Thursday 19 September 2019

विक्रम ची १५ मिनिटे आणि मॉम ची ५ वर्ष... विनीत वर्तक ©

विक्रम ची १५ मिनिटे आणि मॉम ची ५ वर्ष... विनीत वर्तक ©

सप्टेंबर २०१९ चा हा महिना इसरो च्या इतिहासात एक अतिशय महत्वाचा ठरलेला आहे. ह्याच महिन्यात इसरो एका डोळ्यात हसु तर एका डोळ्यात आसु अश्या दोन्ही अवस्था अनुभवते आहे. एकीकडे २४ सप्टेंबर २०१४ ला मंगळाच्या कक्षेत दाखल झालेलं भारताचं मॉम (मार्स ऑर्बिटर मिशन) आपली ५ वर्ष पुर्ण करत आहे. तर त्याचवेळी चंद्रयान २ च्या मोहिमेत आलेल्या १५ मिनिटांच्या थराराने विक्रम ल्यांडर शी इसरो चा संपर्क तुटलेला आहे. ह्या दोन्ही घटना तश्या यशाच्या आणि त्याच वेळी अपयशाचा असल्या तरी त्यातुन भारत मात्र अवकाश तंत्रज्ञानात खुप पुढे तर गेलाच आहे पण त्यापेक्षा जागतिक पटलावर भारताची नोंद घेतली गेली आहे. भारतासारख्या विकसनशील, गरीब आणि आपल्याच समस्यांत गुंतलेल्या राष्ट्राकडून अवकाश संशोधनात भरीव कामगिरीची अपेक्षा न जगातील वैज्ञानिक करत होते न खुद्द भारतीय.

चंद्रयान २ मधील विक्रम ल्यांडर ला सॉफ्ट ल्यांडींग करण्यात इसरो ला अपयश नक्कीच आलं. अपयशाच्या मागे नक्की काय चुकलं ह्याचा अभ्यास इसरो ने नक्कीच आत्तापर्यंत पुर्ण केला असेल. येत्या काही दिवसात त्यावर अधिकृत घोषणा होईलच. पण तरीही आपण सगळंच गमावलेलं नाही किंवा हे अपयश एक यशाची पायरी आहे. कारण इसरो च्या पुर्ण इतिहासात अश्या पद्धतीची मोहीम पहिल्यांदा हाती घेण्यात आली होती. आपल्या पहिल्याच मोहिमेत इसरो ने ९०%-९५% निर्भेळ यश मिळवलं हेच खूप काही आहे. तरीही सॉफ्ट ल्यांडींग सारखं तंत्रज्ञानात आपण अजून एक पाऊल मागे राहिलो आहोत हे ही मान्य करावचं लागेल. विक्रम ल्यांडर ला वेग कमी करताना त्याच्या इंजिनांचा रोख चंद्राच्या दिशेने असायला हवा होता पण शेवटच्या काही क्षणात विक्रम ल्यांडर ला आपली दिशा राखता न आल्याने त्याचा वेग कमी होण्या ऐवजी त्याचा वेग वाढला. त्यानंतर विक्रम शी संपर्क तुटल्याने विक्रम ने चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड ल्यांडींग केलं ह्या सगळ्यात त्या वरचे ट्रान्सपॉन्डर खराब झाल्याने विक्रम ल्यांडर चा संपर्क ऑर्बिटर आणि इसरो शी तुटला असावा असा कयास वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. नक्की काय झालं हे इसरो येत्या काही दिवसात स्पष्ट करेल पण विक्रम शी संपर्क होण्याच्या सगळ्या शक्यता जवळपास आता मावळल्या आहेत हे नक्की. (विनीत वर्तक ©)

