिर्भर करणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या सर्व कर्मचारी , वैज्ञानिक, संशोधक , अभियंते यांच अभिनंदन आणि पुढील चाचण्यांसाठी शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :-  गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  





Tuesday 11 January 2022

कॅससीओपीया ए... विनीत वर्तक ©

 कॅससीओपीया ए... विनीत वर्तक  ©


नासा च्या Imaging X-ray Polarimetry Explorer (IXPE) ने 'कॅससीओपीया ए' या सुपरनोव्हा झालेल्या ताऱ्याचा एक सुंदर फोटो घेतला आहे. हा फोटो खूप सुंदर दिसत आहे. मानवाने केलेल्या तांत्रिक प्रगतीचा एक नमुना या फोटो ला म्हणता येईल. 'कॅससीओपीया ए' हा तारा पृथ्वीपासून ११,०९० प्रकाशवर्ष लांब आपल्या मिल्की वे आकाशगंगेच्या दुसऱ्या आर्म मधे आहे. आता आपण जो फोटो बघत आहोत त्यातील प्रकाश ११,०९० वर्षापूर्वीचा आहे. पण पृथ्वीवर तो आत्ता पोहचत आहे. या ताऱ्याचा स्फोट साधारण १६९० साली झालेला आहे. त्याकाळी जर आपली तांत्रिक क्षमता असती तर हा नजारा विश्वाच्या अनंत पोकळीत बघता आला असता. आज ३३२ वर्षानंतर या ताऱ्याच्या स्फोटातून फेकली गेलेला सगळा भाग तब्बल १० प्रकाशवर्ष अंतरावर पसरलेला आहे. 


'कॅससीओपीया ए' ताऱ्याची प्रकाशमानता सूर्यापेक्षा २,४०,००० ते २,७०,००० पट जास्ती होती असा वैज्ञानिकांचा निष्कर्ष आहे. या रेड जायंट ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या २० ते ५० पट पर्यंत असलं असेल असा अंदाज आहे. लक्षात आलं असेल की किती प्रचंड मोठा हा तारा असेल. आपलं इंधन म्हणजेच हायड्रोजन जाळून झाल्यावर तो आपल्या वस्तुमानाला सांभाळू शकला नाही. सुपरनोव्हा च्या रूपात या ताऱ्याची शकले उडाली. सध्या १० प्रकशवर्ष पसरलेल्या याच्या गॅस आणि धुळीचं तपमान तब्बल ५० मिलियन डिग्री सेल्सिअस असावं असा अंदाज आहे. आता 'कॅससीओपीया ए' ही नवीन ताऱ्यांची भट्टी (नेब्युला) म्हणून अवकाशात प्रसिद्ध आहे. ज्यातून नवीन ताऱ्यांच्या निर्मितीला सुरवात झालेली आहे. हा लेख लिहीपर्यंत विश्वाच्या पोकळीत ८ ते १० असे सुपरनोव्हा फुटत आहेत. जुन्या ताऱ्यांचा अंत होतो आहे तर नवीन ताऱ्यांची निर्मिती ही प्रक्रिया विश्वाच्या पोकळीत न थांबता सुरु आहे. 


विज्ञानतलं काही कळत नसलं तरी अश्या घटना अतिशय रोमांचकारी आहेत. कारण विश्वाच्या तुलनेत आपलं अस्तित्व किती क्षुद्र आहे ते कळते. त्या शिवाय जग कुठे जाते आहे आणि या सगळ्यात आपण कुठे आहोत याचा अंदाज आपल्याला येतो. मला नेहमीच अश्या घटना काहीतरी नवीन शिकवतात. कुठेतरी या विश्वाच्या अंतरंगाची जाणीव करून देतात. त्यासाठीच नासा चा हा फोटो खूप महत्वाचा आहे. 


फोटो सौजन्य :- नासा, अमेरिका 


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Monday 10 January 2022

ठिपक्यांची रांगोळी... विनीत वर्तक ©

 ठिपक्यांची रांगोळी... विनीत वर्तक ©

टी.व्ही. बघण्याची संधी आणि इच्छा खूप कमी वेळा मला होते. त्यातही मराठी मालिका म्हंटल की उरली सुरली इच्छा पण नाहीशी होते. मराठी भाषेशी माझं वावडं नाही पण ज्या पद्धतीच्या मराठी मालिका सुरु असतात. त्यांच कथानक आणि एकूणच सादरीकरण माझ्या पचनी पडत नाही. पण याला अपवाद म्हणून घरी असताना काही दिवस स्टार प्रवाह वरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेने कुठेतरी खिळवून ठेवलं आहे. शरद पोंक्षे, लीना भागवत, मंगेश कदम, सुप्रिया पाठारे, राजन ताम्हाणे अश्या तगड्या कलाकारांसोबत ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, नम्रता प्रधान, तन्वी बर्वे असे काही नवीन कलाकार मिळून ही रांगोळी चांगलीच जमली आहे. 

या मालिकेचं सगळ्यात आवडता भाग म्हणजे त्याच कथानक आणि ज्या पद्धतीने आणि ताकदीने सर्व कलाकारांनी त्याच सादरीकरण केलं आहे. मराठी मालिका बहुतांशी या कुटुंबातील कलहावर आधारित असतात. सासू- सुना, जावई- मुलं, जावा- जावा, काका- काकू ते मामा- मावश्या. कदाचित मराठी प्रेक्षकांना तश्याच पद्धतीच्या मालिका आवडत असतीलही. पण मुळातच कट- कारस्थान रचण्यात अनेक मालिकांच्या कथानकाचे १०० भाग होतात. त्यामुळे मराठी मालिका एकूणच साचेबद्ध असल्याचं माझं व्यक्तिशः मत आहे. पण त्यावर एक वेगळी झुळूक 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेने तूर्तास तरी आणली आहे. कारण मला पुढलं कथानक कसं जाईल याबद्दल माहित नाही. पण निदान हा लेख लिहीपर्यंत ही रांगोळी खूप सुंदर झाली आहे. 

एकत्र कुटुंब पद्धती हा भारतीय समाजाचा पाया आहे. तोच आज कुठेतरी ठासळतो आहे. नक्कीच त्याच्या दोन्ही बाजू आहेत. मी, माझं, स्वतःच, माझ स्वातंत्र्य या सगळ्यात आणि आभासी जगात आपलं स्वतःच अस्तित्व हरवलेलं आहे. नात्यांची वीण सगळ्या बाजूने उसवत चाललेली आहे. चुलत आणि मावस या गोष्टी जवळपास इतिहासजमा झालेल्या आहेत. आज आपले स्वतःचे जन्मदाते आपल्याला डोईजड व्हायला लागले आहेत. तश्याच गोष्टींचा भडीमार मराठी सिरीयल मधून झाला तर त्यात काही नवल नाही. पण यात कुठेतरी ही मालिका उजवी ठरते आहे. त्यामुळेच कुठेतरी ती मला स्वतःला बघताना खूप छान वाटते आहे. स्वभावाचे वेगवेगळे रंग काही नवीन गोष्ट नाही. ते शेकडो वर्ष आणि अनेक पिढ्या असेच आहेत. पण आजच त्याची अडचण व्हायला लागली आहे. याचा अर्थ की आपण रांगोळीचे टिपके चुकीचे जोडत आहोत. कोणीतरी ते योग्य पद्धतीने जोडणारं आज आपल्या कुटुंबात नाही. खऱ्या आयुष्यात माझ्या मते हीच भूमिका सगळ्यात महत्वाची आहे. 

शरद पोंक्षे यांनी साकारलेली विनायक दादांची भूमिका म्हणजेच आपल्या समाजात हरवलेलं ते माणूस. वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांना एकत्र बांधून ठेवताना कोणत्यातरी एका माणसाकडे आपलं स्व बाजूला ठेवून कुटुंबाचा विचार करण्याची जाणीव लागते. त्या जाणिवेला मान देण्याची जरब, प्रेम, जिव्हाळा, शिस्त जेव्हा कुटुंबातील लोकांकडे असते तेव्हा ते टिपके योग्य रीतीने जोडले जातात आणि रांगोळी सुंदर तर होतेच पण त्यात भरणारे रंग आपल्याला न मागता ही खूप काही समाधान देतात. ही गोष्ट जुळून येण्यासाठी त्या व्यक्तीबद्दल नुसतं प्रेम कामाचं नाही तर त्या सोबत जिव्हाळा, त्या व्यक्तीबद्दल आत्मीयता, त्या व्यक्तीबद्दल आणि त्यांनी किंवा तिने घेतलेल्या निर्णयावर विश्वास आणि कोणत्याही परिस्थिती मधे आपण हे आपल्या माणसांसाठी करतो आहोत ही जाणीव असणं सगळ्यात महत्वाचं असते. माझ्या मते विनायक दादांच त्या मालिकेतील पात्र अगदी चपखल या भूमिकेत बसते. 

ठिपक्यांची रांगोळी ही मालिका फक्त मनोरंजन करत नाही तर आज आपल्यातून निसटलेल्या नात्यांचा विचार करायला भाग पाडते. माझ्या मते तेच या मालिकेचं यश आहे. 'अपूर्वा वर्तक' चं पात्र मला तरी व्यक्तिशः खूप आवडलेलं आहे. 'ज्ञानदा रामतीर्थकर' चा अभिनय इतका सुंदर आहे की तो अल्लडपणा तिने लिलया पेलला आहे. अनेकांना तिच्या पत्राबद्दल अतिशोयक्तीपणा, बालिशपणा वाटू शकेल. पण त्यामागे लपलेल्या निरागस भावना संवादातून, आपल्या अभिनयाने ज्या ताकदीने समोर येतात त्या नक्कीच प्रशंसनास पात्र आहेत. ही मालिका खूप पद्धतीने मला कोरियन मालिकेच्या जवळ जाताना वाटली. जिकडे शब्दांशिवाय नुसत्या चेहऱ्यावरच्या अभिनयाने संदेश पोहचवले जातात. तिच्या हळदीच्या वेळी झालेला आजीसोबतचा संवाद आणि तो भाग तर मला खूप आवडला. नवीन आणि जुन्या पद्धतीने आज सुद्धा इतक्या चांगल्या रीतीने पुढे नेलं जाऊ शकते. हे बघणं नक्कीच आनंद देणारं होतं.   

एकूणच काय तर 'ठिपक्यांची रांगोळी' खूप सुंदर पद्धतीने रंगली आहे. ही रांगोळी कितपत रंगेल या बद्दल आत्ता काही बोलणं योग्य राहणार नाही. कारण अनेकदा अश्या छान मालिका कथानक भरकटल्याने डोक्याला शॉट होतात हे आधी अनुभवलेलं आहे. पण कुठेतरी नक्कीच अनेक मराठी मालिकांच्या गर्दीत या मालिकेचं वेगळेपण सध्यातरी दिसून येते आहे. कुटुंब हेच आपल्या समाजाचा पाया आहे. जोवर तुम्ही ते बांधून ठेवता तोवर कोणत्याही संकटाला तुम्ही सामोरं जाऊ शकतात. त्याचे तुकडे पाडायला वेळ लागत नाही. वेळ लागतो ते निभावून न्यायला. त्यासाठी सगळ्याच रंगाची सोबत गरजेची असते. त्या सगळ्या रंगांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या त्या ठिपक्यांची सुद्धा. म्हणूनच 'ठिपक्यांची रांगोळी' बघताना हेच सगळं अनुभवतो आहे. 

