Friday 28 February 2020

पृथ्वीचा दुसरा चंद्र... विनीत वर्तक ©

पृथ्वीचा दुसरा चंद्र... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात १५ फेब्रुवारी २०२० ला सकाळी ४ वाजता अमेरीकेतील दोन खगोलशास्त्रज्ञ काचपेर विरजचोस आणि थिओडोर पृयने आकाशाच निरीक्षण करत असताना त्यांच्या कॉम्प्युटर स्क्रीन वर एक एक ठिपका त्यांना दिसला. आकाशात लघुग्रहांच्या स्वरूपात अनेकवेळा असे ठिपके दिसतात. हे लघुग्रह अवकाशात सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा करत असतात. मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये लघुग्रहांचा एक पट्टा आहे. आपल्या सौरमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरु आपल्या सौरमालेत घुसलेल्या अश्या एकट्या लघुग्रहांना आपल्याकडे खेचून बंदिस्त करतो. अनेकदा गुरूच्या गुरुत्वाकर्षणात होणारे बदल ह्या लघुग्रहांना आपल्या आतल्या सौरमालेतील ढकलतात. आत हे लघुग्रह घुसले की सूर्याच्या भोवती फिरताना अनेकदा पृथ्वीच्या परिक्रमेच्या रस्त्यात येतात. पण ह्या वेळेस आलेला उपग्रह मात्र वेगळा होता. ह्या उपग्रहाने सूर्याची साथ सोडत पृथ्वीशी सलगी करताना पृथ्वीच्या भोवती चंद्राप्रमाणे आपलं भ्रमण सुरु केलं.

आत्ता दिसलेल्या ह्या दुसऱ्या चंद्राच नामकरण सध्या 2020 CD3 असं करण्यात आलेलं आहे. ह्या उपग्रहाला साधारण १८ महिन्यापूर्वी पृथ्वीने आपल्या कक्षेत पकडलं असावं असा अंदाज ह्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.  2020 CD3 हा साधारण एखाद्या कार एवढा मोठा आहे. त्यावर नक्की काय आहे हे सांगणं सध्या तरी कठीण असलं तरी तो नक्कीच कोणत्याही रॉकेट चा भाग अथवा मानवाने पाठवलेली वस्तू नाही ह्यावर शास्त्रज्ञांच एकमत आहे. हा दुसरा चंद्र गेली दीड वर्ष पृथ्वी भोवती सगळ्या उपग्रहांच्या, दुर्बिणीच्या आणि शास्त्रज्ञांच्या नजरेला चुकवून पृथ्वीभोवती फिरत होता. आता येत्या दोन आठवड्यात तो पृथ्वीचा निरोप घेऊन आपल्या पुढल्या प्रवासाला मार्गस्थ होणार आहे.

2020 CD3 आता निरोप घेतल्यावर आपल्या पृथ्वीला पुन्हा भेट द्यायला साधारण २०२८ साली परत येईल. 2020 CD3 हा पहिला आणि शेवटचा असा लघुग्रह नाही की जो पृथ्वीच्या रस्त्यात आलेला आहे. आपलं नशीब इतकं बलवत्तर आहे की गुरु सारखा महाकाय ग्रह आपलं संरक्षण करण्यासाठी वाटेत बसला आहे. ह्या गुरूच्या नजरेला चुकवून पृथ्वीला भेट देणाऱ्या लघुग्रहांची संख्या कमी नाही. अनंत पसरलेल्या ह्या विश्वाच्या पसाऱ्यातून कोण, कधी, कसा आपल्या वाटेत आडवा येईल हे आज तरी आपण सांगू शकत नाही. कारण तंत्रज्ञानातील प्रगतीने कितीही प्रगती करून डोळे दिले तरी आपल्या नजरेची क्षमता खूप सिमीत आहे. ह्याचमुळे आज जवळपास १८ महिने पृथ्वीच्या वास्तव्याला असणाऱ्या दुसऱ्या चंद्राला आपण ओळखू शकलेलो नाही. जेव्हा त्याची ओळख पटली तेव्हा त्याचे जायचे दिवस जवळ आलेले होते.

आपल्या सभोवती पसरलेल्या ह्या अथांग विश्वात अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या आजही मानवाच्या बुद्धिमत्तेपलीकडे आहेत. त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आजही मानव करत आहे पण त्याची व्याप्ती ह्या विश्वाच्या मानाने खूप कमी आहे. पृथ्वीच्या ह्या दुसऱ्या चंद्राला शोधणाऱ्या खगोलशास्त्रज्ञांना माझा सलाम आणि जाता जाता त्यांच्यासाठी काही शब्द,

“Once we lose our fear of being tiny, we find ourselves on the threshold of a vast and awesome Universe which dwarfs -- in time, in space, and in potential -- the tidy anthropocentric proscenium of our ancestors.”

― Carl Sagan

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Thursday 27 February 2020

मुंबई लोकल... विनीत वर्तक ©

मुंबई लोकल... विनीत वर्तक ©

अनेकांसाठी सात बारा चा अर्थ जमिनीशी संबंधित असला तरी मुंबईकरांच्या दृष्टीने सात बारा ला एक वेगळं स्थान आहे. ते स्थान म्हणजे मुंबई लोकलची वेळ.  मुंबईकरांच्या धमन्या म्हणजेच 'मुंबई लोकल'. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या प्रत्येक मुंबईकराच मिशन असते म्हणजे लोकल मध्ये जागा मिळवणं. जागा मिळाली नाही तरी निदान लोकल मध्ये शिरायला मिळालं तरी प्रत्येक मुंबईकराच्या मानाने ते मिशन इम्पॉसिबल सफल झालं असच असते. हे मिशन एका दिवसासाठी किंवा एका वेळेसाठी नसते तर जेव्हा जेव्हा मुंबईकर किंवा मुंबईत आलेला प्रत्येकजण लोकल ने जाण्याचा विचार करतो तेव्हा ते एखाद्या युद्धापेक्षा कमी नसते. हे असं का हे जाणून घेण्यासाठी एकदा मुंबई लोकल चा प्रवास करायला हवा किंवा त्याची माहिती तरी जाणून घ्यायला हवी.

१)  मुंबई लोकल ची लांबी जवळपास ४०० किलोमीटर आहे. (मुंबई-पुणे-मुंबई अश्या प्रवासापेक्षा ही जास्ती). ह्यावर रोज २३४२ पेक्षा जास्ती ट्रेन धावतात. प्रत्येक दोन ते तीन मिनिटाला एक ट्रेन स्टेशन वर येत असताना रोज जवळपास ७.५ मिलियन लोक (७५,०००,००) मुंबई लोकल ने दररोज प्रवास करतात . ह्याचा अर्थ जगातील १३० देशांची पूर्ण लोकसंख्या एकट्या मुंबई लोकल ने प्रत्येक दिवशी प्रवास करते. एका वर्षात मुंबई लोकल ने जवळपास २.३ बिलियन लोकं प्रवास करतात. जगाच्या पूर्ण लोकसंख्येच्या १/३ लोक एका वर्षात मुंबई लोकल ने प्रवास करण्याइतपत आकडा मोठा आहे.

२) रोज ७.५ मिलियन प्रवाशांची ने आण करणाऱ्या मुंबई लोकल वर पडणारा भार  ठरवलेल्या व्याख्येच्या असल्याने त्याला 'सुपर डेन्स क्रश लोड' असं नावं ठेवण्यात आलेलं आहे. २००० लोकांची ने आण करण्याची क्षमता असलेल्या मुंबई लोकल मधून जवळपास ५००० पेक्षा जास्ती लोक प्रवास करतात. एका स्क्वेअर मीटर मध्ये जवळपास १५-१७ लोक प्रवास करतात. ( आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार साधारण ६ लोक १ स्क्वेअर मीटर मध्ये प्रवास करणं हे सगळ्यात जास्ती समजलं जाते. ६ पेक्षा जास्ती लोक असल्यास त्याला क्रश लोड म्हणतात. ) त्या मापदंडातून मुंबई लोकल ने प्रवास करण्याऱ्या लोकांची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे आहे. म्हणूनच गर्दीच्या वेळी विरार ट्रेन किंवा कल्याण ट्रेन मध्ये चढायला मिळणं हे आय.आय.टी आणि आय.आय. एम. मध्ये प्रवेश घेण्यापेक्षा जास्ती कठीण आहे.

३) मुंबई लोकल किंवा मुंबई रेल्वे जगातील सगळ्यात व्यस्त रेल्वे व्यवस्था आहे. २४ तासात मुंबईची लाईफ लाईन फक्त ९० मिनिटे विश्रांती घेते.

४) मुंबई लोकल जगातील सगळ्यात स्वस्त रेल्वे प्रणाली मधील एक आहे. अवघ्या ३० रुपयात प्रवाशी १२० किलोमीटर चा प्रवास करू शकतात.

५) बॉम्बस्फोट आणि अतिरेकी सुद्धा मुंबई लोकल ला थांबवू शकले नाहीत. गरज म्हणा वा लाचारी पण मुंबई लोकल ह्या घटनेनंतर अवघ्या १६ तासात पूर्ण क्षमतेने काम करत होती.

गर्दीने भरलेल्या मुंबई लोकल मध्ये चौथ्या सीटवर बसायला मिळेल ह्याची स्वप्न बघणारा मुंबईकर रिकाम्या लोकल मध्ये मात्र उभं राहून प्रवास करतो. ठरलेला डब्बा आणि ठरलेली जागा पकडण्यासाठी कधी कधी ट्रेन सोडणारा मुंबईकर व्हिडीओ कोच मधून अर्ध्या डब्यात नजर मात्र कटाक्षाने ठेवतो. (व्हिडीओ कोच
 हा काय प्रकार काय हे अस्सल मुंबईकराला चांगलच माहित आहे. ). कोणत्या स्टेशनचा कोणता प्लॅटफॉर्म कोणत्या बाजूला येईल ह्याच गणित करणारा मुंबईकर गणित चुकल्यावर सगळ्यात जास्ती आपटतो. प्लॅटफॉर्म वर येणाऱ्या मुंबई लोकलला हळू करण्यासाठी हात दाखवणारा फक्त मुंबई लोकलचा प्रवासी असतो.

एक दिवस मुंबई लोकल बंद झाली तर पूर्ण मुंबई थांबते हे पूर्ण जगाला माहित आहे. पाऊस आला काय गेला काय मुंबई लोकल थांबून का होईना धावत असते.  मुंबई लोकल ही मुंबईकरांची संस्कृती आहे. जिकडे श्रीमंत- गरीब, जात- पात, धर्म- पंथ अशी सगळी लक्तरं बाजूला ठेवावी लागतात. जेव्हा आपण त्या संस्कृतीचा होतो तेव्हा मुंबई लोकल सगळ्यांना सामावून घेते आणि एक आपल्याला हवा असलेला प्रवास घडवते.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Tuesday 25 February 2020

एर्रोकोथ... विनीत वर्तक ©

एर्रोकोथ... विनीत वर्तक ©

एर्रोकोथ ह्या नावाचा अर्थ होतो, "आकाशाकडे बघण्याची प्रेरणा आणि त्यातून आपल्या पलीकडे असलेल्या विश्वाचं कुतूहल". एर्रोकोथ हा एक ट्रान्स नेपच्यून ऑब्जेक्ट आहे. टी.एन.ओ. (ट्रान्स नेपच्यून ऑब्जेक्ट) म्हणजे नक्की काय भानगड आहे  समजण्यासाठी आपल्याला थोडी सौरमाला समजून घ्यावी लागेल. आपल्या सौरमालेत मंगळ आणि गुरु ग्रहांच्या दरम्यान लघु ग्रहांचा एक पट्टा आहे. ज्यात अनेक छोटे, मोठे लघुग्रह इतर ग्रहांप्रमाणे सूर्याभोवती परीक्रमा करत असतात. ज्याला ऍस्ट्रोइड बेल्ट असं म्हणतात. म्हणजेच आपल्याला माहित असलेल्या ८ ग्रहांपलीकडे लाखो, करोडो लघुग्रह आहेत जे आपल्या सौरमालेचा  भाग आहेत. असाच एक लघुग्रहांचा पट्टा सौरमालेतील शेवटचा ग्रह नेपच्युन पलीकडे आहे. ज्याला कुइपर बेल्ट असं म्हंटल जाते. ह्या पट्यातील लघुग्रहांना  टी.एन.ओ. (ट्रान्स नेपच्यून ऑब्जेक्ट) असं म्हणतात.

ह्या टी.एन.ओ. (ट्रान्स नेपच्यून ऑब्जेक्ट) मध्ये इतरांच्या मानाने मोठे असणारे डवार्फ ग्रह येतात ज्यात प्लूटो, हौमिआ, मॅकेमके ह्यांचा समावेश आहे. (डवार्फ ग्रह म्हणजे असे ग्रह जे एकसंध आहेत आकाराने गोलाकार पण इतकेही मोठे नाहीत की त्यांच्या शेजारची साफसफाई झालेली आहे. आपल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्यांच्या तोडीचे इतर ग्रह त्यांना बाजूला करणं जमलेलं नाही. अश्या ग्रहांना डवार्फ ग्रह म्हणतात.) प्लूटो हा आधी सौरमालेतील ग्रह समजला जात होता परंतु ग्रहांच्या व्याख्येपेक्षा डवार्फ ग्रहांच्या व्याख्येत तो बसत असल्याने त्याला डवार्फ ग्रहाचा दर्जा दिलेला आहे. ह्या टी.एन.ओ. (ट्रान्स नेपच्यून ऑब्जेक्ट) मध्ये एक विचित्र दिसणारा लघुग्रह २०१४ साली शोधला गेला. धड आणि डोके एकमेकांना जोडल्या सारख्या दिसणाऱ्या लघुग्रहाला अल्टीमा थुले असं म्हंटल गेलं. ३६ किलोमीटर लांब असलेल्या ह्या लघुग्रहात अल्टीमा चा भाग २१ किलोमीटर तर थुले १५ किलोमीटर चा आहे.

नुकतंच नासा च्या न्यू होरायझन स्पेस क्राफ्ट ने ह्या लघुग्रहा जवळून प्रवास केला. तर ह्या अल्टीमा थुलेचं नामकरण आता एर्रोकोथ असं केलं गेलं. आपल्या सौरमालेत लाखो लघुग्रह असताना ह्या एर्रोकोथ ला इतकं महत्व का? तर ह्याच उत्तर दडलं आहे त्याच्या जन्मात. ४.५ बिलियन वर्षापूर्वी जेव्हा सूर्यासोबत आपली सौरमाला अस्तित्वात आली तेव्हा आपल्या सौरमालेतील ग्रह कसे अस्तित्वात आले ह्याच उत्तर आपण नक्की देऊ शकलेलो नाहीत. ग्रहांची निर्मिती कशी झाली असेल ह्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. एका मताप्रमाणे बारीक बारीक दगड एकत्र येऊन एकसंध होऊन ग्रहांची निर्मिती झाली असावी. तर दुसऱ्या मताप्रमाणे क्लाऊड कोलॅप्स झालं असावं. ह्या मध्ये छोटे छोटे तुकडे एकमेकांभोवती फिरता फिरता हळुवारपणे जोडले जाऊन मोठ्या ग्रहांची निर्मिती झाली. एर्रोकोथ च्या नवीन विश्लेषणा नुसार ह्याच धड आणि शरीर म्हणजेच अल्टीमा आणि थुले असे दोन लघुग्रह जवळपास ४.५ बिलियन वर्षांनी एकमेकांसोबत जुळले जाऊन एर्रोकोथ निर्मिती झाली आहे.

एर्रोकोथ च्या अभ्यासावरून क्लाऊड कोलॅप्स होऊन सौरमालेतील ग्रहांची निर्मिती झाली आहे हे स्पष्ट होते आहे. जसे जमिनीत लाखो वर्षापूर्वी राहिलेले हाडांचे अवशेष एखाद्या सजीवाच्या आणि एकूणच त्याच्या उत्क्रांती वर प्रकाश टाकतात त्याचप्रमाणे एर्रोकोर्थ हा एक प्लॅनेटेसीमल आहे. आपल्या सौरमालेच्या जडणघडणीचा एक पुरावा असलेला एर्रोकोथ चा अभ्यास एकूणच वैश्विक माहितीमध्ये मोलाचं योगदान आहे. १ जानेवारी २०१९ नासा च्या स्पेस क्राफ्ट ने तब्बल ६.६ बिलियन किलोमीटर वर असलेल्या एर्रोकोथ च्या ३५५८ किलोमीटर वरून छायाचित्र घेतली. त्याच्या अभ्यासानंतर एर्रोकोथ ने आपल्या सौरमालेच्या प्रवासाची माहिती उलगडली आहे.

अवघा ३६ किलोमीटर लांब असलेला एर्रोकोथ सारखा लघुग्रह खरे तर एक सुरवात आहे आपल्याच भूतकाळाला ला ओळखण्याची. असे अनेक लघुग्रह आणि डवार्फ ग्रह आपल्या सौरमालेत अजून अंधारात आहेत. ज्यांचा अभ्यास होणं अजून बाकी आहे. येत्या काळात तंत्रज्ञानातील प्रगती सोबत आपण आपल्याच भूतकाळातील अनेक प्रश्नांचा उलगडा करू ह्याची आशा बाळगायला हरकत नाही.

फोटो स्रोत :- नासा

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Thursday 20 February 2020

एका प्रेमाची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका प्रेमाची गोष्ट... विनीत वर्तक ©

१४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा ला भ्याडपणे भारतीय जवानांवर अतिरेकी हल्ले करणाऱ्या अतिरेक्यांच्या शोधात भारतीय सेनेने कंबर कसली होती. ह्या हल्या मागचा सुत्रधार पुलवामा मधेच असल्याची माहिती भारतीय सेनेला मिळाली. भारतीय सेनेने ह्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी सुरु केलेल्या मोहिमेत ५५ राष्ट्रीय रायफल चे मेजर विभूती धोऊंडियाल हे सहभागी होते. अतिरेक्यांना एका कोपऱ्यात बंदिस्त केल्यावर त्यांनी सैनिकांवर बेछूट गोळीबार सुरु केला. तब्बल २० तास हा गोळीबार सुरु होता. ह्या गोळीबारात मेजर विभूती ह्यांना एक मानेवर तर एक पोटात अश्या दोन गोळ्या लागल्या. जखमी झालेल्या मेजर विभूती ह्यांना ह्या मोहिमेत वीरमरण आलं. मेजर विभूती ह्यांच्यावर पूर्ण घराची जबाबदारी होती. आपली आई, तीन बहिणी आणि अवघ्या १० महिन्या पूर्वी त्यांच्या आयुष्याची जोडीदार झालेल्या निकिता कौल धोऊंडियाल ह्या सर्वाना मागे सोडून देशाचं कर्तव्य बजावताना ते शहीद झाले.

मेजर विभूती धोऊंडियाल ह्यांना शेवटच्या क्षणी बघताना निकिता कौल धोऊंडियल ह्यांनी त्यांच्या कानात आपल्या भावना व्यक्त करताना म्हंटल होतं,

"मला तुझा आज खूप अभिमान वाटतो. आम्ही सगळेच तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू ज्या पद्धतीने सगळ्यांवर प्रेम केलस ते खूप वेगळं होतं कारण तू आपल्या आयुष्यच बलिदान ज्यांच्यासाठी दिलं ज्यांना तू कधी बघितलेलं पण नाहीस. तू खूप पराक्रमी आहेस. तू माझा जोडीदार असल्याचा मला खूप अभिमान आहे. तू खूप शूरवीर आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. माझं आयुष्य तुझ्यासाठीच आहे".

अवघ्या १० महिन्याचा संसार एका क्षणात उध्वस्त झाल्याचा धक्का निकिता ह्यांना पचवावा लागणार होता पण कुठेतरी मनात आपल्या प्रेमासाठी त्याच्या स्वप्नांसाठी जगण्याचे विचार मनात घोळत होते. आयुष्याच्या अश्या बिकट प्रसंगी त्यांना सहानभूती नको होती. दुःखाचा डोंगर बाजूला ठेवत १५ व्या दिवशी निकिता आपल्या जॉब मध्ये रुजू झाली. पण जो धक्का बसला त्यातून सावरायला तिला वेळ लागत होता. एकीकडे मेजर विभूती ची अधुरी स्वप्ने आणि दुसरीकडे त्याची कमतरता अश्या वेळी त्याची अधुरी स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय तिने घेतला. भारतीय सेनेने विधवा झालेल्या सैनिकांच्या जोडीदारांना सैन्यात प्रवेश घेण्याची असलेली वयाची मर्यादा शिथिल केली आहे. त्याचा उपयोग करत निकिता कौल धोऊंडियल हिने भारतीय सैन्य प्रवेश परीक्षा दिली. वयाची अट शिथिल असली तरी बाकी सगळ्या गोष्टी भारतीय सेनेच्या कडक नियमांना धरून असणार होत्या. तिकडे कोणतीही शिथिलता नसते त्यामुळे निकिता कौलला  निवड चाचणी च्या सगळ्या पायऱ्यांवरून इतरांप्रमाणे जावं लागलं.

परीक्षेच्या वेळी त्या जागी प्रवेश करताना तिला भरून आलं. आपला विभू पण असाच परीक्षेला आला असेल. अशीच तयारी त्याने केली असेल. परीक्षेचं ते वातावरण आणि भारतीय तिरंगा सगळच मनात कुठेतरी त्या अधुऱ्या स्वप्नांची जाणीव करून देतं होतं. ह्या प्रवेश परीक्षेच्या मुलाखती च्या वेळी एका अधिकाऱ्याने त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? ह्यावर त्यांनी उत्तर दिलं, दोन वर्ष. त्यांच्या ह्या उत्तराने अधिकारी गोंधळला. तो म्हणाला की इकडे कागदपत्रात तर तुमचं लग्न ९ महिन्याआधी झालं होतं असं लिहिलेलं आहे. त्यावर निकिता कौल धोऊंडियल ह्यांनी उत्तर दिलं,

"विभू आता शरीराने ह्या जगात नसेलही पण ह्याचा अर्थ त्याची साथ सुटली आणि आमचं लग्न संपलं असा होतं नाही".

त्यांच्या ह्या उत्तराने समोर बसलेला अधिकारी ही अवाक झाला. गेल्या आठवड्यात निकिता कौल धोऊंडियल ला मुलाखतीत पास आणि भारतीय सेनेच्या ट्रेनिंग साठी निवड झाल्याचं कळालं तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. भारतीय सेनेत प्रवेशासाठी केलेल्या मेहनतीचं फळ तिला मिळालं होतं पण तिच्या  मते हे तर पहिलं पाऊल आहे.

"मी भारतीय सेनेत निवड होण्यासाठी खूप मेहनत केली, पण आता मला एका वर्षाच्या प्रशिक्षणात अव्वल राहायचं आहे. मला भारतीय सेनेची अशी एक अधिकारी व्हायचं आहे जिच्यावर पूर्ण देशाला गर्व असेल विभूला गर्व असेल".

येत्या काळात जेव्हा निकिता कौल धोऊंडियल चेन्नई च्या ऑफिसर ट्रेनिंग अकॅडेमी मध्ये प्रवेश घेईल तेव्हा मेजर विभूती धोऊंडियाल ह्यांच्या अधुऱ्या राहिलेल्या देशसेवेच्या व्रताला पूर्ण करण्यासाठी एका रणरागिणीने घेतलेली ती एक उंच उडी असेल.

१४ जानेवारीला प्रेम दिवस साजरा करणाऱ्या प्रत्येकासाठी विभूती आणि निकिता ची गोष्ट खरं प्रेम काय असते ह्याच एक जिवंत उदाहरण आहे. भारतात आज असे सैनिक आहेत म्हणून आपण जिवंत आहोत. भारतीय सेना हे एक व्रत आहे. ज्याला ते कळलं त्याने हिमालयाची उंची गाठली.

शहीद मेजर विभूती धोऊंडियाल आणि त्यांच्या पत्नी निकिता कौल धोऊंडियल ह्यांना माझा कडक सॅल्यूट. मला आणि माझ्या देशाला तुम्हा दोघांचा खूप अभिमान आहे.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Monday 17 February 2020

पेल ब्लु डॉट (फिकट निळा ठिपका)... विनीत वर्तक ©

पेल ब्लु डॉट (फिकट निळा ठिपका)... विनीत वर्तक ©

४२ वर्ष ५ महिने आणि आज १३ दिवस झाले आहेत माणसाच्या तांत्रिक क्षमतेची एक वस्तू विश्वाच्या पोकळीत आजही एक अनंताचा प्रवास करत आहे. सप्टेंबर १९७७ ला पृथ्वीवरून अनंताच्या प्रवासाला सुरवात केलेल व्हॉयजर १ आत्ताच्या क्षणाला ६४,००० किलोमीटर/ तास ह्या वेगाने प्रवास करत आहे. व्हॉयजर १ ही मानवनिर्मित पहिली गोष्ट होती जिने सौर मालेच्या पलीकडे पहिल्यांदा प्रवास केला. व्हॉयजर १ ची जवळपास सगळी उद्दिष्ठ ही शनी ला ओलांडे पर्यंत पूर्ण झाली होती. जेव्हा त्याने आपला प्रवास शनी च्या पलीकडे १९८० साली सुरु केला तेव्हा व्हॉयजर १ वर असणाऱ्या गोल्डन रेकॉर्ड च्या टीम चा प्रमुख आणि ह्या मिशन चा एक सदस्य, लेखक 'कार्ल सेगन' ने नासा कडे आपल्या सौर मालेचा मागे वळून एक फोटो घेण्याची मागणी केली. कार्ल सेगन ला हे चांगलच माहित होतं की अश्या फोटो चा वैज्ञानिक दृष्टीकोनातून कोणताच फायदा नव्हता आणि जे काही हजारो सुंदर फोटो व्हॉयजर १ ने आपल्या प्रवासात घेतले त्या समोर हा फोटो काहीच नसेल तरीपण ह्या विश्वाच्या पोकळीत आपल्या पृथ्वी चं अस्तित्व दाखवणारा हा फोटो अजरामर होईल हे कार्ल सेगन ओळखून होता. नासा मधील काही जणांना कार्ल ची कल्पना आवडली तर अनेकांनी ह्याला विरोध केला.

सूर्याच्या जवळून असा फोटो घेणं कदाचित व्हॉयेजर १ च्या कॅमेरा आणि इतर गोष्टींना खराब करू शकते असा नासा च्या अनेक तंत्रज्ञांचा तर्क होता. कार्ल मागे हटला नाही तो आपल्या कल्पनेच्या फोटो साठी नासा कडे आग्रह करत राहिला सरतेशेवटी १९८९ ला नासा ने कार्ल सेगन च्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचं मान्य केलं पण तोवर नासा च्या दुसऱ्या मोहिमा असल्याने नासा चं डीप स्पेस नेटवर्क संपर्कासाठी उपलब्ध नव्हतं. डीप स्पेस नेटवर्क उपलब्ध झाल्यावर लागणार गणित आणि कश्या स्वरूपात फोटो घ्यायचे ह्याच विश्लेषण करून १४ फेब्रुवारी १९९० ला व्हॉयेजर १ आपल्या सौरमालेकडे पुन्हा एकदा नजर टाकून आपल्या कॅमेरा ने तिला बंदिस्त केलं. त्या वेळेस व्हॉयजर १ पृथ्वीपासून साधारण ६.४ बिलियन किलोमीटर ( ४ बिलियन माईल्स ) इतक्या अंतरावर होतं. व्हॉयजर १ ने जवळपास ६० फ्रेम्स घेतल्या होत्या. ह्या फ्रेम्स रेडिओ लहरी च्या स्वरूपात प्रकाशाच्या वेगाने जेव्हा ५.५ तासानंतर पृथ्वीवर आल्या. तेव्हा त्यातल्या तीन फ्रेम्स ना एकत्र करून एक प्रतिमा नासा ने तयार केली त्याला नाव दिलं 'पेल ब्लु डॉट'. जवळपास ६,४०,००० पिक्सल असणाऱ्या ह्या फोटोत आपल्या पृथ्वीचं अस्तित्व फक्त ०.१२ पिक्सल इतकचं आहे. कार्ल सेगन ला जे पूर्ण जगाला सांगायचं होतं ते ह्या एका फोटोत बंदीस्त झालं होतं. कार्ल सेगन ने ह्या फोटोमागच्या आपल्या भावना शब्दात मांडल्या त्या अश्या,

Look again at that dot. That's here. That's home. That's us. On it everyone you love, everyone you know, everyone you ever heard of, every human being who ever was, lived out their lives. The aggregate of our joy and suffering, thousands of confident religions, ideologies, and economic doctrines, every hunter and forager, every hero and coward, every creator and destroyer of civilization, every king and peasant, every young couple in love, every mother and father, hopeful child, inventor and explorer, every teacher of morals, every corrupt politician, every "superstar," every "supreme leader," every saint and sinner in the history of our species lived there--on a mote of dust suspended in a sunbeam.
The Earth is a very small stage in a vast cosmic arena. Think of the rivers of blood spilled by all those generals and emperors so that, in glory and triumph, they could become the momentary masters of a fraction of a dot. Think of the endless cruelties visited by the inhabitants of one corner of this pixel on the scarcely distinguishable inhabitants of some other corner, how frequent their misunderstandings, how eager they are to kill one another, how fervent their hatreds.
Our posturings, our imagined self-importance, the delusion that we have some privileged position in the Universe, are challenged by this point of pale light. Our planet is a lonely speck in the great enveloping cosmic dark. In our obscurity, in all this vastness, there is no hint that help will come from elsewhere to save us from ourselves.
The Earth is the only world known so far to harbor life. There is nowhere else, at least in the near future, to which our species could migrate. Visit, yes. Settle, not yet. Like it or not, for the moment the Earth is where we make our stand.
It has been said that astronomy is a humbling and character-building experience. There is perhaps no better demonstration of the folly of human conceits than this distant image of our tiny world. To me, it underscores our responsibility to deal more kindly with one another, and to preserve and cherish the pale blue dot, the only home we've ever known.
— Carl Sagan,
आज ह्या प्रतिमेला जवळपास ३० वर्ष झाली पण आजही आपण त्यातून शिकलेलो नाही जे कार्ल सेगन ला अभिप्रेत होतं. आजही धर्म, पंथ, जात- पात ते अनेक छोट्या मोठ्या कारणांवरून निष्पाप लोकांचे बळी घेतले जातात. निसर्गाला बुडवत स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा आटापिटा आजही मानव करत आहे. आपण एका शेवटाकडे वाटचाल करत आहोत ह्याची जाणीव कदाचित कार्ल ला ४० वर्षांपूर्वी झाली होती. पेल ब्लु डॉट (फिकट निळा ठिपका) हा फोटो साधा नाही तर एकूणच संपूर्ण मानवजातीला आपल्या भविष्याचा विचार करायला लावणारा आहे. मानव ह्या विश्वाच्या पसाऱ्यात अणू एवढा पण नाही. पण त्याचवेळी तंत्रज्ञानाच्या जोरावर मानव ह्या विश्वाच्या पसाऱ्यात सगळ्यात बुद्धिमान सजीव आहे. ह्याची जाणीव हा फोटो एकाचवेळेस आपल्याला त्या दोन्ही गोष्टींची जाणीव करून देतो. विश्वाच्या त्या काळ्या अंधारात आपण एकटे असलो तरी त्या निळ्या पृथ्वीला वसुंधरा बनवायचं की त्याचा ऱ्हास करायचा ह्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे.

ह्या फोटोची कल्पना मांडणाऱ्या कार्ल सेगन आणि तांत्रिक प्रगतीच्या जोरावर 'पेल ब्लु डॉट' (फिकट निळा ठिपका) टिपणाऱ्या नासा च्या व्हॉयजर १ टीम ला माझा कुर्निसात.

फोटो स्रोत :- नासा, गुगल

 सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Sunday 16 February 2020

एका हल्याचा बदला ( भाग २) ... विनीत वर्तक ©

एका हल्याचा बदला ( भाग २) ... विनीत वर्तक ©
बालाकोट ला हल्ला करणं तितकं सोप्प नाही ह्याची कल्पना सेनेच्या सगळ्याच अधिकारी आणि ह्या मिशन मध्ये असणाऱ्या सगळ्यांना होती. एकतर बालाकोट नियंत्रण रेषेपासून आत होतं. त्यात पाकीस्तान ची एअर फोर्स भारताच्या प्रतिउत्तरासाठी तयार होती. भारतात राहून नक्की बालाकोट ला काय चालू आहे हे समजणं कठीण होतं. भारताचे आकाशातील डोळे ह्या कामी आले. शत्रूला न कळता भारताच्या डोळ्यांनी अवकाशातून बालाकोट चे फोटो सेनेला पाठवून दिले होते. भारताच्या वायू दलासमोर आव्हान होतं ते म्हणजे पाकीस्तानी हवाई दलाच्या डोळ्यात धूळ झोकत अतिशय सफाईने आणि अतिशय वेगाने आपलं मिशन पुर्णत्वाला नेणं. कारण वेळ, अचूकता आणि तांत्रिक क्षमता अश्या तिन्ही गोष्टी जुळून येण्यावर हे मिशन यशस्वी होणं अवलंबून होतं.
सुखोई एम.के.आय. ३० हे जरी भारतीय हवाई दलाचा कणा असलं तरी काही बाबतीत त्याच्या वापरावर मर्यादा येतात. सुखोई साधारण २१२० किलोमीटर/ तास वेगाने हवेतून उडू शकते. त्याच सोबत सुखोई च वजन जास्ती आहे. त्यामुळेच अश्या मिशन मध्ये जिकडे चपळता आणि वेग ह्याची नितांत गरज आहे तिकडे भारताने आपल्या दुसऱ्या फळीतील विमानांचा वापर करण्याचं ठरवलं. त्यांच नाव होतं 'मिराज २०००'. मिराज २००० हे लढाऊ विमान आता सध्या भारतात येणाऱ्या राफेल विमानांचा मोठा भाऊ आहे. फ्रांस ची डसाल्ट एव्हिएशन कंपनी ने ह्याची निर्मिती केलेली आहे. मिराज २००० चा वेग हे त्याच अस्त्र आहे. मिराज २००० हवेतून २३३६ किलोमीटर/ तास वेगाने जाऊ शकते. तसेच ह्यावर इस्राईल ने बनवलेले स्पाईस बॉम्ब बसवले जाऊ शकतात. स्पाईस चा अर्थ होतो (Smart, Precise Impact, Cost-Effective). नावाप्रमाणे ह्या बॉम्ब मध्ये स्वतःची जी.पी.एस. प्रणाली आहे. त्या सोबत ऑप्टिकल फायबर कॅमेरा आहे. ह्या दोघांमुळे अगदी ६० किलोमीटर वरून डागलेले हे बॉम्ब अतिशय अचूकतेने लक्ष्यभेद करण्यात सक्षम आहेत.
तांत्रिक क्षमता आणि अचूकतेत भारतीय हवाई दल कुठेच कमी नव्हतं. आता मोठा प्रश्न होता योग्य वेळेचा आणि पाकीस्तान हवाई दलाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा. बालाकोट मिशन साठी भारतीय वायू सेना पूर्ण नियोजनबद्ध आणि पूर्ण क्षमतेने उतरली होती. प्रत्येक गोष्टीवर विचार केला गेला होता. शत्रू काय विचार करेल? काय प्रतिउत्तर देईल? ह्याचा सुद्धा विचार करून हे मिशन आखलं गेलं होतं. भारताने एक वेगळीच चाल खेळली. जम्मू काश्मीर मध्ये रात्रीच्या वेळी ये जा करणाऱ्या लढाऊ विमानांची गस्त वाढवली. ह्यामुळे पाकीस्तानी सेनेचं लक्ष तिकडे वेधलं गेलं. मिशन साठी १२ मिराज २००० विमानांचा ताफा आग्रा आणि बरेली हवाई बेस वरून हवेत उडाला. त्यांच्या सोबत ४ सुखोई एम.के.आय ३० आणि दोन निरीक्षण करणारी विमानं ज्यात Airborne Warning and Control System (AWACS) आणि Netra Airborne Early Warning and Control (AEW&C) समावेश होता. ह्या शिवाय दोन आय.एल. ७६ एस हवेत लढाऊ विमानांन मध्ये इंधन भरणारी विमान असा भला मोठा ताफा पाकिस्तान च्या दिशेने कूच करण्यात आला.
ह्या सर्व विमानांना दिल्ली वरून पाकीस्तान पर्यंत जायचं होतं. त्यासाठी अतिशय व्यस्त असणाऱ्या दिल्ली च्या हवाई क्षेत्रात डार्क कॉरीडॉर तयार करण्यात आला. दिल्ली मध्ये येणारी विमाने वळवण्यात आली त्यामुळे हवाई दलाच्या ताफ्याला पाकीस्तान ला जाण्यासाठी हवाई मार्ग मोकळा मिळाला. कोणाच्याही नजरेत न येता ही सगळी विमाने सरहद्दीवर पोहचली. इकडे पाकीस्तान ला मूर्ख बनवण्यासाठी काही विमानांनी युद्धाच्या फॉर्मेशन मध्ये बहावलपूर कडे कूच केलं. पाकीस्तान च्या सरहद्दी मध्ये युद्धाच्या फॉर्मेशनमध्ये घुसलेली विमान पाकीस्तान च्या रडारवर दिसताच जैशे ए मुहम्मद च्या मुख्य कार्यालयावर जे की बहावलपूर मध्ये आहे त्यावर भारत हल्ला करणार असा समज पाकीस्तान चा झाला व पाकीस्तान च्या हवाई दलाच्या विमानांनी त्यांना रोखण्यासाठी बहावलपूर च्या दिशेने कूच केलं. हीच वेळ होती जेव्हा पाकीस्तान चं पूर्ण लक्ष हे त्या विमानांवर होतं आणि इकडे भारताची मिराज २००० विमानांची दुसरी फळी जमिनीच्या जवळून बालाकोट कडे आपलं मिशन साध्य करण्यासाठी रवाना झाली.
एकीकडे बहावलपूर मध्ये घुसणाऱ्या मिराज २००० च्या फॉर्मेशन ला रोखण्यासाठी हवेत उडालेल्या पाकीस्तान च्या विमानांना आपल्याला मूर्ख बनवल्याचं लक्षात आलं. कारण मिराज २००० ची बालाकोट ला जाणारी दुसरी विमाने जेव्हा रडार वर दिसली तेव्हा पाकीस्तान ची विमाने त्यांच्यापासून १५० किलोमीटर पेक्षा अधिक दूरवर होती. हा काही मिनिटाचा वेळ भारताने मोठ्या चातुर्याने निर्माण केला होता. हिच वेळ होती जेव्हा बदला घेण्यापासून भारतीय हवाई दलाला कोणीही रोखू शकत नव्हतं. मिराज २००० ची सगळी विमान स्पाईस बॉम्ब बसवलेली होती. ५ स्पाईस बॉम्ब जेव्हा पाच विमानातून बालाकोट मधल्या वेगवेगळ्या बिल्डिंगवर लॉक केले गेले. तेव्हा विमानातून सुटलेल्या त्या बॉम्ब नी १००% अचूकतेने बालाकोट च्या आतंकवादी तळाचा सुपडा साफ केला. काय होते आहे हे कळायच्या आधी सगळे जेहाद ची स्वप्न बघणारे त्यांच्या स्वप्नातच ढगात पोहचले होते. इकडे जोवर पाकीस्तान ची विमाने बालाकोट पर्यंत येतील तोवर आपलं मिशन फत्ते करून मिराज २००० विमाने ध्वनीच्या दुप्पट वेगाने भारतीय हद्दीत सुरक्षितरीत्या पोहचली. पाकीस्तान ची अवस्था नक्की कोणाच्या मागे जावं अशी असताना दोन्ही तुकड्या सुखरूप भारताच्या हद्दीत परतल्या. पाकीस्तानी विमानांनी पाठलाग केला पण सरड्याची धाव कुंपणा पर्यंत त्या प्रमाणे हद्दीजवळ त्यांची वाट थांबली. आपलं शेपूट मागे फिरवण्याशिवाय पाकीस्तानी च्या हवाई दलाकडे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नव्हता.
वेळ, अचूकता, आपल्या शत्रूचा पुरेपूर अभ्यास, तांत्रिक क्षमतांचा अफलातून मेळ आणि आपल्या बहादूर सैनिकांचा पराक्रम ह्यांच्या जोरावर भारताने पाकीस्तान ला त्यांच्याच घरात घुसून ठोकलं होतं. रक्षा क्षेत्राचा अभ्यास असणारे अनेक जाणकार खासगीत सांगतील इतकं सगळं प्लॅनिंग आणि त्याच नियोजनबद्ध अनुसरण आणि ते ही अवघ्या काही दिवसात ह्यासाठी किती कष्ट लागले असतील. बालाकोट मध्ये जवळपास २००- ३०० अतिरेकी मारले गेल्याचा अंदाज आहे. अंदाज ह्यासाठी कारण न पाकीस्तान काही उघडपणे स्विकारणार आहे न कोणाला त्या भागात जाऊन त्याची शहानिशा करून देणार आहे. पण बालाकोट सारख्या यशस्वी बदल्याला जेव्हा आपलेच राजकारणी आणि सो कॉल्ड सेक्युलर लोक संशयतेने बघतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. राजकारणात काय होते त्याच्याशी मला काहीच देणंघेणं नाही पण जेव्हा प्रश्न आपल्या देशाच्या सुरक्षिततेचा आणि सैनिकाच्या अस्मितेचा असतो तेव्हा आपण राजकारण बाजूला ठेवायला हवं. आज एक वर्ष झाल्यावर आपण कोणी काय मिळवलं ह्याचा हिशोब मागतो तेव्हा आपण ह्या देशासाठी काय दिलं? ह्याचा विचार आधी आपण करायला हवा.
आजही ते ४० सैनिक आपल्या सोबत आहेत. कारण सैनिक कधी मरत नसतात तर ते अमर होतात.
उरूजे कामयाबी पर कभी हिन्दोस्ताँ होगा
रिहा सैयाद के हाथों से अपना आशियाँ होगा
चखाएँगे मज़ा बर्बादिए गुलशन का गुलचीं को
बहार आ जाएगी उस दम जब अपना बाग़बाँ होगा
ये आए दिन की छेड़ अच्छी नहीं ऐ ख़ंजरे क़ातिल
पता कब फ़ैसला उनके हमारे दरमियाँ होगा
जुदा मत हो मेरे पहलू से ऐ दर्दे वतन हरगिज़
न जाने बाद मुर्दन मैं कहाँ औ तू कहाँ होगा
वतन की आबरू का पास देखें कौन करता है
सुना है आज मक़तल में हमारा इम्तिहाँ होगा
शहीदों की चिताओं पर लगेगें हर बरस मेले
वतन पर मरनेवालों का यही बाक़ी निशाँ होगा
कभी वह दिन भी आएगा जब अपना राज देखेंगे
जब अपनी ही ज़मीं होगी और अपना आसमाँ होगा....
(कवी :- जगदंबा प्रसाद मिश्र)
त्या सर्व अमर जवानांच्या स्मृतीस माझा कडक सॅल्यूट आणि वंदन.. जय हिंद.
समाप्त.
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


एका हल्याचा बदला ( भाग १) ... विनीत वर्तक ©

एका हल्याचा बदला ( भाग १) ...  विनीत वर्तक ©

१४ फेब्रुवारी २०१९ ला झालेल्या पुलवामा इथल्या अतिरेकी हल्यात सी.आर.पी.एफ. च्या ४० जवान शहीद झाले. हल्ला इतका जबरदस्त होता की त्यादिवशी चं चित्र पूर्ण भारताला कुठेतरी आतून पोखरून गेलं. पाकीस्तान आजपर्यंत अतिरेकी आणि त्यांच्या मसीहांना पोसत आलेला आहे. त्याच पिलावळीच एक शेपूट म्हणजे जैशे ए मोहम्मद ही अतिरेकी संघटना. हीच संघटना पुलवामा हल्यासाठी जबाबदार होती. पाकीस्तान ने भूतकाळात ही असेच हल्ले करत भारताच्या अनेक निष्पाप नागरीक आणि सैनिकांचा बळी घेतलेला होता. त्यांनी हल्ला करायचा आणि भारताने फक्त तोंडाने वाफ सोडायची असा शिरस्ता गेली अनेक वर्ष चालू होता. पण ह्या वेळेस चा हल्ला भारताच्या सैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारा होता. पाकिस्तानी अतिरेक्यांनी अगदी टिपून भारतीय सैनिकांना आपलं लक्ष्य केलं होतं. ह्या ही वेळेस राजनैतिक संबंध, प्ररराष्ट्र धोरण आणि पाकीस्तान ची अण्वस्त्र ह्यांना घाबरून भारत पुन्हा काही दिवसांनी शांत होईल असा अंदाज पाकीस्तान आणि इतर देशांनी बांधला पण ह्या वेळेस च्या हल्याने कुठेतरी भारताच्या सहन करणाच्या क्षमतेला खिंडार पाडलं होतं. त्यानंतर जे झालं तो इतिहास आहे.

आज एक वर्षानंतर काही राजकारणी पुन्हा एकदा त्याच गोष्टींचं राजकारण करू पाहत आहेत. भारताने बालाकोट ने काय मिळवलं? इथपासून ते नक्की भारताने पुलवामा हल्याचा बदला घेतला का? ह्या सगळ्या प्रश्नांना धुमारे फुटले आहेत. मला त्यात जायचं नाही पण भारताने एक गोष्ट केली ज्याचा अभिमान आणि त्याचा प्रभाव येणारी अनेक वर्ष पाकिस्तानातील प्रत्येक अतिरेक्याच्या डोक्यात राहील. ती गोष्ट म्हणजे बालाकोट हवाई हल्ला. आज एका वर्षानंतर भारताच्या बदललेल्या भूमिकेचा प्रभाव कायम आहे. नक्कीच बालाकोट हल्याने आतंकवाद थांबणार नाही किंवा असे हल्ला पुन्हा होणार नाहीत ह्याची खात्री आपण देऊ शकत नाही. पण एक खात्री देऊ शकतो ती म्हणजे आता तोंडाने वाफा काढत भारत रडत बसणार नाही. अर्थात तशी कणखर भूमिका घेणारं राजकीय नेतृत्व, भारताची आर्थिक स्थिती आणि इतर देशांशी असलेले संबंध ह्याचा प्रभाव नक्कीच असेल पण तरीही कुठेतरी शहिदांच बलिदान वाया जाऊ देणार नाही.

एका चिनी जनरल ने म्हंटल होतं,

"If you know the enemy and know yourself, you need not fear the result of a hundred battles. If you know yourself but not the enemy, for every victory gained, you’ll also suffer defeat. If you know neither the enemy nor yourself, you will succumb in every battle".

पुलवामा हल्यानंतर भारताला ह्याची जाणीव झाली की आपण जर नुसत्या आण्विक युद्धाची भिती घेऊन कारवाई केली नाही नाही आणि आपल्या आर्थिक, सैनिकी शक्तीला कुठेतरी महत्व दिलं नाही तर पाकीस्तान असे हल्ले करत राहणार आणि भारताचे निष्पाप नागरिक आणि सैनिक मरत राहणार. पाकीस्तान चे नागरीक भारताचे शत्रू नाहीत तर भारताचे शत्रू पाकीस्तानी अतिरेकी आणि त्यांना पोसणारे आहेत. जर भारताला जर बदला घ्यायचा आहे तर तिथेच घ्यावा लागेल जिकडे सगळ्यात जास्ती दुखेल. जिकडे झालेली जखम दाखवता पण येणार नाही आणि लागलं ते सांगता पण येणार नाही. त्याचवेळी त्याने होणारं नुकसान येणाऱ्या काळात टोचत राहील. भारताने नेमकं हेच केलं.

चोरून अण्वस्त्रधारी झालेला पाकीस्तान आणि त्याचे मूर्ख राज्यकर्ते त्या अण्वस्त्रांचा प्रयोग कधीही करू शकतात त्यामुळेच बदला घेताना पण डोकं शांत ठेवून घ्यावा लागणार होता. एक चूक आणि त्याच परीवर्तन युद्धात किंवा भारताला त्याचे चटके लागू शकतात ते भारतावर बाजी उलटू शकते अशी बिकट परिस्थिती होती. एकीकडे त्या ४० जवानांच बलिदान, लोकांचा आक्रोश आणि प्रक्षोभ तर दुसरीकडे राजनैतिक संबंध, परराष्ट्र धोरण आणि पाकिस्तान आणि भारतातले त्याचे चाहते जे भारतात राहून त्यांची भाषा बोलत होते. ह्या सगळ्यांना एका दगडात गप्प बसवण्याचं शिवधनुष्य भारताच्या सेना, वायू आणि नौदला सोबत राजकीय नेतृत्वाला पेलायच होतं. २०१६ साली केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तान पुलवामा हल्यानंतर अश्या पद्धतीच्या हल्यासाठी आधीच तयारीत होता त्यामुळे पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करणं सोप्प ही नव्हतं आणि भारताला प्रतिउत्तर एकास दहा अश्या स्वरूपात द्यायचं होतं. त्यामुळे हा ऑप्शन बाजूला गेला. दुसरा ऑप्शन म्हणजे हवेतून ठरलेल्या लक्ष्यावर मारा करणं पण ह्यात एक अडचण होती ती म्हणजे नक्की शत्रू कुठे आहे त्या स्थानाचे कॉर्डीनेट माहित असणं अत्यंत गरजेचं होतं. कारण चुकीच्या ठिकाणी हल्ला झाल्यास निष्पाप लोकांचा बळी जाण्याची भिती होती.

भारताला जवळपास १५ अतिरेकी केंद्रांची माहिती होती जिकडे अतिरेकी तयार केले जातात. जेहाद च्या नावाखाली त्यांना निष्पाप लोकांवर गोळी
चालवण्यासाठी तयार केलं जाते. अश्या केंद्रांवर बॉम्ब टाकल्यास एकाचवेळी अनेक अतिरेक्यांचा खात्मा होऊ शकतो हे भारताला आणि भारताच्या सेनेला चांगलं ठाऊक होतं. पण अडचण एकच होती की ह्या सगळ्यात निरपराध लोकांना त्रास होता कामा नये पण त्याचवेळी पाकीस्तान च्या नाकावर टिच्चून बदला घ्यायचा होता. बालाकोट च अतिरेकी केंद्र मुख्य शहरापासून लांब तसेच वर्दळी पासून लांब होतं. त्याचवेळी तिकडे साधारण तयार झालेले आणि तयार होण्यासाठी आलेले जवळपास २००-३०० अतिरेकी जमले होते. पुलवामा हल्यानंतर सगळे त्या यशाचा आनंद साजरा करून अजून अश्या अनेक हल्याची तयारी करण्यात गुंग होते. त्यामुळे बालाकोट भारताच्या गुप्तचर संस्था आणि सेनेच्या रडारवर आलं.

क्रमशः

पुढल्या भागात बदल्याची आखणी आणि हवाई हल्ला करणाऱ्या विमानाची माहिती.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Thursday 13 February 2020

त्याच क्षणांसाठी... विनीत वर्तक ©

त्याच क्षणांसाठी... विनीत वर्तक ©

निसटलेले क्षण पुन्हा अनुभवता येतं नाहीत मात्र त्याच्या आठवणी प्रत्येक वेळी तोच अनुभव देतात. उन्हाने लाहीलाही झालेल्या जमिनीवर अचानक आलेला पाऊस निसर्गाची अगदी कूस बदलून टाकतो. तसाच काहीसा अनुभव आपण काही क्षणात घेतो. शाळेच्या त्या दिवसात भूत, भविष्य ह्यांचा विचार न करता मस्तीत जगणाऱ्या आपल्या निरागस मनाला कोणीतरी पटकन आवडू लागते. का? केव्हा? कधी? अश्या सगळ्या प्रश्नांच्या गर्दीत आपल्याला काहीतरी देणार कोणीतरी आपलच गवसलेलं असते. ती साथ, सोबत पण पुरेशी असते. तो आवाज, तो चेहरा बघितला तरी का कोणास ठाऊक मनात एक वेगळीच चलबिचल होते. हेच का प्रेम? हीच का ती व्यक्ती अश्या प्रश्नांचे धुमारे फुटायच्या आधी आणि कळायच्या आत तो चेहरा आणि ते क्षण मनाच्या कोपऱ्यात कधीच बंदिस्त झालेले असतात.

कॉलेज च्या त्या मयूरपंखी दिवसात आता निरागस भावनांची जागा शब्दरूपी अक्षरांनी तर व्यक्त होण्याची भाषा डोळ्यांनी  शिकलेली असते. आता कोणीतरी आवडलेलं सतत आपल्या सोबत हवसं वाटू लागते. अगदी कॉलेज, कॅन्टीन ते कट्टा सगळीकडे तीच व्यक्ती सोबत असावी ह्यासाठी आपण काही करायला तयार होतो. त्या व्यक्तीच्या नावडत्या गोष्टी आवडत्या बनतात तर आवडलेल्या आपल्या आयुष्याचा भाग बनतात. आता मनात असणाऱ्या भावना समोरच्याला वाटाव्या ह्यासाठी आपण चौकटीबाहेर जातो. एकदा की त्या समजल्या की मग त्याला त्याला स्वप्नांचे धुमारे फुटतात. स्वप्नच ती! कधी समुद्राच्या साक्षीने बघितलेली तर कधी मावळतीचा सूर्य क्षितिजावर जाताना रंगात नाहून निघालेली. काहीही आणि कशीही असली तरी ते क्षण मात्र प्रेमाच्या रंगात नाहून निघालेले. पहिल्यांदा होणारा तो हवाहवासा वाटणारा स्पर्श ते गरम श्वास, हृदयाची वाढलेली धडधड सगळच कसं कुठेतरी वेगळ्याच विश्वात नेणारं. ते क्षण सूर्यास्ता सोबत कधी अस्ताला जातात तर कधी एका नव्या पहाटेची स्वप्न बनतात. कसेही असले तरी ते आपलेच असतात. अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जरी आपण
एकदा विचार केला तरी तेव्हा सुद्धा आठवणींच्या कप्यात भिजवलेले ते सगळेच क्षण असे रंग उधळतात की आपण त्यांना कधीच विसरू शकत नाही.

आयुष्याच्या रहदारीत जोडीदार असलेले ते क्षण कधी हसवतात तर कधी रडवतात. कधी आपल्या सोबत असतात तर कधी आपल्यापासून खूप दूर जातात. आता स्पर्शाची ओढ जाणवत नसली तरी शब्दांचा उपवास मात्र खोलवर टोचतो. रोज उठून तेच पाढे म्हणताना कधीतरी त्याच क्षणांपासून ब्रेक घ्यावासा वाटतो. रोज नेहमीच क्षितिजावर दिसणारा सूर्य आता घडाळ्याच्या काट्यात दिसतो. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र झाली तरी पण कुठेतरी त्याच क्षणाचा आधार असतो. धावताना पडलो, अपयशी झालो तर त्याच क्षणांची भिंत आपल्या मागे भक्कमपणे उभी रहाते. तेव्हा असं वाटते की शांत डोकं ठेवावं त्या खांद्यावर आणि मोकळं व्हावं अगदी पूर्णपणे. पण निघणारे अश्रू आणि आधार देणारा खांदा तेव्हाच मिळतो जेव्हा त्या हरवलेल्या क्षणांना आपण जपलेलं असते. कधी कधी आयुष्यात निरागस क्षण किंवा रंग उधळणारे क्षण आपल्या सोबत नसतात तरीपण पावसाच्या सरीत आणि उन्हाच्या काह्लीत सावली देणारं ते झाड आपलच वाटते.

सगळं काही पूर्ण झालं तरी आयुष्याच्या एका प्रवासात पाहिलेले, अनुभवलेले ते निरागस आणि रंग उधळणारे क्षण मनाच्या कप्यात कुठेतरी रुजलेले असतात. आता काही नको असते फक्त त्या वेळी राहिलेल्या भावनांना एकदा मोकळं करावसं वाटते. राग- रुसवा आता आयुष्याच्या प्रवासात फिका पडलेला असतो. आता दिसतात त्या आठवणी ज्या आपल्या मनात चिरकाळ टिकलेल्या असतात काळाच्या घड्याळा पलीकडे अजूनही तरुण असतात. आता स्पर्शाची पण गरज नसते आणि शब्दांची पण. आता मनाच्या गप्पा मनाशी होतात. कधी लांबून तर कधी जवळून. आयुष्य गेलेलं असते राहिलेल्या असतात त्या आठवणी त्याच क्षणांच्या ज्याच्या सोबतीने आपण आयुष्य जगलेलो असतो.

आज १४ फेब्रुवारी म्हणजेच प्रेमाचा दिवस. माझ्या मते खरे तर हा त्या क्षणांचा दिवस आहे. काही आठवण्याचा, तर काही सांगण्याचा, तर काही अव्यक्त राहून खूप काही अनुभवण्याचा. आयुष्याच्या प्रवासात आपण कुठेही असो. कोणी आपल्याला आवडणार किंवा आपण कोणाला आवडणार असो वा नसो पण ते क्षण आपल्या सोबत नेहमीच असतात. कोणाचे त्या वळवाच्या पावसात भिजलेले तर कोणाचे सूर्याच्या रंगात नाहून निघालेले तर कोणाचे आयुष्याच्या घड्याळावर चालणारे तर कोणाचे सगळं काही बघून आठवणींच्या वारुळातून त्या मुंग्यांप्रमाणे बाहेर आलेले. म्हणून आज प्रेमाचा दिवस 'त्याच क्षणांसाठी' ज्याने आपल्या प्रत्येकाला काही न काही दिलं. ज्यांनी आपल्या आयुष्यात ते क्षण आणले त्या सर्वांसाठी शब्दरूपी भेट. 

मिळवलेलं सगळचं आपलं नसते,
गमावलेलं सगळचं गमावलं असं नसते,
जे गेलं त्यापेक्षा काय मिळालं हे महत्वाचं,
जे मिळालं त्यात आपण काय मिळवलं ते जास्ती महत्वाचं.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 

Monday 10 February 2020

एका अश्रूच दुःख... विनीत वर्तक ©

एका अश्रूच दुःख... विनीत वर्तक ©

नकार पचवायची आणि होकार स्विकारण्याची आपली मानसिकता कधीच संपली आहे. निर्भया शब्द आता अनेकवचन झाला आहे. घटना घडतात निर्भया त्यात बळी पडतात. आक्रोश करणारे दोन दिवसात विसरून आपल्या कामाला लागतात. डोळ्यावर पट्टी बांधलेली न्यायदेवता माणुसकीच्या नावाखाली दबून जाते आणि मग गुन्हा सिद्ध झाल्यावर ही माणुसकीचे गुणगान करत त्यांना शिक्षा दिली जात नाही. त्यामुळे आपलं कोणी काही बिघडू शकत नाही ह्याचा विश्वास निर्भया घडवणाऱ्या प्रत्येकाला वाटायला लागतो. ह्या मागच्या सगळ्या गोष्टींचं अवलोकन केलं तर अनेकांच्या मते ह्यात शिक्षण पद्धती दोषी असते, कोणाच्या मते पुरुषी मानसिकता तर कोणाच्या मते मुलांना नकार पचवायला शिकवलं जातं नाही. कारणे काही असोत पण बळी निर्भयाचा जातो हे अंतिम सत्य आहे.

विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल असणारं आकर्षण हे ठरलेलंच आहे. कोणत्याही वयात ते वाटणं ह्यात चुकीचं काहीच नाही. पण ते आकर्षण ज्या पद्धतीने ओरबाडून घेतलं जात आहे तो आपल्या समाजापुढला प्रश्न आहे. प्रेम ही तरल भावना कोणालाही कधीही कोणाबद्दल वाटू शकते. हेच शारीरिक आकर्षणाला लागू आहे. फरक इतकाच की एक समाजात मांडता येते दुसरी दबून ठेवण्याचं कसब शिकावं लागते. ह्या दोन्ही भावना जेव्हा तरलतेने व्यक्त होतात तेव्हा तो उच्च असा संगम असतो. त्यात त्या दोन व्यक्ती एका वेगळ्या पातळीवर एकरूप होतात. पण काळाच्या ओघात काही गोष्टी बदललेल्या आहेत. मी, माझं, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सुख प्राप्त करण्याची आगतिकता दोन्ही टोकावर न जमल्यामुळे आता गोष्टी ओरबाडून घेतल्या जात आहेत.

शारीरिक सुखाचं केंद्र जेव्हा लिंगात आहे हे ठासवण्यात माध्यम यशस्वी झाली तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम वाटायला लागल्या. मग फक्त लिंगाची ताकद दाखवण्याची चढाओढ सुरु झाली. ह्यात नकळत आपण ही ओढले गेलो हे कळेपर्यंत अनेक निर्भया घडवल्या गेल्या आणि अजून घडवल्या जात आहेत. शारीरिक पातळीवर ह्याची जागा बलात्काराने घेतली तर मानसिक पातळीवर त्याची जागा अहंकाराने घेतली. मग त्याला कुरवाळणं हे सुरु झालं. आज ज्या पद्धतीने आपले विचार कृत्रिम होतं आहेत ते ह्याचच द्योतक आहे. आज अनेक निर्भया ह्या लग्नाच्या बेडीत अडकून पुरुषी लिंगाचा अहंकाराचा रोज अनुभव घेतात कारण समाजच्या बेडीत त्यांना व्यक्त होता येतं नाही. मानसिक अहंकारा बद्दल तर न बोललेलं बरं कारण त्याची मोजदाद केली तर अश्या प्रसंगातून न गेलेल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच असतील.

सगळ्याच वेळेस टाळी एका हाताने वाजत नाही हे कितीही खरं असलं तरी त्या वाजलेल्या टाळीच हिंस्त्र रूप मात्र पुरुषाकडून स्रीवर होणाऱ्या अत्याचारात दिसते हे सत्य आहे. बलात्कार असो व माझी नाही तर कोणाची नाही ह्यासाठी ऍसिड हल्ला अथवा पेटवून देणं असो हे आपल्या समाजाने कुरवाळलेल्या पुरुषी अहंकाराचे एक प्रतीक आहे. शारिरीक सुख जेव्हा लिंगात आलं तेव्हा त्यातलं नावीन्य ही तितक्याच लवकर संपलं मग काहीतरी नवीन च्या मागे लागताना आपण आज अगदी वयाच्या, नात्यांच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. सगळाच दोष पुरुषाचा असं मानून पुढे जाणं हे चुकीचं कारण त्याला घडवणारी त्याच्या यशात, अपयशात मागे उभी असणारी स्री असते. त्यामुळे कोण चुकीचं आणि कोण बरोबर ह्या पेक्षा त्या अश्रूच्या दुःखाची जाणीव आपण दोघानांही करून दयायला हवी.

अडकलेला पतंग तिकडे ही चांगला दिसतो. त्याचा बाजार करून फाडण्याची गरज नसते ही मानसिकता आज स्री आणि पुरुष दोघांमध्ये ही रुजायला हवी. हारके जितने वाला बाजीगर असतो आणि ते हरणं म्हणजे आपल्या निस्सीम, स्वच्छ, तरल भावनांचा सन्मान असतो हे कुठेतरी मनात उमटायला हवं. शारिरीक सुखाच अंतिम स्थानक एकचं असलं तरी तिकडे होणारा प्रवास हा जास्ती आनंददायी असतो हे जेव्हा कळेल तेव्हा अंतिम ठिकाणावर जाण्यासाठी आता होतं असलेली धडपड नक्कीच कमी होईल. आज किती निर्भयांना आपला समाज स्विकारतो हे आपण आपल्या वरून ठरवायला हवं. आज माझा मुलगा, नातू, पणतू, नवरा, भाऊ अथवा कोणत्याही नात्यातला पुरुष निर्भयाला तो सन्मान देऊ शकतो का? तिला आपल्या आयुष्यात जोडीदार बनवू शकतो का? ते सगळं स्वीकारण्याची आपल्या सोबत आपल्या कुटुंबाची मानसिकता आहे का ह्याचा विचार जेव्हा समाजात होईल तेव्हाच त्या अश्रूंच्या दुःखाला खरा न्याय मिळेल.

कोणी प्रत्येक घटनेतून काय शिकावं हा ज्याचा त्याचा निर्णय.  पण जर आपण वेळीच सावरलो नाही तर ह्या समाजाचा भाग म्हणून कदाचित ते अश्रू आपल्या डोळ्यातून यायला वेळ लागणार नाही. अर्थात किती लोकं ह्याचा विचार करतील हा वेगळा भाग आहे. कारण शब्द विरून जायला आजकाल एका नोटिफिकेशन ची गरज लागते. अश्रूंची दुःख आज काल डोळे पण ओले करत नाहीत कारण भावना इतक्या दगड झाल्या आहेत की एका पानावरुन आपण दुसऱ्या पानावर जात रहातो. निर्भया मात्र शांतपणे ह्या अश्रुंचे हुंकार देतं त्या आंधळ्या न्यायदेवतेकडे न्यायाची आस लावून बघत बसते.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Sunday 9 February 2020

अवकाशाला गवसणी घालणारी क्रिस्टिना कोच... विनीत वर्तक ©

अवकाशाला गवसणी घालणारी क्रिस्टिना कोच... विनीत वर्तक ©

'If you want to shine like a sun, first burn like a sun'.... Dr. A. P. J. Abdul Kalam

कोणताही यशाचा क्षण यायला अनेक वर्ष मेहनतीची जावी लागतात. कदाचित हाच अनुभव आज क्रिस्टिना कोच घेतं असेल. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे की पृथ्वीपासून साधारण ४०० किलोमीटर उंचीवर पृथ्वीभोवती फिरत आहे तिकडे जवळपास ३२८ दिवसांचा काळ व्यतीत करून एक जागतिक विक्रम क्रिस्टिना कोच ने आपल्या नावावर केला आहे. सर्वाधिक काळ एक सलग अवकाशात राहण्याचा विक्रम तिने केला आहे. पेगी विटसन च्या नावावर ३ मोहिमेत ६६५ दिवस राहण्याचा जागतिक विक्रम आहे पण क्रिस्टिना कोच ने एकाच मोहिमेत सलग इतके दिवस राहून अवकाशात स्री च्या अस्तित्वाचा एक नवीन झेंडा रोवला आहे.

क्रिस्टिना कोचच्या मते तिचा विक्रम हा तिच काम करताना झालेला एक प्रवास आहे. अवकाशात राहून क्रिस्टिना कोच ने अनेक गोष्टींवर काम केलं आहे ज्यात प्रामुख्याने अवकाशात इंधन कसं जळते? त्यातून निर्माण होणारा धूर तसेच ती विझवण्यासाठी काय करावं लागेल? ह्याच सोबत इंधन अजून जास्ती चांगल्या पद्धतीने कसं वापरता येईल ज्यायोगे पृथ्वीवरील प्रदूषण कमी होईल. ह्या शिवाय अवकाशात वाढणाऱ्या झाडांवर प्रयोग केले आहेत. झाडांच्या वाढीवर गुरुत्वाकर्षण आणि वातावरण ह्यांचा कसा प्रभाव पडतो. ह्या शिवाय वृक्ष रोपण आणि त्यांची देखरेख  इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये कसं अवकाशवीरांच्या मनस्थितीवर प्रभाव पाडते. ह्याच सोबत इतका जास्त काळ अवकाशात राहिल्याने किडनी तसेच शरीरांच्या कार्यावर होणारा परिणाम. तसेच प्रोटीन क्रिस्टल च्या रूपात तिने केलेलं संशोधन पार्किन्सन आणि अल्मायझर रोगांवर सगळ्यांना उपयोगी पडणार आहे. एक स्री म्हणून अवकाशात स्री च्या शरीरावर होणाऱ्या  परिणामांचा अभ्यास करण्यात तिने मोलाची भूमिका बजावलेली आहे. जास्ती वेळ अवकाशात राहण्यापेक्षा ह्या प्रयोगातून पुढे आलेले निष्कर्ष हे तिचं यश आहे.


