Monday 10 February 2020

एका अश्रूच दुःख... विनीत वर्तक ©

एका अश्रूच दुःख... विनीत वर्तक ©

नकार पचवायची आणि होकार स्विकारण्याची आपली मानसिकता कधीच संपली आहे. निर्भया शब्द आता अनेकवचन झाला आहे. घटना घडतात निर्भया त्यात बळी पडतात. आक्रोश करणारे दोन दिवसात विसरून आपल्या कामाला लागतात. डोळ्यावर पट्टी बांधलेली न्यायदेवता माणुसकीच्या नावाखाली दबून जाते आणि मग गुन्हा सिद्ध झाल्यावर ही माणुसकीचे गुणगान करत त्यांना शिक्षा दिली जात नाही. त्यामुळे आपलं कोणी काही बिघडू शकत नाही ह्याचा विश्वास निर्भया घडवणाऱ्या प्रत्येकाला वाटायला लागतो. ह्या मागच्या सगळ्या गोष्टींचं अवलोकन केलं तर अनेकांच्या मते ह्यात शिक्षण पद्धती दोषी असते, कोणाच्या मते पुरुषी मानसिकता तर कोणाच्या मते मुलांना नकार पचवायला शिकवलं जातं नाही. कारणे काही असोत पण बळी निर्भयाचा जातो हे अंतिम सत्य आहे.

विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल असणारं आकर्षण हे ठरलेलंच आहे. कोणत्याही वयात ते वाटणं ह्यात चुकीचं काहीच नाही. पण ते आकर्षण ज्या पद्धतीने ओरबाडून घेतलं जात आहे तो आपल्या समाजापुढला प्रश्न आहे. प्रेम ही तरल भावना कोणालाही कधीही कोणाबद्दल वाटू शकते. हेच शारीरिक आकर्षणाला लागू आहे. फरक इतकाच की एक समाजात मांडता येते दुसरी दबून ठेवण्याचं कसब शिकावं लागते. ह्या दोन्ही भावना जेव्हा तरलतेने व्यक्त होतात तेव्हा तो उच्च असा संगम असतो. त्यात त्या दोन व्यक्ती एका वेगळ्या पातळीवर एकरूप होतात. पण काळाच्या ओघात काही गोष्टी बदललेल्या आहेत. मी, माझं, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सुख प्राप्त करण्याची आगतिकता दोन्ही टोकावर न जमल्यामुळे आता गोष्टी ओरबाडून घेतल्या जात आहेत.

शारीरिक सुखाचं केंद्र जेव्हा लिंगात आहे हे ठासवण्यात माध्यम यशस्वी झाली तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम वाटायला लागल्या. मग फक्त लिंगाची ताकद दाखवण्याची चढाओढ सुरु झाली. ह्यात नकळत आपण ही ओढले गेलो हे कळेपर्यंत अनेक निर्भया घडवल्या गेल्या आणि अजून घडवल्या जात आहेत. शारीरिक पातळीवर ह्याची जागा बलात्काराने घेतली तर मानसिक पातळीवर त्याची जागा अहंकाराने घेतली. मग त्याला कुरवाळणं हे सुरु झालं. आज ज्या पद्धतीने आपले विचार कृत्रिम होतं आहेत ते ह्याचच द्योतक आहे. आज अनेक निर्भया ह्या लग्नाच्या बेडीत अडकून पुरुषी लिंगाचा अहंकाराचा रोज अनुभव घेतात कारण समाजच्या बेडीत त्यांना व्यक्त होता येतं नाही. मानसिक अहंकारा बद्दल तर न बोललेलं बरं कारण त्याची मोजदाद केली तर अश्या प्रसंगातून न गेलेल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच असतील.

सगळ्याच वेळेस टाळी एका हाताने वाजत नाही हे कितीही खरं असलं तरी त्या वाजलेल्या टाळीच हिंस्त्र रूप मात्र पुरुषाकडून स्रीवर होणाऱ्या अत्याचारात दिसते हे सत्य आहे. बलात्कार असो व माझी नाही तर कोणाची नाही ह्यासाठी ऍसिड हल्ला अथवा पेटवून देणं असो हे आपल्या समाजाने कुरवाळलेल्या पुरुषी अहंकाराचे एक प्रतीक आहे. शारिरीक सुख जेव्हा लिंगात आलं तेव्हा त्यातलं नावीन्य ही तितक्याच लवकर संपलं मग काहीतरी नवीन च्या मागे लागताना आपण आज अगदी वयाच्या, नात्यांच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. सगळाच दोष पुरुषाचा असं मानून पुढे जाणं हे चुकीचं कारण त्याला घडवणारी त्याच्या यशात, अपयशात मागे उभी असणारी स्री असते. त्यामुळे कोण चुकीचं आणि कोण बरोबर ह्या पेक्षा त्या अश्रूच्या दुःखाची जाणीव आपण दोघानांही करून दयायला हवी.

अडकलेला पतंग तिकडे ही चांगला दिसतो. त्याचा बाजार करून फाडण्याची गरज नसते ही मानसिकता आज स्री आणि पुरुष दोघांमध्ये ही रुजायला हवी. हारके जितने वाला बाजीगर असतो आणि ते हरणं म्हणजे आपल्या निस्सीम, स्वच्छ, तरल भावनांचा सन्मान असतो हे कुठेतरी मनात उमटायला हवं. शारिरीक सुखाच अंतिम स्थानक एकचं असलं तरी तिकडे होणारा प्रवास हा जास्ती आनंददायी असतो हे जेव्हा कळेल तेव्हा अंतिम ठिकाणावर जाण्यासाठी आता होतं असलेली धडपड नक्कीच कमी होईल. आज किती निर्भयांना आपला समाज स्विकारतो हे आपण आपल्या वरून ठरवायला हवं. आज माझा मुलगा, नातू, पणतू, नवरा, भाऊ अथवा कोणत्याही नात्यातला पुरुष निर्भयाला तो सन्मान देऊ शकतो का? तिला आपल्या आयुष्यात जोडीदार बनवू शकतो का? ते सगळं स्वीकारण्याची आपल्या सोबत आपल्या कुटुंबाची मानसिकता आहे का ह्याचा विचार जेव्हा समाजात होईल तेव्हाच त्या अश्रूंच्या दुःखाला खरा न्याय मिळेल.

कोणी प्रत्येक घटनेतून काय शिकावं हा ज्याचा त्याचा निर्णय.  पण जर आपण वेळीच सावरलो नाही तर ह्या समाजाचा भाग म्हणून कदाचित ते अश्रू आपल्या डोळ्यातून यायला वेळ लागणार नाही. अर्थात किती लोकं ह्याचा विचार करतील हा वेगळा भाग आहे. कारण शब्द विरून जायला आजकाल एका नोटिफिकेशन ची गरज लागते. अश्रूंची दुःख आज काल डोळे पण ओले करत नाहीत कारण भावना इतक्या दगड झाल्या आहेत की एका पानावरुन आपण दुसऱ्या पानावर जात रहातो. निर्भया मात्र शांतपणे ह्या अश्रुंचे हुंकार देतं त्या आंधळ्या न्यायदेवतेकडे न्यायाची आस लावून बघत बसते.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

2 comments:

  1. अतिशय समतोल पातळीवर केलेलं विवेचन...

    पोचेल कुठपर्यंत...??

    असो प्रकट होणं आपल्या हाती...

    ReplyDelete
  2. अतिशय समतोल पातळीवर केलेलं विवेचन...

    पोचेल कुठपर्यंत...??

    असो प्रकट होणं आपल्या हाती...

    ReplyDelete