Monday 28 June 2021

'अग्नी-पी' (प्राईम) एक नवं तंत्रज्ञान... विनीत वर्तक ©

 'अग्नी-पी' (प्राईम) एक नवं तंत्रज्ञान... विनीत वर्तक ©


२८ जून २०२१ रोजी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी ओरीसामधील अब्दुल कलाम बेटावरून 'अग्नी-पी' (प्राईम) या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. डी.आर.डी.ओ. ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही चाचणी १००% यशस्वी झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. भारताकडे सध्या 'अग्नी' या सिरीजमधील अग्नी १, अग्नी २, अग्नी ३, अग्नी ४ आणि अग्नी ५ अशी बॅलेस्टिक मिसाईल आहेत. मग असं असताना हे नवीन क्षेपणास्त्र काय आहे? त्याने भारताच्या तांत्रिक क्षमतेत कश्या पद्धतीने बदल होणार आहेत हे समजून घेतलं पाहिजे. 

१९८० मधे  डी.आर.डी.ओ. ला  Integrated Guided Missile Development Programme (IGMDP) या प्रोग्रॅमच्या अंतर्गत बॅलेस्टिक मिसाईल बनवण्याचं काम देण्यात आलं होतं. पुढे जाण्याआधी आपण हे समजून घेतलं पाहिजे, की बॅलेस्टिक मिसाईल म्हणजे काय? बॅलेस्टिक मिसाईल म्हणजे जे मिसाईल (क्षेपणास्त्र) जमिनीवरून अवकाशात जातात आणि तिथून पुन्हा जमिनीवर येऊन आपलं लक्ष्याचा वेध घेतात. दुसरी म्हणजे क्रूझ मिसाईल (उदाहरण म्हणजे 'ब्राह्मोस' जे की क्रूझ मिसाईल आहे). तर क्रूझ मिसाईल जमिनीलगत प्रवास करतात आणि आपला लक्ष्याचा वेध घेतात. तर वेगवेगळ्या अंतरावर असणाऱ्या लक्ष्यांचा वेध घेण्यासाठी डी.आर.डी.ओ. ने अग्नी बॅलेस्टिक मिसाईल सिरीज बनवलेली आहे. त्यांच्या नंबरप्रमाणे यांची लांबच्या लक्ष्याला भेदण्याची क्षमता वाढत जाते. तूर्तास अग्नी ५ हे मिसाईल सगळ्यात जास्ती अंतरावर जाऊ शकते. याचा पल्ला ५००० किलोमीटरपेक्षा जास्त असून १५०० किलोग्रॅम वजनाचं न्यूक्लिअर वॉरहेड नेण्याची याची क्षमता आहे. आपल्या टर्मिनल फेज म्हणजेच शेवटच्या टप्यात अग्नी ५ चा वेग हा २४ मॅक (ध्वनीच्या वेगाच्या २४ पट ) इतका प्रचंड असतो. त्यामुळे याला रोखणं अशक्य आहे. अग्नी ५ चा पल्ला ६००० किलोमीटर पलीकडे असल्याचा अनेक तज्ञांचा अभ्यास आहे. भारत जाणूनबुजून याची क्षमता कमी सांगत असल्याची चर्चा आहे. तर इतक्या लांबच्या क्षमतेमुळे संपूर्ण चीन भारताच्या अवाक्यात येतो. याचा अर्थ भारताच्या भूमीवरून आपण अग्नी ५ सोडलं तर चीनच्या कोणत्याही गावाला, शहराला लक्ष्य करण्याची आपली क्षमता आहे. 

अग्नी ४ आणि अग्नी ५ बनवताना डी.आर.डी.ओ. ला अनेक नवीन तंत्रज्ञानं विकसित करावी लागली. म्हणजे मिसाईलला इतक्या लांब जाण्यासाठी रस्ता दाखवणारी नेव्हिगेशन प्रणाली, त्याला लागणारं जी.पी.एस., त्याच्या निर्मितीत वापरलं जाणारं इंधन तसेच त्याला हलकं करण्यासाठी आणि शत्रूच्या रडारपासून वाचवण्यासाठी लागणारं कंपोझिट मटेरियल. या दोन्ही मिसाईलच्या यशस्वी चाचण्यानंतर असं लक्षात आलं की हे तंत्रज्ञान आपण आधी निर्माण केलेल्या मिसाईलमध्ये वापरून बघितलं तर? त्याचं उत्तर आहे, डी.आर.डी.ओ. ने विकसित केलेलं संपूर्ण नवीन तंत्रज्ञानावर आधारित 'अग्नी-पी' (प्राईम) हे मिसाईल. 'अग्नी-पी' हे आपल्या भावंडांपासून अतिशय वेगळं मिसाईल आहे. या मिसाईलची क्षमता १०००- २००० किलोमीटर वरील लक्ष्याला नष्ट करण्याची आहे. जी की आपल्याकडे अग्नी १ आणि अग्नी २ मधे आहे. पण 'अग्नी पी' ला सगळ्यात जास्ती तंत्रज्ञानातील लाभ होतो तो वजनात. याचं वजन तितकीच क्षमता असताना अग्नी ३ च्या अवघं ५०% आहे. याच्या निर्मितीत कंपोझिट मटेरियल वापरल्यामुळे ते जास्ती स्टेल्थ आणि हलकं झालं आहे. 

'अग्नी-पी' हे कॅनिस्टर डिझाईन मिसाईल आहे. तर याचा अर्थ काय? तर कोणतंही मिसाईल हे हल्ला करण्यासाठी एखाद्या ठिकाणाहून डागता येते. त्याच्या वजनामुळे किंवा त्यात वापरल्या जाणाऱ्या इंधनामुळे त्याची ने-आण दुसरीकडे करणं सहज शक्य नसते, तसेच त्यात धोका असतो. पण समजा आपण मिसाईल आणि त्याच्या इंधनाला एखाद्या कंटेनरमध्ये सील केलं ज्याप्रमाणे शीतपेय एखाद्या कॅनमध्ये ठेवलेली असतात. त्यांची ने-आण आपण कुठेही सुरक्षितरीत्या करू शकतो जरी त्यात गॅस दाबाखाली असला तरी. त्याचप्रमाणे 'अग्नी पी' हे एखाद्या कॅनिस्टर मधे बसवलेले असते. ते त्याच्या वाहनावरून भारताच्या कोणत्याही भागात रेल्वे, रस्ते, बोटीतून नेले जाऊ शकते. म्हणजे उद्या लडाखमधून डागायचं आहे तर तिकडे ट्र्क नेऊन थांबवला. उद्या मुंबईच्या दादरमधून किंवा पुण्याच्या डेक्कनवरून पण ते डागता येऊ शकते. यामुळे 'अग्नी-पी' नक्की कुठून डागलं गेलं याचा अंदाज शत्रूला येतं नाही. त्याचवेळी ते जवळपास १५०० किलोग्रॅम (अंदाजानुसार) न्यूक्लिअर वॉरहेड घेऊन जाण्यास सक्षम आहे.

'अग्नी-पी' मध्ये दोन स्टेज सॉलिड इंधनाचा वापर केला असून याचा circular error probable (CEP) हा जवळपास १० मीटर आहे. याचा अर्थ काय तर जे लक्ष्य मिसाईलला दिलं आहे त्याच्या १० मीटरच्या क्षेत्रात ते मिसाईल गाठणार. 'अग्नी-पी' हे २००० किलोमीटरवरील लक्ष्य १० मीटरच्या अचूकतेने वेध घेऊ शकते. इतकी अचूकता मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या नेव्हिगेशन प्रणाली यात बसवाव्या लागतात. आधी सांगितलं तसं हे बॅलेस्टिक मिसाईल असल्याने जेव्हा अवकाशातून पुन्हा जमिनीवर यायला सुरूवात करते, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे याचा वेग प्रचंड वाढतो. इतक्या प्रचंड वेगात जागा बदलणाऱ्या लक्ष्याचाही वेध ते घेऊ शकते. त्यासाठी यात रिएन्ट्री वेहकल मोटर्स बसवण्यात आल्या आहेत. ज्या कंपोझिट मटेरीअलने बनवलेल्या आहेत. नेव्हिगेशन प्रणालीकडून मिळालेल्या संदेशाला ग्रहण करून लक्ष्याच्या बदललेल्या जागेप्रमाणे मिसाईलला गाईड करतात. एक प्रकारे लक्ष्याचा मागोवा घेत त्याला नष्ट करण्याची प्रणाली 'अग्नी-पी' मध्ये आहे. 

काल झालेल्या चाचणीत अश्याच प्रकारे लक्ष्य देऊन त्याला डागण्यात आलं. उड्डाणापासून ते लक्ष्याचा वेध घेईपर्यंत प्रत्येक मार्गाचा वेध निरनिराळया सॅटेलाईट्स गायडन्स आणि नेव्हिगेशन यंत्रणांकडून घेण्यात आला. डी.आर.डी.ओ. ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाप्रमाणे 'अग्नी-पी' ने १००% अचूकतेने लक्ष्यभेद केला. याचा अर्थ ते ज्या पद्धतीने मिसाईल जाणं अपेक्षित होतं, त्याच मार्गाने त्याने संपूर्ण चाचणीत मार्गक्रमण केलं. ही अचूकता 'अग्नी-पी' ला पहिल्याच प्रयत्नात मिळालेली आहे. यासाठी डी.आर.डी.ओ. चे वैज्ञानिक, संशोधक, अभियंते आणि 'अग्नी-प्राईम' च्या संपूर्ण चमूचं अभिनंदन आणि पुढल्या चाचण्यांसाठी शुभेच्छा. 'अग्नी-पी' भारताच्या सुरक्षितेत महत्वाची भूमिका येत्या काळात बजावेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल  (पहिल्या फोटोत 'अग्नी-पी' उड्डाण भरताना तर दुसऱ्या फोटोत कॅनिस्टर डिझाईन ) 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Saturday 26 June 2021

#खारे_वारे_मतलई_वारे (भाग ११)... विनीत वर्तक ©

#खारे_वारे_मतलई_वारे (भाग ११)... विनीत वर्तक ©

आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा वाऱ्यांनी दिशा बदलायला सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांतल्या घटनांनी याचे सूतोवाच केले आहे. या घटना भारताच्या शेजारील देशांमध्ये घडणाऱ्या असल्याने त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम भारताला भोगावे लागणार आहेत. भारत या सगळ्यांत काय बाजू घेतो, हे सध्या गुलदस्त्यात असलं तरी भारताने घेतलेली कोणतीही बाजू चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम दाखवू शकते. त्यामुळे येत्या काळात आंतरराष्ट्रीय पटलावर काय घडामोडी घडतात त्यावर भारताची भूमिका ठरणार आहे. 

सध्या पाकिस्तान आपल्या घरात सुरू असलेल्या धुसफुशींमुळे त्रस्त आहे. एकीकडे इम्रान खान यांच्याविरुद्ध सामान्य जनतेत आक्रोश वाढीला लागला आहे, तर दुसरीकडे इम्रान खान स्वतः कचाट्यात सापडलेला आहे. धर्मवेडे सांस्कृतिक रक्षक आणि त्यांनी जोपासलेला आतंकवाद एका बाजूला, तर दुसरीकडे पाकिस्तानची आर्थिक बाजूवर खालावलेली स्थिती यांतून मार्ग काढणं सध्या कठीण झालेलं आहे. नुकत्याच झालेल्या Financial Action Task Force's (FATF) च्या बैठकीत आखून दिलेल्या मुद्यांवर योग्य ती कारवाई न केल्याने पाकिस्तानला पुन्हा एकदा 'ग्रे' लिस्ट मध्ये ठेवण्याचा निर्णय एफ.ए.टी.एफ.च्या समितीने घेतला आहे. ग्रे लिस्ट मध्ये राहिल्यामुळे अवघ्या काही वेळात पाकिस्तानला तब्बल ३८ बिलियन अमेरिकन डॉलरचं नुकसान झालेलं आहे. आधीच भीकेला लागलेल्या पाकिस्तानसाठी हे नुकसान प्रचंड आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अर्थव्यवस्थेला याचे चटके बसणार आहेत. 

पाकिस्तान जर योग्य कारवाई करण्यात सतत अपयशी ठरला, तर त्याची रवानगी ब्लॅक लिस्ट मध्ये होऊ शकते आणि तसं झाल्यास देशाचे धिंडवडे निघणार आहेत याची पूर्ण कल्पना इम्रान खानला आहे. जर ग्रे लिस्ट मधून बाहेर यायचं असेल, तर अतिरेकी कारवाया आणि त्यांना होणारा पैश्याचा पुरवठा हा त्वरित थांबवणं गरजेचं आहे. इच्छा नसतानासुद्धा पाकिस्तानला अतिरेकी कारवायांवर अंकुश ठेवावा लागत आहे आणि त्याचेच परिणाम म्हणजे लोकांमध्ये, सैन्यात वाढणारा असंतोष. पाकिस्तान सैन्य प्रमुख बाजवा यांच्या विरोधात सैन्यामध्ये गट पडले असून गेल्या काही दिवसांत त्यांना पदच्युत करण्यासाठी उठाव सुरू झाला आहे. काही तासांपूर्वीच १४ पाकिस्तानी सैन्य ऑफीसरांना पकडलं गेलं आहे. ज्यांत कर्नल, ब्रिगेडिअर रँकचे अधिकारी आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबाला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. आत्तापर्यंत ७३ पाकिस्तानी सैन्य ऑफीसरांना जेलमध्ये टाकलं गेलं आहे. (अंदाजानुसार ). पण हे बदललेले वारे उद्या येणाऱ्या वादळाची नांदी आहेत जे पाकिस्तानच्या डोक्यावर घोंघावत आहे. या गोष्टी भारतासाठी चांगल्या असा विचार अनेकजण करतील, पण अश्या उठावाचे पर्यावसान अनेकदा युद्धामध्ये होण्याची शक्यता जास्ती असते. ज्याचा फटका भारताला नक्कीच बसू शकतो. तूर्तास जोवर त्यांच्या घरात भांडणं चालू आहेत, तोवर कदाचित भारत पडद्यामागून तेल ओतायचे काम करेल. भारताची चिंता तेव्हाच असेल जेव्हा हा भडका वेशीवर येऊन ठेपेल. 

दुसरी एक महत्वाची घटना घडते आहे ती अफगाणिस्तान मध्ये. अमेरिकेने आपलं सैन्य ११ सप्टेंबर २०२१ पर्यंत अफगाणिस्तानमधून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच अमेरिका अफगाणिस्तानमधून हळूहळू बाहेर पडत होती, पण आता त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. हा निर्णय बाहेर येत नाही तोवर तालिबानी फौजांनी अफगाणिस्तानच्या उत्तर भागातील तजाकिस्तानच्या सीमेवर कुंडुझ भागावर पुन्हा आपला झेंडा फडकावला आहे. १४० शरणार्थी तजाकिस्तानमध्ये पळून गेले, तर १०० जणांना तालिबानने बंदी बनवलं आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून जायची घोषणा व्हायच्या आत तालिबानने आपलं वर्चस्व वाढवायला पुन्हा एकदा सुरूवात केली आहे. १९९६ ते २००१ पर्यंत अफगाणिस्तानात तालिबानी राजवट होती आणि तेव्हाच घातक अश्या 'अल कैदा' सारख्या संघटनांनी आपली पाळंमुळं इकडे पसरवली होती. २६७० किलोमीटर लांबीची सीमा अफगाणिस्तानसोबत सामायिक करणाऱ्या पाकिस्तानने तालिबानी राजवटीला सर्वतोपरी मदत केली होती. इतकंच काय तर अमेरिकेसाठी 'मोस्ट वॉन्टेड' असणाऱ्या ओसामा बिन लादेनलाही आपल्या भागात पाकिस्तानने लपवून ठेवलं होतं हा इतिहास आहे. 

तालिबानने युद्धाला सुरूवात करताच पाकिस्तानच्या इम्रान खान यांनी काल न्यूयॉर्क टाइम्सला मुलाखत देताना स्पष्ट केलं, 

“let me assure you, we will do everything except using military action against the Taliban”.

Imran Khan

त्याचवेळेला हे स्पष्ट केलं, की ज्या कोणाला अफगाण लोक स्वीकारतील त्याच्या सोबत आम्ही आहोत. आता तालिबान ज्या वेगाने अफगाणिस्तानवर कब्जा करते आहे, ते बघता पाकिस्तानला नक्की काय हवं आहे हे समजून घ्यायला आंतरराष्ट्रीय समीक्षकाची गरज नाही. पाकिस्तान छुप्या आणि उघड पद्धतीने तालिबानला सपोर्ट करणार हे स्पष्ट आहे. फरक इतकाच की आता या गोष्टी पाकिस्तानवर ही बूमरँग होऊ शकतात. कारण तालिबानमधली धार्मिक राजवट पाकिस्तानमधल्या धार्मिक कट्टरपंथी लोकांना पुन्हा एकदा जागृत करेल आणि पाकिस्तान पुन्हा एकदा अतिरेक्यांसाठी 'सेफ हेवन' बनण्याकडे वाटचाल करेल. 

या सगळ्यांत भारताची तारेवरची कसरत होणार आहे. आजवर भारताने तालिबानी राजवटीला नाकारलेलं आहे. भारताची भूमिका ही नेहमीच अफगाण लोकांनी प्रजासत्ताक पद्धतीने निवडून दिलेल्या सरकारला होती. भारताच्या पुढाकाराने अफगाणिस्तानमध्ये अनेक गोष्टींवर काम सुरू आहे. जर का पुन्हा तालिबानी सरकार प्रस्थापित झालं, तर भारताचा रोख काय असणार आहे हे सध्या तरी सांगणं सोप्पं नाही. तालिबानी सरकार आणि भारत सरकार यांच्यात जर सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले, तर ते पाकिस्तानला नको आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर अतिरेकी घडवण्यासाठी करण्याचा पाकिस्तानचा मानस आहे. अर्थात या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. पण अमेरिकी गप्तचर संघटनांच्या अहवालानुसार येत्या ६-१२ महिन्यात अफगाणिस्तानमध्ये सत्ता बदल होऊ शकतो. नक्कीच ही गोष्ट भारतासाठी चिंतेचा विषय आहे. 

खालावलेली आर्थिक स्थिती, सैन्य तैनात करण्यासाठी होणारा खर्च, तिथल्या अमेरिकन सैनिकांची सुरक्षितता याचसोबत अमेरिकेचा अफगाणिस्तानात राहण्याचं कोणतंच उद्दिष्ट राहिलं नसल्याने अमेरिका हे पाऊल उचलणार हे क्रमप्राप्त होतं आणि याच संधीची वाट तालिबान लोक बघत होते. आता ती संधी उपलब्ध झाली आहे, जोडीला पाकिस्तानही छुपी मदत करणार हे उघड आहे. त्यामुळे या बदललेल्या वाऱ्यांचं येत्या काळात कोणत्या वादळात रूपांतर होते, ते स्पष्ट होईलच. तूर्तास त्या वादळासाठी भारताने आपली मोर्चेबांधणी आत्तापासून सुरूवात करायला हवी असं माझं स्पष्ट मत आहे. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



 

Thursday 24 June 2021

'टाटा' लोक कल्याणाचा सव्वाशे वर्षाचा प्रवास... विनीत वर्तक ©

'टाटा' लोककल्याणाचा सव्वाशे वर्षांचा प्रवास... विनीत वर्तक ©

What advances a nation or a community is not so much to prop up its weakest and most helpless members, but to lift up the best and the most gifted, so as to make them of the greatest service to the country."

- Jamsetji Tata 

आपलं हे ब्रीदवाक्य बनवत जमशेदजी टाटा यांनी १८९२ मध्ये म्हणजे आजपासून जवळपास १२९ वर्षांआधी लोककल्याणाच्या कार्याचा श्रीगणेशा केला होता. ज्यावेळेस संपूर्ण विश्वात श्रीमंत होण्यासाठी चढाओढ लागली होती, त्यावेळेस टाटा भारताला विश्वात उभारी  देण्यासाठी कार्यरत होते. आज या गोष्टीला १२९ वर्षं होत आहेत आणि त्यांचे लोककल्याणाचे महान कार्य आजही त्यांचे वंशज पुढे नेत आहेत. आज टाटा समूह जो भारतातील सगळ्यात मोठा उद्योगांचा समूह तर आहेच, पण जगातील अग्रगण्य समूहांतही तो समाविष्ट आहे. आज टाटा समूहाचं बाजारमूल्य तब्बल १०६ बिलीयन अमेरिकन डॉलर आहे. त्यातील ६६% हिस्सा हा टाटा ट्रस्टकडे आहे. या ट्रस्टशी संबंधित तब्बल ८५५ पेक्षा जास्ती वेगवेगळ्या संस्था आहेत. भारताच्या ३३ राज्यातून ६४० पेक्षा जास्ती जिल्ह्यांत या संस्थेच्या मार्फत ते भारताच्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा स्तर उंचावत आहेत. आज टाटा ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल १०० मिलियन भारतीयांना आपलं आयुष्य उंचावण्याची संधी दिली जात आहे. 

गेली १२९ वर्षं टाटा कोणताही गाजावाजा न करता लोककल्याणाचे आपले काम शांतपणे करत आलेले आहेत. एका पिढीकडून तीच तत्त्वं दुसऱ्या पिढीकडे देण्यात आली आहेत. आज रतन टाटा या लोककल्याणाच्या वटवृक्षाचं काम पुढे नेत आहेत. २०२० साली भारताच्या दरवाज्यावर कोरोनाच्या महामारीने धडक दिल्यावर झालेल्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी पुढे येणारा हाच वटवृक्ष होता. टाटा ग्रुपने २०२० मध्ये १५०० कोटी रुपयांची तात्काळ मदत पी.एम. केअर्स फंडला केलेली होती. याची कोणतीही जाहिरात त्यांनी केली नाही, ना त्या बदल्यात सरकारकडून टाटांनी अपेक्षा ठेवली. कदाचित भारतीय लोकांनाही त्याची जाणीव होऊ दिली नाही. पण आज टाटांच्या या लोककल्याणाच्या कामाला जेव्हा पाश्चात्य देशातील संस्थेने पहिलं स्थान दिलं, तेव्हा भारतीयांना या वटवृक्षाची जाणीव झाली.  
   
Hurun Research and EdelGive Foundation या संस्थेने २०२१ मध्ये सादर केलेल्या रिपोर्टनुसार जगात गेल्या १०० वर्षांत ज्या लोकांनी आपल्या कमाईचा सर्वाधिक वाटा लोककल्याणासाठी दिला अश्या यादीत भारताचे 'जमशेदची टाटा' यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. त्यांनी केलेल्या लोककल्याण कामासाठी दिलेल्या कमाईची अंदाजित किंमत आज जवळपास १०२.४ बिलियन (१ बिलियन म्हणजे १०० कोटी) अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. त्यांच्या मागे असणारं बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन तब्बल २८ बिलियन अमेरीकन डॉलरने मागे आहे. १०० बिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्ती पैसे दान करणारे जगात एकमेव व्यक्ती आणि संस्था आहे, ती म्हणजे 'टाटा ग्रुप'. ती व्यक्ती एक भारतीय आहे याचा अभिमान सगळ्याच भारतीयांना असायला हवा.  

रुपर्ट हूजवर्फ जे हुरून संस्थेचे प्रमुख आहेत, त्यांनी म्हटलं आहे, 

“While American and European philanthropists may have dominated the thinking of philanthropy over the last century, Jamsetji Tata, Founder of India’s Tata Group, is the world’s biggest philanthropist.” 

Rupert Hoogewerf, the chairman and chief researcher at Hurun

'हुरून'ने आपल्या रिपोर्टमध्ये पुढे म्हटलं आहे, की लोककल्याणाची सुरूवात जमशेदजी टाटानी १८९२ मध्ये केली. आपल्यानंतरही ते काम पुढे तसेच  सुरू ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या कमाईमधील २/३ हिस्सा हा ट्रस्टकडे ठेवला आणि त्यातून लोककल्याणाचे हे व्रत असेच अविरत सुरू राहील याची काळजी घेतली. आज रतन टाटांनी हे व्रत असंच सुरू ठेवलं आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आज शिक्षण, हेल्थकेअर ते अनेक क्षेत्रात भारतीयांना आयुष्यात वर येण्यासाठी संधी आणि मदत दिली जाते. जमशेदजी टाटांनी म्हटल्याप्रमाणे भारताला पुढे नेण्याचं पवित्र कार्य आज टाटा ग्रुप अविरत करत आहे. टाटा ग्रुपच्या दानशूरपणाला माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या पुढील कार्याला माझ्या शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 








Wednesday 23 June 2021

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती... विनीत वर्तक ©

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती... विनीत वर्तक ©

बरोबर एक वर्षापूर्वी २४ जून २०२० या दिवशी भारत आणि चीन दरम्यान संघर्ष शिगेला  पोहोचला होता. त्या संघर्षाची ठिणगी आधीच पडली होती आणि वणवा पेटला होता. चीनच्या छुप्या मनसुब्यांना भारताने बरोबर ओळखून चीनला जशास तसं उत्तर दिलं होतं. चीनच्या तोडीस तोड उत्तर देण्यासाठी भारताला आपल्या सैन्याची रसद वेळेत पुरवणं गरजेचं होतं. त्यासाठी महत्वाची होती इथली दळणवळण यंत्रणा. भारताने गेल्या काही वर्षांत इथल्या दळणवळण यंत्रणेवर तातडीने काम करायला सुरूवात केली होती. या सगळ्यांत महत्वाचा होता तो लेह आणि दौलत बेग ओल्डी यांना जोडणारा रस्ता. 

'लेह-दौलत बेग ओल्डी' रस्त्यावर भारताने सुरू केलेलं काम चीनच्या डोळ्यात खुपत होतं. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात त्याची ठिणगी गलवान संघर्षाच्या रूपात पडली होती. चीनला न जुमानता भारताने आपलं काम सुरूच ठेवलं होतं. भारत गलवान नदीवर एक ब्रीज बांधत होता. या ब्रीजमुळे भारताला चीनच्या भागात जाणं सोप्पं होणार होतं. गलवान नदी समुद्रसपाटीपासून तब्बल १७,८८० फूट (५४५० मीटर) उंचीवरून वहाते. या उंचीवर ऑक्सिजन फक्त ५०% इतका असतो आणि त्यात इथले तपमान ० ते १५ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असते. अश्या अतिशय प्रतिकूल तापमानात शत्रूच्या सावटाखाली याचं काम सुरू होतं. ब्रीजचं काम सुरू असताना गलवान नदीला उधाण आलं होतं. 

अश्यावेळेस एक कामाच्या ठिकाणी एक अपघात घडला आणि दोन भारतीय सैनिक खाली वाहणाऱ्या गलवान नदीच्या पात्रात पडले. प्रसंग अतिशय बाका होता. आपल्या सहकाऱ्यांना नदीच्या पाण्यात डुबताना बघून एका भारतीय सैनिकाने मागचा पुढचा विचार न करता त्या गोठवणाऱ्या नदीच्या पाण्यात उडी घेतली. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने मृत्यूच्या खाईत स्वतःला झोकून दिले. असं करणारा भारतीय सेनेचा तो तडफदार पराक्रमी सैनिक होता एक मराठी माणूस, त्यांच नाव होतं 'नायक सचिन विक्रम मोरे'. 

नायक सचिन विक्रम मोरे हे मूळचे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तहसील मधील साकोरी गावचे. आपलं शिक्षण झाल्यावर वयाच्या अवघ्या १८व्या  वर्षी त्यांनी भारतीय सेनेत प्रवेश घेतला. त्यांना भारतीय सेनेच्या ११५ इंजि. रेजिमेंट. कॉर्प्स ऑफ इंजिनिअर इकडे नियुक्त करण्यात आलं. २०२० पर्यंत त्यांनी १२ वर्षं भारतीय सेनेत मातृभूमीची सेवा केली होती. २४ जून २०२० रोजी गलवान नदीवर ब्रीज बांधण्याचं काम त्यांच्या विभागाला देण्यात आलं होतं. नायक सचिन मोरे हे त्या टीमचा एक भाग होते. काम करत असताना त्यांचे दोन साथीदार अपघात होऊन खाली वाहणाऱ्या गलवान नदीच्या पात्रात पडले. आपल्या साथीदारांचा जीवन-मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष बघून नायक सचिन मोरे यांनी क्षणाचाही विलंब न करता ब्रीजवरून त्या नदीच्या पात्रात उडी घेतली. 

तब्बल १७,८८० फूटांवर अंग गोठवणाऱ्या पाण्यात उडी घ्यायला काय जिद्द लागत असेल याचा आपण विचार करू शकत नाही. नायक सचिन मोरे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पोहत त्या दोन सैनिकांचे प्राण वाचवले आणि त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं. पण या सगळ्यांत त्यांना आपल्या जीवाचं बलिदान द्यावं लागलं. नायक सचिन मोरे यांनी भारतीय सेनेच्या आदर्श मूल्यांचं पालन करताना आपल्या साथीदारांचा जीव वाचवून स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. त्यांच्या या पराक्रमासाठी त्यांना २६ जानेवारी २०२१ रोजी 'सेना मेडल' ने सन्मानित करण्यात आलं. 
आज या गोष्टीला बरोबर एक वर्ष पूर्ण होते आहे. नायक सचिन विक्रम मोरे यांच्यासारख्या अनेक पराक्रमी वीरांच्या बलिदानामुळे भारत आपल्या भूभागांना सुरक्षित ठेवू शकलेला आहे. भारताच्या आणि कधी काळी दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीच्या पराक्रमाची परंपरा अखंडित ठेवणाऱ्या या मराठी सैनिकाला माझा कडक सॅल्यूट. आज तुमच्या बलिदानाच्या आठवणीत या काही ओळी... 

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
देव, देश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती.
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीती.
लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती
देव, देश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती.
जिंकावे वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं
लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं.
देशापायी सारी विसरू माया ममता नाती.
देव, देश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती.
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती!! 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Tuesday 22 June 2021

पडद्यामागचं 'गगनयान'... विनीत वर्तक ©

 पडद्यामागचं 'गगनयान'... विनीत वर्तक ©


कोरोनाच्या महामारीने जसं लोकांना प्रभावित केलं आहे, तसं अनेक कार्यक्रमांनाही कोरोनाचा फटका बसला आहे.  'इसरो' सुद्धा यातून सुटलेली नाही. 'इसरो' चा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच भारतीयांना भारताच्या भूमीवरून अवकाशात पाठवून पुन्हा त्यांना भारताच्या भूमीवर सुरक्षितरीत्या उतरवणे. याच मोहिमेला 'इसरो'ने 'गगनयान' असं नाव दिलेलं आहे. 'आकाशातील वाहन' अश्या अर्थाच्या संस्कृत शब्दांवरून हे नाव ठेवण्यात आलं आहे. आजवर जगातील फक्त तीन देशांकडे माणसाला अवकाशात नेऊन सुखरूप परत आणण्याचं तंत्रज्ञान अवगत आहे. अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांना आजवर हे शक्य करता आलेलं आहे. जर भारत गगनयान मोहीम यशस्वी करू शकला, तर भारत जगातील असं तंत्रज्ञान अवगत करणारा चौथा देश असेल. 

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिवसाच्या आधी भारतीयांना अवकाशात पाठवून त्यांना पुन्हा जमिनीवर आणण्याचं शिवधनुष्य 'इसरो'ने उचललेलं होतं, पण गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीने सगळी गणितं चुकवलेली आहेत. पण तरीसुद्धा इसरो थांबलेली नाही. पडद्यामागून 'गगनयान' मोहिमेची बांधणी कोरोना काळातसुद्धा सुरू असून आता त्याने वेग घेतला आहे. अवकाशात अंतराळयात्री पाठवणं हे खूप किचकट काम आहे. तंत्रज्ञानाशिवायही खूप साऱ्या गोष्टी यामध्ये येतात. गुरूत्वाकर्षणरहित जागेत रहाणे, खाणे, पिणे, रोजच्या इतर घडामोडी यांसोबत तिथे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तब्बेत या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सगळ्या पर्यायांचा विचार करावा लागतो. तिकडे आज डोकं दुखते किंवा ताप आला म्हणून आज कामावर जाणार नाही किंवा सुट्टी घेण्याची सोय उपलब्ध नसते. त्यामुळेच अनेक बारीकसारीक गोष्टींचा विचार यात करावा लागतो.  

भारत आपल्या इतिहासात पहिल्यांदा या सगळ्या अनुभवांतून जात आहे. त्याचसाठी भारताने या क्षेत्रात अनुभव असलेल्या आपल्या मित्राची म्हणजेच रशियाची मदत घेतली आहे. गेले वर्षभर भारताचे चार अंतराळयात्री हे मॉस्को, रशिया इथल्या 'गागारीन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर' इकडे अविरत प्रक्षिशण घेत होते. जेव्हा संपूर्ण जग कोरोना सावटाखाली चाचपडत होतं, तेव्हा हेच चार भारतीय वीर अंतराळात राहण्याचा सराव करत होते. या सरावात अनेक गोष्टींचा अंतर्भाव होता, जसे आणीबाणीच्या काळात काय करायचं? आपला जीव कसा वाचवायचा? पृथ्वीवर उतरताना कोणती काळजी घ्यायची? समजा समुद्रात उतरले तर कश्या पद्धतीने उतरायचं? जमिनीवर उतरताना काय काळजी घ्यायची? अंतराळातील शी-शू पासून ते सामना कराव्या लागणाऱ्या 'जी फोर्सेस', सेंट्रिफ्यूज फोर्सेस, गुरूत्वाकर्षणरहित अवस्थेत कार्य कश्या पद्धतीने करायचं अश्या एक ना विविध गोष्टींवर सराव सुरू होता. इकडे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की एक चूक आणि गेम ओव्हर, त्यामुळेच चुकीला जागा नाही. झोपेतून उठवल्यावरसुद्धा आपण काय करायचं याची तालीम डोक्यात फिक्स असली पाहिजे, असं हे खडतर प्रक्षिशण आहे. या चारही अंतराळवीरांनी रशियन भाषासुद्धा आत्मसात केलेली आहे, ज्यामुळे रशियन प्रक्षिक्षक आणि त्यांच्यात संवाद सुलभ व्हावा. 

फेब्रुवारी २०२० ते जवळपास २०२१ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत हे खडतर प्रक्षिशण पूर्ण करून हे चारही अंतराळयात्री पुढल्या टप्प्यासाठी भारतात परतले आहेत. त्यांनी घेतलेलं प्रक्षिशण हे रशियाच्या सोयूझ कॅप्सूलमध्ये घेतलेलं होतं. आता अभ्यास सुरू झाला आहे तो भारताने बनवलेल्या कॅप्सूलमध्ये प्रक्षिशण घेण्याचा. भारताने आपल्याला गरजेचे तसे त्यात बदल केलेले आहेत. एकीकडे इसरो रॉकेट आणि स्पेस कॅप्सूलच्या तांत्रिक आणि अभियांत्रिकी बाबींवर काम करत आहे. त्याचवेळी दुसरीकडे भारताने आपला दुसरा मित्र फ्रांससोबत अंतराळातील औषध, अन्न कसं असावं यावर काम सुरू केलं आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधे फ्रांस हा औषधांच्या बाबतीत दादा देश समजला जातो. त्याचसाठी भारताने फ्रांससोबत सहकार्याची घोषणा केली आहे. 

प्रत्यक्षात अंतराळवीर पाठवण्याआधी आपण बनवलेल्या तांत्रिक क्षमतांची चाचणी 'इसरो'ला घेणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही भारतीयाचा जीव धोक्यात घालणं परवडणारं नाही. त्यामुळे 'इसरो'ने प्रत्यक्ष मोहिमेआधी दोन चाचण्या तांत्रिक क्षमतांच्या घेण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. या दोन्ही चाचण्यांत विविध तंत्रज्ञान जे 'इसरो'ने मानवमोहिमेसाठी विकसित केलं आहे, त्याच्या चाचण्या होणार होत्या. डिसेंबर २०२० मधे एक तर २०२१ मध्ये दुसरी आणि प्रत्यक्ष मोहीम २०२२ च्या सुरूवातीला नियोजित कार्यक्रमानुसार अपेक्षित होती. पण कोरोनाच्या महामारीमुळे हे वेळापत्रक गडबडलेलं आहे. आता जर गोष्टी सुरळीत झाल्या, तर पहिली चाचणी ही डिसेंबर २०२१ आणि दुसरी चाचणी २०२२ मध्ये तर प्रत्यक्ष मोहीम २०२३ मध्ये अपेक्षित आहे. 

कोरोना काळात न थांबता 'इसरो'ने गगनयान वर आपलं काम पडद्यामागून सुरू ठेवलेलं आहे. नक्कीच भारताच्या अंतराळ प्रगतीमध्ये ही मोहीम एक मैलाचा दगड ठरणार आहे. या मोहिमेमुळे अनेक तंत्रज्ञानावर अभ्यास आणि संशोधन सुरू आहे. ज्याचा फायदा इसरो आणि भारताला येत्या काळात होईल. कोणी म्हणेल की इतके पैसे खर्च करण्यापेक्षा गरिबांना वाटा (आपल्याला सगळं फुकट खायची आणि मागायची सवय लागली आहे तो भाग वेगळा). पण अश्या मोहिमांमधून तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगती होत असते. आज अमेरिका चंद्रावर जाऊन पोहोचली कारण त्यांच्या राज्यकर्त्यांनी विज्ञानाची कास तब्बल ५० वर्षांपूर्वी धरली होती. चंद्रावर जाण्याआधी २०-२५ वर्षं त्यावर काम सुरू होतं. त्यामुळेच एका रात्रीत यश मिळवण्यासाठी अनेक रात्री जागवल्या पाहिजेत. भारताची अंतराळातली उदिष्टं ही नक्कीच वेगळी आहेत. त्यामुळे आपल्याला झेपेल तितकीच उडी मारायची आहे आणि आजवर इसरो ते करत आली आहे. 'गगनयान' मोहीमसुद्धा याहून वेगळी नसेल असा मला विश्वास आहे. 

'गगनयान' मोहिमेसाठी मेहनत घेणाऱ्या त्या चार अंतराळवीरांना माझ्या खूप शुभेच्छा. 'इसरो'च्या वैज्ञानिक आणि अभियंत्यांनाही माझ्या शुभेच्छा. येत्या काळात भारतीय भारतातल्या जमिनीवरून अंतराळात जाऊन ७ दिवस भारताला अवकाशातून न्याहाळून जेव्हा पृथ्वीवर सुखरूप परत येतील, तेव्हा एका नव्या पर्वाची नांदी भारतात सुरू झाली असेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

जय हिंद!!! 

फोटो स्त्रोत :- गुगल (रॉसकॉसमॉस- रशिया) 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  


Monday 21 June 2021

तो दिवस ते वर्ष... विनीत वर्तक ©

 तो दिवस ते वर्ष... विनीत वर्तक ©


२० जून १९९९ चा दिवस होता. कॅप्टन बी.एम.करीअप्पा यांच्या नेतृत्वाखाली '५ पॅरा' ला पाकिस्तानने कब्जा केलेल्या 'पॉईंट ५२०३' ला ताब्यात घेण्याचं लक्ष्य देण्यात आलं होतं. तब्बल ९ तास कठीण चढण चढून '५ पॅरा' चे पराक्रमी वीर पाकिस्तानी सैनिकांनी कब्जा केलेल्या ठिकाणी पोहोचले. रात्रीच्या वेळी भारताच्या पराक्रमी सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांवर हल्लाबोल केला. दोन्ही सैन्यांत जोरदार गोळाबारी आणि धुमश्चक्री सुरू झाली. 

अवघ्या ४० मीटरवरून पाकिस्तानी सैनिक भारतीय सैनिकांवर आग ओकत होते. पाकिस्तानी सैनिक संख्येने जास्त आणि एक क्षण आला की भारतीय सैनिकांकडील शस्त्रसाठा संपत आला. आता मागे फिरणं म्हणजे आपलं लक्ष्य पूर्ण न करणं. पण मागे फिरतील ते भारतीय सैनिक कुठचे! कॅप्टन बी.एम. करीअप्पा यांनी खाली असलेल्या बोफोर्स तोफांचे अधिकारी मेजर गुरप्रीत मढोक यांना कॉल केला. त्यांच्यात झालेलं संभाषण इकडे देतो आहे, 

“ The enemy is just 40 meters away from us, we are out numbered and running out of the ammunition; we need fire upon our own coordinate”, CAPTAIN B M CARIAPPA

कॅप्टन बी.एम. करीअप्पा बोफोर्स गन हाताळणाऱ्या ऑफिसरला सांगतात, आमचा दारुगोळा संपत आला. बोफोर्स आमच्यावर डागा. 

“Bofors is a medium artillery gun with a killing range of 300 meters. The splinters will go flying on all direction. Chances are that you guys will not survive either.” MAJOR GURPREET MADHOK 

मेजर गुरप्रीत मढोक त्यांना समजावतात की बोफोर्स तुमच्या ठिकाणावर डागली तर बोफोर्सची रेंज ३०० मीटरची आहे. ३०० मीटर परिघात सगळं नष्ट होईल. विचार करा ५२०० मीटर उंचीवर (१७,००० फूट) शत्रू ४० मीटरवर आहे. बोफोर्सचा एक गोळा पडला तर ३०० मीटरचा एरिया नष्ट. 

“We will not survive in any case sir. We have run out of ammunition and I need the bloody fire here right now.” CAPTAIN CARIAPPA

कॅप्टन बी.एम. करीअप्पा बोफोर्सच्या कमांडिंग ऑफिसरला सांगतात, असेही आम्ही वाचणार नाहीत, पण त्यांना सोडणार नाही. मला बोफोर्स इकडे हवी आहे. 

“Roger! Fire shall be upon you in minutes. Take cover if you can. God bless you”. MAJOR GURPREET MADHOK

मेजर गुरप्रीत मढोक त्यांना सांगतात जशी आपली आज्ञा, देव तुमचं रक्षण करो. 

पुढे काय घडलं असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. काही क्षणात भारताच्या भूमीवरून बोफोर्सच्या आवाजाने आसमंत थरारला. 'पॉईंट ५२०३' वर एकच धुराळा उडाला. बोफोर्स शांत झाल्यावर काही क्षण असेच शांततेत गेले. त्या धुरळ्यातून बाहेर निघाले, ते '५ पॅरा' चे १४ पराक्रमी सैनिक ज्यांचं नेतृत्व करत होते कॅप्टन बी.एम. करीअप्पा. त्यांनी सगळ्यांजवळ जाऊन चौकशी काय केली असेल, 

CAPTAIN CARIAPPA goes to each man & hugs him saying “ Saale tu bhi bach gaya”.... 

(आपला जीव एका क्षणापूर्वी वाचल्यानंतरसुद्धा त्याची काही फिकीर नव्हती, पण आपले सहकारी वाचले याचा आनंद होता.) 

समोर पाकिस्तानच्या ३३ फ्रंटिअर फोर्स मधील २३ सैनिकांच्या प्रेताचा खच पडला होता. उरलेसुरले आपला जीव वाचवत पाकिस्तानच्या दिशेने पळत होते. 

इकडे कॅप्टन बी.एम. करीअप्पा. आणि त्यांच्या '५ पॅरा' च्या सहकाऱ्यांनी 'पॉईंट ५२०३' वर २१ जून १९९९ च्या सकाळी तिरंगा फडकावला होता.. 

तुम्ही विचार करू शकता की काय जाज्वल्य देशाभिमान आणि अंगात पराक्रम असेल की स्वतःच्या अंगावर बोफोर्सचे गोळे घ्यायलाही एका क्षणाचा विचार केला नव्हता. मेलो तरी चालेल पण लक्ष्य पूर्ण करायचं. 'बचेंगे तो और भी लड़ेंगे' हा एकच विचार आणि समोर लक्ष्य 'पॉईंट ५२०३' वर तिरंगा फडकावणं. त्यांच्या याच पराक्रमासाठी त्यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आलं. 

ब्रिगेडिअर बी.एम. करीअप्पा आणि ब्रिगेडिअर गुरप्रीत मढोक यांच्यासह '५ पॅरा' च्या त्या अनाम वीरांना माझा कडक सॅल्यूट. आम्ही भारतीय तुमचे सदैव ऋणी आहोत. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




'दि लॉंगेस्ट राईड'... विनीत वर्तक ©

 'दि लॉंगेस्ट राईड'... विनीत वर्तक ©

काही चित्रपट असे असतात, की नकळत ते तुम्हाला स्पर्शून जातात, तुम्हाला विचारात टाकतात, तुमच्या भावनांना वाट देतात. काही तर आपण आपल्या आयुष्याशी जोडून बघायला लागतो. पण काही असे असतात, की डोळ्यांत पाणी आणतात. डोळांच्या कडा ओल्या आणि हातावर येणारे शहारे दोन्हींचा एकाचवेळेस अनुभव देणारे असे थोडेच. 'दि लोंगेस्ट राईड' हा २०१५ साली आलेला चित्रपट त्यातलाच.

जेव्हा बघायला सुरूवात केली, तेव्हा एक साधारण चित्रपट बघत आहोत असंच वाटलं. बुल राईड करणारा एक मुलगा आणि शिक्षणात धडपडणारी एक मुलगी यांच्या प्रेमाची सुरूवात तितकीशी हृदयाचा ठाव घेत नाही, कारण अमेरिकन संस्कृतीशी आपण तितके लगेच रुळावत नाही. तरी निसर्गाचं सुंदर चित्रण, विशेषतः तलावाच्या बाजूला त्या दोघांची ती 'डेट' नक्कीच सुंदर वाटते. चित्रपट सामान्य आहे, असं वाटत असतानाच चित्रपट एक सुंदर वळण घेतो, त्या वळणासाठी चित्रपट मला खूप आवडला.

अपघात झालेल्या एका वृद्धाला इस्पितळात नेताना त्याने लिहीलेली पत्रे जेव्हा सोफियाच्या हातात पडतात, तेव्हा वेगळ्या प्रेमकथेची सुरवात होते. १९४० चा काळ, नि त्यात पुढे जाणारी आयरे आणि रुथची प्रेमकथा खूप मागे घेऊन जाते. एक निरागस आणि लाजणारा मुलगा ते एक सैनिक, यांतून त्या दोघांच्या आयुष्यात येणारे प्रसंग सुंदर चित्रित केले आहेत. युद्ध नेहमीच काही जखमा देऊन जाते. आयरे पण त्यातून सुटत नाही. त्या जखमेच्या व्रणांनी मात्र त्याचं आयुष्य उध्वस्थ होतं. पण रुथ साथ सोडत नाही. असा मागचा काळ ते आत्ताचं सोफियाचं प्रेम असं कथानक पुढे सरकत जातं.

सोफिया आणि ल्युकची कथा जरी मनात भरत नसली, तरी त्याचवेळी रुथ आणि आयरे आपल्या मनात रुंजी घालत राहतात. आयरे आणि रुथ दोघांच्या आवडी पूर्ण वेगळ्या असतानासुद्धा आयरे आपल्या प्रेमाला आनंदी बघण्यासाठी अनेक चित्रांचा घरात संग्रह करत रहातो. रुथ प्रत्येक चित्रातून अर्थ शोधत असताना, आयरे फक्त तिला पाहत रहातो. अश्यावेळी एका लहान कोवळ्या डॅनियलच्या येण्याने रुथचं आयुष्य काही क्षणापुरतं बदलून जातं. पण तो अचानक त्यांच्या आयुष्यातून निघून जातो. डॅनियलच्या जाण्याचा धक्का रुथ आणि आयरेचं नातं पण दोलायमान करतो. पण डॅनियल कुठे जातो? त्यांना परत भेटतो का? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात पाहणंच उत्तम.

रुथ आणि आयरे पुन्हा आयुष्याला सुरूवात करून संपूर्ण आयुष्य जगतात. त्यावेळी आयरे रुथला अनेक पत्र लिहून आपला आनंद साजरा करतो. पहिलं चुंबन ते पहिला कटाक्ष सगळंच. एका सकाळी रुथ आयरेला सोडून जेव्हा जगातून निघून जाते. आयरे जेव्हा ही गोष्ट सोफियाला सांगतो, तेव्हा सोफिया स्वतःच्या आयुष्यात आलेल्या वादळांशी झगडत असते. आयरे तिला सांगतो, 

“Love Require Sacrific, Always" .. 

खूप काही आहे या वाक्यात. डॅनियलने काढलेलं रुथचं एक चित्र घेऊन जेव्हा डॅनियलची बायको आयरेला भेटते, तो क्षण चित्रपटाचा कळस आहे. डोळांच्या पापण्या ओल्या आपोआप होतात.

ल्युकला आपल्याला हवं असलेलं मिळवल्यानंतर जाणवतं, की सगळ्यांच्या पलीकडे जे त्याला हवं होतं, ते सोफिया आहे. तोवर आयरेने संग्रही केलेल्या चित्रांच्या विक्रीचं आमंत्रण त्याला मिळालेलं असतं. १९४० मध्ये आयरेने संग्रह केलेल्या चित्रांची किंमत मिलियन डॉलर मध्ये आजच्या काळात असते. विक्री सुरु करण्याआधी आयरेने लिहलेलं एक सुंदर पत्र त्याचा वकील वाचून दाखवतो. त्यात आयरे म्हणतो,

“Ruth had an incredible eye for arts, but I only had an eye for her. For me, the greatest joy was not in collecting great work, but for the person I collected with. These painting brought immense happiness for ruth and sharing that happiness was my life’s greatest privilege”.“True work of art was the longest ride ruth and I shared, that’s called life”.

रुथ आणि आयरेची प्रेमकहाणी बघून सुन्न झालो. इतकं सुंदर, साधेपणानं आणि सहजतेनं प्रेम निभावता येतं. चित्रपटातून ते अस भिडलं मनाला, निदान माझ्या तरी. सोफिया आणि ल्युकचं काय होतं? आयरेने संग्रह केलेल्या चित्रांचं काय होतं? अश्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आणि हातावर शहारे आणि डोळांच्या कडा ओल्या करणाऱ्या रुथ आणि आयरेच्या प्रेमकथेसाठी चित्रपट बघायला हवाच.

सोफिया आणि ल्युक चित्रपटात नसले असते, तरी चालले असते इतकी ती सुंदर कथा एलन अल्डाच्या अभिनयाने खुलून येते. तरुणपणीचा आयरे जॅक हस्टन आणि रुथचा अभिनय केलेली ओंना चॅप्लीन हिने सुंदर अभिनय केला आहे. ओंनाने अभिनयाचे गुण तिचे आजोबा म्हणजेच चार्ली चॅप्लीनकडून घेतलेच आहेत. मला आयरे आणि रुथ खूप भावले. कोणताही बडेजाव आणि प्रेमाला अतिरंजित न करता एक साधं सरळ नातं दाखवण्यात चित्रपट प्रचंड यशस्वी झाला आहे.

फोटो स्त्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Saturday 19 June 2021

मोठं करणाऱ्या लहान गोष्टी... विनीत वर्तक ©

 मोठं करणाऱ्या लहान गोष्टी... विनीत वर्तक ©


आयुष्यात प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं. पैश्याने, अभ्यासाने, वस्तूंनी माणूस श्रीमंत नक्कीच होतो, पण मोठेपण कमवायला मात्र आपलं व्यक्तिमत्व तसं घडवावं लागतं. अंगभूत गुणांनी माणूस मोठा होत असतो. आपल्या स्वभावातील याच गोष्टी माणसाला महान बनवतात. गेल्या आठवड्यात जागतिक पातळीवर घडलेल्या  दोन गोष्टींनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं. 

पहिली गोष्ट घडली, ती युरोपिअन चॅम्पियनशिपच्या पत्रकार परिषदेत. जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंमधे गणल्या जाणाऱ्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्रकार परिषदेत बसताना समोर ठेवलेल्या कोका कोलाच्या दोन बॉटल्स हटवून पाण्याची बाटली हातात घेतली आणि पोर्तुगीज मधे 'ऍक्वा' असं म्हणत कार्बोनेटेड ड्रिंक्सबद्दल आपलं मत स्पष्ट केलं. रोनाल्डोच्या या छोट्या वागणुकीमुळे कोका कोलाचा शेअर १.६% टक्यांनी गडगडला. कोका कोलाचं  बाजारमूल्य तब्बल ४ बिलियन अमेरिकन डॉलर (४०० कोटी अमेरिकन डॉलर) ने कमी झालं. ख्रिस्तियानो रोनाल्डो हा फुटबॉलमधील एक नावाजलेला खेळाडू तर त्याच्या खेळामुळे प्रसिद्ध आहेच, पण तो आपल्या सर्वोत्तम आरोग्यासाठीही ओळखला जातो. आपल्या १९ वर्षांच्या करिअरमध्ये त्याने ७८० पेक्षा जास्त गोल आंतरराष्ट्रीय पातळीवर केले आहेत. जगातील सगळ्यांत तंदुरूस्त खेळाडूंमध्ये वयाच्या ३६ वर्षीही त्याची गणना होते. याला कारण त्याने आपल्या आरोग्याची घेतलेली काळजी. 

१ बिलियन अमेरिकन डॉलर (१०० कोटी अमेरिकन डॉलर ) इतकी प्रचंड संपत्ती आणि जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू असणाऱ्या रोनाल्डोसाठी कोकची एक जाहिरात कित्येक कोटी रुपये कमावून देऊ शकते. पण कार्बोनेटेड ड्रिंक्स आपल्या शरीराची काय हानी करतात याबद्दल सजग असलेल्या या खेळाडूने असल्या कोणत्याही ड्रिंक्सची जाहिरात तर नाकारली आहेच, पण त्यापलीकडे उघडपणे त्याचा विरोध करायलाही त्याने मागेपुढे बघितलेलं नाही. खरे तर युरोपिअन चॅम्पियनशिपचा कोका कोला ब्रँड एक स्पॉन्सर आहे. त्यामुळेच या दोन बॉटल पत्रकार परिषदेत रोनाल्डोपुढे जाहिरातीसाठी ठेवल्या होत्या. पण कोका कोलासारख्या कंपन्यांच्या दबावाला बळी न पडता तो आपल्या तत्त्वाला जागला आणि त्या कोला बॉटलऐवजी त्याने पाण्याची बॉटल ठेवताना 'मी पाणी पितो' हा संदेश स्पष्टपणे दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर अश्या प्रकारचा स्टॅन्ड घ्यायला काय हिंमत लागत असेल, याचा अंदाज आपण इकडे बसून लावू शकत नाही. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या या वर्तनाने त्याच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच उंची दिली आहे ह्याबद्दल कोणाच्या मनात दुमत नसेल. 

दुसरी गोष्ट घडली, ती फेंच ओपनच्या अंतिम सामन्यात. जगातील क्रमांक १ चा लॉन टेनिसपटू नोवाक जोकोविच फ्रेंच ओपनचा अंतिम सामना खेळत होता. ६-७, २-६ असे लागोपाठ दोन सेट हरल्यानंतर हा सामना जोकोविचच्या हातातून गेल्यात जमा होता, पण अचानक जोकोविचचा खेळ उंचावत गेला आणि सामन्याचा नूर पालटला. पहिले दोन सेट हरल्यानंतर नंतरचे तीन सेट ६-३,६-२,६-४ असे जिंकत नोवाक जोकोविचने एक इतिहास रचला. जगातील पहिला पुरुष टेनिसपटू बनला ज्याने चारही ग्रँड स्लॅम दोन वेळा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. नोवाक जोकोविचच्या खेळाबद्दल कोणाच्या मनात शंका नसेल. पण अंतिम सामन्यात त्याला त्याच्या खेळाची लय सापडत नव्हती. याचवेळी धावून आला तो एक प्रेक्षकांमध्ये बसलेला मुलगा. 

नोवाक जोकोविच चाचपडत असताना हा मुलगा सतत त्याला मागून चांगला खेळ करण्यासाठी उत्तेजन देत होता. तेवढ्यापुरतं न थांबता तो त्याला काय कर म्हणजे पॉईंट्स मिळतील, याचं ज्ञान देत होता. नोवाक जोकोविचच्या शब्दात, 

“This boy was in my ear the entire match. He was encouraging me. He was actually giving me tactics. He was like: ‘Hold your serve, get an easy first ball, then dictate, go to his backhand.’ He was coaching me literally”

विचार करा जगातील क्रमांक १ चे टेनिस खेळाडू तुम्ही आहात. फ्रेंच ओपन सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अंतिम सामना खेळत आहात. दोन सेट गमावलेले आहात आणि अश्या वेळी कोणीतरी नुकतीच मिसरूड फुटलेला तुम्हाला काय करावं आणि काय नाही याचे सल्ले देतो आहे. तुमची प्रतिक्रिया काय असेल? कदाचित प्रतिक्रियेतील फरक महान खेळाडू आणि सर्वसामान्य यांत फरक करेल. नोवाक जोकोविचने त्याचे सल्ले तर ऐकलेच, पण सामना जिंकल्यावर आपली रॅकेट जिच्या मदतीने हा अंतिम सामना जिंकला ती त्याला बक्षीस म्हणून दिली. नोवाक जोकोविचच्या कृतीने त्या मुलाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याचा हा व्हिडीओ जगात अनेकांनी बघितला. नोवाक जोकोविच सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाला, 

“To give the racquet to the best person was him, after the match, that was my gratitude for him sticking with me and supporting me.”

नोवाक जोकोविचच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच उंची खेळापलीकडे त्याने दाखवलेल्या छोट्या कृतीतून प्राप्त झाली.

नोवाक जोकोविच असो वा ख्रिस्तियानो रोनाल्डो हे आपापल्या खेळात जगात प्रसिद्ध आहेतच, पण यशाच्या शिखरावर असतानासुद्धा आपली तत्त्वं आणि विचार आपल्या व्यक्तिमत्त्वातून दाखवून देतात. आपल्या मोठेपणाचा गर्व किंवा जग काय विचार करेल? यापेक्षा स्वतःची तत्त्वं आणि यशाच्या शिखरावर असतानासुद्धा जमिनीवर आपले पाय असणं म्हणजे काय असतं, हे त्यांनी आपल्या वागणुकीतून दाखवून दिलं आहे. यश, पैसा, प्रसिद्धी कमावता येते, पण मोठेपणा कमवायला तुमच्या व्यक्तिमत्वाने ती उंची गाठायला लागते, जगातील महान लोक अश्याच छोट्या छोट्या गोष्टींतून ती गाठत असतात.      

फोटो स्त्रोत :- गुगल (ख्रिस्तियानो रोनाल्डो कोका कोलाची बॉटल बाजूला ठेवताना, तर दुसऱ्या फोटोत नोवाक जोकोविच आपली रॅकेट मुलाला बक्षीस म्हणून देताना)

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Thursday 17 June 2021

आत्मनिर्भर भारताच्या आण्विक पाणबुड्या... विनीत वर्तक ©

 आत्मनिर्भर भारताच्या आण्विक पाणबुड्या... विनीत वर्तक  ©


दोन दिवसांपूर्वी 'कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीने' तब्बल ५०,००० कोटी रुपयांच्या तीन आण्विक पाणबुड्या बनवण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याबद्दल सूतोवाच केलं आहे. यातील सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे या तिन्ही पाणबुड्यांच्या निर्मितीत ९५% गोष्टी या 'मेड इन इंडिया' असणार आहेत. आत्मनिर्भर भारत बनण्याकडे टाकलेलं एक मोठं पाऊल म्हणून या गोष्टीकडे बघण्यात येत आहे. मुळातच अतिशय किचकट असणारं तंत्रज्ञान आत्मसात करून अश्या पद्धतीच्या पाणबुड्यांची निर्मिती करणं हे प्रचंड मोठं शिवधनुष्य पेलणं आहे. पारंपारिक पाणबुड्या आणि आण्विक पाणबुड्या यांमधील फरक काय असतो? आण्विक पाणबुडी कशी काम करते? तसेच या पाणबुड्यांमुळे भारताच्या सागरी शस्त्रसज्जतेत काय बदल होणार, ते समजून घेणं महत्वाचं आहे. 

भारताकडे सध्या दोन आण्विक पाणबुड्या कार्यरत आहेत. यातील एक म्हणजे 'आय.एन.एस. चक्र', जी आपण रशियाकडून भाड्याने घेतली आहे, तर दुसरी म्हणजे अरिहंत क्लास मधील 'आय.एन.एस.अरिहंत'. याच वर्षी 'आय.एन.एस.अरिघात' भारताच्या सेवेसाठी नौदलात समाविष्ट होणं अपेक्षित आहे. यानंतर 'आय.एन.एस.चक्र ३' भारताने रशियाकडून भाड्यावर घेतली असून २०२५ पर्यंत ती भारताच्या नौदलात समाविष्ट होणं अपेक्षित आहे. यांनतर एस. ५ क्लास मधील ३ आण्विक पाणबुड्यांवर भारत काम करतो आहे. १३,५०० टन पाणी विस्थापित करणाऱ्या आणि बॅलेस्टिक मिसाईल डागता येऊ शकणाऱ्या या पाणबुड्या असणार आहेत. यातील बॅलेस्टिक मिसाईल हे एम.आय.आर.व्ही. तंत्रज्ञानाने विकसित असणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे एकाच वेळी अनेक लक्ष्यांचा वेध घेता येतो. 

या शिवाय भारताने 'प्रॉजेक्ट ७५' अंतर्गत ५०,००० कोटी रुपयांच्या ३ आण्विक पाणबुड्या बनवण्याकडे पाऊल टाकलं आहे. आण्विक पाणबुड्या आणि पारंपारीक पाणबुड्या यामध्ये खूप सारी तफावत आहे. नक्की कोणत्या पद्धतीच्या पाणबुडीची गरज भारताला आहे यावर अनेकदा चर्चा झालेली आहे. प्रत्येक पाणबुडीची वैशिष्ट्ये आणि फायदे वेगवेगळे आहेत. भारताला दोन्ही पद्धतींच्या पाणबुड्यांची गरज आपल्या सागरी सीमा तसेच हिंद महासागरावर चीनचं वाढणारं वर्चस्व यांवर वचक ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. पारंपारिक पाणबुड्या या सागरी किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी महत्वाच्या आहेत, तर खोल समुद्रात संरक्षणासाठी आण्विक पाणबुड्या महत्वाच्या आहेत. 

आण्विक पाणबुडीत सगळ्यात महत्वाची असते ती गोष्ट म्हणजे अणुभट्टी. भारत ज्या पाणबुड्या बनवणार आहे त्यातील अणुभट्टीही भारतात बनणार आहे. या पाणबुड्यांमध्ये लाईट वॉटर अणुभट्टी बसवली जाणार आहे. अश्या पद्धतीच्या अणुभट्टीमध्ये कूलंट आणि न्यूट्रॉन मॉडरेटर म्हणून साध्या पाण्याचा वापर केला जातो. अणूंच्या फिशन प्रक्रियेत फास्ट न्यूट्रॉन तयार होतात. या न्यूट्रॉनना रोखण्यासाठी तसेच अणूंच्या विखंडन प्रक्रियेवर ताबा मिळवण्यासाठी साधे पाणी वापरले जाते. अणूंच्या विखंडन प्रक्रियेतून निर्माण होणारी ऊर्जा ही एकतर इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी वापरली जाते अथवा या ऊर्जेचा वापर वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो. त्यातून स्टीम टर्बाईन चालवून त्यातून इलेक्ट्रिक ऊर्जा निर्माण केली जाते. एकदा की ऊर्जा निर्मिती सुरू झाली, की ती अविरत सुरू राहते. त्यामुळे आण्विक पाणबुडी किती काळ पाण्याखाली राहू शकते अथवा किती अंतर दूर जाऊ शकते याला मर्यादा नाही. जोवर आत काम करणाऱ्या लोकांजवळ पुरेसा अन्नसाठा आहे, तोवर पाणबुडी खोल महासागरात साधारण ३०० मीटर ते ४०० मीटर खोलीवर लपून राहू शकते. आत्तापर्यंत आण्विक पाणबुडीने सलग पाण्याखाली राहण्याचा केलेला जागतिक विक्रम हा तब्बल १११ दिवसांचा आहे. त्यामुळे एखाद्या आण्विक पाणबुडीने जवळपास ३ महिन्यांहून अधिक काळ पाण्याखालून संपूर्ण जग पालथं घातलं तरी कोणाला त्याचा मागमूस लागणार नाही. यामुळेच आण्विक पाणबुडी या खोल महासागरात वचक ठेवण्यासाठी गरजेच्या आहेत. 

आण्विक पाणबुडी बनवणं तितकं सोप्पं नाही म्हणून मोजक्याच देशांकडे हे तंत्रज्ञान आहे. पारंपारिक पाणबुडीच्या तुलनेत आण्विक पाणबुडी बनवण्याचा आणि त्या व्यवस्थित सुरू ठेवण्याचा खर्च खूप जास्ती असतो. पण त्याच वेळी आण्विक पाणबुड्यांची संहारक शक्ती ही इतर पाणबुड्यांच्या तुलनेत जास्ती असते. भारताने ज्या ३ आण्विक पाणबुड्यांवर काम करण्याचं सूतोवाच केलं आहे, त्यावर निर्भय, ब्राह्मोस, ब्राह्मोस २ आणि वरुणास्त्र सारखी क्षेपणास्त्रं बसवण्यात येणार आहेत. ब्राह्मोस किंवा ब्राह्मोस २ हे कुठून डागलं गेलं याचा अंदाज येईपर्यंत या क्षेपणास्त्रांनी आपलं काम फत्ते केलेलं असेल आणि त्याचवेळेस पाण्याच्या खाली दूर कुठेतरी ही पाणबुडी अदृश्य झालेली असेल. त्यामुळे येत्या काळात हिंद महासागरात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या आण्विक पाणबुड्यांचा वापर होणार आहे. 

या ३ पाणबुड्या कार्यरत झाल्यावर अजून ३ बनवण्यास सुरूवात होणार आहे. या संपूर्ण 'प्रोजेक्ट ७५' ची किंमत १.२५ लाख कोटी रुपये आहे. या आण्विक पाणबुड्यांना लागणारी अणुभट्टी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या साह्याने कल्पकम इकडे तर याची बांधणी हझिरा इकडे तर सर्व सामुग्रीची जुळवाजुळव आणि त्याची परीक्षा विशाखापट्टणम इकडे केली जाणार आहे. वर उल्लेख केला त्याप्रमाणे यातील ९५% काम हे भारतात भारतीयांकडून केलं जाणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात खूप लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच या सर्व आण्विक पाणबुड्या २०३० पर्यंत नौदलाच्या सेवेत दाखल होतील असा अंदाज आहे. तिसऱ्या विमानवाहू जहाजापेक्षा भारतीय नौदलाने या ३+३ पाणबुड्यांसाठी मागणी केली आहे. या आण्विक पाणबुड्या आल्यानंतर १० पेक्षा जास्ती आण्विक पाणबुड्या हिंद महासागरावर लक्ष ठेवून असणार आहेत. आत्मनिर्भर भारताच्या या आण्विक पाणबुड्या नक्कीच शत्रूच्या गोटात खळबळ माजवणार आहेत. 

जय हिंद!!!   

तळटीप :- वर लिहीलेली सर्व माहिती पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. मी कोणत्याच पोस्टमधून संरक्षण संबंधित कोणतीच गोपनीय माहिती पब्लिकली लिहीत नाही. 
       
फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   


Wednesday 16 June 2021

रामसेतू... विनीत वर्तक ©

 रामसेतू... विनीत वर्तक © (Re-Post)


'सायन्स' ह्या दूरचित्रवाणीवरील वाहिनीने २०१७ साली 'रामसेतू'वर कार्यक्रम करताना 'रामसेतू' हा मानवनिर्मित असल्याचं म्हणताच एकच धुरळा उडाला आहे. डिस्कवरी चॅनेलच्या उपवाहिनीने, सायन्स वाहिनीने हे मांडताना काही शास्त्रीय आधार घेतले आहेत. ह्यातील राजकारणाचा आणि आपल्या भावनांचा भाग बाजूला ठेवून ''रामसेतू' म्हणजे काय?', हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. 

'रामसेतू' म्हणजे ज्याला जगाच्या इतर भागात 'ऍडम्स ब्रिज' असं म्हटलं जातं. भारताच्या पामबन बेटापासून ज्याला रामेश्वर बेट असही म्हटलं जातं, तिथपासून ते  श्रीलंकेच्या मन्नार बेटापर्यंत चुनखडीच्या दगडांची एक रांग आहे. ही रांग ५० किमी लांबीची असून ती मन्नारची सामुद्रधुनी आणि पाल्क स्ट्रेट-ला वेगळं करते. रामायणात उल्लेख असल्याप्रमाणे प्रभू श्रीराम याच सेतूवरून लंकेला गेले होते. याची निर्मिती वानरसेनेने समुद्रात दगड टाकून केली असं रामायणात लिहीलेलं आहे. या दगडांवर 'श्रीराम' असं लिहील्यानंतर हे दगड पाण्यावर तरंगायला लागले, असं लिहीलेलं आहे. हा झाला पौराणिक इतिहास. त्यात मला जायचं नाही, पण आत्तासुद्धा या भागात समुद्र खोल असूनही या इथल्या पाण्याची खोली ही १ ते १० मिटर ( ३ ते ३० फुट ) इतकीच आहे. ह्या छोट्या खोलीमुळे इकडून नौकांचं वहन करण्यात अडचणी येतात. आजही जहाजांना मन्नारच्या सामुद्रधुनीतून पाल्क स्ट्रेट-ला जाण्यासाठी श्रीलंकेला वळसा घालून जावं लागतं. २००७-०८ साली भारतातल्या राज्यकर्त्यांनी असा कोणता सेतू आस्तित्वात नाही, असं सुप्रीम कोर्टाला सांगून इकडे 'सेतूसमुद्रम प्रॉजेक्ट' सुरु केला होता. या प्रोजेक्टच्या अंतर्गत इथल्या खाडीची खोली वाढवून इकडून मोठ्या जहाजांना ये-जा करता येईल असा प्रस्ताव होता. पण यासाठी संपूर्ण 'रामसेतू'ला उध्वस्त करावं लागणार होतं. इकडे गुंतलेल्या धार्मिक भावना, लोकांचा होणारा विरोध तसेच इकडे असलेली जैवविविधता या गोष्टींमुळे हा प्रस्ताव मागे पडला.   

'रामसेतू' हा स्थापत्यशास्त्राचा आणि रामायणाच्या इतिहासातील नोंदीचा एकमेव साक्षीदार आहे अस म्हटलं जातं. ह्यावर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनामध्ये इथल्या कोरलचं रेडिओकार्बन वय हे ४०२० वर्षं (+- १६० वर्षं) इतकं आढळून आलं आहे. 

(The conventional radiocarbon age is a report that conforms to International Standards using: • a half-life of 5568 years (the Libby standard); • Oxalic Acid I or II as the modern radiocarbon standard; is calculated from the δ13C-corrected Fraction Modern according to the following formula: Age = -8033 ln (Fm))

हे वय रामायण ज्या काळात घडलं त्याच काळाशी मिळतंजुळतं आहे. (रामायण साधारण ४०००-५००० वर्षांपूर्वी घडलेलं आहे असं सांगितलं जातं) आता हे मानवनिर्मित कसं आहे, यासाठी इथे अजून संशोधन केलं गेलं. 

या इकडे पाण्याच्या खाली दगड-मातीच्या दोन वेगवेगळ्या लेअर आढळून येतात. जर हा नैसर्गिक भाग असेल, तर खाली असणाऱ्या दगडमातीचं वय हे वर असणाऱ्या दगड मातीपेक्षा जास्ती असायला हवं हे विज्ञान सांगते. इकडेच खरी मेख आहे. संशोधनानंतर असं आढळून आलं, की वर जे दगड आणि मातीची रचना (लेअर) आहे ती खालच्या दगड मातीशी संपूर्णपणे वेगळी आहे. तसेच त्याचं वय हे साधारण ५०००- ६००० वर्षांच्या घरात आहे. जी खालची लेअर अथवा भौगोलिक रचना आहे तिचं वय साधारण ३०००-४००० वर्षं इतकं आहे. वर असलेली दगडांची रचना ही नैसर्गिक नाही यावर शिक्कामोर्तब होते. ज्या दगडांनी  रामसेतू बनला आहे, ते दगड दुसरीकडून कुठून तरी आणून त्यांची ब्रिज प्रमाणे रचना केली गेली आहे. म्हणजेच हा सेतू मानवनिर्मित आहे. आता हे दगड कसे आणले आणि हे काम कसं केलं गेलं असेल हे अजून गुलदस्त्यात आहे. पण संशोधकांच्या मते त्या काळी असा सेतू बांधणं हे अभियांत्रिकी, विज्ञान, स्थापत्यशास्त्र ह्याचा एक चमत्कार असेल ह्यात वाद नाही. इतिहासातील नोंदींप्रमाणे १५ व्या शतकापर्यंत 'रामसेतू' हा पाण्याबाहेर होता. त्यावरून चालत जाता येत असे. १४८० साली आलेल्या वादळामध्ये समुद्र आत शिरल्याने पाण्याखाली गेला असावा असं म्हटलं जातं. 

नासाच्या उपग्रहांनी जे टिपलं आहे, तो ऍडम्स ब्रिज किंवा रामसेतू हा नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे, ह्याला दुजोरा देणारी अजून एक गोष्ट किंवा नैसर्गिक रचना म्हणा, इकडे आढळून येते. रामायणात सांगितल्याप्रमाणे समुद्रात टाकलेले दगड हे पाण्यावर तरंगत होते. वानरसेनेनी 'श्रीराम' लिहून टाकलेला प्रत्येक दगड हा तरंगायला लागला आणि त्यावरून मग वानरसेनेने लंकेत पाउल ठेवलं असं रामायणात सांगितलं गेलं आहे. तर असे तरंगणारे दगड या भागात विपुल प्रमाणात आढळून येतात. हे दगड पाण्यावर कसे तरंगतात, ह्यामागचं विज्ञान बघणं हे महत्वाचं आहे. 

तरंगणारे दगड किंवा ज्याला 'प्युमाईस' असं म्हणतात, ते ज्वालामुखीच्या उद्रेकात तयार होतात. ज्वालामुखीतील आतला भाग प्रचंड दाबाखाली असतो आणि  त्याचं तापमान १६०० डिग्री सेल्सियस पर्यंत असतं. जेव्हा हा ज्वालामुखी बाहेर येऊन हवेशी किंवा समुद्राच्या पाण्याशी संपर्क करतो, तेव्हा पाण्याची वाफ तात्काळ होते. पण त्याचवेळी तापमानातील हा प्रचंड फरक गरम लाव्हारसाला 'कोल्ड शॉक' देतो. अचानक झालेल्या तापमानातील फरकामुळे लाव्हा तिथल्या तिथे फ्रोझन (द्रवरुपातून घनरूपात बदल) होतो. ह्या प्रक्रियेत तयार झालेले पाण्याची वाफ होऊन तयार झालेले गॅसचे बुडबुडे आतमध्ये अडकून राहतात. ह्यामुळे ह्या दगडाला स्पंज सारखं सच्छिद्र बनवतात. काही प्युमाईस दगडांमध्ये मध्ये हे बुडबुडे ९०% जागा व्यापतात. ह्या अडकलेल्या गॅसमुळे किंवा रिकाम्या जागेमुळे ह्या दगडांची घनता प्रचंड कमी असते. इतकी कमी की आत असलेल्या सच्छिद्र पोकळ्यांमुळे हे दगड पाण्यात टाकल्यावर काही काळ तरंगतात. जेव्हा पाणी हळूहळू त्यात असलेल्या हवेची जागा घेतं तेव्हा हे दगड पाण्यात बुडतात.

हे 'प्युमाईस' किंवा तरंगणारे दगड ह्या परिसरात विपुल असून 'रामसेतू'च्या वेळेस असे दगड वापरले गेले असण्याची खूप दाट शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. ज्याला आपण एक भावनिक आणि धर्माचा रंग दिला, तरी त्यात एक विज्ञान आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. खरे तर ह्या 'रामसेतू' मुळे इकडे नैसर्गिक कोरल झालं असून समुद्रातील एक विश्व इकडे राहते आहे. इकडे मानवाने हस्तक्षेप करून जर ह्या 'रामसेतू'ला धक्का लावला, तर एक विश्व आपण नष्ट  करणार आहोत. त्यामुळे हा सेतू रामाने बांधला हे आज सांगणं किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्ट करणं आज कठीण असलं, तरी तो मानवनिर्मित आहे हे वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट झालेलं आहे. तसेच तेथील खडक, सागररचना तसेच येथील जैवविविधतेला जतन करण्याची गरज नक्कीच आहे. 'रामसेतू'ला फक्त धार्मिक आणि राजकीय चष्म्यातून न बघता त्यामागचं विज्ञान आणि त्याचं महत्व समजून घेतलं तर ते 'रामसेतू'चं रक्षण आणि महत्व येत्या कित्येक पिढयांना आपण सांगू शकू, ह्यात शंका नाही.

तळटीप :- पोस्टचा उद्देश कोणाच्याही धार्मिक भावनांना खतपाणी घालणे, राजकीय चिखलफेक अथवा अन्य कोणत्याही कारणांसाठी नाही. 'रामसेतू'ला वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघण्याचा एक प्रयत्न आहे. तरी या पोस्टचा वापर कोणत्याही राजकीय, धार्मिक आणि संस्थांच्या उद्देशांना पूर्ण करण्यासाठी करू नये ही  नम्र विनंती.     

फोटो स्त्रोत :- गुगल (पहिल्या फोटोत 'रामसेतू'चा उपग्रहातून फोटो आणि दुसऱ्या फोटोत एक २० डॉलरची नोट प्युमाईस दगडाचं वजन पेलताना. )

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday 13 June 2021

ऑक्सिजन च्या शोधात... विनीत वर्तक ©

'ऑक्सिजन'च्या शोधात... विनीत वर्तक  ©

कोरोना रोगाच्या महामारीत एक संकट ज्याने आपल्या मर्यादा उघड्या पाडल्या, ते म्हणजे 'ऑक्सिजन'. कोरोना रोगाचे विषाणू आपल्या फुफ्फुसांवर हल्ला करत असल्याने रुग्णांना बाहेरून ऑक्सिजन पुरवण्याची गरज भासते. ज्या वेगाने भारतात रुग्णवाढ होत आहे ते बघता या सगळ्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणं एक मोठं संकट होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या आपल्या मर्यादा उघड्या पडल्या आणि अनेकांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं. अनेक देशांनी तातडीने भारताला ऑक्सिजनचा पुरवठा केला पण कुठेतरी ऑक्सिजनच्या बाबतीत आपल्याला स्वयंपूर्ण होणं गरजेचं आहे, याची जाणीव शासकीय आणि वैद्यकीय स्तरावर प्रकर्षाने जाणवली. मग सुरु झाला ऑक्सिजनचा शोध. 

आपल्या हवेत साधारण ७८% नायट्रोजन, २१% ऑक्सिजन आणि १% इतर वायू असतात. सामान्य माणूस प्रत्येक श्वासात हवेतला २०%-२१% ऑक्सिजन आत घेतो आणि  उच्छ्वास करताना १५% ऑक्सिजन बाहेर सोडतो. एका श्वासोच्छ्वासाच्या सायकलमध्ये आपण साधारण ५% ऑक्सिजन शरीरात ओढून घेतो. एका मिनिटात सामान्य माणूस ८ लिटर हवा श्वास आणि उच्छ्वास करतो. साधारण ११,००० लिटर हवा प्रत्येक दिवसाला माणसाला लागते. गणित केलं तर जवळपास ५५० लीटर ऑक्सिजन आपल्याला एका दिवसात लागतो. हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच, की कोरोना महामारीत ऑक्सिजनची गरज लागलेल्या प्रत्येकाला इतका ऑक्सिजन किंवा याहून थोडा जास्ती ऑक्सिजन पुरवण्याची गरज पडते. देशात जेव्हा दररोज १-४ लाख रुग्णांची भर पडत असेल, तेव्हा ऑक्सिजनची गरज किती पटीने वाढली असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. 

जेव्हा माणूस सामान्यपणे हवेतील ऑक्सिजन घेण्यास असमर्थ ठरतो किंवा त्यात त्याला अडचणी येतात, तेव्हा त्याला बाहेरून ऑक्सिजन दिला जातो. ज्याला मेडिकल ग्रेड ऑक्सिजन असं म्हणतात. यात जवळपास ९३%-९५% इतका ऑक्सिजन असतो. कोणी म्हणेल की १००% का नाही? तर १००% ऑक्सिजन हा माणसाला घातक आहे. १००% शुद्ध ऑक्सिजन जर शरीरात गेला तर तो आपल्या डी.एन.ए. स्ट्रक्चर, प्रोटीन, फॅट्स आणि एकूणच रेस्पिरेटरी सिस्टीमला खराब करू शकतो. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय मानकानुसार (ISO standards 7396-1:2016) तो पाईपलाईनमधून रुग्णापर्यंत २ लिटर ते ४ लिटर प्रति मिनिट या वेगाने रुग्णाला दिला जातो. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज असताना त्याची निर्मिती करणं हे सगळ्यात मोठं लक्ष्य भारतापुढे होतं. अनेक पद्धतीने ऑक्सिजन निर्माण केला जातो. पण किफायतशीरपणे जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मितीसाठी भारताची डी.आर.डी.ओ. पुढे आली. त्यांनी विकसित केलेलं तंत्रज्ञान त्यांनी इतर उत्पादकांसोबत शेअर करून भारतात येत्या ३ महिन्यांत ५०० ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट उभे केले जाणार आहेत. 

महाराष्ट्राच्या जालना इकडे अश्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑक्सिजन प्लॅन्ट उभा राहतो आहे. जालना इथल्या जिल्हा रुग्णालयात हा प्लॅन्ट बसवला जाणार आहे. प्रत्येक मिनिटाला १००० लिटर मेडिकल ग्रेड ऑक्सिजन निर्माण करण्याची ह्याची क्षमता आहे. जवळपास १९० रुग्णांना एकावेळी ऑक्सिजन देता येऊ शकणार आहे. तसेच १९५ जंबो ऑक्सिजन सिलेंडर भरता येतील, इतका ऑक्सिजन निर्माण करण्याची याची क्षमता आहे. ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी 'तेजस' लढाऊ विमानात वापरलेलं तंत्रज्ञान डी.आर.डी.ओ. ने दिलेलं आहे. डी.आर.डी.ओ. ने pressure swing absorption and molecular sieve technology चा वापर यात केलेला आहे. तर नक्की काय आहे हे तंत्रज्ञान?

गॅसेस जेव्हा दाबाखाली येतात तेव्हा ते एखाद्या सॉलिड पृष्ठभागाकडे खेचले जातात. तर गॅसेसच्या ह्याच गुणधर्माचा उपयोग pressure swing absorption and molecular sieve technology मध्ये केला जातो. हवा दाबाखाली आणून त्या चेंबरमध्ये नायट्रोजन खेचून घेणारं मटेरियल जसं 'झेओलाइट' असते, जे नायट्रोजन खेचून घेते. मग राहिलेला भाग हा ऑक्सिजनचा उरतो. या चेंबरमधून बाहेर पडणाऱ्या हवेत ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्ती होते. त्याला आपण ९३%-९५% टक्के पर्यंत नेलं की तयार होतो मेडिकल ग्रेड ऑक्सिजन. या मटेरियलची नायट्रोजन खेचून घेण्याची क्षमता भरली, की प्रेशर कमी केले जाते आणि हा नायट्रोजन पुन्हा हवेत सोडला जातो. पुन्हा हे तंत्रज्ञान ऑक्सिजन जास्त असलेल्या हवेची निर्मिती करत राहते. बाहेर निघणाऱ्या नायट्रोजनचा वापर दुसऱ्या चेंबरला प्रेशर करण्यासाठी केला जातो. अश्या रीतीने आलटून पालटून न थांबता या चेंबर मधून मेडिकल ग्रेड ऑक्सिजन (हवा) बाहेर पडत राहतो.

'तेजस'सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानात वापरलं जाणारं हे आधुनिक तंत्रज्ञान डी.आर.डी.ओ. ने सामान्य लोकांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. ह्या तंत्रज्ञानावर आधारित अवघ्या ३ महिन्यात ५०० प्लॅन्ट देशभरात उभे राहणार आहेत. नक्कीच यातून अनेक लोकांचे जीव वाचणार आहेत. आत्मनिर्भर भारत काय करू शकतो याचं दुसरं चांगलं उदाहरण शोधून सापडणार नाही. ऑक्सिजन या प्राणवायूच्या शोधातून भारताने स्वतःला आत्मनिर्भर बनवण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. ऑक्सिजनच्या निर्मिती तंत्रज्ञानमध्ये आमूलाग्र बदल घडवणऱ्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी डी.आर.डी.ओ. च्या वैज्ञानिक आणि संशोधकांना माझा नमस्कार... 

जय हिंद!!!   
       
फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  





Tuesday 8 June 2021

#मंदिरांचे_विज्ञान गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणाऱ्या मंदिराची गोष्ट... विनीत वर्तक ©

#मंदिरांचे_विज्ञान - गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणाऱ्या मंदिराची गोष्ट... विनीत वर्तक ©

१६८७ चं वर्षं होतं. सर आयझॅक न्यूटन यांनी त्यावेळच्या Philosophiae Naturalis Principia Mathematica (1687), किंवा ज्याला 'the Principia' असं म्हटलं जायचं, त्या मासिकात जगाच्या येणाऱ्या कित्येक वर्षांचा कायापालट करणारे गतीचे नियम पहिल्यांदा जगापुढे मांडले. आजही ते तीन नियम न्यूटनचा पहिला, दुसरा आणि तिसरा नियम म्हणून ओळखले जातात. आपल्यापैकी प्रत्येकाने त्याचा अभ्यास शालेय जीवनात केला असेल. त्याच काळात न्यूटन ह्यांनी गुरुत्वाकर्षण आणि त्याचं बल कश्या पद्धतीने पृथ्वीवरच्या कोणत्याही वस्तूवर कार्य करते हे नियमांतून सिद्ध केलं. गुरुत्वाकर्षणामुळे काम करणाऱ्या बलाला निश्चित अशी दिशा आणि परिणाम असतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी अजून एक गोष्ट जगापुढे मांडली, ती म्हणजे हे बल 'व्हेक्टर क्वांटिटी' आहे, याचा अर्थ हे बल एका सरळ रेषेत अथवा एखाद्या निश्चित अश्या बिंदूपाशी एकवटलेले असते. या बिंदूलाच त्यांनी नाव दिलं 'सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी'.

'सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी' म्हणजे काय? अजून थोडं खोलात समजून घेतलं तर गुरुत्वाकर्षणाचं बल जरी कोणत्याही वस्तूवर सगळीकडे काम करत असलं, तरी त्या बलाची संपूर्ण शक्ती एखाद्या बिंदूपाशी अथवा एका रेषेत एकटवलेली असते. संपूर्ण वस्तूचं वजन किंवा त्या वस्तूला स्थिर ठेवण्यासाठी एका बिंदूवर किंवा एका रेषेत जर आपण प्रतिबल निर्माण केलं तर ती वस्तू जशीच्या तशी 'इक्विलिब्रियम' (समतोल) स्थितीत आपण स्थिर करू शकतो. न्यूटननी शोधलेल्या या शोधांबद्दल इतकं सगळं लिहीण्यामागचं कारण हेच की या सगळ्या संज्ञा भारतीयांना कित्येक हजारो वर्षांपूर्वी माहित होत्या. गुरुत्वाकर्षण कसं काम करतं? किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सारख्या नियमांची  जाणीव भारतीयांना आधीच होती. याचे पुरावे देणारं एक मंदिर तब्बल १००० वर्षांपेक्षा जास्ती काळ निसर्गाचं चक्र, परकीय आक्रमणं आणि काळाच्या ओघात होणाऱ्या झीज अश्या सगळ्या प्रतिकूल गोष्टींना झेलत आजही उभं आहे. गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणाऱ्या या मंदिराचं नाव आहे "ककनमठ शंकर मंदिर".     

'ककनमठ मंदिर' हे मध्य प्रदेशमधील मोरना जिल्ह्यातील सिहोनिया या गावात उभं आहे. साधारण १३० फूट उंच असणाऱ्या या मंदिराचं निर्माण १०१५ ते १०३५ मध्ये कीर्तिराजाने केल्याचा शिलालेख आहे. हे मंदिर जेव्हा बांधून पूर्ण झालं होतं, तेव्हा एक मुख्य मंदिर होतं आणि त्याच्याबाजूला ४ मंदिरं होती. पण गेल्या १००० वर्षांपेक्षा जास्ती कालखंडात आता मुख्य मंदिर उभं आहे. या मंदिराचं बांधकाम अर्धवट राहिलेलं वाटतं. कारण मंदिर बघितलं तर अनेक गोष्टी अर्धवट सोडलेल्या वाटतात. या मंदिराबद्दल अशी एक आख्यायिका आहे, की या मंदिराचं बांधकाम भुतांनी आपल्या सर्वोच्च शक्तीला प्रसन्न करण्यासाठी एका रात्रीत केलं. शंकर म्हणजेच शिवा हा देवांसोबत असुरांचाही देव आहे. हिंदू धर्मात शंकराला सर्वोच्च स्थान आहे ते यामुळेच. 'गॉड ऑफ क्रियेशन आणि डिस्ट्रक्शन' असं शंकराच्या बाबतीत म्हटलं जातं. एका रात्रीत बांधकाम करता करता सकाळ झाल्याने भुतं पळून गेली आणि मंदिराचं बांधकाम अर्धवट राहिलं. आजही रात्री इकडे राहण्यासाठी लोक घाबरतात. 

भुतांच्या गोष्टीत मला जायचं नाही, पण या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची रचना. वर सांगितलं त्याप्रमाणे न्यूटनने शोधलेल्या 'सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी' नियमांचा वापर बांधकामात केला गेला आहे. या संपूर्ण मंदिराच्या बांधकामात कुठेही सिमेंट किंवा बायंडिंग मटेरियलचा वापर केला गेलेला नाही. याचा अर्थ या मंदिराचं बांधकाम दगडाच्या चिरा एकमेकांवर रचून केलं गेलं आहे. हे सर्व दगड विशिष्ट पद्धतीने रचले गेले आहेत आणि ते रचताना 'सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी' तत्त्वाचा वापर केला गेला आहे. हे दगड एकमेकांवर अश्या पद्धतीने बल टाकतात, की एक दगड दुसऱ्याला त्याच्या जागेवरून हलू देत नाही. हे बल इतकं मजबूत आहे, की निसर्गाच्या कालचक्रात मग तो ऊन, वारा, पाऊस असो वा परकीय शक्तीच्या आक्रमणातही टिकून राहिलं आहे. मंदिर बघताना आपल्याला असं जाणवेल, की वाऱ्याची झुळूक आली तर सगळं कोसळून जाईल आणि एक धक्का लागला तर सगळं नष्ट. पण गुरुत्वाकर्षणाच्या त्या अदृश्य बलापुढे सगळे हतबल आहेत. 

न्यूटन जन्माला यायच्या ६०० वर्षं आधी भारतीयांना गुरुत्वाकर्षणाबद्दल माहित होतं, तसेच हे बल 'व्हेक्टर क्वांटिटी' आहे हेही ज्ञात होतं. त्यामुळेच हे बल एका रेषेत आणि एका बिंदूत एकटवण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीने दगडाच्या चिऱ्यांना आकार दिले. हे आकार विशिष्ट पद्धतीमध्ये गुंफवून ककनमठ शिव मंदिराचं भव्य स्वरूप उभं केलं, जे आजही तग धरून उभं आहे. मुळातच एखाद्या वस्तूवर काम करणाऱ्या या बलाचा इतका सुंदर वापर मंदिर निर्मितीसाठी केला जाऊ शकतो हा क्रांतिकारी विचार, तसेच त्यावर गणित आणि त्याचा अभ्यास केल्याशिवाय अशी कलाकृती उभी राहणं अशक्य आहे. आज आपण सगळी मोजमापं घेऊन जरी याची प्रतिकृती उभारण्याचा विचार केला, तरी ती अशक्य आहे. एवढंच काय, 'आर्कियॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया'नेही मंदिराला कोणत्याही पद्धतीने दुरुस्त करणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे. कोणता दगड कोणत्या साच्यासाठी बसवला गेला आहे, याचा अंदाज येणं कठीण आहे. तसेच एखादा असा प्रयास संपूर्ण मंदिर नष्ट होण्यास कारणीभूत होऊ शकतो. त्यामुळेच आज त्याच्या त्या अर्धवट रूपात आपण बघू शकतो. 

'ककनमठ शिव मंदिर' राष्ट्रासाठी महत्वाचा सांस्कृतिक वारसा असल्याचं आर्कियॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने घोषित केलं आहे. आजही असं म्हटलं जातं, की गुरुत्वाकर्षणाचे सगळे नियम जिकडे थांबतात ती वस्तू म्हणजे 'ककनमठ शिव मंदिर'. न्यूटनने भले ४०० वर्षांपूर्वी एखाद्या मासिकात हे नियम गणितातून तत्वतः सिद्ध केले असतील, ते आम्ही शिकतो पण त्या नियमांना समजून, तशी उभी राहिलेल्या कलाकृतीबद्दल कोणी आम्हाला सांगत नाही, हेच आमचं अपयश आहे. आम्ही 'ककनमठ शिव मंदिर' ओळखतो ते भुतांनी निर्माण केलं म्हणून, ना की 'गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणारे मंदिर' म्हणून. जेव्हा हा दृष्टिकोन बदलेल तेव्हाच त्या शंकरापर्यंत आपली प्रार्थना पोहोचेल असं मला मनापासून वाटतं. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   



Sunday 6 June 2021

एका आरश्याची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका आरश्याची गोष्ट... विनीत वर्तक ©

आपलंच प्रतिबिंब आपल्याला दाखवणारी गोष्ट म्हणजेच आरसा. रोज सकाळी उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत प्रत्येकजण एकदातरी स्वतःला आरश्यात न्याहाळतो. जो आरसा आपल्याला प्रतिबिंब दाखवतो, तोच आपल्याला विश्वाचं प्रतिबिंबही दाखवतो. अनंत अंतरापासून निघालेला प्रकाश आपल्या कवेत घेऊन, त्याला परावर्तित करून माणसाच्या डोळ्यांपर्यंत पोहोचवल्याने आज विश्वाची अनेक कवाडं माणसाला उघडी झाली आहेत. ही गोष्ट आहे अश्या एका आरश्याची, जो पुढल्या दहा वर्षांत मानवाच्या विश्वाबद्दलच्या ज्ञानात प्रचंड भर तर घालणार आहेच, पण त्याचसोबत आपल्या पृथ्वीला धोका असलेल्या अनेक गोष्टींची धोक्याची सूचनाही आपल्याला आधीच देणार आहे. चला तर मग जाणून घेऊ विश्वाचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या या आरश्याची गोष्ट! 

२००८ साली जगातील अनेक संशोधक अमेरिकेतल्या ऍरिझोना विद्यापीठातल्या एका भट्टीसमोर जमले होते. त्या भट्टीमधलं तापमान जवळपास १२०० डिग्री सेल्सिअसला पोहोचलं होतं. त्या भट्टीत २२ टन (२२,००० किलोग्रॅम) वजनाचा काचेचा गोळा तब्बल ६० किलोमीटर/ तास वेगाने गोल फिरत होता. त्या दिवशी ही काच आपल्या वितळण्याच्या तपमानाला पोहोचली. तिने एखाद्या मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे आकार घ्यायला सुरूवात केली. तीच सुरूवात होती, जेव्हा जगातील सगळ्यांत शक्तिशाली आरसा आकाराला येत होता. त्याला घडवल्यानंतर ९० दिवसांपेक्षा जास्ती दिवस थंड करण्यात गेले. कारण तापमानातील फरक त्या आरश्याची क्षमता खराब करू शकत होता. तयार झाल्यावर तब्बल ६ वर्षं त्याला ग्राइंडिंग आणि पॉलिशिंग केलं गेलं. त्यातून जन्माला आला 'एम १ एम ३' आरसा. 

'एम १ एम ३' आरसा हा चिली-मध्ये बनत असलेल्या वीरा सी. रुबीन Large Synoptic Survey Telescope (LSST) वेधशाळेचा मुख्य भाग आहे. जी २०२२ मध्ये तयार होऊन आकाशाचा वेध घ्यायला सुरू करेल. या वेधशाळेची क्षमता बघितली तर डोळे विस्फारून जातील. आकाशातील ३७ बिलियन ( १ बिलियन म्हणजे १०० कोटी) तारे, ग्रह यांचा वेध घेण्याची हिची क्षमता आहे. विश्वाचा वेध घेताना, पृथ्वीला धोका असणाऱ्या १० मिलीयन (१ मिलियन १० लाख) वस्तूंचे अलर्ट तसेच १००० पेअर ऑफ एक्स्पोजर आणि २० टेराबाईटची माहिती प्रत्येक रात्रीत गोळा करण्याची प्रचंड अशी क्षमता आहे. यावरील कॅमेरा हा तब्बल ३२०० मेगा पिक्सलचा आहे. ज्यातून पोर्णिमेचे ४० चंद्र बसतील इतकी मोठी इमेज प्रत्येक क्लिकमध्ये घेण्याची क्षमता आहे. हे सगळं या वेधशाळेला बंदिस्त करणं शक्य होणार आहे, ते या 'एम १ एम ३' आरश्यामुळे. आपल्या विश्वाबद्दलच्या माहितीत आमूलाग्र भर घालण्याची क्षमता या आरश्यामुळे वीरा सी. रुबीन. वेधशाळेला प्राप्त झाली आहे. 

'एम १ एम ३' आरसा हा साधासुधा आरसा नाही. याच्या निर्मितीमध्ये अगदी या आरश्यात असलेल्या प्रत्येक खड्याला मोजून मापून निरखून घेण्यात आलं आहे. या आरश्यासाठी लागणाऱ्या मटेरिअल सॅण्ड, सोडाऍश आणि लाइमस्टोनमधील प्रत्येक कण हा पारखून निवडण्यात आला आहे. त्याची निवड ही  जपानमधील एका कंपनीने केली आहे. अमेरिकेत भट्टीमध्ये तापवण्याआधी यातील प्रत्येक लेअर ही योग्य प्रमाणात रचली गेली आहे. अत्यंत किचकट असणारी प्रत्येक  पायरी आणि काळजी घेऊन या आरश्याची निर्मिती केली गेली आहे. विश्वाच्या कोपऱ्यात येणाऱ्या अगदी अंधुक प्रकाशाचा वेध घेण्यासाठी या आरश्याचा पृष्ठभाग हा आपल्या केसांच्या जाडीइतक्या अचूकतेने पॉलिश  केला गेला आहे. त्याला हवा तसा आकार देण्यासाठी एका इंचाच्या एक मिलियन-व्या(१० लाख ) भागाइतकी अचूकता त्याच्या पृष्ठभागावर ठेवण्यात आली आहे. आता लक्षात येत असेल की अश्या पद्धतीचा आरसा ग्राइंडिंग आणि पॉलिश करायला तब्बल ६ वर्षं का लागली असतील.   

'एम १ एम ३' हा एक आरसा नाही, तर दोन आरसे एकात एक असे बनवले गेले आहेत. रात्रीच्या आकाशात जेव्हा वीरा सी. रुबीन वेधशाळा विश्वाचा वेध घेण्यासाठी हा आरसा फोकस करेल, तेव्हा विश्वाच्या पोकळीतून येणारा प्रकाश 'एम १' आरश्यावर ('एम १' आरसा म्हणजे ह्या आरश्याचा बाहेरचं वर्तुळ) पडून प्रतिबिंबित होईल. हे प्रतिबिंब ३.४ मीटरच्या दुसऱ्या 'एम २' आरश्यावर पडून पुन्हा 'एम ३' आरश्यावर, जे की ह्या आरश्याचं आतलं वर्तुळ आहे त्यावर प्रतिबिंबित होईल आणि मग तिकडून प्रतिबिंबित झालेला प्रकाश ३२०० मेगापिक्सल असलेल्या लेन्सवर प्रतिबिंबित होऊन आपल्या समोर विश्वाची कवाडं उघडी करेल. विश्वातील आत्तापर्यंतचा मानवाने बनवलेला सगळ्यात शक्तिशाली कॅमेरा हा असेल. ज्यातून विश्वाच्या अनेक अद्भुत रहस्यांचा उलगडा होणार आहे.   

आजवर आपण जे विश्व बघत आलो, त्याला एका वेगळ्याच पातळीवर प्रतिबिंबित करणारा हा आरसा मानवाच्या तांत्रिक कौशल्यातील एक मैलाचा दगड नक्कीच आहे. पुढल्या वर्षी जेव्हा ही वेधशाळा सुरू होऊन विश्वाचा वेध घ्यायला सुरूवात करेल, तेव्हा गेली १२-१३ वर्षं त्याच्या निर्मितीत वेचलेल्या प्रत्येक क्षणाचं सोनं होईल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. या आरश्याच्या निर्मितीसाठी मेहनत करणाऱ्या वैज्ञानिक, कामगार आणि अभियंते तसेच या वेधशाळेच्या निर्मितीसाठी पैसा उपलब्ध करणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार. मला खात्री आहे, की  येत्या काही काळात वीरा सी. रुबीन Large Synoptic Survey Telescope (LSST) आपल्याला ज्ञात असणाऱ्या विश्वाच्या जडघडणीत मोलाचं योगदान देईल.       

फोटो स्त्रोत :- गुगल ( एका फोटोत आरश्याच्या निर्मितीचं मटेरियल काळजीपूर्वक भट्टीत रचताना तर दुसऱ्या फोटोत वैज्ञानिक अचूकतेने आरश्याला पॉलीश करताना) 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


 




Wednesday 2 June 2021

रांगण्याची गोष्ट... विनीत वर्तक ©

 रांगण्याची गोष्ट... विनीत वर्तक ©


कोणतंही मूल जन्माला आल्यावर काही महिन्यांनी ज्या गोष्टीची सगळेजण वाट बघत असतात, ती म्हणजे ते रांगायला केव्हा लागते. आपल्या आयुष्यात स्वतःच्या हिमतीवर पुढे जाण्यासाठी केलेली ती धडपड म्हणजेच आयुष्यात त्याने टाकलेल्या पहिल्या पावलांची नांदी असते. काळाच्या ओघात आपण 'रांगणे म्हणजे काय?' हे विसरून जातो. मोठेपणी आपल्या घरातील दोन भिंतींएवढं अंतर रांगून दाखव, असं म्हटलं तरी आपल्याला घाम फुटेल. पण आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी  आणि आपलं लक्ष्य मिळवण्यासाठी कोणी तब्बल ११ दिवस रांगून ३ किलोमीटरपेक्षा जास्त अंतर तब्बल १७,००० फूट उंचीवर गाठलं असेल, असं आपल्याला कोणी सांगितलं, तर आपला विश्वास बसणार नाही. कारण आपल्याला पडद्यावरचे शत्रुघ्न सिन्हा माहीत असतात पण असा भीमपराक्रम करणारे 'नायक शत्रुघ्न सिंग' मात्र इतिहासाच्या पानात लुप्त झालेले असतात. तर कोण आहेत हे शत्रुघ्न सिंग? आणि काय आहे त्यांच्या रांगण्याची गोष्ट? कारगिल युद्धाचं पारडं भारताच्या बाजूने झुकवण्यात त्यांच्या रांगण्याची काय भूमिका होती?

३ मे १९९९ चा दिवस होता, जेव्हा बटालिक सेक्टरमधल्या गरकोन गावातील ताशी आणि तेरसिंग गुराखी आपल्या याक-ना चरायला घेऊन गेले होते. याक-चा शोध घेताना बटालिकच्या टेकड्यांवर त्यांना काही माणसे जाताना दिसली. बर्फ अजून वितळायचा होता आणि थंडीच्या काळात आपल्या पोस्ट सोडून मागे गेलेले भारतीय सैनिक परत यायला वेळ होता, अश्या वेळेस कोण लोक बटालिकच्या टेकड्यांवर जात आहेत, असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी वेळ न दवडता त्यांची माहिती भारतीय सेनेच्या ३ पंजाब रेजिमेंटला दिली. हीच सुरूवात होती कारगिल युद्धाची. मे संपता संपता हे स्पष्ट झालं होतं की भारताच्या भूमीत पाकिस्तानने घुसखोरी केली आहे. पण पाकिस्तान असं भासवत होता की काही आतंकवादी इकडे घुसले असतील. आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचं पितळ उघडं पाडण्यासाठी भारताला पुरावे हवे होते. याच काळात भारताने काही सैनिकांना गमावलं तर काहींना पाकिस्तानने पकडलं होतं. 

२९ मे १९९९ रोजी मेजर एम. सर्वानन यांच्या नेतृत्वाखाली १ बिहार टीमच्या १५ जणांनी पॉईंट ४२६८ वर हल्ला बोल केला. पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्या टीम वर गोळ्यांचा वर्षाव सुरु केला. मेजर एम. सर्वानन यांनी मागे परतण्याचा विचार सोडून दिला आणि शत्रूवर हल्ला केला. या धुमश्चक्रीत मेजर आणि नायक गणेश प्रसाद यांना वीरमरण आलं. पण त्यांचे मृतदेह शत्रूच्या हाती लागू नये यासाठी नायक शत्रुघ्न सिंग यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शत्रूच्या दिशेने हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या साथीदारांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी कव्हर फायर देण्यास सुरवात केली. पण पुढे काय होणार आहे याचा अंदाज सर्वांना आला होता, पण 'बचेंगे तो ओर भी लढेंगे' या उक्तीला भारतीय सैनिक पुरून उरले. आपल्या साथीदारांना मदत करताना नायक शत्रुघ्न सिंग यांना उजव्या पायात गोळी लागली आणि ते जायबंदी झाले. 

आपल्या उरलेल्या साथीदारांना त्यांनी स्वतःला युद्धभूमीत सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलं. आपण जायबंदी झाल्यामुळे आपले साथीदार शत्रूच्या हातात सापडू नयेत म्हणून त्यांनी त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला आणि युद्धभूमीवर शत्रूवर गोळीबार करत राहिले. शत्रू त्यांच्यासमोर अगदी १०० मीटर वरून गोळ्यांचा वर्षाव करत होता. प्रतिउत्तर यायचं कमी झाल्याचं दिसताच शत्रूने भारतीय सैनिक जिकडे होते तिकडे ते सर्व मेल्याची खात्री करण्यासाठी त्यांनी शोध सुरु केला. जायबंदी झालेल्या नायक शत्रुघ्न सिंग यांना दुसरा कोणताच मार्ग दिसत नव्हता तेव्हा त्यांनी मेल्याचं नाटक केलं. तब्बल ७ तास ते आपला श्वास रोखून तसेच निपचित पडून होते. शत्रू आणि भारताच्या सैनिकांनाही ते मृत्युमुखी पडल्याचं वाटलं. त्यांच्या कुटूंबियांनाही ते हुतात्मा झाल्याचं कळवण्यात आलं. पण नायक शत्रुघ्न सिंग यांचा लढा संपला नव्हता. तब्बल ७ तासांनी सगळं शांत झाल्याचा अंदाज आल्यावर त्यांनी डोळे उघडले. १७,००० फुटावर जिकडे बर्फाचे साम्राज्य असते तिकडे हाडे गोठवणाऱ्या थंडीत उभे राहण्यास आणि चालण्यास असमर्थ असलेल्या  भारतीय सैनिकाची गोष्ट संपत नाही तर इकडे सुरू होते.  

डोळे उघडल्यावर त्यांनी आजूबाजूचा अंदाज घेतला. आणि तिथे मृतदेहांची सुरक्षा करत असलेल्या पाकिस्तानी सैनिकाला त्यांनी तश्या अवस्थेत टिपलं. त्याचा देह जिकडे निपचित पडला होता तिकडे रांगत जाऊन त्यांनी त्याची मशिनगन हस्तगत केली. त्याचसोबत त्याच्या खिशातून काही कागदपत्रे त्यांनी मिळवली. ती बघताच त्यांना पाकिस्तानचा हेतू स्पष्ट झाला. कारण जिकडे भारत आणि जग आतंकवाद्यांनी घुसखोरी केली असं समजत होते तिकडे प्रत्यक्षात पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण नियोजन करून हा डाव खेळला होता. त्याच्या खिशात असलेलं पाकिस्तानी सैन्याचं ओळखपत्र आणि पगाराची पावती या गोष्टी पाकिस्तानी सैनिक या युद्धाला जबाबदार आहेत हे स्पष्ट करत होत्या. पण आता हे सगळं भारतीय सैन्याच्या बेसपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. उभं राहण्यासही असमर्थ असलेल्या नायक शत्रुघ्न सिंग यांनी रांगायला सुरवात केली. १७,००० फुटावर तब्बल ११ दिवस कोणत्याही अन्न-पाण्याशिवाय शत्रूच्या नजरेत न येता ते रांगत होते एका लक्ष्यासाठी.... तब्बल ३ किलोमीटरपेक्षा जास्त अंतर त्यांनी बर्फाच्या कातळांवर रांगत येऊन आपल्याकडील पाकिस्तानी सैनिकाची हस्तगत केलेली मशिनगन, दारुगोळा आणि सगळ्यात महत्वाची असलेली कागदपत्रं त्यांनी भारतीय सेनेला दिली. यानंतर युद्धाची रणनीती संपूर्णपणे बदलून गेली आणि पाकिस्तान जागतिक मंचावर उघडा पडला. 

 नायक शत्रुघ्न सिंग यांना त्यांच्या भीमपराक्रमासाठी 'वीर चक्राने' सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पराक्रमानंतर एकट्या बटालिक सेक्टरमधे ६० पेक्षा जास्ती पाकिस्तानी सैनिकांची आणि अधिकाऱ्यांची ओळख पटवण्यात आली. लहानपणी टाकलेल्या पहिल्या पावलाने नायक शत्रुघ्न सिंग यांनी असा एक पराक्रम केला ज्याचा विचारही आपण आज करू शकत नाही. पण त्यांच हे रांगणं नेहमीप्रमाणे इतिहासाच्या पानात लुप्त झालं. 'खामोश' असं आपल्या स्टाईलने म्हणणाऱ्या शत्रुघ्नसोबत प्रत्येक भारतीयाने रांगणाऱ्या नायक शत्रुघ्न सिंग यांना पण लक्षात ठेवलं तर माझ्या मते तो त्या सैनिकाच्या पराक्रमाचा यथोचित सन्मान असेल. नायक शत्रुघ्न सिंग यांना माझा कडक सॅल्यूट. 

जय हिंद!!! 

फोटो स्त्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.