फोटो शोध सौजन्य :-  गुगल  

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Monday 3 January 2022

आम्ही भारतीय... विनीत वर्तक ©

 आम्ही भारतीय... विनीत वर्तक ©

आम्ही अमेरिकन नाहीत ज्यांनी ११ वर्ष दुसऱ्यांच्या जमिनीवर आपला झेंडा गाडला आणि जाता जाता ८५ बिलियन अमेरिकन डॉलर ची शस्त्रास्त्र तालिबानी लोकांच्या हवाली केली. आम्ही रशियन नाहीत ज्यांनी कोणाची भूमी काबीज केली आणि नरसंहार केला, लोकांना देश सोडण्यासाठी प्रवृत्त केलं. आम्ही चिनी नाहीत ज्यांनी फक्त आपलं वर्चस्व आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आर्थिक गाजरं दिली. आम्ही पाकिस्तानी तर मुळीच नाही ज्यांनी फक्त धर्माच्या नावाखाली निरपराधी लोकांच्या रक्ताचे पाट वाहिले. आम्ही आहोत भारतीय ज्यांच्या मनगटात तोडीस तोड उत्तर देण्याची ताकद आहे. बंदुकीची गोळी देशासाठी झेलणारी छाती आहे. आम्ही शस्त्र उचलतो ते फक्त मातृभूमीच्या रक्षणासाठी अन्याय करण्यासाठी नाही आणि वर्चस्व गाजवण्यासाठी तर मुळीच नाही. १५० वर्ष पारतंत्र्यात घालवून पण आम्ही आज आत्मनिर्धरतेच्या लक्ष्याकडे सगळ्याच क्षेत्रात वाटचाल करत आहोत. 

जेव्हा संपूर्ण जग फक्त बैठका बोलावून चर्चा करते तेव्हा आम्ही कोणताही गाजावाजा न करता मदत करतो. एकीकडे आम्ही एका दिवसात १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ४१ लाख मुलांच लसीकरण करतो. त्याचवेळी सगळ्यांनी आपापल्या मतलबा साठी ज्या लोकांचा वापर केला आणि मग वाऱ्यावर सोडलं त्या लोकांसाठी भारताने माणुसकीच्या दृष्टिकोनातून ५ लाख कोरोना लसी पाठवून दिल्या आहेत. भारत- अफगाणिस्तान अशी विमानसेवा सध्या उपलब्ध नाही. त्यावर उपाय म्हणून भारताने या लसी इराण च्या मदतीने इंदिरा गांधी हॉस्पिटल, काबुल इकडे सुरक्षितरित्या पोहचवल्या आहेत. भारताने यासाठी कोणतं कर्जाचं गाजर किंवा त्याच्या बदल्यात तालिबानी सरकारकडून मदतीची अपेक्षा केलेली नाही. भारताने स्वखर्चाने ही सगळी मदत माणुसकीच्या दृष्टिकोनातून केलेली आहे. 

कोणी म्हणेल की विष ओकणाऱ्या सापासाठी काय माणुसकी दाखवायची पण काही साप विषारी असले म्हणून संपूर्ण साप विषारी नसतात. त्यामुळेच ही मदत तिथल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना, जेष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. हे पाऊल कोणाला पटो वा न पटो पण भारताची ही भूमिका हजारो वर्षापासून हीच आहे आणि हीच राहील. जो आमच्या भूमीवर वाईट नजर ठेवेल त्याला आम्ही दगडाने शोध घेऊन ठेचूच पण त्यासाठी निरपराधी लोकांवर दगडफेक करणार नाही. या पलीकडे जो समुद्र जगातील सगळ्यात धोकादायक समुद्र समजला जातो. निसर्गामुळे नाही तर तिकडे होणाऱ्या चाचेगिरीमुळे अश्या सोमालियाच्या आखातात युनायटेड नेशन कढून जाणाऱ्या ३०३० टन खाण्याचं सामान घेऊन जाणारं एम.व्ही.जुईस्ट या जहाजाला बारबेरा ते मोगादिशू हा ३००० किलोमीटर चा सगळ्यात धोकादायक प्रवास सुरक्षित करून देण्याची जबाबदारी भारतीय नौदलाला देण्यात आली होती. जिकडे प्रत्येक क्षणाला जहाजावर हल्ला होण्याची भीती असते त्या अतिशय धोकादायक प्रवासाची सूत्र भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. ऐरावत ने समर्थपणे पेलली. युनायटेड नेशन च्या एम.व्ही.जुईस्ट जहाजाचा संपूर्ण प्रवास सुरक्षित करताना भारतीय नौदलाने पुन्हा एकदा भारताची 'वसुधैव कुटुंबकम' ही भूमिका अधोरेखित केली. 

युनायटेड नेशन च्या #UNWFP या कामाला २०२० साली नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. एम.व्ही.जुईस्ट हे जहाज याच कामाच्या अंतर्गत ही मदत मानवतेच्या दृष्टिकोनातून करत होतं. खेदाची बाब हीच की ज्यांच्यामुळे शांती प्रस्थापित होते ते मात्र आपलं काम पडद्यामागून शांतपणे करत असतात. ना त्यांना कोणत्या पुरस्काराची ओढ असते ना त्यांना त्याबद्दल चा काही गर्व असतो. पुरस्काराच्या बाबतीत पडद्यामागचा खेळ आपल्याला काही नवीन नाही. साध्या कार्यक्रमाला स्टेजच्या खुर्चीवर बसण्यासाठी पडद्यामागून राजकारण खेळणारे आपल्या गल्लीत असतात तर आंतरराष्ट्रीय पातळीवर का नसतील. पण त्यामुळे आपण आपलं चांगलं काम थांबवायचं नसते कारण आपली उद्दिष्ठ आणि लक्ष्य त्यापेक्षा बऱ्याच उंचीवर असते. 

ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली दिवस रात्र गळे काढून विष ओकणाऱ्या मिडिया मधील एकाला सुद्धा याची ब्रेकिंग न्यूज करावीशी वाटली नाही. यावरून चौथ्या स्तंभाचा आधार नक्की कसला आहे हे स्पष्ट होते. अर्थात त्यांचे ही हात दगडाखाली अडकलेले असतील. पण त्यामुळे गोष्टी लपून रहात नाहीत. १०० नंबरी सोनं हे खणखणीत असते ते कुठेही चकाकते. आमच्यात कितीतरी कमतरता असतील, आम्ही कितीतरी चुका करत असू, आम्ही खड्यात पडत असू पण आम्ही भारतीयांनी आमची संस्कृती सोडलेली नाही. ती कोणत्या जातीवर, धर्मावर, पंथावर, आणि कोणत्या देशाशी निगडित नाही तर ती सर्वसमावेशक आहे. त्यासाठी मला आणि इतर तमाम भारतीय लोकांना भारतीय असल्याचा अभिमान नेहमीच वाटत राहील. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :-  गुगल  

१) पहिल्या फोटोत आय.एन.एस. ऐरावत युनायटेड नेशनच्या एम.व्ही.जुईस्ट जहाजाला दक्षिण सोमालियाच्या समुद्रात सुरक्षित नेताना. 

२) दुसऱ्या फोटोत भारताकडून कोवॅक्सीन चे ५ लाख डोस अफगाणिस्तान च्या भूमीवर.(फोटो सौजन्य :- वियोन) 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.






Saturday 1 January 2022

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १६ )... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १६ )... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात काही महत्वपूर्ण घटना भारताच्या दृष्टीने जागतिक पटलावर घडलेल्या आहेत. गेली अनेक दशके खरे तर स्वातंत्र्यानंतर भारत रक्षा प्रणालींचा आयात करणारा देश म्हणून प्रसिद्ध होता. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कोट्यवधी ते अब्जोवधी चे व्यवहार रक्षा क्षेत्रात होत होते. या अब्जो रुपयांच्या व्यवहारात दलाली, लाचखोरी ही मोठ्या प्रमाणावर होत होती. भारतात घडलेली 'बोफोर्स' सारखी प्रकरणे जागतिक मंचावर भारताची खिल्ली उडवण्यासाठी आजही वापरली जातात. पण गेल्या काही वर्षात वाऱ्यांनी दिशा बदललेली आहे. भारताने आपल्या संरक्षणासाठी लागणाऱ्या गोष्टी देशातच बनवण्यावर भर दिला. 'मेक इन इंडिया' सारख्या योजनांमधून जास्तीत जास्त रक्षा उत्पादन ही भारतात बनवण्यासाठी चालना मिळाली. त्यामुळेच गेल्या काही वर्षात भारतात रक्षा प्रणालींची आयात मोठ्या प्रमाणावर घटली आहे. गेल्या वर्षात तर ही घट तब्बल ३३% इतकी नोंदली गेली आहे. याचा सरळ अर्थ आहे की भारताचं परकीय चलन यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाचलं तर आहेच. पण देशांतर्गत निर्मितीमुळे देशात रोजगाराची निर्मिती झाली आहे. यावर न थांबता आता भारत रक्षा प्रणाली निर्यात करण्याच्या मार्गावर प्रस्थान करू लागला आहे. भारताचा रक्षा प्रणाली निर्याती मधील उदय गेल्या आठवड्यातील काही घटना स्पष्टपणे दर्शवित आहेत. 

सौदी अरेबिया हा जगातील रक्षा प्रणाली आयात करणारा सगळ्यात मोठा देश आहे. भारताच्या संपूर्ण रक्षा अंदाजपत्रकापेक्षा त्यांनी मागणी नोंदवलेल्या रक्षा प्रणालीचा आकडा मोठा आहे. भारताचं रक्षा अंदाजपत्रक जवळपास ७० बिलियन (१ बिलियन = १०० कोटी) अमेरिकन डॉलर इतकं आहे. तर सौदी अरेबिया ने येत्या काळात फक्त अमेरिकेकडून विकत घेतलेल्या रक्षा प्रणालीची किंमत ११० बिलियन अमेरिकन डॉलर च्या घरात आहे. येत्या १० वर्षात अजून ३५० बिलियन अमेरिकन डॉलर ची रक्षा प्रणाली सौदी अरेबिया अमेरिकेकडून विकत घेणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की भारताच्या दृष्टीने नक्की वाऱ्यांनी काय दिशा बदलली आहे? तर गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकन सरकार आणि सौदी अरेबिया मधील नेतृत्व यांच्यात धुसपूस सुरु आहे. याशिवाय अमेरिकेवर रक्षा प्रणालीच्या बाबतीत इतकं अवलंबून राहणं सौदी नेतृत्वाला अस्वस्थ करत आहे. सौदी कडे दुसरे पर्याय होते ते म्हणजे युरोपियन युनियन, रशिया, चीन आणि शेवटी भारत. 

रशिया कडून रक्षा प्रणाली घेणं म्हणजे अमेरिकेचा रोष ओढवून घेणं जे की सौदी आत्ता करू शकत नाही. येमेन मधे निष्पाप लोकांवर बॉम्ब टाकण्यासाठी युरोपियन युनियन चा रोष सौदी वर आहेच. आता राहिला चीन. तर सौदी ने चीन कढून काही रक्षा प्रणाली घेतल्या. त्यांची अवस्था 'आ बैल मुझे मार' अशी झाली. चीन च्या मिसाईल नी दगा दिल्यानंतर सौदी अरेबिया चा चीन वरून विश्वास पूर्णपणे तुटला आहे. आपलीच माणसं चीन च्या मिसाईल ने मारली जातील अशी एक भीती सौदी ला सध्या वाटते आहे. त्यामुळेच सौदी अरेबिया ने भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे. या संदर्भातला एक मोठा करार नुकताच Power For Defense Technologies Co (PDTC) सौदी अरेबिया आणि Bharat Electronics Limited (BEL) भारत यांच्यात झाला आहे. या करारा प्रमाणे दोन्ही देश संरक्षण क्षेत्रात एकमेकांशी भागीदारी करू शकणार आहेत. ज्या मधे एकमेकांच्या रक्षा प्रणाली ची खरेदी-विक्री ही समाविष्ट आहे. सौदी अरेबीया ला भारताच्या 'आकाश' मिसाईल डिफेन्स प्रणालीत रस आहे. आता या करारामुळे सौदी अरेबिया भारताशी कधीही या प्रणालीच्या खरेदी बाबत तसेच इतर प्रणालीच्या खरेदी बाबत करार करू शकणार आहे. सौदी अरेबिया सारखा ग्राहक जर भारताशी जोडला गेला तर भारतासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट असणार आहे. आकाश नंतर सौदी अरेबिया ला भारताच्या 'तेजस' विमानात ही रस आहे. 

जगातील सगळ्यात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल 'ब्राह्मोस' च्या खरेदीसाठी फिलिपाइन्स ने तब्बल २.८ बिलियन पेसोस (५५ मिलियन अमेरिकन डॉलर) ची रक्कम बाजूला ठेवली आहे. याशिवाय भारताने फिलिपाइन्स ला १०० मिलियन अमेरिकन डॉलर ची क्रेडिट लाईन दिली आहे. आता कोणत्याही क्षणी भारत आणि फिलिपाइन्स यांच्यामधे ब्राह्मोस खरेदी- विक्री च्या व्यवहाराची घोषणा होऊ शकेल. कारण या आधीच भारताने ब्राह्मोस च्या विक्रीतील सगळे अडथळे पार केले आहेत म्हणजेच रशियाची मंजुरी घेतलेली आहे. जे ब्राह्मोस आपण फिलिपाइन्स ला विकणार आहोत त्याची क्षमता २९० किलोमीटर पर्यंतच आहे. भारताचं ४०० किलोमीटर पेक्षा जास्त क्षमता असलेलं ब्राह्मोस मात्र आपण अजून विकेलेलं नाही. एका अभ्यासानुसार भारताकडे आजच्या क्षणाला तब्बल १४,००० पेक्षा जास्ती ब्राह्मोस क्षेपणास्त्र तयार स्थितीत आहेत. यातील जवळपास सगळीच भारताच्या सरहद्दीवर भारताच्या संरक्षणासाठी तैनात केली गेली आहेत. ब्राह्मोस घेण्यासाठी अनेक देश रांगा लावून उभे आहेत. या पहिल्या करारा नंतर इतर देशांच्या पुढल्या करारांचा मार्ग मोकळा होणार आहे. यातील बहुतांश देश हे साऊथ चायना सी मधील तर काही दक्षिण अमेरिकेतील आहेत. ज्यांना ब्राह्मोस देण्यासाठी रशियाला कोणतीही अडचण असणार नाही. ब्राह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तरीत्या विकसित केल्याने त्याची विक्री इतर देशांसोबत करण्यासाठी रशियाच्या परवानगीची गरज आहे.  

डोक्यावर पडलेल्या पाकिस्तान ने पुन्हा एकदा आपल्या अकलेची दिवाळखोरी सिद्ध केली आहे. भारताच्या राफेल ला टक्कर देण्यासाठी २५ जे १० सी लढाऊ विमान चीन कडून विकत घेतली आहेत. राफेल च्या सोबत कोणत्याही पद्धतीने बरोबरी करू न शकणाऱ्या जे १० सी च्या खरेदीने संपूर्ण जग नाही तर पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानी सरकारची खिल्ली उडवत आहेत. आपल्याकडे असलेली जुनी एफ १६ राफेल ला जास्ती चांगली टक्कर देऊ शकतात असं म्हणत पाकिस्तानी सरकारचे वाभाडे तिथल्याच जनतेने वेशीवर टांगले आहेत. जिकडे चीन च्या सगळ्यात अद्यावत असणाऱ्या जे २० लढाऊ विमानाला राफेल ला टक्कर देताना घाम फुटेल तिकडे राफेल ला टक्कर देईल अशी लढाऊ विमान एकतर जगात अगदी मोजकी आहेत. अर्थातच ती घेण्याची कुवत पाकिस्तानकडे नाही हे सत्य पाकिस्तान ला पचवायला जड जाते आहे. राफेल, ब्राह्मोस आणि एस ४०० अश्या तिहेरी सर्वोत्तम प्रणाली समोर आपली परमाणू क्षेपणास्त्र कराची पण पार करू शकत नाहीत हे पाकिस्तान ला कळून चुकलं आहे. 

गेल्या आठवड्यातील या घटना जागतिक पातळीवर भारताच्या बदलत जाणाऱ्या प्रतिमेचे द्योतक आहेत. वाऱ्यांची दिशा आता आयाती कडून निर्याती कडे बदललेली आहे. ही बदललेली दिशा भारतासाठी येणाऱ्या काळात खूप काही सकारात्मक बदल मग ते आर्थिक बाबतीत, राजकीय बाबतीत, आंतरराष्ट्रीय दबदबाच्या बाबतीत घडवून आणणार आहेत. तूर्तास या वाऱ्यांचा आनंद आपण भारतीय म्हणून घेऊ यात. 

जय हिंद 

फोटो शोध सौजन्य :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.