Tuesday 30 April 2019

येती (हिममानव) एक न उलगडलेलं कोडं... विनीत वर्तक ©

येती (हिममानव) एक न उलगडलेलं कोडं... विनीत वर्तक ©

आज भारतीय सेनेने त्यांच्या एक टीमला येती अर्थात हिममानवाच्या पावलांचे ठसे आढळल्याच अधिकृतरीत्या जाहीर केलं. हे ठसे जवळपास ३२ X १५ इंच इतक्या मोठ्या आकाराचे मकालू बेस जो की नेपाळ च्या हद्दीजवळ आहे तिकडे आढळले आहेत. ९ एप्रिल २०१९ ला हे ठसे आढळून आल्यावर काही दिवस ह्याचा अभ्यास केल्यावर हे ठसे पुढच्या संशोधनासाठी खुले केले आहेत. भारतीय सेनेच्या आजच्या घोषणेमुळे येती हा हिममानव अस्तित्वात आहे की नाही ह्यावर जगातील अनेक तज्ञांच्या उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. येती म्हणजे नेमकं काय? ह्या मागे इतकं गूढ का दडल आहे ह्यासाठी आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल.

येती ( हिममानव ) हा एक प्राणी जो की दोन पायांवर चालू शकतो आणि त्याची त्वचा केसाळ असून साधारण भुऱ्या राखाडी अथवा लाल रंगाच्या केसांनी झाकलेली असावी असा अंदाज आहे. ह्याची उंची जवळपास १.८ मीटर इतकी असावी आणि वजनाने साधारण १०० ते २०० किलोग्राम इतक्या वजनाचा असावा असा संशोधकांचा कयास आहे. येती आहे किंवा नाही? ह्याच उत्तर होय आणि नाही असं आहे. कारण येतीला अजून कोणी सदृश्य बघितल्याचे किंवा त्याचे असण्याचे पुरावे मिळालेले नाहीत. अगदी एकदा फोटोत पकडण्याचा प्रयत्न पण फसलेला आहे. पण त्याचवेळी अनेकांनी त्यांना येती दिसल्याचा किंवा त्यच्या पाउलखुणा दिसल्याच वर्णन केलं असून अश्या पाउलखुणा अनेकदा हिमालयाच्या कुशीत आढळून आल्या आहेत. त्यामुळे येती नक्की आहे का? हा प्रश्न आजही जगभरातील संशोधकांपुढे न उलगडलेलं कोडं आहे.

अलेक्झांडर ने भारताच्या हिंदू संस्कृतीवर इसविसनपूर्व ३२६ वर्षी हल्ला केल्यावर त्याने येतीला बघण्याची इच्छा व्यक्त केली होती अशी नोंद आहे. पण इथल्या लोकांनी येती हिमालयात असून त्याच दर्शन दुर्लभ असल्याच त्याला सांगितलं होतं. तसेच आपल्यासाठी तो त्रासदायक असून त्यापासून लांब राहण्याची सूचना ही केली होती. ह्या नंतर अनेक पौराणिक कथेत येतीचा उल्लेख केला गेलेला आहे. १९२१ च्या सुमारास पत्रकार हेन्री न्यूमन ह्यांनी काही ब्रिटीश गिर्यारोहकांची भेट घेतली जे एवरेस्ट च्या मोहिमेवरून परतत होते. त्यांनी एवरेस्ट च्या पायथ्याशी मोठ्या पाउलखुणा आढळल्याची नोंद केली होती. १९२५ ला रॉयल जिओग्राफी सोसायटी चे एन.ए. तोम्बाझी ह्यांनी झेमू ग्लेशियर जे ४६०० मीटर उंचीवर आहे तिकडे माणसा सारखा प्राणी दिसल्याची नोंद केली आहे. हा प्राणी दोन पावलांवर चालत असल्याच ही निरीक्षण त्यांनी नोंदवल आहे. ह्यावर संशोधन करणाऱ्या मायरा शाक्ले ह्यांनी १९४२ च्या सुमारास गिर्यारोहकाना दोन अस्वस्ल सदृश्य प्राणी दिसल्याची नोंद केली आहे. १९५१ ला ब्रिटीश शोधकर्ता एरिक शिप्टोन ह्यांनी येती चा फोटो घेतल्याची नोंद आहे. १९५३ ला एवरेस्ट च्या पहिल्या मोहिमेत सर एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे ह्यांनी एवरेस्ट वर येती च्या पाऊलखुणा दिसल्याची नोंद केली आहे. ह्या नंतर अनेक गिर्यारोहक ते अनेक सामान्य लोकांना हिमालयात येती च्या पाऊलांचे ठसे दिसल्याची नोंद जगभर झाली आहे.

येती बद्दलच कुतूहल जगात इतकं आहे की इतिहासात येती वर संशोधन करण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या गेल्या. ह्यात रशिया, ब्रिटन सारख्या देशांचा समावेश आहे. येती च्या संशोधनासाठी २०१३ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संशोधक ब्रायन स्केस ह्यांनी पूर्ण जगात येती असल्याच मानणाऱ्या लोकांकडून येती चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पुरावे देण्याच आवाहन केलं. ह्या पुराव्यात केस, हाड, दात, मांस अश्या गोष्टी समाविष्ट होत्या. त्यांना जवळपास ५७ पुरावे मिळाले ज्यातले ३६ पुरावे डी.एन.ए. चाचणीसाठी निवडण्यात आले. ह्या सर्व पुराव्यांचा ताळमेळ जगात माहित असलेल्या सगळ्या डी.एन.ए. शी मिळवला गेला. ह्यातले अनेक पुरावे हे ज्ञात असलेल्या प्राण्यांशी जुळून आले. पण ह्यातले २ पुरावे मात्र १०० टक्के पृथ्वीच्या ध्रुवावर खूप वर्षापूर्वी राहणाऱ्या अस्वलांशी मिळाले. ही ध्रुवीय अस्वस्ल पृथ्वीवर जवळपास ४०,००० ते १,२०,००० वर्षापूर्वी अस्तित्वात होती. ह्यातील एक पुरावा भारतातून तर दुसरा भूतान मधून मिळालेला होता. ह्यावर दोन संशोधकांनी अजून संशोधन करून आपला अहवाल रॉयल सोसायटी जनरल मध्ये प्रसिद्ध केला आहे.

बघायला गेलं तर येती ( हिममानव ) चा शोध गेली कित्येक शतके चालू आहे. पण अजूनही येती नक्की कसा आहे? कोण आहे? काय आहे? ह्या बद्दल पूर्ण जगातील संशोधकात संभ्रमाच वातावरण आहे. कारण येती असल्याचे पुरावे तर मिळत आले आहेत. पण तो नक्की कुठे आहे? ह्याचा शोध आजही लागलेला नाही. आज भारतीय सेनेच्या पुराव्यांनी पुन्हा एकदा येती बद्दलच्या गुढ्तेला अजून एक वलय प्राप्त झालं आहे. भारतीय सेनेने हे फोटो जगाला दाखवताना हे दाखवण्या मागचा उद्देश हा येती बद्दल अजून संशोधन करण्याचा आहे असं स्पष्ट आपल्या ट्वीट मध्ये म्हंटल आहे. येती ( हिममानव ) मिळेल तेव्हा मिळेल पण पुन्हा एकदा एका न उलगडलेल्या कोड्याची उकल करण्याचे प्रयत्न पूर्ण जगभर केले जातील. ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.

माहिती स्रोत :- विकिपीडिया, लाईव्ह सायन्स

फोटो स्त्रोत :- गुगल




Sunday 28 April 2019

'निडर युद्ध संवाददाता, मेरी कोल्विन'... विनीत वर्तक ©

'निडर युद्ध संवाददाता, मेरी कोल्विन'... विनीत वर्तक © 


जगभरात कोणती युद्ध चालू आहेत ह्याची पुसटशी कल्पना भारतासारख्या लोकशाही राष्ट्रातील लोकांना नसते. लोकशाही संविधानाने दिलेल्या हक्कांवरून नको तितकं राजकारण करणाऱ्या लोकांना बघितलं की युद्ध लढल्या गेलेल्या देशातील परिस्थीची कल्पना त्यांना करून द्यावी असं मनोमन वाटतं. युद्ध मग ते कोणीही लढो, त्यात नुकसान सामान्य निष्पाप लोकांच होतं ही सत्य परिस्थिती आपण डोळे बंद करून बघतो. जेव्हा हे युद्ध आपलं राज्य टिकवण्यासाठी, आपल्याला फायदा मिळवण्यासाठी जागतिक पातळीवर केलं जाते तेव्हा होणारा नरसंहार हा आपल्या विचारांच्या पलीकडला असतो. पूर्ण देश वेठीस धरला जातो. जिंकणारे जिंकतात आणि हरणारे हरतात;  पण ह्यात जीव जातो तो निष्पाप लोकांचा. जगात अशाच युद्ध छायेखाली जगणारे काही देश आहेत. त्यात होणारा नरसंहार आपल्या जीवावर उदार होऊन जगापुढे आणणाऱ्या पत्रकारांमध्ये एक नाव होतं ते म्हणजे 'मेरी कॅथेरीन कोल्विन'. 


'मेरी कोल्विन' जगातील एक अग्रगण्य वृत्तपत्र ‘द संडे टाईम्स’ मध्ये युद्ध संवाददाता म्हणून नोकरीला होती. मेरी प्रसिद्धीला आली ती १९८६ साली. लिबिया चे प्रमुख 'मुआमार गद्दाफी' ह्यांची मुलाखत घेणारी मेरी पहिली पत्रकार होती. ह्या मुलाखतीत गद्दाफी ह्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रेगन ह्यांना 'मूर्ख, वेडा आणि इस्राईलचा कुत्रा म्हटलं होतं. तिची ही मुलाखत खूप गाजली होती. ह्यानंतर युद्ध संवाददाता म्हणून मेरी कोल्विन चं नाव मोठं होत राहिलं. चेचन्या, कोसावो, झिम्बाब्वे, श्रीलंका, इस्ट तिमोर अशा सगळ्या युद्ध पेटलेल्या देशात जाऊन अगदी युद्धभूमीवरच्या घटना मेरी ने आपल्या शब्दातून, लेखणीतून आणि इतर दृकश्राव्य माध्यमातून जगापुढे आणल्या. इस्ट तिमोर च्या युद्धात इंडोनेशिया च्या सैनिकांपासून जवळपास १५०० स्त्रिया आणि लहान मुलांच्या जीवाचं तिने रक्षण केलं. 'चेचन्या' आणि 'कोसावो' इकडे 'युनायटेड नेशन'च्या सैनिकांसोबत राहून तिने तिथल्या घटनांची नोंद पेपरमधून आणि बातमीपत्रात घ्यायला लावली. ह्या साहसासाठी तिला 'इंटरनेशनल वुमन मिडिया फौंडेशन' ने पत्रकारीतील साहसाचा पुरस्कार दिला. 


१६ एप्रिल २०११ ला श्रीलंकेच्या सैनिकांनी डागलेल्या ग्रेनेड च्या हल्ल्यात तिचा डावा डोळा निकामी झाला. ह्या नंतर आयुष्यभर तिला एका डोळ्यावर पट्टी बांधावी लागली. तब्बल ६ वर्ष ती श्रीलंकेतील हे युद्ध आपल्या शब्दातून मांडत होती. ह्या सगळ्याचा मानसिक परिणाम तिच्या मनावर ही झाला. युद्धातील अतिशय क्रूर अशा घटनांनी तिच्या मनावर खोल आघात केला. तिला ह्या साठी हॉस्पिटलमध्ये ही जावं लागलं. एका डोळ्याने देखील, तिने युद्धभूमीवरची आपली पत्रकारिता सुरु ठेवली. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर, 

"You're never going to get to where you're going if you acknowledge fear."

२०११ साली तिला पुन्हा एकदा गद्दाफी ची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्यावेळेला न घाबरता तिने गद्दाफीसमोर युद्धामुळे निष्पाप जीवांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली. तिने गद्दाफी ला सांगितलं होतं, 

“My job is to bear witness. I have never been interested in knowing what make of plane had just bombed a village or whether the artillery that fired at it was 120mm or 155mm."


फेब्रुवारी २०१२ ला सिरीयन सरकारच्या धमक्यांना भिक न घालता त्यांची परवानगी न घेता सिरीया मधील युद्धातील घटना जगापुढे मांडण्यासाठी तिने मोटरसायकल वरून युद्धभागात प्रवेश केला. होम्स शहरात राहून तिने तिथली परिस्थिती उपग्रह फोन च्या मार्फत २१ फेब्रुवारी २०१२ ला बी.बी.सी., सी.एन.एन., च्यानेल ४ आणि आय.टी.एन. न्यूजसारख्या जगातील सगळ्या प्रसिद्ध बातमीपत्रातून मांडली. ते मांडताना आपल्या आयुष्यातील सगळ्यात संहारक असा नरसंहार आपण अनुभवत असल्याचं तिने सांगितलं. २२ फेब्रुवारी २०१२ ला आई.ई.डी. च्या स्फोटात 'मेरी कोल्विन' मृत्युमुखी पडली. तिच्या मृत्यूनंतर होम्स ह्या शहरातले सर्व लोकं युद्धाला न घाबरता तिच्या सन्मानासाठी घराबाहेर निघाले होते. पत्रकारितेच्या आणि संपूर्ण जगात तिच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. सिरीया आर्मी ने ते आय.ई.डी. अतिरेक्यांनी टाकल्याचा दावा केला पण हे खोट असल्याचं नंतर सप्रमाण सिद्ध झालं. तिच्या साहसी युद्ध पत्रकारितेला बंद करण्यासाठी आणि सिरीया मधील परिस्थितीचं आकलन जगाला होऊ नये म्हणून सिरीया च्या आर्मी ने तिला संपवलं होतं. 


२०१९ मध्ये सिरीयाच्या सरकारला 'मेरी कोल्विन'च्या हत्येसाठी जबाबदार धरण्यात आलं. सिरीयन सरकारला ३०२ मिलियन अमेरिकन डॉलर ह्या हत्येसाठी नुकसानभरपाई देण्याचा आदेश कोर्टाने दिला. युद्धाला न घाबरता अक्षरशः युद्धभूमीवरून युद्ध संवाददाता म्हणून तिथल्या परिस्थितीची जाणीव पूर्ण जगाला करून देणारी 'मेरी कोल्विन' तीनवेळा प्रतिथयश अशा 'ब्रिटीश प्रेस' बक्षिसाची मानकरी ठरली होती. तिचा हा प्रवास “A Private WAR” ह्या चित्रपटातून समोर आला आहे. हा चित्रपट आणि एकूणच मेरी कोल्विन च्या निर्भीड पत्रकारितेचा प्रवास अनुभवणं एक वेगळा अनुभव आहे. 


तळटीप :- ह्या चित्रपटात काही दृश्य पूर्ण नग्न स्वरुपाची ( Full Nude Scene ) तसेच काही युद्धभूमीची दृश्येही विचलित करणारी असू शकतात. चित्रपट बघताना काळजी घ्यावी.



Saturday 27 April 2019

चार्जिंग पॉइंट... विनीत वर्तक ©

चार्जिंग पॉइंट... विनीत वर्तक ©

आज आयुष्य धकाधकीच झालं आहे. उर फुटेस्तोवर आज प्रत्येकजण पुढे जाण्यासाठी, शर्यतीत राहण्यासाठी धावत आहे. ‘थांबला तो संपला’ ही म्हण आजच्या जगात अगदी तंतोतंत लागू पडते. कारण जागरहाटीमध्ये आपण थांबलो की काळाच्या पाठीमागे जायला वेळ लागत नाही. पण आज धावण्याची व्याख्या बदलली आहे. आधी आपण एक किंवा दोन शर्यतीत पळायचो पण आता आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एक शर्यत झाली आहे. सगळ्या बाजूने लढाई करताना आपलीच होणारी दमछाक आपण कितीही नाकारली तरी हळूहळू अनेक घटनांन मधून बाहेर येत असते. दमछाक झाल्यावर आपली काळजी घेणारं ‘आपलं माणूस’ आज आपण सगळेच हरवून बसलो आहोत.

माणूस माणसाला पारखा झाला आहे. कारण माणसाकडे माणसासाठीच वेळ नाही अशी आपल्या आयुष्याची स्पर्धा सुरु झाली आहे. आज जिंकल्यावर झालेला आनंद आणि हरल्यावर वाटणार दुखं दोन्ही मोकळं करावसं वाटणार माणूस आणि त्याच ते निरागस मन दोन्ही हरवलं आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया ह्या सगळ्यात आपण अलगद अडकलो गेलो आहोत. कोणी कितीही अलिप्त व्हायचा प्रयत्न केला तरी तो किती वेळ? ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आहे. ह्या सगळ्यांन पासून पळण हा एकमेव मार्ग आहे का? नक्की असं केल्याने आपल्याला हाताशी काही गवसत असलं तरी तितकचं निसटत ही असते हे कोणीच मान्य करायला तयार नसतो. आवडो अथवा न आवडो ह्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाल्या आहेत हे निर्विवाद सत्य आहेत.

कोणत्याही गोष्टीला पूर्ण करायला उर्जा लागते असं विज्ञान सांगते आणि ते माणसाच्या बाबतीत ही तितकंच खरं आहे. सतत आयुष्याच्या शर्यतीत पळण्यासाठी उर्जा लागते. त्यात वाढलेली स्पर्धा, बदललेले नात्यांचे संदर्भ, मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया ह्यावरून होणाऱ्या गोष्टींचा भडीमार ह्यामुळे आपल्याला जास्ती उर्जेची गरज भासते. त्याचवेळी आपल्याला ह्या सगळ्यात उर्जा देणारे चार्जिंग पॉइंट आपण आपल्या माणसांच्या रूपाने गमावून बसलो आहोत. एके काळी प्रचंड मोठी कुटुंब आणि तितकेच विविध चार्जिंग पॉइंट असायचे. काका, मामा, दादा, ताई असे किती तरी विविध चार्जिंग पॉइंट आपल्या घरात असायचे. त्याची कमी भासली तर जोडीला आपले मित्र मैत्रीण असायचे. पण काळाच्या स्पर्धेत आपण हे सगळेच मागे सोडून बसलो आहोत.

एकेकाळी घरात भांडण झाल्यावर, चल सोड रे ! असं म्हणत खांद्यावर हात टाकून बोलणारा मित्र किंवा हातात हात घेऊन, समजू शकते ! असं बोलणारी मैत्रीण कधीच काळाच्या पडद्याआड गेली आहे. अडचणीच्या वेळेस धावून येणाऱ्या काका, मामा, दादांना आपण गेल्या कित्येक वर्षात भेटलो ही नसूं. दादा, ताई आज भेटताना फक्त आभासी जगातून आपल्या भिंतीवर डोकावतात आणि तिकडूनच अदृश्य होतात. खरे तर आज वाढलेल्या स्पर्धेत आपल्याला पुन्हा उर्जा देणारे हे चार्जिंग पॉइंट वाढायला हवे होते. पण आपण नकळत त्यांनाच मागे सोडून आलो आहोत. त्याचे परिणाम आज दिसत आहेत. मनाचा होणारा कोंडमारा, अदृश्य जगात जगण्याची सवय, आभासी जगातून मिळालेल्या कमेंट आणि लाईक्स वरून आज आपण आपल्या जिवनाच मूल्यमापन करत आहोत.

आज कुठेतरी आपल्याला अश्या चार्जिंग पॉइंट ची खूप गरज आहे. उर्जा मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी आधाराची गरज असते असं काही नाही. कोणीतरी एकूण घेणारं, कोणाकडे मन मोकळ करावसं वाटणार आणि ते केल्यावर मोकळं झालेल्या आकाशाप्रमाणे मनाला उभारी देणारे चार्जिंग पॉइंट पण आपल्याला खूप उर्जा देऊन जातात. आज कुठेतरी अश्या चार्जिंग पॉइंट ची खूप गरज प्रत्येकाला आहे. ते चार्जिंग पॉइंट अगदी आपल्या घरापासून ते आपल्या कार्याच्या क्षेत्रात ते अगदी आवडीच्या क्षेत्रात सगळीकडे असायला हवेत. कारण प्रत्येक चार्जिंग पॉइंट हा प्रत्येकवेळी देणारी उर्जा वेगवेगळ्या पातळीवर देणारा असेल. हे सगळे जर एकाचवेळी सगळ्या क्षेत्रात आपल्यासोबत असतील तर ह्या स्पर्धेच्या युगात आपण कधीच मागे पडणार नाहीत. पडलो तरी पुन्हा एकदा राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घ्यायला हेच पुन्हा आपल्याला उर्जा देतील. कोणी, कोणाला, कुठली उर्जा देणार चार्जिंग पॉइंट बनवायचं हे मात्र प्रत्येकाने आपलं ठरवायचं.

Wednesday 24 April 2019

अवकाश आपलं भविष्य... विनीत वर्तक ©

अवकाश आपलं भविष्य... विनीत वर्तक ©

दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, त्यांना लागणारी उर्जा आणि पृथ्वीवर सिमित असणारे उर्जा साठे ह्यामुळे येत्या काळात पृथ्वीवरील लोकांसामोरील समस्या वाढत जाणार आहेत. आपल्या उर्जेची गरज भागवायला पृथ्वी येत्या काळात कमी पडणार आहे. ह्यावरील सध्या तरी दृष्टीक्षेपात असणारा एक उपाय म्हणजे अवकाश. आपलं विश्व हे अनेक गूढ, स्तिमित करणाऱ्या गोष्टींनी भरलेलं आहे. ज्यात असंख्य ग्रह, तारे, धुमकेतू, लघुग्रह, उपग्रह असं सगळचं सामावलेलं आहे. ह्यातील अनेक ग्रह, लघुग्रह ह्यावर मानवी वस्तीसाठी पोषक वातावरण नसलं तरी त्यावर असलेल्या वातावरणात, मूलद्रव्यात माणसाच्या मुलभूत गरजांना भागवण्याची क्षमता आहे. त्यामुळेच येत्या काळात अवकाश हेच आपलं भविष्य राहणार आहे.

माणसाच्या मुलभूत गरजांपेकी एक प्रमुख गरज म्हणजे पाणी. असं म्हणतात की पुढलं विश्वयुद्ध हे पाण्यासाठी लढलं जाईल. पण पृथ्वीपेक्षा जास्त पाणी असणारा ग्रह आपल्याला मिळाला तर? त्यासाठी आपल्याला लांब जायची गरज नाही. आपल्या सौरमालेत असा एक उपग्रह आहे ज्याच्यावर पृथ्वीपेक्षा जास्त पाणी आहे. आपल्या सौरमालेतील सगळ्यात मोठा उपग्रह ज्याच नाव आहे ग्यानीमेडे. ग्यानीमेडे हा गुरू ग्रहाचा उपग्रह असून त्याचा विस्तार तब्बल ३२७३ मैल ( ५२६८ की.मी. ) इतका आहे. ह्याचा पृष्ठभाग बर्फाने झाकलेला असून त्या खाली असणारा पाण्याचा साठा नासाच्या मते जवळपास १०० किलोमीटर खोलीचा आहे. ( पृथ्वीवरील समुद्राची खोली जवळपास १० की.मी. इतकी आहे. ) म्हणजेच ग्यानीमेडे वर पृथ्वीच्या १० पट पाणी असण्याचा अंदाज आहे. हे पाणी जसच्या तसं वापरात येणं किंवा गोड नक्कीच नसणार आहे. हे पाणी समुद्राप्रमाणे खारट आहे. पण पृथ्वीवरील येत्या काळातील पाण्याची गरज लक्षात घेता भविष्यात पाण्याचा स्रोत म्हणून ग्यानीमेडे कडे बघण्यात येते आहे. ह्याच्या संशोधनासाठी युरोपियन स्पेस एजन्सी ‘ज्यूस’ नावचं यान २०२२ पर्यंत ग्यानीमेडे वर पाठवत आहे.

आता विचार करा तुम्ही मस्त एका सरोवराच्या किनारी उभे आहात. समोर पसरलेला अथांग सरोवर तुमचं मन मोहून टाकत आहे. पण अचानक लक्षात येते की हे पाणी नाही तर मिथेन, इथेन आहे. तर तुम्ही आहात आपल्या सौरमालेतील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या शनी ग्रहाच्या उपग्रहावर. ज्याच नाव आहे टायटन. ३१९९ मैल ( ५१४९ की.मी. ) विस्तार असणारा टायटन बुध ग्रहापेक्षा आकाराने मोठा आहे. आपल्या सौरमालेतील पृथ्वी नंतर पृष्ठभागावर द्रव असणारा टायटन एकमेव ग्रह आहे. ह्याच्या पृष्ठभागावर नद्या, सरोवर आहेत. ती पाण्याची नाहीत तर ती आहेत मिथेन आणि इथेन ह्या हायड्रोकार्बन ची. पृथ्वीवरील आत्तापर्यंत माहित असलेल्या नैसर्गिक वायू चा साठा आहे जवळपास १३० बिलियन टन. इतक्या साठ्यातून ३०० पट जास्त उर्जा निर्मिती होऊ शकेल जितकी एकट्या अमेरिकेला वर्षभरासाठी लागते. आता पृथ्वीवरील संपूर्ण साठ्याची क्षमता टायटन वरील मिथेन, इथेन च्या एका सरोवराची आहे. असे कित्येक सरोवर टायटन वर आज प्रवाही आहेत. म्हणजे पूर्ण मानवजातीच्या पुढल्या कित्येक पिढ्यांना उर्जा देण्याची क्षमता एकट्या टायटन वरील हे सरोवर राखून आहेत. त्यामुळेच येत्या काळात संशोधनाची अनेक कवाड ही टायटन भोवती फिरणार आहेत.

ह्या उपग्रहांन सोबत पृथ्वीच्या आसपास जवळपास १०,००० पेक्षा जास्ती लघुग्रह भ्रमण करत आहेत. हे लघुग्रह वैज्ञानिकांच्या नजरेतून सुटलेले नाहीत. लघुग्रह ४३३ इरोस जो की १९९८ साली पृथ्वीच्या जवळून गेला होता. त्यावर जवळपास २० बिलियन टन सोन, प्लाटेनियम आणि टायटेनियम आहे ज्याची आजमितीला किंमत ११ ट्रीलीयन अमेरिकन डॉलर आहे. पृथ्वीवर आजपर्यंत उत्खनन झालेल्या सोन्याची किंमत फक्त ३ ट्रीलीयन अमेरिकन डॉलर आहे. ह्यावरून इरोस ४३३ वर असणाऱ्या खनिज विपुलतेचा अंदाज आपण बांधू शकतो.

प्लानेटरी रिसोर्सेस नावाची कंपनी अश्या लघु ग्रहांवर उत्खनन करण्याच तंत्रज्ञान विकसित करत आहे. ह्या कंपनीला पैसा पुरवण्यात अग्रेसर असलेल्या व्यक्तीन मध्ये गुगल संस्थापक लेरी पेज, चित्रपट निर्माता जेम्स केमेरून, रिचर्ड ब्रानसन अश्या प्रमुख व्यक्तींचा सहभाग आहे. कारण काळाच्या पुढे जाऊन येणाऱ्या हवेचा रोख त्यांनी आधीच ओळखला आहे. अवकाश हेचं मानवजातीच भविष्य येत्या काळात असणार आहे. अजून अश्या कित्येक गोष्टींचा शोध लागायचा आहे किंवा त्यांचा शोध घेणारी यंत्रणा निर्माण व्हायची आहे. पण तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जाते आहे ते बघता भविष्यात अवकाश हाच आपला आसरा असणार आहे.

१) ग्यानेमेडे उपग्रहाची रचना

२) टायटन उपग्रहावरील मिथेन, इथेन चे सरोवर

३) लघुग्रह ४३३ इरोस

माहिती स्त्रोत :- गुगल, नासा

फोटो स्त्रोत :- नासा

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट असून नाव काढून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होईल.




Monday 22 April 2019

#आयुष्य_जगलेली_माणसं.. भाग ९ ( पद्मश्री मुरलीकांत पेटकर )... विनीत वर्तक ©

सप्टेंबर १९६५ चा काळ होता. भारत पाकिस्तान युद्धाला सुरवात झाली होती. अश्याच एका रात्री मुरलीकांत पेटकर सियालकोट इकडे आपल्या युनिटसह सकाळच्या साखर झोपेत होते. त्याचवेळी एका पाकिस्तानी सैनिकाने त्यांच्या युनिटवर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. काय होते आहे कळायच्या आत सगळीकडे अफरातफरी माजली. ह्या सगळ्यात समोरून येणाऱ्या एक, दोन नाही तर तब्बल सात गोळ्या मुरलीकांत पेटकर ह्यांच्या शरीरात घुसल्या. इतक्या गोळ्या शरीरात घुसल्यावर सामान्य माणसाने इहलोकाकडे प्रस्थान केलं असतं पण खेळाडू असणाऱ्या पेटकरांनी यमाला थांबवलं. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी भारतीय सेनेत बॉक्सिंग चं राष्ट्रीय पदक जिंकणारे मुरलीकांत पेटकर ह्यांनी आधीपासून खेळात प्राविण्य मिळवलेलं होतं. त्यांच्या ह्याच खिलाडूवृत्तीने त्यांना पुन्हा जीवनदान दिलं. पण ह्या गोळ्यांनी त्यांचा कंबरे खालचा भाग निकामी करून टाकला होता. १९६५ च्या युद्धामधील शौर्याबद्दल त्यांना रक्षा मेडल ने सन्मानित करण्यात आलं.

१९६५ सालच्या त्या हल्यात जखमी झाल्यावर ही त्यांनी आपली खिलाडूवृत्ती जोपासली. आपल्या शरीराच्या अपंगत्वावर मात करताना त्यांनी १९६७ ला भालाफेक, थाळीफेक, टेबल टेनिस, तिरंदाजी ह्या सर्व खेळात महाराष्ट्र राज्यातून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला. भारतीय सेनेची शिस्त, व्यायामा सोबत आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी खेळत पुन्हा पुनरागमन केलं. १९६९ मधून भारतीय सेनेच्या सेवेतून मुक्त झाल्यावर पुढे काय हा प्रश्न होता. जे. आर. डी. टाटांनी १९६५ च्या युद्धातील सैनिकांसाठी मदत करण्याची तयारी दाखवली होती. पण तात्पुरती मदत घेऊन सहानभूती च्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा मुरलीकांत पेटकर ह्यांनी जे.आर.डी. टाटांकडे सन्मानाने काम करून देण्याची मागणी केली. तेव्हा टाटांनी त्यांना पुण्याच्या टेल्को मध्ये नोकरी दिली. ह्या नंतर मुरलीकांत पेटकरांनी तब्बल ३० वर्षाच योगदान टेल्को च्या उभारणीत दिलं. (विनीत वर्तक ©)

१९६० – ७० च्या दशकात भारतात खेळाचा दर्जा खूपच दुय्यम होता. खेळासाठी कोणतीही तरतूद नव्हती. त्यात दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी तर काहीच नाही. पण त्याही काळात मुरलीकांत पेटकर ह्यांनी जागतिक पॅरालिंपिक्स स्पर्धा जी हायडेलबर्ग, जर्मनी इकडे आयोजित करण्यात आली होती त्यात भाग घेतला. त्यात ५० मीटर फ्री स्टाईल पद्धतीने पोहण्याच्या स्पर्धेत ३७.३३ सेकंदांचा जागतिक विक्रम नोंदवत सुवर्ण पदक पटकावलं. पॅरालिंपिक्स स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावणारे मुरलीकांत पेटकर हे पहिले भारतीय ठरले. त्याआधी ही मुरलीकांत पेटकर ह्यांनी १९७० सालच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत ५० मीटर फ्री स्टाईल पोहण्यात सुवर्ण तर भाला फेकीत रौप्य तर गोळा फेक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई भारतासाठी केली होती. त्या काळात खेळासाठी उदासीन असणाऱ्या भारतात त्यांच्या ह्या भीमपराक्रमाची नोंद खेदाने घेतली गेली नाही. त्यांचा हा पराक्रम देशापासून लपून राहिला. (विनीत वर्तक ©)

आपल्या ह्या पराक्रमाची दखल घेण्यासाठी मुरलीकांत पेटकर ह्यांनी तत्कालीन सरकारकडे पाठपुरावा केला. अपंग म्हणून त्यांना देशाच्या सर्वोच्च अश्या अर्जुन पुरस्कारापासून सरकारने त्यांना वंचित ठेवलं. १९७५ ला महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च असा शिव छत्रपती पुरस्कार मिळूनसुद्धा तिन वेळा सरकारने अर्जुन पुरस्कार देण्यासाठी नकार दिला. कधी अपंग म्हणून तर कधी त्यांनी केलेल्या पराक्रमाला लोटलेला कालावधी आता खूप जास्ती आहे असं सांगत त्यांना परतीची वाट दाखवण्यात आली. १ नोव्हेंबर १९४७ ला पेठ इस्लामपूर ह्या सांगली जिल्ह्यात जन्माला आलेल्या मुरलीकांत पेटकरांनी सरकार कडून कोणत्याही पुरस्कार अथवा आपल्या पराक्रमाची नोंद घेण्याची आशा सोडून दिली होती. (विनीत वर्तक ©)

गेल्या काही वर्षात भारत सरकारने पुरस्कार वितरणाच्या एकूण पद्धतीत अमुलाग्र बदल केला. त्याचाच परिणाम म्हणून विस्मृतीत गेलेल्या मुरलीकांत पेटकर ह्याचं नाव गो स्पोर्ट फौंडेशन सोबत राहुल द्रविड आणि सचिन तेंडूलकर ह्या भारताच्या क्रिकेट खेळातील दिग्गजांनी सरकारकडे सुचवलं. सचिन तेंडूलकर ने मुरलीकांत पेटकर ह्यांना १५ लाख रुपयांची मदत केली तर राहुल द्रविड ने त्यांच्या नावाची शिफारस भारत सरकारकडे केली. त्यांच्या पराक्रमाला जवळपास ४४ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटल्यावर भारत सरकारने २०१८ साली भारताच्या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच “पद्मश्री” पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. सरकार दफ्तरी आलेल्या कटू अनुभवानंतर मुरलीकांत पेटकर ह्यांनी सर्व आशा सोडल्या होत्या पण जानेवारी २०१८ ला भारत सरकार कडून आलेल्या एका पत्राने ह्या खेळाडूच्या डोळ्यात एक लढाई जिंकल्याचा आनंद झाला. उशिरा का होईना भारत सरकारने पॅरालिंपिक्स स्पर्धेत भारताला पाहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या ह्या सैनिकाचा गौरव केला. (विनीत वर्तक ©)

युद्धात ७ गोळ्या अंगावर झेलत ज्यातली एक गोळी अजूनही त्यांच्या मणक्यात रुतलेली आहे अश्या परिस्थितीत आलेल्या अपंगत्वाला बाजूला सारत जिद्दीने जागतिक स्पर्धेत भाग घेऊन भारताचा तिरंगा अटकेपार फडकवणाऱ्या मुरलीकांत पेटकर ह्यांना माझा सलाम. तुमच्या व्यक्तिमत्वाचा आदर्श येणाऱ्या अनेक पिढ्यांना अपंगत्व, कोणतही व्यंग असताना ही सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करेल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. एक असाधारण आयुष्य जगलेल्या मुरलीकांत पेटकर ह्यांना माझा साष्टांग दंडवत.

माहिती स्त्रोत :- गुगल.

फोटो स्त्रोत :- गुगल.



सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट असून नाव काढून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होईल.