Wednesday 10 July 2019

कंपासपेटी... विनीत वर्तक ©

कंपासपेटी... विनीत वर्तक ©

सई च दप्तर भरण्याची वेळ माझ्यावर तशी कमीच येते पण त्यादिवशी दप्तर भरत असताना सई ला कंपासपेटी बद्दल विचारल तर शाळेने कंपासपेटी हा प्रकार बंद केला आहे. कारण शाळेत मुल त्या सोबत खेळतात आणि आजकाल मिळणाऱ्या अवाढव्य पैशाच्या कंपासपेट्या आणि त्यात समाविष्ट झालेल्या शाळेसाठी गरजेच्या नसणाऱ्या वस्तूंमुळे असा निर्णय शाळेने घेतला अस सई म्हणाली. कंपासपेटी पेक्षा पाउच मध्ये पेन्सिल, पट्टी आणि इतर वस्तू आणाव्यात अस शाळेने सांगितलं. खूप छान गोष्ट हि असली तरी माझ मन मात्र पटकन भूतकाळात गेल.

शाळेचे सोनेरी दिवस आठवले कि काही गोष्टी आणि क्षण अगदी डोळ्यासमोर उभ्या राहतात. त्यातली एक महत्वाची वस्तू म्हणजे कंपासपेटी. इयत्ता ४-५ पासून ते अगदी १० वी होई पर्यंत कोणी माझी सोबत केली असेल तर त्या पिवळ्या केशरी रंगाच्या क्यामलीन च्या कंपासपेटीने. मला अजूनही चांगल आठवते कि जेव्हा पहिल्यांदा मला ती मिळाली तेव्हा तिच्या त्या पुठ्याच्या कवर मधुन तिला वर्षभर वापरली होती. अगदी ते कवर फाटून गेल तरी कंपासपेटी शाळा सुटताना त्या कव्हर मध्ये हा शिरस्ता ठरलेला होता. पहिली दोन वर्षे अगदी जपून तर नंतरची तीन वर्षे ती वाट्टेल तशी ती वापरली. तिची गाडी करण्यापासून ते वरच्या कवरला भोक पाडण्यापर्यंत आणि कवरच्या बिजागरी तुटेसतोवर तिने मला साथ दिली म्हणा किंवा मी तिला पिंजून काढल म्हणा.(विनीत वर्तक ©)

प्लास्टिक कंपासपेटी शालेय जिवनात येण्याआधी ह्या लोखंडी कंपासपेटी ने माझ आयुष्य समृद्ध केल होत. एक प्लास्टिक ची पट्टी, कोनमापक आणि त्या सोबत दोन त्रिकोणी पट्ट्या ( ज्यांचा वापर समजेपर्यंत अनेक वर्ष निघून गेली हा भाग वेगळा ) एक करकटक आणि दुसर तीक्ष्ण दोन टोके असलेल करकटक ज्याचा वापर मला कधीच कळला नाही. तर अश्या ह्या समृद्ध खजिन्यात मग स्वतःची पेन्सिल, पेन, कटर, खोडरबर ह्याची भर घालून तो खजिना माझ्या शाळेच्या दप्तरात अतिशय गुप्त ठिकाणी विसावा घ्यायचा.

ह्या कंपासपेटी चा उपयोग अनेक गोष्टींसाठी मी केला. त्याच्या कवर च्या आतल्या बाजूस पैसे ठेवण्याची जागा होती. एक चुंबक पण त्या कव्हर च्या आतल्या बाजूला असायचं अर्थात त्यात कॉपी ठेवून परीक्षेत त्याचा दुहेरी वापर व्हायचा हा भाग वेगळा. पण तसा तो कमी वेळा झाला. पेन, पेन्सिल सोबत ह्या कंपासपेटी मध्ये माझ्या पहिल्या निरागस भावना कागदाच्या पुरचुंडीत लपलेल्या असायच्या. त्या काळी जिच्याबद्दल त्या वाटल्या तिला त्या देण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे त्या सांभाळण्याच उत्तरदायित्व माझ्या कंपासपेटी ने इमानइतबारे निभावल हे नक्कीच. अनेकदा तिच्या त्या आतल्या बाजूस असलेल्या चोरीच्या कप्प्यात माझ्या अनेक आठवणी असायच्या. अगदी देवाच्या फोटोपासून ते ७८६ असलेल्या बसच्या तिकीटापर्यंत. (विनीत वर्तक ©)

त्यातल ते साच्याच प्लास्टिक तुटल कि मग वस्तू कश्या मोकळ्या त्यात बसायच्या. मग दोन्ही बाजूला पेन्सिल च्या टोकांनी आणि करकटकाच्या टोकांनी केलेले वार दिसून यायचे. ते करकटक मला वाटते वर्तुळ काढण्यापेक्षा मी खेळायला जास्ती वेळा वापरल असेल. बेंच वर कोरलेली नाव आणि केलेले खड्डे त्याच्या टोकेरी टोकाची साक्ष आजही माझ्या शाळेत दिसून येते. त्या करकटकात पेन्सिल कधी घट्ट बसायची नाही. त्याच ते नर्लिंग केलेला स्क्रू फिरवून अंगठा मात्र लाल व्हायचा. दुहेरी टोक असलेल करकटक मात्र नेहमीच नवीन वाटायच. त्याचा उपयोग वहीच्या मध्यभागी रुतवून वही अशी सर कर फिरवून वर्गात इम्प्रेशन मारायला व्हायचा. अर्थात किती मुलींवर ते पडायचं हा संशोधनाचा भाग आहे. कोनमापक आणि पट्टी चा वापर अनेकदा झाला तरी त्या त्रिकोणी पट्टीचा वापर मात्र मी तरी बंदूक म्हणून वर्गात खेळायला केला. बाकी त्या पलीकडे त्याचा वापर मला तरी आठवत नाही.(विनीत वर्तक ©)

तर अशी हि कंपासपेटी माझ्या ५ वर्षाच्या सोनेरी क्षणांची साक्षीदार होती. तिला फुलासारखं जपलं पण आणि एखाद्या वाळीत टाकलेल्या माणसासारख वागवल पण. दोन्ही वेळा ती माझीच साथीदार बनून राहिली. त्या कंपासपेटी ने आयुष्य दाखवल. नवीन पासून ते म्हातार होईपर्यंत सगळच. आता प्लास्टिक च्या जमान्यात आणि चिनी आक्रमणात प्रत्येक वर्षी नवीन येणारी कंपासपेटी काय आयुष्य दाखवणार? त्या कार्टून ने बरबटलेल्या आणि बार्बी च्या मध्ये डूबलेल्या कव्हर मध्ये कसली आहे मज्जा? ते करकटक पण आता प्लास्टिक च येते. त्याच टोक पण आता झाकलेल असते. त्या करकटकात कसली आहे भोक पाडायची मज्जा? आता शाळाच हरवली आहे. त्या सोबत शाळेच्या सोनेरी आठवणी जपून ठेवणाऱ्या गोष्टी सुद्धा. आज सई च्या हरवलेल्या कंपासपेटी ने मला माझ्या आयुष्याच्या सोनेरी क्षणांची पुन्हा आठवण करून दिली.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment