Tuesday 25 February 2020

एर्रोकोथ... विनीत वर्तक ©

एर्रोकोथ... विनीत वर्तक ©

एर्रोकोथ ह्या नावाचा अर्थ होतो, "आकाशाकडे बघण्याची प्रेरणा आणि त्यातून आपल्या पलीकडे असलेल्या विश्वाचं कुतूहल". एर्रोकोथ हा एक ट्रान्स नेपच्यून ऑब्जेक्ट आहे. टी.एन.ओ. (ट्रान्स नेपच्यून ऑब्जेक्ट) म्हणजे नक्की काय भानगड आहे  समजण्यासाठी आपल्याला थोडी सौरमाला समजून घ्यावी लागेल. आपल्या सौरमालेत मंगळ आणि गुरु ग्रहांच्या दरम्यान लघु ग्रहांचा एक पट्टा आहे. ज्यात अनेक छोटे, मोठे लघुग्रह इतर ग्रहांप्रमाणे सूर्याभोवती परीक्रमा करत असतात. ज्याला ऍस्ट्रोइड बेल्ट असं म्हणतात. म्हणजेच आपल्याला माहित असलेल्या ८ ग्रहांपलीकडे लाखो, करोडो लघुग्रह आहेत जे आपल्या सौरमालेचा  भाग आहेत. असाच एक लघुग्रहांचा पट्टा सौरमालेतील शेवटचा ग्रह नेपच्युन पलीकडे आहे. ज्याला कुइपर बेल्ट असं म्हंटल जाते. ह्या पट्यातील लघुग्रहांना  टी.एन.ओ. (ट्रान्स नेपच्यून ऑब्जेक्ट) असं म्हणतात.

ह्या टी.एन.ओ. (ट्रान्स नेपच्यून ऑब्जेक्ट) मध्ये इतरांच्या मानाने मोठे असणारे डवार्फ ग्रह येतात ज्यात प्लूटो, हौमिआ, मॅकेमके ह्यांचा समावेश आहे. (डवार्फ ग्रह म्हणजे असे ग्रह जे एकसंध आहेत आकाराने गोलाकार पण इतकेही मोठे नाहीत की त्यांच्या शेजारची साफसफाई झालेली आहे. आपल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्यांच्या तोडीचे इतर ग्रह त्यांना बाजूला करणं जमलेलं नाही. अश्या ग्रहांना डवार्फ ग्रह म्हणतात.) प्लूटो हा आधी सौरमालेतील ग्रह समजला जात होता परंतु ग्रहांच्या व्याख्येपेक्षा डवार्फ ग्रहांच्या व्याख्येत तो बसत असल्याने त्याला डवार्फ ग्रहाचा दर्जा दिलेला आहे. ह्या टी.एन.ओ. (ट्रान्स नेपच्यून ऑब्जेक्ट) मध्ये एक विचित्र दिसणारा लघुग्रह २०१४ साली शोधला गेला. धड आणि डोके एकमेकांना जोडल्या सारख्या दिसणाऱ्या लघुग्रहाला अल्टीमा थुले असं म्हंटल गेलं. ३६ किलोमीटर लांब असलेल्या ह्या लघुग्रहात अल्टीमा चा भाग २१ किलोमीटर तर थुले १५ किलोमीटर चा आहे.

नुकतंच नासा च्या न्यू होरायझन स्पेस क्राफ्ट ने ह्या लघुग्रहा जवळून प्रवास केला. तर ह्या अल्टीमा थुलेचं नामकरण आता एर्रोकोथ असं केलं गेलं. आपल्या सौरमालेत लाखो लघुग्रह असताना ह्या एर्रोकोथ ला इतकं महत्व का? तर ह्याच उत्तर दडलं आहे त्याच्या जन्मात. ४.५ बिलियन वर्षापूर्वी जेव्हा सूर्यासोबत आपली सौरमाला अस्तित्वात आली तेव्हा आपल्या सौरमालेतील ग्रह कसे अस्तित्वात आले ह्याच उत्तर आपण नक्की देऊ शकलेलो नाहीत. ग्रहांची निर्मिती कशी झाली असेल ह्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. एका मताप्रमाणे बारीक बारीक दगड एकत्र येऊन एकसंध होऊन ग्रहांची निर्मिती झाली असावी. तर दुसऱ्या मताप्रमाणे क्लाऊड कोलॅप्स झालं असावं. ह्या मध्ये छोटे छोटे तुकडे एकमेकांभोवती फिरता फिरता हळुवारपणे जोडले जाऊन मोठ्या ग्रहांची निर्मिती झाली. एर्रोकोथ च्या नवीन विश्लेषणा नुसार ह्याच धड आणि शरीर म्हणजेच अल्टीमा आणि थुले असे दोन लघुग्रह जवळपास ४.५ बिलियन वर्षांनी एकमेकांसोबत जुळले जाऊन एर्रोकोथ निर्मिती झाली आहे.

एर्रोकोथ च्या अभ्यासावरून क्लाऊड कोलॅप्स होऊन सौरमालेतील ग्रहांची निर्मिती झाली आहे हे स्पष्ट होते आहे. जसे जमिनीत लाखो वर्षापूर्वी राहिलेले हाडांचे अवशेष एखाद्या सजीवाच्या आणि एकूणच त्याच्या उत्क्रांती वर प्रकाश टाकतात त्याचप्रमाणे एर्रोकोर्थ हा एक प्लॅनेटेसीमल आहे. आपल्या सौरमालेच्या जडणघडणीचा एक पुरावा असलेला एर्रोकोथ चा अभ्यास एकूणच वैश्विक माहितीमध्ये मोलाचं योगदान आहे. १ जानेवारी २०१९ नासा च्या स्पेस क्राफ्ट ने तब्बल ६.६ बिलियन किलोमीटर वर असलेल्या एर्रोकोथ च्या ३५५८ किलोमीटर वरून छायाचित्र घेतली. त्याच्या अभ्यासानंतर एर्रोकोथ ने आपल्या सौरमालेच्या प्रवासाची माहिती उलगडली आहे.

अवघा ३६ किलोमीटर लांब असलेला एर्रोकोथ सारखा लघुग्रह खरे तर एक सुरवात आहे आपल्याच भूतकाळाला ला ओळखण्याची. असे अनेक लघुग्रह आणि डवार्फ ग्रह आपल्या सौरमालेत अजून अंधारात आहेत. ज्यांचा अभ्यास होणं अजून बाकी आहे. येत्या काळात तंत्रज्ञानातील प्रगती सोबत आपण आपल्याच भूतकाळातील अनेक प्रश्नांचा उलगडा करू ह्याची आशा बाळगायला हरकत नाही.

फोटो स्रोत :- नासा

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment