शहीदोंकी चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशा होगा... विनीत वर्तक ©
गेल्यावर्षी गलवान खोर्यातील कारवाईत शहीद झालेल्या कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू (१६ बिहार रेजिमेंट), यांना युद्धकाळातील शौर्य पुरस्कार मरणोत्तर "महावीर चक्र" उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देण्यात येणार आहे.
महावीर चक्र हा सन्मान २००१ नंतर मिळवणारे कर्नल संतोष बाबू हे एकमेव भारतीय सेनेचे ऑफिसर आहेत. महावीर चक्र हा सन्मान युद्धात अतुलनीय शौर्य दाखवून देशाचं रक्षण करण्यासाठी देण्यात येतो. परमवीर चक्रानंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा सन्मान आहे.
१५ जून २०२० रोजी भारताने आपल्या सिंहासह २० मावळे गलवान इथे गमावले होते. ही घटना संपूर्ण जगाच्या विचारधारणेला कलाटणी देणारी म्हणून इतिहासात नोंदली गेली. भारताच्या सैनिकांनी चीन च्या सैन्याला आपली जागा दाखवून दिली होती. ह्यात अनेक चीन चे सैनिक पण मारले गेले. जिकडे भारताने अधिकृतरीत्या आपले सैनिक गमावल्याची कबुली जगापुढे दिली तिकडे चीन ने असं काही घडलं ह्याची दखल सुद्धा घेतली नाही. आपल्या सैनिकांचे मृतदेह पण स्वीकारण्यास मनाई केली होती. त्याचवेळी भारतीय सेनेने आपल्या शूरवीर, पराक्रमी सैनिकांच बलिदान लक्षात ठेवताना त्यांना युद्ध काळात देण्यात येणाऱ्या सन्मानांची शिफारस भारत सरकारकडे केली होती.
ह्या २० सैनिकांच नाव नॅशनल वॉर मेमोरियल, नवी दिल्ली इकडे कोरण्यात आलं असून भारतीय सेनेने 'Gallants of Galwan' (गॅलॅन्टस ऑफ गलवान) नावाचं स्मारक ही पूर्व लडाख च्या १२० पोस्ट वर बांधल आहे.
जर भारतीय सेना युद्धकाळातील सन्मान गलवान इकडे हुतात्मा झालेल्या आपल्या सैनिकांना देते आहे ह्याचा सरळ अर्थ भारत आणि चीन ह्यांच्यात झालेला गलवान इथला संघर्ष हे भारताविरुद्ध चीन ने पुकारलेलं युद्ध आहे. हे सर्व जगासमोर ठासून सांगताना भारताने आपल्या योद्धांचा आणि त्यांच्या बलिदानाचा यथोचित सन्मान केला आहे.
फोटो स्रोत :- गुगल
१) पहिल्या फोटोत कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू (१६ बिहार रेजिमेंट) आपल्या साथीदारांसह देशाची रक्षा करताना
२) गॅलॅन्टस ऑफ गलवान हे १२० पोस्ट पूर्व लडाख मधील युद्ध स्मारक
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Khup sunder blog
ReplyDeleteDhanyavaad
Jai hind