Wednesday 17 July 2019

पुन्हा एकदा सज्ज... विनीत वर्तक

पुन्हा एकदा सज्ज... विनीत वर्तक


१५ जुलै २०१९ रोजी चंद्रयान २ च्या उड्डाणाच्या  ५६ मिनिटाआधी उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे इसरो ला चंद्रयान २ चे उड्डाण स्थगित करावं लागलं होतं. इसरो साठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या ह्या मोहिमेत आलेल्या ह्या तांत्रिक अडचणीमुळे इसरो ला मागे टाकावं लागलं. आलेली तांत्रिक अडचण खूप  नव्हती हे इसरो ला त्याच वेळी कळालं होतं. पण १००% खात्री होईपर्यंत पाऊल पुढे टाकायचं नाही हा एक नियम इसरो ने ह्या मोहिमे बाबत आधीपासून अवलंबला होता. त्यामुळेच चंद्रयान २ ला उड्डाणासाठी उशीर झाला.

क्रायोजेनिक स्टेज साठी इसरो द्रवरूप हायड्रोजन आणि द्रवरूप ऑक्सिजन चा वापर करते. रॉकेट च्या इंधन टाकीत द्रवरूप हायड्रोजन उणे -२५३ डिग्री सेल्सिअस तर ऑक्सिजन उणे -१८३ डिग्री सेल्सिअस ला भरला जातो. त्याला इंजिन प्रज्वलित झाल्यावर कंबशन चेंबर जिकडे हे दोन्ही इंधन मिळून प्रज्वलित होतात आणि बल निर्माण करतात तिकडे नेण्यासाठी हेलियम वायू चा वापर केला जातो. ह्या हेलियम वायू ची टाकी ही ह्या द्रवरूप ऑक्सिजन इंधन टाकीच्या  जवळ असते. ह्या शीत तपमानामुळे ह्या हेलियम वायू च्या एका जॉईंट मधून हेलियम वायू ची गळती सुरु झाली होती. इसरो चं तंत्रज्ञान हे क्लोज लूप सिस्टीम सारखं असल्याने ही गळती इंजिनावर असलेल्या सेन्सर ने ओळखली. त्याचा त्वरित संदेश इसरो च्या कमांड सेंटर ला प्राप्त झाला. ही गळती खूप मोठ्या प्रमाणावर नव्हती. ह्या गळती मध्ये ही रॉकेट च प्रक्षेपण होऊ शकलं असतं. कारण टाकीत असलेला हेलियम हा लागणाऱ्या हेलियमपेक्षा अधिक प्रमाणात भरलेला होता. पण उड्डाण भरताना बसणारे हादरे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर ही गळती वाढली असती तर पूर्ण मोहीम धोक्यात येण्याची शक्यता होती.

इसरो पुढे दोन पर्याय होते एकतर ह्या स्थितीत उड्डाण करणं अथवा उड्डाण रद्द करून नक्की काय झाले? ह्याचा मागोवा घेणं. जेव्हा देशाचे १००० कोटी आणि एखाद्या मोहिमेचं यश आणि अपयश हे संस्थेला  १० वर्ष मागे पुढे नेणार आहे त्यावेळेस इसरो ने १००% खात्री होई पर्यंत पुढे न जाण्याचा निर्णय घेत १५ जुलै चं उड्डाण रद्द केलं. हे करताना लोकांकडून, मिडिया कडून येणाऱ्या संतप्त प्रतिक्रियांची कल्पना इसरो ला नक्कीच होती पण रॉकेट सायन्स आणि तंत्रज्ञान हे दिवाळीचे फटाके उडवण्या इतकं सोप्प नाही हे इसरो ला चांगलं ठाऊक आहे. म्हणून कोणतीही घाई न करता हे उड्डाण पुढे ढकललं गेलं. जी.एस.एल.व्ही. मार्क ३ हे रॉकेट उड्डाण भरताना जवळपास ६९० टन (६,९०,००० किलोग्रॅम ) वजनाचं असते. ह्यावर असणारं चंद्रयान हे जवळपास ३.८ टन (३८०० किलोग्रॅम ) वजनाचं आहे. रॉकेट च्या इतर भागांचं वजन बाजूला काढलं तर बाकी सर्व वजन हे त्यातील इंधनाचं आहे. इतकं सगळं इंधन सुरक्षितरित्या पुन्हा बाहेर काढून रॉकेट वर काम करावं लागणार होतं. १५ जुलै पासून लोकं , मीडिया सगळं विसरून कामाला लागले असले तरी तिकडे इसरो चे अभियंते, वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ रात्रंदिवस काम करत आहेत. जुलै संपण्याच्या आगोदर त्यांना चंद्रयान २ प्रक्षेपित करायचं आहे.

चंद्रयान पाठवण्याची लॉन्च विंडो ३१ जुलै ला संपत आहे. लॉन्च विंडो म्हणजे ज्यावेळी रॉकेट पृथ्वीवरून उड्डाण करून कमीत कमी वेळात आणि इंधनात चंद्रावर जाण्यासाठी वेळ लागेल. प्रत्येक ग्रहाची ही विंडो वेगळी असते. प्रत्येक ग्रहाच, उपग्रहाच सूर्याभोवती, त्या ग्रहाभोवती होणार परिवलन ह्याचं गणित करतं  ही विंडो ठरवली जाते. ३१ जुलै ची विंडो गेल्यावर इसरो ला सप्टेंबर पर्यंत थांबावं लागणार आहे. म्हणून इसरो ची प्रत्येक टीम झालेल्या तांत्रिक अडचणींवर काम करत आहे. इसरो आता तूर्तास ह्या जॉईंट मधली गळती थांबवून पुन्हा एकदा उड्डणांसाठी सज्ज होते आहे. साधारण २१- २२ जुलै ला चंद्रयान २ उड्डाण भरेल असा विश्वास इसरो मधील वैज्ञानिकांना आहे. पण ह्या पुढल्या मिशन साठी इसरो क्रायोजेनिक इंजिनच्या साच्यात बदल करण्याचा विचार करत आहे. हेलियम वायू चा हा जॉईंट द्रवरूप ऑक्सिजन च्या टाकीपासून लांब कसा नेता येईल? अथवा ह्याला ह्या तपमानापासून कसं वाचवता येईल ह्यावर विचार सुरु आहे.

कोणतीही चंद्रयान २ सारखी मोहीम ही  अनेक शाखाचं मिलन असते. शास्त्रज्ञांना अमुक एक उपकरण घेऊन जायचं असते. वैज्ञानिक ते बनवण्याचा प्रयत्न करतात. पण हे बनवलेलं उपकरण रॉकेट मध्ये योग्य रीतीने बसवण्याचं तसेच ते नेण्यासाठी लागणारा उपग्रह, रोव्हर बनवण्याचं काम अभियंते करतात. बरं हे सगळं ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारं गणित, विज्ञान ह्याचा अभ्यास करणं गरजेचं असते. तसेच ह्या उपकरणांशी संवाद, त्यांच्या माहितीची देवाणघेवाण हे अजून वेगळं शास्त्र आहे. रॉकेट मध्ये नुसतं इंधन भरून ते अवकाशात उडवलं असं होतं नाही. प्रत्येक इंधन हे अत्यंत ज्वलनशील असते. त्यांचं योग्य वेळेला प्रज्वलित होणं. लागणार बल निर्माण करणं तसेच ह्या सगळ्या यंत्रणा सुरळीत काम करत आहेत की  नाही ह्यांची इत्यंभूत माहिती क्षणाक्षणाला कमांड आणि कंट्रोल सेंटर कडे पाठवणं हे स्वतःमध्येच एक तंत्रज्ञानातील मैलाचा दगड आहे. ह्या सगळ्या शाखा जेव्हा एकसंध होऊन काम करतात तेव्हाच चंद्रयान सारखी मोहीम आकाराला येते. इसरो अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ने हे सगळं एका पंखाखाली विकसित केलं आहे ते ही जगात सगळ्यात कमी पैश्यात. म्हणूनच ह्याचा अभिमान एक भारतीय म्हणून आपण बाळगायला हवा कारण हे रॉकेट सायन्स आहे. कोणत्याही कठीण गोष्टीला रॉकेट सायन्स म्हणतात ते उगीच नाही.

 आलेल्या अडचणींवर मात करत पुन्हा एकदा इसरो उड्डाणासाठी सज्ज होतं आहे. ह्या मोहिमेत यश अथवा अपयश आलं तरी आपण सर्व भारतीयांनी एकसंधपणे आपल्या वैज्ञानिकांच्या पाठीशी उभं राहायला हवं. इसरो ला चंद्रयान २ मोहिमेच्या उड्डाणासाठी खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की चंद्रावर सॉफ्ट ल्यांड करणारा भारत जगातील ४ था देश लवकरच ठरेल. तूर्तास वाट बघतो आहे इसरो च्या बाहुबली उड्डाणाची.

फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment