Friday, 6 September 2019

ये दिल मांगे मोअर... विनीत वर्तक ©

ये दिल मांगे मोअर... विनीत वर्तक ©

'There's no failure in science, there are only experiments'- PM Narendra Modi.

कालची रात्र भारतीयांनी आणि पुर्ण जगाने न झोपता घालवली. कित्येक दिवसानंतर प्रत्येक भारतीय एका गोष्टीसाठी आप-आपसातील भेदभाव, जातपात, धर्म, पंथ सगळं विसरून टी.व्ही., इंटरनेट आणि मिडिया समोर बसला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात आतुरता होती, स्वप्न होतं आणि एक धाकधूक होती की कधी एकदा विक्रम ल्यांडर चंद्राच्या जमिनीवर पाऊल ठेवते. भारतीय मिडिया कधी नव्हे तो बाकीच्या बातम्या सोडुन इसरो च्या बंगळुरू इथल्या ऑफिस मधुन लाईव्ह प्रक्षेपण करत होता. गेली ११ वर्ष केलेल्या मेहनती वर काल निकाल येणार होता. इसरो च्या कंट्रोल रूम मधील शांत पण त्याचवेळी अतिशय संयमी असणाऱ्या चेहऱ्यानंवरून त्यांच्या मनात असलेली धाकधुक स्पष्ट दिसुन येतं होती. कुठेतरी पुर्ण भारत आणि जग आपल्याला आत्ता बघते आहे ह्याच दडपण ही नक्कीच होतं. आपण केलेल्या कामावर त्यांना विश्वास होता पण परिस्थिती त्यांच्या हातात नव्हती. इसरो चे चिफ के.सिवान जेव्हा आधी म्हणाले होते, "ही १५ मिनिटे सगळ्यात थराराची असतील". काल प्रत्येक भारतीयांने ती १५ मिनिटे थराराची अनुभवली. सगळं काही सुरळीत चालु असताना अचानक काळजाचा ठोका चुकला आणी काहीतरी हातातुन निसटल्याची जाणीव तिथे असलेल्या प्रत्येक वैज्ञानिक आणि संशोधकाला झाली.

रात्री ठरल्या प्रमाणे विक्रम ल्यांडर ने आपला प्रवास चंद्राच्या दिशेने सुरु केला. साधारण ३० किलोमीटर उंचीवरून खाली येताना त्याला आपली फिरण्याची गती ६००० किमी / तास ह्या वेगावरून साधारण १५० मिटर/ सेकंद आणि मग पूर्ण थांबवायची होती. ह्यासाठी विक्रम ल्यांडर वरील सर्व ५ इंजिने ठरलेल्या वेळी प्रज्वलित झाली. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की ह्या सगळ्या घटना क्रमावर इसरो चं नियंत्रण नव्हतं. विक्रम ल्यांडर वरील कॉम्प्युटर हे सगळं करत होता. त्यामुळे त्याने दिलेले कमांडवर योग्य रीतीने विक्रम काम करत आहे का नाही हे आकडे बघणं इतकी गोष्ट जमिनीवर असलेल्या इसरो च्या वैज्ञानिकांच्या हातात होती. ठरल्या प्रमाणे ५ इंजिनांनी आपलं काम करायला सुरवात केली आणि विक्रम ची गती कमी होतं असल्याचं बघुन सगळ्याच वैज्ञानिकांनी थोड्यावेळ का होईना सुटकेचा निश्वास सोडला. पण अजुन क्लायम्याक्स बाकी होता. विक्रम च्या कडुन येणाऱ्या आकड्यांचा ठिपका आधी ठरलेल्या रस्त्याला तंतोतंत कॉपी करत होता.

जवळपास १० मिनिटे विक्रम वरील सर्व इंजिन प्रज्वलित केल्यावर विक्रम ल्यांडर वरील कॉम्प्युटर ने त्यावरील ४ इंजिन बंद करण्याचा आदेश दिला. हे आधी ठरलेलं होतं. विक्रम ल्यांडर चंद्राच्या जमिनीजवळ आल्यावर तिथली धुळ ही निगेटिव्ह पार्टीकल ने चार्ज असते. ती उडुन विक्रम चे सेन्सर तसेच सौर प्यानेल खराब होऊ शकतात हे जाणुन धुळ कमी उडावी म्हणुन ४ इंजिन बंद करण्याचा प्रोग्राम आधीच विक्रम ल्यांडर च्या डोक्यात होता. ह्या वेळेस विक्रम ल्यांडर चंद्राच्या जमीनीपासुन काही किलोमीटर उंचीवर होतं. ह्याच दरम्यान २.१ किलोमीटर उंचीवर विक्रम ल्यांडर चा ऑर्बिटर आणि पृथ्वीशी संपर्क तुटला. नक्की काय घडलं हे कळायच्या आगोदर आपण काहीतरी गमावलं असा विचार तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात त्यावेळी आला. कारण प्रत्येक सेकंद महत्वाचा होता. एक चुक आणी पूर्ण एका तपाची मेहनत आपण गमावून बसु हे सगळ्यांना पक्के ठाऊक होतं. इसरो च्या चिफ नि व्यक्त केलेला १५ मिनिटाचा काळ हा खरोखर टेरर होता हे त्या क्षणी माझ्यासारख्या सामान्य माणसाला ही काल कळुन चुकलं

नक्की काय झालं? काय चुकलं? ह्याच उत्तर अजून इसरो कडे ही नाही. पण काल ही घटना प्रत्यक्ष बघत असताना जर निट लक्ष दिलं तर त्या ग्राफ मधील ठिपका खूप काही सांगु शकतो. ज्या वेळेस ४ इंजिन बंद करण्याचा कमांड दिला गेला त्याचवेळेस तो ठिपका आपला ठरलेला रस्ता सोडुन थोडं खालच्या दिशेने सरकला. नंतर पुन्हा अगदी एका सेकंदासाठी पुन्हा त्या लाईन वर येताना दिसला आणि नंतर एकदम खाली येऊन २.१ किलोमीटर वर विक्रम चा संपर्क तुटला. जर आपण निट आकलन केलं तर जेव्हा ही ४ इंजिन बंद करण्याचा कमांड दिला तेव्हा यानाचा वेग अपेक्षित पेक्षा थोडा जास्ती होता. पण तो कंट्रोल मध्ये होता. पण त्याच क्षणी त्याची उंची मात्र अचानक कमी झाली होती. ह्याचा अर्थ विक्रम च एक इंजिन एकतर अपेक्षित बल निर्माण करत नव्हतं किंवा चंद्राच गुरुत्वाकर्षण विक्रम च्या वेगामुळे जास्ती काम करत होतं. दोन्हीमुळे विक्रम ची उंची कमी राहिली असावी. पण त्याचवेळी विक्रम च्या ल्यांडर ने कदाचित ही उंची ठरल्या प्रमाणे राखण्यासाठी अजुन एखादं इंजिन सुरु केलं असावं म्हणुन तो ठिपका पुन्हा एकदा त्या लाईनवर आला अगदी काही सेकंद. पण तोवर काही सेकंदाचा वेळ गेला आणि कदाचित विक्रम आपल्या ठरलेल्या रस्त्यावरून भटकल. अर्थात ह्याचा अर्थ ते चंद्राच्या जमिनीवर आदळलं असा होतं नाही. कारण आपला संपर्क तुटल्याने पुढे काय झालं? ह्याचा शोध अजुन इसरो घेते आहे.

विक्रम चा कॉम्प्युटर अश्या सर्व गोष्टींना हाताळण्यासाठी बनवला गेला होता. अश्या काही गुंतागुंतीच्या गोष्टी निर्माण झाल्यावर पृथ्वीवरून कमांड ची वाट न बघता निर्णय घेण्याची क्षमता त्याला ह्यासाठीच देण्यात आली होती. त्यामुळे संपर्क तुटला तरी विक्रम ल्यांडर ला एकहाती चंद्राच्या जमिनीवर उतरवण्याची त्याची क्षमता होती. ह्या क्षमतेमुळेच विक्रम ल्यांडर चंद्राच्या जमिनीवर आदळलं असं इसरो ने म्हंटलेलं नाही. कदाचित विक्रम ल्यांडर ने त्याला चंद्रावर उतरवलं ही असेल. रोव्हर प्रग्यान आता चंद्राच्या जमिनीवर विहार ही करायला लागलं असेल कारण ह्या सगळ्या प्रक्रिया पुर्ण करण्यास विक्रम वरील कॉम्प्युटर पूर्णतः सक्षम बनवला गेला होता. पण प्रग्यान रोव्हर वर पृथ्वीशी संपर्क करण्याची यंत्रणा नाही. ते विक्रम ल्यांडर च्या माध्यमातुन पृथ्वीशी संपर्क करणार होतं. ह्या सगळ्यामुळे जोवर विक्रम रोव्हर चा ठावठिकाणा लागत नाही तोवर नक्की काय घडलं ह्या बद्दल इसरो ही उत्तर देऊ शकणार नाही.

आता इसरो सगळ्या घटना पुन्हा एकदा तपासुन नक्की काय घडलं तसेच आपल्या ऑर्बिटर च्या माध्यमातुन इतर देशांच्या माध्यमातुन विक्रम चा शोध घेतल्यावर नक्की काय घडलं हे सांगु शकेल. काल शेवटच्या क्षणापर्यंत अगदी व्यवस्थित असलेल्या संपर्क यंत्रणेने अश्या मोक्याच्या क्षणी दगा देणं इसरो च्या वैज्ञानिकांच्या मनात शंकेची पाल नक्कीच उत्पन्न केली आहे. कारण अचानक ठिपक्याने आपला रास्ता सोडुन सरळ खाली येणं व त्या नंतर संपर्क तुटणं हे नक्कीच आशादायी चित्र नव्हतं. पण काही झालं तरी आपण इथवर पोहचलो हे काही कमी नाही.

मला इकडे नक्कीच भारताच्या पंतप्रधानांचा आदर वाटतो ज्या पद्धतीने काल त्यांनी वैज्ञानिकांच्या पाठीवर थोपटलं तो आधार आणि आश्वासक हात त्या १३० कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करतं होता. त्यात एक जाबदारीची जाणीव होती. अपयशाच्या ह्या क्षणी हे सगळे १३० कोटी भारतीय तुमच्या पाठीशी आहेत हा विश्वास त्यांनी त्या क्षणी सगळ्या वैज्ञानिकांना आणि स्पेशली इसरो चे अध्यक्ष के. सिवान ह्यांना दिला. आज सकाळी पुर्ण देशाला उद्देशुन केलेलं भाषण म्हणजे त्यांच्या आवडत्या भाषणापैकी सर्वोत्तम आहे. आज कोणतही राजकारण नाही, अपयशाचा लवलेश नाही तर ह्या गोष्टी विज्ञानाच्या तराजूत अपेक्षित असतात असं सांगताना येणारा काळात आपण पुन्हा उभे राहु हा विश्वास त्यांनी सगळ्याच वैज्ञानिकांना दिला त्यासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन कारण जेव्हा देशाचा पंतप्रधान समोर उभं राहुन असं सांगतो ती गोष्ट मनाला खूप उभारी देणारी असते.

गेली ११ वर्ष इसरो मधील प्रत्येकाने ह्या मोहिमेवर खुप मेहनत घेतली होती. त्यामुळेच जेव्हा पंतप्रधान इसरो मधुन बाहेर पडत होते तेव्हा इसरो चे अध्यक्ष के. सिवान ह्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत संपूर्ण इसरो च्या भावना त्यांच्या त्या अश्रुत दिसतं होत्या. इसरो मधील वैज्ञानिक, संशोधक पैश्यासाठी नाही तर देशासाठी काम करतात आणि म्हणून एक अपयश सुद्धा किती खोलवर टोचते ह्याचा प्रत्यय ह्या वेळी पूर्ण देशाला दिसला असेल. आज प्रत्येक भारतीय ह्या मोहिमेने एक झाला. एक भारतीय म्हणुन प्रत्येकाने कालचा प्रत्येक क्षण अनुभवला. अपयशाच्या क्षणी जेव्हा ह्याच १३० कोटी भारतीयांच प्रतिनिधित्व करणाऱ्या पंतप्रधानांनी त्यांना आपल्या कवेत घेऊन सांत्वन केलेला क्षण हा प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात पाणी आणणारा पण त्याचवेळी वैज्ञानिकांना एक आत्मविश्वास देणारा असा कायम लक्षात राहील. कदाचित आपल्या कवेत घेऊन त्यांनी इसरो चिफ के.सिवान ह्यांना म्हंटल असेल, 'अजुन सर्वोत्तम यायचं आहे.... 'ये दिल मांगे मोअर'.

फोटो स्रोत :- गुगल


सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment