Sunday 31 January 2021

एलोन मस्क चं स्टारशिप... विनीत वर्तक ©

 एलोन मस्क चं स्टारशिप... विनीत वर्तक ©

एलोन मस्क हा एक ध्येयवेडा उद्योगपती आहे. जगाने ज्याची कल्पना केली नसेल किंवा जग विचार करते त्याच्या पाच पावलं पुढे विचार करून त्यातल्या कल्पनांना तो मूर्त स्वरूप देत आला आहे. त्याच्या उद्दिष्ठात तो कितपत यशस्वी झाला किंवा कसा यशस्वी झाला ह्याची व्याख्या जाणकार करतील. पण त्याला स्वप्न बघण्यापासून ते प्रत्यक्षात उतरवण्या पर्यंत आजवर कोणी रोखू शकलेलं नाही किंबहुना त्याच्या ह्याच जिद्दीमुळे तो आज जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. आज त्याच्याकडे १८२.९ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी प्रचंड संपत्ती आहे. सध्या तो एका नवीन स्वप्नावर काम करतो आहे ज्याचं नाव आहे 'स्टारशिप'. याच्या नावावरून एखाद्या चित्रटातील किंवा स्टार ट्रेक सारख्या मालिका ज्यांनी बघितल्या असतील तर त्यात दाखवण्यात येणार शेकडो लोकांना घेऊन अंतराळात विहार करणारं एखादं अवाढव्य अंतराळातील यान असेल असा आपण अंदाज केला तर तो अगदी बरोबर आहे. कारण शेकडो लोकांना परग्रहावर घेऊन जाणारं 'स्टारशिप' एलोन मस्क प्रत्यक्षात बनवतो आहे. तर काय आहे हे 'स्टारशिप'? हे समजून घेणं महत्वाचं आहे कारण कदाचित आपली येणारी पिढी किंवा आपणसुद्धा यातून अंतराळ प्रवासाला जाऊ शकणार आहोत.

'स्टारशिप' हे एका प्रणाली चा भाग आहे ज्याला 'सुपर हेवी' म्हंटल जाते. या संपूर्ण प्रणाली चे मुखतः तीन भाग होतात एक म्हणजे 'सुपर हेवी रॉकेट', दुसरं ह्या रॉकेट ला इंधन पुरवणाऱ्या टाक्या आणि तिसरं म्हणजे 'स्टारशिप'. स्टारशिप हे संपूर्ण प्रणाली च्या वरच्या भागात बसवलेलं असते. मधल्या भागात इंधन पुरवणाऱ्या टाक्या तर खालच्या भागात इंधनाचे प्रज्वलन करून त्यांना अंतराळात घेऊन जाणारी रॅप्टर इंजिन असतात. हे रॉकेट उड्डाणासाठी 'मेथॅलॉक्स' नावाच्या इंधनाचा वापर करते. खरे तर असं इंधन रॉकेट प्रणाली मध्ये वापरलं जात नाही. पण वर सांगितलं तसं एलोन मस्क आणि त्याची टीम जिकडे आपण थांबतो तिकडून विचार करायला सुरवात करतात. तर ह्या 'मेथॅलॉक्स' मध्ये मुख्य ऊर्जा देणारा घटक म्हणजे मिथेन आणि त्याच प्रज्वलन होण्यासाठी साथ देणारा ऑक्सिजन. मिथेन वापरण्यामागे हेतू आहे की स्टारशिप ची निर्मिती मुखतः मंगळाच्या सफारीसाठी एलोन मस्क करतो आहे. मंगळाच्या वातावरणात मिथेन जास्ती प्रमाणात आहे. मंगळवार पोहचल्यावर तिथल्या मिथेन चा इंधन म्हणून वापर करून पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी इंधन निर्माण करण्याची त्याची योजना आहे. त्यासाठी त्याने 'मेथॅलॉक्स' चा वापर स्टारशिप च्या निर्मिती मध्ये केला आहे. 

सुपर हेवी रॉकेट मध्ये ३४०० टन क्रायोजेनिक (ज्याच तपमान उणे -१५० डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी) 'मेथॅलॉक्स' इंधन असते. रॉकेट उड्डाण भरताना २८ रॅप्टर इंजिन एकावेळेस इंधनाचे प्रज्वलन करून १६ मिलियन पाउंड चा दाब उत्पन्न करतात. ह्या दाबामुळे सुपर हेवी रॉकेट पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण भेदून तब्बल १०० ते १५० टन वजनाचं साहित्य अंतराळात घेऊन जाऊ शकते. एकदा अंतराळात आपल्यावर ते स्टारशिप ला पुढल्या प्रवासाला पाठवून देईल आणि स्वतः आपल्या पंखांच्या साह्याने हे सुपर हेवी रॉकेट पुन्हा एकदा पृथ्वीवर त्याच्या ठरलेल्या ठिकाणी उतरेल. अश्या पद्धतीने रॉकेट च इंजिन पुन्हा जमीनीवर अचूकतेने उतरवण्याच तंत्रज्ञान स्पेस एक्स ने आधी पण आपल्या फाल्कन हेवी मध्ये दाखवून दिलं आहे. परत आलेली इंजिन आणि रॉकेट पुन्हा पुढच्या उड्डाणासाठी वापरता येतील आणि अश्या प्रकारे अंतराळ सफरींचा खर्च अतिशय कमी होणार आहे. 

एकदा का स्टारशिप अंतराळात पाठवलं की पुढला प्रवास करण्यासाठी त्याच्याकडे दोन पर्याय असतील. एक म्हणजे त्याच्यात पुन्हा एकदा इंधन भरून त्याने आणलेला १०० ते १५० टन वजनाचा भार हा चंद्राच्या किंवा मंगळाच्या दिशेने घेऊन जाईल. ह्या साठी स्टारशिप मध्ये ६ रॅप्टर इंजिन आहेत. जी स्टारशिप ला चंद्रावर किंवा मंगळावर घेऊन जाण्यास सक्षम असतील. हे इंधन अंतराळात मिळवण्यासाठी आधीच एक यान ज्याला टँकर म्हंटल जाते ते अंतराळात पार्क केलेलं असेल. त्याच्याशी जोडून स्टारशिप ला इंधनाचा पुरवठा केला जाईल. जर ते पुढे पाठवायचं नसेल तर त्यावर अजून जास्ती भार पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याची योजना आहे (म्हणजे उपग्रह किंवा इंधन इत्यादी). पृथ्वीवर परतण्यासाठी एखाद्या ग्लायडर प्रमाणे स्टारशिप जमिनीच्या दिशेने प्रवास करेल. जमिनीजवळ आल्यावर त्याला अलगद झेलण्याची यंत्रणा स्पेस एक्स विकसित करत असून त्याला त्या प्रमाणे झेलून पुन्हा एकदा वापरासाठी तयार केलं जाईल. हे सगळं एखाद्या कथेप्रमाणे वाटत असलं तरी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची यंत्रणा आणि तंत्रज्ञान स्पेस एक्स आणि एलोन मस्क ने तयार केली आहे. स्टारशिप चे अनेक व्हर्जन बनवण्यात येणार असून प्रत्येकाचं कार्य वेगळं असणार आहे. स्टारशिप मध्ये ४० खोल्या असणार असून प्रत्येक खोलीत २-३ लोकांना राहण्याची सोय असणार आहे. ह्याच तोंड एखाद्या मगरीच्या तोंडाप्रमाणे उघडणार असून त्यामुळे सामानाच चढ उतार, माणसांची ने-आण अतिशय सुलभ रीतीने करता येणार आहे. 

एकूणच काय तर स्टारशिप मानवाच्या तंत्रज्ञान प्रगतीमधील एक मैलाचा दगड ठरणार आहे. माणसाला अंतराळात सफर घडवून आणण्याचे सर्व ठोकताळे ह्या तंत्रज्ञानाने बदलून जाणार आहेत. असं नाही की हे प्रत्यक्षात यायला काही दशकं लागणार आहेत. एलोन मस्क च्या मते २०२४ पर्यंत स्टारशिप ची मंगळ यात्रेची सुरवात होणं अपेक्षित आहे. येत्या फेब्रुवारी २०२१ ला स्टारशिप एस.एन.९ ची चाचणी होणार आहे. ह्यातील प्रत्येक चाचणीत एलोन मस्क आणि स्पेस एक्स त्यांनी बघितलेल्या स्वप्नांकडे एक एक पाऊल पुढे टाकत आहेत. अर्थात ह्यात काही अडचणी येतील, काही वेळा अपयशाची चव चाखायला लागेल पण ज्या पद्धतीने ह्या तंत्रज्ञानावर स्पेस एक्स काम करत आहे ते बघता मंगळ सफारीचे दरवाजे हे दशक संपण्याआधी उघडणार आहेत हे नक्की आहे. त्या वेळेस कदाचित एलोन मस्क ने दुसऱ्या कोणत्या स्वप्नांचा पाठलाग करायला सुरवात केलेली असेल.

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Saturday 30 January 2021

पद्मश्री मिळवणारा अशिक्षित अष्टपैलू सागरी संशोधक... विनीत वर्तक ©

 पद्मश्री मिळवणारा अशिक्षित अष्टपैलू सागरी संशोधक... विनीत वर्तक ©

अवघे आठवी पर्यंतच तुटपुंज शिक्षण. नावाच्या मागे कोणतीही पदवी नसताना सागरी जीवशास्त्र, सागरी संशोधन, भूगोल, खगोलशास्त्र, सामाजिक विज्ञान, जहाज बांधणी, मासेमारी, फलोत्पादन सारख्या विषयातील तज्ञ म्हणून जगभर मान्यता मिळालेली आहे. ह्या शिवाय हिंदी, इंग्रजी, मल्याळम, अरेबिक, लॅटिन, फ्रेंच, रशियन, जर्मन, संस्कृत, तमिळ, पर्शियन, सिन्हालीसे आणि उर्दू भाषांवर प्रभुत्व आणि हा प्रवास इकडेच थांबत नाही तर हिंद महासागरात आढळणाऱ्या एका दुर्मिळ माश्याच्या जातीचं चक्क नाव हे त्यांच्या कार्यांचा सन्मान म्हणून ठेवलं गेलं आहे. त्यांच कार्य आणि कर्तृत्व इतकं मोठं आहे की त्यांनी बांधलेली बोट आज चक्क ओमान च्या संग्रहालयात मोठ्या मान सन्मानाने जतन केली आहे. त्यांच्या ह्या उत्तुंग कार्याची दखल भारत सरकारने घेताना त्यांचा २०२१ सालच्या पद्मश्री सन्मानाने गौरव केला आहे. त्या संशोधकांच नाव आहे 'अली माणिकफ़न'. अर्थात हे नाव भारतीयांसाठी नवीन असेल कारण आपले हिरोच आणि ज्यांना आपण मोठी माणसं मानतो ते ठरवण्याचे आपले ठोकताळेच संपूर्ण चुकीचे आहेत. तर कोण आहेत हे अली माणिकफ़न? ज्यांच्यापुढे भलेभले लोकं नमस्कार करतात, ज्यांच्या कामाची आणि अभ्यासाची महती संपूर्ण जगात पोहचलेली आहे. ज्यांच्याकडे साधी मेट्रिक ची डिग्री नाही पण त्यांना कित्येक क्षेत्रातले मोठे लोक अली माणिकफ़न सर्वोच्च तज्ञ आहेत असं मानतात. 

अली माणिकफ़न हे मूळचे मिनीकॉय ह्या लक्षद्वीप बेटावरचे. १६ मार्च १९३८ ला त्यांचा जन्म झाला त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी केरळ मध्ये पाठवलं. आठवी पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांच मन शिक्षणात रमल नाही. ते शाळा सोडून पुन्हा लक्षद्वीप ला आले. तिकडे आल्यावर त्यांनी आपल्या आवडत्या विषयांचा अभ्यास सुरु केला आणि १९५६ मध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी क्लार्क म्हणून मिनीकॉय ह्या बेटावर नोकरी पत्कारली. त्यांचा सागरी संशोधन मधला अभ्यास त्यांना १९६० साली सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इकडे घेऊन आला. इकडे त्यांनी सागरी जिवशास्त्र संशोधक डॉक्टर सनाथपन जोन्स ह्यांच्यासोबत सागरी जिवांचं संशोधन करायला सुरवात केली. डॉक्टर जोन्स कोणतंही शिक्षण नसताना सागरी जीवांचा त्यांचा अभ्यास बघून अतिशय प्रभावित झाले. त्यांनी शोधलेल्या एका माशांच्या जातीला 'अबूडएफडूफ माणिकफ़न' असं नाव दिलं गेलं. डॉक्टर जोन्स ह्यांनी प्रसिद्ध केलेल्या शोधप्रबंधाचे अली माणिकफ़न हे सहाय्यक लेखक होते.   

१९८१ साली आयरिश असणारा साहसी दर्यावदी टीम सेव्हरीन अली माणिकफ़न ह्यांच्याकडे मदत मागण्यासाठी आला. त्याला १२०० वर्षापूर्वी ज्या पद्धतीने अरब लोक जहाजातून व्यापार करायचे तश्या पद्धतीचं जहाज पुन्हा बनवायचं होतं आणि त्यातून सागरी प्रवास करायचा होता. १२०० वर्षापूर्वीच जहाज त्याच पद्धतीने आज कोणी बांधून देऊ शकेल ह्याचा शोध घेतल्यावर सगळ्यात पुढे नाव आलं ते अली माणिकफ़न ह्यांच. अली माणिकफ़न ह्यांनी हे काम एक आव्हान म्हणून स्वीकारलं. ओमान इकडे जाऊन तब्बल एक वर्षभर लाकडाने आणि काथ्या ह्या दोराचा वापर करत २७ मीटर लांबीचे एक शिडाच जहाज उभं केलं. ज्यात एक खिळा सुद्धा वापरला गेला नव्हता त्याच नाव 'सोहर' असं ठेवण्यात आलं. साहसी दर्यावदी टीम सेव्हरीन ह्याने याच जहाजातून ओमान ते चीन असा ९६०० किलोमीटर चा प्रवास केला. आपल्या ह्या सफारीला त्याने 'सिंदबाद सफर' असं नाव दिलं. त्याच्या आणि अली माणिकफ़न ह्याच्या कार्याची ओमान सरकारने नोंद घेताना हे जहाज ओमान देशाचा सांस्कृतिक वारसा म्हणून ओमान इकडे संग्रालयात आजही जपून ठेवलं आहे. 

अली माणिकफ़न यांच कार्य इकडेच संपत नाही तर पाण्याच नियोजन, सागरी जीवशास्त्रात माणसाच्या हस्तक्षेपामुळे होणाऱ्या बदलांचा विपुल अभ्यास केलेला असून त्यांच ह्या विषयावरच ज्ञान हे जगात नावाजलेलं आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी एका नवीन चंद्राच्या प्रवासावर आधारित दिनदर्शिकेच निर्माण केलं. जगातील सगळ्या मुस्लिम धर्मातल्या लोकांनी एकच हिजरा दिनदर्शिका वापरावी ह्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. अली माणिकफ़न सध्या वालूर, तिरुनेलीवेली, तामिळनाडू इकडे राहतात. तिकडे त्यांनी स्वतः १३ एकर जागा विकत घेऊन स्वतःची शेती फुलवली आहे. ते कोणत्याही कीटकनाशकांचा वापर करत नाहीत न कोणत्या खतांचा. आपल्याला लागणारी संपूर्ण इलेक्ट्रिसिटी ते स्वतः पवनचक्यांद्वारे निर्माण करतात. ज्या पवनचक्यांची निर्मिती सुद्धा त्यांनी स्वतः केली आहे. 

इतकं मोठं कार्य करूनसुद्धा ते एक साधं आयुष्य जगत आहेत. ना कुठला माज, ना कुठला गर्व पण वयाच्या ८२ वर्षी सुद्धा काहीतरी नवीन करण्याची धडपड त्यांची सुरु आहे. आज त्यांच्या तिन्ही मुली शिक्षिका आहेत तर मुलगा दर्यावर्दी आहे. कोणतही शिक्षण नसताना आपल्या अभ्यासाने, कर्तृत्वाने, जिद्दीने अष्टपैलू अशी कामगिरी करून भारताचं नाव अटकेपार नेणाऱ्या अली माणिकफ़न यांचा गौरव भारत सरकारने २०२१ सालातला पद्मश्री सन्मानाने केला आहे. त्यांच्याबद्दल लिहायाला घेतलं तर पान कमी पडतील इतकं अष्टपैलू कर्तृत्व त्यांच आहे. अली माणिकफ़न यांना आणि त्यांच्या कर्तुत्वाला माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. त्याच बरोबर अतिशय योग्य कर्तृत्वान भारतीय हिरोंची निवड करण्यासाठी भारत सरकारचं अभिनंदन. 

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल  (पहिल्या फोटोत अली माणिकफ़न आणि दुसऱ्या फोटोत त्यांनी शोधलेल्या माशाचा फोटो) 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Monday 25 January 2021

शहीदोंकी चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशा होगा... विनीत वर्तक ©

 शहीदोंकी चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशा होगा... विनीत वर्तक ©

गेल्यावर्षी गलवान खोर्‍यातील कारवाईत शहीद झालेल्या कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू (१६ बिहार रेजिमेंट), यांना युद्धकाळातील शौर्य पुरस्कार मरणोत्तर "महावीर चक्र" उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देण्यात येणार आहे. 

महावीर चक्र हा सन्मान २००१ नंतर मिळवणारे कर्नल संतोष बाबू हे एकमेव भारतीय सेनेचे ऑफिसर आहेत.  महावीर चक्र हा सन्मान युद्धात अतुलनीय शौर्य दाखवून देशाचं रक्षण करण्यासाठी देण्यात येतो. परमवीर चक्रानंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा सन्मान आहे. 

१५ जून २०२० रोजी भारताने आपल्या सिंहासह २० मावळे गलवान इथे गमावले होते. ही घटना संपूर्ण जगाच्या विचारधारणेला कलाटणी देणारी म्हणून इतिहासात नोंदली गेली. भारताच्या सैनिकांनी चीन च्या सैन्याला आपली जागा दाखवून दिली होती. ह्यात अनेक चीन चे सैनिक पण मारले गेले. जिकडे भारताने अधिकृतरीत्या आपले सैनिक गमावल्याची कबुली जगापुढे दिली तिकडे चीन ने असं काही घडलं ह्याची दखल सुद्धा घेतली नाही. आपल्या सैनिकांचे मृतदेह पण स्वीकारण्यास मनाई केली होती.  त्याचवेळी भारतीय सेनेने आपल्या शूरवीर, पराक्रमी सैनिकांच बलिदान लक्षात ठेवताना त्यांना युद्ध काळात देण्यात येणाऱ्या सन्मानांची शिफारस भारत सरकारकडे केली होती. 

ह्या २० सैनिकांच नाव नॅशनल वॉर मेमोरियल, नवी दिल्ली इकडे कोरण्यात आलं असून भारतीय सेनेने 'Gallants of Galwan'  (गॅलॅन्टस ऑफ गलवान) नावाचं स्मारक ही पूर्व लडाख च्या १२० पोस्ट वर बांधल आहे. 

जर भारतीय सेना युद्धकाळातील सन्मान गलवान इकडे हुतात्मा झालेल्या आपल्या सैनिकांना देते आहे ह्याचा सरळ अर्थ भारत आणि चीन ह्यांच्यात झालेला गलवान इथला संघर्ष हे भारताविरुद्ध चीन ने पुकारलेलं युद्ध आहे. हे सर्व जगासमोर ठासून सांगताना भारताने आपल्या योद्धांचा आणि त्यांच्या बलिदानाचा यथोचित सन्मान केला आहे.  

फोटो स्रोत :- गुगल 

१) पहिल्या फोटोत कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू (१६ बिहार रेजिमेंट) आपल्या साथीदारांसह देशाची रक्षा करताना 

२) गॅलॅन्टस ऑफ गलवान हे १२० पोस्ट पूर्व लडाख मधील युद्ध स्मारक 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.








Friday 22 January 2021

कोटीच्या कोटी उड्डाणे... विनीत वर्तक ©

 कोटीच्या कोटी उड्डाणे... विनीत वर्तक ©

काल ब्राझील च्या राष्ट्रपती जैर बोलासोनारो ह्यांनी भारताला उद्देशून एक ट्विट केलं आहे. त्यातील आशय असा आहे, 

"Namaskar, Prime Minister @narendramodi. Brazil feels honoured to have a great partner to overcome a global obstacle by joining efforts. Thank you for assisting us with the vaccines exports from India to Brazil. Dhanyavaad! ," 

Brazilian President Jair Bolsonaro

पण त्याच बरोबर एक फोटो त्यांनी शेअर केला आहे जो माझ्या मते काही न सांगता खूप काही सांगणारा आहे. ज्याप्रमाणे रामायणात जखमी झालेल्या लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमानाने संजीवनी औषध आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वत आपल्या खांद्यावर उचलून आणला होता. त्याच प्रमाणे आजच्या काळातील भारत कोरोना च्या लढाईत जीवनदान देणाऱ्या कोविड लसी सातासमुद्रापार पोहचवत आहे. ब्राझील साठी २० लाख कोरोना लसी घेऊन भारतातून एमिरेट्स च्या विमानाने उड्डाण भरलं आहे. त्याबद्दल आभार व्यक्त करताना जैर बोलासोनारो ह्यांनी केलेलं फोटो ट्विट प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 

दुसरीकडे अमेरीकेच्या डिपार्टमेंट ऑफ स्टेट साऊथ एन्ड सेंट्रल एशिया ने एक ट्विट केलं आहे. ज्यातील आशय असा आहे, 

"We applaud India’s role in global health, sharing millions of doses of COVID-19 vaccine in South Asia. India's free shipments of vaccine began w/Maldives, Bhutan, Bangladesh & Nepal & will extend to others. India's a true friend using its pharma to help the global community,"

US Department of State for the Bureau of South and Central Asian Affairs (SCA)

भारताने आत्तापर्यंत १४ मिलियन (१.४ कोटी) लस जगातील इतर देशांना पोहचवल्या असून ह्यातील शेजारी देशांना दिलेल्या सगळ्या लसी ह्या फुकट मैत्रीच्या नात्याने दिलेल्या आहेत. भारताची ही डिप्लोमसी भारतासाठी जागतिक संबंध आणि आपली प्रतिमा उंचावण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. 

काही भारतीय ह्याला पण आक्षेप घेतील किंवा त्यात राजकारण शोधतील. आपण मदत केली पण समोरचा त्याची आठवण ठेवेल का? ह्या प्रश्नाचं उत्तर ना आपण देऊ शकत ना आपल्या देशाचे पंतप्रधान किंवा कोणताही विश्लेषक. कारण समोरच्याने कसं वागावं हे आपण नियंत्रित करू शकत नाही आपण फक्त आपण कस वागू शकतो हे ठरवू शकतो. आपल्या ह्या मित्रत्वाची जाणीव जर समोरच्या देशाने ठेवली नाही तर त्याला जशास तस उत्तर देण्याची ताकद पण आपण बाळगून आहोत ह्यासाठी काल जोधपूर, राजस्थान इकडून आलेले फोटो पुरेसे आहेत. 

जोधपूर इकडे भारत आणि फ्रांस ह्यांच्यात संयुक्त युद्ध सराव Desert Knight-21 सुरु आहे. फ्रांस चे अद्यावत राफेल आणि भारताचे राफेल, सुखोई ३० एम. के. आय. , मिराज २००० सारखी लढाऊ विमान सध्या वाळवंटाच्या आकाशात आपल्या आवाजाने शत्रूची झोप उडवत आहेत. ह्या सरावाचा मुख्य उद्देश राफेल विमानांचा सराव, दोन्ही देशातील सैनिकी संबंध वृद्धिगंत करणे, एकमेकांच्या युद्धातील कौशल्य, प्रबळ जागा, आपल्यातील कच्चे दुवे ह्या सर्वांचा अभ्यास करणे हा आहे. एकीकडे भारत मैत्रीच्या नात्याने संपूर्ण जगात आपलं स्थान बळकट करतो आहे. तर त्याचवेळी आपल्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या कोणालाही जशास तसं उत्तर देण्यासाठी सगळ्या आघाड्यांवर स्वतःला तयार करत आहे. 

जागतिक डिप्लोमसी मध्ये सगळ्यात महत्वाचे असते की किती जण तुमच्या सोबत आहेत. कारण स्वतःच्या जीवाला कोणताच देश घाबरत नाही पण तो घाबरतो ते बाकीचे परीणाम काय होतील ह्यांना. एक उदाहरण द्यायचं झालं तर भारताचा लढाऊ वैमानिक अभिनंदन वर्धमान ह्याला सोडण्यात भारताच्या ब्राह्मोस पेक्षा जागतिक डिप्लोमसी चा वाटा जास्ती होता. आपण भारताच्या ब्राह्मोस ना उत्तर म्हणून भारतावर अणुबॉम्ब टाकू पण त्या वेळेला आपल्या सोबत कोण आहे ह्याची चाचणी जेव्हा पाकिस्तान ने केली तेव्हा एक देश सुद्धा त्याच्या सोबत उभा नव्हता. अगदी चीन ने सुद्धा भारताच्या वैमानिकाला परत करण्याची सूचना पाकिस्तान ला केली होती. अर्थात प्रत्येकवेळी डिप्लोमसी अशीच राहील असं नाही. पण संबंध मजबूत करत राहणं हे अतिशय महत्वाचं असते. 

आज भारताने कोरोना काळात घेतलेल्या ह्या कोटीच्या कोटी उड्डाणाचे परीणाम दूरगामी असणार आहेत. ब्राझीलच्या राष्ट्रपतींच्या ट्विट चे अनेक अर्थ निघतात आणि ते काढले जातील. पण एक लक्षात घेतल पाहिजे की अश्या प्रकारचं ट्विट ऑफिशियल अकाउंट वरून करताना ह्या सर्वाचा सारासार विचार हा केला गेला असेल. आपण जेव्हा जगाबद्दल बोलतो तेव्हा आपण भारतीय असतो. पक्ष, व्यक्ती, राजकारण ह्या गोष्टी तेव्हा दुय्यम ठरतात. म्हणूनच त्यांच्या ह्या कोटीच्या कोटी उड्डाणाच्या ट्विट चा अभिमान प्रत्येक भारतीयाने बाळगायला हवा. 

तळटीप:- ह्या पोस्ट चा उद्देश भारताशी निगडित आहे. त्याला कोणत्या व्यक्ती, पक्षीय राजकारण अथवा संस्थेशी जोडू नये अथवा ह्या पोस्ट चा उद्देश तसा नाही.  

१) पहिल्या फोटोत ब्राझील च्या राष्ट्रपती जैर बोलासोनारो ह्यांनी ट्विट केलेलं हनुमानाचं उड्डाण 

२) दुसऱ्या फोटोत जोधपूर च्या आकाशात हवेतल्या हवेत इंधन भरून युद्ध सराव करणारी भारत आणि फ्रांस ची राफेल. 

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





Tuesday 19 January 2021

एका सिराज ची गोष्ट... विनीत वर्तक ©

 एका सिराज ची गोष्ट... विनीत वर्तक ©

भारताने आज ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत लोळवलं नुसतं लोळवलं नाही तर त्यांच तोंड सुजवल. हा पराभव ऑस्ट्रेलियाच्या इतक्या जिव्हारी लागला असेल की येणारी कित्येक वर्ष ते हा पराभव पचवू शकणार नाहीत. ह्या कसोटीने इतिहासाची अनेक पाने लिहली आहेत. अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. माज, गर्व, अहंकार ह्या सर्वाला अक्षरशः ठेचलं आहे. टीम इंडिया चा प्रत्येकजण ह्या यशासाठी आणि इतिहासासाठी अभिनंदनास पात्र आहे. कारण खेळ हा खेळ असतो त्यात कोणीतरी जिंकतो आणि कोणीतरी हरतो पण जेव्हा गोष्टी आत्मसन्मानावर येतात तेव्हा त्या विजयाचा आनंद आणि पराभवाच दुःख थोडं जास्तच जिव्हारी लागते हा इतिहास आहे. 

भारताच्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याच्या सुरवातीपासून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, समीक्षक ह्यांनी भारताच्या पराभवाचे मनसुबे रचले होते. जेव्हा खेळ सुरु झाला तेव्हा प्रेक्षकांनी, खेळाडूंनी त्याचसोबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताच्या संघाला दुय्यम वागणूक देऊन अनेकवेळा त्यांचा अपमान केला. भारतीय संघाचे ज्या ज्या प्रकारे मानसिक खच्चीकरण करता येईल ते त्या त्या पद्धतीने केले गेले. ऍडलेड मैदानावर जेव्हा अवघ्या ३६ धावात संपूर्ण भारतीय संघ ढेपाळला तेव्हा भारतीय संघाची लक्तरे पुन्हा वेशीवर टांगली जातात अशीच शंका सगळ्यांच्या मनात होती. क्रिकेट बघणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात जितका राग धुसमसत होता त्यापेक्षा थोडा जास्तच भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूच्या मनात होता असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. पण ह्या सगळ्यात एक खेळाडू असा होता ज्याच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं त्याच नाव होतं "मोहम्मद सिराज". 

ऑस्ट्रेलिया इकडे बॉर्डर - गावस्कर क्रिकेट स्पर्धा सुरु होण्या आगोदर एक कठीण निर्णय हैद्राबाद च्या मोहम्मद सिराज ला घ्यावा लागणार होता तो म्हणजे संघासोबत ऑस्ट्रेलियाला जायचं का नाही? आपल्या आजारी असलेल्या वडिलांना सोडून ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी तो सांशक होता पण पुन्हा भारताकडून खेळण्याची संधी मिळणार नाही ह्याची कल्पना ही त्याला होती. शेवटी त्याने ऑस्ट्रेलियाला संघासोबत जाण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियात पोहचत नाही तोच आपले वडील आपल्याला भारताकडून खेळताना कधी बघू शकणार नसल्याची वार्ता त्याला मिळाली. कोरोनामुळे दोन्ही देशात असलेल्या कडक विलग्नवास च्या कायद्यांमुळे त्याला घरी येऊन आपल्या वडिलांच अंतिम दर्शन घेणं ही शक्य नव्हतं. मेलबर्न टेस्ट साठी मोहम्मद सिराज ची वर्णी भारतीय संघात लागली. मेलबर्न मैदानावर खेळ चालू होण्याआधी राष्ट्रगीताची धून सुरु झाली आणि मोहम्मद सिराज च्या डोळ्यातून अश्रू वहायला लागले. 

मोहम्मद सिराज च्या डोळ्यातून निघणाऱ्या त्या अश्रूंची कल्पना फारच थोड्या लोकांना होती. हैद्राबाद च्या गल्ल्यांमध्ये रिक्षा चालवणाऱ्या मोहम्मद घौस ह्यांनी कठीण परिस्थितीतून आपल्या मुलाचं क्रिकेट च वेड जोपासलं होतं. एक ना एक दिवस आपला मुलगा भारतासाठी खेळेल असं एक स्वप्न त्यांनी बघितलं होतं. जेव्हा मोहम्मद सिराज ची निवड ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या संघात झाली तेव्हा ते स्वप्न प्रत्यक्षात येईल अशी आशा त्यांच्या मनात होती पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं भारत- ऑस्ट्रेलिया सिरीज चालू होण्याआधी २० नोव्हेंबर ला त्यांचं निधन झालं. आपल्या वडिलांच स्वप्न अधुरं राहिल्याची खंत मोहम्मद सिराज च्या मनात होती. त्या दिवशी जेव्हा मेलबर्न च्या मैदानात भारताच्या राष्ट्रगीताची धून वाजली तेव्हा मोहम्मद सिराज च्या मनात साठलेलं अश्रूंच्या रूपाने बाहेर पडलं. 

आपल्या वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी मोहम्मद सिराज ना प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीकडे लक्ष दिलं ना एक मुसलमान, एक भारतीय म्हणून केलेल्या वर्णद्वेषी टीकेमुळे त्याने आपलं संतुलन ढळू दिलं. माजोरड्या ऑस्ट्रेलियाला त्यांना समजेल अश्या भाषेत उत्तर द्यायचं असेल तर त्यांना असलेला माज आपल्या कामगिरीने मोडायला हवा हे त्याला पक्क ठाऊक होतं. त्यामुळे कुठेही लक्ष न देता तो चेंडू टाकत राहिला. आपला टप्पा आणि रेषा ह्यावर मेहनत करत राहिला. आज भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत लोळवण्याची जी ऐतिहासिक कामगिरी गेली त्यातील सिंहाचा वाटा ५ बळी घेणाऱ्या मोहम्मद सिराज चा आहे. संपूर्ण सिरीज मध्ये तब्बल १३ कसोटी बळी घेऊन भारतातर्फे सर्वाधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. मोहम्मद सिराज ने आपल्या कामगिरीने वडिलांना दिलेली श्रद्धांजली संपूर्ण भारताला आणि भारतीयांना खूप काही शिकवणारी आणि खूप प्रेरणा देणारी आहे.     

 Take a bow ..... मोहम्मद सिराज. 

विविधतेत एकता असणाऱ्या भारताची शान आज तू आपल्या कामगिरीने खूप उंचावली आहेस त्यासाठी तुझ खूप खूप अभिनंदन आणि पुढल्या प्रवासासाठी शुभेच्छा. 

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Tuesday 12 January 2021

एका 'कृष्ण-सुदाम्या'ची गोष्ट... विनीत वर्तक ©

 एका 'कृष्ण-सुदाम्या'ची गोष्ट... विनीत वर्तक ©

आपल्या देशातील अशी अनेक रत्नं इतिहासाच्या पानात अशी लुप्त झाली, की त्यांचं आयुष्य आणि त्यांनी गाजवलेला पराक्रम नुसता वाचला, तरी आपल्या अंगावर मूठभर मांस चढेल. ही गोष्ट आहे अश्याच एका इतिहासाच्या पानात लुप्त झालेल्या 'सुदामाची', ज्यांच्यामुळे हजारो भारतीय सैनिकांचे प्राण वाचले. ज्यांनी १९६५ आणि १९७१ च्या युद्धात भागही न घेता भारताच्या सैन्याला एकहाती विजयश्री मिळवून दिली होती. भारताचे सर्वांत पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी खुद्द हेलिकॉप्टर पाठवून त्यांच्यासोबत एकत्र भोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सॅम माणेकशॉ या सुदामाला विसरले नव्हते. सतत त्याचं नाव घेत होते. जे ऐकून खुद्द त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर बुचकळ्यात पडले होते, की कोण आहे हा सुदामा? ज्यांच्या पराक्रमासाठी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने आपल्या पोस्टचं नामकरण त्यांच्या नावावरून केलं होतं. भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांचा विशेष सन्मान केला होता. भारतीय सेना, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स , पोलीस ज्याच्या कार्यापुढे नतमस्तक होते, तो सुदामा कोण होता? असं काय शौर्य गाजवलं होतं त्याने, की ज्यामुळे संपूर्ण भारतीय सेना ते  फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ त्याचे फॅन होते? 

त्या 'सुदामा'चं पूर्ण नाव 'रणछोरदास पगी' असं होतं. त्यांचा जन्म गुजरात राज्याच्या बनासकांठा जिल्ह्यातील वसरडा गावी झाला. रणछोरदास पगी यांचं संपूर्ण आयुष्य गुराखी बनून कच्छच्या रणात गेलं होतं. आयुष्यभर गुरांना चारा खाऊ घालताना रणछोरदास पगी यांनी निसर्गाला आपलंसं केलं होतं. या प्रदेशातील कोपरा न कोपरा त्यांना माहीत होता. पण त्यापलीकडेही अशिक्षित असूनसुद्धा त्यांनी अनुभवातून एक विलक्षण शिक्षण घेतलं होतं, ते म्हणजे गुरांच्या पावलांच्या मातीत उमटलेल्या ठश्यांवरून ते कुठे हरवले आहे, कोणत्या दिशेला गेलं आहे, त्याशिवाय कोणतं जनावर हरवलं आहे ह्याची माहिती अचूक सांगण्याचं. १९६५ साल उजाडलं, भारत-पाकिस्तान युद्धाचे बिगुल वाजले. ऑगस्ट महिन्यात पाकिस्तान कच्छच्या रणातून भारतावर आक्रमण करण्याचे मनसुबे रचत होता. भारतीय सैन्याला पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्यातरी गुप्तहेराची गरज होती, जो पाकिस्तानी सैन्याच्या नजरेत न येता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू शकेल. 

रणछोरदास पगी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली. गुरांसोबत जाताना त्यांच्या पाठीवर बसून रणछोरदास पगी सीमेपलीकडे फक्त नजरेने मातीत उमटलेल्या खुणांचा अभ्यास करत असत. त्यांचा अभ्यास इतका विलक्षण होता, की नुसत्या खुणांवरून पाकिस्तानी सैन्य तिकडून गेलं आहे का? गेलं तर किती संख्येने ते होते? त्यांच्यासोबत दारुगोळा, तोफा होत्या का? जाताना ते बसले होते का? किती वेळापूर्वी ते त्या ठिकाणावरून गेले होते? कोणत्या दिशेला गेले आहेत याची बित्तंबातमी रणछोरदास पगी यांनी भारतीय सैन्याला दिली. त्यांच्या या माहितीमुळे पाकिस्तानी सेनेच्या प्रत्येक चालीची माहिती भारतीय सेनेला मिळाली. एकदा तर तब्बल १२०० पाकिस्तानी सैनिकांची माहिती रणछोरदास पगी यांनी भारतीय सेनेला दिली. त्यामुळे पाकिस्तानी सेनेचा खूप मोठा कट उधळला गेला. याच युद्धात भारताने सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाची विद्याकोट पोस्ट गमावली. १०० भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती ही पोस्ट वाचवण्यासाठी दिली, पण तरीही पाकिस्तानने त्यावर आपला हक्क प्रस्थापित केला. कसंही करून ही पोस्ट पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी भारताने १०,००० सैनिक या पोस्टकडे रवाना केले. पण पाकिस्तानची रसद येण्याअगोदर त्यांना तिकडे पोहोचणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा भारतीय सेनेला सगळ्यात भरवशाच्या रणछोरदास पगी यांची आठवण झाली. रणछोरदास पगी यांनी अवघ्या ३ दिवसात तब्बल १०,००० सैनिकांना शॉर्टकट रस्त्याने त्या पोस्टवर पोहोचवलं आणि पाकिस्तानची रसद येण्याअगोदर भारतीय सैनिकांनी त्या पोस्टवर पुन्हा एकदा तिरंगा फडकवला. 

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातसुद्धा रणछोरदास पगी यांनी पुन्हा एकदा मोलाची भूमिका बजावली. तब्बल एक वर्ष ते पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील नगरपारकर इकडे गुप्तहेर बनून राहून, पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींची बित्तंबातमी भारतीय सैन्याला देत होते. १९७१चं युद्ध संपल्यानंतर त्यांच्या पराक्रमापुढे आणि अद्भुत अश्या अभ्यासापुढे तत्कालीन भारतीय सेनेचे अध्यक्ष फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ प्रभावित झाले. त्यांनी चक्क ढाका इकडे रणछोरदास पगी यांना जेवणाचं निमंत्रण दिलं व तिकडे येण्यासाठी भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरची सोय केली. गुजरातमधून रणछोरदास पगी यांना हेलिकॉप्टरमध्ये बसून हेलिकॉप्टरने उड्डाण भरलं पण आपली एक पिशवी मागे राहिल्याचं रणछोरदास पगी यांच्या लक्षात आलं. त्यांची पिशवी घेण्यासाठी हेलिकॉप्टर पुन्हा एकदा जमिनीवर उतरवलं गेलं. त्या पिशवीत असणाऱ्या दोन ज्वारीच्या भाकऱ्या आणि कांदा घेण्यासाठी भारतीय सेनेनं आपलं हेलिकॉप्टर पुन्हा जमिनीवर उतरवलं होतं. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी रणछोरदास पगी यांना भेटल्यावर आपल्या पदाचा कोणताही गर्व, अभिमान किंवा मोठेपणा न ठेवता त्यांना जेवायला आपल्यासोबतच बसवलं. जेवायला बसल्यावर रणछोरदास पगी यांनी आपल्या त्या पिशवीतून दोन ज्वारीच्या भाकऱ्या आणि कांदा खाण्यासाठी काढला आणि चक्क भारताचे सर्वोच्च अधिकारी फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी अगदी आनंदाने त्या ज्वारीच्या भाकरीचा आणि कांद्याचा आस्वाद रणछोरदास पगी यांच्यासोबत घेतला. रणछोरदास पगी यांनी देशासाठी केलेल्या सेवेसाठी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला, याशिवाय संग्राम मेडल, पोलीस मेडल, समर सेवा स्टार अश्या अनेक पदकांनी त्यांना गौरवण्यात आलं. 

भारतीय सेनेचा सर्वोच्च अधिकारी एका अशिक्षित असणाऱ्या गुराख्याला चक्क भारतीय सेनेचं हेलिकॉप्टर पाठवून, त्याला त्याच्या घरापासून (गुजरात) ते अगदी ढाका, बांगलादेश इकडे बोलावून घेतो, त्याच्यासोबत जेवण करून त्याने केलेल्या अमूल्य कार्याचा, पराक्रमाचा आणि त्याच्यामुळे जीव वाचलेल्या त्या हजारो सैनिकांच्या वतीने त्याचे आभार मानतो, इतकंच नाही तर त्याच्यासोबत आनंदाने त्याने पिशवीत आणलेली कांदा-भाकर खातो. मला वाटतं यासारखं 'कृष्ण-सुदामा'चं  दुसरं कोणतं उदाहरण कलियुगात असू शकत नाही. ही मैत्री तिथवर संपत नाही, तर २००८ साली मृत्यूशय्येवर असतानाही फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या तोंडातून रणछोरदास पगी यांचं नाव निघतं, हे सगळं शब्दांच्या पलीकडचं आहे. रणछोरदास पगी हे वयाच्या ११२ व्या वर्षी २०१३ मध्ये अनंताच्या प्रवासाला निघून गेले. त्याचसोबत फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि रणछोरदास पगी यांचं 'कृष्ण-सुदाम्या'चं नातं इतिहासाच्या पानात लुप्त झालं. 

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि रणछोरदास पगी यांना आणि त्यांच्या मैत्रीला या भारतीयाचा मनापासून सॅल्यूट. सर खंत एकाच गोष्टीची वाटते, की तुमच्या सारख्या माणसांना आम्ही आमच्या आयुष्यात स्थान दिलं नाही. तुमचा इतिहास कधी आम्हाला शिकवला आणि सांगितला गेला नाही, ना आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. युद्धं भले शस्त्रांनी जिंकता येत असतील, पण माणसं जिंकायला 'कृष्ण-सुदामा' सारखं काळीज असावं लागतं. धन्य ते लोक ज्यांना तुमचा सहवास लाभला. तुम्ही होतात म्हणून आज भारत अखंड आहे. रणछोरदास पगी तुम्हाला ह्या भारतीयाचा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!! 

फोटो स्त्रोत :- गुगल    

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday 10 January 2021

'द डॉक्टर्स'... विनीत वर्तक ©

 'द डॉक्टर्स'... विनीत वर्तक ©

डॉक्टर लोकांच्या आयुष्याबद्दल मला कुतूहल वाटत आलेलं आहे.  कोणताही डॉक्टर शेवटी मनुष्य असतो आणि त्यालाही भावना असतात. त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात ही असे अनेक प्रसंग घडलेले असतात अथवा घडत असतात ज्यामुळे मानसिक स्वास्थ सामान्य राहणं हे शक्यच नसते. ह्याशिवाय अनेकदा केलेलं निदान बरोबर असेल असं नाही त्यावेळेस एक चूक ही जीवन आणि मरण ह्यातल कारण बनू शकते. अशीच एखादी चूक जर कोणत्याही डॉक्टर कडून आपल्या कुटुंबातील व्यक्तीसोबत घडली तर? वैद्यकीय दृष्ट्र्या ती चूक आपण कशी सिद्ध करणार? राग येणं, चिडणं आणि संताप व्यक्त हा एक भाग झाला पण आपलं तारतम्य न गमावता जर डॉक्टर ने स्वतःहून ती स्वीकारणं हे हवं असेल तर आपल्याला वैद्यकीय दृष्ट्र्या तितकच ज्ञान असणं गरजेचं आहे. ते ज्ञान घेऊन समोरच्या डॉक्टर ला आपल्या चुकीची जाणीव करून देणारा प्रवास म्हणजेच 'द डॉक्टर्स'.

कोरीयन मालिका माझ्या अतिशय जवळच्या आहेत. भावनांच मिश्रण, त्यांच सादरीकरण, त्यातलं तारतम्य आणि एकूणच त्याच पडद्यावर केलेलं चित्रण ह्या सगळ्याच बाबतीत कोरीयन मालिका आपल्यापेक्षा खूप खूप पुढे आहेत. 'द डॉक्टर्स' अश्याच सगळ्या भावनांचा एक अतिशय सुंदर मिलाफ आणि प्रवास आहे. एका डॉक्टर च्या चुकीमुळे आपल्या आजीला गमावलेली एक उनाड मुलगी जेव्हा त्या डॉक्टरच्या हातून चूक झाली आहे हे सिद्ध करण्यासाठी स्वतः डॉक्टर बनून जेव्हा त्याच इस्पितळात त्याच्याच हाताखाली काम करते तेव्हा लहानपणी च्या त्या बदला घेण्याच्या भावनांचा प्रवास तिला एका वेगळ्या वाटेवर नेऊन सोडतो. त्या संपूर्ण प्रवासात अनेक गमावलेली माणसे, त्यांचे टक्के टोमणे ते अगदी तिच्यावर लादलेल्या गोष्टी सगळच कुठेतरी आत कोंडलेल असते. ह्याच वेळी तिची गाठ अश्या एका डॉक्टर शी पडते जो तिला सावरतो पण त्याचवेळी तिला तिचे निर्णय घेण्याचं आणि वाट निवडण्याचं स्वातंत्र्य देतो. तो उभा राहतो एक मार्गदर्शक, एक शिक्षक आणि एक मित्र बनून. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं तरी प्रेमाचा आडोसा घेऊन तिला कमजोर नाही बनवत तर आपल्या प्रेमाने तिला योग्य त्या दिशेने विचार करण्याची दृष्टी देतो. 

आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याच्या नादात आपण काय गमावतो ह्याचा अंदाज आपल्याला येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. बदला घेतल्याने आपण नक्की काय मिळवणार आहोत? ह्याची उत्तर जर आधी मिळाली तर आपण एक पायरी खाली नाही उतरत तर एक पायरी वर जातो आणि त्या वेळेला मिळणार समाधान हे त्या बदल्यापेक्षा जास्ती सुखावणारे असते. आपल्या प्रवासात आपल्याला अनेक मित्र-मैत्रिणी भेटतात. काही घट्ट नाती तयार होतात तर काही तुटत जातात. आपण त्यांना कस हाताळतो ह्यावर समोरचा काय प्रतिक्रिया देणार हे ठरलेलं असते आणि ह्या सगळ्या भावनांच एकत्रित मिश्रण म्हणजे 'द डॉक्टर्स'. ही मालिका इतकी सुंदर आहे की अगदी केलेला द्वेष, आलेला राग, चीड, संताप आणि अगदी दुसऱ्यासाठी मनात निर्माण झालेली कटुतेची भावना पण तितक्याच सुंदरतेने आपल्या समोर येते. द्वेष, मत्सर, राग, चीड ह्या सारख्या भावना खरे तर आपल्याला त्रास देणाऱ्या असायला हव्यात पण ज्या सुंदर पद्धतीने ह्यात चित्रित केल्या गेल्या आहेत त्याला तोड नाही. एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना ज्या तरलतेने फक्त डोळ्यांनी एकमेकांना कळतात तेव्हा अभिनयाचा कस लागतो. त्यात ही मालिका १००% यशस्वी झाली आहे. पावसाचे ओथंबणारे थेंब, मंद वारा आणि भिजणारे ते दोघे जेव्हा स्पर्श करतात तेव्हा प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज लागत नाही. 

कोणतीही मालिका ज्या मध्यवर्ती विषयाला धरून असते तो विषय निसटू न देणं हे महत्वाचं असते आणि त्यातही 'द डॉक्टर्स' खूप सुंदर पद्धतीने गुंफली आहे. एका डॉक्टर च्या आयुष्यात येणारे सगळेच क्षण मग ते आपत्कालीन प्रसंग असो, नातेवाईकांचा तऱ्हेवाईकपणा असो, इस्पितळातील राजकारण असो किंवा सहकाऱ्यांच शोषण आणि त्यांचा मत्सर असो आणि तश्या परिस्थितीत स्वतःला सिद्ध करताना होणारी दमछाक असो. सगळेच त्या मध्यवर्ती विषयाच्या भोवती केंद्रित आहे. त्यामुळेच 'द डॉक्टर्स' आत कुठेतरी मुरते. अगदी शेवटच्या भागापर्यंत कोणताही प्रसंग अतिशयोक्ती वाटत नाही. इकडेच मला वाटते कुठेतरी आपल्या इकडे मालिका बनवणार्यांना शिकण्याची गरज आहे. कारण आपल्या इकडे मराठी मालिका असो वा हिंदी चित्रपट सगळच बटबटीत करून दाखवले जाते. कोणाला तरी अगदीच असहाय दाखवायचे आणि दुसरा मोठ्या चातुर्याने त्याला मूर्ख बनवतो आहे ह्याच उदात्तीकरण करायचे हाच जवळपास सगळ्या मालिका आणि चित्रपटांचा सूर असतो. पण चुकीच्या भावना सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने दाखवता येऊ शकतात. त्याच उदात्तीकरण न करता सुद्धा त्याचा योग्य तो परीणाम साधला जाऊ शकतो हे 'द डॉक्टर्स' मध्ये आपण नक्कीच शिकू शकतो. 

'द डॉक्टर्स' ही अवघी २० भागांची मालिका आहे. त्यामुळेच कुठेच कंटाळवाणी होत नाही. ह्यातलं कोणतच पात्र अनावश्यक वाटत नाही. पात्र उलगडायला आणि त्याचा शेवट करायला कधी जास्ती वेळ घेतलेला नाही. त्यामुळेच जेव्हा मालिका मुरते आहे आणि संपू नये असं वाटते तेव्हा ती संपते आणि आपण त्या सगळ्या पात्रांशी जोडलेले राहतो ते कायमचे. 'द डॉक्टर्स' सारख्या मालिका नेहमीच आपल्याला खूप काही देऊन जातात असं मला वाटते. मग ती नितळ प्रेमाच्या भावनेची अनुभूती असो, महत्वाकांक्षा असो किंवा मनात उत्पन्न होणाऱ्या द्वेष, मत्सर, चीड, संताप ह्या सर्व भावनांना कश्या पद्धतीने हाताळायचं असो. रोज उठून त्याच सासू-सुना, हिंसक, बिभत्स आणि अश्लील मालिकांपेक्षा ही मालिका खूप वरची आहे. 'द डॉक्टर्स' माझ्या सगळ्यात आवडत्या मालिकांपैकी एक आहे आणि मी पुन्हा सर्व २० भाग बघू शकेन इतकी सुंदर आहे.      

फोटो स्रोत :- गुगल    

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



एअर सोल मोईने पोर्टे... विनीत वर्तक ©

एअर सोल मोईने पोर्टे... विनीत वर्तक ©

एअर सोल मोईने पोर्टे हे नाव वाचायला वेगळं वाटेल ह्याचा अर्थ होतो Air-Sol Moyenne Portée (ASMP) हे एक आकाशातून जमिनीवर मारा करणारं एक आण्विक क्षेपणास्त्र आहे. ह्या क्षेपणास्त्राची निर्मिती फ्रांस ने केली आहे. हे क्षेपणास्त्र कोणत्याही आण्विक हल्याआधी शत्रूला आम्ही काय करू शकतो ह्याचा ट्रेलर दाखवण्यासाठी बनवलं गेलं आहे. ह्याची निर्मिती MBDA ह्या युरोप मधील कंपनी ने केली आहे. ह्या क्षेपणास्त्राची एक चाचणी ९ डिसेंबर २०२० रोजी फ्रांस ने राफेल ह्या अत्याधुनिक लढाऊ विमानातून केली. त्यामुळेच एअर सोल मोईने पोर्टे हे नाव भारतासाठी अतिशय महत्वाचं झालं आहे. तर ह्या चाचणीमुळे तुर्की, चीनसह पाकिस्तान चे धाबे दणाणले आहेत. तर नक्की काय आहे हे 'एअर सोल मोईने पोर्टे'?  

एअर सोल मोईने पोर्टे हे एक आण्विक क्षेपणास्त्र असून राफेल सारख्या अत्याधुनिक विमानातून डागता येऊ शकते. संपूर्ण युरोपात राफेल एकमेव असं लढाऊ विमान आहे जे अश्या पद्धतीचं क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम आहे. Air-Sol Moyenne Portée-Amélioré ASMP-A हे ह्याच नवीन व्हर्जन असून जी चाचणी डिसेंबर महिन्यात केली गेली ती ह्या क्षेपणास्त्राची होती. हे क्षेपणास्त्र ५.३८ मीटर लांब असून ह्याच वजन ८६० किलोग्रॅम आहे. ह्याची क्षमता ३०० किलोमीटर लांब असलेल्या लक्ष्यावर निशाणा साधण्याची असून हे आण्विक क्षेपणास्त्र जवळपास ३०० किलोटन TNA (Airborne nuclear warhead) स्फोट करू शकते. (३०० किलोटन स्फोट हा साधारण ६०० मिलियन पाउंड वजनाचं डायनामाईट एकाचवेळी फुटण्यासारखं आहे. ३०० ट्रिलियन कॅलरी इतकी ऊर्जा एका सेकंदाच्या मिलियन इतक्या भागात निर्माण करते. हिरोशिमा वर टाकलेला बॉम्ब हा फक्त १५ किलोटन चा होता. ह्यावरून हे क्षेपणास्त्र काय विध्वंस करू शकते ह्याचा अंदाज आपण लावू शकतो.) हे क्षेपणास्त्र हवेतून ३ मॅक वेगाने प्रवास करते. (३ मॅक म्हणजे ध्वनीपेक्षा ३ पट वेगाने) त्यामुळे ह्याला निष्प्रभ करणं जवळपास अशक्य आहे. 

ह्याच अजून एक नवीन व्हर्जन फ्रांस विकसित करत असून त्याच नाव ASN4G (air-sol nucléaire de 4e génération) असं आहे. २०२१ मध्ये ह्याच परीक्षण फ्रांस करणार असून ह्याची क्षमता तब्बल १००० किलोमीटर पर्यंत मारा करण्याची असणार आहे तसेच हवेतून तब्बल ८ मॅक वेगाने ते जाण्यास सक्षम असणार आहे. हे क्षेपणास्त्र राफेलसाठी तयार केलं जात आहे. राफेल अश्या प्रकारचं आण्विक - हायपरसॉनिक क्षेपणास्त्र डागणारं एकमेव लढाऊ विमान असणार आहे. ह्याला निष्प्रभ करणं तर खूप लांब ह्याला ओळखणं हीच मोठी डोकेदुखी जगातल्या सगळ्या एअर डिफेन्स प्रणालींपुढे असणार आहे. 

एअर सोल मोईने पोर्टे बद्दल इतकं सगळं सांगण्याचं कारण की फ्रांस हे क्षेपणास्त्र भारताला देऊ शकतो. भारताने ह्या आधी मागणी केलेल्या ३६ राफेल लढाऊ विमानाचं उत्पादन सध्या वेगाने सुरु असून अजून राफेल घेण्यासाठी आणि एकूणच भारत- फ्रांस संबंध वृद्धिगंत करण्यासाठी गेल्या आठवड्यात फ्रांस च्या राष्ट्रपतींचे वाणिज्य सल्लागार इम्यॅन्युअल बोने ह्यांनी भारताच्या पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ह्यांची भेट घेऊन भारत- फ्रांस संबंध बळकट करण्याच्या दृष्टीने अजून कोणत्या क्षेत्रावर भर दिला जाऊ शकतो ह्याची चर्चा केली. ३६ विमानांचा करार झाल्यावर भारताने अजून ३६ विमानांचा करार करण्याचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. ह्या अजून ३६ राफेल लढाऊ विमानांचा करार जर भारत फ्रांस ह्यामध्ये झाला तर त्यात 'एअर सोल मोईने पोर्टे' महत्वाची भूमिका निभावणार आहे. एअर सोल मोईने पोर्टे च कोणतच उत्तर भारताच्या दोन्ही शत्रूंकडे म्हणजेच चीन आणि पाकिस्तान ह्याकडे नाही आहे. एअर सोल मोईने पोर्टे सारखं तंत्रज्ञान जर राफेल वर आलं तर भारताच्या वायू सेनेची ताकद कित्येक पट वाढणार आहे. 

जय हिंद!!!

तळटीप :- कोणताही आण्विक हल्ला हा विध्वंस करतो आणि ज्याचे दूरगामी परीणाम सजीवसृष्टीवर होतात. त्यामुळे आण्विक हल्ला हा समर्थनीय नसला तरी भारताला आपल्या सुरक्षिततेसाठी अश्या पद्धतीच्या क्षेपणास्त्राची गरज आहे. ह्या पोस्ट चा उद्देश आण्विक हल्याच समर्थन करण नसून भारताच्या सुरक्षिततेसाठी काय महत्वाचं आहे ते अधोरेखित करण्याचा आहे. 

फोटो स्रोत :- गुगल ( फोटो मध्ये लाल वर्तुळ केलेलं क्षेपणास्त्र हे एअर सोल मोईने पोर्टे (ASMP) आहे. 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   







Saturday 9 January 2021

ही भारतीय सेना आहे... विनीत वर्तक ©

 ही भारतीय सेना आहे... विनीत वर्तक ©

६ जानेवारी २०२१ चा दिवस. आदल्या दिवशी काश्मीर मध्ये खूप बर्फवृष्टी झाली होती. पेठावदार भाग, हंदवारा, उत्तर काश्मीर मध्ये असणाऱ्या निमा बानो ला प्रसूती वेदनांचा त्रास होऊ लागला. १ किलोमीटरवर असलेल्या प्राथमिक केंद्रात जाण्याचे सगळेच पर्याय बर्फवृष्टीमुळे बंद झाले होते. घरातल्या लोकांना काय करावं समजत नव्हतं. कारण जसजसा वेळ जात होता तसतशी तिची प्रकृती खालावत जात होती. निमा बानो च्या वडिलांना अल्लाच्या प्रार्थनेनंतर एकच पर्याय समोर दिसत होता तो म्हणजे 'भारतीय सेना'. 

गुलाम मोह.मीर ह्यांनी भारतीय सेनेचे त्या भागातील चीफ ऑफ बोट (COB) बनावडार ह्यांना फोन लावला आणि त्यांच्या मुलीच्या परिस्थितीची कल्पना दिली. भारतीय सेना आम्हाला काही मदत शकते का? अशी विनंती केली. देशाच्या कोणत्याही नागरिकाची जात, पात, धर्म, उच्च- नीच, श्रीमंत-गरीब असा कोणताही भेदभाव न करता नेहमी तयार असणारी भारतीय सेना ह्या भारतीयाच्या मदतीला धावून नाही अली तर नवलच. चीफ ऑफ बोट (COB) बनावडार ह्यांनी आपल्या सैनिकांना निमा बानो ला सर्वोतपरी मदत करण्याचे आदेश दिले. 

रस्त्यावर गुडघ्यापेक्षा जास्ती बर्फवृष्टी झालेली होती. अश्या अवस्थेत निमा बानो ला प्राथमिक केंद्रात नेणं अशक्य होतं. पण अशक्य हा शब्द भारतीय सेनेच्या शब्दकोशात नाही. गुडघ्याभर बर्फातून आपली बंदूक सांभाळत निमा बानो ला स्ट्रेचर वर व्यवस्थित ठेवत आपल्या खांद्यावर तिला घेत भारतीय सैनिकांनी  आपल्या लक्ष्याकडे कूच केलं. १ किलोमीटर गुडघ्याभर बर्फातून रस्ता काढत प्राथमिक केंद्रावर तिला तपासलं गेलं. तिची अवस्था बघता तिला पुढल्या उपचारासाठी जवळच्या इस्पितळात नेणं गरजेचं होतं. पण तिथे नेण्यासाठी लागणारी ऍम्ब्युलन्स ही त्या केंद्रापासून ३ किलोमीटर लांब होती. कारण सगळेच रस्ते बंद झाले होते. 

पुन्हा एकदा भारतीय सेनेच्या जवानांनी निमा बानो ला आपल्या खांद्यावर उचलत गुडघ्याभर बर्फातून प्रवास सुरु केला. तब्बल ३ किलोमीटरच अंतर कापत तिला इस्पितळात नेण्यात आलं. काही तासांनी निमा बानो ने एका सुंदर बाळाला जन्म दिला. आई आणि जन्माला आलेलं ते बाळ सुखरूपपणे आपल्या घरी पोहचलं. भारतीय सेनेच्या शूरवीर सैनिकांमुळे निमा बानो च आयुष्य वाचलं आणि एका नवीन जिवाने ह्या विश्वात प्रवेश केला. 

प्रत्येक भारतीयाच्या मदतीसाठी सदैव तयार असणाऱ्या भारतीय सेनेला माझा साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!! 

फोटो स्रोत :- गुगल    

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Thursday 7 January 2021

एका 'लसी'ची गोष्ट... विनीत वर्तक ©

 एका 'लसी'ची गोष्ट... विनीत वर्तक ©

३१ डिसेंबर, २०१९ चा दिवस होता. जगातील बहुतेक व्यवहार सुरळीत सुरु होते. त्याचवेळी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्लू.एच.ओ.च्या चीनमधील कार्यालयात एका बातमीने खळबळ उडाली होती. चीनच्या अधिकाऱ्यांनी एका नवीन विषाणू चा इशारा डब्लू.एच.ओ.ला दिला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डिसेंबर २०१९ मधेच या विषाणूबद्दल कल्पना चीनच्या आरोग्यखात्याला आली होती. त्याचं नाव SARS-CoV-2 असं ठेवण्यात आलं, पण त्याचं स्वरूप समजायला किंवा निदान जगाला सांगायला त्यांनी खूप उशीर केला होता. बघता बघता जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात कोरोना-१९ ने आपले हातपाय पसरले आणि संपूर्ण मानवजातीला त्याने लॉकडाऊन केलं. कोरोनाचा प्रसार ज्या वेगाने होत होता,  त्यामुळे जगाची संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडली. त्याचा प्रसार रोखण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी मानवजातीला एका लसीची गरज होती पण ती कधी येईल? किती यशस्वी होईल? लस आल्यावर पृथ्वीवरील प्रत्येकाला कशी देता येईल? असे सगळेच प्रश्न जगासाठी अनुत्तरित होते.

जेव्हा जग कोरोनाच्या उत्तरासाठी चाचपडत होतं, तेव्हा महाराष्ट्रातील पुण्यामध्ये असणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्रयोगशाळेत जगाची गरज भागवणाऱ्या लसी तयार होत होत्या. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लस बनवणारी जगातील सगळ्यात मोठी प्रयोगशाळा आणि कंपनी आहे. वर्षाकाठी तब्बल १.५ बिलियन लस इकडे प्रत्येक वर्षी तयार केल्या जातात आणि जगातील १७० देशांमध्ये प्राणघातक रोगांपासून मानवाचे प्राण वाचवण्यासाठी तिथल्या लोकांना टोचल्या जातात. जगातील ६५% बालकांना भारताच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनवलेल्या लसीमधून जीवनदान दिले जाते, ज्यात बी.सी.जी., टिटॅनस, हिपेटायटीस, रुबेला सारख्या रोगांवरील लसींचा समावेश आहे.  १९६७ मध्ये टिटॅनसच्या लसीपासून सुरु झालेला प्रवास आज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, युनिसेफ सारख्या जागतिक संघटनांना जगातील प्रत्येक व्यक्ती आणि बालकापर्यंत वैद्यकीय सेवा पोहचवण्यात महत्वाचा दुवा ठरत आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत स्वस्त आणि त्याचवेळी उत्तम दर्जा राखत लसी पोहचवण्याच्या सिरमच्या कार्याचं कौतुक संपूर्ण जगाने केलं आहे.

कोरोनावर लसीचे संशोधन सुरु असताना, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना पुढल्या काही महिन्यांत काय होणार आहे, याचा अंदाज आला होता. ज्या पद्धतीने जग कोरोनाच्या विषाणूपुढे होरपळले जात होते, त्यावेळेस कोरोनाची जर लस आली तर जगाच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचवण्यासाठी जगातील सर्व प्रयोगशाळा आणि लस बनवणाऱ्या कंपन्या अपुऱ्या पडणार हे नक्की होतं. याचसाठी जगातील लसींच्या बाजारामधील ५०% पेक्षा जास्त हिस्सा असणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला आपल्या कार्यक्षमतेत प्रचंड वाढ करावी लागणार होती. प्रत्येक वर्षी निर्माण होणाऱ्या १.५ बिलियन लसीसुद्धा जगासाठी कमी पडणार होत्या. एकट्या भारताची लोकसंख्या १.३ बिलियन पेक्षा जास्ती आहे, त्यामुळे जगाची लसीची गरज भागवण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला आपल्या कार्यक्षमतेत वाढ करण्याची गरज त्यांनी ओळखली. 'सिरम'चा प्रवास हा एका कुटुंबाभोवती झालेला आहे. याचे काही फायदे असले, तरी काही तोटेही आहेत. उद्योग वाढवण्यासाठी  'सिरम'ची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अदार पूनावाला यांनी एप्रिल २०२० मध्ये तब्बल ३६६ मिलियन अमेरिकन डॉलर स्वतःची गुंतवणूक केली, आणि ४०० मिलियन अमेरिकन डॉलरची आर्थिक मदत सेवाभावी कार्य करणाऱ्या मेलिंडा-गेट्स फौंडेशनने त्यांना केली. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या कार्यक्षमतेत १ बिलियन वार्षिक लसींची भर घालत, तब्बल २.५ बिलियन लस प्रत्येक वर्षी बनवू शकतो इतकी केली.

ज्या वेळेस कोरोनावर लस येईल का? आली तर कितपत यशस्वी होईल? त्या लसीला देशांची आणि जागतिक मान्यता मिळेल का? अशी सगळी अनिश्चितता असताना अदार पूनावाला यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या ऍस्ट्राझेनेका टीमसोबत त्यांच्या लसीचे १ बिलियन डोस बनवण्याचा शब्द दिला. त्याचसोबत नोव्हाव्हॅक्स, स्पायबायोटेक, कोडाजेनिक्स सारख्या इतर संशोधनाच्या टीम सोबत करार केले. सप्टेंबर २०२० येईपर्यंत ऍस्ट्राझेनेका लसीची युरोपात पहिल्या चरणाची प्रक्रिया सुरु झाली. इकडे अदार पूनावाला यांनी येणाऱ्या परिणामांची वाट न पाहता भारतात ऍस्ट्राझेनेकाच्या लसीचे प्रचंड प्रमाणात उत्पादन सुरु केले. लस यशस्वी कितपत होईल, आणि झाली तरी तिला वापरण्यासाठीची मुभा कितपत मिळेल याची ३०% शाश्वती नसताना अदार पूनावाला आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी एक जुगार खेळला. डिसेंबर उजाडेपर्यंत त्यांनी जवळपास ऍस्ट्राझेनेका लसीचे जवळपास ५ कोटी डोस तयार केले होते. लस यशस्वी होईल, किंवा तिला मान्यता मिळेल की नाही याची कोणतीही शक्यता माहीत नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी लसीचं उत्पादन करून ठेवलं होतं.

३ जानेवारी, २०२१ ला Drug Controller General of India (DCGI) ने कोरोना लसीला मान्यता दिली. अदार पूनावाला आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्रयोगशाळेत ऍस्ट्राझेनेकाच्या ५०० लसी प्रत्येक मिनिटाला तयार होत आहेत. भारतासोबत जगातील ६७ देशात ऍस्ट्राझेनेकाच्या या लसी कोरोनाविरुद्धच्या लढाईत निर्णायक भूमिका निभावणार आहेत. जगातील तब्बल ७.५ बिलियन लोकांपर्यंत कोरोनाची लस पोहोचवण्याचं अदार पूनावाला यांचं स्वप्न आहे. ते साकार करण्यासाठी ऍस्ट्राझेनेकासोबत इतर अनेक लसीसुद्धा ते निर्माण करणार असून, कोरोनाची ही लस सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची किंमतही अवघी ३ अमेरिकन डॉलर इतकीच ठेवली जाणार आहे, जी जेमतेम त्याच्या उत्पादन शुल्काइतकीच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर लसींचं उत्पादनही त्यांनी बंद केलं आहे, ज्याच्या विक्रीने कित्येक डॉलरचा फायदा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला झाला असता. पण जगातील लोकांचं आयुष्य वाचवण्यासाठी त्यांनी कोरोनाच्या लसीला प्राधान्य दिलं आहे.

आज सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या हडपसर, पुणे इथल्या प्रयोगशाळेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. कारण भारताच्या औषधांच्या बाबतीत शीर्ष असलेल्या डी.सी.जी.आय.ने त्यांच्या 'कोव्हीशील्ड'ला मान्यता दिल्यानंतर आता या लसीचा मार्ग मोकळा झाला आहे. नक्कीच आज प्रत्येक भारतीयापर्यंत ही लस पोहोचवणे हे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि अदार पूनावाला यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचसोबत त्यांना या लसीचा फायदा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं शिवधनुष्यही त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पेलायचे आहे. या सगळ्यात पुन्हा एकदा ते यशस्वी होतील याची मला खात्री आहे.

आज लसीच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात भारताचं नाव मोठं करणाऱ्या 'सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' आणि अदार पूनावाला यांना कडक सॅल्यूट आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday 3 January 2021

राफेल की जे.एफ. १७... विनीत वर्तक ©

 राफेल की जे.एफ. १७... विनीत वर्तक ©

पाकिस्तान ने जे. एफ. १७ च्या ब्लॉक ३ मधील लढाऊ विमानांची निर्मिती करण्याची घोषणा नुकतीच केली. ह्या निमित्ताने पाकिस्तान च्या सो कॉल्ड शिकलेल्या अभियंत्यांनी पाकिस्तानी जनतेला आपलं लढाऊ विमान राफेल ला कसं टक्कर देऊ शकते ह्याच्या दर्पोक्त्या मारल्या आहेत. अर्थात ह्या गोष्टी ऐकून भारतातल्या घरभेदी शत्रुंना तोंडसुख घेण्याची एक संधी मिळाली आहे. पाकिस्तान आणि त्यांचे चमचे उर फुटून बोंबलत असले तरी जग ह्या दोन लढाऊ विमानाबद्दल काय म्हणते ते जास्ती महत्वाचं आहे. कोण श्रेष्ठ आणि कोणतं लढाऊ विमान वरचढ ह्याचे निकष वेगळे असतात. नुसत्या वेगावरून किंवा त्यावर असलेल्या क्षेपणास्त्रामुळे एखादं विमान श्रेष्ठ होत नाही. अनेक पातळ्यांवर दोन्ही विमानांची तुलना केल्यावर त्याचा अंदाज येऊ शकतो. शेवटी त्याला चालवणारे वैमानिक हा एक हुकमाचा एक्का त्याच स्थान डळमळीत किंवा अबाधित ठेवत असतो. 

ह्या दोन्ही विमानांच तुलनात्मक विश्लेषण केलं तर पाकिस्तान चा दावा किती पोकळ आहे हे स्पष्ट होतं. 

जे.एफ. १७ एक मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट आहे तर राफेल एक ओम्नीरोल फायटर एअरक्राफ्ट आहे. मल्टिरोल आणि ओम्नीरोल मध्ये काय फरक आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणजे जे एकावेळेस वेगवेगळी कार्य करू शकते. ज्यात स्ट्राईक, सर्व्हेलन्स आणि एअर सुपिरिएटी अश्या पद्धतीच कार्य अथवा रोल निभावू शकते. तर ओम्नीरोल फायटर एअरक्राफ्ट मल्टिरोल च्या कार्यांच्या सोबत विमानवाहू बोटीवरून उड्डाण भरण्यास आणि त्याचसोबत आण्विक क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम असते. आता लक्षात आलं असेल की राफेल हे जे.एफ.१७ पेक्षा सरस आहे.

जे.एफ.१७ हे सिंगल इंजिन असणारं लढाऊ विमान आहे तर राफेल हे दोन इंजिन असणार लढाऊ विमान आहे.  जे.एफ.१७ चा हवेतील वेग साधारण १९६० किलोमीटर/ तास आहे. राफेल चा हवेतील वेग २२२३ किलोमीटर/ तास आहे. राफेल चा वेग जास्ती असल्यामुळे साहजिक राफेल वेगात पुढे आहे. आधी लिहिलं तसं राफेल मध्ये दोन इंजिन आहेत त्यामुळे साहजिक जास्त वजन घेऊन उड्डाण भरण्याची क्षमता राफेल मध्ये जास्ती आहे. जे.एफ.१७ हे १२.४ टन वजन घेऊन उड्डाण भरू शकते तर राफेल त्याच्या जवळपास दुप्पट २४.५ टन वजन घेऊन उड्डाण भरू शकते. हार्ड पॉईंट हा एक महत्वाचा घटक लढाऊ विमानात बघितला जातो. हार्ड पॉईंट म्हणजे किती ठिकाणी आपण त्या विमानात दारुगोळा अथवा क्षेपणास्त्र ठेवू शकतो. जितके जास्त हार्ड पॉईंट तितकी जास्त क्षेपणास्त्र आणि तितकं जास्त घातक ते विमान. जे.एफ.१७ मध्ये ७ हार्ड पॉईंट आहेत तर राफेल मध्ये १४ हार्ड पॉईंट आहेत. राफेल आपल्या वजनाच्या २.५ पट वजन घेऊन उड्डाण भरण्यास सक्षम आहे. ह्यामुळे राफेल समोर जे.एफ.१७ कुठेच टिकत नाही. 

जे.एफ.१७ ची उड्डाण भरण्याची क्षमता २०३७ किलोमीटर इतकी आहे. ह्याचा अर्थ जे.एफ.१७ उड्डाण भरणाच्या ठिकाणापासून जास्तीत जास्त २०३७ किलोमीटर जाऊ शकते आणि तितकच परतीचं अंतर कापू शकते. त्यानंतर त्याला इंधन भरण्याची गरज लागते. राफेल ची उड्डाण भरण्याची क्षमता ३७०० किलोमीटर आहे. ह्या शिवाय राफेल मध्ये हवेतल्या हवेत इंधन भरता येऊ शकते त्यामुळे राफेल अजून जास्त अंतर कापू शकते. ह्या बाबतीत ही जे.एफ.१७ राफेल ला कुठेच टक्कर देऊ शकत नाही. जे.एफ.१७ च रडार क्रॉस सेक्शन हे ४ वर्ग मीटर आहे. रडार क्रॉस सेक्शन हे जितकं जास्ती तितक्या लवकर लढाऊ विमानाचा सुगावा शत्रू राष्ट्राला लागू शकतो. जे.एफ.१७ च्या तुलनेत राफेल च रडार क्रॉस सेक्शन हे फक्त ०.५ वर्ग मीटर आहे. ह्यामुळेच राफेल जवळपास स्टेल्थ म्हणजे रडार वर अदृश्य असल्या सारखं आहे. राफेल मध्ये असलेली स्पेक्ट्रा सिस्टीम कोणत्याही प्रकारचा रडार सिग्नल ला विरुद्ध दिशेने तयार करू शकते आणि शत्रूला चकमा देऊ शकते. 

जे.एफ.१७ च्या ब्लॉक ३ मध्ये चीन च पी.एल. १५ हे बी. व्ही. आर. क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे. ज्याची मारक क्षमता ३०० किलोमीटर पर्यंत आहे जी की राफेल मध्ये असलेल्या मेटॉर क्षेपणास्त्रापेक्षा जास्ती आहे असं चीन सांगतो. नुसत्या क्षमतेवर पी.एल. १५ श्रेष्ठ आहे हे चुकीचं आहे. पी.एल. १५ च वजन जवळपास ५०० किलोग्रॅम आहे आणि ते रॉकेट मोटार पद्धतीचा वापर करते. ह्या पद्धतीत ह्यातील मोटार एकाचवेळेस इंधनाच ज्वलन करून आपलं लक्ष्य गाठत असते. पण समजा मधल्या रस्त्यात जर त्याला रस्ता बदलायचा असेल तर ह्या क्षेपणास्त्रात ते करण्यासाठी इंधन उरत नाही. ह्याचा सरळ अर्थ आहे की पी.एल.१५ जरी लांब जाऊ शकत असलं तरी मध्ये ते आपला रस्ता बदलू शकत नाही. राफेल मध्ये असलेलं मेटॉर मध्ये रॅमजेट इंजिन बसवलेलं आहे. रॅमजेट इंजिन आपलं सगळं इंधन संपूर्णपणे सुरवातीला वापरत नाही. त्यामुळे मधल्या रस्त्यात जर काही बदल करायचा झाला तर तो करण्यासाठी मेटॉर च्या इंजिनात इंधन उपलब्ध असते. म्हणजे मेटॉर च्या हल्ल्यातून लक्ष्य वाचू शकत नाही. त्यामुळेच मेटॉर जगातील बी.व्ही.आर. श्रेणीतील सर्वोत्तम क्षेपणास्त्र आहे. ज्या दाव्यावर पाकिस्तान जे.एफ.१७ ला राफेल पेक्षा श्रेष्ठ मानतो तो तितकाच पोकळ आहे. 

राफेल मध्ये ह्या शिवाय टलिऑस (TALIOS Multifunctional Targeting Pod), Fighter Sphere Tablet सिस्टीम आहेत. तर राफेल मध्ये CATIA V5 सॉफ्टवेअर आहे. (Computer Aided Three-dimensional Interactive Application) ह्या सगळ्या सिस्टीममुळे राफेल च्या वैमानिकावर अतिशय कमी प्रमाणात ताण असतो. ह्या सगळ्या प्रणालीमुळे वैमानिकाला लक्ष्यभेद आणि विमानाचं नियंत्रण अतिशय सहजतेने हाताळता येते. ह्या शिवाय राफेल ला इराक, सिरीया युद्धाचा अनुभव आहे. ह्या उलट जे.एफ.१७ बाबतीत केलेले सगळे दावे चीन आणि पाकिस्तान ने केलेले आहेत. चीन च्या दाव्याला जगाच्या कोपऱ्यात कोणीच सिरियसली घेत नाही. कारण खोट बोलण्याच्या बाबतीत चीन जगात सगळ्यात पुढे आहे. राफेल च तंत्रज्ञान आणि इंजिन हे फ्रांस निर्मित आहे. तर जे.एफ.१७ तंत्रज्ञान चीन च आहे, इंजिन रशियाने बनवलेलं आहे आणि उत्पादन पाकिस्तान करणार आहे. त्यामुळे ह्या विमानांचा मेन्टनन्स पाकिस्तान पुढली सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे. कारण ही इंजिन जर दुरुस्त करायची असतील तर ती रशिया ला पाठवावी लागणार आहेत. हा सगळा व्याप पाकिस्तान ला डोईजड होणार आहे. 

राफेल ची किंमत जशी जे.एफ.१७ पेक्षा दुप्पट आहे तसेच राफेल जे.एफ.१७ पेक्षा जवळपास २.५ पट सगळ्याच बाबतीत पुढे आहे. त्यामुळे जे.एफ.१७ ची राफेल शी तुलना हास्यास्पद आहे. पण एकच की भारतासाठी ३६ राफेल पुरेशी नाहीत. निदान अजून ३६ राफेल विमानांची गरज भारताला आहे. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



Friday 1 January 2021

खारे वारे मतलई वारे (भाग ६)... विनीत वर्तक ©

 खारे वारे मतलई वारे (भाग ६)... विनीत वर्तक ©

भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अश्या काही गोष्टी होत आहेत, ज्याची कल्पना भारतीयांनी आणि जगाने कधी केली नव्हती. भारताची अनेक राजकीय नेतृत्वं आजवर अनेक देशांना भेटी देत असतात, यात नवल असं काही नाही. भारताचे राजकीय, मैत्रीचे, आर्थिक तसेच व्यापाराचे संबंध वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने अश्या भेटी आजवर होत आलेल्या आहेत. संरक्षण संदर्भात भारताचे संरक्षण मंत्री हे भारताचा चेहरा त्या देशांसमोर असत. संरक्षण संदर्भात होणारे करार आणि शस्त्रांची देवाणघेवाण याबद्दलच्या गोष्टी भारताचे संरक्षण मंत्री मांडत असत, जे की योग्य आहे. पण तिथेही संरक्षण मंत्री हे राजकीय नेतृत्व असल्याने त्याला राजकीय भेट म्हणून बघितलं जात होतं. पण गेल्या काही महिन्यात वारे वेगळ्या दिशेने वाहायला लागले आहेत. भारताचे सैन्य प्रमुख जनरल एम.एम.नरवणे हे सध्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आहेत. गेल्या महिन्यात म्यानमार, नेपाळ नंतर त्यांनी सौदी अरेबिया, यु.ए.ई. चे दौरे केले, तर गेल्या आठवड्यात ते दक्षिण कोरियाच्या ३ दिवसीय दौऱ्यावर जाऊन आले. 

भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारताचे सैन्यप्रमुख हे दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेले होते. ह्या दौऱ्यात त्यांची भेट दक्षिण कोरियाच्या तिन्ही सेनांचे प्रमुख ज्यांना चीफ ऑफ जॉइंट स्टाफ म्हटले जाते, त्या जनरल वोन इन चौल यांच्याशी झाली. त्यांच्या सोबत शस्त्र खरेदी-विक्री संबंधीच्या संस्थेचे प्रमुख गॅंग इन हो आणि त्यांचे संरक्षण मंत्री सुन ऊक यांचीसुद्धा भेट आणि चर्चा झाली आहे. या भेटीत नक्की काय चर्चा झाली, याचा तपशील बाहेर आला नसला, तरी चर्चेचा मूळ उद्देश हा संरक्षण संबंध अजून वृद्धिंगत कसे होऊ शकतील ह्यावर होता. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे, की दक्षिण कोरियाचे सैन्यदल जगात अतिशय प्रगत आणि मजबूत मानले जाते. अमेरिकेसोबत त्यांच्या सैन्याचा नेहमीच युद्ध सराव सुरु असतो. दक्षिण कोरिया भारताचा मित्र असून भारताला संरक्षण क्षेत्रात दक्षिण कोरिया नेहमीच मदत करत आला आहे. दक्षिण कोरियाला उत्तर कोरिया सारखा शत्रू देश शेजारी आहे. त्यामुळे दक्षिण कोरियाची सेना नेहमीच युद्धासाठी सज्ज असते. तसेच साऊथ चायना सी मध्ये चीनच्या वर्चस्व, अरेरावी आणि दादागिरीमुळे दक्षिण कोरिया त्रस्त आहे. त्यामुळेच चीनच्या शत्रूसोबत भारत आपले सैनिकी संबंध अजून मजबूत करत आहे. 

गेल्या आठवड्यात भारताच्या आकाश क्षेपणास्त्राच्या विक्रीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आकाश क्षेपणास्त्र हे जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. जवळपास २.५ मॅक वेगाने ३० किलोमीटरच्या क्षेत्रातील आणि जमिनीपासून ३० किलोमीटर उंचीवरून जाणारं कोणतंही लढाऊ विमान, क्षेपणास्त्र किंवा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राला निष्प्रभ करण्याची ह्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णतः भारताने बनवलेलं आहे. प्रत्येक क्षेपणास्त्राची किंमत जवळपास २ कोटी रुपये आहे. पण जगातील ह्या श्रेणीतील कोणत्याही क्षेपणास्त्रापेक्षा ही किंमत जवळपास १/३ आहे. त्यामुळेच हे क्षेपणास्त्र घेण्यासाठी व्हिएतनाम, फिलिपाइन्स आणि यु.ए.ई हे देश अतिशय उत्सुक आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने ह्याच्या विक्रीसाठी मान्यता दिल्याने भारत आता ह्या देशांसोबत विक्रीचे करार करू शकणार आहे. ह्या कराराने खूप जास्ती प्रमाणात परकीय चलन तर उपलब्ध होणार आहेच पण भारताचे ह्या देशांशी संबंध अजून घट्ट आणि वृद्धिंगत होणार आहेत. आकाश सोबत ब्राह्मोस ह्या क्षेपणास्त्रासाठी सगळेच देश रांगेत उभे आहेत. जवळपास ह्यातील सगळेच देश साऊथ चायना सी भागातील आहेत. 

व्हिएतनाम हा देश ब्राह्मोससाठी अतिशय आग्रही आहे. ह्याला कारण म्हणजे ब्राह्मोसला निष्प्रभ करणं तूर्तास शक्य नाही. ह्याशिवाय ब्राह्मोसचे नवीन व्हर्जन १५०० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. व्हिएतनामच्या भूमीवरून चीनची ६ महत्वाची शहरे ब्राह्मोसच्या टप्यात येतात. त्यामुळेच चीनची आगतिकता वाढली आहे. ब्राह्मोसबद्दल ह्या सगळ्या घडामोडी पडद्यामागे घडत असताना तिकडे भारताने आपली एक पाणबुडी म्यानमारला भेट दिली आहे. २५ डिसेंबर, २०२० ला आय.एन.एस. सिंधुवीरचं नामकरण UMS Minye Theinkhathu करून म्यानमारच्या नौदलात समाविष्ट केली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारताने कोणत्या देशाला आपली पाणबुडी भेट म्हणून दिली आहे. ह्या पाणबुडीसाठी म्यानमारने एक गुप्त ठिकाणी तळ बनवला आहे. चीन ज्या पद्धतीने अतिपूर्वेकडील छोट्या देशांना आपल्या पंखाखाली दाबतो आहे, त्यामुळे हे देश कुठेतरी अश्या एका मित्राच्या शोधात आहेत जो चीनला सगळ्याच बाबतीत टक्कर देऊ शकेल आणि त्याचवेळी त्यांचं सार्वभौमत्व अबाधित ठेऊ शकेल. भारत हा त्याच राष्ट्रांचा पर्याय बनून समोर येत आहे. 

गेल्या काही महिन्यातील घटना बघितल्या तर कोणाच्याही लक्षात येईल, की भारत चीनच्या विरुद्ध असणाऱ्या देशांसाठी एक पर्याय म्हणून एक पाऊल पुढे जात आहे. भारताच्या सैन्य प्रमुख जनरल एम.एम.नरवणे यांनी ज्या देशांना भेटी दिल्या आहेत त्या भेटीत चर्चा झालेल्या गोष्टी जेव्हा जगासमोर दृश्य स्वरूपात येतील तेव्हा भारताने जागतिक वाऱ्यांची दिशा बदललेली असेल. चीनला हे हळूहळू लक्षात येते आहे. गेल्या आठवड्यात नेपाळमधली परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यासाठी चीनचं शिष्टमंडळ नेपाळमध्ये दाखल झालं होतं, पण त्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावं लागलं आहे. भारताने पडद्यामागून जी सूत्रं हलवली आहेत, त्याची चाल कळायला चीनला उशीर झालेला आहे. व्हिएतनामला ब्राह्मोस विकणं, हे भारत हुकूमाचा एक्का म्हणून लाईन ऑफ कंट्रोलवर चीनला माघार घेण्यासाठी वापरू शकतो, इतक्या चाली गेल्या काही महिन्यात भारत शांतपणे खेळला आहे. अर्थात शह-काटशह चा खेळ येत्या काळात अजून जास्ती मनोरंजक होणार आहे. पण ज्या चाली भारत खेळतो आहे त्यामुळे चीन, पाकिस्तान सध्या तरी पूर्णपणे बॅकफुटवर गेले आहेत. 

क्रमशः 

फोटो स्त्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.