Friday 26 July 2019

पुन्हा चंद्रच का?... विनीत वर्तक ©

पुन्हा चंद्रच का?... विनीत वर्तक ©

२० जुलै १९६९ ला मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलं. चंद्रावर स्वारी केल्यावर चंद्रावर आपल्या हाताशी लागलेल्या गोष्टी तितक्याशा उत्साहवर्धक नव्हत्या. सहाजिक चंद्र अमेरिकेच्या अपोलो मिशन नंतर वैज्ञानिक आणि संशोधकांसाठी आठवणींच्या कप्यात गेला. चंद्रावर सूर्य ज्या भागात तळपतो त्या भागात तपमान १२३ डिग्री सेल्सिअस च्या आसपास जाते. ह्या तपमानात जर काही पाणी चंद्रावर असेल तर त्याची वाफ बनून ती अवकाशात निघून गेली असेल. चंद्रावर वातावरण नसल्याने ह्या वाफेला चंद्रावर रोखण्याची नैसर्गिक स्थिती अस्तित्वात नाही. तर ज्या भागात सूर्य उगवतं नाही त्या भागात हेच तपमान जवळपास उणे -१७३ डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली उतरते. अश्या दोन टोकांच्या तपमानात मानवासाठी अत्यंत गरजेचे असलेलं पाणी अस्तित्वात असण्याची शक्यता अजिबात नव्हती. त्यामुळे अश्या ठिकाणी वस्ती तसेच पुढच्या पिढीसाठी चंद्राचं वातावरण उपयोगी नाही असा निष्कर्ष काढून चंद्राला बाजूला काढलं गेलं. मानवी वस्तीसाठी शोधाची कवाडे मग मंगळाकडे आपसूक वळली गेली.

ह्या ५० वर्षाच्या काळात काही संशोधकांच मत मात्र वेगळं होतं. त्यांच्या मते चंद्रावर पाणी असण्याची शक्यता होती. त्यांच्या मते चंद्रावर जी अनेक विवरे आहेत. ह्यातील अनेक उल्कापातामुळे तयार झाली आहेत ती खूप मोठी आहेत. तर ह्या विवरांचा काही भाग हा सूर्यप्रकाशात असून पण ह्या विवरांची सावली विवरात काही भागाला सूर्याच्या प्रचंड तपमाना पासून वाचवत असेल. ह्या भागात तपमान १२३ डिग्री इतकं न वाढल्यामुळे ह्या भागात बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची शक्यता त्यांनी मांडली होती. पण ह्या शक्यतेला मूर्त स्वरूपात सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा चंद्रावर जाऊन पॆसे खर्च करण्याची न नासा ची तयारी होती न अमेरिकेची किंवा इतर देशांची.

२००८ च्या आसपास अवकाश क्षेत्रात भारतासारख्या नवख्या देशाचा उदय झाला. भारताने चंद्रावर स्वारी करण्याची मोहीम आखली. मग ह्या मोहिमेत ह्याच सावलीमधील पाण्याचा शोध घेणाऱ्या एम ३ किंवा मुन मिनरोलॉजी म्यापर सारख्या एका यंत्रणेला जागा मिळाली. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की ही जागा भारताने कोणतंही भाडं न स्वीकारता देऊ केली होती. पण नासा ने डीप स्पेस नेटवर्क देण्याचे पैसे मात्र भारताकडून घेतले. त्यामुळे नासा ने इतकं महत्वाचं नसलेल्या पण शक्यता वाटत असलेल्या यंत्रणेला फुकटात म्हणून भारताच्या चंद्रयान १ मोहिमेसोबत पाठवून दिलं. ह्याच उपकरणाला भारताच्या चंद्रयान १ मोहिमेने ह्या विवराच्या सावलीत कोसळवलं. ज्याचा विचार कोणी केला नव्हता त्या शक्यतेचे पुरावे ह्या उपकरणाच्या माध्यमातून पूर्ण जगाला मिळाले. चंद्रावरच्या अनेक विवरांच्या सावलीत बर्फाच्या रूपात पाणी असल्याचं सिद्ध तर झालं पण ह्या पाण्याचा साठा जवळपास १.३ ट्रिलियन पौंड इतका प्रचंड असू शकतो हे पूर्ण जगाला कळून चुकलं.

पाणी म्हणजे जीवन आणि ह्या पाण्याला बनवणारे दोन महत्वाचे घटक म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे हे घटक वेगळे केले तर ह्यातील हायड्रोजन चा वापर हा इंधन म्हणून तर ऑक्सिजन चा वापर मानवी जीवनासाठी होऊ शकतो हे सगळ्यांना माहीत झालं. जी अमेरिका चंद्राला वाळीत टाकून मंगळावर धाव घेत होती अचानक तिच्या क्षितिजावर चंद्राचा उदय भारताच्या चंद्रयान १ मोहिमेमुळे झाला. चंद्रावर पाणी असल्याचा भारताच्या चंद्रयानाने घेतलेला शोध पूर्ण जगाचा दृष्टीकोन बदलवणारा ठरला. ह्या पाण्याच्या जोडीला हेलियम ३ सारख्या संयुगाचे चंद्रावर विपुल प्रमाणात असलेले साठे पुढल्या पिढीसाठी चंद्रच आपलं दुसरं घर होऊ शकतो ह्यावर शिक्कामोर्तब करत होता.

आपल्याला सगळ्यात जवळ असणारा दुसरा ग्रह, पाणी, हेलियम ३ सारखं संयुग ह्यामुळे चंद्र हे कोणत्याही स्पेस स्टेशन पेक्षा कमी नाही ह्याची जगाला जाणीव झाली. लगेच चंद्र हा अवकाश संशोधनात चर्चेचा विषय झाला. इकडे भारताने त्याच वेळेस आपल्या दुसऱ्या चंद्रमोहिमेची आखणी सुरु केली. रशिया सोबत भारताने दुसऱ्या चंद्रमोहिमेची आखणी केली. पण अमेरिकेने इकडे पण नाक खुपसत भारताला क्रायोजेनिक तंत्रज्ञान देण्यास रशियाला मज्जाव केला. रशियाने तिकडे ह्या मोहिमेसाठी असमर्थता दर्शवत २०१४ ला आपलं अंग ह्यातून काढून घेतलं. पुन्हा एकदा इसरो ला ही मोहिम पूर्णपणे स्वतःच्या बळावर उचलावी लागली. पहिल्या मोहिमेनंतर जवळपास ११ वर्षांनी भारत पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाचे साठे जास्ती असण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. आजवर कोणीच ह्या भागावर कोणतंही यान अथवा उपकरण उतरवलं नसल्याने ह्या पूर्ण प्रदेश जगासाठी आजही एक 'अनटच टेरीटरी' आहे. चंद्रयान २ मोहिम चंद्राच्या अजून काही रहस्यांची उकल करेल ह्या आशेने पूर्ण जग अगदी नासा सकट ह्या मोहिमेवर लक्ष ठेवून आहे.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे

माहिती स्रोत :- इसरो, गुगल

फोटो स्रोत :- गुगल, नासा


No comments:

Post a Comment