दुर्गाशक्ती भाग १ (सुषमा स्वराज) ... विनीत वर्तक ©
भारतीय राजकारण म्हणजे पुरुष सत्ताक लोकशाही असा एक समज जागतिक पटलावर होता. चुल आणि मुल ह्यात रमलेली भारतीय स्री कधी भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन भारताच जागतिक पटलाच्या राजकारणात प्रतिनिधित्व करून जवळपास ६ दशके असलेल्या भारताच्या जागतिक प्रतिमेला छेद देतं एका नव्या भारताचा उगम झाल्याची वर्दी जागतिक पटलावर देईल असा विचार ज्यावेळी कोणी केला नव्हता तेव्हा ह्या शक्यतेला मुर्त स्वरूप देण्याचं काम एका भारतीय राजकारणी स्त्री ने केलं. ती स्री म्हणजेच माननीय स्वर्गीय सुषमा स्वराज. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाला एक नवीन धार देताना त्यांनी परराष्ट्र मंत्रालय सर्वसामान्य लोकांपर्यंत नेलं. सोशल मिडियाच्या माध्यमातुन एक केंद्रीय मंत्री अगदी कोणत्याही वेळी जगाच्या कोणत्याही देशातील भारतीय लोकांच्या अडचणी सोडवू शकतो तसेच त्यांची रक्षा, मदत करण्यास भारत सरकार नेहमीच तत्पर असेल असा आत्मविश्वास त्यांनी प्रत्येक अनिवासी भारतीयांना दिला. त्यासाठीच अमेरिकेच्या प्रतिष्ठित अश्या 'वॉल स्ट्रीट जर्नल' वृत्तपत्राने त्यांना भारतातील 'सर्वात आवडतं राजकीय व्यक्तिमत्व' असा किताब देऊन त्यांचा गौरव केला होता.
१४ फेब्रुवारी १९५२ सुषमा स्वराज ह्यांचा जन्म झाला. पॉलिटिकल सायन्स आणि संस्कृत हे विषय घेऊन पदवी घेतल्यावर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. अभ्यासा व्यतिरिक्त इतर सर्व क्षेत्रात त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात आपली छाप सोडली. खेळ, कला, संगीत, चित्रकला ते अगदी एन.सी.सी. अश्या सगळ्याच क्षेत्रात त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. सगळ्याच क्षेत्रात त्यांना विद्यार्थी दशेत असताना पुरस्कार मिळाले. कॉलेज मध्ये असताना सलग ३ वर्ष त्यांना एन.सी.सी. च्या बेस्ट कॅडेट चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. १९७० ला त्यांना अंबाला इथल्या एस.डी. कॉलेज ची सर्वोत्तम विद्यार्थी म्हणुन त्यांची निवड झाली. विद्यार्थी दशेतच त्या त्यांच्या गुणांमुळे राजकारणात ओढल्या गेल्या. हिंदी, इंग्रजी भाषेवर असणारं प्रभुत्व, शब्दांची जाण, अमोघ वक्तृत्त्व तसेच संघटना कौशल्य असे एखाद्या राजकारण्याला लागणारे सगळेच गुण त्यांच्यात ठासुन भरले होते. १९७० च्या दशकात भारतात इंदिरा गांधींनी आणिबाणी घोषित केली होती. व्यक्तिस्वातंत्र्यावर अंकुश घालणाऱ्या त्या काळात त्यांनी विद्यार्थी आंदोलनाच प्रतिनिधित्व केलं. त्यातुन त्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आल्या. त्यानंतर जो एक अभुतपुर्व प्रवास त्यांनी भारताच्या राजकारणात केला जो आजही भारतातील प्रत्येक स्त्री साठी आदर्शवत असाच आहे. (विनीत वर्तक ©)
एका बाजूने विद्यार्थी दशेत राजकारणात प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी आपल्या वकिलीची सुरवात सुप्रीम कोर्टात सुरु केली. सुप्रीम कोर्टात आणिबाणीच्या काळात केसेस लढताना त्यांची ओळख स्वराज कौशल ह्यांच्याशी झाली. सुषमा स्वराज ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणी मधील होत्या तर स्वराज कौशल हे सोशल बिलीफ विचारसरणीचे होते. पण विचारसरणी मधील ही टोकाची तफावत त्यांची मने जुळण्यापासून थांबवू शकली नाहीत. घरातुन विरोध असताना पण त्यांनी लग्न केलं. तब्बल ४४ वर्षाचा सुखी संसार त्यांनी स्वराज कौशल ह्यांच्यासोबत केला. त्यांना बांसुरी कौशल नावाची असुन ती सुद्धा एक वकील आहे. भारतीय राजकारणात सुषमा स्वराज ह्यांनी आपली निर्माण केली. त्यांची राजकीय कारकीर्द म्हणजे एक दंतकथा आहे. राजकारणात त्यांनी उच्चपद भूषवली. आपल्या पक्षाच्या तसेच देशाच्या उभारणीत त्यांचं मोलाचं योगदान राहिलं होतं. राजकारणात त्यांनी अनेक विक्रम निर्माण केले जे येत्या काळात कोणाला मोडणं ही कठीण असेल. त्यांच्या राजकारणातील विक्रमांचा हा छोटा लेखाजोखा,
१) सुषमा स्वराज १९७७ साली भारताच्या सगळ्यात तरुण (वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी) कॅबिनेट मिनिस्टर झाल्या.
२) १९७९ साली जनता पार्टी च्या हरियाणा राज्याच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या. तेव्हा त्यांच वय होतं २७ वर्ष.
३) भारतातिल एखाद्या राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या होण्याचा मान सुषमा स्वराज ह्यांना मिळालेला आहे.
४) सुषमा स्वराज ह्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. (१९९८ साली दिल्ली च्या मुख्यमंत्री बनल्या )
५) सुषमा स्वराज भारतातील पहिल्या महिला युनियन कॅबिनेट मिनिस्टर होत्या.
६) सुषमा स्वराज भारतातील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या होत्या.
ह्या शिवाय त्या ७ वेळा संसदेत निवडून गेल्या होत्या. सुषमा स्वराज ह्यांचा हरियाणा सरकारने उत्कृष्ठ संसदपटु म्हणुन गौरव केला आहे. भारतीय संसदेने त्यांना २००८ आणि २०१० साली भारतातील सर्वोत्कृष्ठ संसदपटु म्हणुन त्यांचा गौरव केला आहे. हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला संसदपटु आहेत. ह्या शिवाय १२ व्या लोकसभेत त्यांनी टेलिकॉम मिनिस्टर म्हणुन काम पाहिलं तर नंतर त्यांनी मिनिस्टर ऑफ इंफॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टींग म्हणुन काम केलं. २००३ साली त्यांची नियुक्ती आरोग्य मंत्री म्हणुन झाली. ह्या काळात त्यांनी भारतात ६ एम्स ( All India Institute of Medical Sciences )ची स्थापना केली. १५ व्या लोकसभेत मध्य प्रदेश मधल्या विदिशा मधुन ४ लाखापेक्षा मतांनी निवडून आल्यावर त्यांच्याकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. राजकारणातील सगळ्यात संस्मरणीय कार्यकाळ हा २०१४ ते २०१९ राहिला जेव्हा त्यांनी विदेशमंत्री पदाची सुत्र आपल्या हाती घेतली. भारतीय स्री ची जागतिक पटलावर कणखर प्रतिमा निर्माण करताना त्यांनी भारताच्या विदेशनीती मध्ये अमुलाग्र बदल केले. अनिवासी भारतीयांमध्ये आपल्या देशाबद्दल आदर, सरकार बद्दल सकारात्मक प्रतिमा निर्माण केली. एकावेळेस जागतिक राजकारणात भारताची बाजु मांडताना अगदी २४ तास लोकांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचं सोशल मिडीयाच्या माध्यमातुन त्यांनी पुर्ण भारताला दाखवून दिलं. (विनीत वर्तक ©)
राजकारणातलं एक कणखर स्री व्यक्तिमत्व अशी आपली ओळख निर्माण करताना सामान्य भारतीयांसाठी अगदी सातासमुद्रापार आपलेपणाची भावना त्यांनी निर्माण केली. कणखर पण त्याच वेळी सामान्य जनतेशी त्यांनी त्यांच्या सामान्य भाषेत संवाद साधला. लोकसभा असो वा युनायटेड नेशन त्यांची भाषण ही त्यांच्या वक्तृत्वामुळे आजही लोकांच्या स्मरणात आहेत. भाषेवरील पकड, अप्रतिम वक्तृत्व कौशल्य, त्याच सोबत असणारं एक हळवं, कवी मन अश्या सर्व गोष्टींचा मिलाफ असणाऱ्या सुषमा स्वराज ह्यांनी भारतातील नव्हे तर पुर्ण जगातील राजकारणात आपला ठसा उमटवला. त्यांचा हा पुर्ण प्रवास प्रत्येक भारतीय स्री ला प्रेरणा देणारा तर आहेच पण त्या पलीकडे भारताच्या स्री मधल्या दुर्गाशक्ती चं एक प्रतीक आहे. अश्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा प्रवास अचानक थांबला असला तरी त्यांनी सर्वांपुढे निर्माण केलेला आदर्श नेहमीच भारतीय स्त्रियांना प्रेरणा देतं राहील. भारताच्या राजकारणातील ह्या दुर्गाशक्तीस माझा साष्टांग नमस्कार.
फोटो स्रोत :- गुगल
No comments:
Post a Comment