चुकलेले सिग्नल... विनीत वर्तक ©
नुकतंच वाहन कायद्यात दुरुस्ती करून रस्त्यांवर नियम तोडणाऱ्यांना अधिक शिक्षेची तरतुद करण्यात आली. ह्या नविन नियमांवर समाजाच्या अनेक थरातून दोन्ही बाजुने प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. ह्यातलं राजकारण बाजुला ठेवुन जर आपण ह्या गोष्टींकडे पाहिलं तर हे नवीन नियम किंवा त्यातील कडक झालेल्या शिक्षा ह्या आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या त्यायोगे देशातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आहेत. पण त्यांची अंमलबजावणी ज्या पद्धतीने होते आहे किंवा त्यात ज्या पद्धतीने राजकारण होते आहे ते नक्कीच धोक्याची घंटा आहे. आमचं सरकार आलं तर आम्ही ही शिथिलता देऊ. आमचं सरकार आलं तर नियम मोडणाऱ्यांना घाबरण्याची गरज नाही असा एक मेसेज देण्यात येतो आहे. तसेच शिक्षेपोटी जास्तीचे पैसे उकळणार सरकार जनता विरोधी आहे. मला त्यातल्या राजकारणात रस नाही. पण एकूणच भारतात वाहतुक कायद्यात अमुलाग्र बदलांची गरज आहे हे नक्की.
मी ज्या कंपनी मध्ये काम करतो तिकडे चारचाकी वाहनात बसल्यावर सिट बेल्ट लावणे बंधनकारक असुन नोकरी शाबुत ठेवण्यासाठी ह्या नियमाला नेहमीच पुर्ण करणं बंधनकारक आहे. कंपनी मधला डायरेक्टर अथवा सि.ई.ओ. असो वा कंपनीसाठी काम करणारा एखादा कामगार सर्वाना जगाच्या म्हणजे १८० देशांसाठी (जिथे माझ्या कंपनीची ऑफिसेस आहेत ) हा नियम लागु आहे. हा नियम तोडल्यावर एकच शिक्षा म्हणजे कंपनी मधुन बडतर्फी त्यात सॉरी, चुकी ला जागा नाही. नोकरीला लागल्यावर पहिल्याच दिवशी फक्त ह्या एका गोष्टीसाठी ८ तास समजावलं जाते. त्या पलीकडे सतत हा नियम तसेच इतर नियम फॉलो करण्यासाठी उद्युक्त केलं जाते. लक्ष ठेवण्यासाठी कंपनी च्या ताफ्यातील प्रत्येक गाडीत इलेक्ट्रॉनिक सिस्टीम असुन त्यात गाडीची प्रत्येक क्षणाची माहिती रेकॉर्ड होतं असते. गाडीचा वेग ताशी ६५-७० कमी/ तास च्या वर गेल्यावर गाडीतुन अलर्ट सुरु होतो. तसेच गाडीचा स्पिड आणि ब्रेक दोन्ही गोष्टी हार्श केल्यास अलर्ट जातो. गाडी चालवणाऱ्या प्रत्येक ड्रायव्हर चे झोपेचे तास, कामाची वेळ तसेच एखाद्या ठिकाणी जाताना प्रत्येक २ तासांच्या ड्रायविंग नंतर १०-१५ मिनिटांचा ब्रेक घ्यावाच लागतो. प्रत्येक ड्राइव्हरला एकही अलर्ट शिवाय महिनाभर गाडी चालवल्यास अधिक भत्ता दिला जातो जो की त्याच्या पगारापेक्षा जास्ती आहे. हे सगळं सांगण्या मागचा उद्देश हाच की सुरक्षित प्रवास ही एक सवय आहे ती अंगी जोपासावी लागते. त्या साठी मेहनत घ्यावी लागते. आपल्याला सगळं येते असं म्हणुन अंगवळणी पडलेल्या सवयीला पण पुन्हा पुन्हा शिकवलं जाते ते ह्याचसाठी की गाडीच्या आत बसणारा प्रत्येक जण आणि त्याच आयुष्य महत्वाचं आहे. जवळपास १ लाखापेक्षा जास्त कर्मचारी आणि इतक्या देशात काम करून पण रस्त्याच्या अपघातात जखमी अथवा मृत होणाऱ्या लोकांची संख्या जवळपास नगण्य आहे. ह्याला कारण म्हणजे नियमांची केलेली योग्य अंमलबजावणी.
भारतात अश्या नियमांची आणि सवयींची अत्यंत गरज आहे. भारतात दोन चाकी स्कुटर वर हेल्मेट हे पोलिसाला चुकवण्यासाठी घातले जाते. त्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या स्वसात मिळणाऱ्या हेल्मेट चा वापर केला जातो. ज्याची सुरक्षा मापदंडाच्या आधारे चाचणी झालेली नसताना तसेच त्यांच्या निकषावर ती उतरत नसताना ती सर्रास विकली जातात. ती विकणारे वाढत आहेत कारण घेणारे वाढत आहेत. त्यांच्यावर बंदी आणण्यापेक्षा आपल्या विचारात बदल करणं गरजेचं आहे. एकवेळ पोलिसांना मुर्ख बनवाल पण आपल्या डोक्याचं संरक्षण ही आपली जबाबदारी आहे पोलिसांची नव्हे. मोबाईल च्या स्क्रीनवर रेघोट्या येऊ नये म्हणुन तत्परतेने प्रोटेक्शन लावणारे आपल्या डोक्याच्या प्रोटेक्शन चा विचार करत नाहीत. कारण १५ हजार ते २० हजार रुपयांचा मोबाईल हा आपल्या अमूल्य असलेल्या डोक्यापेक्षा जास्ती महत्वाचा आहे ही आपली मानसिकता आहे. हेल्मेट घालुन काय होते? कधी एकदाच तर अपघात होणार? त्यासाठी मी माझे केस कशाला खराब करू? त्याने माझे लुक्स जातात? मला घाम येतो? अश्या एक न विविध कारणे सगळेच हे विसरतात की ती एक वेळ कधीही येऊ शकते आज , आत्ता , ह्या क्षणाला सुद्धा. जेव्हा ती येईल तेव्हा जर तुमचं डोकं सुरक्षित नसेल तर त्या मोबाईल वर फिरणारे हात त्या स्क्रीन ला कसे वाचवणार आहेत? (विनीत वर्तक ©)
दारु पिऊन गाडी चालवणे, गाडी मध्ये बदल्यावर सिट बेल्ट न लावणे, गाडी घेताना ५० हजार रुपये वाचवण्यासाठी एअर ब्याग्स नसलेलं मॉडेल घेणं हे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जिवावर कधिही बेतु शकते हे आपल्याला कळत का नाही? तुमची आणि तुमच्या कुटुंबाची किंमत फक्त ५० हजार रुपये आहे का? कारण जन्म आणि मृत्यू ह्या मध्ये उद्या ह्या एअर ब्याग्स असणार आहेत ह्याची जाणिव आपल्याला कधी होणार आहे? सिट बेल्ट कसा काम करतो? हेच आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे मला बसायला अडचण होते? आखडलेले वाटते? अश्या अनेक तक्रारी करताना हाच सिट बेल्ट जन्म आणि मृत्यू मधला दुवा आहे हे आपण कधी लक्षात घेणार आहोत. गाडीची सुरक्षितता आणि त्याचे मापदंड हा एक भाग आहे जिकडे आपल्याला सज्ञान होण्याची गरज आहे. अधिक पैसे सुरक्षित मापदंडांसाठी लागले तरी आपल्या जीवाची किंमतीच्या दृष्टीने एकदा त्या किमतीचा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा. स्वस्तात मिळतात म्हणुन वापरलेले टायर, ५ वर्षापेक्षा जास्ती काळ गाडी चालली नाही म्हणुन तेच टायर वापरताना ते फुटल्यास दोष कोणाचा? प्रत्येक गोष्टीच एक आयुष्य असते ते लक्षात घेऊन त्या गोष्टी योग्य त्या वेळी बदलायला हव्याच. (विनीत वर्तक ©)
आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर काही कठोर पावलं उचलावीच लागणार आहेत. आत्ता वाहन कायद्यात केलेल्या सुधारणा आणि भरीव शिक्षेची तरतूद ही अश्याच कठोर पावलांची एक सुरवात होती. पण त्यातही राजकारण आणि भारतीय लोकांची ह्या सगळ्याकडे चलता है म्हणुन बघण्याच्या मानसिकतेने ह्या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. आपल्या जिवापेक्षा लोकांना दंडाच्या रकमेची काळजी आहे. अर्थात त्यांची सगळी ओरड चुकीची आहे असं ही नाही. कारण ह्या नियमांच्या आडोश्याला काही पोलिसांची अरेरावी, टेबलाखालुन चिरीमिरी घेण्याची पद्धत ह्याचा प्रसार ही वाढलेला आहे. हे सगळं योग्य रीतीने पुर्ण देशात एकसूत्री पद्धतीने राबवणं गरजेचं आहे. आज एक राज्य नाही म्हणते मग उद्या दुसरं , परवा त्यात तिसरं उडी घेईल आणि चौथं मीच का म्हणुन राबायचे हे नियम म्हणुन बाजुला काढेल. थोडक्यात काय सरकार कोणाचं असो? वा विरोधात पक्ष कोणताही असो आपण आपल्या देशांच्या लोकांच्या आयुष्याशी खेळतो आहोत ह्याच कोणालाच सोयरसुतक नाही. आपले भारतीय लोकं पण हो ला हो मिळवत ह्या नियमांच्या विरोधात दंड थोपटत आहेत. 'चुकलेले सिग्नल' जेव्हा आपल्या कुटुंबातील कोणाचा बळी घेतील तेव्हा ह्याचा विरोध करणारे जागे होतील. तूर्तास नवीन नियमांचा खेळ हताशपणे बघावा लागत आहे.
तळटीप :- ह्या पोस्टमध्ये कोणतं राजकारण मला अपेक्षित नाही. मी कोणत्याही पक्षाचा, नेत्याचा अथवा विचारांचा पुरस्कर्ता नाही. जे मला योग्य वाटलं ते लिहलेलं आहे.
No comments:
Post a Comment