Saturday, 8 June 2019

क्षणभंगुर... विनीत वर्तक ©

क्षणभंगुर... विनीत वर्तक ©

साधारण १० वर्षापूर्वी आयुष्याच्या एका वेगळ्या वळणाला सुरवात केली. त्या वळणावर आम्ही दोघेही चाचपडत होतो. अनोळखी ते जोडीदार हा प्रवास एकत्र करताना आमच्याच सारख्या त्या वळणावर वळलेल्या लोकांसोबत हनिमून ट्रीप ला गेलो होतो. आमच्या सारख्याच एका जोडीने आमच्या दोघांच मन जिंकल. त्या दोघांकडे बघून आमचं एकमत झालं की प्रवास सोबत करायचा तर तो असा. अनोळखी असून पण ओळखीचे असणारे ते दोघे तेव्हापासून आमच्या दोघांच्याही मनात घर करून गेले. दिवसांमागून दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेली. ते दोघे आणि आम्ही दोघे एका मुलीचे आई बाबा झालो. सोशल मिडिया मधून ३-४ वेळा बोलणं होतं राहिलं. पण आयुष्याच्या प्रवासात पुन्हा कधी भेटलो नाहीत.

वाढदिवस किंवा एखाद्या पोस्ट च्या माध्यमातून शुभेछ्या ते आयुष्यात काय चालू आहे ह्याची पुसटशी कल्पना दोघांच्या प्रोफाईल वरून मी वाचत होतो. ह्या वर्षी मात्र काही वेगळं झालं. वाढदिवसाच्या शुभेछ्या दिल्या. तेवढ्यात इनबॉक्समध्ये आमच्याच सोबत नवीन वळणावर सुरवात करणाऱ्या एकाचा मेसेज. अरे, तुला माहित नाही का? ती गेली तिन महिने झाले? मी दोन मिनिटे स्तब्ध. हा धक्का पचवत नाही तोवर दुसरा धक्का तो पण गेला मागच्याच आठवड्यात..... हे ऐकलं आणि मी पूर्ण कोलमडून गेलो. कुठेतरी आपल्या आयुष्यातून कोणीतरी गेलं हा धक्का पचवण्याची माझी तयारी नव्हती किंवा ही बातमीच खूप धक्कादायक होती. कारण काही असो अवघ्या दहा दिवसांची त्यांची सोबत आमच्यासोबत होती पण त्यांची एक्झिट मात्र कायमचा चटका देऊन गेली.

आयुष्य किती क्षणभंगुर असते ह्याचा अनुभव मला आला. अगदी काही महिन्यांपूर्वी बोलता बोलता आमच्यात त्यांच्या विषय आला होता. माझी मुलगी सई आणि त्यांच्या मुलीच वय ही सारखच अवघे काही दिवसांच अंतर असेल. फेसबुक वर दोघांचे फोटो आणि बातम्या बघून आमच्यात अनेकदा विषय निघत असे की किती आनंदात आहेत. घर, व्यावसायिक, आर्थिक सगळ्याच पातळीवर यशस्वी घौडदौड सुरु होती. मुळात त्या दोघांचाही लाघवी स्वभाव ते सर्वसमावेशक वृत्ती त्याचवेळी आम्हा दोघांना ही खूप आवडून गेली होती. पण अवघ्या ३ महिन्यांच्या प्रवासात होत्याच नव्हतं झालं.

सगळं सुरळीत चालू असताना अचानक ब्रेक लागून आयुष्य थांबाव असं काहीसं मला जाणवलं. आपण आयुष्यात उर फुटेसतोवर धावतो. पैसा, मानसन्मान, चांगल आयुष्य ( ते चांगल म्हणजे काय? ह्याच उत्तर अनेकांना आयुष्यात कळत नाही हा भाग सोडून ), आपली सामाजिक प्रतिष्ठा ते आजकाल सोशल मिडिया मधील आपलं व्यक्तिमत्व ह्यासाठी सकाळ पासून ते रात्री पर्यंत धावपळ सुरु असते. कधी सरळ रस्त्याने तरी कधी रस्ता वाकडा करून आपल्यापेकी प्रत्येकजण ते आनंदाचे क्षण मिळवण्यासाठी किंमत मोजत असतो. गेलेला क्षण आपला होणार नाही ते येणारा क्षण आपला शेवटचा असेल का? ह्याची शाश्वती नसताना पण त्या आशेवर आत्ता हातात असलेले क्षण सोडून देत असतो.

आयुष्य म्हणजे तरी काय? वेचलेले क्षण जेव्हा आपण आपल्याला ओळखतो. जेव्हा आपण समाधानी असतो. समाधान तर कशातही मिळते. उन्हाची लाही होत असताना मृगाच्या पडलेल्या पावसात भिजण्याच असो वा आयुष्यात पहिल्यांदा आपल्या पाल्याचा रडण्याचा आवाज असो. समाधानासाठी न पैश्याची गरज नसते ना तुमचं समाजात स्थान काय आहे हे महत्वाच असते. मर्सिडीज मध्ये बसणारा पण समाधानी असतो आणि आपल्या सायकल वर टांग मारणारा पण. फक्त ते क्षण टिपता यायला हवेत. हे टिपण जगाच्या जगरहाटीत धावताना विसरून चाललो आहोत ह्याची जाणीव ह्या निमित्ताने पुन्हा एकदा झाली. वक्त नावाचा एक चित्रपट खूप वर्षापूर्वी बघितला होता. होत्याच नव्हत करायला एक सेकंद पण पुरेसा असतो. एकेकाळी राजा असणाऱ्या कोणालाच रंक व्हायला वेळ लागत नाही. जे लिहिलं आहे ते घडतेच.

आयुष्य बनते ते अश्याच क्षणांनी ज्याची किंमत आपण करत नाही. काही घटना अश्या घडतात की आपण एकदम जागे होतो कदाचित वरची घटना त्यातलीच एक. काहीतरी निसटून जाते आहे ह्याची जाणीव होती पण काय ते कळायला अशीच एखादी घटना समोर यावी लागते. राजेश खन्ना चे आनंद चित्रपटातले काही संवाद माझ्या नेहमीच लक्षात आहेत,

“बाबूमोशाय, जिंदगी और मौत उपर वाले के हाथ है... उसे ना तो आप बदल सकते है ना मै... हम सब तो रंगमंच की कठपुतलीया है जिनकी डोर उपर वाले के उंगलियो मै बंधी है”...

जब तक जिंदा हुं तब तक मरा नही... जब मर गया साला मै ही नही...

बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये... लंबी नही”...

आयुष्यात खूप काही क्षण निसटले पण अजून नाही निसटू देणार. आयुष्य क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव पुन्हा एकदा झाली. आयुष्याच्या जगरहाटीत महत्वाची लोकं, क्षण, घटना ह्यांना निसटू द्यायचं नाही असं ठरवलं आहे. काय माहित येणारा कोणता क्षण शेवटचा असेल...

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment