ऑल सेट फॉर बिग डे... विनीत वर्तक ©
आज सकाळी चंद्रयान २ चं इंजिन ९ सेकंद प्रज्वलित करून विक्रम ल्यांडर ची कक्षा कमी करून त्याला चंद्राच्या अजुन जवळ सुखरूप नेण्यात आलं आहे. सध्या विक्रम ल्यांडर ३५ किमी गुणिले १०१ किमी कक्षेत चंद्राच्या भोवती परीक्रमा करत आहे. ऑर्बिटर मात्र त्याच्या ९६ किमी गुणिले १२५ किमी च्या कक्षेत चंद्राची परीक्रमा करत आहे. चंद्रयान २ ने आजच्या प्रज्वलना नंतर विक्रम ल्यांडर ला चंद्रावर उतरण्यासाठी लागणारी अपेक्षित कक्षा गाठली असुन आता चंद्रयान २ साठी ऑल सेट फॉर बिग डे.
ह्यानंतर घडणाऱ्या घडामोडी भारताच्या अवकाश इतिहासात पहिल्यांदा घडणार असुन ह्या नंतरचे सगळे टप्पे हे अतिशय कठिण असणार आहेत. ह्या घडामोडींची सुरवात विक्रम ल्यांडर ला ऑर्बिटर पासुन विलग करून इसरो ने केली होती. इसरो च्या इतिहासात पहिल्यांदा ३.८१ लाख किलोमीटर वर असलेल्या यानापासून दोन भाग वेगळे करण्याची प्रक्रिया केली गेली. वाचताना हे सोप्प वाटलं तरी पृथ्वीवरून विलग होण्याचे कमांड दिल्यावर यानावर असलेल्या यंत्रणेने ते अचुकपणे पार पडणे हे अवकाश तंत्रज्ञानातील इसरो च एक महत्वाचं पाऊल आहे. कारण ह्यात अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतं असतो. विलग होण्याच्या प्रक्रियेत ऑर्बिटर आणि ल्यांडर ला ज्या बोल्ट नी जोडलेलं होतं ते बोल्ट ह्या यानाच्या वर असणाऱ्या यंत्रणेने कापुन टाकले. हे बोल्ट तुटल्या नंतर ऑर्बिटर आणि ल्यांडर विलग होऊन स्वतंत्रपणे चंद्राभोवती भ्रमण करायला लागले. आत्त्तापर्यंत ऑर्बिटर चं इंजिन वापरून चंद्रयान २ च्या सगळ्या कक्षा बदलल्या गेल्या पण ल्यांडर विलग झाल्यावर त्याच इंजिन प्रज्वलित करून पुढील बदल केले गेले.
आता विक्रम ल्यांडर प्रदक्षिणा करता करता चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो घेऊन ते पृथ्वीवर इसरो च्या बंगळुरू इथल्या कमांड आणि ट्रॅकिंग सेंटर ला पाठवेल. हे फोटो बघुन विक्रम ल्यांडर कुठे उतरवायचे ह्याचा निर्णय इसरो चे वैज्ञानिक आणि अभियंते घेतील. हा निर्णय झाल्यावर ही माहिती बंगळुरू वरून पुन्हा एकदा विक्रम ल्यांडर च्या कॉम्प्युटर ला सांगितली जाईल. एकदा जागा निश्चिती चे कमांड आल्यावर विक्रम ल्यांडर वरील कॉम्प्युटर विक्रम ला चंद्राच्या जमिनीवर उतरवण्याची सगळी सुत्र आपल्या हातात घेइल. आपल्या कॅमेराने जमीन न्याहाळताना कमांड सेंटर कडुन आलेल्या माहितीशी जुळणारी जागा सापडल्यावर मग कॉम्प्युटर विक्रम ल्यांडर ची ५ इंजिन प्रज्वलित करेल. इंजिन प्रज्वलित झाल्यावर चंद्राच्या जमिनीच्या दिशेने विक्रम कूच करेल. जमिनीच्या जवळ आल्यावर एखाद्या हेलिकॉप्टर प्रमाणे किंवा चित्रपटात दाखवतात तसे विक्रम ल्यांडर चंद्राच्या पृष्ठभागापासून अगदी काही उंचीवर तरंगत राहील. ह्या काळात त्याचा कॉम्प्युटर ठरलेल्या जागेत उतरण्यासाठी लागणारे काही बदल करेल. जसं थोडं उजवीकडे, थोडं डावीकडे, थोडं पुढे तर थोडं मागे. हे सगळे सोपस्कार पूर्ण केल्यावर आणि कॉम्प्युटर ला सांगितलेल्या सर्व बाबी ठरल्याप्रमाणे पूर्ण झाल्यावर विक्रम ल्यांडर चंद्राच्या भुमीला अलगद स्पर्श करणार आहे.
एकदा का जागा विक्रम ल्यांडर च्या कॉम्प्युटर ला सांगितली की पुढची सगळी सुत्रे विक्रम ल्यांडर च्या कॉम्प्युटर च्या हातात असणार आहेत. तो जो काही निर्णय घेईल त्यावर इसरो च नियंत्रण नसणार आहे. त्यामुळे जवळपास पुर्ण मोहिमेचं सुकाणू आपल्या हातात असणारा असा कॉम्प्युटर निर्माण करणं, कॉम्प्युटर ला विक्रम ल्यांडर च्या चंद्रावरील स्थिती च्या माहिती देणाऱ्या यंत्रणा निर्माण करणं ज्यात लेझर सेन्सर, कॅमेरे ते इतर पोझिशन सिस्टीम समाविष्ट आहेत. तसेच कॉम्प्युटर कडुन दिले गेलेल्या आदेशाप्रमाणे इंजिन च कार्य, त्याचा प्रज्वलन काळ अश्या कित्येक छोट्या, मोठ्या बाबी नियंत्रित करणारी प्रणाली ह्या सगळ्याच गोष्टी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अतिशय किलष्ठ अश्या आहेत. विक्रम ल्यांडर वरील एक, दोन नाही तर पाच इंजिन एकाचवेळी प्रज्वलित होणार आहेत. त्या सर्वांचा इंधन पुरवठा, त्यांनी निर्माण केलेलं बल, विक्रम ल्यांडर चा उतरण्याचा वेग ह्या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधुन निर्णय घेण्याची पुर्ण जबाबदारी विक्रम ल्यांडर वर असलेल्या कॉम्प्युटर सिस्टीम ला असणार आहे. ह्या सर्व गोष्टींची निर्मिती, नियोजन करून त्या अवकाशात सुरळीत चालु ठेवणं हे खरचं रॉकेट सायन्स आहे.
वाचताना हे जितकं थरारक वाटते त्या पेक्षा कैक जास्ती पटीने हे सगळं नियोजन पद्धतीने पृथ्वीवरून घडवून आणणं हे इसरो च्या वैज्ञानिकांनपुढे आव्हान आहे. इसरो चे डायरेक्टर के.सिवान ह्यांनी जो १५ मिनिटांचा थरार म्हंटला होता तो हाच असणार आहे. आजवर लाईव्ह फोटो काढुन मग ते पृथ्वीवर पाठवून त्या नंतर जागा निश्चित करून त्यावर यान उतरवण्याचा प्रयत्न कोणत्याच राष्टाने अथवा स्पेस एजन्सी ने केलेला नाही. भारताची इसरो जगात पहिल्यांदा अश्या तर्हेच्या अतिशय कठीण तांत्रिक उलाढाली पृथ्वीपासून जवळपास ३.८ लाख किलोमीटर वर करणार आहे. त्यामुळेच चंद्रयान २ चंद्रावर यशस्वीपणे उतरण्याचा क्षण आणि ही घटना अवकाश तंत्रज्ञानातील एक मैलाचा दगड असणार आहे.
आत्तापर्यंत चंद्रयान २ चे सगळे टप्पे अगदी ज्याला 'कॉपी बुक स्टाईल' म्हणतात त्या पद्धतीने पुर्ण झाले आहेत. हे सगळे टप्पे सुरळीत पुर्ण करणे ही पण इसरो साठी अभिमानाची गोष्ट आहे. आता 'ऑल सेट फॉर बिग डे' ह्यात पण इसरो नक्की यशस्वी
होईल ह्याची मला तरी १००% खात्री आहे. इसरो च्या सर्व अभियंते, वैज्ञानिक आणि कर्मचारी सगळ्यांना ह्यासाठी खुप खुप शुभेच्छा.
माहिती स्रोत:- इसरो
फोटो स्रोत :- इसरो, गुगल
No comments:
Post a Comment