Friday 28 June 2019

अतिरेक्यांना जेहाद दाखवणारी रुखसाना... विनीत वर्तक ©

अतिरेक्यांना जेहाद दाखवणारी रुखसाना... विनीत वर्तक ©

जेहाद हा एक अरेबिक शब्द आहे. ज्याचा अर्थ होतो की कोणाच्या तरी वाईट प्रवृत्तीवर मात करून समाजाच्या चांगल्यासाठी पुकारलेलं युद्ध. ह्या शब्दाचा अर्थ आपल्या सोयीप्रमाणे लावून काही मुस्लीम धर्मवेड्यांनी अतिरेकी कारवायांना ह्या शब्दाची जोड दिली. ह्या शब्दाचा आधार घेत जगभर अतिरेकी कारवाया सुरु केल्या. जेहाद ह्या शब्दाला त्यांनी रक्तरंजित छुप्या युद्धाची जोड देऊन अनेक निष्पाप लोकांचे बळी दिले. जेहाद ह्या शब्दाला भारत पण अनेकवेळा बळी पडलेला आहे आणि पडतो आहे. भारताच्या शेजारील मुस्लीम राष्ट्र पाकिस्तान ह्याच शब्दाचा वापर करत भारताच्या जम्मू – काश्मीर भागात छुप युद्ध आजही सुरु आहे. ह्याचाच परिणाम म्हणून ह्या प्रदेशातील कित्येक लोकं आज भितीच्या सावटाखाली जगत आहेत.

रुखसाना कौसर ही ह्याच जम्मू काश्मीर इथल्या रेजौरी जिल्ह्यात राहणारी एक साधी पहाडी गुज्जर कुटुंबातली एक मुलगी. तिचं घर हे जम्मू काश्मीर मधल्या अतिशय संवेदनशील भागात होतं. अवघ्या ३२ किलोमीटर वर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा त्यामुळे गोळ्यांचे आवाज, जेहाद च्या नावाखाली सुरु असलेली अतिरेकी कारस्थान हे लहानपणापासून पचनी पडलेल्या गोष्टी. पण एक दिवस तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. २७ डिसेंबर २००९ च्या रात्री ९.३० च्या सुमारास तिन अतिरेक्यांनी तिच्या घराच्या बाजूला असलेल्या काकांच्या घरात प्रवेश केला. तिकडून त्यांनी मोर्चा रुखसाना च्या घराकडे वळवला. दरवाजा उघडायला नकार दिल्यावर त्यांनी घराच्या खिडकीतून रुखसाना च्या घरात प्रवेश मिळवला. अतिरेकी आपल्या घरात घुसत आहेत आणि त्यांची वाकडी नजर आपल्या मुलीवर म्हणजेच रुखसाना वर आहे हे लक्षात आल्यावर तिच्या आई वडिलांनी तिला घरातील एका कॉटखाली लपवलं.

घरात शिरल्यावर अतिरेक्यांनी रुखसाना च्या कुटुंबाकडे तिला आपल्या हवाली करण्याची मागणी केली. पण आपल्या मुलीला त्यांच्या हवाली करण्यास तिच्या वडिलांनी नकार दिला. एजाझ ह्या रुखसानाच्या लहान भावाने आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी अतिरेक्यांशी दोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही. ह्या सगळ्या गडबडीत कॉटखाली लपून बसलेल्या २० वर्षाच्या रुखसानाची भीती खूप वाढली होती. अतिरेक्यांच्या हवाली झाल्यावर होणाऱ्या अमानुष अत्याचाराची पुसटशी कल्पना पण तिला नकोशी होतं होती. कुठेतरी भीती ची जागा आता संतापाने घेतली होती. आपल्याला लुटायला आलेल्या नराधमांना जश्यास तसं उत्तर देण्याच तिच्या मनान ठरवलं.

घरात अतिरेकी आणि तिचे आई, वडील, भाऊ ह्यांच्यात शाब्दिक चकमक सुरु असताना रुखसाना ने आपल्या बाजूला पडलेल्या कुऱ्हाडीला आपलं अस्त्र बनवत गनिमी काव्यासारखा हल्ला अतिरेकाच्या मोहरक्यावर केला. काय होते आहे हे अतिरेक्यांना कळायच्या आधीच विजेच्या वेगाने तिच्या हातातल्या कुऱ्हाडीने अतिरेक्याच्या डोक्याचा वेध घेतला. रुखसानाचा हा अवतार पाहून बाकीचे अतिरेकी बिथरले. त्यांनी तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या दिशेने गोळीबार करायला सुरवात केली. ह्यातली एक गोळी रुखसाना च्या वडिलांच्या खांद्यात घुसली. त्याच वेळी रुखसाना ने तिच्या वारामुळे घायाळ झालेल्या त्या अतिरेक्याच्या हातातली एके ४७ घेत त्याला मारून टाकलं. मग तिने एके ४७ ने अतिरेक्यांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. ह्यात अजून एक बंदूक तिने मिळवली. ती आपल्या भावाकडे देत त्या दोघांनी अतिरेक्यांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. अचानक झालेल्या ह्या नाट्याने अतिरेक्यांनी काढता पाय घेतला.

आपण मारलेला अतिरेकी कोणीतरी महत्वाचा कमांडर होता हे लक्षात आल्यावर पुन्हा होणाऱ्या संभाव्य हमल्यातून वाचण्यासाठी तिने आपल्या कुटुंबासह शाहदरा शरीएफ पोलीस पोस्ट कडे कूच केलं. अतिरेकी आपल्या मागावर असतील ह्या भीतीने त्यांनी रस्त्यातून जाताना आपल्या एके ४७ मधून हवेत गोळीबार ही केला. जेणेकरून आपल्याकडे अजूनही बंदूक असून जवळ येण्याची हिंमत त्यांनी करू नये. पोलीस स्टेशन ला पोहचताच अतिरेक्यान कडून मिळवलेली सगळी शस्त्रास्त्र त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिली. २० वर्षीय रुखसाना ने मारलेला अतिरेकी हा कुख्यात अतिरेकी संघटना लष्कर ए तय्यबा चा कमांडर अबू ओसामा होता. रुखसाना ने आपल्या बहादुरीने एका मोठ्ठ्या अतिरेक्याचा खात्मा केला होता. रुखसाना ने मारलेला कमांडर हा अतिरेक्यांच्या टीम चा खूप मोठा कमांडर होता त्याच्या हत्येचा चा बदला घेण्यासाठी अतिरेक्यांनी २००९ मधे २ वेळा तिच्या घरावर हल्ला केला. तिच्या घरावर ग्रेनेड ते आय.ई.डी. चे हल्ले झाले पण ह्या सर्वातून ती बचावली.

रुखसानाच्या ह्या बहादुरी बद्दल तिला २००९ साली राष्ट्रीय बहादुरी पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आलं. २०१० साली रुकसाना आणि तिचा भाऊ एजाझ ह्या दोघांना त्यांच्या बहादुरीसाठी कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलं. कीर्ती चक्र हा शांती काळात देण्यात येणारा दुसरा सगळ्यात मोठा शौर्य पुरस्कार आहे. राजोरी इथल्या जामिया मशीद चे धर्मगुरू मौलाना अमिर मोह्हमद शामसी ह्यांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना म्हंटल की,

“रुकसाना ने आज जेहाद चा खरा अर्थ जगापुढे मांडला”

अतिरेक्यांना त्यांच्याच शब्दात जेहाद शिकवणाऱ्या रुकसाना ने खूप मोठा आदर्श जम्मू काश्मीर मधल्या जनतेपुढे विशेष करून तिथल्या मुस्लीम स्त्रियांनपुढे ठेवला. बंदुकीच्या गोळ्यांना न घाबरता हिमतीने परिस्थितीला बदलवता येऊ शकते हे तिने आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिलं. आज ती दोन मुलींची आई असून तिच्या गावातील पोलीस दलात कार्यरत आहे. तिच्या ह्या कर्तुत्वाला माझा सलाम.

माहिती स्रोत:- विकिपिडीया

फोटो स्रोत :- गुगल



Monday 24 June 2019

नारीशक्तीचा चंद्रावर तिरंगा... विनीत वर्तक ©



नारीशक्तीचा चंद्रावर तिरंगा... विनीत वर्तक ©

२०१४ साली भारताच्या यशस्वी मंगळ स्वारी नंतर पूर्ण जगाच लक्ष भारताकडे वळाल होतं. खास करून जगातील अग्रगण्य अवकाश संस्था आणि त्यातले वैज्ञानिक. भारत मंगळाच्या कक्षेत आपलं यान प्रक्षेपित करू शकतो ही गोष्टच त्यांना पचायला जड जात होती. ह्या वेळेस इस्रो च्या कमांड सेंटर मधील एका फोटोने पूर्ण जगभरात सगळ्याचं लक्ष वेधलं. तो फोटो होता इस्रो च्या नारी शक्तीचा. भारतीय संस्कृती च प्रतिक असलेल्या साड्या घालून अगदी केसात गजरा माळून मंगळयान मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करताना इस्रो च्या स्त्री वैज्ञानिकांना बघून पूर्ण जग अवाक झालं होतं. चूल आणि मुल ह्यात अडकलेली भारतीय नारी भारताच्या मंगळ मोहिमेत आपला सिंहाचा वाटा उचलताना बघून पूर्ण जगाने तोंडात बोटे घातली होती.

एकेकाळी सापांच्या जादू करणारा देश कसा काय मंगळावर पहिल्याच प्रयत्नात पोहोचतो? हे जेवढं जगासाठी धक्कादायक होतं तितकचं धक्कादायक साडी घातलेली भारतीय स्त्री ह्या मिशन मध्ये मोलाची भूमिका बजावते हे होतं. ह्या नंतर जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णतः बदलून गेला. २०१४ च्या मोहिमेनंतर पुन्हा एकदा इस्रो एका नव्या मोहिमेसाठी सज्ज होतं आहे. ‘चंद्रयान २’ हे इस्रो च्या इतिहासातलं सगळ्यात कठीण मिशन मानलं जाते आहे. आजवर इस्रो पृथ्वीच्या, चंद्राच्या आणि मंगळाच्या कक्षेत आपलं यान / उपग्रह पाठवण्यात यशस्वी झाली आहे. पण ह्या वेळेस पहिल्यांदा इस्रो एका वेगळ्या ग्रहावर यान उतरवणार आहे.

एखाद्या ग्रहाभोवती त्याच्या कक्षेत यान प्रक्षेपित करण सोप्प पण तेच यान त्याच्या पृष्ठभागावर उतरवणं हे तितकचं कठीण आहे. एखाद्या ग्रहावर यान / रोवर उतरवण्यासाठी अनेक गोष्टींचा अभ्यास गरजेचा आहे. त्या ग्रहाच्या वातावरणाची अचूक माहिती, तिथल्या वातावरणाचा दाब, स्थिती, तपमान ते उतरवण्याची जागा ह्या सोबत इतर अनेक गोष्टींचा प्रचंड अभ्यास करावा लागतो. प्रत्येक गोष्टीच गणित एक दोन वेळा नाही तर हजारवेळा करावं लागते. एक चूक आणि होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. चंद्राच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ह्या वर्षाच्या सुरवातीला इस्राईल च्या यानाला चंद्रावर उतरताना अपयशाला सामोर जावं लागलं कारण खूप काही अश्या गोष्टी आहेत ज्याचं नियंत्रण आपल्याला पृथ्वीवरून करावं लागते तर काही गोष्टी तिथल्या कॉम्प्यूटर ने योग्यरित्या करणं गरजेचं असते.

चंद्रावर उतरण्यासाठी लागणार डीप स्पेस नेटवर्क आणि चंद्राच्या वातावरणाशी जुळवून घेणारी यंत्रणा निर्माण करण कठीण होतं त्यामुळे इस्रो च्या ह्या मिशन ला अनेकवेळा पुढे ढकलाव लागलं आहे. चंद्रावर यान उतरवणं ज्याला वैज्ञानिक भाषेत सॉफ्ट लेंडिंग म्हणतात ते आजवर इस्रो पहिल्यांदा करत आहे. ज्या भागात इस्रो आपलं यान उतरवत आहे त्या भागात आधी कोणत्याच राष्ट्राच यान उतरलेलं नाही. चंद्रयान २ चं सगळं वजन ३.८ टन ( ३८०० किलोग्राम ) आहे. इस्रो चं जी.एस.एल.व्ही. मार्क ३ रॉकेट पहिल्यांदा इतकं वजन घेऊन अवकाशात उड्डाण करणार आहे. तब्बल १००० कोटी रुपयांची अतिशय खडतर अशी मोहीम यशस्वी करण्याच शिवधनुष्य इस्रो ने भारताच्या नारीशक्ती वर सोपवलेलं आहे.

एम.वनिथा ह्या मिशन च्या प्रोजेक्ट डायरेक्टर असणार असून रितू करीढाल ह्या मिशन डायरेक्टर असणार आहेत. एम. वनिथा ह्या इस्रो च्या पहिल्या महिला प्रोजेक्ट डायरेक्टर असणार असून २००६ साली त्यांना एस्ट्रोनॉमीकल सोसायटी ऑफ इंडिया च्या “बेस्ट वुमन” सायंटीस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर रितू करीढाल ह्या भारताच्या “रॉकेट वुमन ऑफ इंडिया” म्हणून ओळखल्या जातात. त्यांना ही २००७ साली “यंग सायंटीस्ट” पुरस्कार डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळालेला आहे. त्यांच्या निवडीबाबत सांगताना के.शिवन ह्यांचे शब्द खूप काही सांगून जातात,

इस्रो डायरेक्टर के. शिवन म्हणतात,

“We only look at the most fit person for the job, and it so happened that it was women here. It didn’t make difference for us. In fact, 30% of the chandryaan 2 team are women.”

ज्या देशात स्त्री म्हणून आजवर अनेक ठिकाणी पुरुषसत्ताक समाजाकडून डाववलेल्या गेलेल्या अनेक संधीसाठी स्त्री लढा देते आहे. त्याच भारत देशात भारताच्या अवकाश इतिहासातील सगळ्यात खडतर आणि सगळ्यात महत्वाकांक्षी मोहिमेसाठी दोन स्त्रियांची निवड ही त्यांच्या कर्तुत्वावर होते हा बदल खूप मोठा आहे असं मला मनापासून वाटते. चंद्रयानातील ल्यांडर आणि रोव्हर वर भारतीय तिरंगा असणार आहे तर रोव्हर च्या चाकांच्या एका बाजूला अशोकचक्र तर दुसऱ्या बाजूला इस्रो चा लोगो असणार आहे. जवळपास ६२० पेक्षा जास्ती भारतीय विद्यापीठ, कंपनी, प्रयोगशाळा त्याचं योगदान ह्या मोहिमेसाठी दिलं आहे. ह्या सगळ्यांच्या तसेच १३० कोटी भारतीयांच्या चंद्रावर तिरंगा फडकवण्याच स्वप्नाच नेतृत्व करण्याची जबाबदारी भारताच्या दोन स्त्रिया उचलत आहेत. ही सगळ्याच भारतीय स्त्रियांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

जेव्हा चंद्रयान २ चंद्रावर उतरेल तेव्हा भारताने एक असा पल्ला पार केला असेल ज्याच स्वप्न पण कोणत्याच भारतीयाने ५० वर्षापूर्वी बघितलेलं नसेल. हे स्वप्न पूर्णत्वाला नेण्याचं श्रेय त्याच साड्या घातलेल्या, गजरा माळलेल्या स्त्रियांकडे असेल तेव्हा नारीशाक्तीचा तिरंगा मोठ्या डौलाने चंद्रावर फडकत असेल.

माहिती स्रोत :- इस्रो, गुगल, इतर तत्सम इंटरनेट लिंक

फोटो स्रोत :- गुगल, बी.बी.सी., गेटी इमेज.



Saturday 22 June 2019

मंदिरांच विज्ञान भाग १६... विनीत वर्तक ©

मंदिरांच विज्ञान भाग १६... विनीत वर्तक ©

भारतात मंदिरांची निर्मिती हजारो वर्षापासून झालेली आहे. कित्येक मंदिरांना १००० वर्षापेक्षा जास्ती कालावधी लोटला आहे. इतक्या प्रचंड कालावधी नंतर सुद्धा ह्यातील अनेक मंदिरांच सौंदर्य आजही टिकून आहे. ह्यातील प्रत्येक मंदिर हे आपल्यामागे काही न काही इतिहास, पौराणिक कथा, भूगोल, स्थापात्यशास्त्र, कला, संगीत, शास्त्र ते विज्ञान आणि तंत्रज्ञान घेऊन आजही काळाच्या कसोटीवर उभं आहे. पण काळाच्या ओघात, परकीय आक्रमणांनी त्यांची पडझड झाली असली तरी त्यांच्या निर्मितीमागचं तंत्रज्ञान आजही अनेक वैज्ञानिकांना बुचकळ्यात टाकते. ह्या मंदिरावर असलेली शिल्पकला, त्यांच्या निर्मिती मध्ये वापरलं गेलेलं गणित, त्यातला स्थापात्यशास्त्र, अभियांत्रिकी, विज्ञानाचा भाग आजही रहस्य आहे. रहस्य ह्यासाठी की आज विज्ञानाच्या कक्षेत काही प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला तरी ह्या सर्व गोष्टी ७०० ते १२०० वर्षापूर्वी कश्या शक्य झाल्या असतील ह्याच उत्तर आज कोणीच देऊ शकत नाही.

हिंदू धर्मात भगवान शंकराच महत्व सर्वोच्च आहे. ज्याला सृष्टीचा नाश करणारा ते सृष्टी निर्माता असं म्हंटल गेलं आहे. म्हणून शंकराची सर्वच मंदिरे ही सगळ्याच बाबतीत भव्यदिव्य, कलाकुसरेने नटलेली, विज्ञान- तंत्रज्ञान ह्यांची कास धरणारी बांधली गेली आहेत. त्यामुळेच आज इतके वर्षानंतर त्यामागचं तंत्रज्ञान काही प्रमाणात आपल्याला लक्षात आलं तरी त्याची उकल आजही एक कोडं आहे. भगवान शंकराला वाहिलेलं असचं एक मंदिर भारतात आहे ज्याच नावं आहे ‘विरूपक्षा मंदिर’ कर्नाटक मधील हंपी इकडे असलेलं हे मंदिर शंकराला वाहिलेलं असून ह्याची निर्मिती देवराया २ ह्या विजयनगरी साम्राज्याच्या राजाच्या काळात झाली आहे. साधारण १५६५ च्या सुमारास विजयनगरी साम्राज्य लयाला गेल्यावर ह्या ठिकाणी परकीय आक्रमणांनी ह्या साम्राज्याची राजधानी असणाऱ्या हंपी शहराची प्रचंड नासधूस केली. इकडे असलेली अनेक मंदिरे त्यातील शिल्पकला नष्ट केली. पण त्यात विरूपक्षा मंदिर हे वाचलं. आज तब्बल ७०० वर्षानंतर त्या साम्राज्याच्या खुणा घेऊन उभं आहे.

भारताच्या दक्षिण भागातील मंदिरांन प्रमाणे हे मंदिर प्रचंड अश्या शिल्प कलेने नटलेलं आहे. ह्या मंदिरात असलेल्या खाबांची रचना आणि ह्या मंदीराच स्थापात्यशास्त्र हे खूप उच्च दर्जाच आहे. ह्या मंदिरातील प्रत्येक गोष्ट समानतेने उभारली गेली आहे. ह्या मंदिराचा १० वर्षापेक्षा जास्त काळ अभ्यास केल्यावर डॉक्टर क्याथेलीन कमिन्स ज्या की यु.ए.बी. डिपार्टमेंट आर्ट आणि आर्ट हिस्ट्रीमध्ये प्रोफेसर आहेत असा निष्कर्ष काढला आहे की,

“ For a long time, there was an assumption that the sculptures on the outside of Hindu temples didn’t necessarily mean anything as a group. However, these figures are more than just architectural decoration. they were certain, very conscious choices being made as to where deities and specific forms of deities were placed”

हे वाचल्यावर लक्षात येते की कोणतीही मूर्ती कशी असावी, कुठे असावी, कोणत्या पद्धतीची असावी अथवा मंदिराचा कोणत्या भागाचा आकार कसा असावा ह्याचा पूर्ण अभ्यास केला गेला होता. त्यानंतर त्यांची निर्मित केली गेली आहे.

विरूपक्षा मंदिराच्या पूर्वे कडे असणाऱ्या प्रवेश द्वारावर असणाऱ्या गोपुराची उंची जवळपास ५२ मीटर (१६५ फुट उंच X १५० फुट लांबी X १२० फुट रुंदी ) असून हा गोपूर ९ मजल्यांचा आहे. ह्याची निर्मिती जवळपास ७०० वर्षापूर्वी झाली असून आजही सुस्थितीत उभा आहे. (आजकाल ४ मजल्यांची बिल्डींग ४० वर्ष उभी नाही रहात तर ९ मजल्यांचा अवाढव्य असा ७०० वर्षापूर्वीचा गोपूर व्यवस्थित आहे. ह्यात देव कुठे नसून त्याकाळी बांधकाम करण्यासाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान, विज्ञान कारणीभूत आहे.) असे गोपूर दक्षिण भारतातील अनेक मंदिरात बघायला मिळतील पण ह्या गोपुराच वैशिष्ठ थोडं वेगळं आहे.

विरूपक्षा मंदीरामध्ये तंत्रज्ञानाचा एक आविष्कार बघायला मिळतो ज्याचं रहस्य अजूनही गुलदस्त्यात आहे. ह्या मंदिरात पिनहोल कॅमेरा तंत्रज्ञांनाचा वापर केला आहे. ह्या गोपुरापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या मंदिराच्या एका भागात ह्या गोपुराची सावली उलट पडते. हा भाग मंदिराच्या आतल्या बाजूस आहे. त्यामुळे अशी सावली कशी काय पडत असेल ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला पिनहोल कॅमेराच तंत्रज्ञान समजून घ्यावं लागेल. प्रकाश पडणाऱ्या एखाद्या पडद्यावर असणार एक लहान छिद्र त्यावर पडणाऱ्या सर्व प्रकाशाला एकत्रित एका ठिकाणी करून समोर असणाऱ्या गोष्टींची प्रतिमा बनवू शकते. एखादी चांगली प्रतिमा मागच्या बाजूस निर्माण होण्यासाठी ह्या छीद्राचा आकार आणि मागच्या पडद्याच त्याच्यापासून असलेलं अंतर ह्याचं गुणोत्तर साधारण १/१०० पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. विरूपक्षा मंदिराच्या गोपुरामुळे सूर्याची किरणे अडवली जातात. पण गोपुराच्या बाजूने येणारी सूर्यकिरणे मात्र मागे असलेल्या मंदिरावर पडतात. मंदिर बांधताना एक छोट छीद्र त्यात योग्य ठिकाणी बनवून “पिनहोल कॅमेरा” तंत्रज्ञान वापरून त्याची प्रतिमा मागच्या भिंतीवर उलटी उमटेल अशी रचना केली अगेली आहे.

कॅमेरा तंत्रज्ञानाने प्रतिमा निर्माण करण्याचा शोध साधारण १८१६ च्या आसपास लागला असा आजचा इतिहास सांगतो. पण सूर्य प्रकाशाच्या किरणांना एकत्र करून एका ठिकाणी फोकस करण्याच तंत्रज्ञान ह्या मंदिरात तब्बल ७०० वर्षापूर्वी वापरलं गेलं आहे. म्हणजे छायाचित्र निर्मिती करण्यासाठी लागणार तंत्रज्ञान भारतात अवगत होतं. जर हे तंत्रज्ञान अवगत नसेल तर त्या छीद्राचा आकार किती असावा? छीद्र आणि मागचा पडदा ह्यांच्या अंतरातील गुणोत्तर किती असावं ह्याच गणित सोडवल्या शिवाय अश्या उलट्या प्रतिमेची निर्मिती अशक्य आहे. इकडे हे छिद्र आरश्याच पण काम करून गोपुराची उलटी प्रतिमा मागच्या भिंतीवर आजही दाखवते.



आजही आपण फक्त असं तंत्रज्ञान वापरलं असेल ह्याचा अंदाज बांधू शकतो. त्यांनी ह्याची निर्मिती कशी केली? का केली? हे तंत्रज्ञान पुढे कुठे लुप्त झालं? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजही आजचं विज्ञान देऊ शकत नाही. भारतातील प्रत्येक मंदिर हे नाविन्यपूर्ण गोष्टी आणि वैशिष्ठ ह्यांनी ओतप्रोत भरलेलं आहे. पण ते बघण्यासाठी देव, देव न करता त्या मंदिराच्या श्रद्धेला नमन करत तंत्रज्ञानाची कास धरून शोधण्याची गरज आहे.

माहिती स्रोत :- गुगल, विकिपिडिया, इतर तत्सम इंटरनेट लिंक

फोटो स्रोत :- विकिपिडिया, गुगल





Friday 21 June 2019

पलीकडच्या तीरावरून... विनीत वर्तक ©

पलीकडच्या तीरावरून... विनीत वर्तक ©

भारताची भूमी नेहमीच परकीय आक्रमणांना तोंड देत आली आहे. आधी परकीय तर आता स्वकीय सगळ्याच बाजूने आपण खूप काही गमावलं आहे. आपलीच माणसं आपण गमावली आहेत आणि गमावतो आहोत. भारताला मिळालेले शेजारी सतत काहीतरी खुसपट काढून भारताच्या भूमीवर आजही कित्येक शतके चाललेला रक्तरंजित खेळ खेळत आहेत. आजवर आपण जिंकत असलो तरी त्यासाठी आपण बरीच किंमत मोजत आहोत ह्याची जाणीव खूप कमी जणांना आहे. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी कोणीतरी आपलं स्वतःच रक्त सांडत आहे तर कोणी आपल्या जिवाच बलिदान देते आहे. पण लोकशाही मध्ये आपले हक्क मोजणाऱ्या लोकांना त्यांच्या बलिदानाची काहीच किंमत नाही किंबहुना ते एका वेगळ्याच तीरावर आहेत जिकडून गोष्टी खूप वेगळ्या भासवल्या जातात.

पलीकडच्या तीरावरून मात्र गोष्टी खूप वेगळ्या आहेत. त्या अनुभवायच्या असतील तर ह्या दोन तीरावरच अंतर मात्र पार करता यायला हवं. भारतीय सेनेचे सैनिक बनणं सगळ्यांना नक्कीच शक्य नाही पण त्या सैनिकाला समजून घेण्याच अंतर मात्र आपण नक्कीच पार करू शकतो. त्या सैनिकाच्या पलीकडच्या तीरावरून आपण जेव्हा गोष्टी अनुभवू तेव्हा एक वेगळाच भारत आणि त्या भारताला सुरक्षित ठेवणारे ते सर्वच सैनिक आपल्याला वेगळ्या अनुभती देतात. भारतीय सैनिक होऊन देशाची सेवा करणं म्हणजे नोकरी नाही तर ते एक व्रत आहे. ज्यात कोणत्या क्षणाला काय होईल ह्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. कारण समोरचा जिवावर उदार होऊन बेसावध क्षणी हल्ला करत असेल तर आपल्यासाठी कोणताच क्षण बेसावध नसतो आणि आपल्यासाठी प्रत्येक क्षण हा जिवावर उदार होऊन ह्या मातृभूमीच रक्षण करण्याचा असतो.

प्रत्येक क्षणाला बदलणारी परिस्थिती, कधी त्याच्यासाठी, कधी माझ्यासाठी तर कधी आपल्या सगळ्याचसाठी येणारा क्षण शेवटचा असेल अश्या परिस्थिती मध्ये आपल्या सोबत आपलं पूर्ण कुटुंब घेऊन वावरायचं. आपण आपल्या जोवावर उदार तर होऊ शकतो आपण आपल्या सोबत आपल्या कुटुंबाला दावणीला बांधून युद्धजन्य परिस्थिती मध्ये आपल्या मुला बाळांना घेऊन वावरायचं हे सोप्प असते का? मुलांचा वाढदिवसाचा केक कापताना आलेला फोन घेऊन त्याचं क्षणी आधी देश मग सगळं म्हणत वरून मिळालेला आदेश अंतिम मानून आपलं कर्तव्य पूर्ण करताना त्या मनाला काही होतं नसेल का? स्वतःची पत्नी, मुल हॉस्पिटल मध्ये असताना युद्धात जखमी झालेल्या आपल्याच सैनिकी मित्रावर उपचार करताना किंवा त्याच्यासाठी रात्रीचा दिवस करताना ते आपलं आद्य कर्तव्य आहे हे ठरवताना किती मोठे दगड मनावर ठेवावे लागत असतील ह्याची कल्पना आपल्याला ह्या तीरावरून कधीच येणार नाही.

गोळी लागलेला ते आपल्याला वाचवणारा हा कोणत्या धर्माचा आहे. त्याची जात कोणती. तो दलित की सवर्ण आणि तो भारताच्या कोणत्या भागातला हे विचारण्याची गरज कोणालाच भासत नाही. कारण प्रत्येकासाठी तो एक भारतीय सैनिक असतो. भारतीय म्हणजे काय? ह्याची व्याख्या जाणून घ्यायची असेल तर कदाचित भारतीय सैनिकांशिवाय दुसरं कोणतं उदाहरण निदान माझ्यातरी डोळ्यासमोर नाही. हे सगळं करताना त्याचं पूर्ण कुटुंब पण त्यांच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं रहाते. कुटुंब म्हणून त्यांच्या प्रत्येकाच्या मनात ही अनेक धाकधूक असतील. आपलं कोणीतरी आपल्याला सोडून देशासाठी असलेलं आपलं कर्तव्य पूर्ण करायला आनंदाने हो म्हणणे ही पण एक देशसेवाच. त्यांच्या मनात घरातून निघालेलं आपलं माणूस पुन्हा घराकडे येईल की नाही ही शंकेची पाल मनात चुकचुकत असताना पण ते जाताना मन घट्ट करून जा सांगण किती कठीण असेल ह्याचा अंदाज आपल्याला मुंबई, पुणे सारख्या शहरात बसून येणार नाही. त्यासाठी युद्धभूमीवर रहावं लागते. तेव्हाच ह्या गोष्टींचा अंदाज आपण बांधू शकतो.

आम्ही इकडे बसून फक्त हे करायला हवं ते करायला हवं ह्याचे इमले बांधतो. एकमेकांना धर्मावरून त्यांची जात शोधून राजकारण करतो का तर हा देश माझा आहे. माझे हक्क, माझा समाज, माझा धर्म हे सगळं माझं असताना त्याच्यासाठी बलिदान देण्यासाठी मात्र दुसरं कोणाला शोधतो. माझा पगार किती वाढला, कोणाची कशी जिरवली, कालच्या खेळात कोण जिंकलं, कोणत्या चित्रपटाने किती गल्ला केला ते कोणत्यातरी हिरो अथवा हिरोईन च्या खाजगी आयुष्यात काय चालू आहे हे आमच्यासाठी जास्त महत्वाच असते. कारण पलीकडच्या तीरावर किती गेले तरी त्याची मोजदाद करण्याची गरज आम्हाला वाटत नाही. कारण डोळ्यावर आम्ही जात, धर्म, पंथ, हक्क ह्यांची इतकी झापड लावून घेतली आहेत की त्या झापडांच्या सावलीत आम्हाला पलीकडच्या तीरावर काय चालू आहे हे काही दिसत नाही. कधीतरी स्वतःला त्या पलीकडच्या तीरावर ठेवून दोन क्षण विचार करावा. कदाचित नुसत्या विचारांनी आपण किती आंधळे झालो आहोत ह्याचा अंदाज येईल.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Wednesday 19 June 2019

एक सकाळ... विनीत वर्तक ©

एक सकाळ... विनीत वर्तक ©

वाळवंटा मधील वातावरणात एक वेगळीच शांतता आहे. दूरवर पसरलेला वाळूचा अथांग सागर त्यात छत्री प्रमाणे जाणवणारी छोटी छोटी खुरटी झुडपं. त्यावर चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या आणि बुलबुल. काल रात्री येऊन गेलेली पावसाची एक सर त्यामुळे थंड होऊन हळूच अंगाला स्पर्श करून जाणारा वारा ह्या सगळ्यावर कढी म्हणजे मोरांच्या आवाजाने एकदम गाढ झोपेतून येणारी जाग. अश्या धुंद करणाऱ्या वातावरणात अनेकदा मी मलाच विसरून जातो आणी त्यात एकरूप होतो. उन चढायच्या आधी पक्ष्यांची चाललेली धावपळ, खुदकन हसून घाबरून आपल्या समोरून तुरुतुरु पळणारी खारूताई टकमक बघत जाताना बघून अनेकदा मला माझ्याच बालपणात पटकन घेऊन जाते.

निसर्गाच्या ह्या रुपात एकरूप होताना हाताशी अनेक क्षण असे लागतात जे मोजता येतं नाहीत. आज मोरांच्या आवाजाने जागा झालोच होतो. मग निसर्गाशी एकरूप होतांना त्याचं दर्शन ही अगदी जवळून झालं. ज्याच्या आवाजाने जागा झालो तो बिचारा त्या खुरट्या झाडावर चढून तिला आर्त साद घालत होता. त्याच्या आवाजात एक वेगळीच कशिश मला जाणवली. अश्या वेळी माझ्या डोक्यात मात्र हिंदी चित्रपटा मधील रोमान्स चे क्षण उभे राहिले. कदाचित तो तिला सांगत असावा, “प्रिये, आज जर तू माझ्या आवाजाला साथ देऊन मला भेटायला आली नाहीस... तर कदाचित ह्या झाडावरून खाली उडी मारून माझं जीवन संपवून टाकेल.” असा काही विचार मनात येतो तोच ती त्या दुसऱ्या टोकावरून स्वतःला जरा सांभाळत मला येताना दिसली. त्याला ही ती येताना दिसलीच होती त्यामुळे त्याच्या आवाजातली आर्तता आता शिगेला पोहचली होती.

शेवटी ती आलीच त्याच झाडाजवळ ज्यावर तो तिला साद घालत होता. पण ती न थांबता पुढे जाऊ लागली तेव्हा त्याने आगतिक होऊन झाडावरून स्वतःला झोकून दिलं. कदाचित तुझ्यासाठी मी काही करू शकतो हा विचार त्याच्या मनाला शिवला असावा. त्या हवेत विहार करत तो अगदी तिच्या जवळ उतरला. जणू काही तिला भेटायला स्वर्गातून त्याने भूतलावर अवतार घेतला ह्या आविर्भावात तो तिच्या मागे मागे चालू लागला. काही अंतर गेल्यावर मागे चालणाऱ्या त्याला ती काहीच भाव देत नाही हे लक्षात आल्यावर त्याला राहवेना. मग पुढे जे काही १० मिनिटे सुरु होतं ते बघून माझ्या डोळ्याचं मात्र पारणे फिटलं.

अचानक त्याने कूस बदलून आपल्या आत बंदिस्त केलेल्या त्या नजराण्याचा अविष्कार तिच्या समोर पेश केला. त्या नंतर अतिशय तालबद्ध पद्धतीने त्याने तिच्या समोर रुंजी घालायला सुरवात केली. सप्तरंग पिसारांच्या त्या मनमोहक तालबद्ध नृत्य आविष्काराने मी मात्र मंत्रमुग्ध झालो. काही वेळ ती पण त्याच्या त्या आविष्कारात स्वतःला विसरून गेली असावी कारण तो धुंद होऊन नाचत होता आणि ती एकटक त्याच्या त्या रुपाकडे बघत होती. १० मिनिटे गेली असावी ती आणि मी दोघेही त्याच्या त्या लयबद्ध नृत्याने एकाच जागी खिळून बसलो होतो. आजूबाजूला काय सुरु आहे ह्याचा अंदाज आम्हा दोघांना ही नव्हता. पण अचानक तिला काय झाले माहित नाही त्याच्या ह्या मनमोहक नृत्याने तिचं समाधान झालं नसावं तिने आपलं तोंड फिरवलं आणि चालू लागली.

ते बघून त्याचा ही हिरमोड झाला असावा. आसमंतात सप्तरंगाची उधळण करणारा त्याचा पिसारा अर्ध्यावर आला आणि मग हळूच अस्ताला गेला. कुठेतरी त्याच तुटलेलं मन मला काय कोणास ठाऊक पण इतक्या लांबून ही जाणवलं. कदाचित जीव तोडून केलेला तो स्वर्गीय अविष्कार त्याच्या सखीला आवडला नसावा ह्याची खंत त्याच्या देहबोलीतून माझ्यापर्यंत पोहोचली ह्यात सगळं आलं. पण तो हरला नाही पुन्हा एकदा तिच्या मागे रुंजी घालत ते दोघे त्या दुसऱ्या क्षितिजावर नाहीसे झाले. त्याच सोबत मी पण भानावर आलो. घड्याळाचे काटे कामाची वेळ झाली सांगत होते.

कुठेतरी त्या दोघांचा तो रोमान्स बघून आपलंपण असचं असते ह्याची जाणीव झाली. पण प्राणी आणि माणसात एकच फरक.. प्रेम, प्रतिसाद समोरून मिळाला नाही तर ओरबाडून घेण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. तो खचला, कुठेतरी नाराज झाला पण पुढल्या क्षणाला पुन्हा तीच मन वळवण्यासाठी तिच्यामागे रुंजी घालू लागला. पण त्याने काही ओरबाडून घेतलं नाही. त्याने जबरदस्ती केली नाही. जे जसं आहे तसं ते स्वीकारण्याची त्याची वृत्ती मला सकाळीच खूप काही शिकवून गेली. कोणत्याही नात्यात नकार पचवण्याची ताकद आपली असायला हवी. अडकलेला पतंग निघत नाही म्हणून तो फाडण्याची आपली वृत्ती आपल्याला त्या मुक्या प्राण्यांपेक्षा खाली नेते हे पुन्हा एकदा मनात पक्क झालं. पण त्याचा तो स्वर्गीय अविष्कार माझ्या मनात बंदिस्त झाला तो कायमचा.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Thursday 13 June 2019

चंद्रयान २ एका स्वप्नाचा प्रवास ( भाग १)... विनीत वर्तक ©

चंद्रयान २ एका स्वप्नाचा प्रवास ( भाग १)... विनीत वर्तक ©

भारताची पहिली चंद्र मोहीम सुरु होण्याआधीच भारताने चंद्रयान २ मोहिमेची आखणी सुरु केली होती. रशिया ची रॉसकॉसमॉस आणि भारताची इस्रो ह्यांनी २००७ मधेच एक करार केला. त्यानुसार ऑरबिटर आणि रोव्हर ची जबाबदारी इस्रो ने उचलली तर चंद्रावर उतरायला लागणाऱ्या ल्यांडर ची जबाबदारी रॉसकॉसमॉस ने उचलायची असं ठरलं. पण रॉसकॉसमॉस ला आलेल्या मंगळाच्या फोबोस- गृंट मिशन च्या अपयशानंतर त्यांनी भारतासोबत झालेल्या करारातून काढता पाय घेतला. २०१० च्या आसपास अपेक्षित असलेली चंद्रयान २ मोहीम २०१५ पर्यंत पुढे ढकलली गेली. रशिया ने असमर्थता दाखवल्यावर इस्रो ने ल्यांडर बनवण्याची जबाबदारी स्वतः उचलायचं ठरवलं. ह्या मिशन ला वेगवेगळ्या तांत्रिक चाचण्यातून पूर्ण पास करण्यासाठी पुढे अजून ४ वर्षाचा कालावधी लोटला. आता १५ जुलै २०१९ ला जवळपास १० वर्षानंतर पुन्हा एकदा भारत चंद्राकडे झेपावत आहे. चंद्रावर मानव जाऊन इतका कालावधी लोटल्यावर पुन्हा एकदा चंद्रावर का जायचं? किंवा भारताने चंद्राची निवड का करावी? चंद्रावर नक्की जाउन इस्रो काय करणार? इस्रो च्या ह्या चंद्रयान मोहिमेचं जागतिक पटलावर महत्व हे सगळेच प्रश्न सामान्य माणसाच्या मनात येणं स्वाभाविक आहे.

चंद्र पृथ्वीचा एकमेव उपग्रह ज्याचा अभ्यास अनेकवेळा केला गेला आहे. पण ह्याच चंद्राच्या अनेक बाबी आजही गुलदस्त्यात आहेत. २००८ साली भारताच्या चंद्रयान १ मोहिमेतून चंद्रावर पाणी असल्याच्या निष्कर्षावर शिक्कामोर्तब झालं होतं. हा शोध २१ व्या शतकातील अवकाश संशोधनातील एक मैलाचा दगड मानण्यात येतो. ह्यावेळी इस्रो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी करत आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव का निवडला ते तिकडे जाण्यातील तांत्रिक अडचणी? ह्याच्या उत्तरासाठी आपल्याला थोडा चंद्राच्या ह्या भागाची माहिती असणं गरजेचं आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव रहस्यमयी आहे. कारण ह्याच्या काही भागात आजवर कधीच सूर्याचा प्रकाश पोहचलेला नाही तर काही भागात नेहमीच सूर्य तेजाने तळपत असतो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या ज्या भागावर सूर्य आजवर कधीच उगवलेला नाही त्या भागात चंद्राच पाणी हे बर्फाच्या स्वरूपात असण्याची शक्यता आहे. चंद्राच्या पाण्याच स्वरूप जर समजून घ्यायचं असेलं तर ह्या बर्फाचा अभ्यास वैज्ञानिकांसाठी अतिशय महत्वाचा आहे.

चंद्राच्या ह्याच भागात अनेक विवरं आहेत. जी उल्कापातामुळे तयार झाली आहेत. ह्या विवराला सूर्याचा प्रकाश स्पर्श करत नसल्यामुळे ह्या मधील अनेक महत्वाच्या गोष्टी ज्या भौतिक, रसायन आणि भूगोलाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत त्या आजही जपल्या गेल्या आहेत. पुढल्या भविष्यात जर चंद्रावर आपलं दुसरं घर बसवायची वेळ आली तर चंद्राचा दक्षिण भाग हा सगळ्यात महत्वाचा असणार आहे. बर्फाच्या स्वरूपात असलेलं पाणी मानवाची प्राथमिक गरज भागवू अश्केल. तसेच ह्या भागातील जमीन प्रचंड अश्या खनिजांनी ओतप्रोत आहे. ज्यात हेलिअम ३ चा ही समावेश आहे. हेलिअम ३ कडे मानवाच्या भविष्याचा उर्जेचा स्रोत म्हणून बघण्यात येते आहे. चंद्राच्या ह्याच भागात अनेक डोंगर असून इकडे असलेलं एपीसिलोन टोक हे पृथ्वीवर असणाऱ्या कोणत्याही डोंगरापेक्षा जास्ती उंचीच आहे. चंद्रावर जास्तीत जास्त काळ सूर्यप्रकाश ह्याच भागात पडतो. त्यामुळे सगळ्यात जास्त काळ सौर उर्जा मिळवण्याच ठिकाण पण दक्षिण धृवच आहे.

आजवर झालेल्या चंद्रयान मोहिमा ह्या चंद्राच्या मध्य भागाच्या आसपास झालेल्या आहेत. दक्षिण ध्रुव हा भाग पूर्णतः माहित नसलेला भाग आहे. ह्यामुळेच इकडे उपग्रह यान किंवा रोव्हर उतरवणं प्रचंड कठीण काम आहे. सूर्यप्रकाश पोहचत नसल्याने इकडे रोव्हर चं आयुष्य ही खूप कमी असणार आहे. अश्या प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा इस्रो ने चंद्रयान २ मोहिमेचं स्वप्न बघून ती प्रत्यक्षात उतरवली आहे. ह्या मोहिमेत इस्रो आधी सांगितलं त्या प्रमाणे ऑरबिटर, ल्यांडर आणि रोव्हर नेतं असून ह्यातील ऑरबिटर चंद्राच्या कक्षेत फिरत राहणार आहे. तर ल्यांडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असून ह्यातील रोव्हर चंद्राच्या जमिनीवर विहार करणार आहे. ह्या तिन्ही गोष्टींवर वेगवेगळी उपकरण असून चंद्राच्या अनेक बाबींचा ती अभ्यास करणार आहेत.

चंद्रयान १ वर असलेल्या नासा (अमेरिका) च्या उपकरणाने चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला होता. हे उपकरण भारताने कोणतेही पैसे न घेता वैज्ञानिक दृष्ट्रीने चंद्रावर नेलं होतं. ह्या वेळेस ही चंद्रयान २ वर असलेल्या १४ उपकरणांन पेकी १३ भारतीय असून १ उपकरण नासाचं असणार आहे. ह्या ही वेळेस भारत कोणतेही पैसे न घेता नासा चं हे उपकरण नेतो आहे. ह्यासाठी नासा भारताला आपलं डीप स्पेस नेटवर्क वापरण्याची मुभा देणार आहे. नासा चं डीप स्पेस नेटवर्क जगात अग्रगण्य असून इंटर प्लानेटरी मिशन जसे की चंद्रयान २ च्या संपर्क आणि संवादासाठी भारताला ह्याची अत्यंत गरज भासणार आहे.

क्रमश.
माहिती स्रोत :- इस्रो, नासा, स्पेस प्लानेटरी, विकिपिडिया

फोटो स्रोत:- इस्रो, नासा, गुगल

१) दक्षिण ध्रुवावर दिसणाऱ्या ह्या दोन निळ्या टीपक्यांच्या मध्ये भारताचे चंद्रयान २ उतरणार आहे.

२) चंद्रावर आजवर उतरलेल्या यानांची जागा आणि भारताच्या चंद्रयान २ उतरण्याची प्रस्तावित जागा.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Tuesday 11 June 2019

सुरक्षित भारत... विनीत वर्तक ©

सुरक्षित भारत... विनीत वर्तक ©

अस्थिर असणारे शेजारी राष्ट्र, सतत होणारी अतिरेकी आक्रमण, आशिया मधलं चीन ची वाढती सैनिकी सामर्थ्य, सतत धुसमुसणाऱ्या सीमा, जवळपास ७००० किमी पेक्षा जास्त असलेली किनारपट्टी आणि येत्या काळात समोरासमोर युद्ध न करता क्षेपणास्त्र युद्धाचा वाढता धोका अश्या सगळ्या पातळीवर भारताची सुरक्षितता गेल्या काही वर्षात चिंतेचा विषय बनत चालली होती. पण येत्या काळात भारत सरकारने घेतलेल्या काही पावलांमुळे भारत आता एक सुरक्षित भारत म्हणून उदयास येतं आहे. नुकतेच अमेरिकेने भारताला जवळपास १ बिलियन अमेरिकन डॉलर ( ६००० कोटी रुपये) किमतीची नासमास-२ ही प्रणाली देण्याच मान्य केलं आहे. अमेरिकेची नासमास २, इस्राईल ची बराक, रशियाची एस ४०० ह्यांच्या जोडीला भारताच्या डी.आर.डी.ओ. ची बी.एम.डी. आणि ए.ए.डी. प्रणाली. ह्या सगळ्यांना अवकाशातून गरुडाचे डोळे देणारी इस्रो मिळून २१ व्या शतकातील सुरक्षित भारताच्या उदयाची सुरवात झाली आहे.

पुढल्या काळातील युद्ध ही समोरासमोर क्वचित लढली जातील. कोणत्याही देशावर आक्रमण करायचं झाल्यास क्षेपणास्त्र युद्ध हे पाहिलं पाउल असणार आहे. भारताच्या प्रमुख शहर आणि ठिकाणांवर असा हल्ला जास्तीत जास्त भारताच नुकसान करू शकतो हे लक्षात घेऊन आपल्या सीमांना तसेच अति महत्वाच्या शहरांना तसेच ठिकाणांना सुरक्षित करण्यासाठी भारताने मल्टी लेअर एअर डिफेंस प्रणाली बनवण्याची सुरवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेची नासमास २ भारत खरेदी करत आहे. ही प्रणाली दिल्ली मधील अति महत्वाच्या भागांच्या रक्षणेतील सगळ्यात आतलं कवच असणार आहे. तर नक्की काय आहे ह्या वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये जे भारताला सुरक्षित बनवणार आहेत. ते आपण समजून घ्यायला हवं.

नासमास २ ही सिस्टीम भारताच्या अति महत्वाच्या भागांच (दिल्ली शहर) रक्षण करण्यासाठी तैनात असणार आहे. ह्यात वेगवेगळे १२ मिसाईल डागणारे प्लाटफॉर्म असून प्रत्येकावर ६ एआयएम १२० एअर तो एअर सरफेस मिसाईल आहेत. ह्यांच्या जोडीला आठ एक्स ब्यांड थ्री डी रडार तसेच गन सिस्टीम, फायर कंट्रोल युनिट असून ह्या सर्वांच नियंत्रण करणारी यंत्रणा ह्यात समाविष्ट आहे. ही सगळी यंत्रणा एखाद्या बिल्डींग मधल्या अतिरेक्याला ते ९/११ सारख्या हल्याला तोंड देण्यास सक्षम आहेत. ह्याच्या भोवती डी.आर.डी.ओ. ने विकसित केलेली आकाश प्रणाली संरक्षण करेल. ह्या पहिल्या लेअर नंतर दुसरी लेअर ची जबाबदारी आहे ती जवळपास ४०,००० कोटी रुपये खर्चून रशिया कडून घेतलेल्या एस ४०० सिस्टीम ची.

एस ४०० ची एक बटालीयन म्हणजे शत्रूच्या चारी मुंड्या चीत. ह्या प्रणाली मध्ये ३ प्रकारची मिसाईल वापरली जातात. सगळ्यात दूरवर मारा करणारी ४० एन ६, दूरवर मारा करणारी ४८ एन ६ तर जवळ मारा करणारी ९ एम ९६ मिसाईल. ही तिन्ही मिसाईल सुपर सॉनिक व हायपर सॉनिक वेगाने म्हणजे तब्बल १४ माख वेगाने ( ध्वनीपेक्षा १४ पट जास्ती वेगाने) १७,००० हजार किमी / तास वेगाने शत्रूकडे झेपावतात. एक उदाहरण द्यायचं झाल तर हलवारा एअर बेस मध्ये असलेल्या एस ४०० कडून निघालेलं क्षेपणास्त्र पाकिस्तान मधल्या लाहोर वर उडणाऱ्या एफ-१६ विमानाचा फक्त ३४ सेकंदात वेध घेऊ शकते. १२० ते ६०० किमी पर्यंतच्या टप्यात येणार कोणतही विमान, क्षेपणास्त्र किंवा ड्रोन ह्याच्या पासून वाचू शकत नाही. एकाच वेळी ६०० किमितील ३०० वेगवेगळी टार्गेट शोधून तब्बल ८० टार्गेट वर एकाच वेळी खातमा करू शकते. १६० वेगवेगळ्या मिसाईल न एकाच वेळी गाईड करू शकते. ह्यातील स्याम प्रणाली एफ-३५ सारख्या पाचव्या पिढीतील स्टेल्थ ( रडार वर न दिसणाऱ्या ) फायटर प्लेन ला सुद्धा मारू शकते. एस ४०० ही जरी सिमेवर तैनात असली तरी ही प्रणाली मोबाईल असल्याने देशाच्या संरक्षण सज्जतेत खूप महत्वाचा भाग असणार आहे.

ह्या नंतर तिसऱ्या लेयर मध्ये डी.आर.डी.ओ. ने विकसित केलेली ए.आर.डी. आणि पृथ्वी एअर डिफेन्स प्रणाली संरक्षण करेल. ही प्रणाली २००० -५००० की.मी. च्या टप्यात १५ ते २५ आणि ८० ते १०० की.मी. उंचीवरील कोणत्याही क्षेपणास्त्राला उत्तर देण्यास सक्षम आहे. ह्या नंतर शेवटच्या टप्प्यात इस्राईल आणि भारताच्या डी.आर.डी.ओ. ने विकसित केलेली बराक ८ ही सरफेस टू एअर क्षेपणास्त्र प्रणाली ७५ – १०० किमी. उंचीवरील कोणत्याही क्षेपणास्त्राला हवेत गारद करण्यासाठी ही कार्यान्वित केली गेली आहे.

जमिनीवरील अभेद्य रचनेला अवकाशातून लक्ष आणि माहिती देण्याच काम इस्रो चे आरआयस्याट आणि क्राट्रोस्याट उपग्रह देत आहेत. इस्रो चा आरआयस्याट अवकाशातून ढगांच्या मधून पण जमिनीवर काय चालू आहे ते बघण्यात सक्षम असून क्राट्रोस्याट तर २० सेंटीमीटर पर्यंतचा भाग अवकाशातून दाखवण्यात सक्षम आहे. त्यांच्या जोडीला येत्या नोव्हेंबरमध्ये इस्रो नेक्स्ट जनरेशन मल्टी स्पेक्ट्रल, मल्टी रिझोल्यूशन असणारे सैनिकी उपग्रह अवकाशात सोडत आहे. ह्या उपग्रहांच्या नजरेमुळे युद्ध सुरु होण्याआधीच युद्ध कुठे ते शत्रूची तयारी काय ह्याची खडानखडा माहिती भारताला असणार आहे. ह्या उपग्रहांना संरक्षण देण्यासाठी भारताने आधीच ए- स्याट मिसाईल ची चाचणी घेऊन तैनात केलं आहे.

एकाच वेळी वेगवेगळ्या बनावटीच्या, वेगवेगळ्या क्षमतेच्या अभेद्य अश्या आवरणामुळे भारताच्या अभेद्य तटबंदीला खिंडार पाडणे शत्रूला जवळपास अशक्य होणार आहे. एके काळी कोणीही याव टपली मारून जावं आणि आम्ही निषेध करणार ह्या पोतडी मधून बाहेर पडत भारत आता अभेद्य अश्या सुरक्षित भारताकडे पावलं टाकत आहे. एस ४०० असो वा नासमास २ ह्या सगळ्या प्रणाली महाग असल्या तरी येत्या ४ ते ५ वर्षात त्या काम करू लागल्यावर त्यांच्या सोबतीला ब्राह्मोस हे स्वनातीत क्षेपणास्त्र बसवलेली सुखोई ३०, राफेल सारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने, पृथ्वी , अग्नी ५, अग्नी ६ सारखी आंतरखंडीय क्षेपणास्त्र , त्याच्या जोडीला इस्रो चे सैनिकी उपग्रह मिळून एका सुरक्षित भारताचा उदय जागतिक पटलावर करतील ह्याची माझ्या मनात शंका नाही.

माहिती स्रोत :- विकिपिडीया

फोटो स्रोत :- गुगल


Saturday 8 June 2019

क्षणभंगुर... विनीत वर्तक ©

क्षणभंगुर... विनीत वर्तक ©

साधारण १० वर्षापूर्वी आयुष्याच्या एका वेगळ्या वळणाला सुरवात केली. त्या वळणावर आम्ही दोघेही चाचपडत होतो. अनोळखी ते जोडीदार हा प्रवास एकत्र करताना आमच्याच सारख्या त्या वळणावर वळलेल्या लोकांसोबत हनिमून ट्रीप ला गेलो होतो. आमच्या सारख्याच एका जोडीने आमच्या दोघांच मन जिंकल. त्या दोघांकडे बघून आमचं एकमत झालं की प्रवास सोबत करायचा तर तो असा. अनोळखी असून पण ओळखीचे असणारे ते दोघे तेव्हापासून आमच्या दोघांच्याही मनात घर करून गेले. दिवसांमागून दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेली. ते दोघे आणि आम्ही दोघे एका मुलीचे आई बाबा झालो. सोशल मिडिया मधून ३-४ वेळा बोलणं होतं राहिलं. पण आयुष्याच्या प्रवासात पुन्हा कधी भेटलो नाहीत.

वाढदिवस किंवा एखाद्या पोस्ट च्या माध्यमातून शुभेछ्या ते आयुष्यात काय चालू आहे ह्याची पुसटशी कल्पना दोघांच्या प्रोफाईल वरून मी वाचत होतो. ह्या वर्षी मात्र काही वेगळं झालं. वाढदिवसाच्या शुभेछ्या दिल्या. तेवढ्यात इनबॉक्समध्ये आमच्याच सोबत नवीन वळणावर सुरवात करणाऱ्या एकाचा मेसेज. अरे, तुला माहित नाही का? ती गेली तिन महिने झाले? मी दोन मिनिटे स्तब्ध. हा धक्का पचवत नाही तोवर दुसरा धक्का तो पण गेला मागच्याच आठवड्यात..... हे ऐकलं आणि मी पूर्ण कोलमडून गेलो. कुठेतरी आपल्या आयुष्यातून कोणीतरी गेलं हा धक्का पचवण्याची माझी तयारी नव्हती किंवा ही बातमीच खूप धक्कादायक होती. कारण काही असो अवघ्या दहा दिवसांची त्यांची सोबत आमच्यासोबत होती पण त्यांची एक्झिट मात्र कायमचा चटका देऊन गेली.

आयुष्य किती क्षणभंगुर असते ह्याचा अनुभव मला आला. अगदी काही महिन्यांपूर्वी बोलता बोलता आमच्यात त्यांच्या विषय आला होता. माझी मुलगी सई आणि त्यांच्या मुलीच वय ही सारखच अवघे काही दिवसांच अंतर असेल. फेसबुक वर दोघांचे फोटो आणि बातम्या बघून आमच्यात अनेकदा विषय निघत असे की किती आनंदात आहेत. घर, व्यावसायिक, आर्थिक सगळ्याच पातळीवर यशस्वी घौडदौड सुरु होती. मुळात त्या दोघांचाही लाघवी स्वभाव ते सर्वसमावेशक वृत्ती त्याचवेळी आम्हा दोघांना ही खूप आवडून गेली होती. पण अवघ्या ३ महिन्यांच्या प्रवासात होत्याच नव्हतं झालं.

सगळं सुरळीत चालू असताना अचानक ब्रेक लागून आयुष्य थांबाव असं काहीसं मला जाणवलं. आपण आयुष्यात उर फुटेसतोवर धावतो. पैसा, मानसन्मान, चांगल आयुष्य ( ते चांगल म्हणजे काय? ह्याच उत्तर अनेकांना आयुष्यात कळत नाही हा भाग सोडून ), आपली सामाजिक प्रतिष्ठा ते आजकाल सोशल मिडिया मधील आपलं व्यक्तिमत्व ह्यासाठी सकाळ पासून ते रात्री पर्यंत धावपळ सुरु असते. कधी सरळ रस्त्याने तरी कधी रस्ता वाकडा करून आपल्यापेकी प्रत्येकजण ते आनंदाचे क्षण मिळवण्यासाठी किंमत मोजत असतो. गेलेला क्षण आपला होणार नाही ते येणारा क्षण आपला शेवटचा असेल का? ह्याची शाश्वती नसताना पण त्या आशेवर आत्ता हातात असलेले क्षण सोडून देत असतो.

आयुष्य म्हणजे तरी काय? वेचलेले क्षण जेव्हा आपण आपल्याला ओळखतो. जेव्हा आपण समाधानी असतो. समाधान तर कशातही मिळते. उन्हाची लाही होत असताना मृगाच्या पडलेल्या पावसात भिजण्याच असो वा आयुष्यात पहिल्यांदा आपल्या पाल्याचा रडण्याचा आवाज असो. समाधानासाठी न पैश्याची गरज नसते ना तुमचं समाजात स्थान काय आहे हे महत्वाच असते. मर्सिडीज मध्ये बसणारा पण समाधानी असतो आणि आपल्या सायकल वर टांग मारणारा पण. फक्त ते क्षण टिपता यायला हवेत. हे टिपण जगाच्या जगरहाटीत धावताना विसरून चाललो आहोत ह्याची जाणीव ह्या निमित्ताने पुन्हा एकदा झाली. वक्त नावाचा एक चित्रपट खूप वर्षापूर्वी बघितला होता. होत्याच नव्हत करायला एक सेकंद पण पुरेसा असतो. एकेकाळी राजा असणाऱ्या कोणालाच रंक व्हायला वेळ लागत नाही. जे लिहिलं आहे ते घडतेच.

आयुष्य बनते ते अश्याच क्षणांनी ज्याची किंमत आपण करत नाही. काही घटना अश्या घडतात की आपण एकदम जागे होतो कदाचित वरची घटना त्यातलीच एक. काहीतरी निसटून जाते आहे ह्याची जाणीव होती पण काय ते कळायला अशीच एखादी घटना समोर यावी लागते. राजेश खन्ना चे आनंद चित्रपटातले काही संवाद माझ्या नेहमीच लक्षात आहेत,

“बाबूमोशाय, जिंदगी और मौत उपर वाले के हाथ है... उसे ना तो आप बदल सकते है ना मै... हम सब तो रंगमंच की कठपुतलीया है जिनकी डोर उपर वाले के उंगलियो मै बंधी है”...

जब तक जिंदा हुं तब तक मरा नही... जब मर गया साला मै ही नही...

बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये... लंबी नही”...

आयुष्यात खूप काही क्षण निसटले पण अजून नाही निसटू देणार. आयुष्य क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव पुन्हा एकदा झाली. आयुष्याच्या जगरहाटीत महत्वाची लोकं, क्षण, घटना ह्यांना निसटू द्यायचं नाही असं ठरवलं आहे. काय माहित येणारा कोणता क्षण शेवटचा असेल...

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.