Saturday 19 June 2021

मोठं करणाऱ्या लहान गोष्टी... विनीत वर्तक ©

 मोठं करणाऱ्या लहान गोष्टी... विनीत वर्तक ©


आयुष्यात प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं. पैश्याने, अभ्यासाने, वस्तूंनी माणूस श्रीमंत नक्कीच होतो, पण मोठेपण कमवायला मात्र आपलं व्यक्तिमत्व तसं घडवावं लागतं. अंगभूत गुणांनी माणूस मोठा होत असतो. आपल्या स्वभावातील याच गोष्टी माणसाला महान बनवतात. गेल्या आठवड्यात जागतिक पातळीवर घडलेल्या  दोन गोष्टींनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं. 

पहिली गोष्ट घडली, ती युरोपिअन चॅम्पियनशिपच्या पत्रकार परिषदेत. जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंमधे गणल्या जाणाऱ्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्रकार परिषदेत बसताना समोर ठेवलेल्या कोका कोलाच्या दोन बॉटल्स हटवून पाण्याची बाटली हातात घेतली आणि पोर्तुगीज मधे 'ऍक्वा' असं म्हणत कार्बोनेटेड ड्रिंक्सबद्दल आपलं मत स्पष्ट केलं. रोनाल्डोच्या या छोट्या वागणुकीमुळे कोका कोलाचा शेअर १.६% टक्यांनी गडगडला. कोका कोलाचं  बाजारमूल्य तब्बल ४ बिलियन अमेरिकन डॉलर (४०० कोटी अमेरिकन डॉलर) ने कमी झालं. ख्रिस्तियानो रोनाल्डो हा फुटबॉलमधील एक नावाजलेला खेळाडू तर त्याच्या खेळामुळे प्रसिद्ध आहेच, पण तो आपल्या सर्वोत्तम आरोग्यासाठीही ओळखला जातो. आपल्या १९ वर्षांच्या करिअरमध्ये त्याने ७८० पेक्षा जास्त गोल आंतरराष्ट्रीय पातळीवर केले आहेत. जगातील सगळ्यांत तंदुरूस्त खेळाडूंमध्ये वयाच्या ३६ वर्षीही त्याची गणना होते. याला कारण त्याने आपल्या आरोग्याची घेतलेली काळजी. 

१ बिलियन अमेरिकन डॉलर (१०० कोटी अमेरिकन डॉलर ) इतकी प्रचंड संपत्ती आणि जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू असणाऱ्या रोनाल्डोसाठी कोकची एक जाहिरात कित्येक कोटी रुपये कमावून देऊ शकते. पण कार्बोनेटेड ड्रिंक्स आपल्या शरीराची काय हानी करतात याबद्दल सजग असलेल्या या खेळाडूने असल्या कोणत्याही ड्रिंक्सची जाहिरात तर नाकारली आहेच, पण त्यापलीकडे उघडपणे त्याचा विरोध करायलाही त्याने मागेपुढे बघितलेलं नाही. खरे तर युरोपिअन चॅम्पियनशिपचा कोका कोला ब्रँड एक स्पॉन्सर आहे. त्यामुळेच या दोन बॉटल पत्रकार परिषदेत रोनाल्डोपुढे जाहिरातीसाठी ठेवल्या होत्या. पण कोका कोलासारख्या कंपन्यांच्या दबावाला बळी न पडता तो आपल्या तत्त्वाला जागला आणि त्या कोला बॉटलऐवजी त्याने पाण्याची बॉटल ठेवताना 'मी पाणी पितो' हा संदेश स्पष्टपणे दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर अश्या प्रकारचा स्टॅन्ड घ्यायला काय हिंमत लागत असेल, याचा अंदाज आपण इकडे बसून लावू शकत नाही. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या या वर्तनाने त्याच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच उंची दिली आहे ह्याबद्दल कोणाच्या मनात दुमत नसेल. 

दुसरी गोष्ट घडली, ती फेंच ओपनच्या अंतिम सामन्यात. जगातील क्रमांक १ चा लॉन टेनिसपटू नोवाक जोकोविच फ्रेंच ओपनचा अंतिम सामना खेळत होता. ६-७, २-६ असे लागोपाठ दोन सेट हरल्यानंतर हा सामना जोकोविचच्या हातातून गेल्यात जमा होता, पण अचानक जोकोविचचा खेळ उंचावत गेला आणि सामन्याचा नूर पालटला. पहिले दोन सेट हरल्यानंतर नंतरचे तीन सेट ६-३,६-२,६-४ असे जिंकत नोवाक जोकोविचने एक इतिहास रचला. जगातील पहिला पुरुष टेनिसपटू बनला ज्याने चारही ग्रँड स्लॅम दोन वेळा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. नोवाक जोकोविचच्या खेळाबद्दल कोणाच्या मनात शंका नसेल. पण अंतिम सामन्यात त्याला त्याच्या खेळाची लय सापडत नव्हती. याचवेळी धावून आला तो एक प्रेक्षकांमध्ये बसलेला मुलगा. 

नोवाक जोकोविच चाचपडत असताना हा मुलगा सतत त्याला मागून चांगला खेळ करण्यासाठी उत्तेजन देत होता. तेवढ्यापुरतं न थांबता तो त्याला काय कर म्हणजे पॉईंट्स मिळतील, याचं ज्ञान देत होता. नोवाक जोकोविचच्या शब्दात, 

“This boy was in my ear the entire match. He was encouraging me. He was actually giving me tactics. He was like: ‘Hold your serve, get an easy first ball, then dictate, go to his backhand.’ He was coaching me literally”

विचार करा जगातील क्रमांक १ चे टेनिस खेळाडू तुम्ही आहात. फ्रेंच ओपन सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अंतिम सामना खेळत आहात. दोन सेट गमावलेले आहात आणि अश्या वेळी कोणीतरी नुकतीच मिसरूड फुटलेला तुम्हाला काय करावं आणि काय नाही याचे सल्ले देतो आहे. तुमची प्रतिक्रिया काय असेल? कदाचित प्रतिक्रियेतील फरक महान खेळाडू आणि सर्वसामान्य यांत फरक करेल. नोवाक जोकोविचने त्याचे सल्ले तर ऐकलेच, पण सामना जिंकल्यावर आपली रॅकेट जिच्या मदतीने हा अंतिम सामना जिंकला ती त्याला बक्षीस म्हणून दिली. नोवाक जोकोविचच्या कृतीने त्या मुलाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याचा हा व्हिडीओ जगात अनेकांनी बघितला. नोवाक जोकोविच सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाला, 

“To give the racquet to the best person was him, after the match, that was my gratitude for him sticking with me and supporting me.”

नोवाक जोकोविचच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच उंची खेळापलीकडे त्याने दाखवलेल्या छोट्या कृतीतून प्राप्त झाली.

नोवाक जोकोविच असो वा ख्रिस्तियानो रोनाल्डो हे आपापल्या खेळात जगात प्रसिद्ध आहेतच, पण यशाच्या शिखरावर असतानासुद्धा आपली तत्त्वं आणि विचार आपल्या व्यक्तिमत्त्वातून दाखवून देतात. आपल्या मोठेपणाचा गर्व किंवा जग काय विचार करेल? यापेक्षा स्वतःची तत्त्वं आणि यशाच्या शिखरावर असतानासुद्धा जमिनीवर आपले पाय असणं म्हणजे काय असतं, हे त्यांनी आपल्या वागणुकीतून दाखवून दिलं आहे. यश, पैसा, प्रसिद्धी कमावता येते, पण मोठेपणा कमवायला तुमच्या व्यक्तिमत्वाने ती उंची गाठायला लागते, जगातील महान लोक अश्याच छोट्या छोट्या गोष्टींतून ती गाठत असतात.      

फोटो स्त्रोत :- गुगल (ख्रिस्तियानो रोनाल्डो कोका कोलाची बॉटल बाजूला ठेवताना, तर दुसऱ्या फोटोत नोवाक जोकोविच आपली रॅकेट मुलाला बक्षीस म्हणून देताना)

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment: