Saturday 8 February 2020

आयुष्य जगलेली माणसं भाग १ ( बाबा आमटे )... विनीत वर्तक © (Re-Post)

आज एका महान तपस्वी ची पुण्यतिथी आहे. त्यांच्यावर लिहलेला एक लेख. ह्या शब्दातून त्यांच्या कार्याला माझा सॅल्यूट..

आयुष्य जगलेली माणसं भाग १ ( बाबा आमटे )... विनीत वर्तक © (Re-Post)

बाबा आमटे हे नाव ऐकताच आनंदवन आणि कुष्ठरोग्यांसाठी काम करणार एक महान व्यक्तिमत्व म्हणून आपल्या समोर त्यांचा चेहरा उभा रहातो. पण बाबा आमटेंच्या आयुष्याचा प्रवास हा तितकाच प्रेरणादायक आहे हे खूप कमी जणांना माहित असेल. बाबा आमटेंचा जन्म २६ डिसेंबर १९१४ ला हिंगणघाट, वर्धा ह्या महाराष्ट्रतल्या जिल्ह्यात झाला. एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या बाबा आमटे ह्यांचे वडील त्याकाळी ब्रिटीश सरकारमध्ये अधिकारी होते. त्यामुळे लहानपणापासून बाबा आमटेंना श्रीमंती अनुभवायला मिळाली. मग ती शिकार करण्यासारख्या आवडी पासून असो ते महागड्या गाड्या पायाशी असण्यापर्यंत असो. काहीही कमी नव्हतं. पण बाबा आमटेंच्या मनात वेगळच होतं. लहानपणापासून जरी सगळी सुख पायाशी लोळण घेत होती तरी समाजात असलेली गरिबी, जाती व्यवस्थेतील दरी त्यांच्या नजरेतून लपलेली नव्हती. वकिली शिक्षण पूर्ण केल्यावर खरे तर एक सामान्य आयुष्य त्यांना आरामात जगता आलं असतं. पण असामान्य असणाऱ्या माणसांना वेगळीच क्षितीज खुणावत असतात.

घराच्या भोवती असलेल्या भिंतींच्या बाहेरच जग बाबा आमटेंच्या मनाला कुठेतरी अस्वस्थ करत होतं पण त्याचवेळी ह्या अभेद्य भिंती ज्या समाजातील स्टेटस आणि श्रीमंतीवर बांधलेल्या होत्या त्या त्यांना त्या पलीकडे बघण्यास मज्जाव करत होत्या. दिवसेंदिवस वाढणारा हा असंतोष मग एक अशी वेळ घेऊन आला ज्याने बाबा आमटे आणि एकूणच त्यांच्या आणि त्यांच्या नंतर येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या आयुष्याला एक वेगळ वळण मिळालं. आपली सर्व सुख आणि कुटुंब बाजूला ठेवून बाबा आमटेंनी महात्मा गांधी आणि विनोबा भावे ह्यांच्या विचारांचा रस्ता निवडला. त्यांनी समाजातील उपेक्षित आणि गरीब लोकांसाठी काम सुरु केलं. त्यांची दुःख समजून घेण्यसाठी त्यांच्या सोबत राहण्यास ही त्यांनी मागेपुढे बघितलं नाही. असच एका दिवशी काम करत असताना कुष्ठरोगाने पिडीत असलेल्या एका माणसाला ते अडखळले. पहिल्यांदा त्याची अवस्था बघून त्यांना खूप भीती वाटली. पण कुठेतरी त्या माणसाच्या अतिशय हालाखीच्या अवस्थेने त्यांना आतून अस्वस्थ केलं. ह्या अश्या भीषण अवस्थेत असलेला तो कोणतरी आधी माणूस होता मग आता आजारामुळे त्याच माणूसपण संपल का? ह्या एका विचाराने त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले. कुठेतरी आपण काहीतरी करायला हवं हा विचार आतून त्यांना साद घालत होता. अश्या वेदना देणाऱ्या आजारावर एकच उपचार होता तो म्हणजे माणुसकीच प्रेम. वयाच्या ३४ वर्षी त्यांनी हेच प्रेम कुष्ठरोग्यांना देण्याचा एक निर्णय घेतला. ह्यानंतर पुढे जे घडलं तो इतिहास आहे.

कुष्ठरोगाची माहिती, त्याच निवारण, उपचार ह्या सगळ्याची माहिती घेतल्यावर आपली पत्नी (साधनाताई आमटे), दोन लहान मुलं ( डॉक्टर विकास आमटे आणि डॉक्टर प्रकाश आमटे), एक गाय, चार कुत्रे आणि सहा कुष्ठरोगी, काही पैसे आणि महाराष्ट्र सरकारने दिलेल्या ५० एकर च्या पडीक जमिनीवर “आनंदवन” ची स्थापना केली. समाजाने वाळीत टाकलेल्या लोकांना दिलेल्या पडीक जमनीवर बाबा आमटे आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाने आपल्या सहकाऱ्यांनसोबत एक आनंदवन फुलवलं. आनंदवन आज ४५० एकर पेक्षा जास्त जागेवर वसलेलं असून त्यात ५००० पेक्षा जास्त कुष्ठरोगी उपचार घेत आणि रहात असून त्यात दोन हॉस्पिटल, एक कॉलेज, अंधांसाठी तसेच मुकबधिरांसाठी शाळा आहे. ह्याशिवाय आनंदवनात आज असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत ज्याच्यावर अजून एक पुस्तक होऊ शकेल. त्यांच्या ह्या कार्याचा उल्लेख करताना बौद्ध धर्मगुरु दलाई लामा ह्यांनी म्हंटल होतं,

“In creating Anandwan, (Amte) provided a practical opportunity for people even with crucial disadvantages to show that they could regain dignity and come to be recognized as productive members of society.”

आपलं कार्य आनंदवन पुरती मर्यादित न ठेवता बाबा आमटेंनी अशोकवन हा आश्रम १९५५ साली तर सोमनाथ ह्या प्रकल्पाची १९६७ साली मुहूर्तमेढ रोवली. आपलं कुष्ठरोग निवारण्याच कार्य पुढे चालू ठेवताना १९७३ साली गडचिरोली इथल्या हेमलकसा इकडे लोक बिरादरी प्रकल्प माडिया, गौंढ ह्या आदिवासी जमातीसाठी सुरु केला. आज लोक बिरादरी प्रकल्पामधून वर्षाला ४०,००० पेक्षा जास्त लोकांना हेल्थ केअर ची मदत केली जाते. इथल्या शाळेत ६०० पेक्षा जास्ती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बाबा आमटेंच हे कार्य त्यांच्या दुसऱ्या, तिसऱ्या पिढीने त्याच निष्ठेने, त्याच निस्वार्थी भावनेने पुढे चालू ठवले आहे. इतकं सगळं करून सुद्धा बाबा आमटे आपल्या कार्याबद्दल म्हणतं,

“I took up leprosy work not to help anyone, but to overcome that fear in my life. That it worked out good for others was a by-product. But the fact is I did it to overcome fear”

बाबा आमटेंनी फक्त एक चळवळ उभी नाही केली तर पूर्ण समाजाला आपल्या चळवळीने समाजाची विचारसरणी बदलायला प्रवृत्त केलं. ज्या नापीक जमिनीवर आनंदवनाची सुरवात केली जिकडे लोकांना वाळीत टाकलं जायचं, जिकडे जायला लोक घाबरत. समाजाच्या दृष्टीने तो भाग संस्कृतीच्या बाहेरचा आणि खालच्या दर्जाचा होता. आज तेच आनंदवन आणि तेच हेमलकसा जगाच्या पटलावर सामाजिक कार्यांच एक मापदंड म्हणून ओळखलं जाते. बाबा आमटेंच्या ह्या कार्याचा गौरव खुद्द युनायटेड नेशन नी बाबा आमटेंना १९८८ साली पुरस्कार देऊन केला आहे.

आज सोशल टुरीझम म्हणून आनंदवन आणि हेमलकसा ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. ज्या आनंदवनात आणि हेमलकसा ला लोकं जायला घाबरायचे तिकडे आज दोन महिने आधी बुकिंग करावी लागते. पण तिकडे जाणारे नक्की कशासाठी जातात हे मात्र सगळ्यांनी शिकण्याची गरज आहे. बाबा आमटेंच कार्य, त्याचं पूर्ण आयुष्य आपण एकदा वाचलं तरी सुद्धा आपण आयुष्यात काय करू शकतो ह्याची जाणीव आपल्याला होईल. पैश्याने सर्व सुखं पायाशी लोळत असली तरी समाधान मात्र कमवावं लागते. ते कसं? हे शिकायचं असेल तर बाबा आमटेंच आयुष्य आपल्या सगळ्यांना नेहमीच मार्गदर्शन करेल.

फोटो स्त्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment