Monday 22 July 2019

पाऊले चालती चंद्राची वाट... विनीत वर्तक ©

पाऊले चालती चंद्राची वाट... विनीत वर्तक ©

आज दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी इसरो च्या 'बाहुबली' रॉकेट म्हणजेच जी.एस.एल.व्ही. मार्क ३ - एम १ ह्याने उड्डाण केल्यावर अवघ्या १८ मिनिटात म्हणजेच दुपारी ३ वाजताना चंद्रयान २ ला जि.टी.ओ. मध्ये प्रक्षेपित केलं. १५ जुलै रोजी आलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करत इसरो ने आपण अडचणी मध्ये अजून जास्ती चांगली कामगिरी करतो हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं आहे.

क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान सर्व देशांनी नाकारल्यानंतर इसरो ने जवळपास एक दशकाही मेहनत आणि तब्बल १६,५०० वैज्ञानिक, अभियंते ह्यांच्या अथक परिश्रमानंतर ह्या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवलेलं होतं. गेल्या १० वर्षाची मेहनत कुठेतरी कमी पडते की काय अशी शंका १५ जुलै च्या तांत्रिक अडचणीमुळे वैज्ञानिकांसमोर उभी राहिली. पण स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असला की अडचणी पण छोट्या वाटायला लागतात. इसरो चिफ के.सिवन ह्यांनी मोहीम यशस्वी झाल्यावर पहिलं वाक्य तेच म्हंटल की तांत्रिक अडचण आल्यावर पहिले २४ तास जे कामं झालं ते अभूतपूर्व होतं. हे करायला तुम्हाला पैश्यापलीकडे विचार करणारी माणसं लागतात जी देशासाठी घरी न जाता पुढले २४ तास ते गेला आठवडा रात्रं दिवस ह्या उड्डाणासाठी जिवाचं रान करत होती.

अपयश आल्यावर कोण काय म्हणते ह्याचा विचार न करता नक्की काय घोळ झाला? तो कसा दुरुस्त करता येऊ शकतो आणि पुन्हा होऊ नये म्हणून काय? ह्या सगळ्या गोष्टींसोबत पुन्हा एकदा सुरवातीपासून सर्व गोष्टींची उजळणी केली गेली. कारण आता पुन्हा एक चूक न इसरो ला परवडणारी होती न भारताला. कारण इसरो कडे असलेली लॉन्च विंडो ही जवळपास काही मिनिटांची राहिली होती. ९ ते १६ जुलै ह्या काळात हिच विंडो जवळपास तासाची होती तर आता फक्त काही मिनिटांची.

पृथ्वी सूर्याभोवती सुमारे १,०७,००० किमी/ तास ह्या प्रचंड वेगाने फिरते. त्याच वेळी स्वतःभोवती १६५६ किमी/ तास ह्या वेगाने फिरते. तिकडे चंद्र हा पृथ्वीभोवती ३६८३ किमी / तास ह्या वेगाने फिरतो. आपली सौरमाला सूर्यासकट आपल्या आकाशगंगेत ७.८९ लाख किलोमीटर/ तास ह्या अतिप्रचंड वेगाने फिरत आहे. म्हणजे जर तुम्हाला पृथ्वीवरून चंद्रावर जायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचं गणित करून कोणत्या ठिकाणी आपण कमीत कमी वेळात आणि इंधनात चंद्रावर जाऊ शकु अशी स्थिती ही काही महिन्यात काही तासांची तर काही मिनिटांची असते. हे वेळेचं गणित जर चुकलं तर चंद्रयान २ वरील इंधन चंद्रावर पोहचण्या आधीच संपून जाईल. अश्या स्थितीत काही मिनिटांच्या लॉन्च विंडो मध्ये ठरवलेल्या ऑर्बिट मध्ये चंद्रयान २ प्रक्षेपित करणं इसरो साठी अत्यंत कठीण बनलं होतं. पण जेव्हा आपल्या कामावर विश्वास असतो तेव्हा काही मिनिटे पण पुरेशी असतात.


बाहुबली रॉकेट ने उड्डाण केल्यावर चंद्रयान २ ला जि.टी.ओ. म्हणजेच जिओ ट्रान्स्फर ऑर्बिट ह्या कक्षेत पार्क केलं. ही कक्षा साधारण १७० किमी गुणिले ३९,१२० किमी. अशी असणार होती. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की ही कक्षा जितकी मोठी तितकं कमी इंधन चंद्रयान २ ला चंद्रावर जाण्यासाठी खर्च करावं लागणार होतं. उड्डाण होताना स्क्रीन वरील डॉट अगदी आधी ठरवलेल्या रस्त्याला अगदी तंतोतंत फॉलो करत होते. ह्याचा अर्थ ह्या रॉकेट वरील तिन्ही सतेज च्या इंजिनांनी आपलं काम चोख केलं होतं. चंद्रयान २ ला गाठायची उंची आणि वेग ह्या दोन्ही गोष्टी अगदी ठरवलेल्या प्रमाणे सध्या होतं होत्या. ज्या तंत्रज्ञानाने इसरो ला दहा वर्ष त्रास दिला आज तेच इंजिन त्यांनी ठरवलेल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करत होतं. बाहुबली रॉकेट ने चंद्रयान २ ला ठरलेल्या ऑर्बिट पेक्षा तब्बल ६००० कि.मी. जास्त उंची गाठून दिली. ह्यामुळे उद्या होणाऱ्या प्रज्वलनाची गरज राहिली नाही. जे इंधन ह्यामुळे वाचलं आहे त्याचा उपयोग ऑर्बिटर ला जास्त काळ चंद्राच्या कक्षेत राहण्यासाठी केला जाईल.

ज्या इंजिनाच्या तांत्रिक अडचणीमुळे इसरो ला आपलं उड्डाण पुढे ढकलावे लागले आज त्याच इंजिनाने अपेक्षेपेक्षा जास्त काम करत चंद्रयान २ ला एक वेगळी उंची गाठून दिली आहे. ह्यामागे सर्व इसरो चे संशोधक, वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचारी ह्यांचा तोलामोलाचा वाटा आहे. आजच्या यशाला अपयशाचे कांगोरे असले तरी हे यश प्रत्येक भारतीयाने आज साजरं करायला हवं. चंद्रयान २ मोहीम पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानावर तयार झालेली मोहीम असून चंद्राच्या पंढरीकडे भारताने आपली पाऊले पुन्हा एकदा टाकायला सुरवात केली आहे.

माहिती स्रोत :- गुगल,इसरो

फोटो स्रोत :- इसरो


1 comment:

  1. Congratulations to all participants.Jay Hind Jay Bharat.

    ReplyDelete