Monday 15 July 2019

T मायनस ५६...विनीत वर्तक ©

T मायनस ५६...विनीत वर्तक ©

आज सकाळी २ वाजून ५१ मिनिटाला प्रक्षेपित होणाऱ्या इसरो च्या चंद्रयान २ मोहिमेच्या उड्डाणाच्या ५६ मिनिटे आधी तांत्रिक बिघाड उद्धभवल्याने इसरो ने ह्या मोहिमेचं उड्डाण स्थगित केलं. हे उड्डाण बघण्यासाठी भारताचे राष्ट्रपती आपल्या कुटुंबासोबत जातीने हजर होते तसेच देश विदेशी मीडिया, पत्रकार ते सामान्य भारतीयांनी ह्या मोहिमेच्या उड्डाणासाठी खूप गर्दी केली होती. पण कुठेतरी हे उड्डाण स्थगित झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. अनेक लोकांनी तर इसरो कडे पैसे परत मागण्याचा मूर्खपणा केला. अनेकांनी ह्याचा संबंध राजकारणाशी जोडला. अमुक होते तेव्हा असं कधी झालं नाही अमुक आहेत म्हणून इसरो ला हे अपयश बघावं लागते आहे. काही वृत्तपत्रांनी तर इसरो च्या आजवर अपयशाचा आलेख आज प्रथम पानावर ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रसिद्ध केला.

आजवर कोलंबिया आणि चॅलेंजर सारख्या मोठ्या दुर्घटनेत अनेक लोकांना जीव गमवावा लागल्यावर ही नासाला ह्यातून जावं नाही लागलं पण व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली भारतात आपण काही बोलू शकतो आणि काही लिहण्याच स्वातंत्र्य आपल्याला आहे त्यातही लोकशाही चा अधिकार गाजवायला सोशल मीडिया आहेच. पण त्यात मला जायचं नाही. कोणत्याही रॉकेट सोबत उपग्रहाच उड्डाण हे किचकट तंत्रज्ञान आहे. आजवर मोजक्याच देशांकडे उपग्रह प्रक्षेपित करणारी रॉकेट आहेत. त्याला कारण ह्यातील तांत्रिकबाबी. त्यातही ज्या रॉकेट मध्ये क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात येते त्या रॉकेट चं प्रक्षेपण हे अजून जास्ती किचकट होते.

कोणत्याही रॉकेट चं प्रक्षेपण होण्याआधी त्याची उलटगिणती चालू होते. ह्या काळात रॉकेटमधील प्रत्येक तांत्रिक बाबी तपासल्या जातात. रॉकेट मध्ये अनेक सेन्सर बसवलेले असतात. जे रॉकेट मधील तापमान, काम करणाऱ्या अनेक प्रणाली लक्ष ठेवून क्षणाक्षणाला त्याची बातमी रॉकेटमध्ये असणाऱ्या कॉम्प्युटर ला देतं असतात. रॉकेटमधील कम्प्युटर ने रॉकेट चा ताबा घेण्याआगोदर ह्या सगळ्या प्रणाली आणि सेन्सर चे रिडींग हे वैज्ञानिक आणि अभियंते योग्य रीतीने काम करतात की नाही हे तपासत असतात. सगळ्या प्रणाली कडून सर्व काही सुरळीत असल्यावरच रॉकेट चा ताबा त्यातील कॉम्प्युटर कडे देतं रॉकेट चं प्रक्षेपण केलं जाते. (विनीत वर्तक ©)

ह्याच वेळी रॉकेट च्या विविध टप्प्यात इंधन भरण्यात येते. जी.एस.एल.व्ही. मार्क ३ मध्ये पहिल्या टप्प्यात सॉलिड इंधन , दुसऱ्या टप्प्यात लिक्विड इंधन तर पुढच्या टप्प्यात क्रायोजेनिक इंधन भरण्यात येते. हायड्रोजन हा सगळ्यात जास्ती बल निर्माण करणारा घटक आहे. पण वायू स्थितीत त्याला इंधन म्हणून वापरता येतं नाही. पण द्रवस्वरूपात आपण त्याचा इंधन म्हणून वापर करू शकतो. उणे -२५० डिग्री सेल्सिअस तपमानात हायड्रोजन द्रव रूपात ठेवता येतो. ह्याच तापमानात तो रॉकेट च्या इंधन टाकीत भरण्यात येतो. त्याला ह्या तपमानात प्रज्वलनासाठी लागणारा ऑक्सिजन ही उणे -१०० डिग्री सेल्सिअस तपमानात रॉकेटमध्ये भरण्यात येतो. हे तपमान इंधनासाठी योग्य असलं तरी इतर प्रणालीसाठी अत्यंत घातक असते. जर हे तपमान बाकीच्या रॉकेट प्रणाली पासून वेगळं केलं गेलं नाही तर त्या प्रणाली खराब होऊ शकतात. ह्यामुळे क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान हे सगळ्यात किचकट तंत्रज्ञान आहे.

आजच्या उलटगिणती मध्ये ५६ मिनिटे आधी इंधन भरून झाल्यावर रॉकेट मधल्या सेन्सर ने ह्यामध्ये काहीतरी गडबड असल्याचं नमूद केलं. जर ह्याकडे दुर्लक्ष करत किंवा सेन्सर ने गडबड लक्षात आणून दिली नसती तर उड्डाण केल्यावर अवघ्या काही मिनिटात भारताचं चंद्रावर उतरण्याचं स्वप्न धुळीला मिळालं असतं. त्यामुळे इसरो ने जोवर सेन्सर ने दाखवलेली गडबड कशामुळे झाली? खरचं झाली का? नक्की कोणत्या सिस्टीम मधून हा संदेश आला अश्या सगळ्या प्रश्नांना उत्तर सापडून त्यावर योग्य ती पावलं उचलल्या शिवाय ही मोहीम स्थगित केली. आता इकडे हे लक्षात घ्यायला हवं की रॉकेट उड्डाणासाठी सज्ज असल्याने त्यात संपूर्ण इंधन भरण्यात आलं होतं. हे सर्व इंधन सुरक्षित रीतीने पुन्हा रॉकेट मधून काढून पुन्हा रॉकेट असेम्ब्ली लाईन मध्ये नेऊन त्यातल्या प्रत्येक प्रणाली आणि सेन्सर ला तपासलं जाईल. ह्या नंतर योग्य ती उपाय योजना केल्यावर पुन्हा सगळी प्रणाली तपासल्यावर रॉकेट उड्डाणासाठी सज्ज होईल. (विनीत वर्तक ©)

ह्या सगळ्या गोष्टीला १० दिवस ते महिन्याचा अवधी लागू शकतो. रॉकेट पुन्हा सज्ज झाल्यावर ही पुन्हा एकदा सगळी आकडेमोड करून रॉकेट चा प्रवास ठरवावा लागेल. कारण ह्या सगळ्या दिवसात चंद्र आणि पृथ्वी ह्या दोघांनीही आपल्या जागा बदलेल्या असतील. हे सर्व काम सोप्प नाही. घरात बसून टी.व्ही. समोर अथवा फेसबुक, ट्विटर वरून तर्क कोणीही काढू शकतो पण जेव्हा देशाचे १००० कोटी रुपये आणि मोहिमेचं यश आणि अपयश संस्थेला १० वर्ष मागे किंवा १० वर्ष पुढे घेऊन जाण्याइतपत मोहीम महत्वाची असते. तेव्हा टी मायनस ५६ काय पण टी मायनस १ पर्यंत तुम्हाला १००% खात्रीशीर रहावं लागते. (विनीत वर्तक ©)

आज उड्डाण रद्द करून इसरो ने उलट ही मोहीम वाचवली असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. काहीतरी गडबड होण्याआधी सेन्सर नी ती लक्षात आणून देणं हे ही एक महत्वाचं तंत्रज्ञानातील पाऊल आहे. नासा सारखी संस्था सुद्धा अश्या अनेक अपयशी मोहिमांना सामोरी गेली आहे. त्यामुळे अश्या एखाद्या मोहीम लांबवण्यातून इसरो ला दूषणं देणं कितपत योग्य आहे? अपयशाची गाथा वाचणं कितपत योग्य? इसरो काय दिवाळी साजरी करत नव्हती तर एक रॉकेट प्रक्षेपित करत होती. रॉकेट उड्डाण बघण्याची संधी देणं ही मोठी गोष्ट होती त्यासाठी आपण आपले पैसे परत मागणं कितपत योग्य? इतकचं होतं तर घरातून ही उड्डाण बघता आलं असतं.

T मायनस ५६ मुळे चंद्रयान २ बचावलं. लवकरच इसरो त्यातील तांत्रिक बिघाड दूर करून पुन्हा एकदा चंद्र स्वारीसाठी तयार होईल. इसरो च्या सर्व वैज्ञानिक आणि अभियंतांना त्यासाठी शुभेच्छा. आम्ही भारतीय नेहमीच तुमच्या पाठीशी आहोत.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


1 comment:

  1. आपल्या मताशी पूर्णतः सहमत आहे.

    ReplyDelete