Monday 30 September 2019

दुर्गाशक्ती भाग ३ (गरिमा यादव)... विनीत वर्तक ©

दुर्गाशक्ती भाग ३ (गरिमा यादव)... विनीत वर्तक ©

स्रीला सौंदर्याची देणगी मिळालेली आहे आणि ते सौंदर्य नेहमीच सगळ्यांना आकर्षित करत आलेलं आहे. देश- विदेशात होणाऱ्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्याची सुप्त इच्छा अनेक स्त्रियांच्या मनात असते. जर समजा अशी एखादी संधी मिळाली तर अशी संधी कोण सोडेल? ते पण देशसेवेसाठी. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपली निवड झाली आहे पण त्याचवेळी देशाच्या संरक्षणासाठी काम करण्याची संधी मिळाली अश्या दोन्ही संधी हातात असताना देशासाठी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देताना एका स्री ने इंडियन आर्मी मध्ये प्रवेश घेण्याचं नक्की केलं. सगळ्या आमिषांना बाजुला ठेवत २०१७ ला 'इंडिया मिस चार्मिंग फेस' गरिमा यादव ने इंडियन आर्मी मध्ये प्रवेश घेण्याची 'कम्बाईन डिफेन्स सर्विस' परीक्षा पास केली. पण ती तर सुरवात होती. खडतर काळ पुढे येणार होता. त्याचवेळी भारतात जिंकल्यामुळे इटली ला जागतिक स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला होता. एकीकडे जागतिक पटलावर मान सन्मान, पैसा, प्रतिष्ठा आणि आपल्या सौंदर्याला जगाच्या पटलावर नोंद घेण्याची संधी तर दुसरीकडे एक वर्षाचं खडतर प्रशिक्षण ज्यात चिखल, जंगल, मातीत आपल्या शरीराच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा घेणारे सराव. रोज सकाळी उठून बंदुकीच्या गोळ्यांशी सामना आणि त्या नंतर देशाच्या सिमांच्या रक्षणाची जबाबदारी. ज्या चेहऱ्याला आजवर इतकं जपलं त्याला लिपस्टिक लावायची की त्याच चेहऱ्यावर काळ्या रेषा ओढयाच्या ज्यामुळे शत्रुच्या नजरेत आपण येऊ नये.

आयुष्यात कधी कधी आपण अश्या एका ठिकाणी अडकतो जेव्हा दोन्ही रस्ते खुणावत असतात. एका रस्त्यावरचा प्रवास खुप सहज असतो पण त्या रस्त्याच्या शेवट काय असेल? ह्या बद्दल आपण काहीच सांगू शकत नाही. त्या रस्त्यावर मिळणारा आनंद, सुख हे क्षणिक असते तर ज्यामुळे ते मिळणार ते सौंदर्य पण काही वर्षासाठीच असते. पण ह्या रस्त्यावरचा प्रवास सहज असतो. अनेक प्रलोभन खुणावत असतात. समोर सगळं सुंदर दिसत असते. तर दुसऱ्या रस्त्यावरचा प्रवास हा कट्यानी भरलेला असतो. अनेक खाचखळगे असतात तो प्रवास आपण पुर्ण करू की नाही ह्याची शाश्वती नसते पण त्या रस्त्याच्या टोकाला असते संपुर्ण समाधान, एक अशी भावना ज्यात आपण मातृभूमीसाठी काहीतरी दिल्याचं समाधान. गरिमा यादव ला ह्या दोन्ही रस्त्यातुन एक रस्ता स्विकारायचा होता. (विनीत वर्तक ©)

गरिमा यादव ला बालपणापासून काहीतरी करून दाखवण्याची इच्छा होती. एकच पालक असल्याने आपल्या आईची धडपड तिने बालपणापासुन बघितलं होतं. तिची आई तिच्यासाठी आदर्श होती. आयुष्याच्या सगळ्या उतार चढावात ती गरिमा च्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती. गरिमा च शिक्षण आर्मी पब्लिक स्कुल सिमला मधुन झालं. आपलं पदवी शिक्षण पुर्ण झाल्यावर तिने सिव्हिल सर्व्हिसेस साठी तयारी केली. पण तिथे तिला अपयश आलं. कुठेतरी तिला भारतीय आर्मी खुणावत होती. गरिमा ला भारतीय वायु सेनेत जायचं होतं पण तिकडे जाण्यासाठी लागणारी प्रवेश परीक्षा पास करण्यात तिला अपयश आलं. परीक्षेसाठी तयारी करत असताना इंडिया मिस चार्मिंग साठी तिला बोलावणं आलं. हि स्पर्धा गरिमा ने जिंकली. ह्या विजयासोबत तिला इटली ला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली पण त्याचवेळेस तिचं सिलेक्शन ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी मध्ये झालं. गरिमा ला लहानपणी तिच्या मनात असलेल्या इच्छेला मुर्त स्वरूप द्यायचं होतं. आपल्या आईसाठी, स्वतःसाठी काहीतरी करून दाखवायचं होतं. लहानपणापासुन तिने ठरवलं होतं की ती भारतीय आर्मी मध्ये प्रवेश घेणार.(विनीत वर्तक ©)

ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी मध्ये प्रवेश तर घेतला पण तिथलं ट्रेनिंग खडतर असणार ह्याची पुरेपूर कल्पना तिला होती. शारिरीक तंदुरुस्तीत गरिमा बेताची होती. त्यामुळे एक जो सार्वत्रिक समज होता की भारतीय सेनेत जायला शारीरिक क्षमता खूप उच्च असावी लागते ह्याची तिला काळजी होती. पण जे येईल त्याला सामोर जायची तिने तयारी केली होती. जेवढं शक्य होईल तितकं आपलं सर्वोत्कृष्ठ द्यायचं आणि ज्या चुका होतील त्यावर काम करून त्यात सुधारणा करण्याची खूणगाठ तिने मनाशी बांधली होती. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर,

"I had a wonderful experience at the OTA. At first, it was difficult for me to cope up with the tough training, the weather was also unfavorable, I did not have very good physical standards but somehow I managed for the first few months, I didn’t give up and improved drastically. I actively participated in all curriculum activities.People have a wrong conception that you have to be good at all sports and physically strong to get selected in the SSB. That’s not true. You just should be willing to accept your weaknesses and work on them and should always endeavor to get better and better every day. One should be honest, positive, creative and solution orientated — that’s all you need rest everything will follow."

जवळपास ११ महिने खडतर प्रशिक्षण घेतल्यावर गरिमा यादव आज भारतीय सैन्यात दाखल झाली आहे. लेफ्टनंट गरिमा यादव चा हा प्रवास अनेक स्त्रियांना प्रेरणा देणारा आहे. सुंदर स्री शारीरिक क्षमतेत कमी असते हा समज तिने मोडुन काढला आहे. त्याच सोबत चेहऱ्यावरच्या सौंदर्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाचं सौंदर्य जास्ती उठून दिसते हा एक संदेश ही तिने सगळ्यांना दिला आहे. एक सौंदर्यवती ते एक आर्मी ऑफिसर हा लेफ्टनंट गरिमा यादव चा प्रवास दुर्गाशक्तीच एक प्रतीक आहे. तिच्या ह्या असामान्य कर्तृत्वास माझा सॅल्युट.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Sunday 29 September 2019

दुर्गाशक्ती भाग २ (नंदिनी हरीनाथ) ... विनीत वर्तक ©

दुर्गाशक्ती भाग २ (नंदिनी हरीनाथ) ... विनीत वर्तक ©

२४ सप्टेंबर २०१९ ला इसरो च्या मॉम (मार्स ऑर्बिटर मिशन ) मिशन ला ५ वर्ष पुर्ण झाली. पाच वर्षापुर्वी ह्याच दिवशी भारताने एक इतिहास रचला होता. ज्याचा विचार जगाने कधी केला नाही असं अशक्यप्राय वाटणारी गोष्ट भारताने स्वबळावर साध्य केली. २४ सप्टेंबर २०१४ ला भारताचं मॉम मंगळाच्या कक्षेत दाखल झालं. एक अविश्वनीय असं मिशन इसरो ने पर्यायाने भारताने पुर्ण केलं. मॉम मिशन ने अवकाश क्षितिजावर भारताचा उदय झाल्याची वर्दी दिली. ह्या मिशन मध्ये पुर्ण जगाने एका गोष्टीची दखल घेतली ती म्हणजे ह्या मिशन मध्ये असणारं स्री वैज्ञानिकांच योगदान. जेव्हा साडी नेसुन पदर सावरत मोगऱ्याचा गजरा घातलेल्या आणि कपाळावर कुंकू लावलेल्या इसरो च्या महिला वैज्ञानिकांनी इसरो च्या सेंटर मध्ये मिशन यशस्वी झाल्यावर जो आनंद व्यक्त केला ते छायाचित्र जगातील चर्चेचा विषय ठरलं. मंगळ मिशन यशस्वी करण्यामध्ये ज्या स्री वैज्ञानिकांनी आपलं प्रचंड योगदान दिलं त्यात सगळ्यात वरचं नावं होतं नंदिनी हरिनाथ. मिडिया, सोशल मिडिया, लाइमलाईट ह्यांच्या झगमटापासून दुर राहुन आणि बघता क्षणी अतिशय सामान्य गृहिणी वाटणाऱ्या नंदिनी हरिनाथ ह्यांनी मंगळ मिशन चा रस्ता ठरवणं तसेच मंगळ मिशन ला कोणाच्याही मदतीशिवाय आपल्या अडचणी दुर करण्यासाठी लागणारी यंत्रणा निर्माण केली होती.

१५ ऑगस्ट २०१० ला भारताच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भारत मंगळावर असल्याची घोषणा केली. इसरो मध्ये त्यावेळी कोणालाच ह्याची कल्पना नव्हती की ह्या मिशन मध्ये कोण असणार आहे? आपण मंगळावर स्वारी करणार कशी? नंदिनी हरिनाथ पण त्या वेळेस RISAT-1 ह्या रडार इमेजिंग उपग्रहावर ऑपरेशन डायरेक्टर म्हणून काम करत होत्या. त्यांना अचानक ते काम लवकरात लवकर संपवून URSC ला येण्याचं सांगितलं गेलं. तिथे गेल्यावर नंदिनी हरिनाथ ह्यांना डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर म्हणुन जबाबदारी देण्यात आली. जबाबदारी स्विकारल्यावर त्यांच्या अधिकाऱ्या कडुन पहिलं वाक्य होतं, “Find out what others have done and do what you’re supposed to do" आणि पहिल्या दिवसापासून एका नव्या अध्यायाला सुरवात झाली. (विनीत वर्तक ©)

ज्यांनी कधीच अशी एखादी मोहीम बघितलेली नाही अश्या लोकांना सोबत घेऊन काम करायला सुरवात केल्यापासुन १५ महिन्यात एक स्वतः कार्य करू शकणारं यान बनवायचं होतं ते ही पृथ्वीपासून ५४.६ मिलियन किलोमीटर लांब चालु शकेल असं. समोर एक लक्ष्य होतं जे अशक्यप्राय वाटत होतं पण आता विचार करायला वेळ नव्हता. प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट महत्वाचा होता. जे यान तंत्रज्ञानात पण उच्च क्षमतेचं असेल पण त्याचवेळी मिळालेल्या पैश्यात तयार होईल आणि ते ही अतिशय कमी वेळात. कामाला सुरवात झाल्यावर रोज १० तास काम असायचं तर जसजसे दिवस जायला लागले तसतश्या कामाचे तास १२ ते १४ झाले. मंगळयान उड्डाणाच्या दिवशी तर घरी न जाता २४ तास मंगळयानाच्या आकड्यांवर लक्ष ठेवावं लागतं होतं. एक चुक आणि सर्व मेहनत पाण्यात. जे कोणी कधी केलं नाही ते करण्याची जबाबदारी नंदिनी हरिनाथ ह्यांच्यावर होती. असं म्हणतात,

लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती
नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है
मन का विश्वास रगों में साहस भरता है,चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है
आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती,कोशिश करने वालों की हार नहीं होती
नंदिनी हरिनाथ ह्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर,

“Nothing is impossible. There were so many countries that failed in their first tries. But we weren’t disheartened and we didn’t accept that.”

पुढे २४ सप्टेंबर २०१४ जे झालं तो इतिहास आहे.

अवकाशाच वेड नंदिनी हरिनाथ ह्यांना लहानपणापासुन होतं. पुस्तकातुन निर्माण झालेल्या कुतुहलाला स्वप्नांचे पंख दिले ते त्याकाळी प्रसारीत होणाऱ्या 'स्टार ट्रेक' मालिकेने. ह्या मालिकेने नंदिनी हरिनाथ ह्यांच्या मनात घर केलं ते कायमचं. पुढे इसरो मध्ये संधी मिळाल्यावर त्या संधीच त्यांनी सोनं केलं. 'स्टार ट्रेक' प्रमाणे त्यांनी भारताच्या मॉम च्या उभारणीत मोलाची पण त्याचवेळी निर्णायक भुमिका निभावली. हे सगळं करताना त्यांची एकचं अपेक्षा होती ती म्हणजे,

“I would like to be known as a scientist, not a woman scientist.”

स्री असली म्हणुन मला कोणत्याही विशेष दर्जाची गरज नाही. मॉम सारखं अतिशय कठीण मिशन हाताळताना आपल्या घराकडे दुर्लक्ष होणार नाही ह्याची काळजी ही नंदिनी हरिनाथ ह्यांनी घेतली. ज्यावेळेस मंगळयान चं उड्डाण होणार होतं त्यावेळेस त्यांच्या मुलीची १२ वी ची परीक्षा होती. इसरो मधुन घरी यायला रात्रीचे १२ वाजायचे. पण तरीही अवघी ४ तासाची झोप घेऊन सकाळी ४ ला उठुन मुलीला अभ्यासात मदत करून तसेच घरातील इतर काम आटपुन नंदिनी हरिनाथ पुन्हा इसरो मध्ये हजर असायच्या. त्यांनी जितकं लक्ष आणि कष्ट मॉम मिशन ला घेतले तितकेच एक आई म्हणुन आपल्या मुलीला दिले. १२ वी च्या परीक्षेत त्यांच्या मुलीने गणितात १००/ १०० मार्क्स मिळवताना आपल्या आईने आपल्याला लागणारी साथ दिली हे सिद्ध केलं. (विनीत वर्तक ©)

नंदिनी हरिनाथ च्या मते,

"The problem is that many highly educated women drop out before reaching leadership positions. That's the mindset we need to change. Women have to realise that they can manage having careers and families. It's possible! You can do it if you want to. The women of ISRO proved it."

“All of you should have a dream. But make sure you have a passion to drive that dream. It’s not going to be easy. You won’t always get success wherever you go. You have to be persistent. It may sound cliche, but that’s all it is.”

एक रॉकेट सायंटिस्ट, एक मिशन डायरेक्टर, एक गृहिणी, एक आई अश्या सगळ्याच भूमिकेत आपलं सर्वोत्तम देऊन लहानपणी बघितलेल्या आपल्या स्वप्नांना मॉम चे पंख देऊन भारताचा तिरंगा अभिमानाने जगात फडकवताना सगळ्या झगमटापासुन दूर राहुन एका नवीन लक्ष्याकडे ( Mission system leader of NISAR, a joint NASA-ISRO satellite being developed to launch in 2020.) उड्डाण करणाऱ्या भारतीय दुर्गाशक्तीच प्रतीक असणाऱ्या इसरो च्या वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ ह्यांना माझा सलाम.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Saturday 28 September 2019

दुर्गाशक्ती भाग १ (सुषमा स्वराज) ... विनीत वर्तक ©

दुर्गाशक्ती भाग १ (सुषमा स्वराज) ... विनीत वर्तक ©

भारतीय राजकारण म्हणजे पुरुष सत्ताक लोकशाही असा एक समज जागतिक पटलावर होता. चुल आणि मुल ह्यात रमलेली भारतीय स्री कधी भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन भारताच जागतिक पटलाच्या राजकारणात प्रतिनिधित्व करून जवळपास ६ दशके असलेल्या भारताच्या जागतिक प्रतिमेला छेद देतं एका नव्या भारताचा उगम झाल्याची वर्दी जागतिक पटलावर देईल असा विचार ज्यावेळी कोणी केला नव्हता तेव्हा ह्या शक्यतेला मुर्त स्वरूप देण्याचं काम एका भारतीय राजकारणी स्त्री ने केलं. ती स्री म्हणजेच माननीय स्वर्गीय सुषमा स्वराज. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाला एक नवीन धार देताना त्यांनी परराष्ट्र मंत्रालय सर्वसामान्य लोकांपर्यंत नेलं. सोशल मिडियाच्या माध्यमातुन एक केंद्रीय मंत्री अगदी कोणत्याही वेळी जगाच्या कोणत्याही देशातील भारतीय लोकांच्या अडचणी सोडवू शकतो तसेच त्यांची रक्षा, मदत करण्यास भारत सरकार नेहमीच तत्पर असेल असा आत्मविश्वास त्यांनी प्रत्येक अनिवासी भारतीयांना दिला. त्यासाठीच अमेरिकेच्या प्रतिष्ठित अश्या 'वॉल स्ट्रीट जर्नल' वृत्तपत्राने त्यांना भारतातील 'सर्वात आवडतं राजकीय व्यक्तिमत्व' असा किताब देऊन त्यांचा गौरव केला होता.

१४ फेब्रुवारी १९५२ सुषमा स्वराज ह्यांचा जन्म झाला. पॉलिटिकल सायन्स आणि संस्कृत हे विषय घेऊन पदवी घेतल्यावर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. अभ्यासा व्यतिरिक्त इतर सर्व क्षेत्रात त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात आपली छाप सोडली. खेळ, कला, संगीत, चित्रकला ते अगदी एन.सी.सी. अश्या सगळ्याच क्षेत्रात त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. सगळ्याच क्षेत्रात त्यांना विद्यार्थी दशेत असताना पुरस्कार मिळाले. कॉलेज मध्ये असताना सलग ३ वर्ष त्यांना एन.सी.सी. च्या बेस्ट कॅडेट चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. १९७० ला त्यांना अंबाला इथल्या एस.डी. कॉलेज ची सर्वोत्तम विद्यार्थी म्हणुन त्यांची निवड झाली. विद्यार्थी दशेतच त्या त्यांच्या गुणांमुळे राजकारणात ओढल्या गेल्या. हिंदी, इंग्रजी भाषेवर असणारं प्रभुत्व, शब्दांची जाण, अमोघ वक्तृत्त्व तसेच संघटना कौशल्य असे एखाद्या राजकारण्याला लागणारे सगळेच गुण त्यांच्यात ठासुन भरले होते. १९७० च्या दशकात भारतात इंदिरा गांधींनी आणिबाणी घोषित केली होती. व्यक्तिस्वातंत्र्यावर अंकुश घालणाऱ्या त्या काळात त्यांनी विद्यार्थी आंदोलनाच प्रतिनिधित्व केलं. त्यातुन त्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आल्या. त्यानंतर जो एक अभुतपुर्व प्रवास त्यांनी भारताच्या राजकारणात केला जो आजही भारतातील प्रत्येक स्त्री साठी आदर्शवत असाच आहे. (विनीत वर्तक ©)

एका बाजूने विद्यार्थी दशेत राजकारणात प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी आपल्या वकिलीची सुरवात सुप्रीम कोर्टात सुरु केली. सुप्रीम कोर्टात आणिबाणीच्या काळात केसेस लढताना त्यांची ओळख स्वराज कौशल ह्यांच्याशी झाली. सुषमा स्वराज ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणी मधील होत्या तर स्वराज कौशल हे सोशल बिलीफ विचारसरणीचे होते. पण विचारसरणी मधील ही टोकाची तफावत त्यांची मने जुळण्यापासून थांबवू शकली नाहीत. घरातुन विरोध असताना पण त्यांनी लग्न केलं. तब्बल ४४ वर्षाचा सुखी संसार त्यांनी स्वराज कौशल ह्यांच्यासोबत केला. त्यांना बांसुरी कौशल नावाची असुन ती सुद्धा एक वकील आहे. भारतीय राजकारणात सुषमा स्वराज ह्यांनी आपली निर्माण केली. त्यांची राजकीय कारकीर्द म्हणजे एक दंतकथा आहे. राजकारणात त्यांनी उच्चपद भूषवली. आपल्या पक्षाच्या तसेच देशाच्या उभारणीत त्यांचं मोलाचं योगदान राहिलं होतं. राजकारणात त्यांनी अनेक विक्रम निर्माण केले जे येत्या काळात कोणाला मोडणं ही कठीण असेल. त्यांच्या राजकारणातील विक्रमांचा हा छोटा लेखाजोखा,

१) सुषमा स्वराज १९७७ साली भारताच्या सगळ्यात तरुण (वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी) कॅबिनेट मिनिस्टर झाल्या.

२) १९७९ साली जनता पार्टी च्या हरियाणा राज्याच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या. तेव्हा त्यांच वय होतं २७ वर्ष.

३) भारतातिल एखाद्या राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या होण्याचा मान सुषमा स्वराज ह्यांना मिळालेला आहे.

४) सुषमा स्वराज ह्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. (१९९८ साली दिल्ली च्या मुख्यमंत्री बनल्या )

५) सुषमा स्वराज भारतातील पहिल्या महिला युनियन कॅबिनेट मिनिस्टर होत्या.

६) सुषमा स्वराज भारतातील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या होत्या.


ह्या शिवाय त्या ७ वेळा संसदेत निवडून गेल्या होत्या. सुषमा स्वराज ह्यांचा हरियाणा सरकारने उत्कृष्ठ संसदपटु म्हणुन गौरव केला आहे. भारतीय संसदेने त्यांना २००८ आणि २०१० साली भारतातील सर्वोत्कृष्ठ संसदपटु म्हणुन त्यांचा गौरव केला आहे. हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला संसदपटु आहेत. ह्या शिवाय १२ व्या लोकसभेत त्यांनी टेलिकॉम मिनिस्टर म्हणुन काम पाहिलं तर नंतर त्यांनी मिनिस्टर ऑफ इंफॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टींग म्हणुन काम केलं. २००३ साली त्यांची नियुक्ती आरोग्य मंत्री म्हणुन झाली. ह्या काळात त्यांनी भारतात ६ एम्स ( All India Institute of Medical Sciences )ची स्थापना केली. १५ व्या लोकसभेत मध्य प्रदेश मधल्या विदिशा मधुन ४ लाखापेक्षा मतांनी निवडून आल्यावर त्यांच्याकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. राजकारणातील सगळ्यात संस्मरणीय कार्यकाळ हा २०१४ ते २०१९ राहिला जेव्हा त्यांनी विदेशमंत्री पदाची सुत्र आपल्या हाती घेतली. भारतीय स्री ची जागतिक पटलावर कणखर प्रतिमा निर्माण करताना त्यांनी भारताच्या विदेशनीती मध्ये अमुलाग्र बदल केले. अनिवासी भारतीयांमध्ये आपल्या देशाबद्दल आदर, सरकार बद्दल सकारात्मक प्रतिमा निर्माण केली. एकावेळेस जागतिक राजकारणात भारताची बाजु मांडताना अगदी २४ तास लोकांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचं सोशल मिडीयाच्या माध्यमातुन त्यांनी पुर्ण भारताला दाखवून दिलं. (विनीत वर्तक ©)

राजकारणातलं एक कणखर स्री व्यक्तिमत्व अशी आपली ओळख निर्माण करताना सामान्य भारतीयांसाठी अगदी सातासमुद्रापार आपलेपणाची भावना त्यांनी निर्माण केली. कणखर पण त्याच वेळी सामान्य जनतेशी त्यांनी त्यांच्या सामान्य भाषेत संवाद साधला. लोकसभा असो वा युनायटेड नेशन त्यांची भाषण ही त्यांच्या वक्तृत्वामुळे आजही लोकांच्या स्मरणात आहेत. भाषेवरील पकड, अप्रतिम वक्तृत्व कौशल्य, त्याच सोबत असणारं एक हळवं, कवी मन अश्या सर्व गोष्टींचा मिलाफ असणाऱ्या सुषमा स्वराज ह्यांनी भारतातील नव्हे तर पुर्ण जगातील राजकारणात आपला ठसा उमटवला. त्यांचा हा पुर्ण प्रवास प्रत्येक भारतीय स्री ला प्रेरणा देणारा तर आहेच पण त्या पलीकडे भारताच्या स्री मधल्या दुर्गाशक्ती चं एक प्रतीक आहे. अश्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा प्रवास अचानक थांबला असला तरी त्यांनी सर्वांपुढे निर्माण केलेला आदर्श नेहमीच भारतीय स्त्रियांना प्रेरणा देतं राहील. भारताच्या राजकारणातील ह्या दुर्गाशक्तीस माझा साष्टांग नमस्कार.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Saturday 21 September 2019

जस्ट मॅरीड (एका अनोख्या लग्नाची गोष्ट)... विनीत वर्तक ©

जस्ट मॅरीड (एका अनोख्या लग्नाची गोष्ट)... विनीत वर्तक ©


एकदा इंडियन नेव्ही च्या सी हॉक लढाऊ विमानाने उड्डाण भरलं. त्यात त्याचं मिशन होतं?  एक अनोख्या लग्नसोहळ्याला पार पाडण्याचं.

HMS Hercules नावाची ब्रिटिशांनी बांधलेली एक विमानवाहू युद्धनौका अर्धवट अवस्थेत भारताने १९५७ ला खरेदी केली. तिचं राहिलेलं काम संपवून ती भारताच्या समुद्र किनारपट्टी आणि सिमेच्या सुरक्षिततेसाठी १९६१ साली इंडियन नेव्ही मध्ये दाखल झाली. तिचं नाव ठेवण्यात आलं "आय.एन.एस. विक्रांत". त्याकाळी आशियातील पहिली आणि एकमेव विमानवाहु युद्धनौका असा तिचा दरारा होता. १९६५ च्या आसपास भारत- पाकिस्तान मधील संघर्ष चिघळत चालला होता. पाकिस्तान ला युद्धासाठी "आम्ही तयार आहोत" हे दाखवण्यासाठी आय.एन.एस. विक्रांत ला अरबी समुद्रात पाकिस्तान जवळ गस्त घालण्याचे आदेश आले. अचानक आलेल्या ह्या आदेशाने त्यावर काम करणाऱ्या नेव्ही च्या अधिकाऱ्यांसाठी आणि सैन्यासाठी हा आदेश त्यांची सामान्य दिनचर्या बदलावणारा होता. आपल्या लग्नाची स्वप्न रंगवलेला एक लेफ्टनंट मात्र घरी लग्नासाठी जाण्याची तयारी करत होता. अचानक आलेल्या आदेशामुळे आय.एन.एस. विक्रांत ने अरबी समुद्रात कूच केलं. ज्या वेळेस त्याने मुंबई मधुन बंगलोर ला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर असायला हवं होतं त्या वेळेस हा लेफ्टनंट अरबी समुद्रात अडकुन पडला  होता.

इंडियन नेव्ही किंवा एकूणच भारतीय सेना आपल्या शिस्तीसाठी ओळखली जाते. पण त्याच वेळी आपल्या सैनिकांची काळजी घेण्यात पण भारतीय सेना मागेपुढे बघत नाही. त्या तरुण लेफ्टनंट ची स्थिती बिकट होती. आयुष्यातला एक महत्वाचा क्षण पण त्याचवेळी देशासाठी आपल्या कर्तव्यासाठी तो तत्पर अश्या चक्रव्युहात तो अडकला होता. त्याच्या कॅप्टन ने त्याच्या मनातले भाव ओळखले. काही बैठीकी नंतर फ्लीट कमांडर रिअर एडमिरल बी.ए.सॅम्सन ह्यांनी त्याला २४ तासांचा अवधी दिला. त्याच्या कॅप्टन ने लग्नाच्या दिवशी 'सी हॉक' लढाऊ विमानाने उड्डाण करून उद्या सकाळी ०६:०० च्या ठोक्याला पुन्हा आय.एन.एस. विक्रांतवर हजर राहण्याचा आदेश दिला. जाण्याची अनुमती तर मिळाली पण वेळ कमी होता. लग्नाचे कपडे इतर गोष्टी त्याला सोबत घेऊनच उड्डाण भराव लागणार होतं. कारण लग्नाची मुहूर्त घटिका जवळ येत चालली होती. एका विमनावाहु नौकेच्या लढाऊ विमानात कपडे न्यायला कुठली आली आहे जागा? त्याचवेळी त्याच्या एका मित्राने युक्ती केली. विमानात क्षेपणास्त्र ठेवण्याच्या जागी ती काढून त्याचे कपडे ठेवता येतील अशी व्यवस्था केली. आता इंडियन नेव्ही चं 'सी हॉक' एका अश्या मिशनसाठी सज्ज झालं होतं ज्याचा विचार ही कोणी केला नव्हता. मिशन होतं एका लग्नसोहळ्याला पुर्ण करण्याचं.

आय.एन.एस. विक्रांत युद्ध स्थितीत असल्याने तिचं स्थान अरबी समुद्रात कुठे आहे हे कळू नये म्हणुन संपुर्ण रेडिओ सायलन्स होता. आय.एन.एस. विक्रांत वरून सी हॉक तर उडालं पण ह्याची कल्पना बंगलोर ला त्या लेफ्टनंन च्या घरच्यांना होती न त्या वधुला जिच्याशी लग्न करण्यासाठी चक्क त्याने लढाऊ विमानातुन उड्डाण केलं होतं. बंगलोर ला दोन्ही लग्न घरातील लोकांना नवरदेव कुठे आहे ह्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. तो येणार आहे का? निघाला का? कधी पोहचणार? सगळेच अनुरुत्तरित प्रश्न समोर होते. घड्याळाची टिकटिक लग्नाची घटिका जवळ आल्याची वर्दी देतं होती पण नवर देवाचा कसलाच थांगपत्ता लागत नव्हता. काय होणार? ह्या भीतीने सगळे चिंतीत होते. इकडे बंगलोर मधल्या एच.ए.एल. च्या कंट्रोल टॉवर ला उतरण्यासाठी परमिशन हवी आहे असा मेसेज आला. एका इंडियन नेव्ही च्या लढाऊ विमानाकडून आलेला आदेश तिथल्या सगळ्यांसाठीच अनपेक्षित होता. काही क्षणात त्या सी हॉक च  बंगलोर च्या धावपट्टीवर आगमन झालं. त्या लेफ्टनंट ने सी हॉक ला पार्किंग बे मध्ये पार्क करत धुम ठोकली कारण लग्नघटिकेला काही मिनिटांचा अवधी राहिला होता.

लग्न ठरलेल्या मुहूर्तावर पुर्ण झालं. नवरदेवाने वेळेवर पोचायला काय काय केलं? ह्याची कल्पना कोणालाच नव्हती. दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० ला बंगलोर च्या त्याच धावपट्टी वरून सी हॉक ने पुन्हा उड्डाण केलं. फक्त ९० मिनिटाच्या काळात सी हॉक आय.एन.एस. विक्रांत च्या डेकवर उतरलं होतं. मिशन अकॉम्पलिश असे भाव त्या लेफ्टनंट च्या चेहऱ्यावर होते. ह्या यशस्वी कामगिरीसाठी त्याच स्वागत करायला त्याचे सहकारी हजर होते. त्या वेळेस त्याच स्वागत करायला युद्धनौकेवर फुलं नव्हती. ह्यावर उपाय म्हणुन त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या गळ्यात भाज्यांची बनवलेली माळ घातली. त्याच्या ह्या मिशन ला यशस्वी करणाऱ्या सी हॉक विमानाला त्यांनी "जस्ट मॅरीड" चा बोर्ड चिकटवला. त्या विमानाच्या नाकावर एक बुटांची जोडी ही लटकवली. १९६५ ला हे अनोखं मिशन पुर्ण करणारा तो सैनिक म्हणजेच "रिअर एडमिरल संतोष कुमार गुप्ता". आपल्या बहादुरीने त्यांनी १९७१ मध्ये भारत - पाकिस्तान युद्धात ह्याच आय.एन.एस. विक्रांत च सारथ्य केलं. त्यांनी भारताच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा "महावीर चक्र" देऊन सन्मान करण्यात आला.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा क्षण असतो. त्या पलीकडे आपल आपल्या देशाच्या प्रति असलेलं कर्तव्य सर्वप्रथम मानणारा तो सैनिक आणि त्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या क्षणाला अजुन अविस्मरणीय करताना "सी हॉक" सारख्या लढाऊ विमानाने जाण्याची अनुमती देणारे भारतीय सेनेचे अधिकारी. आपण दिलेल्या शब्दाचा मान ठेवत वेळेआधी पुन्हा देशसेवेसाठी हजर होणारा तो सैनिक त्याचवेळी जे काही आहे त्यात आनंद साजरा करणारे त्याचे सहकारी  ह्या सर्वाना साष्टांग नमस्कार. भारताच्या सीमेची जबाबदारी आज अश्या सैनिकांकडे आहे म्हणून आज भारत सुरक्षित आहे. हे अनोखे मिशन म्हणजे भारतीय सेनेच्या एकाचवेळी शिस्त आणि आपल्या सैनिकांच्या प्रति असलेला ओलावा ह्यांचं अविस्मरणीय मिश्रण होतं. ह्या सगळ्यांना माझा कुर्निसात.

जय हिंद......

माहिती स्रोत :- गुगल

फोटो स्रोत :- गुगल  (फोटोत जस्ट मॅरीड आणि बुट लटकवलेलं सी हॉक लढाऊ विमान आणि त्या सोबत रिअर एडमिरल संतोष कुमार गुप्ता) 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Thursday 19 September 2019

न संपणारी बॅटरी... विनीत वर्तक ©

न संपणारी बॅटरी... विनीत वर्तक ©

आपल्या मोबाईल फोन किंवा लॅपटॉप च्या बॅटरीला कधीच चार्ज करायची गरज लागली नाही तर? अशी एखादी बॅटरी ज्यातील ऊर्जेचा स्रोत न संपणारा असेल असं शक्य आहे का? काही वर्षापुर्वी असा प्रश्न आपल्याला पडला असता तर त्याच उत्तर नाही असं होतं कारण मुळातच अश्या अक्षय ऊर्जेचा स्रोत देणारी बॅटरी निर्माण करणं तेव्हाच्या तंत्रज्ञानाने शक्य नव्हतं किंवा त्याचा वापर करता येणं शक्य नव्हतं. पण तंत्रज्ञानातील गेल्या काही वर्षातील प्रगतीमुळे अशी न संपणारी बॅटरी निर्माण करण्यात यश आलेलं आहे.

अक्षय, अखंड अशी ऊर्जा देणारा एक स्रोत म्हणजे अणू प्रक्रियेतुन निर्माण होणारी ऊर्जा. अधिक भार असलेल्या मुलद्रव्यांचं विघटन केल्यावर निर्माण होणारी ऊर्जा ही अशीच अखंड असते. एकदा की ही प्रक्रिया सुरु झाली की आपण बनवल्या प्रमाणे ऊर्जेचा स्रोत सुरु राहतो. ह्या पद्धतीचा वापर करून न्यूक्लिअर रियाक्टर मध्ये टर्बाईन फिरवून इलेक्ट्रिकल ऊर्जेची निर्मिती केली जाते. ह्या न्यूक्लिअर रियाक्टर चा आकार हा खुप मोठा असतो व ह्यातुन ऊर्जा निर्मिती करणं तितकं सोप्प नसते. ह्याशिवाय ह्यातुन निर्माण होणारी ऊर्जा खूप जास्त शक्तिशाली असते. आपल्या मोबाईल फोन अथवा लॅपटॉप ला अतिशय कमी ऊर्जेची गरज असते. मग अश्या ऊर्जेसाठी न्यूक्लिअर रियाक्टर बनवणं व्यावहारिक नाही. त्यासाठी मग किरणोत्सर्गी संयुगे जी सतत इलेक्ट्रॉन, अल्फा, बिटा अश्या पदार्थांचा मारा करत असतात. त्यांचा वापर करून ऊर्जा निर्मिती शक्य आहे. ह्यातुन निर्माण होणारी ऊर्जा कमी शक्तीची पण अव्याहत सुरु राहते जोवर त्यात वापरलेल्या किरणोत्सर्गी संयुगाच अर्ध आयुष्य संपत नाही. अर्थात हे पदार्थ मानवी आयुष्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत. हे पदार्थ आणि त्यातुन निघणाऱ्या किरणांमध्ये अतिशय उच्च क्षमतेची ऊर्जा भरलेली असते. जेव्हा हे अदृश्य किरण आपल्या शरीरातुन जातात तेव्हा आपल्या शरीरातील पेशी त्यांच्या ह्या ऊर्जेमुळे नष्ट होतात. तसेच पेशींच्या संरचनेत जनुकीय बदल होतात. ह्यामुळे कॅन्सर तसेच इतर आजार होण्याची शक्यता असते.पण समजा आपण ह्या पदार्थांना योग्य रीतीने थोपवलं तर?

रशिया मधील काही संशोधकांनी असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे की ज्याद्वारे रेडिओ आयसोटोप (किरणोत्सर्गी संयुगे) चा वापर करत बॅटरी बनवता येऊ शकते. ह्या संशोधकांनी आपल्या संशोधनात 'निकेल ६३' ह्या रेडिओ आयसोटोप चा वापर केलेला आहे. हे किरणोत्सर्गी संयुग बिटा पार्टीकल उत्सर्जित करत राहते. ह्याच अर्धआयुष्य हे १०० वर्षाचं आहे. (हाफ लाईफ किंवा अर्धआयुष्य म्हणजे सध्या सुरु असलेल्या उत्सर्जनाची क्षमता (उर्जेला) अर्ध्यावर येण्यास लागणारा कालावधी ) प्रत्येक किरणोत्सर्गी संयुगाच अर्ध आयुष्य हे वेगवेगळं असते. ह्या बॅटरी मध्ये बिटाव्हॉल्टीक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. ह्या तंत्रज्ञानाचं नाव आहे तसं ह्या बॅटरी मध्ये उत्सर्जित होणाऱ्या बिटा पार्टीकल पासुन ऊर्जा निर्मिती केली जाते. जेव्हा हे बिटा पार्टीकल एखाद्या सेमीकंडक्टर वर धडकतात तेव्हा ते इलेक्ट्रिकल ऊर्जेची निर्मिती करू शकतात. ह्या बॅटरी मध्ये निकेल ६३ हे किरणोत्सर्गी संयुग आणि हिऱ्यांपासून बनवलेले सेमीकंडक्टर चा वापर केला असुन ही बॅटरी ३३०० मिलीवॅट ऊर्जा प्रत्येक तासाला एक ग्रॅम 'निकेल ६३' ने पुढील १०० वर्ष अखंड निर्माण करू शकण्यात सक्षम आहे.

एखाद किरणोत्सर्गी संयुग आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप च्या बॅटरी मध्ये आपल्या जवळ बाळगणं कितपत सुरक्षित असेल? असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात येणं साहजिक आहे. पण ह्या बिटा पार्टीकलना सहज एखाद्या ऍल्युमिनियम च्या पातळ पत्र्याने रोखता येऊ शकते. ज्यायोगे हे पार्टीकल आपल्या शरीरात प्रवेश करणार नाहीत अथवा आपल्याला कोणती हानी पोहचवणार नाहीत. बिटा रेडिएशन हे सहजरित्या आपल्याला अडवता आलं तरी एक अडचण नेहमीच असणार ते म्हणजे ह्याच सुरक्षित आवरणाला कधीही हानी पोचणार नाही ह्याच. १०० वर्षाच आयुष्य असलेली बॅटरी वापर झाल्यानंतर सुद्धा तोडुन- मोडून चालणार नाही. बॅटरी च आयुष्य १०० वर्षाचं झालं तरी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप चं तितकं असणं सध्याच्या तंत्रज्ञानाने तरी शक्य नाही. ह्यामुळे ह्या बॅटरी ची व्हिलेवाट कशी लावायची हा ही प्रश्न समोर असेल. तसेच ह्यातील निकेल ६३ हे किरणोत्सर्गी संयुग स्वस्त मुळीच नाही. तसेच ह्याचा वापर इतर विध्वंस करणाऱ्या गोष्टीसाठीपण केला शकेल. तूर्तास अश्या पद्धतीची अखंड, अक्षय असणारी बॅटरी हे स्वप्न असलं तरी येत्या काळात ते वास्तव असेल.

न संपणारी बॅटरी आता प्रत्यक्षात उतरली असुन त्याचा वापर अवकाश क्षेत्रात, मिलिटरी क्षेत्रात तसेच इतर संशोधनात नक्कीच केला जातो आहे. अवकाश क्षेत्रात दूरवर जाणाऱ्या यानांना सूर्याच्या उर्जेवर अवलंबुन न राहता अश्या बॅटरी ची गरज लागते आहे. अश्या बॅटरी च्या उपयोगामुळे जिकडे सुर्यप्रकाश पोहचत नाही अश्या भागात पण आपण आपली संशोधन उपकरणे वापरू शकणार आहोत. कदाचित पुढल्या काही वर्षात अश्या बॅटरी सर्वसामान्य लोकांना हाताळता येतील अश्या पद्धतीने बनवून आपल्या घरात प्रवेश करतील तेव्हा बॅटरी चार्ज करण्याची गरज आपल्याला कधी भासणार नाही.

माहिती स्रोत :- गुगल

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


विक्रम ची १५ मिनिटे आणि मॉम ची ५ वर्ष... विनीत वर्तक ©

विक्रम ची १५ मिनिटे आणि मॉम ची ५ वर्ष... विनीत वर्तक ©

सप्टेंबर २०१९ चा हा महिना इसरो च्या इतिहासात एक अतिशय महत्वाचा ठरलेला आहे. ह्याच महिन्यात इसरो एका डोळ्यात हसु तर एका डोळ्यात आसु अश्या दोन्ही अवस्था अनुभवते आहे. एकीकडे २४ सप्टेंबर २०१४ ला मंगळाच्या कक्षेत दाखल झालेलं भारताचं मॉम (मार्स ऑर्बिटर मिशन) आपली ५ वर्ष पुर्ण करत आहे. तर त्याचवेळी चंद्रयान २ च्या मोहिमेत आलेल्या १५ मिनिटांच्या थराराने विक्रम ल्यांडर शी इसरो चा संपर्क तुटलेला आहे. ह्या दोन्ही घटना तश्या यशाच्या आणि त्याच वेळी अपयशाचा असल्या तरी त्यातुन भारत मात्र अवकाश तंत्रज्ञानात खुप पुढे तर गेलाच आहे पण त्यापेक्षा जागतिक पटलावर भारताची नोंद घेतली गेली आहे. भारतासारख्या विकसनशील, गरीब आणि आपल्याच समस्यांत गुंतलेल्या राष्ट्राकडून अवकाश संशोधनात भरीव कामगिरीची अपेक्षा न जगातील वैज्ञानिक करत होते न खुद्द भारतीय.

चंद्रयान २ मधील विक्रम ल्यांडर ला सॉफ्ट ल्यांडींग करण्यात इसरो ला अपयश नक्कीच आलं. अपयशाच्या मागे नक्की काय चुकलं ह्याचा अभ्यास इसरो ने नक्कीच आत्तापर्यंत पुर्ण केला असेल. येत्या काही दिवसात त्यावर अधिकृत घोषणा होईलच. पण तरीही आपण सगळंच गमावलेलं नाही किंवा हे अपयश एक यशाची पायरी आहे. कारण इसरो च्या पुर्ण इतिहासात अश्या पद्धतीची मोहीम पहिल्यांदा हाती घेण्यात आली होती. आपल्या पहिल्याच मोहिमेत इसरो ने ९०%-९५% निर्भेळ यश मिळवलं हेच खूप काही आहे. तरीही सॉफ्ट ल्यांडींग सारखं तंत्रज्ञानात आपण अजून एक पाऊल मागे राहिलो आहोत हे ही मान्य करावचं लागेल. विक्रम ल्यांडर ला वेग कमी करताना त्याच्या इंजिनांचा रोख चंद्राच्या दिशेने असायला हवा होता पण शेवटच्या काही क्षणात विक्रम ल्यांडर ला आपली दिशा राखता न आल्याने त्याचा वेग कमी होण्या ऐवजी त्याचा वेग वाढला. त्यानंतर विक्रम शी संपर्क तुटल्याने विक्रम ने चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड ल्यांडींग केलं ह्या सगळ्यात त्या वरचे ट्रान्सपॉन्डर खराब झाल्याने विक्रम ल्यांडर चा संपर्क ऑर्बिटर आणि इसरो शी तुटला असावा असा कयास वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. नक्की काय झालं हे इसरो येत्या काही दिवसात स्पष्ट करेल पण विक्रम शी संपर्क होण्याच्या सगळ्या शक्यता जवळपास आता मावळल्या आहेत हे नक्की. (विनीत वर्तक ©)

विक्रम ल्यांडर जरी अपयशी ठरलं असलं तरी ऑर्बिटर ची तब्येत अगदी व्यवस्थित असुन पुढील ७.५ वर्ष ते चंद्राच्या भोवती परिक्रमा करत राहणार आहे. ह्यावरील उपकरण ह्या सगळ्या काळात चंद्राचा अभ्यास करणार आहेत. चंद्रयान २ मोहिमेत विक्रम ल्यांडर ला अपयश आलं असलं तरी ह्या प्रवासात इसरो ने तंत्रज्ञानातील अनेक गोष्टी सर केल्या आहेत. जी.एस.एल.व्ही. मार्क ३- एम १ ह्या रॉकेट मध्ये आलेली तांत्रिक अडचण इसरो च्या सेन्सर सिस्टीम ने अचुक ओळखली व योग्य वेळेत वैज्ञानिकांना त्याची कल्पना दिली. समजा ही अडचण लक्षात आली नसती तर चंद्रयान २ पृथ्वीच्या वातावरणात धुळीला मिळालं असतं. रॉकेट तंत्रज्ञान एक अतिशय किचकट असं तंत्रज्ञान आहे. एकतर अश्या तंत्रज्ञानाची निर्मिती करणं आणि त्यातही त्याला अभियांत्रिकी भाषेत म्हणतात तसं , 'फुल प्रुफ किंवा क्लोज लुप सिस्टीम' चा भाग बनवणं हे त्याहुन कठीण आहे. इसरो च्या बाहुबली रॉकेट च्या इंजिनांनी अपेक्षेपेक्षा जास्त दमदार कामगिरी करत चंद्रयान २ ला ६००० किमीचा जास्त पल्ला गाठुन दिला होता. ह्यामुळेच आज ऑर्बिटर चं आयुष्य एका वर्षावरुन ७.५ वर्ष इतकं वाढलेलं आहे. ह्या शिवाय ऑर्बिटर च्या इंजिनांनी योग्य प्रमाणात दिलेला प्रतिसाद, उशिरा प्रक्षेपित होऊन सुद्धा ठरलेल्या दिवशी चंद्राच्या कक्षेत पोहचण्याच गणित तसच ह्या सगळ्या कक्षा अगदी पुस्तकाप्रमाणे प्रत्यक्षात गाठणं तसेच विक्रम ल्यांडर आणि ऑर्बिटर च विलग होणं ह्या सगळ्या घटना इसरो च्या तांत्रिक प्रगतीची साक्ष देतं आहेत. (विनीत वर्तक ©)

२४ सप्टेंबर २०१४ चा तो ऐतिहासिक दिवस कोण विसरू शकेल? एका अशक्यप्राय वाटणाऱ्या शिखराला इसरो ने गवसणी घातली होती. जगातील सगळ्यात स्वस्त इंटर प्लॅनेटरि मिशन, पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत दाखल होणारा जगातील पहिला देश, मंगळाच्या कक्षेत आपलं यां पाठवणारा पहिला आशियायी देश अश्या एक ना अनेक विक्रमांची नोंद ह्या दिवशी झाली. भारताचा उदय ह्या मोहिमेमुळे अवकाशाच्या क्षितिजावर झाला जिकडे फक्त ३-४ देशांची मक्तेदारी आजवर राहिलेली होती. अवघ्या ६ महिन्यांचं आयुष्य घेऊन मंगळाच्या कक्षेत स्थापन झालेलं मॉम आज तब्बल ५ वर्ष झाली तरी मंगळाच्या कक्षेत परिक्रमा करत आहे. येत्या २४ सप्टेंबर ला मॉम आपला पाचवा वाढदिवस मंगळावर साजरा करेल तेव्हा पुर्ण जग भारताच्या ह्या कामगिरीला पुन्हा एकदा कुर्निसात करेल. ह्या ५ वर्षाच्या काळात मॉम ने मंगळाची १००० पेक्षा जास्त छायाचित्र इसरो कडे पाठवलेली असुन ह्यातील प्रत्येक छायाचित्र आवाज आपल्याशी बोलत आहे. मंगळावरील अनेक छोट्या, मोठ्या गोष्टी मॉम ने टिपल्या असुन जे आजवर कोणत्या देशाला जमलं नाही त्या पद्धतीने मॉम ने मंगळाची छायाचित्र घेतलेली आहेत. मॉम ची कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने अगदी जवळुन ते अगदी लांबुन ज्याला फुल डिस्क फोटो म्हणतात अश्या पद्धतीची छायाचित्र मॉम ने मंगळाची घेतलेली आहेत. मॉमवर असलेलं इंधन हे अजून १०-१२ वर्ष मॉम ला त्याच्या कक्षेत ठेवण्यास सक्षम असुन तोवर जर ह्यावरील उपकरणे काम करत राहिली तर मॉमकडून येणारा खजिना किती प्रचंड असेल ह्याचा अंदाज प्रत्येकजण लावु शकतो.

चंद्रयान २ मोहिमेत इसरो ने चंद्राचा गड जिंकला तरी विक्रम चा सिंह गमावला तर मंगळयान मोहिमेत तर मंगळाचे ही तख्त राखतो भारत माझा असं म्हंटलयास वावगं ठरणार नाही. यश- अपयश नाण्याचा दोन बाजु आहेत. भारताचे पंतप्रधान म्हणाले तसे,

"There's no failure in science, there are only experiments."

येत्या काळात इसरो पुन्हा एकदा भरारी घेईल आणि त्यावेळेस अश्याच एखाद्या सप्टेंबर महिन्यात पुर्ण भारत देश चंद्रावर सॉफ्ट ल्यांडींग चं यश साजरे करत असेल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही. विक्रम ची १५ मिनिटे आणि मॉम ची ५ वर्ष इसरो ला नक्कीच खुप काही शिकवून तर गेलीच आहेत पण त्याही पेक्षा असंख्य भारतीयांच्या मनात अवकाशाची नवी कवाड उघडून गेली आहेत.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Saturday 14 September 2019

चुकलेले सिग्नल... विनीत वर्तक ©

चुकलेले सिग्नल... विनीत वर्तक ©

नुकतंच वाहन कायद्यात दुरुस्ती करून रस्त्यांवर नियम तोडणाऱ्यांना अधिक शिक्षेची तरतुद करण्यात आली. ह्या नविन नियमांवर समाजाच्या अनेक थरातून दोन्ही बाजुने प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. ह्यातलं राजकारण बाजुला ठेवुन जर आपण ह्या गोष्टींकडे पाहिलं तर हे नवीन नियम किंवा त्यातील कडक झालेल्या शिक्षा ह्या आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या त्यायोगे देशातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आहेत. पण त्यांची अंमलबजावणी ज्या पद्धतीने होते आहे किंवा त्यात ज्या पद्धतीने राजकारण होते आहे ते नक्कीच धोक्याची घंटा आहे. आमचं सरकार आलं तर आम्ही ही शिथिलता देऊ. आमचं सरकार आलं तर नियम मोडणाऱ्यांना घाबरण्याची गरज नाही असा एक मेसेज देण्यात येतो आहे. तसेच शिक्षेपोटी जास्तीचे पैसे उकळणार सरकार जनता विरोधी आहे. मला त्यातल्या राजकारणात रस नाही. पण एकूणच भारतात वाहतुक कायद्यात अमुलाग्र बदलांची गरज आहे हे नक्की.

