Tuesday 30 July 2019

साधा असलेला मोठा माणूस... विनीत वर्तक ©

साधा असलेला मोठा माणूस... विनीत वर्तक ©

१५ जुलै २०१९ ला चंद्रयान २ च्या उड्डाणाची उलट गिणती सुरु असताना अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे  निर्णय घेण्याची पाळी इसरो डायरेक्टर के. सिवन ह्यांच्या खांद्यावर आली. देशाचे राष्ट्रपती हे उड्डाण बघण्यासाठी आपल्या कुटुंबासह श्रीहरीकोट्टा मध्ये उपस्थित होते. त्यामुळे अश्या कठीण परिस्थितीत उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेणं हे भावनांच्या दृष्टीने कच खाण्यासारखं होतं पण त्याचवेळेस उड्डाणाचे घड्याळ सुरु ठेवणं तंत्रज्ञानाच्या दृष्टीतून योग्य नव्हतं. जागतिक मिडिया, भारतीय मिडिया, पंतप्रधान, राष्ट्रपती हे सगळेच जातीने पूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे मनाचा कौल घ्यायचा की तंत्रज्ञानाचा असा मोठा प्रश्न के. सिवन  ह्यांच्यापुढे होता. कारण दोन्ही बाजूने येणाऱ्या परिणामांची जबाबदारी पूर्णतः त्यांच्या अंगावर होती. इसरो च्या अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेताच पहिल्याच मोहिमेत दोन दशकानंतर (२४ वर्षांनी ) इसरो ला हिट शिल्ड विलग न झाल्याने पी.एस.एल.व्ही च्या अपयशाला सामोरं जावं लागलं होतं.  ह्या अपयशाची पूर्ण जबाबदारी के. सिवन  ह्यांनी स्वीकारली होती. कुठेतरी मनावर दगड ठेवून इसरो डायरेक्टर के.सिवन ह्यांनी उड्डाण रद्द केल्याचं घोषित केलं. राष्ट्रपतींना ह्या गोष्टीची कल्पना देताना आलेल्या दडपणाची,अपयशाची टोचणी कुठेतरी त्यांच्या मनात सलत होती.

मनापेक्षा तंत्रज्ञान महत्वाचं होतं. जोवर १००% खात्री होतं नाही तोवर १००० कोटी रुपयांची मोहीम पुढे नेणं परवडणार नव्हतं. उड्डाण तर रद्द झालं पण आता संकटांचा डोंगर पुढे उभा होता. पूर्ण रात्रभर के.सिवन ह्यांच्यासह इसरो चे सर्व वैज्ञानिक,संशोधक नक्की काय चुकलं ह्याची उजळणी करत होते. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती सकाळची न्याहरी आटपून पुन्हा दिल्ली कडे निघण्याअगोदर इसरो ने नक्की काय चुकलं ह्याचा शोध घेतला होता. तर पुढल्या ४८ तासात ती चूक सुधारून रॉकेट पुन्हा उड्डाणासाठी सज्ज झालं होतं. इतक्या कमी वेळात रॉकेट तंत्रज्ञाना सारख्या किचकट तंत्रज्ञानात चूक शोधून त्यावर योग्य तो उपाय केला गेला ह्यासाठी खुद्द पंतप्रधानांनी इसरो चं कौतुक केलं. २३ जुलै ला उड्डाण करून अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी उड्डाण साध्य करणाऱ्या इसरो वर आनंदाचा वर्षाव झाला. ह्या सगळ्या प्रसंगात अपयशाची जबाबदारी स्वतःवर तर यशाचं श्रेय सर्वाना देणार नावं म्हणजेच इसरो डायरेक्टर के.सिवन.

इसरो चा 'रॉकेट म्यान' ते 'फ्रुगल इंजिनिअरिंग चॅम्पियन' म्हणून ज्यांना गौरवलं जाते त्या के.सिवन ह्यांचा प्रवास सगळ्यांसाठी आदर्शवत असाच आहे. अतिशय सध्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या के.सिवन ह्यांचं शिक्षण सरकारी शाळेत झालं. कोणत्याही क्लास आणि कोणाच्याही मार्गदर्शना शिवाय त्यांनी घरात वीज नसताना दिव्याखाली अभ्यास केला. आपल्या पूर्ण घरात पदवीपर्यंत शिक्षण घेणारे के.सिवन पहिलेच होते. शेतीच्या कामात मदत व्हावी म्हणून त्यांच्या वडिलांनी घराजवळच्या कॉलेजमध्ये त्यांचा प्रवेश घेतला होता. १९८२ साली त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर इसरो मध्ये प्रवेश केला. त्यांची नियुक्ती पी.एस.एल.व्ही.रॉकेट च्या प्रोजेक्त मध्ये झाली होती. ह्या रॉकेट च्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. आज हेच रॉकेट जगातील सगळ्यात यशस्वी  रॉकेट आणि इसरो चा वर्कहॉर्स म्हणून ओळखलं जाते. एकाच रॉकेट मधून १०४ उपग्रह नेण्याच्या जागतिक विक्रमात हे सगळे उपग्रह रॉकेट मध्ये बसवण्याची यंत्रणा आणि एकमेकांना टक्कर न देता अवकाशात विलग करण्याची यंत्रणा ही के.सिवन ह्यांनी बनवलेली होती. ह्याच साठी त्यांना इसरो मध्ये 'रॉकेट म्यान' ते 'फ्रुगल इंजिनिअरिंग चॅम्पियन' म्हणून ओळखलं जाते.

जगाच्या पटलावर इसरो चा दबदबा वाढवण्यात कारणीभूत असलेल्या भारताच्या मॉम मिशन मध्ये ही त्यांचा सहभाग लक्षणीय होता. इसरो च्या सगळ्याच रॉकेट तंत्रज्ञानावर त्यांनी काम केलं आहे. क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान नाकारल्यावर आणि २०१० साली इसरो ला आलेल्या अपयशानंतर इसरो च्या 'नॉटी बॉय" म्हणजेच जी.एस.एल.व्ही. रॉकेट ला आज भारताचं 'बाहुबली' रॉकेट बनवण्यामागे के.सिवन ह्यांची भूमिका मोठी पण त्याचवेळेस पडद्यामागची राहिली आहे. जिद्द, मेहनत आणि स्वतःवर असलेला विश्वास अडचणीच्या काळात पण टिकवून ठेवताना आपल्या कर्तृत्वाची छाप त्यांनी इसरो च्या प्रवासात सोडलेली आहे. त्यामुळेच एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा ते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष हा सर्वच प्रवास थक्क करणारा आहे. २३ जुलै ला चंद्रयान २ ने यशस्वी उड्डाण केल्यावर रात्रंदिवस काम करून हे उड्डाण यशस्वी करणाऱ्या सर्वांचेच आभार मानताना आत्ता सुरवात झालेली आहे अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे नमूद केलं. जेव्हा चंद्रावर ल्यांडर उतरेल आणि रोव्हर च्या चाकांवर असलेली अक्षर चंद्राच्या मातीत उमटतील तेव्हा के.सिवन  ह्यांच्या शिरपेचात एक मनाचा तुरा खोवलेला असेल. साधं राहून असाधारण काम करणाऱ्या के.सिवन ह्यांच्या मुळेच आज भारताचं आणि इसरो चं नाव जागतिक पटलावर आदराने घेतलं जाते. त्यांच्या ह्या कार्यास माझा सलाम.   

माहिती स्रोत :- गुगल, इसरो

फोटो स्रोत :- गुगल, इसरो

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Saturday 27 July 2019

पैश्यापलीकडचं जगणं ... विनीत वर्तक ©

पैश्यापलीकडचं जगणं ... विनीत वर्तक ©

लोकांच्या घरी काम करतं त्याचवेळी भाजीपाला विकून शेती करणाऱ्या एका गरीब कुटुंबात तो जन्माला आला. वडील एका ऑइल ट्यांकर वर कामाला. घरात साधी वीज नाही. त्याची सकाळ व्हायची तीचमुळी बाजारात. आपल्या आई सोबत भाजीपाला विकण्यासाठी त्याला सोबत करावी लागत होती. त्यानंतर शेतात काम करावं लागत होतं. वयाच्या १७ व्या वर्षी घराला आधार द्यायला शाळा सोडावी लागली. मिळेल ते काम करायला सुरवात त्याने केली. अगदी पोस्टमन पासून ते गाडीचा ड्रायव्हर पर्यंत. कुठेतरी आतलं मन त्याला शांत बसून देतं नव्हतं.

काम करता करता एक दिवस एका वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीने त्याच लक्ष वेधून घेतलं. एका स्टुडिओ साठी कलाकार हवा होता. त्याने त्यासाठी अर्ज दिला. हाच दिवस त्याच्या आयुष्यातील एक वेगळं वळण घेणारा ठरला. तीन वर्षाच्या करारा नुसार त्याने काम सुरु केलं आणि बघता बघता तो पूर्ण देशाचा लाडका कलाकार ठरला. एका मागोमाग एक यशाच्या पायऱ्या तो चढत गेला. चित्रपटांची रांग त्याच्या मागे लागली. अगदी सातासमुद्रापार त्याच्या अदाकारीने प्रेक्षक त्याला डोक्यावर घेऊ लागले. चित्रपटातील मापदंड मानल्या गेलेल्या ऑस्कर पर्यंत त्याच्या चित्रपटांनी धडक दिली. पैसा, समृद्धी, सुख सगळंच त्याच्या पायाशी लोळण घेतं होतं. पण तो आपल्या आधीच्या दिवसांना विसरला नव्हता. आपल्या गरजा त्याने कधीच वाढू दिल्या नाहीत. तो दिखाव्यासाठी कधीच जगला नाही. त्याने आपल्या आतल्या कलाकाराला कधीच हवेत जाऊन दिलं नाही. तो तसाच राहिला जसा होता अगदी जमिनीवर पाय घट्ट रोवून. (विनीत वर्तक ©)

एक दिवस त्याने पूर्ण जगाला सांगितलं की मी कमावलेला पैसा माझा नाही. ज्या लोकांकडून तो आला त्यांना मी ह्या जगातून जाण्याआधी परत करून जाणार. तो नुसता बोलून थांबला नाही तर तसं जगला. त्याने कधीच पैश्याचा माज केला नाही. अब्जो रुपये असताना पण ना कधी उंची कपडे वापरले ना कधी महागड्या गाड्या ते अगदी मोबाईल फोन. एक, दोन नाही तर तब्बल १७ वर्ष त्याने एकच मोबाईल फोन जो की नोकिया कंपनीचा होता तोच वापरला. शेवटी कंपनी बंद पडल्यामुळे त्याने फोन बदली केला. त्याच्या शब्दात सांगायचं झालं तर,

“I don’t wear clothes for other people. As long as I think it’s comfortable, then it’s good enough for me.”

उंच उंच महालात राहण्यापेक्षा त्याने आपल्या शरीरावर लक्ष दिलं. तो रमला डोंगर दऱ्यांमध्ये . योगा, मेडिटेशन, मार्शल आर्ट ते ध्यान करत अगदी कोणालाही आपल्यासोबत फोटो काढू देताना न त्याला कोणता माज होता न कसला मोठेपणा. तो जमीनीवर जन्माला आला आणि त्याच जमिनीवर जगला. प्रसिद्धी, मोठेपणा ह्या सगळ्याच गोष्टी बाजूला ठेवून जगलेला हा कलाकार म्हणजेच "चाऊ यान फ्याट". (विनीत वर्तक ©)

भारतीयांना हा कलाकार माहित आहे तो त्याने काम केलेल्या एका प्रसिद्ध भूमिकेमुळे. त्यात त्याच नाव होतं "ली-मोबाई" ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या ह्या चित्रपटाचं नाव होतं "क्राऊचिंग टायगर हिडन ड्रॅगन". ह्यात चाऊ यान फ्याट ने केलेली भूमिका पूर्ण जगभर गाजली होती. ह्याप्रमाणे "ए बेटर टुमारो" ह्या चित्रपटातील भूमिका ही त्याची प्रचंड गाजलेली होती.

चाऊ यान फ्याट ने जाण्याआधी आपली सगळी संपत्ती ही लोकांच्या कल्याणासाठी दान करत असल्याचं जाहीर केलं. हा आकडा किती असेल ह्याचा अंदाज केल्यावर आपल्याला चक्कर येईल. तब्बल ७०० मिलियन अमेरिकन डॉलर चाऊ यान फ्याट ने दान करणार असल्याचं जाहीर केलं. भारतीय रुपयात जर आपण ह्याचा अंदाज घेतला तर हा आकडा तब्बल ४८ अब्ज भारतीय रुपयांच्या घरात जातो.

७०० मिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त संपत्ती असलेल्या चाऊ यान फ्याट चा महिन्याचा खर्च फक्त १०० डॉलर च्या घरात आहे. ( जवळपास ७००० रुपये). हे दान करण्याच्या निर्णयाला त्याच्या पूर्ण कुटुंबाने ही सहमती दिली आहे हे विशेष. चाऊ यान फ्याट च्या शब्दात सांगायचं झालं तर,

“The money’s not mine. I’m only keeping it safe for the time being.”

माणूस मोठा होतो तो प्रसिद्धी, पैसा, मानसन्मान किंवा त्याच्या सामाजिक स्थानामुळे नाही तर तो आयुष्य कसं जगतो, तो समाजात कसा वावरतो ह्यावर माणसाचं मोठेपण अवलंबून असते. सुख, आनंद ह्या गोष्टी पैसा विकत घेऊ शकत नाही. आनंदी राहायला तो आनंद दुसऱ्यांना दाखवण्याची गरज नसते. फक्त आपण समाधानी असायला हवं. चाऊ यान फ्याट ने अब्जो रुपये असताना सुद्धा अगदी साधं आयुष्य जगून सगळ्यांपुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. अश्या ह्या कलाकारास माझा कुर्निसात.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

माहिती स्रोत :- गुगल

फोटो स्रोत :- गुगल


Friday 26 July 2019

पुन्हा चंद्रच का?... विनीत वर्तक ©

पुन्हा चंद्रच का?... विनीत वर्तक ©

२० जुलै १९६९ ला मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलं. चंद्रावर स्वारी केल्यावर चंद्रावर आपल्या हाताशी लागलेल्या गोष्टी तितक्याशा उत्साहवर्धक नव्हत्या. सहाजिक चंद्र अमेरिकेच्या अपोलो मिशन नंतर वैज्ञानिक आणि संशोधकांसाठी आठवणींच्या कप्यात गेला. चंद्रावर सूर्य ज्या भागात तळपतो त्या भागात तपमान १२३ डिग्री सेल्सिअस च्या आसपास जाते. ह्या तपमानात जर काही पाणी चंद्रावर असेल तर त्याची वाफ बनून ती अवकाशात निघून गेली असेल. चंद्रावर वातावरण नसल्याने ह्या वाफेला चंद्रावर रोखण्याची नैसर्गिक स्थिती अस्तित्वात नाही. तर ज्या भागात सूर्य उगवतं नाही त्या भागात हेच तपमान जवळपास उणे -१७३ डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली उतरते. अश्या दोन टोकांच्या तपमानात मानवासाठी अत्यंत गरजेचे असलेलं पाणी अस्तित्वात असण्याची शक्यता अजिबात नव्हती. त्यामुळे अश्या ठिकाणी वस्ती तसेच पुढच्या पिढीसाठी चंद्राचं वातावरण उपयोगी नाही असा निष्कर्ष काढून चंद्राला बाजूला काढलं गेलं. मानवी वस्तीसाठी शोधाची कवाडे मग मंगळाकडे आपसूक वळली गेली.

ह्या ५० वर्षाच्या काळात काही संशोधकांच मत मात्र वेगळं होतं. त्यांच्या मते चंद्रावर पाणी असण्याची शक्यता होती. त्यांच्या मते चंद्रावर जी अनेक विवरे आहेत. ह्यातील अनेक उल्कापातामुळे तयार झाली आहेत ती खूप मोठी आहेत. तर ह्या विवरांचा काही भाग हा सूर्यप्रकाशात असून पण ह्या विवरांची सावली विवरात काही भागाला सूर्याच्या प्रचंड तपमाना पासून वाचवत असेल. ह्या भागात तपमान १२३ डिग्री इतकं न वाढल्यामुळे ह्या भागात बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची शक्यता त्यांनी मांडली होती. पण ह्या शक्यतेला मूर्त स्वरूपात सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा चंद्रावर जाऊन पॆसे खर्च करण्याची न नासा ची तयारी होती न अमेरिकेची किंवा इतर देशांची.

२००८ च्या आसपास अवकाश क्षेत्रात भारतासारख्या नवख्या देशाचा उदय झाला. भारताने चंद्रावर स्वारी करण्याची मोहीम आखली. मग ह्या मोहिमेत ह्याच सावलीमधील पाण्याचा शोध घेणाऱ्या एम ३ किंवा मुन मिनरोलॉजी म्यापर सारख्या एका यंत्रणेला जागा मिळाली. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की ही जागा भारताने कोणतंही भाडं न स्वीकारता देऊ केली होती. पण नासा ने डीप स्पेस नेटवर्क देण्याचे पैसे मात्र भारताकडून घेतले. त्यामुळे नासा ने इतकं महत्वाचं नसलेल्या पण शक्यता वाटत असलेल्या यंत्रणेला फुकटात म्हणून भारताच्या चंद्रयान १ मोहिमेसोबत पाठवून दिलं. ह्याच उपकरणाला भारताच्या चंद्रयान १ मोहिमेने ह्या विवराच्या सावलीत कोसळवलं. ज्याचा विचार कोणी केला नव्हता त्या शक्यतेचे पुरावे ह्या उपकरणाच्या माध्यमातून पूर्ण जगाला मिळाले. चंद्रावरच्या अनेक विवरांच्या सावलीत बर्फाच्या रूपात पाणी असल्याचं सिद्ध तर झालं पण ह्या पाण्याचा साठा जवळपास १.३ ट्रिलियन पौंड इतका प्रचंड असू शकतो हे पूर्ण जगाला कळून चुकलं.

पाणी म्हणजे जीवन आणि ह्या पाण्याला बनवणारे दोन महत्वाचे घटक म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे हे घटक वेगळे केले तर ह्यातील हायड्रोजन चा वापर हा इंधन म्हणून तर ऑक्सिजन चा वापर मानवी जीवनासाठी होऊ शकतो हे सगळ्यांना माहीत झालं. जी अमेरिका चंद्राला वाळीत टाकून मंगळावर धाव घेत होती अचानक तिच्या क्षितिजावर चंद्राचा उदय भारताच्या चंद्रयान १ मोहिमेमुळे झाला. चंद्रावर पाणी असल्याचा भारताच्या चंद्रयानाने घेतलेला शोध पूर्ण जगाचा दृष्टीकोन बदलवणारा ठरला. ह्या पाण्याच्या जोडीला हेलियम ३ सारख्या संयुगाचे चंद्रावर विपुल प्रमाणात असलेले साठे पुढल्या पिढीसाठी चंद्रच आपलं दुसरं घर होऊ शकतो ह्यावर शिक्कामोर्तब करत होता.

आपल्याला सगळ्यात जवळ असणारा दुसरा ग्रह, पाणी, हेलियम ३ सारखं संयुग ह्यामुळे चंद्र हे कोणत्याही स्पेस स्टेशन पेक्षा कमी नाही ह्याची जगाला जाणीव झाली. लगेच चंद्र हा अवकाश संशोधनात चर्चेचा विषय झाला. इकडे भारताने त्याच वेळेस आपल्या दुसऱ्या चंद्रमोहिमेची आखणी सुरु केली. रशिया सोबत भारताने दुसऱ्या चंद्रमोहिमेची आखणी केली. पण अमेरिकेने इकडे पण नाक खुपसत भारताला क्रायोजेनिक तंत्रज्ञान देण्यास रशियाला मज्जाव केला. रशियाने तिकडे ह्या मोहिमेसाठी असमर्थता दर्शवत २०१४ ला आपलं अंग ह्यातून काढून घेतलं. पुन्हा एकदा इसरो ला ही मोहिम पूर्णपणे स्वतःच्या बळावर उचलावी लागली. पहिल्या मोहिमेनंतर जवळपास ११ वर्षांनी भारत पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाचे साठे जास्ती असण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. आजवर कोणीच ह्या भागावर कोणतंही यान अथवा उपकरण उतरवलं नसल्याने ह्या पूर्ण प्रदेश जगासाठी आजही एक 'अनटच टेरीटरी' आहे. चंद्रयान २ मोहिम चंद्राच्या अजून काही रहस्यांची उकल करेल ह्या आशेने पूर्ण जग अगदी नासा सकट ह्या मोहिमेवर लक्ष ठेवून आहे.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे

माहिती स्रोत :- इसरो, गुगल

फोटो स्रोत :- गुगल, नासा


Monday 22 July 2019

पाऊले चालती चंद्राची वाट... विनीत वर्तक ©

पाऊले चालती चंद्राची वाट... विनीत वर्तक ©

आज दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी इसरो च्या 'बाहुबली' रॉकेट म्हणजेच जी.एस.एल.व्ही. मार्क ३ - एम १ ह्याने उड्डाण केल्यावर अवघ्या १८ मिनिटात म्हणजेच दुपारी ३ वाजताना चंद्रयान २ ला जि.टी.ओ. मध्ये प्रक्षेपित केलं. १५ जुलै रोजी आलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करत इसरो ने आपण अडचणी मध्ये अजून जास्ती चांगली कामगिरी करतो हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं आहे.

क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान सर्व देशांनी नाकारल्यानंतर इसरो ने जवळपास एक दशकाही मेहनत आणि तब्बल १६,५०० वैज्ञानिक, अभियंते ह्यांच्या अथक परिश्रमानंतर ह्या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवलेलं होतं. गेल्या १० वर्षाची मेहनत कुठेतरी कमी पडते की काय अशी शंका १५ जुलै च्या तांत्रिक अडचणीमुळे वैज्ञानिकांसमोर उभी राहिली. पण स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असला की अडचणी पण छोट्या वाटायला लागतात. इसरो चिफ के.सिवन ह्यांनी मोहीम यशस्वी झाल्यावर पहिलं वाक्य तेच म्हंटल की तांत्रिक अडचण आल्यावर पहिले २४ तास जे कामं झालं ते अभूतपूर्व होतं. हे करायला तुम्हाला पैश्यापलीकडे विचार करणारी माणसं लागतात जी देशासाठी घरी न जाता पुढले २४ तास ते गेला आठवडा रात्रं दिवस ह्या उड्डाणासाठी जिवाचं रान करत होती.

अपयश आल्यावर कोण काय म्हणते ह्याचा विचार न करता नक्की काय घोळ झाला? तो कसा दुरुस्त करता येऊ शकतो आणि पुन्हा होऊ नये म्हणून काय? ह्या सगळ्या गोष्टींसोबत पुन्हा एकदा सुरवातीपासून सर्व गोष्टींची उजळणी केली गेली. कारण आता पुन्हा एक चूक न इसरो ला परवडणारी होती न भारताला. कारण इसरो कडे असलेली लॉन्च विंडो ही जवळपास काही मिनिटांची राहिली होती. ९ ते १६ जुलै ह्या काळात हिच विंडो जवळपास तासाची होती तर आता फक्त काही मिनिटांची.

पृथ्वी सूर्याभोवती सुमारे १,०७,००० किमी/ तास ह्या प्रचंड वेगाने फिरते. त्याच वेळी स्वतःभोवती १६५६ किमी/ तास ह्या वेगाने फिरते. तिकडे चंद्र हा पृथ्वीभोवती ३६८३ किमी / तास ह्या वेगाने फिरतो. आपली सौरमाला सूर्यासकट आपल्या आकाशगंगेत ७.८९ लाख किलोमीटर/ तास ह्या अतिप्रचंड वेगाने फिरत आहे. म्हणजे जर तुम्हाला पृथ्वीवरून चंद्रावर जायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचं गणित करून कोणत्या ठिकाणी आपण कमीत कमी वेळात आणि इंधनात चंद्रावर जाऊ शकु अशी स्थिती ही काही महिन्यात काही तासांची तर काही मिनिटांची असते. हे वेळेचं गणित जर चुकलं तर चंद्रयान २ वरील इंधन चंद्रावर पोहचण्या आधीच संपून जाईल. अश्या स्थितीत काही मिनिटांच्या लॉन्च विंडो मध्ये ठरवलेल्या ऑर्बिट मध्ये चंद्रयान २ प्रक्षेपित करणं इसरो साठी अत्यंत कठीण बनलं होतं. पण जेव्हा आपल्या कामावर विश्वास असतो तेव्हा काही मिनिटे पण पुरेशी असतात.


बाहुबली रॉकेट ने उड्डाण केल्यावर चंद्रयान २ ला जि.टी.ओ. म्हणजेच जिओ ट्रान्स्फर ऑर्बिट ह्या कक्षेत पार्क केलं. ही कक्षा साधारण १७० किमी गुणिले ३९,१२० किमी. अशी असणार होती. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की ही कक्षा जितकी मोठी तितकं कमी इंधन चंद्रयान २ ला चंद्रावर जाण्यासाठी खर्च करावं लागणार होतं. उड्डाण होताना स्क्रीन वरील डॉट अगदी आधी ठरवलेल्या रस्त्याला अगदी तंतोतंत फॉलो करत होते. ह्याचा अर्थ ह्या रॉकेट वरील तिन्ही सतेज च्या इंजिनांनी आपलं काम चोख केलं होतं. चंद्रयान २ ला गाठायची उंची आणि वेग ह्या दोन्ही गोष्टी अगदी ठरवलेल्या प्रमाणे सध्या होतं होत्या. ज्या तंत्रज्ञानाने इसरो ला दहा वर्ष त्रास दिला आज तेच इंजिन त्यांनी ठरवलेल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करत होतं. बाहुबली रॉकेट ने चंद्रयान २ ला ठरलेल्या ऑर्बिट पेक्षा तब्बल ६००० कि.मी. जास्त उंची गाठून दिली. ह्यामुळे उद्या होणाऱ्या प्रज्वलनाची गरज राहिली नाही. जे इंधन ह्यामुळे वाचलं आहे त्याचा उपयोग ऑर्बिटर ला जास्त काळ चंद्राच्या कक्षेत राहण्यासाठी केला जाईल.

ज्या इंजिनाच्या तांत्रिक अडचणीमुळे इसरो ला आपलं उड्डाण पुढे ढकलावे लागले आज त्याच इंजिनाने अपेक्षेपेक्षा जास्त काम करत चंद्रयान २ ला एक वेगळी उंची गाठून दिली आहे. ह्यामागे सर्व इसरो चे संशोधक, वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचारी ह्यांचा तोलामोलाचा वाटा आहे. आजच्या यशाला अपयशाचे कांगोरे असले तरी हे यश प्रत्येक भारतीयाने आज साजरं करायला हवं. चंद्रयान २ मोहीम पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानावर तयार झालेली मोहीम असून चंद्राच्या पंढरीकडे भारताने आपली पाऊले पुन्हा एकदा टाकायला सुरवात केली आहे.

माहिती स्रोत :- गुगल,इसरो

फोटो स्रोत :- इसरो


Friday 19 July 2019

५० वर्षाच पाऊल... विनीत वर्तक ©

५० वर्षाच पाऊल... विनीत वर्तक ©

२० जुलै १९६९ म्हणजे बरोबर ५० वर्षांपूर्वी मानवाने आपल्या इतिहासात पृथ्वी सोडून दुसऱ्या कोणत्याही ग्रहावर पहिल्यांदा पाऊल ठेवलं. अमेरिकेचा अवकाशवीर निल आर्मस्ट्राँग ने म्हंटल होतं,
'Giant leap for mankind'

आजच्या पिढीला कदाचित महत्व कळणार नाही कारण १९६९ नंतर जन्मलेल्या सगळ्यांसाठी मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. त्याकाळी २० जुलै १९६९ ची घटना टी.व्ही. वरून लाईव्ह दाखवली गेली होती. तब्बल ३.८ लाख किलोमीटर वरून घडणाऱ्या गोष्टी पहिल्यांदा लाईव्ह बघण्याचं भाग्य त्या काळच्या लोकांना मिळालं. आज तंत्रज्ञान पुढे गेलं तरी ५० वर्षांपूर्वी अश्या एखाद्या रॉकेट ची निर्मिती करून मानवाने चंद्रावर स्वारी करण्याची घटना स्वप्नवत अशीच होती.

२० जुलै १९६९ च्या सकाळी ४ वाजून १७ मिनिटांनी मायकल कॉलिन्स ला मागे सोडत आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन ह्यांनी चंद्राच्या दिशेने आपला प्रवास सुरु केला. अगदी काही सेकंदाचं इंधन राहिलं असताना त्या चार पायांच्या यानाने चंद्रावरची कित्येक बिलियन वर्षाची धूळ उडवत आपले पाय रोवले. निल आर्मस्ट्राँग ने नासा शी संवाद केला,

"Houston, Tranquillity Base here, The Eagle has landed."

ह्यावर उत्तर देताना नासा कंट्रोल रूम मधून मेसेज गेला,

"Roger, Twan... Tranquillity, we copy you on the ground."

हे शब्द आता जरी सामान्य वाटले तरी ५० वर्षांपूर्वी शब्दांनी मानवाचा इतिहास बदलून टाकला. ह्या घटनेनंतर बरोबर साडेसहा तासांनी निल आर्मस्ट्राँग चंद्रावर आपलं पाऊल टाकणारा पहिला मानव ठरला. ह्या नंतर नासा ला आपण चंद्रावर उतरलो हे सांगताना तो म्हणाला,

"That's one small step for (a) man, one giant leap for mankind."

अपोलो ११ च्या फ्लाईट डायरेक्टर नी म्हंटल होतं,

"आजवर पृथ्वीवरून आपण चंद्राकडे, ताऱ्यांकडे, ग्रहांकडे बघत आलो. आज पहिल्यांदा आपण दुसऱ्या ग्रहावर उतरलो, राहिलो आणि आता तिथून पृथ्वी ला बघत आहोत."

ह्या नंतर जवळपास १० अमेरिकन अवकाशवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवलं पण त्याला तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. अपोलो १३ च्या अपयशा नंतर १९७० च्या आसपास चंद्र मोहिमा ह्या खर्चिक आणि निरुपयोगी वाटू लागल्या पण तो पर्यंत जवळपास ३८१ किलोग्रॅम वजनाचे दगड, मातीचे नमुने ह्या मोहिमांनी पृथ्वीवर आणले होते ज्याचा अभ्यास आजही केला जातो आहे. मानव चंद्रावर जाऊ शकतो ह्याचा १९६९ पर्यंत कोणीही स्वप्नात विचार केला नव्हता.

१२ एप्रिल १९६१ ला युरी गागरीन ला अवकाशात पाठवत रशियाने अमेरिकेवर अवकाश क्षेत्रात मात केली. हा पराभव शित युद्धाच्या काळात अमेरिकेच्या जिव्हारी लागला. ह्या नंतर २५ मे १९६१ ला तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी ह्यांनी म्हंटल होतं,

"I believe that this nation should commit itself to achieving the goal, before this decade is out, of landing a man on the moon and returning him safely to the Earth."

आम्ही आता अवकाशात नाही तर चंद्रावर जाऊन दाखवू हा निर्धार अमेरिकेने केला होता. कारण अवकाशात रशिया ने बाजी मारली होती. आता असं काही लक्ष्य साध्य करण्याची गरज होती ज्याचा विचार कोणीच केला नसेल. आपल्या भाषणात केनेडी म्हणाले होते,

"We choose to go to the moon in this decade and do the other things, not because they are easy, but because they are hard"

केनेडींचा शब्द खरा करण्यासाठी अमेरिकेने आपली सगळी ताकद पणाला लावली. सगळ्या लोकांना, वैज्ञानिकांना, संशोधकांना, अभियंतांना एकच लक्ष्य देण्यात आलं ते म्हणजे चंद्रावर मानव उतरवणं. तब्बल ८ वर्षाच्या अथक मेहनत आणि ८ अवकाशवीरांचा ह्या मोहिमेच्या चाचणीत बळी गेल्यावर जवळपास २५ बिलियन अमेरिकन डॉलर ( आताच्या तुलनेत २८८ बिलियन अमेरिकन डॉलर ) खर्च करून अमेरिकेने चंद्रावरची अपोलो मोहीम यशस्वी केली. १२ अवकाशवीर ह्या मोहिमेतून चंद्रावर आपलं पाऊल उमटवून परत पृथ्वीवर आले.

आजवर अनेक चंद्रमोहिमा झाल्या पण चंद्रावर उतरून तिथून पुन्हा पृथ्वीवर उतरण्याच्या अनुभवाची सर कशालाच नाही. आज ५० वर्षानंतर नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्यासाठी सज्ज होते आहे. २०२४ पर्यंत आपल्या स्पेस लॉन्च सिस्टीम द्वारे पुन्हा एकदा चंद्रावर मानवाला पाठवत आहे. ५० वर्षात तंत्रज्ञानाच बरचं पाणी पुलाखालून वाहून गेलं असलं तरी पुन्हा चंद्रावर उतरणं तितकं सोप्प असणार नाही ह्याची जाणीव नासा ला ही आहे. अपोलो मिशन हे तंत्रज्ञानाचा एक मैलाचा दगड होतं. २० व्या शतकाच्या इतिहासात ५० वर्षांपूर्वी २० जुलै १९६९ ला टाकलेलं पाऊल हे सोनेरी अक्षराने नोंदलं गेलं आहे हे नक्की.

माहिती स्रोत :- गुगल, नासा

फोटो स्रोत :- नासा

१) मानवाने चंद्रावर ठेवलेलं पाऊल
२) अपोलो ११ उड्डाण भरताना

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Wednesday 17 July 2019

पुन्हा एकदा सज्ज... विनीत वर्तक

पुन्हा एकदा सज्ज... विनीत वर्तक


१५ जुलै २०१९ रोजी चंद्रयान २ च्या उड्डाणाच्या  ५६ मिनिटाआधी उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे इसरो ला चंद्रयान २ चे उड्डाण स्थगित करावं लागलं होतं. इसरो साठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या ह्या मोहिमेत आलेल्या ह्या तांत्रिक अडचणीमुळे इसरो ला मागे टाकावं लागलं. आलेली तांत्रिक अडचण खूप  नव्हती हे इसरो ला त्याच वेळी कळालं होतं. पण १००% खात्री होईपर्यंत पाऊल पुढे टाकायचं नाही हा एक नियम इसरो ने ह्या मोहिमे बाबत आधीपासून अवलंबला होता. त्यामुळेच चंद्रयान २ ला उड्डाणासाठी उशीर झाला.

क्रायोजेनिक स्टेज साठी इसरो द्रवरूप हायड्रोजन आणि द्रवरूप ऑक्सिजन चा वापर करते. रॉकेट च्या इंधन टाकीत द्रवरूप हायड्रोजन उणे -२५३ डिग्री सेल्सिअस तर ऑक्सिजन उणे -१८३ डिग्री सेल्सिअस ला भरला जातो. त्याला इंजिन प्रज्वलित झाल्यावर कंबशन चेंबर जिकडे हे दोन्ही इंधन मिळून प्रज्वलित होतात आणि बल निर्माण करतात तिकडे नेण्यासाठी हेलियम वायू चा वापर केला जातो. ह्या हेलियम वायू ची टाकी ही ह्या द्रवरूप ऑक्सिजन इंधन टाकीच्या  जवळ असते. ह्या शीत तपमानामुळे ह्या हेलियम वायू च्या एका जॉईंट मधून हेलियम वायू ची गळती सुरु झाली होती. इसरो चं तंत्रज्ञान हे क्लोज लूप सिस्टीम सारखं असल्याने ही गळती इंजिनावर असलेल्या सेन्सर ने ओळखली. त्याचा त्वरित संदेश इसरो च्या कमांड सेंटर ला प्राप्त झाला. ही गळती खूप मोठ्या प्रमाणावर नव्हती. ह्या गळती मध्ये ही रॉकेट च प्रक्षेपण होऊ शकलं असतं. कारण टाकीत असलेला हेलियम हा लागणाऱ्या हेलियमपेक्षा अधिक प्रमाणात भरलेला होता. पण उड्डाण भरताना बसणारे हादरे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर ही गळती वाढली असती तर पूर्ण मोहीम धोक्यात येण्याची शक्यता होती.

इसरो पुढे दोन पर्याय होते एकतर ह्या स्थितीत उड्डाण करणं अथवा उड्डाण रद्द करून नक्की काय झाले? ह्याचा मागोवा घेणं. जेव्हा देशाचे १००० कोटी आणि एखाद्या मोहिमेचं यश आणि अपयश हे संस्थेला  १० वर्ष मागे पुढे नेणार आहे त्यावेळेस इसरो ने १००% खात्री होई पर्यंत पुढे न जाण्याचा निर्णय घेत १५ जुलै चं उड्डाण रद्द केलं. हे करताना लोकांकडून, मिडिया कडून येणाऱ्या संतप्त प्रतिक्रियांची कल्पना इसरो ला नक्कीच होती पण रॉकेट सायन्स आणि तंत्रज्ञान हे दिवाळीचे फटाके उडवण्या इतकं सोप्प नाही हे इसरो ला चांगलं ठाऊक आहे. म्हणून कोणतीही घाई न करता हे उड्डाण पुढे ढकललं गेलं. जी.एस.एल.व्ही. मार्क ३ हे रॉकेट उड्डाण भरताना जवळपास ६९० टन (६,९०,००० किलोग्रॅम ) वजनाचं असते. ह्यावर असणारं चंद्रयान हे जवळपास ३.८ टन (३८०० किलोग्रॅम ) वजनाचं आहे. रॉकेट च्या इतर भागांचं वजन बाजूला काढलं तर बाकी सर्व वजन हे त्यातील इंधनाचं आहे. इतकं सगळं इंधन सुरक्षितरित्या पुन्हा बाहेर काढून रॉकेट वर काम करावं लागणार होतं. १५ जुलै पासून लोकं , मीडिया सगळं विसरून कामाला लागले असले तरी तिकडे इसरो चे अभियंते, वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ रात्रंदिवस काम करत आहेत. जुलै संपण्याच्या आगोदर त्यांना चंद्रयान २ प्रक्षेपित करायचं आहे.

चंद्रयान पाठवण्याची लॉन्च विंडो ३१ जुलै ला संपत आहे. लॉन्च विंडो म्हणजे ज्यावेळी रॉकेट पृथ्वीवरून उड्डाण करून कमीत कमी वेळात आणि इंधनात चंद्रावर जाण्यासाठी वेळ लागेल. प्रत्येक ग्रहाची ही विंडो वेगळी असते. प्रत्येक ग्रहाच, उपग्रहाच सूर्याभोवती, त्या ग्रहाभोवती होणार परिवलन ह्याचं गणित करतं  ही विंडो ठरवली जाते. ३१ जुलै ची विंडो गेल्यावर इसरो ला सप्टेंबर पर्यंत थांबावं लागणार आहे. म्हणून इसरो ची प्रत्येक टीम झालेल्या तांत्रिक अडचणींवर काम करत आहे. इसरो आता तूर्तास ह्या जॉईंट मधली गळती थांबवून पुन्हा एकदा उड्डणांसाठी सज्ज होते आहे. साधारण २१- २२ जुलै ला चंद्रयान २ उड्डाण भरेल असा विश्वास इसरो मधील वैज्ञानिकांना आहे. पण ह्या पुढल्या मिशन साठी इसरो क्रायोजेनिक इंजिनच्या साच्यात बदल करण्याचा विचार करत आहे. हेलियम वायू चा हा जॉईंट द्रवरूप ऑक्सिजन च्या टाकीपासून लांब कसा नेता येईल? अथवा ह्याला ह्या तपमानापासून कसं वाचवता येईल ह्यावर विचार सुरु आहे.

कोणतीही चंद्रयान २ सारखी मोहीम ही  अनेक शाखाचं मिलन असते. शास्त्रज्ञांना अमुक एक उपकरण घेऊन जायचं असते. वैज्ञानिक ते बनवण्याचा प्रयत्न करतात. पण हे बनवलेलं उपकरण रॉकेट मध्ये योग्य रीतीने बसवण्याचं तसेच ते नेण्यासाठी लागणारा उपग्रह, रोव्हर बनवण्याचं काम अभियंते करतात. बरं हे सगळं ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारं गणित, विज्ञान ह्याचा अभ्यास करणं गरजेचं असते. तसेच ह्या उपकरणांशी संवाद, त्यांच्या माहितीची देवाणघेवाण हे अजून वेगळं शास्त्र आहे. रॉकेट मध्ये नुसतं इंधन भरून ते अवकाशात उडवलं असं होतं नाही. प्रत्येक इंधन हे अत्यंत ज्वलनशील असते. त्यांचं योग्य वेळेला प्रज्वलित होणं. लागणार बल निर्माण करणं तसेच ह्या सगळ्या यंत्रणा सुरळीत काम करत आहेत की  नाही ह्यांची इत्यंभूत माहिती क्षणाक्षणाला कमांड आणि कंट्रोल सेंटर कडे पाठवणं हे स्वतःमध्येच एक तंत्रज्ञानातील मैलाचा दगड आहे. ह्या सगळ्या शाखा जेव्हा एकसंध होऊन काम करतात तेव्हाच चंद्रयान सारखी मोहीम आकाराला येते. इसरो अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ने हे सगळं एका पंखाखाली विकसित केलं आहे ते ही जगात सगळ्यात कमी पैश्यात. म्हणूनच ह्याचा अभिमान एक भारतीय म्हणून आपण बाळगायला हवा कारण हे रॉकेट सायन्स आहे. कोणत्याही कठीण गोष्टीला रॉकेट सायन्स म्हणतात ते उगीच नाही.

 आलेल्या अडचणींवर मात करत पुन्हा एकदा इसरो उड्डाणासाठी सज्ज होतं आहे. ह्या मोहिमेत यश अथवा अपयश आलं तरी आपण सर्व भारतीयांनी एकसंधपणे आपल्या वैज्ञानिकांच्या पाठीशी उभं राहायला हवं. इसरो ला चंद्रयान २ मोहिमेच्या उड्डाणासाठी खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की चंद्रावर सॉफ्ट ल्यांड करणारा भारत जगातील ४ था देश लवकरच ठरेल. तूर्तास वाट बघतो आहे इसरो च्या बाहुबली उड्डाणाची.

फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Monday 15 July 2019

T मायनस ५६...विनीत वर्तक ©

T मायनस ५६...विनीत वर्तक ©

आज सकाळी २ वाजून ५१ मिनिटाला प्रक्षेपित होणाऱ्या इसरो च्या चंद्रयान २ मोहिमेच्या उड्डाणाच्या ५६ मिनिटे आधी तांत्रिक बिघाड उद्धभवल्याने इसरो ने ह्या मोहिमेचं उड्डाण स्थगित केलं. हे उड्डाण बघण्यासाठी भारताचे राष्ट्रपती आपल्या कुटुंबासोबत जातीने हजर होते तसेच देश विदेशी मीडिया, पत्रकार ते सामान्य भारतीयांनी ह्या मोहिमेच्या उड्डाणासाठी खूप गर्दी केली होती. पण कुठेतरी हे उड्डाण स्थगित झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. अनेक लोकांनी तर इसरो कडे पैसे परत मागण्याचा मूर्खपणा केला. अनेकांनी ह्याचा संबंध राजकारणाशी जोडला. अमुक होते तेव्हा असं कधी झालं नाही अमुक आहेत म्हणून इसरो ला हे अपयश बघावं लागते आहे. काही वृत्तपत्रांनी तर इसरो च्या आजवर अपयशाचा आलेख आज प्रथम पानावर ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रसिद्ध केला.

आजवर कोलंबिया आणि चॅलेंजर सारख्या मोठ्या दुर्घटनेत अनेक लोकांना जीव गमवावा लागल्यावर ही नासाला ह्यातून जावं नाही लागलं पण व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली भारतात आपण काही बोलू शकतो आणि काही लिहण्याच स्वातंत्र्य आपल्याला आहे त्यातही लोकशाही चा अधिकार गाजवायला सोशल मीडिया आहेच. पण त्यात मला जायचं नाही. कोणत्याही रॉकेट सोबत उपग्रहाच उड्डाण हे किचकट तंत्रज्ञान आहे. आजवर मोजक्याच देशांकडे उपग्रह प्रक्षेपित करणारी रॉकेट आहेत. त्याला कारण ह्यातील तांत्रिकबाबी. त्यातही ज्या रॉकेट मध्ये क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात येते त्या रॉकेट चं प्रक्षेपण हे अजून जास्ती किचकट होते.

कोणत्याही रॉकेट चं प्रक्षेपण होण्याआधी त्याची उलटगिणती चालू होते. ह्या काळात रॉकेटमधील प्रत्येक तांत्रिक बाबी तपासल्या जातात. रॉकेट मध्ये अनेक सेन्सर बसवलेले असतात. जे रॉकेट मधील तापमान, काम करणाऱ्या अनेक प्रणाली लक्ष ठेवून क्षणाक्षणाला त्याची बातमी रॉकेटमध्ये असणाऱ्या कॉम्प्युटर ला देतं असतात. रॉकेटमधील कम्प्युटर ने रॉकेट चा ताबा घेण्याआगोदर ह्या सगळ्या प्रणाली आणि सेन्सर चे रिडींग हे वैज्ञानिक आणि अभियंते योग्य रीतीने काम करतात की नाही हे तपासत असतात. सगळ्या प्रणाली कडून सर्व काही सुरळीत असल्यावरच रॉकेट चा ताबा त्यातील कॉम्प्युटर कडे देतं रॉकेट चं प्रक्षेपण केलं जाते. (विनीत वर्तक ©)

ह्याच वेळी रॉकेट च्या विविध टप्प्यात इंधन भरण्यात येते. जी.एस.एल.व्ही. मार्क ३ मध्ये पहिल्या टप्प्यात सॉलिड इंधन , दुसऱ्या टप्प्यात लिक्विड इंधन तर पुढच्या टप्प्यात क्रायोजेनिक इंधन भरण्यात येते. हायड्रोजन हा सगळ्यात जास्ती बल निर्माण करणारा घटक आहे. पण वायू स्थितीत त्याला इंधन म्हणून वापरता येतं नाही. पण द्रवस्वरूपात आपण त्याचा इंधन म्हणून वापर करू शकतो. उणे -२५० डिग्री सेल्सिअस तपमानात हायड्रोजन द्रव रूपात ठेवता येतो. ह्याच तापमानात तो रॉकेट च्या इंधन टाकीत भरण्यात येतो. त्याला ह्या तपमानात प्रज्वलनासाठी लागणारा ऑक्सिजन ही उणे -१०० डिग्री सेल्सिअस तपमानात रॉकेटमध्ये भरण्यात येतो. हे तपमान इंधनासाठी योग्य असलं तरी इतर प्रणालीसाठी अत्यंत घातक असते. जर हे तपमान बाकीच्या रॉकेट प्रणाली पासून वेगळं केलं गेलं नाही तर त्या प्रणाली खराब होऊ शकतात. ह्यामुळे क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान हे सगळ्यात किचकट तंत्रज्ञान आहे.

आजच्या उलटगिणती मध्ये ५६ मिनिटे आधी इंधन भरून झाल्यावर रॉकेट मधल्या सेन्सर ने ह्यामध्ये काहीतरी गडबड असल्याचं नमूद केलं. जर ह्याकडे दुर्लक्ष करत किंवा सेन्सर ने गडबड लक्षात आणून दिली नसती तर उड्डाण केल्यावर अवघ्या काही मिनिटात भारताचं चंद्रावर उतरण्याचं स्वप्न धुळीला मिळालं असतं. त्यामुळे इसरो ने जोवर सेन्सर ने दाखवलेली गडबड कशामुळे झाली? खरचं झाली का? नक्की कोणत्या सिस्टीम मधून हा संदेश आला अश्या सगळ्या प्रश्नांना उत्तर सापडून त्यावर योग्य ती पावलं उचलल्या शिवाय ही मोहीम स्थगित केली. आता इकडे हे लक्षात घ्यायला हवं की रॉकेट उड्डाणासाठी सज्ज असल्याने त्यात संपूर्ण इंधन भरण्यात आलं होतं. हे सर्व इंधन सुरक्षित रीतीने पुन्हा रॉकेट मधून काढून पुन्हा रॉकेट असेम्ब्ली लाईन मध्ये नेऊन त्यातल्या प्रत्येक प्रणाली आणि सेन्सर ला तपासलं जाईल. ह्या नंतर योग्य ती उपाय योजना केल्यावर पुन्हा सगळी प्रणाली तपासल्यावर रॉकेट उड्डाणासाठी सज्ज होईल. (विनीत वर्तक ©)

ह्या सगळ्या गोष्टीला १० दिवस ते महिन्याचा अवधी लागू शकतो. रॉकेट पुन्हा सज्ज झाल्यावर ही पुन्हा एकदा सगळी आकडेमोड करून रॉकेट चा प्रवास ठरवावा लागेल. कारण ह्या सगळ्या दिवसात चंद्र आणि पृथ्वी ह्या दोघांनीही आपल्या जागा बदलेल्या असतील. हे सर्व काम सोप्प नाही. घरात बसून टी.व्ही. समोर अथवा फेसबुक, ट्विटर वरून तर्क कोणीही काढू शकतो पण जेव्हा देशाचे १००० कोटी रुपये आणि मोहिमेचं यश आणि अपयश संस्थेला १० वर्ष मागे किंवा १० वर्ष पुढे घेऊन जाण्याइतपत मोहीम महत्वाची असते. तेव्हा टी मायनस ५६ काय पण टी मायनस १ पर्यंत तुम्हाला १००% खात्रीशीर रहावं लागते. (विनीत वर्तक ©)

आज उड्डाण रद्द करून इसरो ने उलट ही मोहीम वाचवली असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. काहीतरी गडबड होण्याआधी सेन्सर नी ती लक्षात आणून देणं हे ही एक महत्वाचं तंत्रज्ञानातील पाऊल आहे. नासा सारखी संस्था सुद्धा अश्या अनेक अपयशी मोहिमांना सामोरी गेली आहे. त्यामुळे अश्या एखाद्या मोहीम लांबवण्यातून इसरो ला दूषणं देणं कितपत योग्य आहे? अपयशाची गाथा वाचणं कितपत योग्य? इसरो काय दिवाळी साजरी करत नव्हती तर एक रॉकेट प्रक्षेपित करत होती. रॉकेट उड्डाण बघण्याची संधी देणं ही मोठी गोष्ट होती त्यासाठी आपण आपले पैसे परत मागणं कितपत योग्य? इतकचं होतं तर घरातून ही उड्डाण बघता आलं असतं.

T मायनस ५६ मुळे चंद्रयान २ बचावलं. लवकरच इसरो त्यातील तांत्रिक बिघाड दूर करून पुन्हा एकदा चंद्र स्वारीसाठी तयार होईल. इसरो च्या सर्व वैज्ञानिक आणि अभियंतांना त्यासाठी शुभेच्छा. आम्ही भारतीय नेहमीच तुमच्या पाठीशी आहोत.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Sunday 14 July 2019

खेळ जिंकला... विनीत वर्तक ©

खेळ जिंकला... विनीत वर्तक ©

काल दोन महत्वाच्या स्पर्धांचे अंतिम सामने एकाचवेळी सुरु होते. कोणता सामना बघू आणि कोणता सोडू अशी अवस्था ह्या वेळी प्रत्येक खेळ प्रेमीची होतं होती. कारण दोन्ही सामने रंगतदार अवस्थेत होते. कधी इकडे तर कधी तिकडे झुकणारे हे सामने नक्की कोण कधी जिंकेल ह्याबाबत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाच निर्णायक सांगता येतं नव्हतं इतके चुरशीचे झाले. कोण जिंकलं आणि कोण हरलं ह्याचा उपपोह करण्यापेक्षा ह्या सगळ्यात खेळ जिंकला. कारण खेळात कोणीतरी जिंकतो आणि कोणीतरी हरतो पण खेळ ज्या खिलाडू वृत्तीने खेळाला गेला ते खेळाला उंचीवर नेत असते.

ह्या दोन्ही सामन्यात भारत कुठे नव्हता तरीपण त्याची उत्कंठता भारतात ही तितकीच होती. एकीकडे क्रिकेट ह्या भारताला वेड लावणाऱ्या खेळाचा जन्मदाता देश पहिल्यांदा क्रिकेट च्या पंढरीवर दर ४ वर्षांनी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या कपासाठी खेळत होता तर न्यूझीलंड सारखा देश दोन वेळा हुलकावणी देणाऱ्या ह्या कपाच्या दावेदारीसाठी त्वेषाने खेळत होता. दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ होते. तेच ह्या सामन्यात दिसून आलं. अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेला हा सामना १०० ओव्हर खेळल्यावर पण बरोबरीत राहिला होता. हेच काय कमी तर सुपर ओव्हर मध्ये ही दोन्ही संघ हे बरोबरीत राहिले. जय पराजयाचा निर्णय हा क्रिकेटच्या नियमांनी करावा लागला. ब्रिटिश संघ आणि न्यूझीलंड चा संघ हे दोघेही खरे तर जिंकले कारण काल क्रिकेट जिंकलं. मला सगळ्यात आवडलं ते म्हणजे कोणीही जिंको पण प्रेक्षकांनी खेळाला दाद दिली. लॉर्ड्स वर असणाऱ्या ते जगभर दूरदर्शन, इंटरनेट वरून बघणाऱ्या प्रत्येकाने काल क्रिकेट हा खेळ बघितला. मला वाटते जिंकणारा तर जिंकला पण हरणारा पण सगळ्यांची मन जिंकून गेला हे कालच्या सामन्याच वैशिष्ठ.

दुसरीकडे एक चाळीशी मध्ये पोचणारा हिरवळीचा राजा. ज्या हिरवळीवर त्याने गेले काही दशके राज्य केले आज त्याच हिरवळीवर तो वयाच्या चाळीशी च्या आसपास पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत होता. जगातील नंबर २ असणाऱ्या खेळाडूला विम्बल्डनं स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हरवत वयाच्या ३८ व्या वर्षी सुद्धा आपण तितकेच समर्थ असल्याचा पुरावा त्याने जगाला दिला होता. तब्बल ८ वेळा ही स्पर्धा त्याने जिंकलेली होती आणि समोर जगात नंबर १ वर असलेला खेळाडू होता. अगदी चुरशीचा झालेला हा सामना रंगला तो ह्या दोघांच्या फटाक्यांमुळे. पूर्ण सामन्यात जेव्हा सामना एका बाजूला झुकतो आहे असं जाणवतं होतं तेव्हाच प्रतिस्पर्धी आपला खेळ उंचावत पुन्हा सामना आपल्या बाजूने झुकवत होता. ह्यामुळेच सेंटर कोर्ट वर असणाऱ्या आणि टी.व्ही., इंटरनेट वरून हा सामना बघणाऱ्या प्रत्येकजण टेनिस ह्या खेळातील एका अजरामर सामन्याचा साक्षीदार होतं होता. सामना जरी डोकोव्हिच ने जिंकला तरी मने मात्र रॉजर फेडरर ने जिंकली ह्यात शंका नाही. सामन्यानंतर खुद्द डोकोव्हिच म्हणाला की वयाच्या ३८ व्या वर्षी सुद्धा फेडरर मला कडवी झुंज देईल ह्याची खात्री मला होती. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा इतका आदर खूप काही सांगून गेला आणि पुन्हा एकदा टेनिस जिंकलं.

हे दोन्ही सामने सुरु असताना तिकडे चेक प्रजासत्ताक मध्ये सुरु असलेल्या क्लॅनदो अथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या हिमा दास ने दोन आठवड्यात तिसरं सुवर्ण पदक भारताच्या खात्यात जमा केलं. क्रिकेट मध्ये अडकलेल्या भारतीयांना क्रिकेट बाहेर ही भारत आपली छाप पाडू शकतो ह्याची दखल घेण्यास हिमा दास ने भाग पाडलं आहे. धावण्याच्या शर्यतीत जागतिक स्पर्धांनं मध्ये एक दोन अपवाद सोडले तर भारताची दखल ना जगाने कधी घेतली न खुद्द भारतीयांनी पण ह्या विचारधारणेला बदलण्याचं काम भारतीय धावपटू विशेषतः स्त्री धावपटूंनी गेल्या काही वर्षात केलं आहे. चाहत्यांचा पाठिंबा नसताना पण आपण आपला सर्वोत्तम खेळ करत तिरंगा उंचावर फडकावण्याच्या कामगिरी ने हळूहळू का होईना भारतीय सुजाण प्रेक्षक आता क्रिकेट पलीकडे विचार करण्यास प्रवृत्त होतं आहेत हे ही नसे थोडके.

एकूणच कालचा दिवस खेळाचा होता. योगायोगाने विम्बल्डन आणि क्रिकेट विश्वकप ह्या दोन्ही स्पर्धा एकाच वेळी एकाच देशात सुरु होत्या. दोन्ही स्पर्धेचे जनक असलेल्या देशात विम्ब्लडन चे सेंटर कोर्ट आणि क्रिकेट मधील लॉर्ड्स चे मैदान ह्या दोन्ही ठिकाणी आपला खेळ दाखवण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडू बघत आलेला असतो अशा वेळी ह्या दोन्ही खेळांचे त्या त्या खेळांच्या पंढरीमध्ये सर्वोत्तम सामने व्हावेत हा योगायोग पण खेळासाठी नक्कीच चांगला होता. काल कोणी जिंकलं आणि कोणी हरलं तरी काल पुन्हा एकदा खेळ, सांघिक भावना आणि खेळाडू जिंकले ह्याच समाधान मला सगळ्यात जास्ती आहे.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.