कृष्णविवराची प्रतिमा.. तंत्रज्ञानाच एक पुढलं पाउलं... विनीत वर्तक ©
काल जगभरातील वैज्ञानिक, संशोधक ह्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. ह्याला कारण आहे मानवी इतिहासात पहिल्यांदा तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे घेता आलेला कृष्णविवराची प्रतिमा. सामान्य माणसाच्या दृष्ट्रीने ह्यात इतकं मोठं काय? असा प्रश्न मनात आला असेल. कारण जिकडे आपण मिलियन, बिलियन अंतरावरच्या आकाशगंगा बघतो आणि त्यांच्या प्रतिमा घेतो तिकडे कृष्णविवराच्या प्रतिमेचं इतकं काय महत्व? खरे तर आधी थोडक्यात कृष्णविवर काय समजून घेतलं आणि त्याची प्रतिमा घेणं का इतकं अवघड आहे हे समजलं तर आपल्याला अंदाज येईल की वैज्ञानिकांनी कोणती सिद्धी मिळवली आहे.
जगाच्या कोपऱ्यात कुठेही आपण वावरतो तेव्हा एक गोष्ट जवळपास सारखी असते ती म्हणजे गुरुत्वाकर्षण. समजा आपण एखाद्या रस्त्यावरच म्हणजे मुंबईतल्या एस.व्ही रोड किंवा पुण्यामधल्या डेक्कन वरचं गुरुत्वाकर्षण नाहीस केल तर? जे लोक आधीच कोणत्याही मोशन म्हणजे वेगात आहेत ते अवकाशात फेकले जातील. गाड्या हवेत उडायला लागतील. पण समजा उलट केल तर? आपल्यावर पृथ्वीच जे बल काम करते ते १ जी असते. समजा आपण ते ८-९ जी केल तर आपल्याला अस्वस्थ वाटेल. काही काळ आपण सहन ही करू जसे लढाऊ विमानातील पायलट अनुभवतात. समजा हा फोर्स काही मिलियन जी केला तर? तुमच्या डोक्याच्या वजनाने तुम्ही पूर्णपणे चेपले जाल. म्हणजे तुमच्या डोक्याच मास किंवा वस्तुमान इतक होईल कि तुमच शरीर पूर्ण त्यात दबून जाईल.
आता हाच फोर्स किंवा गुरुत्वीय बल जेव्हा प्रचंड प्रमाणात वाढते तेव्हा प्रकाश पण त्याच्या वजनापुढे गुडघे टेकतो. म्हणजे की ह्या प्रचंड बलापुढे तो इच्छा असून पण पुढे जाऊ शकत नाही. आता प्रकाश जर आपल्यापर्यंत पोहचू शकला नाही तर आपल्याला काय दिसेल? तर काळोख पण त्या काळोखात दडलेलं असेल ते प्रचंड गुरुत्वीय बल. प्रचंड मोठे तारे म्हणजे सूर्याच्या २० पट वजन असणारा एखादा तारा आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी सगळ इंधन जळून झाल्यावर आपल्याच वजनाला झेलू शकत नाही. त्या वजनाखाली तो दबला जातो. किती तर अवघ्या काही किलोमीटर च्या एका साच्यात. विचार करा सूर्याच्या २० पट वजनाचा तारा जेव्हा फक्त काही कि.मी. चा होईल तेव्हा त्या अंतरात त्याच सगळं प्रचंड असं वस्तुमान त्यात दबलेलं असेल. ह्या वस्तुमानाच्या वजनामुळे त्यातून जाणारा प्रकाश पण झुकेल. त्याचवेळी त्या ताऱ्याच गुरुत्वीय बल मात्र आपलं काम करत असेल म्हणजे त्याच्या जवळ येणारी प्रत्येक गोष्ट ह्या गुरुत्वीय बलाने त्याच्या कडे ओढली जाईल आणि त्या काळोखात लुप्त होईल. ह्यालाच म्हणतात स्टेलर किंवा मध्यम कृष्णविवर.
आपल्याला ग्रह, तारे दिसतात ते त्यांच्याकडून येणाऱ्या प्रकाशामुळे पण कृष्णविवराच्या बाबतीत तसं घडतं नाही. वर सांगितलं त्या प्रमाणे प्रकाश जिकडून येतं नाही तिकडे आपल्याला काय दिसणार? पण कृष्णविवराच्या बाबतीत ते दिसत नाही ही मोठी अडचण वैज्ञानिकांपुढे नव्हती. कारण त्याच्या भोवती असणाऱ्या प्रकाशाला आपण बघू शकतो. किंवा त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या गोष्टी कृष्णविवराच अस्तित्व दाखवण्यास पुरेश्या आहेत. पण सगळ्यात मोठी अडचण आहे की कृष्णविवर आकाराने खूपच लहान असते. आपलं कृष्णविवरा पासून असलेलं अंतर हे खूप मोठं असते. पृथ्वीवरून बघताना त्याला एन्गुलर साईज असं म्हणतात. आता हे एन्गुलर साईज म्हणजे काय तर. आपण स्वतःभोवती पूर्ण गिरकी घेतली तर ती ३६० अंशाची (डिग्री) होते. ह्यातील प्रत्येक अंश (डिग्री) हे ६० भागात विभागलं तर त्यातील एका भागाला एक आर्क मिनिट म्हणतात. प्रत्येक आर्क मिनिट ला जर आपण ६० भागात विभागलं तर त्यातील एका भागाला एक आर्क सेकंद म्हणतात. उदाहरण दयायचं झालं तर आपण पृथ्वीवरून आकाशातला पूर्ण चंद्र आपल्या एका हाताच्या अंगठ्याने बंदिस्त करू शकतो. म्हणजे काय तर? चंद्राचा आकार पृथ्वीवरून अर्ध्या अंशाचा भाग व्यापतो म्हणून आपण आपल्या हाताच्या अंगठ्याने त्याला पूर्ण झाकू शकतो.
काल जो फोटो वैज्ञानिकांनी घेतला ते कृष्णविवर पृथ्वीपासून सुमारे ५५ मिलियन प्रकाशवर्षे लांब आहे. म्हणजे तिकडून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोचायला ५५ मिलियन वर्ष लागतात. ( ३ लाख किलोमीटर/ सेकंद वेगाने ) पण हे अंतर अडचण नाही तर जो फोटो आपण बघत आहोत त्याची एन्गुलर साईज आहे ४० मायक्रो आर्क सेकंद. म्हणजे चंद्राशी तुलना केली तर हे कृष्णविवर चंद्रापेक्षा ४५ मिलियन पट एन्गुलर साईजने लहान आहे. दुसरी एक अडचण म्हणजे प्रकाश हा एखाद्या वस्तूमुळे प्रसारित होतो ज्याला ‘डिफ्र्याक्षन’ असं म्हणतात. जेव्हा प्रकाश हा आपल्या डोळ्याच्या बुबुळात किंवा कोणत्याही दुर्बिणीच्या आरश्याच्या आत प्रवेश करतो तेव्हा तो प्रसारित होतो. प्रकाश आजूबाजूच्या इतर प्रकाश किरणात मिसळून जातो. ह्यामुळे त्याची प्रतिमा उमटत नाही. मानवी डोळे हे फक्त १ आर्क मिनिट अंतरावरच्या प्रकाशाची प्रतिमा निर्माण करण्यात सक्षम आहेत. तेव्हा ४० मायक्रो आर्क सेकंद अंतर असलेल्या कृष्णविवराची प्रतिमा घेणं किती अवघड असेल हे लक्षात आलं असेल.
४० मायक्रो आर्क सेकंद इतक्या लहान असलेल्या कृष्णविवराची प्रतिमा / फोटो घ्यायचा असेल तर उपाय काय? उपाय एकच की प्रकाशकिरण आत घेणारी दुर्बीण मोठी बनवणं. त्या दुर्बिणीचा आरसा इतका मोठा असेल की ह्या एन्गुलर साईज ची प्रतिमा ती उमटवू शकेल. पण त्यासाठी दुर्बिणीचा आकार लागणार होता जवळपास पृथ्वीच्या आकाराएवढा. अशी एखादी दुर्बीण जिची व्याप्ती पृथ्वीएवढी असेल. हे अशक्य होतं. पण म्हणतात न “जब घी सिधी उंगली से नही निकले तो उंगली तेढी कर दो” वैज्ञानिकांनी नेमकं हेच केलं. त्यांनी जगातील सगळीकडे विखुरलेल्या दुर्बिणीना एकत्र आणलं. सगळ्याच दुर्बिणी जर एकाचवेळी एकीकडे पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागातून बघायला लागल्या तर आपण वर्च्युअलि पृथ्वीच्या आकाराची एक पूर्ण दुर्बीण बनवली. वैज्ञानिकांनी नेमकं हेच केलं. जगातील ८ मोठे रेडीओ टेलिस्कोप इवेंट होरायझन टेलिस्कोप ह्या नावाने एकत्र आणून ह्या सगळ्या दुर्बिणीत येणाऱ्या प्रकाशाचा अभ्यास केला.
आपल्यापासून ५५ मिलियन प्रकाशवर्ष लांब असलेल्या मेसियर ८७ ह्या आकाशगंगेतील कृष्णविवरावर ह्या सगळ्या दुर्बिणी रोखल्या. ह्या कृष्णविवराच वस्तुमान सूर्याच्या ६.५ बिलियन पट आहे. स्पेन, नेवाडा, हवाई बेट, एरिझोना , मेक्सिको, चिली, अंटाट्रीका इथल्या दुर्बिणी ह्या आकाशगंगेकडे रोखल्या गेल्या. तब्बल ६० मिलियन अमेरिकन डॉलर ह्या साठी खर्च केला गेला. जवळपास दहा लक्ष गिगाबाईट इतका प्रचंड डेटा एकत्रित केला गेला. हे सगळं करण्यासाठी सुपर कॉम्प्यूटर ची मदत घेतली गेली. त्यातून निर्माण झाली ती काल प्रसिद्ध केलेली प्रतिमा. ही प्रतिमा आपल्याला दिसते तशी साधी प्रतिमा नाही तर ह्यातील प्रत्येक पिक्सल हे खर म्हणजे रेडीओ व्हेव ची व्हेवलेंथ आहे. ह्यातला जो शेंदरी रंगाचा प्रकाश दिसतो आहे तो खरे तर १ मिलीमीटर व्हेव लेंथ असलेल्या रेडीओ व्हेव ची प्रतिमा आहे.
सामान्य माणसाला हे सगळं वाचून खरे तर गोष्टी डोक्यावरून जातील पण तंत्रज्ञानाच्या दृष्ट्रीने, विज्ञानाच्या दृष्ट्रीने काल घडलेली घटना एक क्रांतिकारी पाउल आहे. माणसाच्या ह्या विश्वाच्या बाबतीत असलेल्या मुलभूत प्रश्नांना उत्तर शोधणाच्या दृष्ट्रीने पूर्ण मानवाने टाकलेलं एक पुढलं पाउल आहे. ह्या प्रतिमेमुळे विश्वाच्या उत्त्पती तसेच एकूणच कृष्णविवरा बद्दल असलेल्या आपल्या कल्पनांनवर आपण कुठेतरी शिक्कामोर्तब केलं आहे. ह्या प्रयोगाच्या मागे असणाऱ्या वैज्ञानिक, संशोधक आणि संस्था ह्याचं अभिनंदन आणि विश्वाच्या शोधात त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेछ्या.
माहिती स्रोत :- गुगल, नासा
वाह खूप छान सोप्या भाषेत लिहिलंय
ReplyDelete