Monday 24 June 2019

नारीशक्तीचा चंद्रावर तिरंगा... विनीत वर्तक ©



नारीशक्तीचा चंद्रावर तिरंगा... विनीत वर्तक ©

२०१४ साली भारताच्या यशस्वी मंगळ स्वारी नंतर पूर्ण जगाच लक्ष भारताकडे वळाल होतं. खास करून जगातील अग्रगण्य अवकाश संस्था आणि त्यातले वैज्ञानिक. भारत मंगळाच्या कक्षेत आपलं यान प्रक्षेपित करू शकतो ही गोष्टच त्यांना पचायला जड जात होती. ह्या वेळेस इस्रो च्या कमांड सेंटर मधील एका फोटोने पूर्ण जगभरात सगळ्याचं लक्ष वेधलं. तो फोटो होता इस्रो च्या नारी शक्तीचा. भारतीय संस्कृती च प्रतिक असलेल्या साड्या घालून अगदी केसात गजरा माळून मंगळयान मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करताना इस्रो च्या स्त्री वैज्ञानिकांना बघून पूर्ण जग अवाक झालं होतं. चूल आणि मुल ह्यात अडकलेली भारतीय नारी भारताच्या मंगळ मोहिमेत आपला सिंहाचा वाटा उचलताना बघून पूर्ण जगाने तोंडात बोटे घातली होती.

एकेकाळी सापांच्या जादू करणारा देश कसा काय मंगळावर पहिल्याच प्रयत्नात पोहोचतो? हे जेवढं जगासाठी धक्कादायक होतं तितकचं धक्कादायक साडी घातलेली भारतीय स्त्री ह्या मिशन मध्ये मोलाची भूमिका बजावते हे होतं. ह्या नंतर जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णतः बदलून गेला. २०१४ च्या मोहिमेनंतर पुन्हा एकदा इस्रो एका नव्या मोहिमेसाठी सज्ज होतं आहे. ‘चंद्रयान २’ हे इस्रो च्या इतिहासातलं सगळ्यात कठीण मिशन मानलं जाते आहे. आजवर इस्रो पृथ्वीच्या, चंद्राच्या आणि मंगळाच्या कक्षेत आपलं यान / उपग्रह पाठवण्यात यशस्वी झाली आहे. पण ह्या वेळेस पहिल्यांदा इस्रो एका वेगळ्या ग्रहावर यान उतरवणार आहे.

एखाद्या ग्रहाभोवती त्याच्या कक्षेत यान प्रक्षेपित करण सोप्प पण तेच यान त्याच्या पृष्ठभागावर उतरवणं हे तितकचं कठीण आहे. एखाद्या ग्रहावर यान / रोवर उतरवण्यासाठी अनेक गोष्टींचा अभ्यास गरजेचा आहे. त्या ग्रहाच्या वातावरणाची अचूक माहिती, तिथल्या वातावरणाचा दाब, स्थिती, तपमान ते उतरवण्याची जागा ह्या सोबत इतर अनेक गोष्टींचा प्रचंड अभ्यास करावा लागतो. प्रत्येक गोष्टीच गणित एक दोन वेळा नाही तर हजारवेळा करावं लागते. एक चूक आणि होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. चंद्राच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ह्या वर्षाच्या सुरवातीला इस्राईल च्या यानाला चंद्रावर उतरताना अपयशाला सामोर जावं लागलं कारण खूप काही अश्या गोष्टी आहेत ज्याचं नियंत्रण आपल्याला पृथ्वीवरून करावं लागते तर काही गोष्टी तिथल्या कॉम्प्यूटर ने योग्यरित्या करणं गरजेचं असते.

चंद्रावर उतरण्यासाठी लागणार डीप स्पेस नेटवर्क आणि चंद्राच्या वातावरणाशी जुळवून घेणारी यंत्रणा निर्माण करण कठीण होतं त्यामुळे इस्रो च्या ह्या मिशन ला अनेकवेळा पुढे ढकलाव लागलं आहे. चंद्रावर यान उतरवणं ज्याला वैज्ञानिक भाषेत सॉफ्ट लेंडिंग म्हणतात ते आजवर इस्रो पहिल्यांदा करत आहे. ज्या भागात इस्रो आपलं यान उतरवत आहे त्या भागात आधी कोणत्याच राष्ट्राच यान उतरलेलं नाही. चंद्रयान २ चं सगळं वजन ३.८ टन ( ३८०० किलोग्राम ) आहे. इस्रो चं जी.एस.एल.व्ही. मार्क ३ रॉकेट पहिल्यांदा इतकं वजन घेऊन अवकाशात उड्डाण करणार आहे. तब्बल १००० कोटी रुपयांची अतिशय खडतर अशी मोहीम यशस्वी करण्याच शिवधनुष्य इस्रो ने भारताच्या नारीशक्ती वर सोपवलेलं आहे.

एम.वनिथा ह्या मिशन च्या प्रोजेक्ट डायरेक्टर असणार असून रितू करीढाल ह्या मिशन डायरेक्टर असणार आहेत. एम. वनिथा ह्या इस्रो च्या पहिल्या महिला प्रोजेक्ट डायरेक्टर असणार असून २००६ साली त्यांना एस्ट्रोनॉमीकल सोसायटी ऑफ इंडिया च्या “बेस्ट वुमन” सायंटीस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर रितू करीढाल ह्या भारताच्या “रॉकेट वुमन ऑफ इंडिया” म्हणून ओळखल्या जातात. त्यांना ही २००७ साली “यंग सायंटीस्ट” पुरस्कार डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळालेला आहे. त्यांच्या निवडीबाबत सांगताना के.शिवन ह्यांचे शब्द खूप काही सांगून जातात,

इस्रो डायरेक्टर के. शिवन म्हणतात,

“We only look at the most fit person for the job, and it so happened that it was women here. It didn’t make difference for us. In fact, 30% of the chandryaan 2 team are women.”

ज्या देशात स्त्री म्हणून आजवर अनेक ठिकाणी पुरुषसत्ताक समाजाकडून डाववलेल्या गेलेल्या अनेक संधीसाठी स्त्री लढा देते आहे. त्याच भारत देशात भारताच्या अवकाश इतिहासातील सगळ्यात खडतर आणि सगळ्यात महत्वाकांक्षी मोहिमेसाठी दोन स्त्रियांची निवड ही त्यांच्या कर्तुत्वावर होते हा बदल खूप मोठा आहे असं मला मनापासून वाटते. चंद्रयानातील ल्यांडर आणि रोव्हर वर भारतीय तिरंगा असणार आहे तर रोव्हर च्या चाकांच्या एका बाजूला अशोकचक्र तर दुसऱ्या बाजूला इस्रो चा लोगो असणार आहे. जवळपास ६२० पेक्षा जास्ती भारतीय विद्यापीठ, कंपनी, प्रयोगशाळा त्याचं योगदान ह्या मोहिमेसाठी दिलं आहे. ह्या सगळ्यांच्या तसेच १३० कोटी भारतीयांच्या चंद्रावर तिरंगा फडकवण्याच स्वप्नाच नेतृत्व करण्याची जबाबदारी भारताच्या दोन स्त्रिया उचलत आहेत. ही सगळ्याच भारतीय स्त्रियांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

जेव्हा चंद्रयान २ चंद्रावर उतरेल तेव्हा भारताने एक असा पल्ला पार केला असेल ज्याच स्वप्न पण कोणत्याच भारतीयाने ५० वर्षापूर्वी बघितलेलं नसेल. हे स्वप्न पूर्णत्वाला नेण्याचं श्रेय त्याच साड्या घातलेल्या, गजरा माळलेल्या स्त्रियांकडे असेल तेव्हा नारीशाक्तीचा तिरंगा मोठ्या डौलाने चंद्रावर फडकत असेल.

माहिती स्रोत :- इस्रो, गुगल, इतर तत्सम इंटरनेट लिंक

फोटो स्रोत :- गुगल, बी.बी.सी., गेटी इमेज.



No comments:

Post a Comment