Saturday, 26 June 2021

#खारे_वारे_मतलई_वारे (भाग ११)... विनीत वर्तक ©

#खारे_वारे_मतलई_वारे (भाग ११)... विनीत वर्तक ©

आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा वाऱ्यांनी दिशा बदलायला सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांतल्या घटनांनी याचे सूतोवाच केले आहे. या घटना भारताच्या शेजारील देशांमध्ये घडणाऱ्या असल्याने त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम भारताला भोगावे लागणार आहेत. भारत या सगळ्यांत काय बाजू घेतो, हे सध्या गुलदस्त्यात असलं तरी भारताने घेतलेली कोणतीही बाजू चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम दाखवू शकते. त्यामुळे येत्या काळात आंतरराष्ट्रीय पटलावर काय घडामोडी घडतात त्यावर भारताची भूमिका ठरणार आहे. 

सध्या पाकिस्तान आपल्या घरात सुरू असलेल्या धुसफुशींमुळे त्रस्त आहे. एकीकडे इम्रान खान यांच्याविरुद्ध सामान्य जनतेत आक्रोश वाढीला लागला आहे, तर दुसरीकडे इम्रान खान स्वतः कचाट्यात सापडलेला आहे. धर्मवेडे सांस्कृतिक रक्षक आणि त्यांनी जोपासलेला आतंकवाद एका बाजूला, तर दुसरीकडे पाकिस्तानची आर्थिक बाजूवर खालावलेली स्थिती यांतून मार्ग काढणं सध्या कठीण झालेलं आहे. नुकत्याच झालेल्या Financial Action Task Force's (FATF) च्या बैठकीत आखून दिलेल्या मुद्यांवर योग्य ती कारवाई न केल्याने पाकिस्तानला पुन्हा एकदा 'ग्रे' लिस्ट मध्ये ठेवण्याचा निर्णय एफ.ए.टी.एफ.च्या समितीने घेतला आहे. ग्रे लिस्ट मध्ये राहिल्यामुळे अवघ्या काही वेळात पाकिस्तानला तब्बल ३८ बिलियन अमेरिकन डॉलरचं नुकसान झालेलं आहे. आधीच भीकेला लागलेल्या पाकिस्तानसाठी हे नुकसान प्रचंड आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अर्थव्यवस्थेला याचे चटके बसणार आहेत. 

पाकिस्तान जर योग्य कारवाई करण्यात सतत अपयशी ठरला, तर त्याची रवानगी ब्लॅक लिस्ट मध्ये होऊ शकते आणि तसं झाल्यास देशाचे धिंडवडे निघणार आहेत याची पूर्ण कल्पना इम्रान खानला आहे. जर ग्रे लिस्ट मधून बाहेर यायचं असेल, तर अतिरेकी कारवाया आणि त्यांना होणारा पैश्याचा पुरवठा हा त्वरित थांबवणं गरजेचं आहे. इच्छा नसतानासुद्धा पाकिस्तानला अतिरेकी कारवायांवर अंकुश ठेवावा लागत आहे आणि त्याचेच परिणाम म्हणजे लोकांमध्ये, सैन्यात वाढणारा असंतोष. पाकिस्तान सैन्य प्रमुख बाजवा यांच्या विरोधात सैन्यामध्ये गट पडले असून गेल्या काही दिवसांत त्यांना पदच्युत करण्यासाठी उठाव सुरू झाला आहे. काही तासांपूर्वीच १४ पाकिस्तानी सैन्य ऑफीसरांना पकडलं गेलं आहे. ज्यांत कर्नल, ब्रिगेडिअर रँकचे अधिकारी आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबाला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. आत्तापर्यंत ७३ पाकिस्तानी सैन्य ऑफीसरांना जेलमध्ये टाकलं गेलं आहे. (अंदाजानुसार ). पण हे बदललेले वारे उद्या येणाऱ्या वादळाची नांदी आहेत जे पाकिस्तानच्या डोक्यावर घोंघावत आहे. या गोष्टी भारतासाठी चांगल्या असा विचार अनेकजण करतील, पण अश्या उठावाचे पर्यावसान अनेकदा युद्धामध्ये होण्याची शक्यता जास्ती असते. ज्याचा फटका भारताला नक्कीच बसू शकतो. तूर्तास जोवर त्यांच्या घरात भांडणं चालू आहेत, तोवर कदाचित भारत पडद्यामागून तेल ओतायचे काम करेल. भारताची चिंता तेव्हाच असेल जेव्हा हा भडका वेशीवर येऊन ठेपेल. 

दुसरी एक महत्वाची घटना घडते आहे ती अफगाणिस्तान मध्ये. अमेरिकेने आपलं सैन्य ११ सप्टेंबर २०२१ पर्यंत अफगाणिस्तानमधून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच अमेरिका अफगाणिस्तानमधून हळूहळू बाहेर पडत होती, पण आता त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. हा निर्णय बाहेर येत नाही तोवर तालिबानी फौजांनी अफगाणिस्तानच्या उत्तर भागातील तजाकिस्तानच्या सीमेवर कुंडुझ भागावर पुन्हा आपला झेंडा फडकावला आहे. १४० शरणार्थी तजाकिस्तानमध्ये पळून गेले, तर १०० जणांना तालिबानने बंदी बनवलं आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून जायची घोषणा व्हायच्या आत तालिबानने आपलं वर्चस्व वाढवायला पुन्हा एकदा सुरूवात केली आहे. १९९६ ते २००१ पर्यंत अफगाणिस्तानात तालिबानी राजवट होती आणि तेव्हाच घातक अश्या 'अल कैदा' सारख्या संघटनांनी आपली पाळंमुळं इकडे पसरवली होती. २६७० किलोमीटर लांबीची सीमा अफगाणिस्तानसोबत सामायिक करणाऱ्या पाकिस्तानने तालिबानी राजवटीला सर्वतोपरी मदत केली होती. इतकंच काय तर अमेरिकेसाठी 'मोस्ट वॉन्टेड' असणाऱ्या ओसामा बिन लादेनलाही आपल्या भागात पाकिस्तानने लपवून ठेवलं होतं हा इतिहास आहे. 

तालिबानने युद्धाला सुरूवात करताच पाकिस्तानच्या इम्रान खान यांनी काल न्यूयॉर्क टाइम्सला मुलाखत देताना स्पष्ट केलं, 

“let me assure you, we will do everything except using military action against the Taliban”.

Imran Khan

त्याचवेळेला हे स्पष्ट केलं, की ज्या कोणाला अफगाण लोक स्वीकारतील त्याच्या सोबत आम्ही आहोत. आता तालिबान ज्या वेगाने अफगाणिस्तानवर कब्जा करते आहे, ते बघता पाकिस्तानला नक्की काय हवं आहे हे समजून घ्यायला आंतरराष्ट्रीय समीक्षकाची गरज नाही. पाकिस्तान छुप्या आणि उघड पद्धतीने तालिबानला सपोर्ट करणार हे स्पष्ट आहे. फरक इतकाच की आता या गोष्टी पाकिस्तानवर ही बूमरँग होऊ शकतात. कारण तालिबानमधली धार्मिक राजवट पाकिस्तानमधल्या धार्मिक कट्टरपंथी लोकांना पुन्हा एकदा जागृत करेल आणि पाकिस्तान पुन्हा एकदा अतिरेक्यांसाठी 'सेफ हेवन' बनण्याकडे वाटचाल करेल. 

या सगळ्यांत भारताची तारेवरची कसरत होणार आहे. आजवर भारताने तालिबानी राजवटीला नाकारलेलं आहे. भारताची भूमिका ही नेहमीच अफगाण लोकांनी प्रजासत्ताक पद्धतीने निवडून दिलेल्या सरकारला होती. भारताच्या पुढाकाराने अफगाणिस्तानमध्ये अनेक गोष्टींवर काम सुरू आहे. जर का पुन्हा तालिबानी सरकार प्रस्थापित झालं, तर भारताचा रोख काय असणार आहे हे सध्या तरी सांगणं सोप्पं नाही. तालिबानी सरकार आणि भारत सरकार यांच्यात जर सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले, तर ते पाकिस्तानला नको आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर अतिरेकी घडवण्यासाठी करण्याचा पाकिस्तानचा मानस आहे. अर्थात या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. पण अमेरिकी गप्तचर संघटनांच्या अहवालानुसार येत्या ६-१२ महिन्यात अफगाणिस्तानमध्ये सत्ता बदल होऊ शकतो. नक्कीच ही गोष्ट भारतासाठी चिंतेचा विषय आहे. 

खालावलेली आर्थिक स्थिती, सैन्य तैनात करण्यासाठी होणारा खर्च, तिथल्या अमेरिकन सैनिकांची सुरक्षितता याचसोबत अमेरिकेचा अफगाणिस्तानात राहण्याचं कोणतंच उद्दिष्ट राहिलं नसल्याने अमेरिका हे पाऊल उचलणार हे क्रमप्राप्त होतं आणि याच संधीची वाट तालिबान लोक बघत होते. आता ती संधी उपलब्ध झाली आहे, जोडीला पाकिस्तानही छुपी मदत करणार हे उघड आहे. त्यामुळे या बदललेल्या वाऱ्यांचं येत्या काळात कोणत्या वादळात रूपांतर होते, ते स्पष्ट होईलच. तूर्तास त्या वादळासाठी भारताने आपली मोर्चेबांधणी आत्तापासून सुरूवात करायला हवी असं माझं स्पष्ट मत आहे. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



 

No comments:

Post a Comment