Friday 21 June 2019

पलीकडच्या तीरावरून... विनीत वर्तक ©

पलीकडच्या तीरावरून... विनीत वर्तक ©

भारताची भूमी नेहमीच परकीय आक्रमणांना तोंड देत आली आहे. आधी परकीय तर आता स्वकीय सगळ्याच बाजूने आपण खूप काही गमावलं आहे. आपलीच माणसं आपण गमावली आहेत आणि गमावतो आहोत. भारताला मिळालेले शेजारी सतत काहीतरी खुसपट काढून भारताच्या भूमीवर आजही कित्येक शतके चाललेला रक्तरंजित खेळ खेळत आहेत. आजवर आपण जिंकत असलो तरी त्यासाठी आपण बरीच किंमत मोजत आहोत ह्याची जाणीव खूप कमी जणांना आहे. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी कोणीतरी आपलं स्वतःच रक्त सांडत आहे तर कोणी आपल्या जिवाच बलिदान देते आहे. पण लोकशाही मध्ये आपले हक्क मोजणाऱ्या लोकांना त्यांच्या बलिदानाची काहीच किंमत नाही किंबहुना ते एका वेगळ्याच तीरावर आहेत जिकडून गोष्टी खूप वेगळ्या भासवल्या जातात.

पलीकडच्या तीरावरून मात्र गोष्टी खूप वेगळ्या आहेत. त्या अनुभवायच्या असतील तर ह्या दोन तीरावरच अंतर मात्र पार करता यायला हवं. भारतीय सेनेचे सैनिक बनणं सगळ्यांना नक्कीच शक्य नाही पण त्या सैनिकाला समजून घेण्याच अंतर मात्र आपण नक्कीच पार करू शकतो. त्या सैनिकाच्या पलीकडच्या तीरावरून आपण जेव्हा गोष्टी अनुभवू तेव्हा एक वेगळाच भारत आणि त्या भारताला सुरक्षित ठेवणारे ते सर्वच सैनिक आपल्याला वेगळ्या अनुभती देतात. भारतीय सैनिक होऊन देशाची सेवा करणं म्हणजे नोकरी नाही तर ते एक व्रत आहे. ज्यात कोणत्या क्षणाला काय होईल ह्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. कारण समोरचा जिवावर उदार होऊन बेसावध क्षणी हल्ला करत असेल तर आपल्यासाठी कोणताच क्षण बेसावध नसतो आणि आपल्यासाठी प्रत्येक क्षण हा जिवावर उदार होऊन ह्या मातृभूमीच रक्षण करण्याचा असतो.

प्रत्येक क्षणाला बदलणारी परिस्थिती, कधी त्याच्यासाठी, कधी माझ्यासाठी तर कधी आपल्या सगळ्याचसाठी येणारा क्षण शेवटचा असेल अश्या परिस्थिती मध्ये आपल्या सोबत आपलं पूर्ण कुटुंब घेऊन वावरायचं. आपण आपल्या जोवावर उदार तर होऊ शकतो आपण आपल्या सोबत आपल्या कुटुंबाला दावणीला बांधून युद्धजन्य परिस्थिती मध्ये आपल्या मुला बाळांना घेऊन वावरायचं हे सोप्प असते का? मुलांचा वाढदिवसाचा केक कापताना आलेला फोन घेऊन त्याचं क्षणी आधी देश मग सगळं म्हणत वरून मिळालेला आदेश अंतिम मानून आपलं कर्तव्य पूर्ण करताना त्या मनाला काही होतं नसेल का? स्वतःची पत्नी, मुल हॉस्पिटल मध्ये असताना युद्धात जखमी झालेल्या आपल्याच सैनिकी मित्रावर उपचार करताना किंवा त्याच्यासाठी रात्रीचा दिवस करताना ते आपलं आद्य कर्तव्य आहे हे ठरवताना किती मोठे दगड मनावर ठेवावे लागत असतील ह्याची कल्पना आपल्याला ह्या तीरावरून कधीच येणार नाही.

गोळी लागलेला ते आपल्याला वाचवणारा हा कोणत्या धर्माचा आहे. त्याची जात कोणती. तो दलित की सवर्ण आणि तो भारताच्या कोणत्या भागातला हे विचारण्याची गरज कोणालाच भासत नाही. कारण प्रत्येकासाठी तो एक भारतीय सैनिक असतो. भारतीय म्हणजे काय? ह्याची व्याख्या जाणून घ्यायची असेल तर कदाचित भारतीय सैनिकांशिवाय दुसरं कोणतं उदाहरण निदान माझ्यातरी डोळ्यासमोर नाही. हे सगळं करताना त्याचं पूर्ण कुटुंब पण त्यांच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं रहाते. कुटुंब म्हणून त्यांच्या प्रत्येकाच्या मनात ही अनेक धाकधूक असतील. आपलं कोणीतरी आपल्याला सोडून देशासाठी असलेलं आपलं कर्तव्य पूर्ण करायला आनंदाने हो म्हणणे ही पण एक देशसेवाच. त्यांच्या मनात घरातून निघालेलं आपलं माणूस पुन्हा घराकडे येईल की नाही ही शंकेची पाल मनात चुकचुकत असताना पण ते जाताना मन घट्ट करून जा सांगण किती कठीण असेल ह्याचा अंदाज आपल्याला मुंबई, पुणे सारख्या शहरात बसून येणार नाही. त्यासाठी युद्धभूमीवर रहावं लागते. तेव्हाच ह्या गोष्टींचा अंदाज आपण बांधू शकतो.

आम्ही इकडे बसून फक्त हे करायला हवं ते करायला हवं ह्याचे इमले बांधतो. एकमेकांना धर्मावरून त्यांची जात शोधून राजकारण करतो का तर हा देश माझा आहे. माझे हक्क, माझा समाज, माझा धर्म हे सगळं माझं असताना त्याच्यासाठी बलिदान देण्यासाठी मात्र दुसरं कोणाला शोधतो. माझा पगार किती वाढला, कोणाची कशी जिरवली, कालच्या खेळात कोण जिंकलं, कोणत्या चित्रपटाने किती गल्ला केला ते कोणत्यातरी हिरो अथवा हिरोईन च्या खाजगी आयुष्यात काय चालू आहे हे आमच्यासाठी जास्त महत्वाच असते. कारण पलीकडच्या तीरावर किती गेले तरी त्याची मोजदाद करण्याची गरज आम्हाला वाटत नाही. कारण डोळ्यावर आम्ही जात, धर्म, पंथ, हक्क ह्यांची इतकी झापड लावून घेतली आहेत की त्या झापडांच्या सावलीत आम्हाला पलीकडच्या तीरावर काय चालू आहे हे काही दिसत नाही. कधीतरी स्वतःला त्या पलीकडच्या तीरावर ठेवून दोन क्षण विचार करावा. कदाचित नुसत्या विचारांनी आपण किती आंधळे झालो आहोत ह्याचा अंदाज येईल.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment