'द डॉक्टर्स'... विनीत वर्तक ©
डॉक्टर लोकांच्या आयुष्याबद्दल मला कुतूहल वाटत आलेलं आहे. कोणताही डॉक्टर शेवटी मनुष्य असतो आणि त्यालाही भावना असतात. त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात ही असे अनेक प्रसंग घडलेले असतात अथवा घडत असतात ज्यामुळे मानसिक स्वास्थ सामान्य राहणं हे शक्यच नसते. ह्याशिवाय अनेकदा केलेलं निदान बरोबर असेल असं नाही त्यावेळेस एक चूक ही जीवन आणि मरण ह्यातल कारण बनू शकते. अशीच एखादी चूक जर कोणत्याही डॉक्टर कडून आपल्या कुटुंबातील व्यक्तीसोबत घडली तर? वैद्यकीय दृष्ट्र्या ती चूक आपण कशी सिद्ध करणार? राग येणं, चिडणं आणि संताप व्यक्त हा एक भाग झाला पण आपलं तारतम्य न गमावता जर डॉक्टर ने स्वतःहून ती स्वीकारणं हे हवं असेल तर आपल्याला वैद्यकीय दृष्ट्र्या तितकच ज्ञान असणं गरजेचं आहे. ते ज्ञान घेऊन समोरच्या डॉक्टर ला आपल्या चुकीची जाणीव करून देणारा प्रवास म्हणजेच 'द डॉक्टर्स'.
कोरीयन मालिका माझ्या अतिशय जवळच्या आहेत. भावनांच मिश्रण, त्यांच सादरीकरण, त्यातलं तारतम्य आणि एकूणच त्याच पडद्यावर केलेलं चित्रण ह्या सगळ्याच बाबतीत कोरीयन मालिका आपल्यापेक्षा खूप खूप पुढे आहेत. 'द डॉक्टर्स' अश्याच सगळ्या भावनांचा एक अतिशय सुंदर मिलाफ आणि प्रवास आहे. एका डॉक्टर च्या चुकीमुळे आपल्या आजीला गमावलेली एक उनाड मुलगी जेव्हा त्या डॉक्टरच्या हातून चूक झाली आहे हे सिद्ध करण्यासाठी स्वतः डॉक्टर बनून जेव्हा त्याच इस्पितळात त्याच्याच हाताखाली काम करते तेव्हा लहानपणी च्या त्या बदला घेण्याच्या भावनांचा प्रवास तिला एका वेगळ्या वाटेवर नेऊन सोडतो. त्या संपूर्ण प्रवासात अनेक गमावलेली माणसे, त्यांचे टक्के टोमणे ते अगदी तिच्यावर लादलेल्या गोष्टी सगळच कुठेतरी आत कोंडलेल असते. ह्याच वेळी तिची गाठ अश्या एका डॉक्टर शी पडते जो तिला सावरतो पण त्याचवेळी तिला तिचे निर्णय घेण्याचं आणि वाट निवडण्याचं स्वातंत्र्य देतो. तो उभा राहतो एक मार्गदर्शक, एक शिक्षक आणि एक मित्र बनून. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं तरी प्रेमाचा आडोसा घेऊन तिला कमजोर नाही बनवत तर आपल्या प्रेमाने तिला योग्य त्या दिशेने विचार करण्याची दृष्टी देतो.
आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याच्या नादात आपण काय गमावतो ह्याचा अंदाज आपल्याला येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. बदला घेतल्याने आपण नक्की काय मिळवणार आहोत? ह्याची उत्तर जर आधी मिळाली तर आपण एक पायरी खाली नाही उतरत तर एक पायरी वर जातो आणि त्या वेळेला मिळणार समाधान हे त्या बदल्यापेक्षा जास्ती सुखावणारे असते. आपल्या प्रवासात आपल्याला अनेक मित्र-मैत्रिणी भेटतात. काही घट्ट नाती तयार होतात तर काही तुटत जातात. आपण त्यांना कस हाताळतो ह्यावर समोरचा काय प्रतिक्रिया देणार हे ठरलेलं असते आणि ह्या सगळ्या भावनांच एकत्रित मिश्रण म्हणजे 'द डॉक्टर्स'. ही मालिका इतकी सुंदर आहे की अगदी केलेला द्वेष, आलेला राग, चीड, संताप आणि अगदी दुसऱ्यासाठी मनात निर्माण झालेली कटुतेची भावना पण तितक्याच सुंदरतेने आपल्या समोर येते. द्वेष, मत्सर, राग, चीड ह्या सारख्या भावना खरे तर आपल्याला त्रास देणाऱ्या असायला हव्यात पण ज्या सुंदर पद्धतीने ह्यात चित्रित केल्या गेल्या आहेत त्याला तोड नाही. एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना ज्या तरलतेने फक्त डोळ्यांनी एकमेकांना कळतात तेव्हा अभिनयाचा कस लागतो. त्यात ही मालिका १००% यशस्वी झाली आहे. पावसाचे ओथंबणारे थेंब, मंद वारा आणि भिजणारे ते दोघे जेव्हा स्पर्श करतात तेव्हा प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज लागत नाही.
कोणतीही मालिका ज्या मध्यवर्ती विषयाला धरून असते तो विषय निसटू न देणं हे महत्वाचं असते आणि त्यातही 'द डॉक्टर्स' खूप सुंदर पद्धतीने गुंफली आहे. एका डॉक्टर च्या आयुष्यात येणारे सगळेच क्षण मग ते आपत्कालीन प्रसंग असो, नातेवाईकांचा तऱ्हेवाईकपणा असो, इस्पितळातील राजकारण असो किंवा सहकाऱ्यांच शोषण आणि त्यांचा मत्सर असो आणि तश्या परिस्थितीत स्वतःला सिद्ध करताना होणारी दमछाक असो. सगळेच त्या मध्यवर्ती विषयाच्या भोवती केंद्रित आहे. त्यामुळेच 'द डॉक्टर्स' आत कुठेतरी मुरते. अगदी शेवटच्या भागापर्यंत कोणताही प्रसंग अतिशयोक्ती वाटत नाही. इकडेच मला वाटते कुठेतरी आपल्या इकडे मालिका बनवणार्यांना शिकण्याची गरज आहे. कारण आपल्या इकडे मराठी मालिका असो वा हिंदी चित्रपट सगळच बटबटीत करून दाखवले जाते. कोणाला तरी अगदीच असहाय दाखवायचे आणि दुसरा मोठ्या चातुर्याने त्याला मूर्ख बनवतो आहे ह्याच उदात्तीकरण करायचे हाच जवळपास सगळ्या मालिका आणि चित्रपटांचा सूर असतो. पण चुकीच्या भावना सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने दाखवता येऊ शकतात. त्याच उदात्तीकरण न करता सुद्धा त्याचा योग्य तो परीणाम साधला जाऊ शकतो हे 'द डॉक्टर्स' मध्ये आपण नक्कीच शिकू शकतो.
'द डॉक्टर्स' ही अवघी २० भागांची मालिका आहे. त्यामुळेच कुठेच कंटाळवाणी होत नाही. ह्यातलं कोणतच पात्र अनावश्यक वाटत नाही. पात्र उलगडायला आणि त्याचा शेवट करायला कधी जास्ती वेळ घेतलेला नाही. त्यामुळेच जेव्हा मालिका मुरते आहे आणि संपू नये असं वाटते तेव्हा ती संपते आणि आपण त्या सगळ्या पात्रांशी जोडलेले राहतो ते कायमचे. 'द डॉक्टर्स' सारख्या मालिका नेहमीच आपल्याला खूप काही देऊन जातात असं मला वाटते. मग ती नितळ प्रेमाच्या भावनेची अनुभूती असो, महत्वाकांक्षा असो किंवा मनात उत्पन्न होणाऱ्या द्वेष, मत्सर, चीड, संताप ह्या सर्व भावनांना कश्या पद्धतीने हाताळायचं असो. रोज उठून त्याच सासू-सुना, हिंसक, बिभत्स आणि अश्लील मालिकांपेक्षा ही मालिका खूप वरची आहे. 'द डॉक्टर्स' माझ्या सगळ्यात आवडत्या मालिकांपैकी एक आहे आणि मी पुन्हा सर्व २० भाग बघू शकेन इतकी सुंदर आहे.
फोटो स्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
हो. कोरीयन मालिका मी नेहमीच बघते. खूप छान असतातच
ReplyDelete.त्याचबरोबर नवीन शिकवणही देतात.अतिशय सकारात्मक असतात.मीपण ही पाहिली आहे.