क्रिस्टिना कोच ने १२ मार्च २०१९ ला अवकाशात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर आपलं पाऊल ठेवलं होतं. जवळपास ३२८ दिवसांचा काळ तिने इकडे सलग व्यतीत करताना १८ ऑक्टोबर २०१९ ला तिने जेसिका मिर सोबत पहिल्यांदा 'ऑल वूमन स्पेस वॉक' करून एक इतिहास रचला. ह्या स्पेस वॉक मध्ये तिने इंटरनॅशनल स्पेस स्टेशन च्या पॉवर सिस्टीम मध्ये काही अपग्रेड केले त्याच सोबत काही प्रयोग ही केले. ह्या काळात तिने ५२४८ वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. दररोज १६ वेळा सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दर्शन घेतलं. जवळपास २२३ मिलियन किलोमीटर चं अंतर तिने ह्या काळात कापलं. १९६१ जेव्हा मानव अवकाशात  गेला तेव्हापासून ५६० पुरुष अवकाशात गेले आहेत तर फक्त ७० स्त्रिया आजवर अवकाशात जाऊ शकल्या आहेत. स्री अवकाशात पण पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करू शकते हे तिने दाखवून दिलं आहे. आपला प्रवास सांगताना ती सांगते,

“We both drew a lot of inspiration from seeing people who were reflections of ourselves as we were growing up, and developing our dreams to become astronauts, Diversity is important and it is something worth fighting for.”

“We caught each other’s eye and we knew that we were really honoured with this opportunity to inspire so many, and just hearing our voices talk to Mission Control, knowing two female voices had never been on the loops, solving those problems together outside – it was a really special feeling.”

क्रिस्टिना कोच चा जन्म २९ जानेवारी १९७९ ला  अमेरीका ला झाला. विद्युत अभियांत्रिकी मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर तिने नासा मध्ये प्रवेश घेतला. २०१३ साली तिची निवड अवकाशयात्री म्हणून झाली. आपलं ट्रेनिंग यशस्वीपणे पूर्ण केल्यावर २०१९ साली तिने अवकाशात उड्डाण केलं. नासाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अवकाश यात्रींची ने आण करणाऱ्या रॉकेट प्रक्षेपणात बदलावं केल्याने तिचा मुक्काम वाढला. ६ फेब्रुवारी २०२० ला रशियाच्या सोयूझ कॅप्सूल मधून ती पुन्हा पृथ्वीवर उतरली. जवळपास ३२८ दिवसांनी पहिल्यांदा जमिनीला लागलेले पाय आणि अंगावर येणाऱ्या वाऱ्याच्या त्या झुळुकेचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून त्या दिवशी वाहत होता.

क्रिस्टिना कोच ने आपल्या जिद्दीने, मेहनतीने एक नवा आदर्श जगातील समस्त स्री वर्गापुढे ठेवला आहे. तिच्या कर्तुत्वाला माझा सलाम. येणाऱ्या अनेक पिढयांना क्रिस्टिना कोचचा प्रवास प्रेरणा देतं राहील.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Saturday 8 February 2020

आयुष्य जगलेली माणसं भाग १ ( बाबा आमटे )... विनीत वर्तक © (Re-Post)

आज एका महान तपस्वी ची पुण्यतिथी आहे. त्यांच्यावर लिहलेला एक लेख. ह्या शब्दातून त्यांच्या कार्याला माझा सॅल्यूट..

आयुष्य जगलेली माणसं भाग १ ( बाबा आमटे )... विनीत वर्तक © (Re-Post)

बाबा आमटे हे नाव ऐकताच आनंदवन आणि कुष्ठरोग्यांसाठी काम करणार एक महान व्यक्तिमत्व म्हणून आपल्या समोर त्यांचा चेहरा उभा रहातो. पण बाबा आमटेंच्या आयुष्याचा प्रवास हा तितकाच प्रेरणादायक आहे हे खूप कमी जणांना माहित असेल. बाबा आमटेंचा जन्म २६ डिसेंबर १९१४ ला हिंगणघाट, वर्धा ह्या महाराष्ट्रतल्या जिल्ह्यात झाला. एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या बाबा आमटे ह्यांचे वडील त्याकाळी ब्रिटीश सरकारमध्ये अधिकारी होते. त्यामुळे लहानपणापासून बाबा आमटेंना श्रीमंती अनुभवायला मिळाली. मग ती शिकार करण्यासारख्या आवडी पासून असो ते महागड्या गाड्या पायाशी असण्यापर्यंत असो. काहीही कमी नव्हतं. पण बाबा आमटेंच्या मनात वेगळच होतं. लहानपणापासून जरी सगळी सुख पायाशी लोळण घेत होती तरी समाजात असलेली गरिबी, जाती व्यवस्थेतील दरी त्यांच्या नजरेतून लपलेली नव्हती. वकिली शिक्षण पूर्ण केल्यावर खरे तर एक सामान्य आयुष्य त्यांना आरामात जगता आलं असतं. पण असामान्य असणाऱ्या माणसांना वेगळीच क्षितीज खुणावत असतात.

घराच्या भोवती असलेल्या भिंतींच्या बाहेरच जग बाबा आमटेंच्या मनाला कुठेतरी अस्वस्थ करत होतं पण त्याचवेळी ह्या अभेद्य भिंती ज्या समाजातील स्टेटस आणि श्रीमंतीवर बांधलेल्या होत्या त्या त्यांना त्या पलीकडे बघण्यास मज्जाव करत होत्या. दिवसेंदिवस वाढणारा हा असंतोष मग एक अशी वेळ घेऊन आला ज्याने बाबा आमटे आणि एकूणच त्यांच्या आणि त्यांच्या नंतर येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या आयुष्याला एक वेगळ वळण मिळालं. आपली सर्व सुख आणि कुटुंब बाजूला ठेवून बाबा आमटेंनी महात्मा गांधी आणि विनोबा भावे ह्यांच्या विचारांचा रस्ता निवडला. त्यांनी समाजातील उपेक्षित आणि गरीब लोकांसाठी काम सुरु केलं. त्यांची दुःख समजून घेण्यसाठी त्यांच्या सोबत राहण्यास ही त्यांनी मागेपुढे बघितलं नाही. असच एका दिवशी काम करत असताना कुष्ठरोगाने पिडीत असलेल्या एका माणसाला ते अडखळले. पहिल्यांदा त्याची अवस्था बघून त्यांना खूप भीती वाटली. पण कुठेतरी त्या माणसाच्या अतिशय हालाखीच्या अवस्थेने त्यांना आतून अस्वस्थ केलं. ह्या अश्या भीषण अवस्थेत असलेला तो कोणतरी आधी माणूस होता मग आता आजारामुळे त्याच माणूसपण संपल का? ह्या एका विचाराने त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले. कुठेतरी आपण काहीतरी करायला हवं हा विचार आतून त्यांना साद घालत होता. अश्या वेदना देणाऱ्या आजारावर एकच उपचार होता तो म्हणजे माणुसकीच प्रेम. वयाच्या ३४ वर्षी त्यांनी हेच प्रेम कुष्ठरोग्यांना देण्याचा एक निर्णय घेतला. ह्यानंतर पुढे जे घडलं तो इतिहास आहे.

कुष्ठरोगाची माहिती, त्याच निवारण, उपचार ह्या सगळ्याची माहिती घेतल्यावर आपली पत्नी (साधनाताई आमटे), दोन लहान मुलं ( डॉक्टर विकास आमटे आणि डॉक्टर प्रकाश आमटे), एक गाय, चार कुत्रे आणि सहा कुष्ठरोगी, काही पैसे आणि महाराष्ट्र सरकारने दिलेल्या ५० एकर च्या पडीक जमिनीवर “आनंदवन” ची स्थापना केली. समाजाने वाळीत टाकलेल्या लोकांना दिलेल्या पडीक जमनीवर बाबा आमटे आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाने आपल्या सहकाऱ्यांनसोबत एक आनंदवन फुलवलं. आनंदवन आज ४५० एकर पेक्षा जास्त जागेवर वसलेलं असून त्यात ५००० पेक्षा जास्त कुष्ठरोगी उपचार घेत आणि रहात असून त्यात दोन हॉस्पिटल, एक कॉलेज, अंधांसाठी तसेच मुकबधिरांसाठी शाळा आहे. ह्याशिवाय आनंदवनात आज असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत ज्याच्यावर अजून एक पुस्तक होऊ शकेल. त्यांच्या ह्या कार्याचा उल्लेख करताना बौद्ध धर्मगुरु दलाई लामा ह्यांनी म्हंटल होतं,

“In creating Anandwan, (Amte) provided a practical opportunity for people even with crucial disadvantages to show that they could regain dignity and come to be recognized as productive members of society.”

आपलं कार्य आनंदवन पुरती मर्यादित न ठेवता बाबा आमटेंनी अशोकवन हा आश्रम १९५५ साली तर सोमनाथ ह्या प्रकल्पाची १९६७ साली मुहूर्तमेढ रोवली. आपलं कुष्ठरोग निवारण्याच कार्य पुढे चालू ठेवताना १९७३ साली गडचिरोली इथल्या हेमलकसा इकडे लोक बिरादरी प्रकल्प माडिया, गौंढ ह्या आदिवासी जमातीसाठी सुरु केला. आज लोक बिरादरी प्रकल्पामधून वर्षाला ४०,००० पेक्षा जास्त लोकांना हेल्थ केअर ची मदत केली जाते. इथल्या शाळेत ६०० पेक्षा जास्ती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बाबा आमटेंच हे कार्य त्यांच्या दुसऱ्या, तिसऱ्या पिढीने त्याच निष्ठेने, त्याच निस्वार्थी भावनेने पुढे चालू ठवले आहे. इतकं सगळं करून सुद्धा बाबा आमटे आपल्या कार्याबद्दल म्हणतं,

“I took up leprosy work not to help anyone, but to overcome that fear in my life. That it worked out good for others was a by-product. But the fact is I did it to overcome fear”

बाबा आमटेंनी फक्त एक चळवळ उभी नाही केली तर पूर्ण समाजाला आपल्या चळवळीने समाजाची विचारसरणी बदलायला प्रवृत्त केलं. ज्या नापीक जमिनीवर आनंदवनाची सुरवात केली जिकडे लोकांना वाळीत टाकलं जायचं, जिकडे जायला लोक घाबरत. समाजाच्या दृष्टीने तो भाग संस्कृतीच्या बाहेरचा आणि खालच्या दर्जाचा होता. आज तेच आनंदवन आणि तेच हेमलकसा जगाच्या पटलावर सामाजिक कार्यांच एक मापदंड म्हणून ओळखलं जाते. बाबा आमटेंच्या ह्या कार्याचा गौरव खुद्द युनायटेड नेशन नी बाबा आमटेंना १९८८ साली पुरस्कार देऊन केला आहे.

आज सोशल टुरीझम म्हणून आनंदवन आणि हेमलकसा ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. ज्या आनंदवनात आणि हेमलकसा ला लोकं जायला घाबरायचे तिकडे आज दोन महिने आधी बुकिंग करावी लागते. पण तिकडे जाणारे नक्की कशासाठी जातात हे मात्र सगळ्यांनी शिकण्याची गरज आहे. बाबा आमटेंच कार्य, त्याचं पूर्ण आयुष्य आपण एकदा वाचलं तरी सुद्धा आपण आयुष्यात काय करू शकतो ह्याची जाणीव आपल्याला होईल. पैश्याने सर्व सुखं पायाशी लोळत असली तरी समाधान मात्र कमवावं लागते. ते कसं? हे शिकायचं असेल तर बाबा आमटेंच आयुष्य आपल्या सगळ्यांना नेहमीच मार्गदर्शन करेल.

फोटो स्त्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Friday 7 February 2020

दोन स्पेशल... विनीत वर्तक ©

दोन स्पेशल... विनीत वर्तक ©

दूरचित्र वाहिनी वरचे कार्यक्रम बघण्याचा योग तसा मला कमीच येतो. पण जेव्हा कधी बघतो तेव्हा काहीतरी आनंद आणि समाधान देणारे कार्यक्रम. काल अश्याच एका कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कलर्स मराठी वाहिनी वरचा 'दोन स्पेशल' हा कार्यक्रम खूप काही देऊन गेला. मला आवडणारे दोन प्रसिद्ध कलाकार. अभिनयाच्या उंचीपेक्षा माणूस म्हणून त्यांची उंची मला नेहमीच आवडत आलेली आहे. त्यांचे चित्रपट, नाटके किती प्रसिद्ध आणि किती पैसे कमावतात ह्यापेक्षा अभिनयाचा उच्च दर्जा, त्याच टायमिंग आणि त्याला वास्तवतेची जोड अश्या काही गुणांमुळे आवडत असणारे दोन स्पेशल कलाकार कालच्या आणि त्या आधीच्या भागात आले होते. ते म्हणजे मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे. 

ह्या दोन्ही कलावंताचा प्रवास त्यांच्या तोंडून ऐकणं म्हणजे एक पर्वणी. कोणताही गॉडफादर चित्रपट सृष्टीत नसताना आपलं नाव चित्रपट सृष्टीत आणणं  ते प्रसिद्धीच्या टोकावर असताना सुद्धा आपल्या मातीशी पाय घट्टपणे रोवून उभं राहणं हे दोघांकडून पण शिकण्यासारखं आहे. कदाचित ह्याच रहस्य त्यांनी ह्या शिखरावर येण्यासाठी केलेल्या मेहनतीत असेल. अगदी घरची परिस्थिती बेताची आणि खिशात पैसे नसताना आपल्या अभिनयाच्या जोरावर झगडत ह्या दोघांनी आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. त्यासाठी अगदी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म झोपणं असो किंवा नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर आपली रात्र काढणं असो. आयुष्याच्या दोन्ही टोकांना अनुभवलेले हे अभिनेते रुपेरी पडद्यावर काम करूनपण आजही आयुष्याच्या खऱ्या प्रवासाशी नाळ बांधून आहेत. त्यामुळेच कालच्या कार्यक्रमात त्यांचा प्रत्येक शब्द, अनुभव सगळच कुठेतरी आतून येतं होतं आणि ते आतून येतं होतं म्हणून आतवर रुजत होतं.

एका क्षणी बेभान होऊन हसत असताना दुसऱ्या क्षणाला डोळ्यांच्या पापण्या ओल्या होण्याचा अनुभव हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येकाने अनुभवला असेल. त्यामुळेच हे कलाकार म्हणून जितके मोठे आहेत त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून जास्ती मोठे आहेत. कारण एकाचवेळी आसू आणि हसू प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर यायला त्या गोष्टी कुठेतरी खूप आतवर जाव्या लागतात. समाजात एक विशिष्ठ उंची गाठल्यावर पण आपल्या त्या दिवसांना न विसरता ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं त्याला परत काहीतरी देण्याचा उदात्त विचारच त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेची उंची दाखवतो. नुसत्या विचारांवर न थांबता त्याची सुरवात अगदी स्वतःपासून करून पूर्ण समाजाला त्यात सामील करून घेण्यासाठी चाललेला त्यांचा प्रयत्न आदर्श म्हणून घ्यावा असाच आहे. नाम फौंडेशन असो वा सयाजी शिंदे ह्यांची वृक्ष बँक. त्यांच्या प्रत्येक शब्दात ह्या कामासाठी असलेली तळमळ दिसत होती. कुठेतरी हे काम आतून आलेलं आहे म्हणून आज त्याला कोणत्याही स्पॉन्सर शिवाय प्रसिद्धी आणि समाजाचा हात मिळत आहे.

रुपेरी पडद्यावर असो वा सामाजिक जीवनात इतकं सगळं काम करत असताना पण घरच्या लोकांशी त्यांच जोडलेलं असणं पण काल निशब्द करून गेलं. आपल्या आईचा फोटो बघताना भावनिक झालेले सयाजी शिंदे बघताना काल माझ्या डोळ्यांच्या पापण्या कधी ओल्या झाल्या माझं मलाच कळलं नाही. कारण ते दिसण्यासाठी नव्हतं जे काही होतं ते खरं होतं म्हणून ते सरळ आत गेलं आणि मेंदूने विचार करायच्या आगोदर डोळ्यांना ते कळलं होतं. धरणावर एक कारकून म्हणून काम करणारे सयाजी शिंदे आणि फोटो नाहीत म्हणून चित्रपटासाठी फोटोची झेरॉक्स पाठवणारे मकरंद अनासपुरे ह्यांच्या प्रवासाने मला निशब्द तर केलच पण आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन दिला.

ह्या सगळ्या प्रवासात आलेल्या अनुभवांनी ह्या दोघांचं आयुष्य किती समृद्ध केलं असेल ह्याचा विचार मनात डोकावला. घरातील तीन लोकांनी आत्महत्या केली म्हणून नाम फौंडेशन ने एका शाळेतल्या विद्यार्थिनी ला केलेली मदत तिने हुंडा हवा म्हणून लग्न होऊ न शकलेल्या मुलींसाठी द्यावी ह्या अनुभवाने मला पण काहीकाळ निशब्द केलं. खारीचा वाटा उचलून खूप काही केलं अश्या अविर्भावात माझ्यासह अनेकजण असतात. पैसे दिले म्हणजे खूप काही आपण समाजासाठी केलं अशी भावना अनेकदा मनात येते पण असे काही अनुभव ऐकले की आपण किती खुजे आहोत हे आरश्यात दिसून येते.

कालचा दोन स्पेशल खरच माझ्यासाठी खूप स्पेशल होता. एक माणूस म्हणून त्या दोघांकडून खूप काही हाताशी लागलं. त्यांच्या इतकी मोठी चळवळ उभी करण्या इतपत मी मोठा नसलो तरी त्यांचा आदर्श मला नक्कीच प्रेरणा देतं राहील. मोठं असून पण मोठेपणाचा लवलेश नसलेल्या ह्या दोन स्पेशल कलाकारांना माझा कडक सॅल्यूट. सयाजी शिंदे आणि मकरंद अनासपुरे ह्यांनी जितेंद्र जोशी च्या दोन स्पेशल ला नुसतं स्पेशल नाही केलं तर अविस्मरणीय केलं.

फोटो स्रोत :- गुगल

Thursday 6 February 2020

आदित्य (भाग २ )... विनीत वर्तक ©

आदित्य (भाग २ )... विनीत वर्तक ©

सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात होणारे बदल पृथ्वीच्या वातावरणात खूप बदल करतात. सूर्याचं चुंबकीय क्षेत्र कश्या पद्धतीने पृथ्वीच्या वातावरणात बदल घडवतात हे अजून आपल्याला पूर्ण समजलेलं नाही. सूर्यावरच्या डागावरून सूर्य हा स्थिर नसून स्वतःभोवती फिरतो हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलेलं आहे. पण हे डाग तयार होतात कसे? सोलार प्लाझ्मा फुटतो कसा? सोलार फ्लेअर नक्की कश्या पद्धतीने पृथ्वीवर आदळतात ते त्यांचा परीणाम आणि ह्याच सोबत सूर्याच्या 'कोरोना' च तपमान हा सगळ्यात मोठा प्रश्न अजून आपल्यासाठी कोडं आहे. भारतात फार पूर्वीपासून सूर्याला अनन्यसाधारण महत्व दिलं गेलं आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवताना आजच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक अश्या नव्या भारतात अशीच एक मोहीम भारताने हाती घेतली आहे. सूर्याच्या न सोडवलेल्या कोड्यांना उत्तर शोधण्यासाठी भारत आपल्या परीने योगदान देण्यासाठी सज्ज झाला आहे. ह्या वर्षीअखेर भारताची इसरो सूर्याच्या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी एक मिशन सूर्याच्या दिशेने सोडतं आहे. ज्याचं नाव आहे 'आदित्य एल १'.

कोणतही मिशन म्हंटलं की त्याची काही उद्दिष्ठ असतात. सूर्याच्या 'कोरोना मधील तपमानाच्या कोड्यांना' ला आपलं मुख्य लक्ष ठेवताना सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचे पृथ्वीवर होणारे परीणाम, त्याच सोबत सोलार प्लाझ्मा आणि सोलार फ्लेअर सारख्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी इसरो ने आदित्य एल १ मिशन ची आखणी  केली आहे. आधी सांगितलं तसं ह्या मिशन साठी सगळ्यात महत्वाचं आहे ते सूर्याच्या कोरोना वर सतत लक्ष ठेवणं त्याच्या तपमानात होणारे बदल नोंदवणं त्याशिवाय त्याच्यातून येणाऱ्या क्ष किरणांचा अभ्यास करणं जेणेकरून कोरोना च्या इतक्या प्रचंड तपमानाचा उलगडा होऊ शकेल. त्यामुळे आदित्य एल १ प्रक्षेपित केल्यावर ते सतत सूर्याच्या समोर राहणं गरजेचं आहे.अवकाशात सूर्याचं जसं गुरुत्वाकर्षण आहे तसचं पृथ्वी चं ही आहे. ह्या दोन्ही गुरुत्वाकर्षणावर मात करून सतत सूर्य दिसतं राहील अश्या ठिकाणी यान प्रक्षेपित करणं गरजेचं आहे. त्यामुळेच आदित्य ला एल १ ह्या ठिकाणी भारत प्रक्षेपित करणार आहे.

'एल १' काय भानगड आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन बलांचा अभ्यास करावा लागेल. सूर्याभोवती आपली पृथ्वी एका कक्षेत फिरते. सूर्याचं गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड आहे तर पृथ्वी सूर्यावर जाऊन आदळायला हवी. पण तसं होतं नाही. ह्याला कारण आहे सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीला अगदी विरुद्ध असं एक बल कार्यरत आहे ज्याला सेंट्रीफ्युकल फोर्स ( केंद्रापासून दूर जाणारं बल ) असं म्हणतात. जेव्हा ही दोन्ही बल समान असतात तेव्हा पृथ्वी एका स्थिर कक्षेत सूर्याभोवती फिरत रहाते. जेव्हा एखादं यान सूर्य आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते तेव्हा त्याला ह्या दोघांच्या गुरुत्वाकर्षण बलावर मात करणं गरजेचं असते. त्यासाठी त्याला जास्ती सेंट्रीफ्युकल फोर्स ( केंद्रापासून दूर जाणारं बल ) ची गरज लागते. जेवढा जास्ती वेग तेवढं हे बल जास्ती म्हणजेच जास्ती वेगासाठी जास्ती इंधनाची गरज. पण ह्या दोघांच्या भोवती अश्या ५ जागा आहेत. जिकडे सूर्य आणि पृथ्वी चं गुरुत्वाकर्षण एकमेकांना मारक ठरते. त्या जागांना लाग्रांगीण (Lagrangian) असं म्हणतात. ह्या ५ ठिकाणी यान जर आपण प्रक्षेपित केलं तर कमीत कमी इंधनात ते पृथ्वी आणि सूर्याभोवती फिरत राहू शकेल. ह्याच ठिकाणी दुर्बिणी अथवा यान पाठवण्यात येतात जेणेकरून त्यांचं आयुष्य वाढेल.

इसरो चं आदित्य मिशन लाग्रांगीण (Lagrangian) १ ह्या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात येणार आहे म्हणून ह्या मिशन चं नाव आदित्य एल १ असं आहे. हा भाग सूर्य आणि पृथ्वी ह्यांच्या मधे पृथ्वीपासून सुमारे १.५ मिलियन किलोमीटर वर आहे. एल १ भागात आदित्य मिशन पाठवल्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय आदित्य सतत सूर्याचा वेध घेऊ  शकणार आहे. ह्याशिवाय कमीत कमी इंधनात ते सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत राहणार आहे. इसरो चं वर्कहॉर्स रॉकेट पी.एस.एल.व्ही. एक्स एल साधारण १५०० किलोग्रॅम वजनाच्या आदित्य एल १ ला पृथ्वीपासून १.५ मिलियन किलोमीटर घेऊन जाणार आहे. आदित्य एल १ वर ७ वैज्ञानिक उपकरणं लावली जाणार असून ही सर्व उपकरणं सूर्याच्या अनेक रहस्यांचा वेध घेणारआहेत. ह्या सर्व उपकरणांची निर्मिती पूर्णपणे भारतात केलेली आहे. 'मेक इन इंडिया' हा टॅग घेऊन जेव्हा आदित्य लाग्रांगीण (Lagrangian) १ वर प्रक्षेपित होईल तेव्हा जगातील सर्व संशोधकांचं लक्ष त्याच्यावरील उपकरणांनी सूर्याच्या कोरोना आणि इतर गोष्टींच्या टिपलेल्या आकड्यांकडे असणार आहे.

लालबुंद सूर्याला सफरचंद समजून त्याला पकडण्यासाठी उडी घेतलेल्या हनुमानाची गोष्ट आपण सगळ्यांनी वाचलीच असेल. ह्या उडी नंतरच हनुमानाच्या शक्तींची जाणीव पूर्ण स्वर्गलोकाला झाली. त्याचप्रमाणे इसरो ची आदित्य उडी येणाऱ्या काळात सूर्याच्या अनेक कोड्यांना सोडवण्यात महत्वाची भूमिका बजावेल त्याचसोबत भारताच्या तांत्रिक प्रगतीची ताकद सगळ्या जगाला दिसेल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही. इसरो च्या आदित्य मिशन साठी सर्व वैज्ञानिक आणि अभियंतांना खूप खूप शुभेच्छा.

फोटोत लाग्रांगीण (Lagrangian) पॉईंट च्या पाच जागा. ह्यातील एल १ जागेवर आदित्य मिशन जाणार आहे.

फोटो स्रोत :- गुगल

समाप्त.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Tuesday 4 February 2020

आदित्य (भाग १)... विनीत वर्तक ©

आदित्य  (भाग १)... विनीत वर्तक ©

आदित्य म्हणजेच आपला सूर्य. आपल्याला सगळ्यात जवळचा तारा. पृथ्वीवर जीवसृष्टीचा निर्माता आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अतिशय महत्वाचं स्थान असणाऱ्या ह्या सूर्याबद्दल आपलं ज्ञान तसं थोडं कमीच आहे. सूर्य ह्या विश्वाच्या पसाऱ्यात एक सामान्य तारा आहे. खूप मोठा ही नाही आणि खूप लहान ही नाही. आपल्या आकाशगंगेत एका टोकावर तो आहे. सूर्याचं प्रचंड मोठं असलेलं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या रोखाने आलेल्या सगळ्या धूमकेतू अथवा लहान मोठ्या खडकांना त्याच्याकडे खेचून आपल्या पृथ्वीचं संरक्षण करतो. असा हा सूर्य प्रत्येक क्षणाला ४ बिलियन बिलियन बिलियन ( ४ वर २६ शून्य ) वॅट इतका प्रकाशमान (सूर्याच तेज) असतो. हे प्रकाशमान कमी जास्त होतं असते. प्रत्येक ११ वर्षात सूर्याचं तेज सगळ्यात कमी आणि जास्ती होते. ह्या सगळ्या बदलांचा परीणाम पृथ्वीवर पडतो. सूर्याच्या प्रकाशमानात होतं असलेले बदल पृथ्वीवर खूप मोठा परीणाम करतात त्यामुळेच सूर्या बद्दल जाणून घेणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. 

अतिशय तेजोमय असलेल्या सूर्यावर ही डाग आहेत. सूर्य आपल्याला दिसतो तसा नाही. जो गोलाकार आकार आपल्याला दिसतो त्याला सूर्याचा 'फोटोस्पिअर' असं म्हणतात. खरे तर सूर्यावर जमीन नाही. सूर्य तप्त वायूचा गोळा आहे. ह्या गोळ्यात अनेक प्रक्रिया सुरु असतात. प्रत्येक क्षणाला सूर्य ६०० मिलियन टन हायड्रोजन चं ५९६ मिलियन टन हेलियम मध्ये रूपांतर करतो. ह्या प्रक्रियेत जी ऊर्जा निर्माण होते त्याने सूर्य प्रकाशमान होतो. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रक्रियेमुळे सूर्यावर चुंबकीय प्रक्रिया सुद्धा सुरु असतात ह्याचाच परीणाम म्हणजे सूर्यावर काही भागात सोलार प्लाझ्मा अडकतो. तिकडे सूर्याचं तपमान कमी म्हणजे ४००० डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरते. सूर्याच्या इतर भागात त्याचवेळी तपमान ६००० डिग्री सेल्सिअस च्या आसपास असते. जेव्हा आपण पृथ्वीवरून सूर्याकडे बघतो तेव्हा हाच कमी तपमान असलेला भाग आपल्याला डागांच्या रूपात दिसतो. सूर्याचे हे डाग कधीतरी अचानक फुटतात. फुटल्यावर त्यात अडकलेला सोलार प्लाझ्मा अवकाशात फेकला जातो. ह्यालाच आपण 'सोलार फ्लेअर' म्हणतो.

जेव्हा सूर्याकडून अश्या सोलार फ्लेअर फेकल्या जातात त्यात अनेक विकिरण तसेच इतर अनेक कण पृथ्वीवरपण आदळतात. आपलं नशीब चांगलं की पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र प्रबळ असल्याने हे कण पृथ्वीच्या ध्रुवांकडे खेचले जातात. ह्याच कणांना आपण ध्रुवीय प्रदेशातून (नॉर्वे आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशातून)  हिरव्या, निळ्या रेषांच्या रंगात आकाशात बघू शकतो ज्याला 'ऑरोरा बोरलिस' असं म्हणतात. आपल्या सूर्याचं गूढ मात्र अजून एका गोष्टीत आहे. ती गोष्ट म्हणजे सूर्याचा 'कोरोना'. आधी सांगितलं त्या प्रमाणे सूर्य हा तप्त वायूचा गोळा आहे. ह्या गोळ्याच्या आजूबाजूला जे वातावरण आहे जे की सूर्यापासून हजारो किलोमीटर दूरवर पसरलेलं आहे. ह्या भागाचं तपमान साधारण ५५०० डिग्री सेल्सिअस च्या आसपास आहे. पण ह्याच्या पलीकडे सूर्याचा 'कोरोना' सुरु होतो. वास्तविक बघता जर आपण सूर्यापासून लांब गेलो तर हळूहळू सूर्याची झळ कमी व्हायला हवी असं विज्ञान सांगते. पण कोरोना च्या बाबतीत मात्र नेमकं उलट घडते.

सूर्याच्या कोरोना चं तपमान कमी होतं नाही तर इतकं वाढते की जितकं सूर्याचं तपमान पण नाही. सूर्याच्या कोरोना चं तपमान साधारण १ मिलियन डिग्री सेल्सिअस ते १० मिलियन डिग्री सेल्सिअस च्या आसपास आहे. ( १० लाख डिग्री ते १ कोटी डिग्री सेल्सिअस). कोरोना मध्ये असं काय होते की त्याच तपमान इतकं प्रचंड वाढते ह्याच उत्तर अजून गुलदस्त्यात आहे. त्यामुळेच सूर्याचा कोरोना हा सगळ्या वैज्ञानिकांसाठी एक न उलगडलेलं कोडं आहे. सूर्याचा कोरोना हा नेहमी सूर्याच्या तेजामुळे लपलेला असतो. सूर्याच्या प्रकाशात तो दिसत नाही. पण जेव्हा सूर्यग्रहण (खग्रास) होते तेव्हा कोरोना चं दर्शन आपल्याला पृथ्वीवरून होते. हे दर्शन अगदी काही मिनिटांकरता वर्षातून जास्तीत जास्त दोनदा शक्य होते. ह्यामुळेच सूर्याचा कोरोनाचा अभ्यास एक आव्हान आहे. जर आपल्याला कोरोना ला समजून घ्यायचं असेल तर अश्या ठिकाणी आपण आपलं यान पाठवायला हवं जिकडून आपल्याला कोरोना नेहमी बघता येईल. त्याच्यावर नजर ठेवता येईल आणि त्याच्या बदलांचा अभ्यास करून त्याच्या गूढतेची उत्तर शोधता येतील.

फोटो १ :- सूर्यावरील डाग

फोटो २ :- सूर्याचा कोरोना

क्रमशः

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

फोटो स्रोत :- गुगल


Monday 3 February 2020

काळ्या मातीचं सोनं करणारे परीस सरपंच पद्मश्री पोपटराव पवार... विनीत वर्तक ©

काळ्या मातीचं सोनं करणारे परीस सरपंच पद्मश्री पोपटराव पवार... विनीत वर्तक ©

१९७२ ला महाराष्ट्रात दुष्काळ पडला. ह्या दुष्काळाचा फटका सगळ्यात जास्ती बसला तो अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाला. दुष्कळाने गावाची परिस्थिती पूर्णपणे खालावली. गावातील सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या. सगळी पिकं नष्ट झाली. उत्पादनाचं अजून कोणतं साधन नसलेल्या गावात लोकांना नैराश्य आलं. सगळीकडे दारूचं व्यसन पसरलं. गावातील जवळपास  ९०% लोकांनी गावाला रामराम केला. अश्या बिकट परिस्थिती मध्ये गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावाचा चेहरा बदलवायचा निर्णय घेतला. १९८९ ला त्यांनी ह्याच नेतृत्व त्यांनी सोपवलं एका तरुण सरपंचाकडे त्यांचं नाव होतं 'पोपटराव बागुजी पवार'.

छोट्या छोट्या मदतीसाठी मुंबई आणि दिल्लीची वाट बघून चालणार नाही. जे काही करायचं ते आपल्याला करायचं आहे हे पोपटराव पवार ओळखून होते. सरपंच झाल्या झाल्या पहिला निर्णय होता तो म्हणजे दारू आणि सिगरेट बंदीचा. गावातील सगळीच्या सगळी दारूची दुकाने त्यांनी पूर्णपणे बंद केली. त्या पाठोपाठ गावाच्या हद्दीत सिगरेट अथवा दारू पिण्यावर पूर्णपणे बंदी आणली. हिवरे बाजार गाव ज्या भागात आहे तिकडे वर्षोनुवर्षे पावसाचं प्रमाण वर्षाला १५ इंच इतकं तुटपुंज आहे. त्यामुळे दुष्काळासाठी दरवेळेला निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. गावातील पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर 'पाणी अडवा पाणी जिरवा' हे त्यांनी ओळखलं. महाराष्ट्र सरकारकडून कर्ज काढून पावसात वाहणाऱ्या पाण्याचा अभ्यास करून त्यांनी गावात ३२ दगडाचे आणि ५२ मातीचे बंधारे बांधले. योग्य ठिकाणी पाणी साठवणाऱ्या टाक्या बांधल्या.  त्या सोबत गावातील सर्व लोकांना पाणी कसं वाचवायचं त्याचा अपव्यय कसा थांबवायचा ह्याच शिक्षण दिलं. इतकं करून पोपटराव पवार थांबले नाहीत तर पूर्ण गावात त्यांनी लाखो वृक्षाची लागवड आणि त्याच संगोपन करण्याचं काम सुरु केलं.

पोपटराव पवार ह्यांनी घेतलेल्या मेहनतीची फळ काही वर्षात दिसायला लागली. गावाने केलेल्या 'पाणी अडवा पाणी जिरवा' कामामुळे गावातील जमिनीत पाण्याची पातळी कमालीची वाढली. १९९० ला ९० कोरड्या विहिरी असणाऱ्या गावात आज ३०० पेक्षा जास्त विहारी पाण्याने भरलेल्या आहेत. पोपटराव पवार ह्यांनी काळ्या मातीत उसाच्या आणि केळीच्या शेतीवर बंधन आणली. ह्या दोघांच्या शेतीसाठी पाण्याची खूप गरज असते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी आपल्या जमिनीतून कमी पाण्यात नाविन्यपूर्ण उत्त्पन्न घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी प्रेरीत केलं. गाई- म्हशी च्या दुधाच्या जोरावर त्यांनी शेतकऱ्यांना श्रीमंत केलं. ज्या गावातून लोकं पळून गेली होती ती परत आली. एकेकाळी गरीबी रेषेच्या खाली १८२ पैकी १६८ कुटुंब असणाऱ्या गावात आज फक्त ३ कुटुंब गरीबी रेषेच्या खाली आहेत तर ६० लोकं लक्षाधीश आहेत. ह्या यशाच्या मागे पोपटराव पवार ह्यांच व्हिजन तर गावाने ह्याच व्हिजन ला आपलं मिशन मानून त्यावर केलेलं काम कारणीभूत आहेत. हिवरे बाजार गावाचं १९९५ ला दरडोई उत्पन्न ८०० रुपये होतं ते आज ३०,००० रुपयांपेक्षा जास्ती आहे.

पोपटराव पवार ह्यांनी गावातील सगळ्याचं आयुष्य नुसतं समृद्ध नाही केलं तर पूर्ण गावाचा कायापालट केला. सरपंच बनल्यावर त्यांनी स्वच्छतेचा विडा उचलताना सगळीकडे स्वच्छतागृह बांधली. प्रत्येक घरात संडास बांधून दिलं. प्रत्येक घरात बायोगॅस वापरणं अनिवार्य केलं. सगळ्या लोकांना शिक्षणाची व्यवस्था केली. शाळेत पुतळे उभारण्यापेक्षा त्याच पैश्यात त्यांनी शाळेचा दर्जा वाढवला आणि मुलांसाठी लागणारी शालेय साधनं उच्च दर्जाची केली. ह्याचा थेट परीणाम म्हणजे आज हिवरे बाजार गावातील ६०% पेक्षा जास्ती मुलं मेडिकल चं शिक्षण घेतं आहेत. आज हिवरे बाजार गावात बाहेरच्या गावातून मुलं शिक्षणासाठी येतं आहेत. त्यांच्याकडून पैसा न घेता एका कागदावर लिहून घेतलं जाते की शिकल्यावर त्यांनी गावात राहून सेवा करायची. पोपटराव पवार इथेच थांबले नाहीत तर लग्नाआधी एच.आय.व्ही. / एड्स चाचणी त्यांनी गावातील लग्न करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला अनिवार्य केली.

“Show me one mosquito in Hiware Bazar and I will give you Rs 100."

आज अभिमानाने पोपटराव पवार जेव्हा असं सांगतात तेव्हा त्यामागे गेल्या ३० वर्षाची त्यांची दूरदृष्टी आणि गावातील लोकांची प्रामाणिक मेहनत, त्यांच्या स्वप्नावर ठेवलेला विश्वास कारणीभूत आहे. हिवरे बाजार आज नुसत्या भारतात नाही तर पूर्ण जगात प्रसिद्ध झालं आहे. तब्बल २१ देशातील अनेक मान्यवर संस्था आणि इतर लोकांनी ह्या गावाला भेट दिली आहे. हिवरे बाजार गावाचं मॉडेल आज देशासाठी एक अभिमानाची गोष्ट झाली आहे. हिवरे बाजार च्या ह्या कायापलटात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या सरपंच पोपटराव पवार ह्यांच्या कामगिरीला सलाम करताना भारत सरकारने त्यांचा २०२० सालच्या पद्मश्री सन्मानाने गौरव केला आहे. हिवरे बाजार चं आदर्श मॉडेल हे दुसऱ्या गावात निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांची नेमणूक Executive Director of Maharashtra state government’s Model Village programme वर केली आहे.

एकेकाळी दुष्काळात होरपळणाऱ्या, अडी-अडचणी नी ग्रासलेल्या गावाला एक नवी उभारी देताना गावातील लोकांसोबत गावातील निसर्ग, स्वच्छता राखताना  तसेच वाईट प्रवृत्तीचा नायनाट करून संपूर्ण गावाला एका नव्या उंचीवर नेऊन पूर्ण जगात 'हिवरे बाजार' हा मापदंड तयार करणाऱ्या पोपटराव पवार ह्यांना माझा सॅल्यूट. पोपटराव पवार ह्यांचा सन्मान केल्यामुळे आज पद्मश्री सन्मानाची शोभा वाढली आहे. त्यांना पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.