Thursday 4 July 2019

झाडांच्या सावलीत... विनीत वर्तक ©

झाडांच्या सावलीत... विनीत वर्तक ©

मुंबईत लहानपणापासून राहिल्याने शहरी वातावरणात लहानाचा मोठा झालो. आजूबाजूला असणाऱ्या लहान मोठ्या इमारती आणि सतत दिसणारी माणसांची वर्दळ ह्या गोष्टी लहानपणीच अंगवळणी पडल्या होत्या. त्या गर्दीतून डोकावणारी एक दोन झाडे हीच काय ती दिलासा देणारी गोष्ट. जिकडे राहणाच्या जागेचे भाव प्रत्येक स्क्वेअर फुटावर ठरतात तिकडे झाडांसाठी जागा ठेवण्याचा प्रश्न येतचं नाही. कारण जो बिल्डींग बांधतो त्याला तेवढी जागा मोकळी ठेवणं परवडत नाही आणि जो घेतो त्याला ह्या जास्तीच्या जागेचा देखभाली खर्च परवडत नाही. त्यामुळेच जुन्या काळाच अस्तित्व घेऊन असणाऱ्या त्या झाडांच्या भोवती चकचकीत असणार कुंपण हीच काय ती त्यांची ओळख. पण ह्यामुळे त्या झाडाची निरागसता मला मुंबई सारख्या शहरात अनुभवता आली नाही.

लहानपणी अनेक गोष्टींनमधे तहानभूक लागल्यावर न्याहरी घेण्यासाठी एखाद्या झाडाच्याखाली बसून अन्नाचा आनंद उपभोगण्याच असलेलं वर्णन माझ्या अंतर्मनात कुठेतरी लपून बसलं होतं. म्हणजे नक्की कसं वाटत असेल? झाडांची सावली तर अनेकदा बघितली पण उन्हाने अंगाची लाही लाही होतं असताना त्या सावलीत बसून, डोळे बंद करून विसावा घेण्याचा आनंद मात्र कधी अनुभवला नव्हता म्हणून ह्या गोष्टीच अप्रूप मला आजवर वाटत आलेलं होतं.

कामाच्या निमित्ताने अनेकदा जगातील अनेक दुर्गम भागात काम करावं लागत असल्याने नेहमी न मिळणारे अनेक अनुभव मला आजवर घेता आले. त्यातला एक म्हणजेच ‘झाडांच्या सावलीत’. दूर दूर पर्यंत फक्त वाळू आणि काही खुरटी असणारी झाडं. वरून आग ओकत अंगाला भाजून काढणारा सूर्यदेव त्यावर ४७ डिग्री सेल्सिअस तपमानात वाहणारी गरम हवा. अंगातील पाणी प्रत्येक क्षणाला शोषून घेत असताना कधी एकदा ह्या सूर्यदेवाच्या नजरेतून आडोश्याला जातो असं मला मनोमन वाटत होतं. ए.सी. ची थंड हवा जरी शरीर थंड करत असली तरी मनाला लागलेले उष्णतेचे चटके मात्र काही कमी होतं नव्हते.

काम करत असताना एक झाडं अचानक दृष्टीक्षेपात पडलं. त्याच्या जवळ गेलो तसा मला काय कोणास ठाऊक पण ते माझ्याशी बोलत असल्याचा भास झाला. बघितलं तर त्याच्या आंगाखांद्यावर जवळपास ५० एक बुलबुल आणि चिमण्या विसावल्या होत्या. त्यांचा चिवचिवाट आणि आवाज ऐकण्यात किती वेळ गेला कळलाच नाही. जवळ गेलो तसा मधमाश्यांची पोळ बनवण्याची धावपळ सुरु होती. अगदी माझ्या हातात येईल इतक्या उंचीवर हजारो मधमाश्या आपलं घर बनवण्यात गुंग होत्या. क्षणभर भीती वाटली पण जोवर आपण त्यांना त्रास देतं नाही तोवर त्या आपल्याला काही इजा करणार नाही असा विचार करून त्या झाडाच्या कुशीत जाऊन बसलो.

त्याच्या बुंध्याला पाठ टेकवत डोळे काही क्षण मिटले आणि ते क्षण वेगळेच होते. त्या आग ओकणाऱ्या उन्हात मला एक वेगळीच अनुभूती मिळाली. पक्ष्यांचा आवाज, गरम हवेच्या झोताने हलणारी बारीक पान आणि झाडाच्या त्या थंड सावलीत काही क्षणात मी ताजातवाना झालो. आताही सूर्य आग ओकत असला तरी त्याची झळ मला अचानक लागत नाही असा भास काही क्षण मला झाला. घड्याळात बघितलं तर अर्धा तास उलटून गेला होता. मी पुन्हा भानावर आलो. जो आनंद क्षणभर वाटला तो गेले ३० मिनिटे मी अनुभवत होतो ह्याचा अंदाज मला आला नाही. लहानपणापासून मनात असलेली झाडांच्या सावलीत एकदा विसावण्याची माझी इच्छा मात्र ह्या निमित्ताने पूर्ण झाली होती. मनोमन त्या झाडाला नमस्कार करून पुन्हा आपल्या कामाला लागलो.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment