Sunday 30 May 2021

'ओयुमुआमुआ'... विनीत वर्तक ©

 'ओयुमुआमुआ'... विनीत वर्तक ©

 'ओयुमुआमुआ' हे नाव वाचायला आपल्याला दोन मिनिटं लागली असतील! तर काय प्रकार आहे हा? 'ओयु-मुआ-मुआ' हा मानवाला ज्ञात झालेला पहिला 'इंटरस्टेलर ऑब्जेक्ट' आहे. 'इंटरस्टेलर ऑब्जेक्ट' म्हणजे काय, हे आपण आधी जाणून घ्यायला हवं. अवकाशातील कोणतीही बॉडी(entity), जी तारा आणि उपतारा ह्यांशिवाय इंटरस्टेलर स्पेस मध्ये आहे, आणि कोणत्याही ताऱ्याशी गुरुत्वाकर्षणामध्ये बांधलेली नाही, त्याला 'इंटरस्टेलर ऑब्जेक्ट' असं म्हटलं जातं. 

'ओयु-मुआ-मुआ' हा असा पहिला 'इंटरस्टेलर ऑब्जेक्ट' आहे. 'ओयु-मुआ-मुआ' हे नाव त्याला शोधणाऱ्या संशोधकांनी दिलं आहे. त्याचा अर्थ होतो, 

“a messenger from afar arriving first”. 

अवकाशात नवीन शोध लावणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्या वस्तू अथवा शोधाला नाव देण्याची मुभा असते. तर 'ओयु-मुआ-मुआ'चा शोध रोबर्ट वेर्याकनी पेन स्टार्स टेलिस्कोप, हवाई इकडून लावला. त्याचा शोध लागला, तेव्हा 'ओयु-मुआ-मुआ' पृथ्वीपासून ३३,०००,००० किमी अंतरावरून प्रवास करत होता. आधी त्याला धुमकेतू असं म्हटलं गेलं. नंतर त्याचं 'इंटरस्टेलर ऑब्जेक्ट' असं नवीन वर्गीकरण केलं गेलं. 'ओयु-मुआ-मुआ' विषयी वैज्ञानिक बुचकळ्यात पडायला अनेक कारणे होती. 'ओयु-मुआ-मुआ'चा आकार सिगारसारखा आहे. साधारण ८०० फूट x १०० फूट. 'ओयु-मुआ-मुआ' हा बर्फाने बनलेला असून त्याचा पृष्ठभाग कार्बनने संपन्न आहे. 'ओयु-मुआ-मुआ'ची कक्षा ही खूपच वेगळी असून, त्याच्या प्रचंड वेगामुळे सूर्याच्या गुरूत्वाकर्षणामध्ये न फसता २६ किमी/सेकंद ह्या वेगाने तो आपल्या सौरमालेतून निघून जाईल. 

'ओयु-मुआ-मुआ' यायच्या आधी वैज्ञानिकांचं असं मत होतं, की अश्या तऱ्हेचे ऑब्जेक्ट जेव्हा सौरमालेतून जातील, तेव्हा धुमकेतूसारखे होतील. बर्फाचे बनलेले असल्याने सूर्याजवळून जाताना बर्फ वितळून मागे त्याचं शेपूट तयार होईल, जसं धुमकेतूचं होतं. पण 'ओयु-मुआ-मुआ'च्या बाबतीत असं काहीच घडलं नाही. सूर्याच्या अतिशय जवळून जाऊनसुद्धा असं शेपूट दिसलं नाही. नवीन संशोधनातून असं दिसून आलं आहे, की त्याचं बर्फाचं आवरण हे ऑरगॅनिक शिल्डने झाकलेलं आहे. त्यामुळे धुमकेतूसारखी शेपूट आपल्याला दिसून आली नाही. 'ओयु-मुआ-मुआ'चा शोध लागला, त्यावेळी त्याचा सूर्याला ओलांडून परतीचा प्रवास सुरू होता, त्यामुळे वैज्ञानिकांना त्याचा अभ्यास करायला खूपच कमी वेळ मिळाला. तरीपण मिळालेल्या कमी वेळात 'ओयु-मुआ-मुआ'ने अभ्यासाची अनेक कवाडं उघडली आहेत. 

एकतर 'ओयु-मुआ-मुआ'चं जन्मस्थान, त्याचं सौरमालेत येणं, त्याचा आकार, त्याचा वेग आणि एकंदर त्याचा रस्ता वेगळा असल्यामुळे आधी हे मानवजातीपेक्षा तंत्रज्ञानात श्रेष्ठ असणाऱ्या एलियन लोकांनी पृथ्वी बघण्यासाठी पाठवलेलं एखादं यान असेल, असं वैज्ञानिकांना वाटलं. पण त्याच्या अभ्यासानंतर असं काही अजून तरी आढळून आलेलं नाही. आपल्या विश्वाचा पसारा इतका मोठा आहे, की खूप कमी गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. 'ओयु-मुआ-मुआ' सारखे ऑब्जेक्ट कधीतरी एकदाच आपल्याला अभ्यासाची संधी देतात. त्यामुळे अनेक ज्ञात नसणाऱ्या गोष्टी ज्ञात होतात आणि एकूणच विश्वाच्या जडणघडणीबद्दल अधिक माहिती मिळते. विश्वाच्या पसाऱ्यात माणूस खूप सूक्ष्म प्राणी आहे. पण आपल्यासारखं कोणीतरी अजून आहे का, ह्या शोधासाठी आत्ता कुठे तो आपल्या घराच्या आजूबाजूला बघायला लागला आहे. 'ओयु-मुआ-मुआ' सारखे ऑब्जेक्ट हे त्याच शोधाचा एक भाग आहेत.

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Thursday 27 May 2021

टौक्टे ते यास चक्रीवादळाची धोक्याची घंटा... विनीत वर्तक ©

 टौक्टे ते यास चक्रीवादळाची धोक्याची घंटा... विनीत वर्तक ©

गेल्या काही आठवड्यात भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यानां दोन वेगवेगळ्या चक्रीवादळांनी धडक दिली आहे. टौक्टे चक्रीवादळाने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तर यास चक्रीवादळाने भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडक दिली आहे. गेले काही वर्ष चक्रीवादळांचा हा सिलसिला भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यांवर मान्सून च्या आधी आणि मान्सून नंतर सुरु झाला आहे. अचानक ही चक्रीवादळं निर्माण कुठून होतात? इतिहासात भारताच्या पश्चिम किनारपट्टी वर अशी वादळ निर्माण होत नसताना आजकाल का ती तयार होत आहेत? भविष्यात काय होणार आहे हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. 

गेल्या पाच शतकात एकट्या भारतात तब्बल १.४ लाख लोकांचा जीव चक्रीवादळात गेला आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळ धडक देण्याचा इतिहास जुना आहे. त्यामागे काही कारणं आहेत. मुळातच बंगालचा उपसागर हा तीन बाजूने जमिनीने वेढलेला आहे आणि त्याचा आकार त्रिकोणी फनेल  सारखा आहे. या आकारामुळे चक्रीवादळांच्या निर्मितीला चालना मिळते. गेल्या २ शतकात जगातील सगळ्या चक्रीवादळांपैकी जवळपास ४३% वादळ ही याच भागात निर्माण झाली आणि त्यांनी एकट्या बांगलादेश मधे २० लाख लोकांचा बळी घेतला आहे. १९७० मधे आलेल्या 'भोला' वादळाने ३ ते ५ लाख लोकांचा बळी  घेतला होता. बंगालचा उपसागर तीन बाजूने तीन देशांनी वेढलेला आहे. भारत, बांगलादेश आणि म्यानमार. या भागातील जमीन ही जवळपास सपाट आहे. तसेच शेतीसाठी पूरक असल्याने हा भाग दाट लोकवस्तीचा आहे. त्यामुळेच चक्रीवादळांनी होणाऱ्या नुकसानीची तीव्रता प्रचंड आहे.    

चक्रीवादळाची निर्मिती होण्यासाठी पृथ्वीच्या वातावरणचा जो भाग महत्वाचा असतो तो म्हणजे ट्रोपोस्फिअर. हा वातावरणाचा भाग जमिनीपासून साधारण ७ किमी. ते २० किमी. उंचीवर असतो. ह्या भागात चक्रीवादळांची निर्मिती होते. बंगाल च्या उपसागराच्या पृष्ठभागाच तपमान हे साधारण २८ डिग्री सेल्सिअस आहे जे की अश्या वादळांच्या निर्मितीसाठी अतिशय योग्य आहे. जमीन सूर्याच्या उष्णतेने लवकर तापून लवकर थंड होते. पण पाण्याच्या बाबतीत ह्याला वेळ लागतो. तपमानातील उष्णतेच्या फरकामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. कमी दाबाचा पट्टा म्हणजे इथल्या हवेच वस्तुमान हे बाजूच्या हवेपेक्षा कमी असते. त्यामुळे जास्त वस्तुमानाची हवा इकडे ओढली जाते. गोल फिरणाऱ्या हवेला योग्य बाष्प मिळालं की त्याचा चक्रीवादळाकडे बनण्याचा प्रवास सुरु होतो. पाण्याच्या पृष्ठभागाच तपमान हे काम करत असते. ह्या बाष्पाच घन स्वरूपात रुपांतर होऊन मग ह्याची तीव्रता वाढत जाते. हे घोंगावणार चक्रीवादळ जेव्हा कोणत्याही जमिनीवर येते तेव्हा त्याचा इंधन स्त्रोत म्हणजे बाष्प संपते. इंधन संपल्यावर तिव्रता कमी झाल्यावर जमवलेला साठा पाऊसाच्या स्वरूपात जमिनीवर पडतो. इंधन म्हणजेच बाष्प आणि उर्जा संपल्याने वादळ शांत होते. बंगाल चा उपसागराच स्थान आणि त्याच तपमान हे त्याच्या चक्रीवादळ निर्मितीमागे प्रमुख कारण आहे. बंगाल चा उपसागर ह्या वादळांसाठी इंधन म्हणजेच बाष्प पुरवतो. 

अरबी समुद्र बंगाल च्या उपसागरापेक्षा २ डिग्री सेल्सिअस ने थंड आहे. हा दोन डिग्री चा फरक इकडे चक्रीवादळांची निर्मिती इतिहासात होऊ देत नव्हता. पण गेल्या काही वर्षात अरबी समुद्राचं तपमान जवळपास १.२ ते १.४ डिग्री सेल्सिअस ने वाढलं आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे झपाट्याने हा बदल झाला आहे. त्यामुळेच अरबी समुद्र आता चक्रीवादळांची निर्मिती करणारी नवीन भट्टी सुरु झाली आहे. २०१९ मधे चक्रीवादळ वायू भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या जवळून गेलं तर २०२० मधे चक्रीवादळ 'निसर्ग' ने महाराष्टाच्या किनारपट्टीवर तांडव केलं आणि आता २०२१ मधे 'टौक्टे' चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या सह्याद्री पलीकडे धडक दिली आहे. यावरून आपण अंदाज लावू शकतो की येणाऱ्या काळात कोणतं संकट भारताच्या दोन्ही किनारपट्यांवर घोंगावते आहे. ग्लोबल वॉर्मिंग ज्या वेगाने वाढते आहे त्याच वेगाने या चक्रीवादळांची तीव्रता वाढत जाणार आहे त्याचसोबत त्यांच्या निर्मितीसाठी लागणारा वेळ कमी होत जाणार आहे.        

सध्या परिस्थिती अशी आहे की एखाद्या कमी दाबाच्या पट्ट्याला एक्सट्रीमली सिव्हिअर सायक्लॉन किंवा चक्रीवादळाचं स्वरूप धारण करायला अवघे २४ तास लागत आहेत. इतक्या कमी वेळात या वादळांच्या धोक्याची सुचना लोकांना देऊन त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा अवधी ही कमी मिळत आहे. काल पर्यंत छोटं स्वरूप असलेला पट्टा एका रात्रीत चक्रीवादळाचे स्वरूप धारण करून भारताच्या दोन्ही किनारपट्यांवर धडक देण्यास सक्षम होतो आहे. एवढ्या कमी वेळात लोकांचे स्थलांतर आणि मालमत्तेचे होणारे नुकसान वाचवणं येत्या काळात कठीण होणार आहे. २० मे २०२० रोजी धडक दिलेल्या चक्रीवादळ 'आम्फान' ने तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान केलं होतं. चक्रीवादळ 'निसर्ग' ने एकट्या महाराष्ट्रात १२,४४० एकर जमिनीवरच्या शेती आणि मालमत्तेचं नुकसान केलं होतं.  

येत्या काळात चक्रीवादळांची तीव्रता आणि त्यांची संख्या वाढत जाणार आहे. प्रत्येकवेळी सरकारी यंत्रणा आणि मदतीवर अवलंबून न राहता ह्या आस्मानी संकटाची तयारी प्रत्येकाने करायला हवी. कारण आपल्यापैकी प्रत्येकजण निसर्गाच्या या रौद्ररूपासाठी कारणीभूत आहे. या संकटाची तीव्रता आणि त्यांच्यामुळे होणारे नुकसान हे पण वाढणार आहे. या आठवड्यात समुद्राच्या मध्यभागी उभं राहून 'यास' चक्रीवादळाचं रौद्र रूप अनुभवलं आहे. तब्बल १०-१५ मीटर च्या लाटा आणि ४०-६० नॉटिकल मैल वेगाने वाहणारे बोचरे वारे जेव्हा निसर्गाचं रूप दाखवतात तेव्हा एक माणूस म्हणून त्याकडे हतबलतेने बघण्यापलीकडे काही करू शकत नाही. 

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





Wednesday 26 May 2021

निरागसता... विनीत वर्तक ©

 निरागसता... विनीत वर्तक ©


लहान असताना जसे मन निरागस असते ना, तसे लहान मुलांची नजर पण निरागस असते. मनातले भाव नजरेत पटकन कळून येतात, म्हणून लहान मुलं पटकन आपलीशी होतात. राग, प्रेम जे काही वाटते, ते त्यांच्या नजरेतून अगदी आपल्यापर्यंत लगेच पोहोचते. मनातले भाव आपल्या एकंदर व्यक्तिमत्वावर खूप काही परिणाम करत असतात. म्हणूनच माणसाचे मन अगदी नजरेतूनही काही वेळा समोर येते. आपण मोठे होत जातो, तश्या अनेक गोष्टी आपल्या विचारांवर प्रभाव टाकतात. काही छोट्या गोष्टीही खूप परिणाम करतात, तर काही सतत समोर आल्याने आपले विचार बदलवतात. त्या विचारांचा प्रभाव इतका प्रचंड असतो, की आपलं मन निरागस विचार करण्याची क्षमता हरवून बसतं. 


आजकालच्या जमान्यात ज्या पद्धतीने गोष्टी समोर आणून टाकल्या जात आहेत, त्यामुळे मनाची निरागसता तर हरवलीच आहे, पण मनात आता गोष्टी विकृततेने भरल्या जात आहेत. त्यामुळे त्याचे  परिणाम आता दिसत असून, माणूस आता माणसाकडे विकृतीमधून बघायला लागला आहे. सुंदरताही विकृत नजरेने समोर येते आहे. विचार पण विकृततेने केला जात आहे. माणूस हळूहळू विकृत मशीन बनला आहे. तेच त्याच्या नजरेतून पण समोर येते आहे. स्त्रीकडे बघताना खरे तर तिच्या सौंदर्याची भुरळ पुरुषाला पडायला हवी. सौंदर्याचे निकष भले वेगळे असतील, पण त्यात नजाकत आणि निरागसता असायची. ती नजर स्त्रीलाही हवीहवीशी वाटते. खरे तर तिचं ते नटणं, छान राहणं, दिसणं ह्याच नजरेसाठी असतं. पण आजकाल नजर सौंदर्यावर न जाता तिच्या उंचवट्यांवर जाते. उंचवटे जितके अधिक आणि त्या कपड्यातून त्याचं उन्नत दर्शन अधिक त्यावर स्त्रीची सुंदरता मोजली जाते. 


किती पुरूषांचं लक्ष आज खऱ्या सौंदर्याकडे जातं? तीच लाजणं, नटणं, ती अदा, ते रूप ह्याकडे किती जण बघतात? बघितलं तरी त्यात ते ओरबाडून घेण्याचा भावच जास्ती जाणवतो. आज काल पहिली नजर जाते ती छातीवर आणि मग पार्श्वभागावर. तिकडे उन्नतता कशी आहे, कपडे कसे आहेत, हे बघून ती किती सेक्सी आहे की नाही ह्याचं अनुमान लावण्यात पुरूषांचं डोकं बिझी असतं. काही अपवाद असतीलही, पण सौंदर्याचं अनुमान हे शरीराच्या उन्नत भागावरून लावताना तिच्या बाकीच्या सौंदर्याकडे त्याची नजरच जात नाही. तिचं ते लाजणं, तिच्याकडे तिरक्या नजरेतून बघणं हे सगळ हरवलं आहे. आपले विचार सुरूच मुळी सेक्सपासून होतात आणि संपतात पण तिकडेच. हे फक्त पुरुषापुरतं मर्यादित नाही, तर स्त्रीसाठी पण हेच लागू आहे. व्यायाम करून दिसणारी छाती आणि सिक्स पॅक आजकाल नजरेत भरतात. बाकी पुरुष कसा का असेना, तरी ह्या गोष्टी त्याला हिरो बनवतात. 


सेक्सला इतकं मशीन बनवलं आहे, की आजकाल इंचांचे आकडे महत्वाचे ठरतात. त्यातील भावना, स्पर्श, प्रेम हे सगळं नंतर येतं, बरेचदा येत पण नाही. पॉर्न बघून डोळ्यासमोर जननेंद्रियांचं इतकं उद्दातीकरण झालं आहे, की दुसरं काही दिसतच नाही. फक्त कधी एकदा त्याचं मिलन होतं आणि मी त्या कळसाकडे कधी पोहोचतो, ह्याची घाई लागलेली असते. बाकी समोर काय दिसते, काय जाणवते, समोरच्याला काय पोहोचते, ह्याचं काहीच सोयरसुतक नाही, म्हणून आजकाल नजरच घाण वाटायला लागली आहे. स्त्री काय, पुरुष काय! बघताना त्यातून मिळणाऱ्या संवेदना फक्त आणि फक्त शरीरापासून सुरु होऊन शरीरावर संपत असतात, मग त्यातून चांगलं वाटणार कसं? एक जोडीदार नसलेले स्त्री आणि पुरूष  बोलले, भेटले किंवा एकत्र असतील तर पहिला विचार लफड्यापासून सुरू होऊन अफेअरपर्यंत संपतो. शाळेतली मैत्रीण किंवा मित्र पुन्हा एकदा कॉफीला भेटले, तर मदतीचा भाग हा एकटेपणावर सुरु होतो आणि शरीरसुखावर संपतो. काही अपवाद असतीलही नक्कीच, पण नजरेतील निरागसता आजकाल जास्ती जाणवत नाही हेच खरं.


सतत तेच तेच बघून आता मनही विकृत बनलं आहे. वयाचा मुलाहिजा आम्ही कधीच बाजूला केला आहे. लहानग्या वयातही आम्हाला शरीर दिसायला लागलं आहे. कोरं फूल मिळावं, म्हणून न उमललेल्या कळ्यांना कुस्करायची स्पर्धा आम्ही लावली आहे. हे कोरं असणं आणि हे मशीन झालेलं मन कसं झालं, ह्याचा विचार करायला तर सोडाच पण हे स्वीकारायलाही आपलं मन तयार नाही आहे. निरागसता यायला आधी मनावर झालेली ही जाळी बाजूला काढायला हवीत. ह्यातून कोणी सुटलेलं नाही, हे अगदी माझ्या तुमच्यापासून सगळेच ह्यात अडकलेलो आहोत. फरक इतकाच, की काही दाखवतात तर काही लपवतात. प्रश्न हा आहे, की आपल्याला ती निरागसतेची जाणीव केव्हा होणार आहे? 


ही जाळी खूप भक्कम आहेत. अशी सहजासहजी ती निघणार नाहीतच. आधी त्याची जाणीव जरी झाली, तरी आपलं एक पाउल पुढे पडलं, असंच मी म्हणेन. निदान जाळीचे विचार आले तरी त्यात आपली निरागसता अडकलेली आहे ह्याची जाणीव ज्या दिवशी होईल, तेव्हा नजरेतही त्याचा फरक दिसेल. माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची ती सुरूवात असेल. लहानपणीचं ते निरागस मन आपण कधीच हरवलं आहे. गरज आहे ती त्याला शोधण्याची आणि त्याच्या नजरेतून बघण्याची.


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Tuesday 25 May 2021

खारे वारे मतलई वारे (भाग १०)... विनीत वर्तक ©

 खारे वारे मतलई वारे (भाग १०)... विनीत वर्तक ©


गेल्या काही आठवड्यांत आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेल्या घडामोडी या बहुतांशी इस्राईल आणि पॅलेस्टाईन संघर्षाभोवती फिरत राहिलेल्या आहेत. त्यातून भारताने या संघर्षाच्या भूमिकेवर घेतलेली भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. एकीकडे त्याच्या समर्थनार्थ लोक सोशल मिडीयावर उतरले आहेत, तर  दुसरीकडे त्याचा विरोध आणि टीकेची झोड उठली आहे. यात कोणाची भूमिका योग्य, हे अर्धा पाण्याने भरलेला ग्लास की अर्धा हवेने भरलेला ग्लास, यातील बरोबर काय? हे ठरवण्यासारखे आहे. ज्याला जे योग्य वाटते, तो प्रत्येकजण तशी भूमिका मांडतो आहे. आपले मत व्यक्त करताना एक लक्षात घेतले पाहीजे, की आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूमिका या लोकांना काय वाटते, याचा विचार करून ठरवल्या जात नाहीत. प्रत्येक देश आपला फायदा बघून आपलं धोरण ठरवत असतात. 

भारत-इस्राईल आणि भारत-पॅलेस्टाईन संबंधांचे वारे हे नेहमीच खारे आणि मतलई राहीले आहेत. जशी परिस्थिती बदलत गेली आहे, तसे वाऱ्यांच्या दिशेत पण बदल झाला आहे. हा बदल नक्कीच भारताचं हित सर्वतोपरी समोर ठेवून केला गेला आहे. भारत-इस्राईल संबंधांसाठी आपण थोडं इतिहासात डोकावलं,  तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ 'अल्बर्ट आईनस्टाईन' यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहून यहुदी लोकांच्या राष्ट्रनिर्मितीसाठी भारताने युनायटेड नेशनच्या जनरल असेम्बलीमध्ये साथ द्यावी, यासाठी समर्थन मागितलं होतं. त्याकाळी भारताला युनायटेड नेशनमधे खूप महत्व होतं. भारताला मिळालेलं सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्वही आपण चीनला बहाल केलं होतं, तो इतिहास आहे. सांगायचा मुद्दा इतका, की युनायटेड नेशनमधे भारत काय भूमिका मांडतो, याला वजन होतं. ते आईनस्टाईन यांना माहीत होतं, पण भारताने त्याकाळी इस्राईलच्या निर्मिती करण्याला विरोध दर्शवला होता.  

भारताच्या इस्राईलविरोधी भूमिकेला अनेक पैलू होते, त्यातील एक म्हणजे पॅलेस्टाईन विरोधात भूमिका म्हणजे मुस्लिम लोकांविरुद्ध भूमिका. भारताला अरब  राष्ट्रांचा रोष ओढवून घ्यायचा नव्हता. भारताची तेलाची मदार अरब राष्ट्रांवर अवलंबून होती. तसेच काश्मीर प्रश्नांवर त्यांचं सहकार्य गरजेचं होतं . या शिवाय इस्राईलच्या बाजूने जाण्याने भारताचा तसा फायदा नसल्याने भारताची तत्कालीन भूमिका नक्कीच योग्य होती. यानंतरच्या काळातही भारताची भूमिकाही पॅलेस्टाईनच्या संघर्षाला समर्थन करणारी राहिली आहे. वर उल्लेख केलेले पदर तत्कालीन काळातसुद्धा महत्वाचे राहिल्याने भारताची भूमिका ही पॅलेस्टाईन समर्थन आणि इस्राईलला विरोध अशी राहिलेली होती. 

आता याचा अर्थ कोणी मुस्लिम लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा भारताच्या राजकारणात राहिलेल्या एका घराण्याच्या एकाधिकारशाहीमुळे, असा काढला तरी तो संयुक्तिक वाटू शकतो. कारण भारताला ज्याला स्वतंत्र भूमिका म्हणतात, ती घेणं या काळात जमलं असतं. ती भूमिका म्हणजे, सपोर्ट पण नाही आणि विरोधही नाही. जेव्हा इस्राईलने १९७१-७२ च्या वेळेस भारताला ज्या पद्धतीने मदत केली. ती बघता भारताने इस्राईल-पॅलेस्टाईन भांडणात तुमच्या घरातलं भांडण तुम्ही मिटवा. आमच्यासाठी तुम्ही दोघेही चुलत भावंडं आहात. तुमच्या आपापसातील भांडणात आमच्या मताची किंमत नाही. आमचा दोघांनाही सपोर्ट आहे आणि आम्ही आमचा फायदा बघू अशी भूमिका कदाचित भारताची या काळात असायला हवी होती असं माझं वैयक्तिक मत आहे. पण वर उल्लेख केला तसा वैयक्तिक भूमिकेवरून संबंध ठरत नसतात.    

गेल्या काही काळात मात्र भारताने या भूमिकेचा स्वीकार केला आहे. ती भूमिका म्हणजे दोघांच्या भांडणात कोणाचीच बाजू घ्यायची नाही. त्याचवेळी दोघांनाही ते आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत हे पटवून द्यायचं. गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावरील संबंध बदललेले आहेत. एकीकडे अरब राष्ट्रांनी इस्राईलशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले, तर त्याचवेळी काश्मीर प्रश्नांवर भारताने जागतिक मताची फिकीर करणं बंद केलं. त्याचवेळी इस्राईल भारताचा तंत्रज्ञान आणि सुरक्षतेतच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सहकारी बनला. एकेकाळी पॅलेस्टाईन नेते 'यासर अराफत' यांचं प्रत्येकवेळी भारतात रेड कार्पेट स्वागत होत असे. प्रत्येकवेळी जेव्हा जेव्हा त्यांनी भारताला भेट दिली तेव्हा भारताच्या पंतप्रधानांनी त्यांना एअरपोर्टवर उपस्थित राहून सन्मान दिला होता. आता तोच सन्मान इस्राईलच्या पंतप्रधानांना ते जेव्हा भारतात आले तेव्हा दिला गेला. 

इस्राईल-पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा भारताकडून अतिशय सावध प्रतिक्रिया देण्यात आली, तेव्हा इस्राईलला भारताने पाठिंबा न दिल्याचा एक सूर सोशल मिडीयावर उमटला. भारताने काय प्रतिक्रिया दिली, याचा अभ्यास न करता अनेकांनी आपली जीभ उचलून त्याचे आपल्याला वाटतात तसे अर्थ काढले. भारताच्या प्रतिक्रियेत दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या होत्या, ज्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. भारताने असं म्हटलं, की आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांच्यासोबत आहोत. हे वाचून अनेकांनी शब्दशः त्याचा अर्थ भारत इस्राईलच्या बाजूने नाही असा काढला. प्रत्यक्षात भारताने आपण इस्राईलच्या संघर्ष किंवा त्यांनी केलेल्या हल्याचा निषेध करतो, असं कोणतंही स्टेटमेंट केलेलं नाही. याच मताच्या दुसऱ्या वाक्यात भारताने हमास करत असलेल्या हल्ल्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पूर्ण वाक्य जर आपण बघितलं तर त्याचा अर्थ होतो, 'आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांसोबत आहोत, पण आम्ही हमासने इस्राईलवर केलेल्या रॉकेट हल्याचा निषेध करतो'. 

आता यातून भारताने आपली स्वतंत्र भूमिका स्पष्ट केली आहे, जी कोणत्या देशाच्या संबंधांवर अवलंबून नाही. आम्हाला त्या दोन देशांनी एकत्र येऊन तोडगा काढावा हे हवं आहे. त्याचवेळी भारत पॅलेस्टाईन लोकांचं समर्थन करतो, पण हमासचं नाही. याचा अर्थ सरळ आहे की इस्राईलने स्वसंरक्षणार्थ केलेल्या हल्याला आमचं समर्थन आहे. आता कोणी म्हणेल, की भारताने हे मोकळेपणाने का नाही मांडलं, तर त्याला काही कारणं आहेत, एक तर भारताला काय वाटते याने इस्राईल आणि पॅलेस्टाईन या दोघांना काही फरक पडत नाही. मग भारताने उगाच समर्थन आणि विरोध करून रोष का ओढवून घ्यावा? इस्राईल इतका समर्थ देश आहे, की ते एकटे संपूर्ण जगाविरुद्ध लढू शकतात आणि जिकडे अमेरिका आणि इतर अरब देशांच्या मताला ते भीक घालत नाही, त्याने भारताच्या मताने काही फरक पडणार नाही. इस्राईलच्या पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये भारताला स्थान दिलं  नाही, म्हणून अनेकांना तो भारताचा निषेध वाटला किंवा इस्राईलला आपण दुखावलं असं वाटलं असेल आणि काही अंशी ते खरं असेलही पण भारताची भूमिका इस्राईलला काय वाटते आणि पॅलेस्टाईनला काय वाटते यावर अवलंबून राहिलेली नाही तर भारताला काय वाटते यावर ती अवलंबून आहे हा स्पष्ट मेसेज जगात गेला. 

भारताने इस्राईलला उघड पाठिंबा देऊन भारताच्या पदरात काहीच पडणार नव्हतं. उलट अरब राष्ट्रांचा विरोध, घरच्या भूमीवर धार्मिक द्वेषाला खतपाणी आणि एकूणच राजकीय नेतृत्वाची प्रतिमा मलीन होण्यापलीकडे काहीही घडलं नसतं. एका ट्विटमुळे भारत-इस्राईल संबंध खराब झाले, याचा आनंद साजरा करणाऱ्यांनी  आधी १९७१ नंतर भारताने ज्या पद्धतीने इस्राईलला वाईट वागणूक दिली त्यावरही काथ्याकूट करावा. मुळात भारताची ही भूमिका दोन्ही राष्ट्रांना योग्य अंतरावर ठेवून आपलं हित साधण्याची आहे. ज्याची पूर्ण कल्पना भारत आणि इस्राईल या दोघांनाही आहे. आंतरराष्ट्रीय संबंधात उतार-चढाव हे परिस्थितीप्रमाणे सुरू असतात, पण याचा अर्थ जर कोणी ते संपुष्टात आले असा काढत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा इतिहासात डोकावण्याची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे. 

भारत-इस्राईल आणि भारत-पॅलेस्टाईन अश्या दोन्ही बाजूवर भारताची भूमिका ही सामन्यांसाठी बुचकळ्यात टाकणारी असली तरी बुद्धिबळाच्या पटावरची ती खूप दूरदृष्टीने खेळलेली चाल आहे, जिकडे दोन्ही बाजूने भारताचं हित आहे. अर्थात हे सोप्पं नाही. आजवर पॅलेस्टाईनकडे झुकलेला भारत आज इस्राईलच्या जवळ आहे. त्याचवेळी पॅलेस्टाईनची बाजू घेऊन इस्राईलला दुखावणं भारताच्या हिताचं नाही. पण आज जरी इस्राईल भारताच्या भूमिकेवर नाराज असला तरी येत्या काळात भारत आपलं वजन एखाद्या दुसऱ्या गोष्टीत इस्राईलच्या बाजूने टाकून त्यांची नाराजी नक्कीच कमी करेल असा मला विश्वास आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात वाऱ्यांची दिशा बदलायला वेळ लागत नाही. म्हणूनच खारे वारे कधी मतलई होऊन वहायला लागतील हे आपल्याला कळणार पण नाही.  

फोटो स्त्रोत :- गुगल  

 सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday 23 May 2021

''का''? ... विनीत वर्तक ©

 ''का''? ... विनीत वर्तक ©

भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांचा वारसा आहे. वेद, रामायण, महाभारत आणि इतर अनेक पौराणिक कथांपासून चालू झालेली ही संस्कृती एकेकाळी संपूर्ण विश्वातली संपन्न अशी संस्कृती होती, हे पूर्ण जग मान्य करते. ह्या सुवर्णकाळाचे अनेक दाखले आजही आस्तित्वात आहेत. स्थापत्त्यशास्त्राची अद्भुत नमुने असलेली अनेक मंदिरे, ज्यात संस्कृतीशिवाय अभियांत्रिकी, गणित तसेच कला ह्या सर्वांचा मेळ आपल्याला आजही दिसून येतो. ज्या देशाने जगाला 'शून्य' ही संकल्पना दिलली, तसेच अनेक अवकाश नोंदी ह्या शिलालेखांवर आणि इतर ग्रंथांत वाचायला मिळतात. हे सगळं ते देऊ शकले, कशामुळे? तर आपलं विज्ञान त्याकाळी प्रगत होतं म्हणून! कारण मनात असणाऱ्या संकल्पना देवळांच्या रूपाने स्थापन करायला, ते विज्ञानाची कास धरल्याशिवाय शक्यच नव्हतं. पण मग असं काय झालं, की विसाव्या शतकात आपण ह्यात एकदम मागे पडलो?
भारतीय संस्कृती मागे पडण्याचं मुख्य कारण म्हणजे विज्ञानाची सोडलेली कास. परकीय आक्रमणं, आपसातील हेवेदावे ही जरी इतर प्रमुख कारणं असली, तरी विज्ञानाची कास सोडून कर्मकांडांत वळलेली संस्कृती ह्या सगळ्यामुळे आपण जास्ती मागे पडलो, असं माझं मत आहे. आपण गोष्टी बघितल्यावर त्याला एका रुपात बसवायला लागलो, ते रूप म्हणजे देव. दैवी शक्ती आणि त्याचं आस्तित्व. नक्कीच एक अशी शक्ती आहे, की जिचं अस्तित्व तेव्हाही होतं आणि आजही आहे. ज्याची पूजा करणे, त्यावर श्रद्धा ठेवणे नक्कीच बरोबर आहे, किंवा ते नक्कीच करावं. पण ते करताना आपण प्रत्येक न समजणारी गोष्ट त्या शक्तीला अर्पण केली, तर आपली अधोगती निश्चित आहे. म्हणजे कैलास मंदिर, वेरूळ सारखी मंदिरे, तसेच 'अंगकोर वाट' सारखं मंदिर ह्याला एक दैवी शक्तीचं देणं आहे, हे नाकारता येत नाही, पण त्यापलीकडे जाऊन त्याकडे बघणं गरजेचं आहे. विज्ञानाची कास आणि त्या विज्ञानातून, गणितातून पूर्णत्वाला नेलेली मानवी स्वप्नांची ती अत्युच्च शिखरं आहेत.
ह्या अदभूत किंवा सांगता न येणाऱ्या शक्तींशी आपण इतके तल्लीन झालो, की विज्ञान आपल्या हातातून निसटलं. आपण “का?” हा प्रश्न विचारायचं सोडूनच दिलं. सगळं देव आणि धर्माच्या नावाखाली लपवलं. ज्या संस्कृतीने हजारो वर्षं ह्या भूतलावर राज्य केलं, ती रसातळाला जायला काही दशकं पुरली. २०व्या शतकाच्या उंबरठ्यावर किंबहुना त्याच्या साक्षीने पुन्हा एकदा आपल्याला विज्ञानाची कास धरणं गरजेचं आहे. कारण ती अद्भुत शक्ती तशीच आहे, त्या काळीही होती आणि आजही! फरक आहे तो आपल्याला पडलेल्या प्रश्नांना आपण प्रतिप्रश्न विचारून उत्तरं शोधतो का?
'झाडावरून पाडलेलं सफरचंद खालीच का पडतं'? हा प्रश्न जेव्हा न्यूटनला पडला, तेव्हा आपल्याला एका अदभूत शक्तीचा म्हणजे 'गुरुत्वाकर्षणाचा' शोध लागला. वाफेच्या शक्तीचा शोध लावणारा जेम्स वॅट असो वा १६व्या शतकात दुर्बिण घेऊन आकाश बघणारा गॅलिलिओ, ह्या सर्वांनी आपल्याला पडलेल्या प्रश्नांना उत्तरं शोधली. ती उत्तरं सापडेपर्यंत विज्ञानाचा हरएक कोपरा धुंडाळून सोडला. मग जे काही समोर आलं, त्याने पूर्ण मानवजातीचं भविष्य बदलवून टाकलं. असे अनेक वैज्ञानिक परदेशात घडत असताना आम्ही मात्र अजूनही आमच्या सुवर्णकाळाचे दाखले देण्यात धन्यता मानत राहिलो. आजही वेगळं काही घडत नाही. आम्ही आजही कारकून बनवतो, जे की सर्वांत स्वस्त, मस्त आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम देतात, ते घडवण्यात आम्ही धन्यता मानत आहोत. ८०%, ९०%, ९९% इथवर पोचलेली आमची कारकुनांची पिढी लवकरच १००% ला गवसणी घालेल असं चित्र आहे. पण हे कारकून खरंच विज्ञानाची कास धरणारे आहेत की विज्ञानाच्या मागे धावणारे आहेत ह्याचा विचार करण्याची गरज नक्कीच आहे.
मुळात पाय (π) म्हणजे काय? पाय-ची किंमत ३.१४२ का? प्रकाशात ७ रंगच का? असे अनेक साधे प्रश्न ह्या कारकुनांना विचारले, तर चेहऱ्यावर प्रश्न उभे राहतील. कारण विज्ञानात उत्तरं शोधावी लागतात, ती पाठ करून विज्ञान येत नसते. पण आजही आपण एकतर अश्या प्रश्नांना फालतू मानतो, किंवा इतक्या सोप्प्या गोष्टींची कास धरावी असं आपल्याला वाटत नाही, पण इथेच खरा घोळ आहे. '३ इडियटस्' चित्रपट आपण सगळेच बघतो, पण आपला पाल्य त्यातला एक नसावा असं सगळ्यांना वाटतं. कारण शेवट चांगला असला, तरी 'एका दिवसात यश मिळविण्यासाठी हजारो रात्रींचा त्रास माझ्या पाल्याने सहन का करावा?' हा प्रश्न प्रत्येक पालकाला पडलेला असतो. म्हणूनच आपण अजून त्या सुवर्णकाळापासून कोसो मैल लांब आहोत, हे पुन्हा एकदा उघडपणे मान्य करावं.
आमच्याच सुवर्णकाळाच्या साक्षीदार असणाऱ्या गोष्टींबद्दल आम्हालाच माहिती नाही, इतकी आपली पातळी खालची आहे. 'अंगकोर वाट' हे आपलं मंदिर आहे? ते कुठे आहे? असा प्रश्न असतो. 'कैलास लेणी' बघितली का? तर, हो बघितली असं उत्तर सगळे देतात. पण तिकडे असणारा दगडी पूल कसा बांधला? किंवा साधारण किती टन खडक त्यातून काढला असेल? किंवा त्याच जागी मंदिर का बांधलं गेलं? असले प्रश्न आम्हाला पडत नाहीत. आधी कळस आणि मग पाया बांधताना कोणत्या गोष्टींचा विचार केला गेला असेल? त्यात कोणत्या अडचणी आल्या असतील? अश्या अनेक प्रश्नांचा मागोवा घेणं आमच्या रक्तात नाही, हे सत्य आहे. कारण त्याचा विचार करून काय मिळणार? असे आपले विचार असतात. आपण उत्तरं शोधत नाही, म्हणून आपलं उत्तर ठरलेलं असतं, 'दैवी शक्ती'. जिकडे सगळेच प्रश्न सोडवले जातात नाही का?
जगातील अनेक देश प्रगत झाले, कारण त्यांनी विज्ञानाची कास धरली. देव किंवा अद्भुत शक्तीची नाही. त्या शक्तीचं आस्तित्व आजही आहे. काही गोष्टींची उत्तरं विज्ञान नाही देऊ शकत, यावर श्रद्धा असणं, त्यात काही चुकीचं नाही. पण सगळ्याच उत्तरांसाठी त्या शक्तीपुढे शरण जाणं हेही तितकंच चुकीचं आहे. उद्याचा भारत जर पुन्हा एकदा सुवर्णकाळ दाखवणारा बनवायचा असेल, तर विज्ञान आणि श्रद्धा ह्या दोघांची कास असल्याशिवाय हे शक्य नाही. श्रद्धा तर आपली असतेच, गरज आहे ती विज्ञान समजून घेण्याची, सुरूवात आपल्या स्वतःपासून करण्याची, पडलेल्या प्रत्येक “का” ला उत्तरं शोधायला सुरूवात करण्याची. आपल्या पुढल्या पिढीला ह्या “का”च्या पाठीमागे धावण्याची सवय लावली, तर पुन्हा एकदा भारत संपूर्ण विश्वात सुखीसंपन्न देश असेल ह्याविषयी शंका नाही.
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Friday 21 May 2021

चुकलेला जमाखर्च... विनीत वर्तक ©

 चुकलेला जमाखर्च... विनीत वर्तक ©

काल एका प्रतिथयश पेपरात बॉलिवूड मधे करणाऱ्या मॉडेल च मनोगत वाचत होतो. कोरोना ने कश्या पद्धतीने आयुष्य होत्याच नव्हतं केलं. गेली अनेक वर्ष आपल्या सौंदर्याने आणि अदांनी अनेकांना घायाळ करत पैश्याच्या राशीवर लोळणारी तिला आज कुठेतरी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. कोरोना च वाढलेलं संक्रमण आणि त्यामुळे शासनाने केलेल्या लॉकडाऊन मुळे संपूर्ण चित्रपट सृष्टी आणि त्याच्याशी संल्गन असणाऱ्या उद्योगांचा बोजवारा उडालेला आहे. किंबहुना अनेक उद्योगांची आज तीच दशा आहे. हे झालं उद्योगांच पण स्वतःच्या जमाखर्चाचा ताळमेळ ठेवायला ही आजकाल अनेक लोकांना कठीण जात आहे. वरच्या मॉडेल च उदाहरण त्याचेच एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. 

'अंथरूण पाहून पाय पसरावे' अशी एक म्हण जुन्या काळात प्रचिलित होती. पण पॉझिटिव्ह थिंकिंग ची दुकान चालवणाऱ्यांनी आजच्या काळात तीच स्वरूप बदलून 'आपलं अंथरूण मोठं करावं' असं एक नवीन स्वरूप सगळ्यांसमोर सादर केलं. अर्थात ते किती चूक आणि बरोबर याचा अर्थ यातील अभ्यासक लोकं  काढतील पण ते अंथरूण मोठं करण्याच्या नादात आपल्या पायांची आपण किती दमछाक करतो आहोत याचा विचार कोणीच केला नाही. पायाची लांबी काय प्रत्येक वर्षी वाढत नाही मग स्थिर असणाऱ्या पायांना अंथरूण तरी किती मोठं लागणार? आपल्या दैनंदिन गरजा खरे तर किती लहान असतात पण अंथरूण मोठं करणाच्या नादात आपण त्या इतक्या वाढवून ठेवतो की त्याच वाढलेलं स्वरूप आपल्याला भारी पडते. 

कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण जगाचे ठोकताळे बदललेले आहेत आणि त्यात अजूनही बदल होत आहेत. नक्कीच त्याचा फटका आर्थिक पातळीवर आपल्यापैकी प्रत्येकाला बसलेला आहे किंवा बसणार आहे. अचानक आलेली मंदी, आटत चाललेली पैश्यांची आवक, बंद पडलेला धंदा, नोकरी टिकवण्याची धडपड ते महिन्या अखेरीला मिळणाऱ्या पगारावर अस्थिरतेचे घोंघावणारे वादळ अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर पैश्याचा विनिमय ही सगळ्यात मोठी समस्या बनत चाललेली आहे. कारण अश्या कोणत्याच परिस्थितीचा आपण कधी विचार केला होता न आपली काही तयारी होती. एकेकाळी प्रत्येक आठवड्याला माणसांनी भरून वाहणारे मॉल, चित्रपटगृह, बीच, आणि विकेंड डेस्टिनेशन आज पूर्णपणे बंद पडलेले आहेत. पुन्हा ते कधी चालू होतील आणि त्याच स्वरूप पूर्वी सारखं असेल  का? या बद्दल आज कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे अश्या अनेक गोष्टींशी निगडित असणारे आपण कळत  नकळत या अस्थिरतेच्या चक्रात ओढले गेलो आहोत.  

आज भलीमोठी कर्ज घेऊन उभारलेली घर फक्त स्वप्नात उरली आहेत. पण कर्जाचे हप्ते मात्र डोईजड व्हायला लागले आहेत. दुसऱ्या घराची स्वप्न बघताना पहिल्या घराच्या खर्चाच्या शिलकीतून सगळे पैसे अंथरूण मोठं करण्यात गुंतवल्याने आता त्या मोठ्या अंथरुणाचा भार पेलवेना झाला आहे. एकतर ते स्वप्नात कुठेतरी राहिलं आहे किंवा प्रत्यक्षात उतरलं तरी तिथे जायचे वांदे आहेत. स्टेटस, श्रीमंती आणि उच्च राहणीमान जगणाच्या आणि दाखवण्याच्या नादात आपण आपल्या ठेवणीतल्या रकमेला कात्री लावली आहे. आज अचानक जेव्हा काही महिन्यांसाठी किंवा काही आठवड्यांसाठी आपल्या नियमित मिळकतीला  कात्री लागते तेव्हा आपण त्यातून सावरू शकत नाही हे वास्तव आज सगळीकडे प्रखरतेने दिसत आहे.      

ही परिस्थिती का आली? याचा विचार केला तर त्याच उत्तर आपल्या पसरवलेल्या अंथरुणात आहे असं माझं स्पष्ट मत आहे. उद्या जर का माझी नोकरी किंवा व्यवसाय मला पुढले काही महिने अपेक्षित उत्पन्न देऊ शकला नाही तर मी अश्या परिस्थितीत किती आठवडे अथवा महिने एक चांगल राहणीमान जगू शकतो? हा विचार आपण आपल्या जमाखर्चात करणं बंद केलेलं आहे. माझ्यावर अडचणीची परिस्थिती आली की जिकडे हॉस्पिटल सारखे खर्च अश्या अनपेक्षित खर्चाला आपल्याला सामोरं जावं लागलं तर त्याची काय तजवीज आपण केली आहे? याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. नुसतं मेडिक्लेम आहे म्हणून पुढे जाण खूप भारी पडू शकते. कारण मेडिक्लेम चा क्लेम दिसतो तितका सरळ नसतो हे वास्तव आपण कधी स्विकारणार आहोत? माझ्याकडे १ आणि २ कोटींचा मेडिक्लेम आहे असं म्हणणारे प्रत्यक्षात त्याच्या १०% रक्कम तरी खात्रीने पॉलिसी विकणाऱ्या कंपन्यांकडून मिळेल याची खात्री देऊ शकतात का? अपवाद असतील पण अनेकदा या न त्या कारणाने क्लेम ची रक्कम मिळत नाही हे वास्तव आहे. मग अश्या परिस्थिती मधे आपण काय करणार आहोत? आपल्याकडे काही प्लॅन बी आहे का? 

आजवर जमाखर्चाच्या रकान्यात आपण आपल्या स्वप्नानसाठी जागा ठेवत आलो. पण स्वप्नांच्या मृगजळात आपण वास्तवापासून कधी लांब गेलो याच भान आपल्याला राहिलं नाही. कोरोनाने ती जाणीव आपल्याला करून दिली आहे. आज नाइके चे शूज, गुची ची बॅग, लिव्हाइस ची पॅन्ट, रोलेक्स च घड्याळ किंवा ऍपल चा फोन सगळं निपचित घरात पडलेलं आहे. लग्नात दाखवण्यासाठी मानपानासाठी खर्च केलेले करोडो रुपयांची आठवण आज घरातले लोकं पण काढत नाहीत तिकडे बाकीच्यांच सोडून द्या. आज स्वप्नातलं घर, गाडी, स्टेटस सगळं तिथल्या तिथे पसरलेलं आहे. पण त्या पसरलेल्या अंथरुणाच्या खाली विसावणारे पाय मात्र दोन वेळच्या जेवणासाठी वणवण करत आहेत. नक्की आपल्याला काय हवं हे लक्षात आलं की मिळालेल्या अंथरुणात पण अश्या अडचणीच्या काळात सुखाने पाय पसरता येतात फक्त आपल्याला जमा खर्चाचा हिशोब जमवता यायला हवा.      

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Wednesday 19 May 2021

'लाय टू मी' ... विनीत वर्तक ©

 'लाय टू मी' ... विनीत वर्तक ©

गेले अनेक दिवस “लाय टू मी” नावाची अमेरिकन सिरीज बघतो आहे. अमेरिकन सिरीज नेहमीच एक वेगळाच विषय घेऊन समोर येतात. त्याच पठडीतील चुकवू नये अशी ही सिरीज आहे. जगातील नावाजलेले सायकॉलॉजीस्ट पॉल एकमन यांच्या 'ह्युमन एक्स्प्रेशन'च्या अभ्यासावर ही सिरीज बेतलेली आहे. अप्लाइड सायकोलॉजी, मायक्रोएक्स्प्रेशन, फेशियल कोडींग सिस्टीम, बॉडी लँग्वेज या सगळ्यांचा अभ्यास करून गुन्ह्यांची उकल करण्यावर ही संपूर्ण सिरीज प्रकाशझोत टाकते.

ह्यातील प्रत्येक एका विषयात एक स्वतंत्र पी. एच. डी. होऊ शकेल. ह्यामुळेच माणसाला समजणे किती अवघड आहे, हे सिद्ध होते. खरे तर 'एक्स्प्रेशन' हे मानवाला इतर प्राण्यांपेक्षा लाभलेलं वरदान आहे. म्हणून तर प्रेमाचीही इतक्या वेगवेगळ्या लेव्हलवर आपण अनुभूती घेऊ शकतो. न बोलता सुद्धा भावनांची अनेक आंदोलनं जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचवू शकतो. अजूनही आपण या शक्तीबद्दल पूर्णतः अनभिज्ञ आहोत. ह्याचा वापर आपण करू शकलो, तर अनेक गोष्टींचं आकलन आपल्याला खूप आधी तर होईलच, पण एकमेकांना न बोलता, न सांगता समजून घेण्यासाठीसुद्धा ते वरदान ठरेल.

“लाय टू मी” एक क्राईम इनव्हेस्टीगेशन सिरीज आहे. ज्यात एका डॉक्टरचा उपयोग गुन्हेगारांच्या ह्याच एक्स्प्रेशनस् चा अभ्यास करण्यासाठी केला जातो. आपल्या अभ्यासातून हा डॉक्टर पोलीस, गुप्तहेर यंत्रणा ह्यांना अनेक गुन्ह्यांची उकल करण्यास मदत करतो. सिरीज जरी आभासी असली, तरी त्यात अंतर्भूत केलेला अभ्यास मात्र वास्तववादी आहे. आपले मत मांडताना कोणत्या गोष्टीवरून हे मत झालं, हे सांगायला डॉक्टर विसरत नाही. तसेच ते बळकट करण्यासाठी आधी घडून गेलेल्या काही गोष्टींचा आधारही घेतो. म्हणजे खोटं समोर आल्यावर माणसाच्या चेहऱ्याची बदलणारी ठेवण, मग त्यात सगळं आलं. डोळे, भुवया, ओठ, तोंड, कान, कपाळ त्यासोबत हाताच्या हालचाली, उभं राहण्याच्या पद्धतीपासून ते आवाजातील बदलांपर्यंत सगळं.

इतका प्रचंड मोठा हा अभ्यास आहे, की प्रत्येक नवीन एपिसोड आपल्याला वेगळं काहीतरी शिकवून जातो. अनेक वेळा हे ठोकताळे बरोबर येतीलच असं नाही, पण हे गणित नाही. दोन अधिक दोन नेहमीच चारच होतील असे नाही. कारण प्रत्येक वेळेला परिस्थितीचे अनेक कंगोरे त्याला चिकटलेले असतात. त्यामुळे मांडलेला ठोकताळा नेहमीच अपेक्षित उत्तरच असेल असं नाही. पण हे सगळं असतानाही माणसांना अनेक वेगळ्या पद्धतीने ओळखायला, समजून घ्यायला मात्र आपण नक्की शिकतो.

'मायक्रोएक्स्प्रेशन' म्हणजे अनेकदा कळत नकळत आपल्या चेहऱ्यात छोटे छोटे बदल अगदी पटकन होतात, जसं भुवई वरती जाणं. हे घडलेल्या घटनांवर अवलंबून असतं. या आणि अश्या अनेक असंख्य बदलांचा केलेला अभ्यास हा आपल्याला अनेक न बोलल्या गेलेल्या गोष्टीही सांगू शकतो. काही एक्स्प्रेशन असे असतात, की ते सगळ्यांत आढळून येतात, म्हणजे खोटं बोलताना. मग अश्या एक्स्प्रेशनस्-चा अभ्यास करून काही न सांगितलेल्या गोष्टी मनातून काढता येतात. ह्याचा अभ्यास म्हणजेच 'फेशिअल कोडींग सिस्टीम', शेवटचा पण अतिशय महत्वाचा भाग म्हणजे 'बॉडी लँग्वेज'. याबद्दल खूपदा लिहीलं गेलं आहे. कारण ह्यावरून पूर्ण व्यक्तिमत्वाचं  रिफ्लेक्शन समोरच्या व्यक्तीवर पडत असते. ही त्रिसूत्री म्हणजे माणसाला ओळखण्याचा डी.एन.ए. आहे.

डॉक्टर पॉल एकमन यांनी अश्या १०,००० पेक्षा जास्ती 'फेशियल एक्स्प्रेशनस्-चा' अभ्यास करून अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. 

"The best human lie detector in the world" 

अशी बिरुदावली मिळवणारे डॉक्टर आणि त्यांच्या अभ्यासावर बसलेली "लाय टू मी" ही सिरीज बघावी अशीच आहे.

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday 17 May 2021

इस्राईल आणि पॅलेस्टाईन एक रक्तरंजित इतिहास (भाग २)... विनीत वर्तक ©

 इस्राईल आणि पॅलेस्टाईन एक रक्तरंजित इतिहास (भाग २)... विनीत वर्तक ©

१९४८ मधे इस्राईल ने जेरुसलेम आणि आजूबाजूचा भूभाग जिंकून आपलं राष्ट्र स्थापन केलं पण कोणत्याही ठोस करार इस्राईल आणि अरब राष्ट्र यांच्यात न झाल्यामुळे इस्राईल आणि पॅलेस्टाईन वाद हा सुरूच राहिला. युनायटेड नेशन ने हस्तक्षेप करून सुद्धा याच समाधान करणार उत्तर काढता येत नव्हत. इकडे इस्राईल आणि पॅलेस्टाईन पुन्हा एकमेकांसमोर उभे राहिले. १९६७ साली इस्राईल ने पुन्हा ज्याला 'सिक्स डेज वॉर' म्हणतात ते युद्ध अरब लोकांशी केलं. ज्यात इस्राईल ने पुन्हा एकदा सगळयांना पाणी पाजताना गाझा पट्टी आणि पेनिनसुला इजिप्त कडून जिंकलं तर वेस्ट बँक आणि पूर्वेकडील जेरुसलेम वर आपला हक्क प्रस्थापित केला. इस्राईल ने जिंकलेला सर्व प्रदेश पुन्हा एकदा अरब राष्ट्रांना देण्याचं एका अटीवर मान्य केलं ती अट म्हणजे अरब राष्ट्र इस्राईल च सार्वभौमत्व स्वीकारून या भागात शांतता प्रस्थापित करतील आणि सगळ्या धर्माच्या लोकांना आपापल्या पवित्र ठिकाणांना भेट देता येईल. पण अश्या कोणत्याही तहाला अरब राष्ट्रांनी केराची टोपली दाखवली. 

इजिप्त ने मात्र इस्राईल शी शांततेचा करार करताना इस्राईल ला नवीन देश म्हणून मान्यता दिली. इस्राईल ने त्याच्या मोबदल्यात जिंकलेला पेनिनसुला चा भाग इजिप्त ला परत केला. पण इस्राईल ने इतर सर्व जिंकलेला भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. १९६७ पासून कित्येक मिलियन पॅलेस्टाईन लोक हे इस्राईल च्या राजवटीखाली आले. अरब राष्ट्रांनी किंवा तिथल्या धार्मिक मुस्लिम जनतेने इस्राईल चा तह न स्विकारल्यामुळे परीस्थिती चिघळत गेलेली आहे. मुस्लिम लोकांना तिथल्या भागावर मुस्लिम राजवट हवी आहे. तर इस्राईल यहुदी लोकांची वस्ती ईस्ट जेरुसलेम भागात वाढवत आहे. गेल्या कित्येक वर्षात यहुदी म्हणजेच इस्राईल लोकांनी इकडे खूप साऱ्या बिल्डिंग बनवल्या. आपली लोकवस्ती वाढवत नेली. आता अशी परिस्थिती आहे की जे समाधान इस्राईल १९६७ साली देत होती ते आता इस्राईल ला करणं पण शक्य नाही. इस्राईल ने आपल्या भागात असणाऱ्या पॅलेस्टाईन लोकांना इस्राईल च्या भागात राहण्याची मुभा दिली आणि ते लोक नागरीकत्व  मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात असंही सांगितलं पण नक्कीच ही सगळी प्रक्रिया इतकी सोप्पी नाही. 

 १९८७ साली पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी एकत्र येऊन 'हमास' या संस्थेची स्थापना केली. हमास च उद्दिष्ठ हे इस्राईल कडून त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या गाझा, वेस्ट स्ट्रीप आणि ईस्ट जेरुसलेम चा हक्क हिसकावून घेणं आणि मुस्लिम शासन व्यवस्था प्रस्थापित करणं . जेरुसलेम मधे फक्त आणि फक्त मुस्लिम धर्मातील लोकांना पवित्र स्थानी जाण्याचा हक्क आणि बाकीच्या धर्माच अस्तित्व संपुष्टात आणणं हे हमास च अजून एक उद्दिष्ठ आहे. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची हमास ची तयारी आहे. २००६ साली हमास ने गाझा पट्टीत निवडणूक जिंकून आपलं नियंत्रण गाझा पट्टीत प्रस्थापित केलं. त्यानंतर त्यांनी तिकडे इस्राईल विरुद्ध अतिरेकी कारवाया करायला सुरवात केली. इस्राईल ने २०१५ मधे गाझा पट्टी मधून आपलं सैन्य मागे घेतलं आणि अश्या रीतीने हमास कडे गाझा पट्टीच संपूर्ण नियंत्रण आलं. 

हमास ला ह्या यशामुळे आपण आपल्या अतिरेकी अथवा शस्त्राच्या धाकाने इस्राईल च वर्चस्व संपुष्टात आणू असं वाटायला लागलं. त्याचाच भाग म्हणून हमास ने अजून भूभाग ताब्यात घेण्याची तयारी सुरु केली. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की गाझा पट्टीतील पॅलेस्टाईन लोकांवर अन्याय केल्याचा आरोप इस्राईलवर जागतिक समुदायाकडून केला गेला पण इस्राईल ने तो कधीच मान्य केला नाही. इस्राईल ने यहुदी लोकांच्या बदल्यात पॅलेस्टाईन लोकांचा बळी दिला असं एक प्रवाह आहे त्यालाच हवा देऊन हमास ने गाझा पट्टी मधे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. हमास सामान्य लोकांना वेठीस धरून आपल्या अतिरेकी कारवायांना सफल करत आलेली आहे. ज्या प्रमाणे काश्मिरी जनता आणि तिथले काही प्रस्थापित नेते दरवाज्या आडून पाकिस्तान च समर्थन करून अतिरेक्यांना शरण देतात तसला हा प्रकार आहे. 

इस्राईल मधे भारतात असलेले बुरखाधारी आणि परकीय शक्तीची मदत घेऊन देश पोखरणारे नेते, लोकं आणि मानवतेच्या नावाखाली सोशल मिडिया आणि रस्त्यावर उतरणारी पिलावळ नाही. त्यामुळे देशाच्या विरुद्ध कारवाई करणाऱ्या प्रत्येकाला इस्राईल घरात घुसून मारतो. ह्यात इस्राईल हयगय करत नाही. हमास त्याचवेळी गाझा पट्टीत असलेल्या निष्पाप नागरीकांचा सहारा घेऊन इस्राईल वर हल्ला करते. इस्राईल ला प्रत्येकवेळी सैन्य एखाद्या भागात पाठवून कारवाई करणं शक्य नसल्याने इस्राईल मिसाईल, ड्रोन आणि आपल्या अदयावत तंत्रज्ञानाने गाझा पट्टीच्या भागात लपलेल्या हमास च्या अतिरेक्यांवर कारवाई करते. त्यात निष्पाप नागरिकांचा बळी जातो. २०१४ मधे ५० दिवस चाललेल्या युद्धात २२०० पॅलेस्टाईन लोकांचा बळी गेला आणि फक्त ७३ इस्राईल चे लोक यात मारले गेले. पॅलेस्टाईन मधे  मारल्या गेलेल्या सर्व लोकांमध्ये ५०% हे सामान्य नागरीक होते. गाझा  पट्टीत वसलेल्या २ मिलियन पेक्षा जास्त लोकांना वापरून हमास आपले हल्ले करत असते. आपल्या अतिरेकी संघटनेचा पाया वाढवण्यासाठी तिथल्या गरीब तरुणांना धर्माच्या नावाखाली अतिरेकी कारवायांसाठी तयार करते. जेव्हा इस्राईल वर हल्ला केला जातो तेव्हा उत्तरात हमास च्या अतिरेक्यांसोबत त्यांना मदत करणारी निष्पाप माणसंही मृत्युमुखी पडतात. 

इस्राईल- पॅलेस्टाईन संघर्षाचं समाधान अरब राष्ट्रांना नको आहे. समोर माणुसकीचा भाव आणणारे अरबी आणि मुस्लिम राष्ट्र मागच्या दाराने हमास ला मिसाईल आणि दारुगोळा पुरवत आहेत. एकट्या गाझा पट्टीत हमास ने तब्बल ३०,००० रॉकेट, मोर्टार चा साठा इस्राईल च्या दिशेने तयार ठेवला आहे. प्रत्येक क्षणी इस्राईल नागरीक आणि इस्राईल या हजारो रॉकेट च्या टप्यात आहे. नकाशा बघितला तर गाझा पट्टी इस्राईल अगदी खेटून आहे. त्यामुळे इस्राईलच्या नागरिकांना प्रत्येक रात्र आणि दिवस डोळ्यात तेल घालून आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सज्ज रहावं लागते. हमास ला हा शस्त्र पुरवठा इजिप्त, लिबिया, इराण अश्या अनेक देशांकडून केला जातो. इराण कडून मोठ्या प्रमाणावर मिसाईल हमास ला पुरवली जात आहेत. अश्या वातावरणात इस्राईल कडे एकच पर्याय होता तो म्हणजे स्वतःला सुसज्ज ठेवणे. त्यासाठी इस्राईल ने तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केली. आयर्न डोम सारखं तंत्रज्ञान देशाच्या सुरक्षिततेसाठी तयार केलं त्याचवेळी जगातील सर्वात चांगली आणि सुसज्ज अशी गुप्तचर संघटना ज्याला अमेरिका पण सलाम करते ती 'मोसाद' तयार केली. जिच्यामुळे आपल्यावर होणाऱ्या प्रत्येक कारवाईसाठी इस्राईल तयार असतो. 

२०२१ मधे रमजान च्या महिन्यात जेरुसलेम मधे अल अकसा मशिदी च्या भागात नमाज करण्यासाठी इस्राईल च्या सैनिकांनी सुरक्षेच्या आणि अतिरेकी कारवाया घडण्याची शक्यता लक्षात घेऊन बंदी घातली. त्याचा परिणाम इथल्या भागात असंतोष वाढवण्यासाठी झाला. इस्राईल च्या कारवाई विरोधात मोर्चे निघाले आणि इस्राईल चा बदला घेण्याची भाषा हमास ने सुरु केली. इराण ने याला खतपाणी घातलं आणि असंतोषाचा वणवा पेटत गेला. इस्राईल वर हमास ने रॉकेट ने हल्ले केले. शेवटी इस्राईल ला युद्धाची भाषा बोलावी लागली आणि आता एकदाच काय ते हमास आणि त्याच्या अतिरेक्यांना संपवण्यासाठी इस्राईल ने पावलं उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून इस्राईल ने गाझा पट्टीत मिसाईल आणि ड्रोन ने मारा सुरु केला आहे. ह्या सगळ्यात निष्पाप लोक ही बळी पडत आहेत हे सत्य आहे. इस्राईल ला सैनिकी कारवाईसाठी भाग पाडलं गेलं आहे जसं भारताला बालाकोट मधील कारवाईसाठी भाग पाडलं गेलं होतं. या युद्धाचा शेवट काय होईल हे सध्यातरी सांगणं कठीण आहे. पण इस्राईल आता आर-पार ची लढाई करेल असं सध्यातरी दिसत आहे. ह्यात निष्पाप नागरिक दोन्ही बाजूचे मृत्युमुखी पडणार हे उघड आहे. 

जेरुसलेम आणि तिथलं पावित्र्य टिकवणं हे सगळ्यांची जबाबदारी होती. पण फक्त मलाच हक्क हवा या स्वार्थापोटी तिन्ही धर्मातील विशेष करून यहुदी आणि मुस्लिम धर्मातील निष्पाप लोक बळी पडत आहेत. हे सगळं थांबवता येऊ शकलं असतं पण तसं  करण्याची तयारी कोणत्याच देशाची नाही. एकीकडे इस्राईल आपल्यावर होणाऱ्या अतिरेकी कारवाईसाठी लढा देत आहे तर दुसरीकडे हमास धार्मिक भावनांना पेटवून जेहाद च्या लढाईत उतरली आहे. इस्राईलकडे असलेलं तंत्रज्ञान लक्षात घेता हमास च पानिपत नक्की आहे. पण त्या पानिपतात गाझा पट्टीतील जनता बळी  पडणार आणि त्याचे परीणाम  भोगणार हे पण निश्चित आहे. येत्या काळात इस्राईल आणि पॅलेस्टाईन चा इतिहास अजून रक्तरंजित झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. 

समाप्त.       

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday 16 May 2021

इस्राईल आणि पॅलेस्टाईन एक रक्तरंजित इतिहास (भाग १)... विनीत वर्तक ©

 इस्राईल आणि पॅलेस्टाईन एक रक्तरंजित इतिहास (भाग १)... विनीत वर्तक ©

सध्या सुरु असलेल्या इस्राईल आणि पॅलेस्टाईन संघर्षावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. घरामध्ये बसून नकाशात हे दोन्ही भूभाग कुठे आहेत? संघर्षाची पार्श्वभूमी काय? नक्की कोण चुकीचं आणि कोण बरोबर? याचा अभ्यास न करता अनेकजण सोशल मिडिया मधून आपली मत बिनदिक्कतपणे ठोकून देतं आहेत. मानवतेचा बुरखा धारण करून समर्थन अथवा विरोध करत आहेत. असं करताना आपल्याच मताची किंमत कमी करत आहेत याची जाणीव कदाचित त्यांना येत नसेल. इस्राईल आणि पॅलेस्टाईन संबंध समजून घ्यायचा असेल तर माझ्या मते अयोध्या मधील राम मंदिर एक आदर्श उदाहरण ठरू शकेल. कदाचित त्याची तुलना केली तर दोन्ही बाजूने गुंतलेल्या भावना एवढ्या तीव्र का? तसेच एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत हा संघर्ष का येऊन पोहचला आहे याचा थोडाफार अंदाज येऊ शकेल. 

इस्राईल आणि पॅलेस्टाईन संघर्षाच ठिकाण किंवा रक्तरंजित दुखरी नस म्हणजे 'जेरुसलेम' हे शहर. या जेरुसलम शहरात काय दडलं आहे हे समजून घेण्यासाठी थोडं इतिहासात जाऊ. साधारण १००० बी. सी. (येशू ख्रिस्ताचा जन्म होणाच्या १००० वर्ष आधी) राजा डेव्हिड ने जेरुसलेम जिंकल आणि तिकडे यहुदी धर्म बसवला. यहुदी धर्माची जेरुसलेम राजधानी झाली. हे शहर वसवल्या नंतर साधारण ४० वर्षांनी त्याने यहुदी धर्माच पहिलं मंदिर तिकडे बांधलं. हे मंदिर ४ दशक म्हणजेच ४०० वर्ष वापरलं गेलं आणि त्याकाळी अतिशय प्रसिद्ध झालं कारण त्यात असलेला 'पवित्र कोष'. साधारण ५८६ बी.सी.मधे त्यावर परकीय शत्रूंनी आक्रमण करून यहुदी लोकांच ते पवित्र मंदिर उध्वस्थ केलं. तिथे वसलेल्या ज्यू (यहुदी) लोकांना कैदेत टाकलं आणि त्यांच्यावर अत्याचार केले.       ५० वर्षानंतर यहुदी लोकांना पर्शियन राजा सायरस ने पुन्हा जेरुसलेम ला येऊन आपलं मंदिर उभारण्याची मुभा दिली. त्या नंतर अलेक्सझांडर दि ग्रेट याने ३३२ बी.सी. मध्ये जेरुसलेम वर ताबा मिळवला. त्यानंतर रोमन, अरब, पर्शियन, इस्लामिक अश्या अनेक राज्यकर्त्यांनी पुढल्या १०० वर्षात आक्रमण करून ताबा मिळवला. 

त्या नंतर ६३२ व्या शतकात मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर हे जेरुसलेम मधून स्वर्गात गेले. त्या नंतर अनेक वर्ष मुस्लिम आणि यहुदी समाजासाठी जेरुसलेम हे अतिशय पवित्र स्थान म्हणून मानलं गेलं. यहुदी आणि मुस्लिम धर्माचे लोक इकडे हजारो च्या संख्येने येत राहिले. १९१७ ला पहिल्या महायुद्धानंतर जेरुसलेम चा ताबा ग्रेट ब्रिटन कडे आला. तोवर या प्रदेशात यहुदी आणि मुस्लिम धर्मांच्या लोकांमध्ये संघर्ष वाढत होता. कारण दोन्ही धर्मासाठी जेरुसलेम अतिशय पवित्र स्थान होतं. प्रत्येकाला त्यावर ताबा हवा होता. इंग्रजांच शासन संपुष्टात आल्यानंतर १९४८ साली इस्राईल हा यहुदी लोकांचा देश जगाच्या नकाशावर वर अस्तित्वात आला. 

हा झाला इतिहास पण या सगळ्यात वादाची ठिणगी किंवा कारण समजण्यासाठी पुन्हा एकदा या इतिहासातली काही पान उलटावी लागतील. वर सांगितलं त्या प्रमाणे यहुदी लोकांच मंदिर जेरुसलेम मधे सगळ्यात आधी होतं असं इतिहास सांगतो. रोमन लोकांनी ७० ए.डी. मधे हे मंदिर उध्वस्थ केलं. ज्याची एक भिंत आज फक्त शाबूत आहे. त्यामुळेच यहुदी लोकांसाठी ती खूप पवित्र आणि धार्मिक आहे. त्याच जागेवर शेकडो वर्षांनी अल अकसा ही मशीद बांधण्यात आली.याच मशिदीच महत्व मुस्लिम धर्मातील लोकांसाठी मक्का आणि मदिना नंतर तिसऱ्या नंबरवर आहे. इकडेच ख्रिश्चन धर्मियांसाठी पवित्र असं पवित्र थडग्यांच चर्च आहे. साधारण ३५ चौरस किलोमीटर ची ही जागा तीन धर्मांसाठी अतिशय महत्वाची आहे. गेल्या १००-२०० वर्षाच्या इतिहासात इकडे कोणी प्रार्थना करावी आणि कश्या पद्धतीने यावर अनेकदा अरब आणि यहुदी- ख्रिश्चन लोकांमध्ये मतभेद  झाले आहेत. त्याचीच परिणीती एकमेकांचा द्वेष करण्यापर्यंत गेली आहे. 

१९४८ मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी या विवादित भागातून माघार घेतली तेव्हा इस्राईल या स्वतंत्र्य राष्टाची निर्मिती झाली. यहुदींनी हा भाग आपला असून आपल्या हक्कापासून गेली अनेक दशके वंचित ठेवण्यात आलं त्या भागावर आपला हक्क सांगितला पण त्याचवेळी मुस्लिम धर्मातील पवित्र स्थानाचे  महत्व ओळखून त्यांचा हक्क ही या जमिनीवर राहील अशी भूमिका मांडली. ब्रिटिश येण्याअगोदर या प्रदेशावर मुस्लिम शासकांचे राज्य असल्याने हा भाग आपला आहे असं अनेक अरब राष्ट्रांचे म्हणणे होते. इस्राईल ला थांबवण्यासाठी सर्व अरब राष्ट्र एकत्र आली. त्यातून १९४८ साली अरब आणि इस्राईल असा संघर्ष झाला. त्यात इस्राईल ने अरब लोकांना पाणी पाजलं. अरब लोकांमध्ये ही गटबाजी होती ज्याचा फायदा इस्राईल ला झाला. जवळपास १ वर्ष युद्ध झाल्यानंतर इस्राईल ने ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असणारा भूभाग आपल्या ताब्यात घेतलेला होता. इस्राईल ने 'जेरुसलेम' जिंकलं तर जॉर्डन ने पश्चिमेकडील नदीचं पात्र तर इजिप्त ने गाझा वर आपला झेंडा रोवला. यात सगळ्यात जास्ती पानिपत झालं ते इकडे राहणाऱ्या पॅलेस्टाईन लोकांच. ज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकांना इकडून पळून जावं लागलं. 

क्रमशः

पुढील भागात इस्राईल आणि पॅलेस्टाईन ची रक्तरंजित गोष्ट आज कुठे येऊन पोहचली तिचे येत्या काळात होणारे संभाव्य परिणाम. 

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Thursday 13 May 2021

आयर्न डोम सुरक्षाकवच... विनीत वर्तक ©

 आयर्न डोम सुरक्षाकवच... विनीत वर्तक ©

महाभारतात अर्जुनाच्या बाणापेक्षा कर्णाच सुरक्षाकवच अभेद्य आहे याची कल्पना श्रीकृष्णाला होती. जोवर कर्णाच्या अंगावर सुरक्षाकवच आहे तोवर अर्जुनाचे बाण कर्णाला काहीच इजा पोहचवू शकणार नाहीत हे श्रीकृष्ण ओळखून होता. हा झाला महाभारतातला भाग पण तो आजही तितकाच लागू होतो. फरक इतकाच की त्या बाणाची जागा आज मिसाईल घेतली आहे तर त्या कवचाची जागा आर्यन डोम ने. आयर्न डोम समजून घेण्यासाठी त्याची तुलना कर्णाच्या कवचाशी केली तर पटकन समजून येईल. तर अश्या सुरक्षा करणाऱ्या कवचाची निर्मिती इस्राईल च्या राफेल एडवांस डिफेन्स सिस्टीम ने केली आहे. गेल्या एक-दोन दिवसात गाझा पट्टीत वातावरण पुन्हा पेटलं आहे. पॅलेस्टाईच्या हमास या अतिरेकी संघटनेकडून हजारो क्षेपणास्त्रांचा मारा इस्राईल च्या दिशेने केला गेला. ही रॉकेट इस्राईल च्या दिशेने आली तर खरी पण ती आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचू शकली नाही. कारण त्या आधीच इस्राईल च्या आयर्न डोम ने त्यांना आधीच निष्प्रभ केलं होतं. तर नक्की काय आहे ही इस्राईल ची आयर्न डोम सिस्टीम? भारताला याचा फायदा होऊ शकेल का? हे आपण समजून घ्यायला हवं. 

आयर्न डोम ही एक एअर डिफेन्स सिस्टीम आहे. वर सांगितलं तसं हवेतून येणार कोणतही क्षेपणास्त्र, ड्रोन, लढाऊ विमान, रॉकेट याचा मागोवा घेऊन शत्रूचं आहे हे लक्षात आल्यास त्यावर आपल्याकडील क्षेपणास्त्राने हल्ला करून निष्प्रभ करू शकते. आयर्न डोम ही इस्राईल बनवत असलेल्या मल्टी लेअर एअर डिफेन्स प्रणालीचा भाग आहे. इस्राईल आपल्या संपूर्ण प्रदेशावर असं सुरक्षा कवच तयार करतो आहे की  ज्यातून कोणीच इस्राईलवर हवेतून हल्ला करू शकत नाही. ह्या प्रणाली मध्ये एरो २, एरो ३, बराक ८, आयर्न बीम आणि डेव्हिड स्लिंग अश्या वेगवेगळे थर आहेत. तर आयर्न डोम प्रणाली कशी काम करते तर इस्राईल च्या आकाशात येणारं कोणतही रॉकेट, मिसाईल, विमान ही प्रणाली पहिल्यांदा शोधून काढते. त्या नंतर त्याच लक्ष्य आणि मार्ग ठरवते. जर का ते शत्रूचं असल्याचं नक्की झालं तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकते. आता वाचताना हे सोपे  वाटले तरी प्रत्यक्षात या सगळ्या प्रक्रिया १-२ सेकंदात करायच्या असतात. कारण येणाऱ्या रॉकेट किंवा कोणत्याही वस्तूचा वेग इतका असतो की त्याला निष्प्रभ करण्यासाठी १-२ सेकंद मिळतात. 

आयर्न डोम प्रणाली मध्ये तीन वेगवेगळ्या प्रणाली एकत्र काम करतात. त्यात पहिली म्हणजे डिटेक्शन एन्ड ट्रॅकिंग प्रणाली जीच काम इस्राईल च्या आकाशात असणाऱ्या सगळ्या वस्तुंना शोधून काढणे. दुसरी प्रणाली आहे बॅटल मॅनॅजमेन्ट एन्ड वेपन कंट्रोल सिस्टीम ह्या प्रणालीकडे रडार कडून आलेल्या माहितीचं आकलन केलं जाते आणि आपला शत्रू कोण हे ठरवल्यावर त्याला निष्प्रभ करण्यासाठी डागता येणाऱ्या यंत्रणेला आदेश दिला जातो. तिसरी यंत्रणा आहे मिसाईल फायरिंग युनिट ज्यातून प्रतिहल्ला केला जातो. या तिन्ही प्रणाली एखाद्या भागात विशिष्ठ पद्धतीने बसवल्या जातात. ज्यायोगे त्या शत्रूच्या नजरेत येऊ नयेत. बॅटल मॅनॅजमेन्ट एन्ड वेपन  कंट्रोल सिस्टीम (बी.एम.सी.) ही गुप्त नेटवर्क द्वारे सेंट्रल प्रणालीशी जोडलेली असते. अश्या तीन प्रणाली मिळून एक बॅटरी बनते. अशी एक बॅटरी किंवा युनिट साधारण ७० किलोमीटर च्या प्रदेशाचं संरक्षण करू शकते. अश्या अनेक बॅटरी च जाळ इस्राईल ने आपल्या गाझा पट्टी जवळच्या भागात विणलेलं आहे. अश्या प्रत्येक बॅटरीची कमांड ही सेंट्रल प्रणालीकडे असते. जी त्यांच्यामध्ये समन्वय साधते. 

गेल्या १-२ दिवसात पॅलेस्टाईन कडून झालेल्या १००० पेक्षा जास्ती रॉकेट हल्यामधील ९०% पेक्षा जास्त रॉकेट ही हवेतल्या हवेत आयर्न डोम प्रणालीने नष्ट केली. इस्राईल च्या नागरिकांना या रॉकेट हल्ल्यापासून वाचवलं. हजार रॉकेट सोडल्यानंतर फक्त ४ इस्राईल लोकांचा त्यात मृत्यू झाला. इस्राईल ने केलेल्या प्रतिउत्तरात मात्र ५० पेक्षा जास्ती पॅलेस्टाईन लोक मारले गेले आहेत. आयर्न डोम प्रणाली जशी चांगली आहे तशी ती महागडी पण आहे. पॅलेस्टाईन कडून डागल्या गेलेल्या रॉकेट ची किंमत साधारण १००० डॉलर च्या घरात आहे. तर आयर्न डोम प्रणालीने निष्प्रभ करण्यासाठी मारा केलेल्या रॉकेट ची किंमत तब्बल ८०,००० अमेरिकन डॉलर (४०,००० डॉलर प्रत्येकी. एक रॉकेट नष्ट करण्यासाठी दोन क्षेपणास्त्र डागावी  लागतात.) च्या घरात आहे. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की शत्रूने सोडलेली रॉकेट ही फक्त आणि फक्त इस्राईल च्या दिशेने विध्वंस करण्यासाठी सोडली गेली होती. त्यामुळे अचूकता किंवा लक्ष्य यांचा काही ताळमेळ असण्याची गरज नव्हती. त्यामुळे ती अतिशय स्वस्त होती. पण इस्राईल च्या आयर्न डोम प्रणाली मधील प्रत्येक रॉकेट हे स्मार्ट रॉकेट होतं. यातील प्रत्येक रॉकेट हवेतून येणाऱ्या लक्ष्याला समोरून, बाजूने आणि मागून अश्या कोणत्याही दिशेने निष्प्रभ करण्यास सक्षम होतं. त्यासाठी त्यावर ऑप्टिकल-इन्फ्रारेड कॅमेरे बसवलेले असतात. एकदा डागल्यावर हे क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्याचा पाठलाग करून त्याचा वेध घेण्यास सक्षम असणारं स्मार्ट रॉकेट ते आहे.  

आयर्न डोम ची किंमतीवरून त्यावर अनेकदा आक्षेप घेतले जातात. पण इस्राईल च्या ह्याच यंत्रणेने गेल्या १० वर्षात २५०० पेक्षा जास्त रॉकेट, क्षेपणास्त्र, ड्रोन  इंटरसेप्ट करून त्यांचा वेध घेतला आहे. २५०० रॉकेट नी किती इस्राईल लोकांचा बळी घेतला असता याचा विचार केला तर आयर्न डोम ची किंमत त्यापुढे काहीच नाही. भारताने ही प्रणाली घेण्यासाठी खूप वर्षाआधीच रस दाखवला होता. पण भारताच्या दृष्टीने काही गोष्टी अतिशय वेगळ्या होत्या. इस्राईल वर होणारे हल्ले हे त्यांच्या देशाच्या सीमेच्या अगदी हाकेच्या अंतरावरून होतात. त्यामुळे आयर्न डोम ची मारा करण्याची असलेली ७० किलोमीटर ची क्षमता त्यांच्यासाठी पुरेशी आहे. भारताला जरी दोन्ही बाजूने शत्रू असले तरी भारताच्या सिमांवर रॉकेट हल्ले होत नाहीत. दुसरं म्हणजे होणारे हल्ले हे काही शेकडो किलोमीटर वरून होण्याची शक्यता जास्ती आहे. तसेच भारताची शेकडो किलोमीटर ची सिमा संरक्षित करण्यासाठी शेकडो आयर्न डोम सिस्टीम लावाव्या लागतील. तब्बल ५० मिलियन अमेरिकन डॉलर प्रत्येक बॅटरी ची किंमत असणारी सिस्टीम त्यामुळे भारताला परवडणारी नाही. त्यासाठीच भारताने जगातील दुसरी सर्वोत्तम असणारी एस ४०० ही एअर डिफेन्स प्रणाली रशिया कडून विकत घेतली आहे. जिची क्षमता तब्बल ६०० किलोमीटर ची आहे. त्याशिवाय भारत भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम तयार करत आहे. रशियाची एस ४००, अमेरिकेची National Advanced Surface to Air Missile-II (NASAMS-II) सोबत भारताची Ballistic Missile Defence (BMD), Prithvi Air Defence (PAD),  Advanced Air Defence (AAD), and Akash Air Defence System. अश्या वेगवेगळ्या पद्धतीने भारताच्या आकाशातील संरक्षणासाठी सज्ज आहेत. या वर्षी एस ४०० तैनात झाल्यावर भारताचं हवेतील सुरक्षा कवच प्रचंड मजबूत होणार आहे. ज्याला भेदणं शत्रू राष्ट्रांना जवळपास अशक्य असणार आहे.   

इस्राईल आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षा करतो आणि आपल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवाच्या बदल्यात निदान १० तरी शत्रुंना ढगात पाठवतो. 'हमास' या अतिरेकी संघटनेने जर अतिरेकी हल्ले असेच चालू ठेवले तर होणाऱ्या परिणामांसाठी पॅलेस्टाईन ने तयार राहण्याचा इशारा कालच इस्राईल च्या पंतप्रधानांनी दिला आहे. त्यासाठी घरात घुसून तर मारूच पण त्यानंतर ते घर आणि ती जमीन पण आमचीच असेल  इशारा देण्यात ते घाबरलेले नाहीत. इतर देश काय विचार करतील?, त्यांना ते आवडेल का नाही? याचा विचार इस्राईल देश कधीच करत नाही. आपल्या नागरिकांचं संरक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याला कोणी इजा पोहचवली तर त्याला त्याच्या घरात घुसून मारण्याची क्षमता इस्राईल आज ठेवून आहे ती अश्याच आधुनिक प्रणालींमुळे. गेल्या काही दिवसात आयर्न डोम ने हजारो इस्राईल नागरिकांचे प्राण वाचवून पुन्हा एकदा आपली अचूकता आणि क्षमता सिद्ध केली आहे. जोवर इस्राईल वर आयर्न डोम आणि पुढे येणाऱ्या मल्टी लेअर एअर डिफेन्स च कवच आहे तोवर जगातील कोणतही क्षेपणास्त्र आणि रॉकेट इस्राईल ला जखमी करू शकणार नाही. येत्या काळात ज्या पद्धतीने इस्राईल स्वतःला सुरक्षित करतो आहे ते बघता हे अभेद्य कवच भेदणं अशक्य होणार आहे. इस्राईल आणि भारत एकत्र येऊन भारतासाठी बराक ८ या कवचाची निर्मिती करत आहेत. इस्राईल ने भारताला संपूर्णपणे अश्या कवच निर्मितीचे तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यासाठी ही मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या काळात भारताच्या सुरक्षितेत आयर्न डोम सारख्या प्रणालींचा मोठा वाटा असणार आहे. 

 फोटो स्रोत :- गुगल ( फोटो मध्ये कश्या पद्धतीने आयर्न डोम प्रणाली ने क्षेपणास्त्रांना नष्ट केलं ते बघू शकतो. आयर्न डोम प्रणाली कडून निघालेली रॉकेट.) 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Wednesday 12 May 2021

बस दो मिनीट... विनीत वर्तक ©

 बस दो मिनीट... विनीत वर्तक ©

लहानपणी मॅगी ची एक जाहिरात दूरचित्रवाणीवर लागायची. त्यात मुलं बाहेरून खेळून येतात आणि आईकडे खाण्याची मागणी करतात आई आपली दोन मिनिटात तयार होणारं मॅगी तयार करते अशी ती जाहिरात होती. अर्थात त्या काळी ती जाहिरात बघून आणलेली मॅगी फेकून देण्यापलीकडे काही केलं नाही. (आत्ता ती जबरदस्ती खावी लागते हा भाग वेगळा) तर तेव्हापासून कुठेतरी सगळं झटपट हा विचार नकळत त्या मनावर कोरला गेला. झटपट मोठं होणं, झटपट पैसे कमावणं, झटपट यशस्वी होणं, झटपट आयुष्यातील सगळ्या गोष्टींचा आनंद घेणं. आयुष्यात काहीही करा पण ते दोन मिनिटांच गणित डोक्यात मात्र फिक्स झालं. 

नात्यांची परिभाषा सुद्धा झटपट झाली. चट मंगनी पट बियाह सारखं आज ओळख, उद्या मैत्री आणि परवा प्रेम ते त्यानंतरच्या पायऱ्या झटपट चढल्या जाऊ लागल्या. सोशल मिडिया वरून तर दिवसांची मुदत काही तासांवर आणि काही मिनिटावर येऊन पोहचली. दोन मिनिटांपूर्वी ओळख झालेला किंवा झालेली मित्र- मैत्रीण बनते आणि चटकन आपल्या आयुष्याचा भाग होते. ते चांगल का वाईट नक्कीच त्या नात्यांच्या बेस वर अवलंबून असेल. कारण आपण कोणत्या कारणासाठी कोणाच्या जवळ जातो हे त्या दोघांना चांगलं माहित असेल. पण या सगळ्यात आपण त्या उमलण्याची मज्जा मात्र कुठेतरी हरवून बसतो आहे असं अनेकदा वाटून जाते. 

पत्रातून होणारा तो संवाद आणि त्याच्या येण्याची वाट बघण्यात जी मज्जा आणि आपलेपणा होता तो आता मेसेंजर वरच्या मेसेजमध्ये कुठे जाणवते? आज मेसेज मधून येणारे शब्द जेवढ्या वेगाने स्क्रीन वर झळकतात त्याच वेगाने वर ढकलले जातात. २ मिनिटा आधी मेसेज मध्ये काय लिहिलेलं आज आपल्याला आठवायला लागते पण पत्रातले शब्द आजही कित्येक वर्षांनी ओठावर रेंगाळतात. आपलेपणाची भावना आणि आपलेपणाचं नातं जुळायला लागलेला काळ कमी झाला पण त्याच वेगाने ती भावना पण त्या क्षणांसारखी अल्पजीवी झाली. कारण झटपट मैत्री किंवा नात झटपट होण्यात काही अडचण नाही पण अडचण आहे ती लागलेल्या दोन मिनिटाच्या सवयीची. ज्या वेगाने जवळ येतो त्याच वेगाने आपण बाजूला होतो. नात टिकवण्यासाठी लागणार समर्पण, तडजोड आज कोणाला नको आहे. पण त्याचवेळी जवळचं नातं मात्र हवं आहे.    

आजकाल चित्रपट मग ते रोमँटिक असो वा एडल्ट ते बघणं आज मोबाईल च्या एका क्लिक वर उपलब्ध आहे. त्यामुळे ते बघण्याची मज्जा कुठेतरी कमी झाली आहे हे नक्की. मला अजून चांगल आठवते माझ्या लहानपणी असा एखादा चित्रपट बघणं म्हणजे एक मोठं दिव्य असायचं. व्हिडीओ कॅसेट देणाऱ्या काकाला पटवण्यापासून ते ज्याच्या घरी बघायचं त्याच्या घरच्या सेटिंग पर्यंत सगळच  जमवून आणायला लागायचं. चित्रपट बघताना ही एखादी बॅक अप प्लॅन म्हणून अमिताभ नाहीतर मिथुन च्या चित्रपटाची कॅसेट आणलेली असायची. घराचे पडदे बंद करून अतिशय कमी आवाजात त्या २०-२५ मित्रांच्या घोळक्यात चित्रपटाची मज्जा घेणं एक वेगळा अनुभव होता. मला अजून आठवते रंगीला सारखा चित्रपट थेटर मधे जाऊन बघताना त्या संपूर्ण थेटर मधे उर्मिला नाचताना खरोखरचा पिन ड्रॉप सायलेन्स अनुभवणं माझ्या मते एक उमलण होतं ज्याची मज्जा आज एका क्लिकवर उपलब्ध होणाऱ्या चित्रपटात कुठे येते? आज झटपट उपलब्ध होणाऱ्या सगळ्या गोष्टी मग ते प्रेम असो, चित्रपट असो वा अगदी पॉर्न असो कुठेतरी दोन मिनिटाच्या घाईत आपल्या भावना पण दोन मिनिटासाठीच तेवत ठेवतात नाही का? 

कोणत्याही गोष्टीचा वेग काय असावा याचा काही मापदंड नाही. प्रत्येक माणूस वेगळं तशी नात्यांची, प्रेमाची, त्यागाची परीभाषा किंबहुना प्रत्येक गोष्टींचा वेग वेगळा. नात झटपट निर्माण होण्यात काही चुकीचं नाही, चित्रपट हाताच्या बोटावर बघण्यात पण काही चुकीचं नाही, मेसेज मधून होणाऱ्या संवादात पण काही चुकीचं नाही. पण त्या गोष्टींच उमलण आपल्याला टिकवता यायला हवं. बस दो मिनीट हे सुरवातीला चांगले पण नंतर मात्र आपल्याला ती गोष्ट अनुभवता यायला हवी. दोन मिनिटात बनणारी मॅगी एखाद्या दिवशीच चांगली वाटते पण घरच जेवण मात्र आपण आयुष्यभर जेवू शकतो. त्यामुळेच बस दो मिनीट हे दोन मिनीटांसाठीच अनुभवायला हवेत. 

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



Sunday 9 May 2021

#हिरोज_भाग_४ 'सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव'... विनीत वर्तक ©

 #हिरोज_भाग_४ 'सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव'... विनीत वर्तक ©

शाळा संपवून कॉलेजमध्ये प्रवेश घेतला कि ते दिवस आयुष्यातले सगळ्यात मयुरपंखी दिवस असतात. वयाची वीस वर्ष ओलांडताना नवीन स्वप्नांची चाहूल लागलेली असते. आयुष्य काय? आयुष्यातलं लक्ष काय? आपण काय करणार? हे असले प्रश्न अजून आपल्या समोर यायचे असतात. पण काही लोक वेगळ्याच मातीची बनलेली असतात. म्हणजे आपलं लक्ष्य काय हे त्यांनी आधीच ठरवलेल असते. ते लक्ष्य पूर्ण करताना आपल्या जीवाची कोणतीही पर्वा ते करत नाहीत. “लक्ष्य तो हर हाल में पाना हे” हे हृतिक रोषन च्या चित्रपटातील गाण तर सगळ्यांना माहित असेल. किंबहुना हा चित्रपट हृतिक च्या करियर मधील मैलाचा दगड समाजला जातो. पण ज्यांच्या खऱ्या पराक्रमावर हा चित्रपट बेतला आहे त्या सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांच्या बद्दल आपणच सगळेच अनभिज्ञ आहोत. 

वय वर्ष १९. विचार करा....  ज्या वर्षात आयुष्याच लक्ष्य ठरवायच असते. त्या वर्षी सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांना भारताच्या सर्वोच्च सैनिकी सन्मानाने  सन्मानित करण्यात आल आहे. 'परमवीर चक्र' हा पुरस्कार काही साधासुधा सन्मान नाही. लढाईत आपल्या विचारानं पलीकडचं पराक्रम, शौर्य, देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा बजावण्यासाठी देण्यात येतो. हा सन्मान रेअरेस्ट ऑफ रेअर असून आत्तापर्यंत फक्त २१ जणांना मिळालेला आहे. अमेरिकेच्या 'मेडल ऑफ ऑनर' किंवा ब्रिटन च्या 'व्हिक्टोरिया क्रॉस' इतक्या सर्वोच्च सन्मानासारखा आहे. वयाच्या १९ व्या वर्षी हा सर्वोच्च सन्मान मिळवणाऱ्या सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांना किती भारतीय ओळखतात?

१० मे १९८० साली जन्मलेल्या सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांनी वयाच्या अवघ्या १६ वर्ष ५ महिन्यांचे असताना भारतीय सेनेत दाखल होत देशाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतल. सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव हे १८ ग्रेनेडियर च्या “घातक” ह्या दस्त्यामध्ये सेवेत असताना कारगिल युद्धात त्यांच्या टीम ला सगळ्यात कठीण अश्या मोहिमेच लक्ष्य देण्यात आल. कसही करून टायगर हिल वर तिरंगा फडकवायचा हा निर्धार करून सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांनी आपल्या लक्ष्याकडे कूच केल. ४ जुलै १९९९ ची पहाट भारतीयांसाठी नेहमीसारखीच असली तरी सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव तो दिवस आपल लक्ष्य पूर्ण करण्याचा होता. १६,००० फुटापेक्षा जास्त उंचीवर असलेली टायगर हिल बर्फाने झाकलेली होती. त्याच्या टोकावर होते भारताचे दुश्मन. १००० फुटाचा सरळ सोट कडा समोर उभा होता. त्याच्या वर प्रतिकूल वातावरणात चढाई करायची बर नुसती चढाई नाही कि ट्रेकिंग होत. वर दुश्मन बसलेला होता तेव्हा त्याची नजर चुकावत, गोळ्या चुकवत वर चढाई करायची. नुसत चढून लक्ष्य मिळणार नव्हत तर तिकडे बसलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करून टायगर हिल वर भारताचा तिरंगा फडकावण हे ते लक्ष्य होत. 

वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांनी सगळ्यात प्रथम चढाई करण्याची जबाबदारी उचलली. अंग गोठवून टाकणाऱ्या थंडीत जिकडे श्वास घ्यायला पण त्रास होतो अश्या वातावरणात १००० फुट सरळसोट कड्यावर चढाई करण म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण पण भारतीय सैनिकच वेगळे. सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांच्या कडे जबाबदारी होती ती म्हणजे वर पोचून खाली दोर सोडायचे ज्यावरून बाकीचे सैनिक वर पोचून टायगर हिल वर शत्रूशी युद्ध करू शकतील. सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव नी १००० फुटाचा कडा चढण्यास सुरवात केली. अर्ध्या रस्त्यात पोचल्यावर शत्रूला त्याची माहिती मिळाली. वरच्या भागावरून पाकिस्तानी अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार तसेच रॉकेट चा मारा खालच्या बाजूने सुरु केला. ह्या गोळीबारात त्यांच्या प्लॅटून चा कमांडर तसेच इतर दोन जण मृत्युमुखी पडले. सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांच्या शरीरात तीन गोळ्या घुसल्या. खांद्यात गोळ्या लागल्यावर आणि अजून ६० फुट चढण बाकी असूनसुद्धा त्यांनी हिंमत नाही गमावली. 

आपला घायाळ झालेला खांदा आणि ३ गोळ्या शरीरात असताना सुद्धा सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव टायगर हिल ची ती कठीण चढण चढून गेले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसाठी दोर खाली सोडले. इथवर खरं तर त्यांच लक्ष्य संपल होत. पण म्हणतात न वेगळ्या मातीच्या बनलेल्या माणसांची लक्ष्यच वेगळी असतात. वर पोचून त्यांनी शत्रूच्या पहिल्या बंकरकडे आपला मोर्चा वळवला. १७,५०० फुटावर बर्फावरून लोळत शत्रूच्या पहिल्या बंकर वर ग्रेनेड ने हमला केला. ह्यात ४ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. ह्या सगळ्यामुळे इतर भारतीय सैनिकांना त्या कड्यावरून चढण सोप्प गेल. पण त्याचवेळी पाकिस्तानी सैनिकांना सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव दिसले होते. त्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आंगावर गोळ्या झेलत बंकर च्या दिशेने धाव घेतली. पाकिस्तानी सैन्यावर हातानी हमला केला. तिकडे झालेल्या हाणामारीत ( हॅन्ड टू हॅन्ड कॉम्बॅट) मध्ये सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांनी अजून ४ सैनिकांना कंठस्थान घातल. त्यांच्या ह्या कामगिरीमुळे त्यांच्या मागे असलेल्या भारतीय सैनिकांमध्ये वीरश्री संचारली. तिसर बंकर भारतीय सैनिकांनी उध्वस्थ करत टायगर हिल वर भारतीय तिरंगा फडकवला. 

हे युद्ध संपल तेव्हा सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांचा खांदा पूर्णपणे निखळलेला, पाय तुटलेला  आणि शरीरात तब्बल १५-१६ गोळ्या घुसल्या होत्या. आपण विचार करू का साध खरचटल तर आई ग!!!.......  करणारे आपण १६ गोळ्यांचा विचार तरी करू शकतो का? वयाच्या ज्या वर्षात आपण सोनेरी स्वप्न बघतो त्या वयात सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांनी असा पराक्रम गाजवला होता ज्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. एक माणूस १६ गोळ्या शरीरात असताना पण हॅन्ड टू हॅन्ड कॉम्बॅट करू शकतो हे आपल्या विचारानं पलीकडच आहे. हे फक्त आणि फक्त शक्य झाल ते देशावरच्या प्रेमामुळे अशी देशभक्ती जिचा विचार पण आपण करू शकत नाही. आधी जेव्हा त्यांना परमवीरचक्र देण्यात आल तेव्हा ते मृत्युमुखी पडले अस म्हंटल गेल. नावातील गोंधळामुळे हा प्रकार झाला पण मृत्यूला स्पर्श करून सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव जिवंत राहिले. 

सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांचा पराक्रम इतका मोठा आहे कि जगातील सर्वोच्च पराक्रम दाखवणाऱ्या पहिल्या पाच सैनिकात त्यांची गणना होते. एका इंटरनेट साईट ने “ ५ सोल्जर हु मेक रॅम्बो लुक लाईक पुसी” ह्या एका लेखात त्यांना समाविष्ट केल आहे. चित्रपटात आजवर अनेक वॉर हिरो झाले पण खऱ्या आयुष्यात आपल्या कर्तुत्वाने ज्या सैनिकांनी सांगता, लिहिता येणार नाही अशी कामगिरी केली त्यात जगातील पहिल्या पाच मध्ये एक भारतीय सैनिक आहे हेच आपल्याला माहित नाही. हाच आपला करंटेपणा. हृतिक रोषन चा लक्ष्य आपल्याला लक्षात राहतो पण तेच लक्ष्य आपल्या अतुलनीय शौर्याने, देशभक्तीने मिळवणारे सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव लोकांना माहित पण नाहीत हीच आपल्या देशाची शोकांतिका आहे. 

२०१५ साली कारगिल ला गेलो असताना ह्या जाबांज सैनिकाला भेटण्याची संधी मिळाली. त्यांना कडक सॅल्यूट देताना आणि हात मिळवतानाचा क्षण माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे......... आजही तोच अभिमान, तेच देशप्रेम त्यांच्या डोळ्यात मला दिसलं. 

अश्या आयुष्यातील खऱ्याखुऱ्या हिरो पुढे मी मनोमन नतमस्तक झालो......  

१)पहिल्या फोटोत सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव

२)२०१५ साली कारगिल विजय दिवस निमित्ताने शहीदांना आदरांजली वाहताना मध्यभागी सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव.    




फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

सुखातलं समाधान की समाधानातलं सुख?... विनीत वर्तक ©

 सुखातलं समाधान की समाधानातलं सुख?... विनीत वर्तक ©

आयुष्याच्या पहिल्या श्वासापासून ते अखेरपर्यंत माणूस सुखाच्या क्षणांसाठी धडपडत असतो. ते क्षण जितके जास्ती, तितकंच आयुष्य समृद्ध आणि आनंदी असतं असं आपण मानतो. सुख कोणत्याही स्वरूपात असो, मग तो पैसा, उन्नती, भरभराट, शिक्षण, नोकरी, जोडीदार असे अनेक टप्पे त्यात येतात. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला ते मिळावं ह्यासाठी माणूस जीवाचं रान करतो, पण ते खरंच मिळतं का? मिळालं तरी किती टिकतं? ह्याचा उलगडा व्हायला आयुष्य निघून जातं. आनंदाची/सुखाची व्याख्या आपण करू तशी सापेक्ष असते. आपण आयुष्यभर सुखातून समाधान शोधतो पण समाधानातलं सुख नेहमीच चिरकाळ टिकणारा आनंद देतं.

दहावीला ९०% मिळाले ही गोष्ट खूप आनंदाची/सुखावह गोष्ट असू शकेल, पण ते किती वेळ टिकते? हे ९०% आपल्याला हव्या त्या कॉलेजला प्रवेश मिळवून देतील ह्याची शाश्वती नाहीच. सुखाने समाधान होईलच अस नाही. खूप पैसा कमावला पण तो किती काळ टिकेल? किंवा टिकवता येईल ह्यावर आनंदाचे क्षण अवलंबून असतात. पैश्याने सुख विकत घेतलं पण समाधान? हवा तसा जोडीदार शोधला; रंग, रूप, शिक्षण, सामाजिक पातळीवर जुळणारा, तरी तो किंवा ती आपल्याला किती समाधान देईल ह्यावर सुख अवलंबून आहे. थोडक्यात काय, तर आनंद आणि सुख हे सापेक्ष असते. त्याला मर्यादा असते. त्याचा शेवट असतो आणि सगळं मिळवूनसुद्धा ते मिळेलच ह्याची खात्री नसते. मग नक्की कशाचा शोध घ्यावा, सुखातल्या समाधानाचा कि समाधानातल्या सुखाचा?

आपलं लिखाण लोक वाचतात ह्याचा आनंद मला नक्कीच खूप होतो. आपले लिखाण खूप लोकांपर्यंत जाते, फेसबुकवर अनेक लाईकचा पाउस, तर व्हाट्सअप वर अंगठ्यांचा भडीमार होतो. आनंदी वाटतंही पण कुठे तरी ते त्या क्षणापुरतंच असतं. म्हणजे तो क्षण गेला की त्यातलं नावीन्य संपत जातं. नक्कीच कुठेतरी मनात छान भावना नेहमीच राहते, पण ती मनातच, त्याने समाधान होतेच असं नाही. मनाला समाधान वाटणाऱ्या गोष्टीत खरं सुख आणि आनंद असतो. हजारो लाईक आणि शेकडो कमेंटमध्ये जे समाधान मिळत नाही, ते एका कमेंटमध्ये मिळून जाते. म्हणूनच अश्या कमेंट किंवा दिलेली दाद माझ्यासाठी समाधानातलं सुख देतात, ज्यांच्या शोधात मी नेहमीच असतो.

माझा “आयुष्याला घडवणारी माणसं” हा लेख वाचून एक छान प्रतिक्रिया आली. “माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत माझ्या लहान बहिणीचा खूप हात होता. मे महिन्यात तिच्याकडे राहिले असताना काही वादामुळे आमच्यात वितुष्ट आलं. आपल्या घरी आल्यावर पुन्हा तिच्याकडे कधी जायचं नाही, असंच मनाशी ठरवलं. पण तुझा लेख वाचला आणि आयुष्याला घडवणाऱ्या त्या बहिणीची मला आठवण झाली. सगळं बाजूला ठेवून पुन्हा तिला भेटून आले, मळभ दूर झालं. आता त्या निरभ्र आकाशाला पुन्हा अनुभवते आहे”. हे वाचून मी क्षणभर स्तब्ध झालो. आपले शब्द कोणाच्या आयुष्यात इतके सुंदर क्षण आणू शकतात, हे समाधान मला जे सुख देऊन गेलं, ते मी शब्दांत पण मांडू शकत नाही.

माझ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. माझ्या आईबाबांना माझ्या लिखाणाबद्दल काहीच माहिती नव्हतं. म्हणजे आईला खूप कल्पना होती कारण तिचे आणि माझे शाब्दीक वाद चालूच असायचे. पण बाबा मात्र खूपच अनभिज्ञ होते. समोर असलेले सगळेच वाचक, त्यातले काहीजण तर पहिल्यांदा भेटलेले. समोर येऊन जेव्हा माझ्या लेखांबद्दल आणि माझ्याबद्दल बोलत होते तेव्हा त्यांच्या कौतुकांच्या शब्दांपेक्षा बाबांच्या डोळ्यात दिसलेल्या आनंदाश्रूनी जे समाधान आणि सुख दिलं, त्याची तुलना कशानेच होऊ शकत नाही.

इस्रोच्या लेखावर एका ७० वर्षांच्या आजीनी मला अभिप्राय पाठवला होता. “इतके वर्षं मला कुतूहल होतं, की नक्की रॉकेटमधून एकतर हे उपग्रह पाठवतात कसे? एकाच वेळी वेगवेगळ्या कक्षेत ते स्थापन कसे करतात? त्यांची कक्षा अशी वेगवेगळी का? अश्या अनेक प्रश्नांना गेल्या कित्येक वर्षांत मी उत्तरं शोधू शकली नव्हती, आज तुझ्या लेखांमुळे त्याची उत्तरं मिळाली”. माझा लेख विज्ञानाच्या कक्षेत येतो की नाही हे मला माहीत नाही! तो पूर्ण असतो का, मला माहित नाही! पण तो जर एका ७० वर्षांच्या आजींना समजत असेल, तर तो नक्कीच सगळ्यांपर्यंत पोहोचत असेल. हे समाधान कित्येक पुरस्कार आणि पुस्तकाच्या विक्रीच्या खपाच्या आकड्यांपेक्षा जास्ती आहे.

आयुष्यात आपण कशाच्या मागे धावायचं, हे आपण ठरवायचं. 'सुखातल्या समाधानाकडे' की 'समाधानातल्या सुखाकडे'!! दोन्हीकडे आनंद आणि सुख आहेच. 'सुखातलं समाधान' कदाचित आपण पटकन मिळवू, पण ते चिरकाल टिकेल ह्याची काहीच खात्री नाही. तर 'समाधानातलं सुख' मिळायला कदाचित खूप वर्षं जातील, पण ते चिरकाल आनंद देणारं असेल, अगदी शाश्वत! प्रसिद्धी, लाईक, शेअर आणि आपल्या स्व-ला मिळणाऱ्या सुखापेक्षा लिखाणातून मला समाधान मिळतं. वर आलेल्या प्रतिक्रिया त्या समाधानातलं सुख मला देतात, जे चिरकाल माझ्यासोबत टिकणारं असतं. 'सुखातलं समाधान' की 'समाधानातलं सुख', आपण काय निवडायचं, ह्याचा विचार ज्याचा त्यांनी करायला हवा.

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 

Tuesday 4 May 2021

आयुष्य देणाऱ्या एका सैनिकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

आयुष्य देणाऱ्या एका सैनिकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

कर्नल (डॉक्टर) दिवाकरन पद्मकुमार पिल्लई म्हणजेच डी.पी.के.पिल्लई हे नाव भारतीयांना माहित असण्याची अगदी दूर दूर पर्यंत माहित असण्याची शक्यता नाही. १९८८ साली एन.डी.ए. मधून भारतीय सैन्यात ऑफिसर झालेले त्याकाळी कॅप्टन असलेले डी.पी.के.पिल्लई २५ जानेवारी १९९४ साली एक ऑपरेशन लीड करत होते. National Socialist Council of Nagaland (Isak-Muivah) चे चार बंडखोर लोंगडी परभन या भागात लपून बसले होते. तिथल्या एका ब्रिज आणि संपर्क करणाऱ्या टॉवर ला उध्वस्थ करण्याची त्यांची योजना असल्याची गुप्त माहिती मिळालेली होती. या बंडखोरांना नेस्तनाबूत करण्याची जबाबदारी कॅप्टन डी.पी.के.पिल्लई यांच्या टीमकडे होती. त्यांच्या टीम ने बंडखोर लपून बसलेल्या घराला चारी बाजूने घेरलं. अनेकवेळा घरातून बाहेर येण्याची विनंती करून सुद्धा दरवाजा न उघडल्याने कॅप्टन नी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

आत प्रवेश करताच आत दबून बसलेल्या बंडखोरांनी एके ४७ मधुन गोळ्यांचा पाऊस पाडायला सुरवात केली. बंडखोर आणि भारतीय सेनेच्या मधे तब्बल दीड  तास धुमश्चक्री सुरु होती. शेवटी रॉकेट लॉंचर ने संपूर्ण घर उडवून देण्याचा शेवटचा इशारा भारतीय सेनेने दिल्यावर बंडखोरांनी आपली शस्त्र खाली ठेवली. पण तोवर कॅप्टन डी.पी.के.पिल्लई गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या दंडामध्ये तीन तर छातीत एक गोळी घुसलेली होती. बंडखोऱ्यानी टाकलेल्या बॉम्ब च्या स्फोटात उजवा पाय सोलून निघाला होता. पण अजूनही ते अश्या अवस्थेत आपल्या टीम च नेतृत्व करत होते. या सगळ्या कारवाईत ते जखमी झाल्याची बातमी भारतीय सेनेच्या मुख्यालयात पोहचली होती. त्यांना तातडीने हॉस्पिटल मधे  नेण्यासाठी भारतीय सेनेचं हेलिकॉप्टर कारवाईच्या ठिकाणी पाठवण्यात आलं. 

या कारवाईत बंडखोरांचा मोहरक्या मारला गेला तर इतरांनी शरणागती पत्कारली. बंडखोर आपली हत्यार टाकून बाहेर येत असताना त्यांच्यामागून दोन मुलं जखमी अवस्थेत बाहेर आली. बंडखोरांसोबत मुलं जोडीला आहेत याबद्दल कॅप्टन डी.पी.के.पिल्लई पूर्णतः अनभिज्ञ होते. त्यात त्या ६ वर्षाच्या मुलाच्या पायात गोळी लागली होती आणि १३ वर्षाच्या मुलीच्या पोटात गोळी लागली होती. भाऊ-बहीण असणाऱ्या त्या दोघांचा जीव धोक्यात होता. जवळ असणार हॉस्पिटल ६ तासाच्या अंतरावर होत. त्यांचा जीव तिथवर जाईपर्यंत वाचणं अशक्य होतं. भारतीय सेनेचं हेलिकॉप्टर कॅप्टन डी.पी.के.पिल्लई यांना हॉस्पिटल मधे घेऊन जाण्यासाठी तयार होतं. जखमी झालेली ती दोन मुलं भारतीय सेनेने केलेल्या गोळीबारात जखमी झाली होती. कॅप्टन डी.पी.के.पिल्लई यांच्यापुढे दोन पर्याय होते. एकतर स्वतःचा जीव वाचवणं किंवा त्या दोन मुलांचा जीव वाचवणं. भारतीय सेनेच्या ट्रेनिंग मधलं वाक्य त्यांच्या डोक्यात होतं , 

“Our weapons are meant to kill our enemies and not our own people".... 

हेलिकॉप्टर मधे बसून स्वतःचा जीव वाचवला तर त्या दोन मुलांचा जीव घेण्याचं शल्य आयुष्यभर टोचत राहिलं असतं आणि या अपराधी पणाच्या भावनेतून आपण स्वतःला कधीच माफ करू शकत नाही हे त्यांना समजून चुकलं. स्वतःचा मृत्यू समोर दिसत असताना आपला जीव वाचवण्यापेक्षा त्यांनी त्या दोन मुलांच्या जीवाला भारतीय नागरीक असल्याने त्यांच्या जीवाचं रक्षण हे आपल्या जिवापेक्षा महत्वाचं आहे हे आपलं कर्तव्य त्यांनी स्वीकारलं. त्यांना नेण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टर च्या पायलट ला त्या दोन मुलांना आधी सुरक्षित स्थळी नेण्यासाठी सांगितलं. त्या हेलिकॉप्टर चा पायलट हा त्यांचा चांगला मित्र होता. त्याने कॅप्टन डी.पी.के.पिल्लई यांना उद्देशून म्हंटल, 

“Don’t play Mother Teresa, Pillay. I need to… what will I tell your mum?” 

त्याला उत्तर देताना कॅप्टन डी.पी.के.पिल्लई म्हणाले, 

 “Just tell her that I saved two children.” 

त्यांच्या उत्तरावर हेलिकॉप्टर च्या पायलट ला त्यांचा आदेश मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. हेलिकॉप्टर मधून त्या दोन मुलांना बटालियन च्या हेडक्वार्टर मधे  नेण्यात आलं आणि मग त्यांना Regional Institute of Medical Sciences (RIMS) इंफाळ इकडे हलवण्यात आलं. तब्बल दोन तासानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कॅप्टन डी.पी.के.पिल्लई यांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं. आपण जगलो नाही तरी आपण आपलं कर्तव्य पूर्ण केल्याचं समाधान त्या यमासोबत जाताना असेल याची पूर्ण कल्पना त्यांना होती. त्यांना या पराक्रमासाठी शांततेच्या काळात देण्यात येणाऱ्या सर्वोच्च सन्मान शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलं. पण गोष्ट इकडे संपत नाही तर सुरु होते. 

१६ वर्ष मधे गेली. त्या मुलांच काय झालं? याची कल्पना न कॅप्टन डी.पी.के.पिल्लई यांना होती न त्या मुलांना ज्यांचा जीव त्यांच्यामुळे वाचला होता. आपला एक सहकारी मणिपूर मधे असताना कर्नल डी.पी.के.पिल्लई यांनी त्या गावाशी संपर्क साधला. त्यांना भेटण्यासाठी त्यांनी मणिपूर ला भेट दिली. ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या गावातील मुलांचे प्राण वाचवले त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव जमा झाला होता. संपूर्ण गावातील जमातीने कर्नल डी.पी.के.पिल्लई यांना आपल्या जमातीत स्थान दिलं. त्यांना  ‘Pillay Pamei’ अशी उपाधी दिली. याशिवाय सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांना त्यांच्या गावात घर बांधण्यासाठी १०० एकर जमीन भेट दिली. अर्थात माणुसकी आणि भारतीय सैन्याचा आदर्श जपणाऱ्या कर्नल डी.पी.के.पिल्लई यांनी नम्रपणे ही भेट तर नाकारली पण गावाच्या विकासासाठी जे काही करता येईल ते करण्याचं आश्वासन दिलं. नुसतं आश्वासन न देता त्यांनी गावात रस्ता बांधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर पाठपुरावा केला. २०१६ मधे Tamenglong to Peren via Longdi Pabram या रस्त्यासाठी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने मंजुरी दिली. त्यांनी ज्या ६ वर्षाच्या मुलाचा त्यांनी जीव वाचवला तो आज शिकून बँकेत नोकरीला लागला आहे. याच वर्षी २१ जानेवारीला त्याने लग्न केलं. त्याच्या लग्नाचं ट्विट कर्नल डी.पी.के.पिल्लई यांनी शेअर केलं होतं. लग्नाला जाऊ न शकल्याची खंत व्यक्त केली आहे. 

आपलं आयुष्य भारतासाठी समर्पित करून आपलं मरण समोर दिसत असताना आपल्या कर्तव्यापुढे आपल्या मरणाला झुकायला लावणाऱ्या शौर्य चक्र सन्मानित कर्नल डी.पी.के.पिल्लई यांना माझा कडक सॅल्यूट. सर आज मला माझ्या आयुष्यातले हिरो आणि आदर्श कोण विचारले तर त्यातले तुम्ही एक असाल.  आपल्या आयुष्याचा विचार न करता दुसऱ्यांना  आयुष्य देणाऱ्या तुमच्या सारख्या सैनिकांमुळेच आजचा भारत अस्तित्वात आहे. तुमच्या कार्यास माझा साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  





Sunday 2 May 2021

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे... विनीत वर्तक ©

 मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे... विनीत वर्तक ©

काही नाती आयुष्यात व्यक्त करता येत नाही. कारण ती आपल्यालाच नीट समजलेली नसतात तर आपण समोरच्याला आपल्याला काय वाटते ते नक्की कस सांगणार हा गोंधळ मनात सुरु असतो. आयुष्याच्या अनेक टप्प्यावर अनुभव घेतल्यावर एक परिपक्व नात असावं वाटते आणि ते हि आपल्या विरुद्ध लिंगी व्यक्तीशी. दोन वैचारिक पातळीतील फरक खरे तर एका परिपूर्ण नात्याला आकार देतो त्याला स्थैर्य देते. पण हि तारेवरची कसरत खूप कमी जण निभावून नेऊ शकतात.

मैत्री एक सुंदर नात. त्या पुढल पाउल प्रेमाच असल तरी त्या दोन पाउलात खूप मोठा पल्ला गाठावा लागतो. ह्या मध्ये सुद्धा नात बनवता आणि टिकवता यायला हव. किंबहुना वयाच्या उत्तरार्धात जेव्हा शारीरिक, भावनिक, कौटुंबिक अश्या सगळ्या पातळ्यांवर प्रेम, मैत्री हे अनुभवलेलं असते. त्यावेळेस निखळ, निरपेक्ष मैत्री पेक्षा हि मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असणाऱ्या नात्याची गरज प्रकर्षाने जाणवते. पण अस कोणीतरी आपल्या आयुष्यात येण आणि ती व्यक्ती टिकवून ठेवणे हे सगळयांना जमते अस नाही.

मैत्री आणि प्रेम ह्यामध्ये हि नात असू शकते हि मानसिकता आपण निर्माण केलीच नाही. मैत्री आणि प्रेमाच्या भावना ह्या आपल्याला ओळखता येतात. त्यांना आपण त्यांच्या साच्यात हि बसवतो पण ह्या दोन्ही पाउलांच्या मध्ये असलेल्या नात्याला आपल्याला साच्यात बसवता न आल्याने त्याचा श्वास नेहमीच गुदमरतो. कधी कोणी आधल्या पाऊलावर विसावतो तर कोणी पुढल्या पाऊलावर मग दोन्ही नात्यातून निर्माण होणाऱ्या अपेक्षा आणि त्यातून मिळणारी प्राप्ती ह्यातल अंतर वाढत जाते. मग सुरु होतो तो गैरसमजाचा प्रवास आणि त्याची परिणीती एक चांगल बंध तुटण्यात होते. कारण एकदा ठेच लागली कि त्यातली सहजता संपून जाते.

सगळ हाताशी असून सुद्धा आपल्याला विश्वासाने सांगता येईल अस कोणीतरी प्रत्येकाला हव असते. जोडीदार आणि मित्र- मैत्रिणी ह्या दोन स्टेशन मधला थांबा आपण शोधत असतो. जिकडे मैत्री चा निखळ विश्वास असेल, जिकडे त्या छान वाटणाऱ्या भावना हि असतील. जिकडे आधार देणारा खांदा असेल आणि जिकडे आपल्या भावना हक्काने सांगण्याच व्यासपीठ हव. पण त्याचे वेळी भावनिक गुंतवणूक हि मर्यादेत हवी. शारीरिक गुंतवणूक नको पण अस असून सुद्धा निरपेक्ष भावनेने आपल्याला आपल मानणार आणि त्याच वेळी आपल्याला आपल वाटणार कोणी तरी हव ह्याच शोधात आपण असतो नाही का?

दोन पाउलांच्या मध्ये अस थांबण ह्यासाठी विचारांची पक्की बैठक तर लागतेच पण त्याशिवाय दोन्ही टोकावर न जाण्याचा संयम पण खूप गरजेचा असतो. ह्या गोष्टी दोन्ही व्यक्तींकडून तितक्याच प्रगल्भतेने स्वीकारल्या जातील तेव्हाच हे अविस्मरणीय नात जन्माला येत आणि बहरते. आयुष्याच्या उत्तरार्धात हे नात शोधताना अनेकदा गल्लत होतेच. कारण दाणे टाकत फिरणारे, सहानभूतीचा खांदा देऊन जवळ येणारे, डोळ्यांचे अश्रू पुसून मीच तो असा आभास निर्माण करणारे त्या सोबत मज्जा म्हणून टाईमपास करणारे असे अनेक पुरुष तर ढळत्या सौंदर्याला पुन्हा कोणीतरी सुंदर म्हणावे म्हणून शोधणाऱ्या त्या, मजेसाठी आपल्यावर पैसे उडवणारे पुरुष शोधणाऱ्या तसेच काही नाही तर आपल्या पाठीमागे अनेक पुरुष ह्या विचारांनी माज मिरवण्यासाठी अनेक स्त्रिया असतात. अश्या प्रत्येक विचारांची स्त्री – पुरुष आपल्या आजूबाजूला असताना विश्वास तरी नक्की कोणावर ठेवायचा ह्या विवंचनेत सगळेच असतात.

मैत्री आणि प्रेम ह्य दोन्ही जितक आयुष्यात गरजेच आहे त्याहीपेक्षा जास्त गरजेच आहे ते ह्या दोघांच्या मध्ये कोणीतरी असण. अर्थात ते आपल्याला जाणवते तोवर एकतर बरच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं असत. आलेल्या अनुभवांनी मन इतक तुटलेलं असते कि आता पुन्हा हे नकोच आणि जरी असा कोणी कधी मिळाला तर त्याची कालांतराने टोकावर जाण्याची ओढ पुन्हा एकदा आपल्याला आगीतून निघून फुफाट्यात घेऊन जाते. पण अस मैत्रीच्या पलीकडल आणि प्रेमाच्या अलीकडल कोणी असेल तर एक अतिशय सुंदर नात जन्माला येते ह्यात शंका नाही.

कोणत्याही अपेक्षेशिवाय, आपल्या आयुष्यातील कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पूर्ण करून समोरच्याला हि तितक्याच विश्वासाने तोलून ठेवणाऱ्या ह्या नात्यासाठी खूप काही द्यावच लागते. वेळेपासून ते समजून घेण्यापर्यंत. संयम ठेवावा लागतो. आपल्याला ऐकून घेणार, आपल्याशी संवाद साधणार, आपल्याला काही सांगणार अस आपल माणूस असण हीच तर प्रत्येकाची इच्छा असते. त्यातही मैत्रीच्या पलीकडल आणि प्रेमाच्या अलीकडल कोणी असेल तर ह्या दोन्ही टोकांवर असणाऱ्या नात्यांमधील ते दुवा असते हे मात्र नक्की. ह्याचा शोध ज्याचा त्याने घ्यायचा कारण प्रेम आणि मैत्रीच्या व्याख्या जितक्या सापेक्ष तितकच ह्या दोन पावलांमधील अंतर. पण एकदा अस कोणी मिळाल तर ते नात जपण हि पण आपलीच कला. कारण मशागत सगळ्याचीच करावी लागते. मग ती शेती असो वा नात. 

बघा मग आपल्या आयुष्यात कोणी अस आहे का? कि आपण कोणाच्या आयुष्यात मैत्रीच्या पलीकडे पण प्रेमाच्या अलिकडले आहोत?..........

फोटो स्त्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.