Wednesday 12 May 2021

बस दो मिनीट... विनीत वर्तक ©

 बस दो मिनीट... विनीत वर्तक ©

लहानपणी मॅगी ची एक जाहिरात दूरचित्रवाणीवर लागायची. त्यात मुलं बाहेरून खेळून येतात आणि आईकडे खाण्याची मागणी करतात आई आपली दोन मिनिटात तयार होणारं मॅगी तयार करते अशी ती जाहिरात होती. अर्थात त्या काळी ती जाहिरात बघून आणलेली मॅगी फेकून देण्यापलीकडे काही केलं नाही. (आत्ता ती जबरदस्ती खावी लागते हा भाग वेगळा) तर तेव्हापासून कुठेतरी सगळं झटपट हा विचार नकळत त्या मनावर कोरला गेला. झटपट मोठं होणं, झटपट पैसे कमावणं, झटपट यशस्वी होणं, झटपट आयुष्यातील सगळ्या गोष्टींचा आनंद घेणं. आयुष्यात काहीही करा पण ते दोन मिनिटांच गणित डोक्यात मात्र फिक्स झालं. 

नात्यांची परिभाषा सुद्धा झटपट झाली. चट मंगनी पट बियाह सारखं आज ओळख, उद्या मैत्री आणि परवा प्रेम ते त्यानंतरच्या पायऱ्या झटपट चढल्या जाऊ लागल्या. सोशल मिडिया वरून तर दिवसांची मुदत काही तासांवर आणि काही मिनिटावर येऊन पोहचली. दोन मिनिटांपूर्वी ओळख झालेला किंवा झालेली मित्र- मैत्रीण बनते आणि चटकन आपल्या आयुष्याचा भाग होते. ते चांगल का वाईट नक्कीच त्या नात्यांच्या बेस वर अवलंबून असेल. कारण आपण कोणत्या कारणासाठी कोणाच्या जवळ जातो हे त्या दोघांना चांगलं माहित असेल. पण या सगळ्यात आपण त्या उमलण्याची मज्जा मात्र कुठेतरी हरवून बसतो आहे असं अनेकदा वाटून जाते. 

पत्रातून होणारा तो संवाद आणि त्याच्या येण्याची वाट बघण्यात जी मज्जा आणि आपलेपणा होता तो आता मेसेंजर वरच्या मेसेजमध्ये कुठे जाणवते? आज मेसेज मधून येणारे शब्द जेवढ्या वेगाने स्क्रीन वर झळकतात त्याच वेगाने वर ढकलले जातात. २ मिनिटा आधी मेसेज मध्ये काय लिहिलेलं आज आपल्याला आठवायला लागते पण पत्रातले शब्द आजही कित्येक वर्षांनी ओठावर रेंगाळतात. आपलेपणाची भावना आणि आपलेपणाचं नातं जुळायला लागलेला काळ कमी झाला पण त्याच वेगाने ती भावना पण त्या क्षणांसारखी अल्पजीवी झाली. कारण झटपट मैत्री किंवा नात झटपट होण्यात काही अडचण नाही पण अडचण आहे ती लागलेल्या दोन मिनिटाच्या सवयीची. ज्या वेगाने जवळ येतो त्याच वेगाने आपण बाजूला होतो. नात टिकवण्यासाठी लागणार समर्पण, तडजोड आज कोणाला नको आहे. पण त्याचवेळी जवळचं नातं मात्र हवं आहे.    

आजकाल चित्रपट मग ते रोमँटिक असो वा एडल्ट ते बघणं आज मोबाईल च्या एका क्लिक वर उपलब्ध आहे. त्यामुळे ते बघण्याची मज्जा कुठेतरी कमी झाली आहे हे नक्की. मला अजून चांगल आठवते माझ्या लहानपणी असा एखादा चित्रपट बघणं म्हणजे एक मोठं दिव्य असायचं. व्हिडीओ कॅसेट देणाऱ्या काकाला पटवण्यापासून ते ज्याच्या घरी बघायचं त्याच्या घरच्या सेटिंग पर्यंत सगळच  जमवून आणायला लागायचं. चित्रपट बघताना ही एखादी बॅक अप प्लॅन म्हणून अमिताभ नाहीतर मिथुन च्या चित्रपटाची कॅसेट आणलेली असायची. घराचे पडदे बंद करून अतिशय कमी आवाजात त्या २०-२५ मित्रांच्या घोळक्यात चित्रपटाची मज्जा घेणं एक वेगळा अनुभव होता. मला अजून आठवते रंगीला सारखा चित्रपट थेटर मधे जाऊन बघताना त्या संपूर्ण थेटर मधे उर्मिला नाचताना खरोखरचा पिन ड्रॉप सायलेन्स अनुभवणं माझ्या मते एक उमलण होतं ज्याची मज्जा आज एका क्लिकवर उपलब्ध होणाऱ्या चित्रपटात कुठे येते? आज झटपट उपलब्ध होणाऱ्या सगळ्या गोष्टी मग ते प्रेम असो, चित्रपट असो वा अगदी पॉर्न असो कुठेतरी दोन मिनिटाच्या घाईत आपल्या भावना पण दोन मिनिटासाठीच तेवत ठेवतात नाही का? 

कोणत्याही गोष्टीचा वेग काय असावा याचा काही मापदंड नाही. प्रत्येक माणूस वेगळं तशी नात्यांची, प्रेमाची, त्यागाची परीभाषा किंबहुना प्रत्येक गोष्टींचा वेग वेगळा. नात झटपट निर्माण होण्यात काही चुकीचं नाही, चित्रपट हाताच्या बोटावर बघण्यात पण काही चुकीचं नाही, मेसेज मधून होणाऱ्या संवादात पण काही चुकीचं नाही. पण त्या गोष्टींच उमलण आपल्याला टिकवता यायला हवं. बस दो मिनीट हे सुरवातीला चांगले पण नंतर मात्र आपल्याला ती गोष्ट अनुभवता यायला हवी. दोन मिनिटात बनणारी मॅगी एखाद्या दिवशीच चांगली वाटते पण घरच जेवण मात्र आपण आयुष्यभर जेवू शकतो. त्यामुळेच बस दो मिनीट हे दोन मिनीटांसाठीच अनुभवायला हवेत. 

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



No comments:

Post a Comment