विक्रम ल्यांडर जरी अपयशी ठरलं असलं तरी ऑर्बिटर ची तब्येत अगदी व्यवस्थित असुन पुढील ७.५ वर्ष ते चंद्राच्या भोवती परिक्रमा करत राहणार आहे. ह्यावरील उपकरण ह्या सगळ्या काळात चंद्राचा अभ्यास करणार आहेत. चंद्रयान २ मोहिमेत विक्रम ल्यांडर ला अपयश आलं असलं तरी ह्या प्रवासात इसरो ने तंत्रज्ञानातील अनेक गोष्टी सर केल्या आहेत. जी.एस.एल.व्ही. मार्क ३- एम १ ह्या रॉकेट मध्ये आलेली तांत्रिक अडचण इसरो च्या सेन्सर सिस्टीम ने अचुक ओळखली व योग्य वेळेत वैज्ञानिकांना त्याची कल्पना दिली. समजा ही अडचण लक्षात आली नसती तर चंद्रयान २ पृथ्वीच्या वातावरणात धुळीला मिळालं असतं. रॉकेट तंत्रज्ञान एक अतिशय किचकट असं तंत्रज्ञान आहे. एकतर अश्या तंत्रज्ञानाची निर्मिती करणं आणि त्यातही त्याला अभियांत्रिकी भाषेत म्हणतात तसं , 'फुल प्रुफ किंवा क्लोज लुप सिस्टीम' चा भाग बनवणं हे त्याहुन कठीण आहे. इसरो च्या बाहुबली रॉकेट च्या इंजिनांनी अपेक्षेपेक्षा जास्त दमदार कामगिरी करत चंद्रयान २ ला ६००० किमीचा जास्त पल्ला गाठुन दिला होता. ह्यामुळेच आज ऑर्बिटर चं आयुष्य एका वर्षावरुन ७.५ वर्ष इतकं वाढलेलं आहे. ह्या शिवाय ऑर्बिटर च्या इंजिनांनी योग्य प्रमाणात दिलेला प्रतिसाद, उशिरा प्रक्षेपित होऊन सुद्धा ठरलेल्या दिवशी चंद्राच्या कक्षेत पोहचण्याच गणित तसच ह्या सगळ्या कक्षा अगदी पुस्तकाप्रमाणे प्रत्यक्षात गाठणं तसेच विक्रम ल्यांडर आणि ऑर्बिटर च विलग होणं ह्या सगळ्या घटना इसरो च्या तांत्रिक प्रगतीची साक्ष देतं आहेत. (विनीत वर्तक ©)

२४ सप्टेंबर २०१४ चा तो ऐतिहासिक दिवस कोण विसरू शकेल? एका अशक्यप्राय वाटणाऱ्या शिखराला इसरो ने गवसणी घातली होती. जगातील सगळ्यात स्वस्त इंटर प्लॅनेटरि मिशन, पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत दाखल होणारा जगातील पहिला देश, मंगळाच्या कक्षेत आपलं यां पाठवणारा पहिला आशियायी देश अश्या एक ना अनेक विक्रमांची नोंद ह्या दिवशी झाली. भारताचा उदय ह्या मोहिमेमुळे अवकाशाच्या क्षितिजावर झाला जिकडे फक्त ३-४ देशांची मक्तेदारी आजवर राहिलेली होती. अवघ्या ६ महिन्यांचं आयुष्य घेऊन मंगळाच्या कक्षेत स्थापन झालेलं मॉम आज तब्बल ५ वर्ष झाली तरी मंगळाच्या कक्षेत परिक्रमा करत आहे. येत्या २४ सप्टेंबर ला मॉम आपला पाचवा वाढदिवस मंगळावर साजरा करेल तेव्हा पुर्ण जग भारताच्या ह्या कामगिरीला पुन्हा एकदा कुर्निसात करेल. ह्या ५ वर्षाच्या काळात मॉम ने मंगळाची १००० पेक्षा जास्त छायाचित्र इसरो कडे पाठवलेली असुन ह्यातील प्रत्येक छायाचित्र आवाज आपल्याशी बोलत आहे. मंगळावरील अनेक छोट्या, मोठ्या गोष्टी मॉम ने टिपल्या असुन जे आजवर कोणत्या देशाला जमलं नाही त्या पद्धतीने मॉम ने मंगळाची छायाचित्र घेतलेली आहेत. मॉम ची कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने अगदी जवळुन ते अगदी लांबुन ज्याला फुल डिस्क फोटो म्हणतात अश्या पद्धतीची छायाचित्र मॉम ने मंगळाची घेतलेली आहेत. मॉमवर असलेलं इंधन हे अजून १०-१२ वर्ष मॉम ला त्याच्या कक्षेत ठेवण्यास सक्षम असुन तोवर जर ह्यावरील उपकरणे काम करत राहिली तर मॉमकडून येणारा खजिना किती प्रचंड असेल ह्याचा अंदाज प्रत्येकजण लावु शकतो.

चंद्रयान २ मोहिमेत इसरो ने चंद्राचा गड जिंकला तरी विक्रम चा सिंह गमावला तर मंगळयान मोहिमेत तर मंगळाचे ही तख्त राखतो भारत माझा असं म्हंटलयास वावगं ठरणार नाही. यश- अपयश नाण्याचा दोन बाजु आहेत. भारताचे पंतप्रधान म्हणाले तसे,

"There's no failure in science, there are only experiments."

येत्या काळात इसरो पुन्हा एकदा भरारी घेईल आणि त्यावेळेस अश्याच एखाद्या सप्टेंबर महिन्यात पुर्ण भारत देश चंद्रावर सॉफ्ट ल्यांडींग चं यश साजरे करत असेल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही. विक्रम ची १५ मिनिटे आणि मॉम ची ५ वर्ष इसरो ला नक्कीच खुप काही शिकवून तर गेलीच आहेत पण त्याही पेक्षा असंख्य भारतीयांच्या मनात अवकाशाची नवी कवाड उघडून गेली आहेत.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment: