पैश्यापलीकडचं जगणं ... विनीत वर्तक ©
लोकांच्या घरी काम करतं त्याचवेळी भाजीपाला विकून शेती करणाऱ्या एका गरीब कुटुंबात तो जन्माला आला. वडील एका ऑइल ट्यांकर वर कामाला. घरात साधी वीज नाही. त्याची सकाळ व्हायची तीचमुळी बाजारात. आपल्या आई सोबत भाजीपाला विकण्यासाठी त्याला सोबत करावी लागत होती. त्यानंतर शेतात काम करावं लागत होतं. वयाच्या १७ व्या वर्षी घराला आधार द्यायला शाळा सोडावी लागली. मिळेल ते काम करायला सुरवात त्याने केली. अगदी पोस्टमन पासून ते गाडीचा ड्रायव्हर पर्यंत. कुठेतरी आतलं मन त्याला शांत बसून देतं नव्हतं.
काम करता करता एक दिवस एका वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीने त्याच लक्ष वेधून घेतलं. एका स्टुडिओ साठी कलाकार हवा होता. त्याने त्यासाठी अर्ज दिला. हाच दिवस त्याच्या आयुष्यातील एक वेगळं वळण घेणारा ठरला. तीन वर्षाच्या करारा नुसार त्याने काम सुरु केलं आणि बघता बघता तो पूर्ण देशाचा लाडका कलाकार ठरला. एका मागोमाग एक यशाच्या पायऱ्या तो चढत गेला. चित्रपटांची रांग त्याच्या मागे लागली. अगदी सातासमुद्रापार त्याच्या अदाकारीने प्रेक्षक त्याला डोक्यावर घेऊ लागले. चित्रपटातील मापदंड मानल्या गेलेल्या ऑस्कर पर्यंत त्याच्या चित्रपटांनी धडक दिली. पैसा, समृद्धी, सुख सगळंच त्याच्या पायाशी लोळण घेतं होतं. पण तो आपल्या आधीच्या दिवसांना विसरला नव्हता. आपल्या गरजा त्याने कधीच वाढू दिल्या नाहीत. तो दिखाव्यासाठी कधीच जगला नाही. त्याने आपल्या आतल्या कलाकाराला कधीच हवेत जाऊन दिलं नाही. तो तसाच राहिला जसा होता अगदी जमिनीवर पाय घट्ट रोवून. (विनीत वर्तक ©)
एक दिवस त्याने पूर्ण जगाला सांगितलं की मी कमावलेला पैसा माझा नाही. ज्या लोकांकडून तो आला त्यांना मी ह्या जगातून जाण्याआधी परत करून जाणार. तो नुसता बोलून थांबला नाही तर तसं जगला. त्याने कधीच पैश्याचा माज केला नाही. अब्जो रुपये असताना पण ना कधी उंची कपडे वापरले ना कधी महागड्या गाड्या ते अगदी मोबाईल फोन. एक, दोन नाही तर तब्बल १७ वर्ष त्याने एकच मोबाईल फोन जो की नोकिया कंपनीचा होता तोच वापरला. शेवटी कंपनी बंद पडल्यामुळे त्याने फोन बदली केला. त्याच्या शब्दात सांगायचं झालं तर,
“I don’t wear clothes for other people. As long as I think it’s comfortable, then it’s good enough for me.”
उंच उंच महालात राहण्यापेक्षा त्याने आपल्या शरीरावर लक्ष दिलं. तो रमला डोंगर दऱ्यांमध्ये . योगा, मेडिटेशन, मार्शल आर्ट ते ध्यान करत अगदी कोणालाही आपल्यासोबत फोटो काढू देताना न त्याला कोणता माज होता न कसला मोठेपणा. तो जमीनीवर जन्माला आला आणि त्याच जमिनीवर जगला. प्रसिद्धी, मोठेपणा ह्या सगळ्याच गोष्टी बाजूला ठेवून जगलेला हा कलाकार म्हणजेच "चाऊ यान फ्याट". (विनीत वर्तक ©)
भारतीयांना हा कलाकार माहित आहे तो त्याने काम केलेल्या एका प्रसिद्ध भूमिकेमुळे. त्यात त्याच नाव होतं "ली-मोबाई" ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या ह्या चित्रपटाचं नाव होतं "क्राऊचिंग टायगर हिडन ड्रॅगन". ह्यात चाऊ यान फ्याट ने केलेली भूमिका पूर्ण जगभर गाजली होती. ह्याप्रमाणे "ए बेटर टुमारो" ह्या चित्रपटातील भूमिका ही त्याची प्रचंड गाजलेली होती.
चाऊ यान फ्याट ने जाण्याआधी आपली सगळी संपत्ती ही लोकांच्या कल्याणासाठी दान करत असल्याचं जाहीर केलं. हा आकडा किती असेल ह्याचा अंदाज केल्यावर आपल्याला चक्कर येईल. तब्बल ७०० मिलियन अमेरिकन डॉलर चाऊ यान फ्याट ने दान करणार असल्याचं जाहीर केलं. भारतीय रुपयात जर आपण ह्याचा अंदाज घेतला तर हा आकडा तब्बल ४८ अब्ज भारतीय रुपयांच्या घरात जातो.
७०० मिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त संपत्ती असलेल्या चाऊ यान फ्याट चा महिन्याचा खर्च फक्त १०० डॉलर च्या घरात आहे. ( जवळपास ७००० रुपये). हे दान करण्याच्या निर्णयाला त्याच्या पूर्ण कुटुंबाने ही सहमती दिली आहे हे विशेष. चाऊ यान फ्याट च्या शब्दात सांगायचं झालं तर,
“The money’s not mine. I’m only keeping it safe for the time being.”
माणूस मोठा होतो तो प्रसिद्धी, पैसा, मानसन्मान किंवा त्याच्या सामाजिक स्थानामुळे नाही तर तो आयुष्य कसं जगतो, तो समाजात कसा वावरतो ह्यावर माणसाचं मोठेपण अवलंबून असते. सुख, आनंद ह्या गोष्टी पैसा विकत घेऊ शकत नाही. आनंदी राहायला तो आनंद दुसऱ्यांना दाखवण्याची गरज नसते. फक्त आपण समाधानी असायला हवं. चाऊ यान फ्याट ने अब्जो रुपये असताना सुद्धा अगदी साधं आयुष्य जगून सगळ्यांपुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. अश्या ह्या कलाकारास माझा कुर्निसात.
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
माहिती स्रोत :- गुगल
फोटो स्रोत :- गुगल
Excellent message
ReplyDeleteGreat great realy great human being on earth.
ReplyDelete