Thursday, 13 February 2020

त्याच क्षणांसाठी... विनीत वर्तक ©

त्याच क्षणांसाठी... विनीत वर्तक ©

निसटलेले क्षण पुन्हा अनुभवता येतं नाहीत मात्र त्याच्या आठवणी प्रत्येक वेळी तोच अनुभव देतात. उन्हाने लाहीलाही झालेल्या जमिनीवर अचानक आलेला पाऊस निसर्गाची अगदी कूस बदलून टाकतो. तसाच काहीसा अनुभव आपण काही क्षणात घेतो. शाळेच्या त्या दिवसात भूत, भविष्य ह्यांचा विचार न करता मस्तीत जगणाऱ्या आपल्या निरागस मनाला कोणीतरी पटकन आवडू लागते. का? केव्हा? कधी? अश्या सगळ्या प्रश्नांच्या गर्दीत आपल्याला काहीतरी देणार कोणीतरी आपलच गवसलेलं असते. ती साथ, सोबत पण पुरेशी असते. तो आवाज, तो चेहरा बघितला तरी का कोणास ठाऊक मनात एक वेगळीच चलबिचल होते. हेच का प्रेम? हीच का ती व्यक्ती अश्या प्रश्नांचे धुमारे फुटायच्या आधी आणि कळायच्या आत तो चेहरा आणि ते क्षण मनाच्या कोपऱ्यात कधीच बंदिस्त झालेले असतात.

कॉलेज च्या त्या मयूरपंखी दिवसात आता निरागस भावनांची जागा शब्दरूपी अक्षरांनी तर व्यक्त होण्याची भाषा डोळ्यांनी  शिकलेली असते. आता कोणीतरी आवडलेलं सतत आपल्या सोबत हवसं वाटू लागते. अगदी कॉलेज, कॅन्टीन ते कट्टा सगळीकडे तीच व्यक्ती सोबत असावी ह्यासाठी आपण काही करायला तयार होतो. त्या व्यक्तीच्या नावडत्या गोष्टी आवडत्या बनतात तर आवडलेल्या आपल्या आयुष्याचा भाग बनतात. आता मनात असणाऱ्या भावना समोरच्याला वाटाव्या ह्यासाठी आपण चौकटीबाहेर जातो. एकदा की त्या समजल्या की मग त्याला त्याला स्वप्नांचे धुमारे फुटतात. स्वप्नच ती! कधी समुद्राच्या साक्षीने बघितलेली तर कधी मावळतीचा सूर्य क्षितिजावर जाताना रंगात नाहून निघालेली. काहीही आणि कशीही असली तरी ते क्षण मात्र प्रेमाच्या रंगात नाहून निघालेले. पहिल्यांदा होणारा तो हवाहवासा वाटणारा स्पर्श ते गरम श्वास, हृदयाची वाढलेली धडधड सगळच कसं कुठेतरी वेगळ्याच विश्वात नेणारं. ते क्षण सूर्यास्ता सोबत कधी अस्ताला जातात तर कधी एका नव्या पहाटेची स्वप्न बनतात. कसेही असले तरी ते आपलेच असतात. अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जरी आपण
एकदा विचार केला तरी तेव्हा सुद्धा आठवणींच्या कप्यात भिजवलेले ते सगळेच क्षण असे रंग उधळतात की आपण त्यांना कधीच विसरू शकत नाही.

आयुष्याच्या रहदारीत जोडीदार असलेले ते क्षण कधी हसवतात तर कधी रडवतात. कधी आपल्या सोबत असतात तर कधी आपल्यापासून खूप दूर जातात. आता स्पर्शाची ओढ जाणवत नसली तरी शब्दांचा उपवास मात्र खोलवर टोचतो. रोज उठून तेच पाढे म्हणताना कधीतरी त्याच क्षणांपासून ब्रेक घ्यावासा वाटतो. रोज नेहमीच क्षितिजावर दिसणारा सूर्य आता घडाळ्याच्या काट्यात दिसतो. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र झाली तरी पण कुठेतरी त्याच क्षणाचा आधार असतो. धावताना पडलो, अपयशी झालो तर त्याच क्षणांची भिंत आपल्या मागे भक्कमपणे उभी रहाते. तेव्हा असं वाटते की शांत डोकं ठेवावं त्या खांद्यावर आणि मोकळं व्हावं अगदी पूर्णपणे. पण निघणारे अश्रू आणि आधार देणारा खांदा तेव्हाच मिळतो जेव्हा त्या हरवलेल्या क्षणांना आपण जपलेलं असते. कधी कधी आयुष्यात निरागस क्षण किंवा रंग उधळणारे क्षण आपल्या सोबत नसतात तरीपण पावसाच्या सरीत आणि उन्हाच्या काह्लीत सावली देणारं ते झाड आपलच वाटते.

सगळं काही पूर्ण झालं तरी आयुष्याच्या एका प्रवासात पाहिलेले, अनुभवलेले ते निरागस आणि रंग उधळणारे क्षण मनाच्या कप्यात कुठेतरी रुजलेले असतात. आता काही नको असते फक्त त्या वेळी राहिलेल्या भावनांना एकदा मोकळं करावसं वाटते. राग- रुसवा आता आयुष्याच्या प्रवासात फिका पडलेला असतो. आता दिसतात त्या आठवणी ज्या आपल्या मनात चिरकाळ टिकलेल्या असतात काळाच्या घड्याळा पलीकडे अजूनही तरुण असतात. आता स्पर्शाची पण गरज नसते आणि शब्दांची पण. आता मनाच्या गप्पा मनाशी होतात. कधी लांबून तर कधी जवळून. आयुष्य गेलेलं असते राहिलेल्या असतात त्या आठवणी त्याच क्षणांच्या ज्याच्या सोबतीने आपण आयुष्य जगलेलो असतो.

आज १४ फेब्रुवारी म्हणजेच प्रेमाचा दिवस. माझ्या मते खरे तर हा त्या क्षणांचा दिवस आहे. काही आठवण्याचा, तर काही सांगण्याचा, तर काही अव्यक्त राहून खूप काही अनुभवण्याचा. आयुष्याच्या प्रवासात आपण कुठेही असो. कोणी आपल्याला आवडणार किंवा आपण कोणाला आवडणार असो वा नसो पण ते क्षण आपल्या सोबत नेहमीच असतात. कोणाचे त्या वळवाच्या पावसात भिजलेले तर कोणाचे सूर्याच्या रंगात नाहून निघालेले तर कोणाचे आयुष्याच्या घड्याळावर चालणारे तर कोणाचे सगळं काही बघून आठवणींच्या वारुळातून त्या मुंग्यांप्रमाणे बाहेर आलेले. म्हणून आज प्रेमाचा दिवस 'त्याच क्षणांसाठी' ज्याने आपल्या प्रत्येकाला काही न काही दिलं. ज्यांनी आपल्या आयुष्यात ते क्षण आणले त्या सर्वांसाठी शब्दरूपी भेट. 

मिळवलेलं सगळचं आपलं नसते,
गमावलेलं सगळचं गमावलं असं नसते,
जे गेलं त्यापेक्षा काय मिळालं हे महत्वाचं,
जे मिळालं त्यात आपण काय मिळवलं ते जास्ती महत्वाचं.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 

No comments:

Post a Comment