Tuesday, 10 September 2019

चंद्राच्या कुशीत... विनीत वर्तक ©

चंद्राच्या कुशीत... विनीत वर्तक ©

विक्रम ल्यांडर ला चंद्राच्या जमिनीवर उतरून बराच वेळ झाला आहे पण अजुनही विक्रम ल्यांडर शी संपर्क करण्यास इसरो ला यश आलेलं नाही. विक्रम ल्यांडर ने चंद्राच्या जमिनीवर हार्ड ल्यांडींग केलं हे इसरो ने स्पष्ट केलं आहे. हार्ड ल्यांडींग आणि सॉफ्ट ल्यांडींग काय हे आधी समजायला हवं. सॉफ्ट ल्यांडींग मध्ये विक्रम ल्यांडर एका विशिष्ठ वेगात चंद्राच्या जमिनीवर उतरणं अपेक्षित होतं. हा वेग अश्या पद्धतीने गणित केलेला होता ज्यायोगे उतरणाच्या वेळी लागणाऱ्या धक्के तसेच इतर गोष्टींमुळे आतल्या सिस्टीम ना कोणतिही इजा होणार नाही. विक्रम ल्यांडर मध्ये अनेक तांत्रिक गोष्टींचा मेळ केलेला होता. ज्यात इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम, कम्युनिकेशन सिस्टीम, मेकॅनिकल सिस्टीम, तसेच ब्याटरी, सोलार प्यानेल, इंजिन अश्या अनेक वेगवेगळ्या सिस्टीम चा समावेश होता. ह्या सगळ्या सिस्टीम ना नियंत्रित करणारा कॉम्प्युटर हा ह्या सगळ्या सिस्टीम चा समन्वय साधत होता. सॉफ्ट ल्यांडींग केल्यावर ह्या सर्व गोष्टी सुखरुप राहतील ह्याच्या चाचण्या इसरो ने पृथ्वीवर घेतल्या होत्या. जोवर ह्या सगळ्या सिस्टीम व्यवस्थित चालत नाहीत तोवर चंद्रयान २ ला गो अहेड दिलं गेलं नव्हतं. (विनीत वर्तक ©)

जेव्हा विक्रम ल्यांडर चा संपर्क तुटला तेव्हा ते होण्यामागे काय कारण होतं ह्याचा शोध इसरो घेते आहे. पण ऑर्बिटर ने पाठवलेल्या फोटो मधुन ल्यांडर चं हार्ड ल्यांडींग झाल्याचं इसरो ने स्पष्ट केलं आहे. ह्याचा सरळ अर्थ आहे की ज्या वेगात, ज्या धक्याने विक्रम ल्यांडर चंद्राच्या जमिनीवर आदळलं तो धक्का सहन करण्यासाठी विक्रम ल्यांडर वरील सिस्टीम बनवलेल्या नव्हत्या. म्हणजेच ह्या हार्ड ल्यांडींग मुळे  ह्यातील एक किंवा अधिक सिस्टीम ला हानी पोहोचल्याची शक्यता नक्कीच आहे. आता हा वेग इतका ही जास्ती नव्हता की विक्रम ल्यांडर जमिनीवर आढळून त्याचे तुकडे तुकडे होतील. सध्या विक्रम ल्यांडर चंद्राच्या जमीनीवर एका बाजूने कललेल्या स्थितीत आहे. ह्या धक्यामुळे नक्की कोणत्या सिस्टीम खराब झाल्या आहेत ह्याचा शोध इसरो घेते आहे.

इसरो पुढील सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे संपर्क साधणं आहे. कारण संपर्क झाल्यावर जरी विक्रम ल्यांडर ने काही काम केलं नाही तरी नक्की कोणती सिस्टीम खराब झाली आहे. त्यात नक्की काय पार्टस खराब झाले ह्याचा अंदाज इसरो ला आला असता. तसेच उतरताना नक्की कुठे माशी शिंकली ह्या सर्व गोष्टी इसरो ला कळल्या असत्या. पण संपर्क प्रस्थापित होतं नसल्याने नक्की काय बिघडलं ह्याचा अंदाज इसरो ला लावता येत नाही आहे. आता संपर्क साधण्यासाठी इसरो वेगवेगळे कमांड विक्रम ल्यांडर ला पाठवत आहे. जर का विक्रम ल्यांडर वरील एखादी सिस्टीम जर चालु असेल तर ह्या कमांड प्रमाणे काम करेल. त्याचे रिझल्ट इसरो ला परत पाठवेल. पण हे सर्व होण्यासाठी विक्रम ल्यांडर वरील अँटिना इसरो च्या डीप स्पेस नेटवर्क शी जुळून येणं गरजेचं आहे. जर विक्रम ल्यांडर ने सॉफ्ट ल्यांडींग केलं असतं तर विक्रम वरील कॉम्प्युटर ने ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन त्या प्रमाणे त्याला चंद्रावर उतरवलं असतं पण आता हार्ड ल्यांडींग मुळे नक्की कश्या स्थितित विक्रम आहे हे सांगता येणं कठीण आहे. (विनीत वर्तक ©)

एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या सर्व गोष्टी पृथ्वीपासुन जवळपास ३.८१ लाख किलोमीटर वर सुरु आहेत. ऑर्बिटर ने जी छायाचित्र घेतली असली तरी ती अजून इतकी सुस्पष्ट नाहीत की विक्रम ल्यांडर ला झालेल्या नुकसानीचा अंदाज बांधता येईल. एक पर्याय जो इसरो समोर आहे तो म्हणजे ऑर्बिटर ला जर त्याच्या कक्षेतुन काढत चंद्राच्या जवळ ३०-३५ किलोमीटर उंचीच्या कक्षेत आणुन विक्रम ल्यांडर ला जवळुन बघणं पण असं करणे म्हणजे आधीच यशस्वी झालेल्या आणि व्यवस्थित असलेल्या ऑर्बिटर ला संकटात टाकणं. विक्रम ल्यांडर चा कार्यकाळ असाही १४ दिवसांचा होता. १४ दिवसानंतर ह्या भागावरून सूर्याचा अस्त झाल्यावर विक्रम ल्यांडर वरील सिस्टीम अतिशित तपमानात तग धरून राहण्याची शक्यता कमीच होती. म्हणुन इसरो ऑर्बिटर ची कक्षा बदलण्याची रिस्क घेणार नाही. (विनीत वर्तक ©)

ऑर्बिटर प्रत्येक वेळी त्या भागातुन जाताना विक्रम ल्यांडर शी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. विक्रम ल्यांडर वरील एक जरी सिस्टीम चालु झाली अथवा असली तरी त्या सिग्नल ने पण इसरो च्या हातात बरच काही लागु शकते. १४ दिवसांचा अवधी इसरो कडे आहे. ह्या कालावधीत विक्रम शी संपर्क झाला तर खूप काही गोष्टींवरून पडदा बाजूला होईल. संपर्क झाला नाही तर निपचित पडलेलं विक्रम चंद्राच्या कुशीत कायमसाठी विसावून जाईल. आपण आशा करूया की इसरो विक्रम ल्यांडर शी संपर्क करण्यात यशस्वी होईल.

माहिती स्रोत :- इसरो 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

1 comment:

  1. इसरोटीम च्या प्रयत्नांना यश ही अगदी मनापासुन सदीच्छा

    ReplyDelete