मी ज्या कंपनी मध्ये काम करतो तिकडे चारचाकी वाहनात बसल्यावर सिट बेल्ट लावणे बंधनकारक असुन नोकरी शाबुत ठेवण्यासाठी ह्या नियमाला नेहमीच पुर्ण करणं बंधनकारक आहे. कंपनी मधला डायरेक्टर अथवा सि.ई.ओ. असो वा कंपनीसाठी काम करणारा एखादा कामगार सर्वाना जगाच्या म्हणजे १८० देशांसाठी (जिथे माझ्या कंपनीची ऑफिसेस आहेत ) हा नियम लागु आहे. हा नियम तोडल्यावर एकच शिक्षा म्हणजे कंपनी मधुन बडतर्फी त्यात सॉरी, चुकी ला जागा नाही. नोकरीला लागल्यावर पहिल्याच दिवशी फक्त ह्या एका गोष्टीसाठी ८ तास समजावलं जाते. त्या पलीकडे सतत हा नियम तसेच इतर नियम फॉलो करण्यासाठी उद्युक्त केलं जाते. लक्ष ठेवण्यासाठी कंपनी च्या ताफ्यातील प्रत्येक गाडीत इलेक्ट्रॉनिक सिस्टीम असुन त्यात गाडीची प्रत्येक क्षणाची माहिती रेकॉर्ड होतं असते. गाडीचा वेग ताशी ६५-७० कमी/ तास च्या वर गेल्यावर गाडीतुन अलर्ट सुरु होतो. तसेच गाडीचा स्पिड आणि ब्रेक दोन्ही गोष्टी हार्श केल्यास अलर्ट जातो. गाडी चालवणाऱ्या प्रत्येक ड्रायव्हर चे झोपेचे तास, कामाची वेळ तसेच एखाद्या ठिकाणी जाताना प्रत्येक २ तासांच्या ड्रायविंग नंतर १०-१५ मिनिटांचा ब्रेक घ्यावाच लागतो. प्रत्येक ड्राइव्हरला एकही अलर्ट शिवाय महिनाभर गाडी चालवल्यास अधिक भत्ता दिला जातो जो की त्याच्या पगारापेक्षा जास्ती आहे. हे सगळं सांगण्या मागचा उद्देश हाच की सुरक्षित प्रवास ही एक सवय आहे ती अंगी जोपासावी लागते. त्या साठी मेहनत घ्यावी लागते. आपल्याला सगळं येते असं म्हणुन अंगवळणी पडलेल्या सवयीला पण पुन्हा पुन्हा शिकवलं जाते ते ह्याचसाठी की गाडीच्या आत बसणारा प्रत्येक जण आणि त्याच आयुष्य महत्वाचं आहे. जवळपास १ लाखापेक्षा जास्त कर्मचारी आणि इतक्या देशात काम करून पण रस्त्याच्या अपघातात जखमी अथवा मृत होणाऱ्या लोकांची संख्या जवळपास नगण्य आहे. ह्याला कारण म्हणजे नियमांची केलेली योग्य अंमलबजावणी.

भारतात अश्या नियमांची आणि सवयींची अत्यंत गरज आहे. भारतात दोन चाकी स्कुटर वर हेल्मेट हे पोलिसाला चुकवण्यासाठी घातले जाते. त्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या स्वसात मिळणाऱ्या हेल्मेट चा वापर केला जातो. ज्याची सुरक्षा मापदंडाच्या आधारे चाचणी झालेली नसताना तसेच त्यांच्या निकषावर ती उतरत नसताना ती सर्रास विकली जातात. ती विकणारे वाढत आहेत कारण घेणारे वाढत आहेत. त्यांच्यावर बंदी आणण्यापेक्षा आपल्या विचारात बदल करणं गरजेचं आहे. एकवेळ पोलिसांना मुर्ख बनवाल पण आपल्या डोक्याचं संरक्षण ही आपली जबाबदारी आहे पोलिसांची नव्हे. मोबाईल च्या स्क्रीनवर रेघोट्या येऊ नये म्हणुन तत्परतेने प्रोटेक्शन लावणारे आपल्या डोक्याच्या प्रोटेक्शन चा विचार करत नाहीत. कारण १५ हजार ते २० हजार रुपयांचा मोबाईल हा आपल्या अमूल्य असलेल्या डोक्यापेक्षा जास्ती महत्वाचा आहे ही आपली मानसिकता आहे. हेल्मेट घालुन काय होते? कधी एकदाच तर अपघात होणार? त्यासाठी मी माझे केस कशाला खराब करू? त्याने माझे लुक्स जातात? मला घाम येतो? अश्या एक न विविध कारणे सगळेच हे विसरतात की ती एक वेळ कधीही येऊ शकते आज , आत्ता , ह्या क्षणाला सुद्धा. जेव्हा ती येईल तेव्हा जर तुमचं डोकं सुरक्षित नसेल तर त्या मोबाईल वर फिरणारे हात त्या स्क्रीन ला कसे वाचवणार आहेत? (विनीत वर्तक ©)

दारु पिऊन गाडी चालवणे, गाडी मध्ये बदल्यावर सिट बेल्ट न लावणे, गाडी घेताना ५० हजार रुपये वाचवण्यासाठी एअर ब्याग्स नसलेलं मॉडेल घेणं हे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जिवावर कधिही बेतु शकते हे आपल्याला कळत का नाही? तुमची आणि तुमच्या कुटुंबाची किंमत फक्त ५० हजार रुपये आहे का? कारण जन्म आणि मृत्यू ह्या मध्ये उद्या ह्या एअर ब्याग्स असणार आहेत ह्याची जाणिव आपल्याला कधी होणार आहे? सिट बेल्ट कसा काम करतो? हेच आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे मला बसायला अडचण होते? आखडलेले वाटते? अश्या अनेक तक्रारी करताना हाच सिट बेल्ट जन्म आणि मृत्यू मधला दुवा आहे हे आपण कधी लक्षात घेणार आहोत. गाडीची सुरक्षितता आणि त्याचे मापदंड हा एक भाग आहे जिकडे आपल्याला सज्ञान होण्याची गरज आहे. अधिक पैसे सुरक्षित मापदंडांसाठी लागले तरी आपल्या जीवाची किंमतीच्या दृष्टीने एकदा त्या किमतीचा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा. स्वस्तात मिळतात म्हणुन वापरलेले टायर, ५ वर्षापेक्षा जास्ती काळ गाडी चालली नाही म्हणुन तेच टायर वापरताना ते फुटल्यास दोष कोणाचा? प्रत्येक गोष्टीच एक आयुष्य असते ते लक्षात घेऊन त्या गोष्टी योग्य त्या वेळी बदलायला हव्याच. (विनीत वर्तक ©)

आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर काही कठोर पावलं उचलावीच लागणार आहेत. आत्ता वाहन कायद्यात केलेल्या सुधारणा आणि भरीव शिक्षेची तरतूद ही अश्याच कठोर पावलांची एक सुरवात होती. पण त्यातही राजकारण आणि भारतीय लोकांची ह्या सगळ्याकडे चलता है म्हणुन बघण्याच्या मानसिकतेने ह्या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. आपल्या जिवापेक्षा लोकांना दंडाच्या रकमेची काळजी आहे. अर्थात त्यांची सगळी ओरड चुकीची आहे असं ही नाही. कारण ह्या नियमांच्या आडोश्याला काही पोलिसांची अरेरावी, टेबलाखालुन चिरीमिरी घेण्याची पद्धत ह्याचा प्रसार ही वाढलेला आहे. हे सगळं योग्य रीतीने पुर्ण देशात एकसूत्री पद्धतीने राबवणं गरजेचं आहे. आज एक राज्य नाही म्हणते मग उद्या दुसरं , परवा त्यात तिसरं उडी घेईल आणि चौथं मीच का म्हणुन राबायचे हे नियम म्हणुन बाजुला काढेल. थोडक्यात काय सरकार कोणाचं असो? वा विरोधात पक्ष कोणताही असो आपण आपल्या देशांच्या लोकांच्या आयुष्याशी खेळतो आहोत ह्याच कोणालाच सोयरसुतक नाही. आपले भारतीय लोकं पण हो ला हो मिळवत ह्या नियमांच्या विरोधात दंड थोपटत आहेत. 'चुकलेले सिग्नल' जेव्हा आपल्या कुटुंबातील कोणाचा बळी घेतील तेव्हा ह्याचा विरोध करणारे जागे होतील. तूर्तास नवीन नियमांचा खेळ हताशपणे बघावा लागत आहे.


तळटीप :- ह्या पोस्टमध्ये कोणतं राजकारण मला अपेक्षित नाही. मी कोणत्याही पक्षाचा, नेत्याचा अथवा विचारांचा पुरस्कर्ता नाही. जे मला योग्य वाटलं ते लिहलेलं आहे.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

फोटो स्रोत :- गुगल