Sunday, 8 September 2019

एका वादळा नंतर... विनीत वर्तक ©

एका वादळा नंतर... विनीत वर्तक ©

परवा रात्री विक्रम ल्यांडर चंद्राच्या जमिनीवर उतरण्याचा थरार अनुभवल्या नंतर एक अनामिक शांतता सगळीकडे आहे. विक्रम ल्यांडर चा संपर्क तुटल्यामुळे सगळ्यांना जे दुःख झालं ते व्यक्त करणं शब्दानंपलीकडचं आहे. खुप दिवसांनी आपण सगळेच भारतीय म्हणुन एकत्र आलो होतो. सगळं सुरळीत असताना होत्याचं नव्हतं झालं. विक्रम ल्यांडर शी संपर्क तुटल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला असला तरी भारताने चंद्रयान २ मोहीम ९०%-९५% टक्के आधीच यशस्वी केली आहे. चंद्रयान २ चं ऑर्बिटर हे चंद्राच्या कक्षेत व्यवस्थित काम करत आहे. इसरो च्या अतिशय अचुक गणितामुळे तसेच जी.एस.एल.व्ही. मार्क ३ ने दिलेल्या अपेक्षेपेक्षा जास्ती कामगिरीमुळे ऑर्बिटर वर शिल्लक राहिलेले इंधन हे अपेक्षेपेक्षा खुप जास्ती प्रमाणात असुन त्यामुळे ऑर्बिटर चा कार्यकाल हा एक वर्षावरुन तब्बल ७.५ वर्षापर्यंत वाढला आहे. इंधन शिल्लक राहिल्यामुळे आपली कक्षा राखण्यासाठी ऑर्बिटर ला अधिक इंधन आता मिळणार आहे. इसरो च्या मंगळ मोहिमेत ही इंधन वाचल्यामुळे त्याचा कार्यकाळ वाढला होता. आजही मॉम इसरो च्या संपर्कात असुन मंगळा भोवती परीक्रमा करत आहे.

चंद्राच्या जमिनीवर उतरताना संपर्क तुटल्यामुळे हरवलेल्या विक्रम ल्यांडर चा चंद्रावर शोध घेण्यासाठी ही ह्याच ऑर्बिटर ची मदत घेण्यात आली. ऑर्बिटर ने आपला विश्वास सार्थ ठरवताना अवघ्या काही तासात विक्रम ल्यांडर चा शोध घेतलेला आहे. ह्या ऑर्बिटर वर सगळ्यात जास्त वैज्ञानिक उपकरणे बसवलेली आहेत. ह्यातील हाय रिझोल्युशन कॅमेरा ने विक्रम ला जवळपास आपल्या उतरण्याच्या जागेपासुन अर्धा किलोमीटर दुरवर बघितलेलं आहे. विक्रम ल्यांडर जरी दृष्टीक्षेपात आलं तरी त्याची स्थिती कशी आहे हे अजुन समजलेलं नाही. विक्रम ल्यांडर चं सॉफ्ट ल्यांडींग न होता हार्ड ल्यांडींग झालं असावं असा निष्कर्ष हळुहळु पुढे येतो आहे. पण ह्यावर अजुन निश्चिती झालेली नाही. जर असं झालं असेल तर ह्यावर असणारी यंत्रणेला धक्का लागुन ती खराब होण्याचा धोका सगळ्यात जास्ती आहे. त्यामुळे विक्रम ल्यांडर शी संपर्क होण्याची शक्यता कमी आहे. (विनीत वर्तक ©)

जरी विक्रम ल्यांडर उतरलं असेल तरी त्याच्या सौर प्यानेल ची बाजु कशी असेल ह्यावर पण बरेच काही अवलंबुन असणार आहे. कारण जर सौर प्यानेल विरुद्ध दिशेला असतील तर सुर्याची किरणे त्यावर न पडल्याने विक्रम ल्यांडर ची ब्याटरी चार्ज होणं अशक्य आहे. ब्याटरी जर चालली नाही तर संपर्क होण्याची शक्यता तितकीच कमी असणार आहे. जस जसे तास जात आहेत तसे विक्रम ल्यांडर वरील ब्याटरी जर चालु असेल तर ती झपाट्याने संपत जाणार आहे. त्यामुळेच जितका उशीर होईल तितकी संपर्क होण्याची शक्यता कमी आहे. विक्रम ल्यांडर शी जरी संपर्क झाला नाही तरी ऑर्बिटर वर असलेली उपकरणं काहीतरी महत्वाचा शोध लावतील असा विश्वास इसरो ला आहे. ह्यावर असलेला कॅमेरा ३० सेंटीमिटर पर्यंत झुम करण्यास सक्षम आहे. तर ह्यावर असलेलं सार हे उपकरण जमिनीच्या खाली १० मिटर पर्यंत बघण्यास सक्षम आहे. ह्या शिवाय टी.एम.सी., क्लास, चेस २ सारखी उपकरणं चंद्राची अनेक रहस्यांची उकल करण्यास सक्षम आहेत. (विनीत वर्तक ©)

विज्ञानाच्या तराजूत काही अडचणी ह्या गृहीत धरलेल्या असतात. मानवाच्या अंतराळ इतिहासातील चंद्र मोहिमेतील सगळ्यात यशस्वी 'अपोलो' मिशन मध्ये ५ वेळा तांत्रिक अडचणीमुळे अपयशाला सामोर जावं लागलेलं आहे. त्यात ३ अंतराळ विरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अपोलो १३ मिशन मध्ये तर चंद्रावरून रिकाम्या हाताने परत येऊन आपल्या अवकाश विरांना वाचवण्यासाठी नासा ला प्रयत्न करावे लागले होते. नासा च्या स्पेस शटल मिशन मध्ये तब्बल १४ अवकाशविरानां आपले प्राण गमवावे लागले आहेत. ज्यात भारताची अंतराळवीर कल्पना चावला चा ही समावेश आहे. ह्यामध्ये पैश्याच किती नुकसान झालं ह्याची मोजदाद केली तर आपले डोळे पांढरे होतील. पण हे सगळं गमवून पण अमेरिकेने जे कमावलं त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. हा इतिहास आहे. सगळ्याच गोष्टी पैश्यात मोजता येत नाही.

काल विक्रम ल्यांडर चं अपयश बघितल्यावर अनेकांनी १००० कोटी रुपये तिकडे टाकण्यापेक्षा रस्ते सुधारायला हवे होते, गरिबी हटाव वगरे अश्या योजनांवर खर्च करायला हवे वगरे अश्या चर्चा सुरु केल्या. पण विज्ञान, तंत्रज्ञान प्रगती आणि सामाजिक प्रगती ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. एकाला सोडून दुसऱ्याचा उत्कर्ष कधीच होतं नसतो. अमेरिकेचा, तिथल्या समाजाचा उत्कर्ष झाला तो तांत्रिक आणि विज्ञानातील प्रगतीमुळेच. आज हेच लोकं अमेरिकेतील विकासाची गाजर भारतात दाखवताना हे सोईस्कररित्या विसरतात की आज त्यांचा उत्कर्ष त्यांच्या विज्ञानातील प्रगतीमुळे झाला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान मधील प्रगती भारताला विकासाच्या वाटेवर पुढे नेणार आहे. काही गोष्टींचे दुरगामी परिणाम होतात आणि असतात. आज आपण चंद्रावर जाऊन राहत नसलो तरी पुढे तोच आपल्या ऊर्जेचा स्रोत बनणार आहे. त्यासाठी अश्या मोहिमांची गरज आहे. (विनीत वर्तक ©)

वादळ गेल्यावर एक शांतता पसरते पण त्याचवेळी आपण त्या उध्वस्थ झालेल्या गोष्टींना पुन्हा उभारायचं असते. ते उभारताना परत जर ते वादळ आलं तर त्यात उभं राहण्याची ताकद त्यात निर्माण करायची असते. माझ्यामते इसरो सुद्धा ह्या वादळात उभी राहील त्यांना मिळालेला १३० कोटी भारतीयांचा पाठिंबा अशी अनेक वादळे पेलण्यास सक्षम करेल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तूर्तास विक्रम ल्यांडर शी संपर्क होण्यासाठी आणि चंद्रयान २ मिशन च्या पुढल्या प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment