Saturday 21 September 2019

जस्ट मॅरीड (एका अनोख्या लग्नाची गोष्ट)... विनीत वर्तक ©

जस्ट मॅरीड (एका अनोख्या लग्नाची गोष्ट)... विनीत वर्तक ©


एकदा इंडियन नेव्ही च्या सी हॉक लढाऊ विमानाने उड्डाण भरलं. त्यात त्याचं मिशन होतं?  एक अनोख्या लग्नसोहळ्याला पार पाडण्याचं.

HMS Hercules नावाची ब्रिटिशांनी बांधलेली एक विमानवाहू युद्धनौका अर्धवट अवस्थेत भारताने १९५७ ला खरेदी केली. तिचं राहिलेलं काम संपवून ती भारताच्या समुद्र किनारपट्टी आणि सिमेच्या सुरक्षिततेसाठी १९६१ साली इंडियन नेव्ही मध्ये दाखल झाली. तिचं नाव ठेवण्यात आलं "आय.एन.एस. विक्रांत". त्याकाळी आशियातील पहिली आणि एकमेव विमानवाहु युद्धनौका असा तिचा दरारा होता. १९६५ च्या आसपास भारत- पाकिस्तान मधील संघर्ष चिघळत चालला होता. पाकिस्तान ला युद्धासाठी "आम्ही तयार आहोत" हे दाखवण्यासाठी आय.एन.एस. विक्रांत ला अरबी समुद्रात पाकिस्तान जवळ गस्त घालण्याचे आदेश आले. अचानक आलेल्या ह्या आदेशाने त्यावर काम करणाऱ्या नेव्ही च्या अधिकाऱ्यांसाठी आणि सैन्यासाठी हा आदेश त्यांची सामान्य दिनचर्या बदलावणारा होता. आपल्या लग्नाची स्वप्न रंगवलेला एक लेफ्टनंट मात्र घरी लग्नासाठी जाण्याची तयारी करत होता. अचानक आलेल्या आदेशामुळे आय.एन.एस. विक्रांत ने अरबी समुद्रात कूच केलं. ज्या वेळेस त्याने मुंबई मधुन बंगलोर ला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर असायला हवं होतं त्या वेळेस हा लेफ्टनंट अरबी समुद्रात अडकुन पडला  होता.

इंडियन नेव्ही किंवा एकूणच भारतीय सेना आपल्या शिस्तीसाठी ओळखली जाते. पण त्याच वेळी आपल्या सैनिकांची काळजी घेण्यात पण भारतीय सेना मागेपुढे बघत नाही. त्या तरुण लेफ्टनंट ची स्थिती बिकट होती. आयुष्यातला एक महत्वाचा क्षण पण त्याचवेळी देशासाठी आपल्या कर्तव्यासाठी तो तत्पर अश्या चक्रव्युहात तो अडकला होता. त्याच्या कॅप्टन ने त्याच्या मनातले भाव ओळखले. काही बैठीकी नंतर फ्लीट कमांडर रिअर एडमिरल बी.ए.सॅम्सन ह्यांनी त्याला २४ तासांचा अवधी दिला. त्याच्या कॅप्टन ने लग्नाच्या दिवशी 'सी हॉक' लढाऊ विमानाने उड्डाण करून उद्या सकाळी ०६:०० च्या ठोक्याला पुन्हा आय.एन.एस. विक्रांतवर हजर राहण्याचा आदेश दिला. जाण्याची अनुमती तर मिळाली पण वेळ कमी होता. लग्नाचे कपडे इतर गोष्टी त्याला सोबत घेऊनच उड्डाण भराव लागणार होतं. कारण लग्नाची मुहूर्त घटिका जवळ येत चालली होती. एका विमनावाहु नौकेच्या लढाऊ विमानात कपडे न्यायला कुठली आली आहे जागा? त्याचवेळी त्याच्या एका मित्राने युक्ती केली. विमानात क्षेपणास्त्र ठेवण्याच्या जागी ती काढून त्याचे कपडे ठेवता येतील अशी व्यवस्था केली. आता इंडियन नेव्ही चं 'सी हॉक' एका अश्या मिशनसाठी सज्ज झालं होतं ज्याचा विचार ही कोणी केला नव्हता. मिशन होतं एका लग्नसोहळ्याला पुर्ण करण्याचं.

आय.एन.एस. विक्रांत युद्ध स्थितीत असल्याने तिचं स्थान अरबी समुद्रात कुठे आहे हे कळू नये म्हणुन संपुर्ण रेडिओ सायलन्स होता. आय.एन.एस. विक्रांत वरून सी हॉक तर उडालं पण ह्याची कल्पना बंगलोर ला त्या लेफ्टनंन च्या घरच्यांना होती न त्या वधुला जिच्याशी लग्न करण्यासाठी चक्क त्याने लढाऊ विमानातुन उड्डाण केलं होतं. बंगलोर ला दोन्ही लग्न घरातील लोकांना नवरदेव कुठे आहे ह्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. तो येणार आहे का? निघाला का? कधी पोहचणार? सगळेच अनुरुत्तरित प्रश्न समोर होते. घड्याळाची टिकटिक लग्नाची घटिका जवळ आल्याची वर्दी देतं होती पण नवर देवाचा कसलाच थांगपत्ता लागत नव्हता. काय होणार? ह्या भीतीने सगळे चिंतीत होते. इकडे बंगलोर मधल्या एच.ए.एल. च्या कंट्रोल टॉवर ला उतरण्यासाठी परमिशन हवी आहे असा मेसेज आला. एका इंडियन नेव्ही च्या लढाऊ विमानाकडून आलेला आदेश तिथल्या सगळ्यांसाठीच अनपेक्षित होता. काही क्षणात त्या सी हॉक च  बंगलोर च्या धावपट्टीवर आगमन झालं. त्या लेफ्टनंट ने सी हॉक ला पार्किंग बे मध्ये पार्क करत धुम ठोकली कारण लग्नघटिकेला काही मिनिटांचा अवधी राहिला होता.

लग्न ठरलेल्या मुहूर्तावर पुर्ण झालं. नवरदेवाने वेळेवर पोचायला काय काय केलं? ह्याची कल्पना कोणालाच नव्हती. दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० ला बंगलोर च्या त्याच धावपट्टी वरून सी हॉक ने पुन्हा उड्डाण केलं. फक्त ९० मिनिटाच्या काळात सी हॉक आय.एन.एस. विक्रांत च्या डेकवर उतरलं होतं. मिशन अकॉम्पलिश असे भाव त्या लेफ्टनंट च्या चेहऱ्यावर होते. ह्या यशस्वी कामगिरीसाठी त्याच स्वागत करायला त्याचे सहकारी हजर होते. त्या वेळेस त्याच स्वागत करायला युद्धनौकेवर फुलं नव्हती. ह्यावर उपाय म्हणुन त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या गळ्यात भाज्यांची बनवलेली माळ घातली. त्याच्या ह्या मिशन ला यशस्वी करणाऱ्या सी हॉक विमानाला त्यांनी "जस्ट मॅरीड" चा बोर्ड चिकटवला. त्या विमानाच्या नाकावर एक बुटांची जोडी ही लटकवली. १९६५ ला हे अनोखं मिशन पुर्ण करणारा तो सैनिक म्हणजेच "रिअर एडमिरल संतोष कुमार गुप्ता". आपल्या बहादुरीने त्यांनी १९७१ मध्ये भारत - पाकिस्तान युद्धात ह्याच आय.एन.एस. विक्रांत च सारथ्य केलं. त्यांनी भारताच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा "महावीर चक्र" देऊन सन्मान करण्यात आला.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा क्षण असतो. त्या पलीकडे आपल आपल्या देशाच्या प्रति असलेलं कर्तव्य सर्वप्रथम मानणारा तो सैनिक आणि त्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या क्षणाला अजुन अविस्मरणीय करताना "सी हॉक" सारख्या लढाऊ विमानाने जाण्याची अनुमती देणारे भारतीय सेनेचे अधिकारी. आपण दिलेल्या शब्दाचा मान ठेवत वेळेआधी पुन्हा देशसेवेसाठी हजर होणारा तो सैनिक त्याचवेळी जे काही आहे त्यात आनंद साजरा करणारे त्याचे सहकारी  ह्या सर्वाना साष्टांग नमस्कार. भारताच्या सीमेची जबाबदारी आज अश्या सैनिकांकडे आहे म्हणून आज भारत सुरक्षित आहे. हे अनोखे मिशन म्हणजे भारतीय सेनेच्या एकाचवेळी शिस्त आणि आपल्या सैनिकांच्या प्रति असलेला ओलावा ह्यांचं अविस्मरणीय मिश्रण होतं. ह्या सगळ्यांना माझा कुर्निसात.

जय हिंद......

माहिती स्रोत :- गुगल

फोटो स्रोत :- गुगल  (फोटोत जस्ट मॅरीड आणि बुट लटकवलेलं सी हॉक लढाऊ विमान आणि त्या सोबत रिअर एडमिरल संतोष कुमार गुप्ता) 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


3 comments:

  1. Wonderful information and wondreful writeup.Its very amazing, overwhelming sensitivity running through out the body with unknown sensation. These commitments, towards fellow man, towards duty ,towards country, is beyond imagination. But this is what we do require in our daily, civilian life while discharging duties. The entire mind set up to be changed forall of us.

    ReplyDelete
  2. 100 time hatsoff to respected Santosh
    Kumar Gupta and his colleagues.

    ReplyDelete
  3. व्वा.... अनपेक्षित आणि सुंदरशी घटना... तुम्ही माहिती मिळवली असली तरी ती इतक्या छान रीतीने सादर केलीत... जबरदस्त...👌👌

    ReplyDelete