Sunday, 23 May 2021

''का''? ... विनीत वर्तक ©

 ''का''? ... विनीत वर्तक ©

भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांचा वारसा आहे. वेद, रामायण, महाभारत आणि इतर अनेक पौराणिक कथांपासून चालू झालेली ही संस्कृती एकेकाळी संपूर्ण विश्वातली संपन्न अशी संस्कृती होती, हे पूर्ण जग मान्य करते. ह्या सुवर्णकाळाचे अनेक दाखले आजही आस्तित्वात आहेत. स्थापत्त्यशास्त्राची अद्भुत नमुने असलेली अनेक मंदिरे, ज्यात संस्कृतीशिवाय अभियांत्रिकी, गणित तसेच कला ह्या सर्वांचा मेळ आपल्याला आजही दिसून येतो. ज्या देशाने जगाला 'शून्य' ही संकल्पना दिलली, तसेच अनेक अवकाश नोंदी ह्या शिलालेखांवर आणि इतर ग्रंथांत वाचायला मिळतात. हे सगळं ते देऊ शकले, कशामुळे? तर आपलं विज्ञान त्याकाळी प्रगत होतं म्हणून! कारण मनात असणाऱ्या संकल्पना देवळांच्या रूपाने स्थापन करायला, ते विज्ञानाची कास धरल्याशिवाय शक्यच नव्हतं. पण मग असं काय झालं, की विसाव्या शतकात आपण ह्यात एकदम मागे पडलो?
भारतीय संस्कृती मागे पडण्याचं मुख्य कारण म्हणजे विज्ञानाची सोडलेली कास. परकीय आक्रमणं, आपसातील हेवेदावे ही जरी इतर प्रमुख कारणं असली, तरी विज्ञानाची कास सोडून कर्मकांडांत वळलेली संस्कृती ह्या सगळ्यामुळे आपण जास्ती मागे पडलो, असं माझं मत आहे. आपण गोष्टी बघितल्यावर त्याला एका रुपात बसवायला लागलो, ते रूप म्हणजे देव. दैवी शक्ती आणि त्याचं आस्तित्व. नक्कीच एक अशी शक्ती आहे, की जिचं अस्तित्व तेव्हाही होतं आणि आजही आहे. ज्याची पूजा करणे, त्यावर श्रद्धा ठेवणे नक्कीच बरोबर आहे, किंवा ते नक्कीच करावं. पण ते करताना आपण प्रत्येक न समजणारी गोष्ट त्या शक्तीला अर्पण केली, तर आपली अधोगती निश्चित आहे. म्हणजे कैलास मंदिर, वेरूळ सारखी मंदिरे, तसेच 'अंगकोर वाट' सारखं मंदिर ह्याला एक दैवी शक्तीचं देणं आहे, हे नाकारता येत नाही, पण त्यापलीकडे जाऊन त्याकडे बघणं गरजेचं आहे. विज्ञानाची कास आणि त्या विज्ञानातून, गणितातून पूर्णत्वाला नेलेली मानवी स्वप्नांची ती अत्युच्च शिखरं आहेत.
ह्या अदभूत किंवा सांगता न येणाऱ्या शक्तींशी आपण इतके तल्लीन झालो, की विज्ञान आपल्या हातातून निसटलं. आपण “का?” हा प्रश्न विचारायचं सोडूनच दिलं. सगळं देव आणि धर्माच्या नावाखाली लपवलं. ज्या संस्कृतीने हजारो वर्षं ह्या भूतलावर राज्य केलं, ती रसातळाला जायला काही दशकं पुरली. २०व्या शतकाच्या उंबरठ्यावर किंबहुना त्याच्या साक्षीने पुन्हा एकदा आपल्याला विज्ञानाची कास धरणं गरजेचं आहे. कारण ती अद्भुत शक्ती तशीच आहे, त्या काळीही होती आणि आजही! फरक आहे तो आपल्याला पडलेल्या प्रश्नांना आपण प्रतिप्रश्न विचारून उत्तरं शोधतो का?
'झाडावरून पाडलेलं सफरचंद खालीच का पडतं'? हा प्रश्न जेव्हा न्यूटनला पडला, तेव्हा आपल्याला एका अदभूत शक्तीचा म्हणजे 'गुरुत्वाकर्षणाचा' शोध लागला. वाफेच्या शक्तीचा शोध लावणारा जेम्स वॅट असो वा १६व्या शतकात दुर्बिण घेऊन आकाश बघणारा गॅलिलिओ, ह्या सर्वांनी आपल्याला पडलेल्या प्रश्नांना उत्तरं शोधली. ती उत्तरं सापडेपर्यंत विज्ञानाचा हरएक कोपरा धुंडाळून सोडला. मग जे काही समोर आलं, त्याने पूर्ण मानवजातीचं भविष्य बदलवून टाकलं. असे अनेक वैज्ञानिक परदेशात घडत असताना आम्ही मात्र अजूनही आमच्या सुवर्णकाळाचे दाखले देण्यात धन्यता मानत राहिलो. आजही वेगळं काही घडत नाही. आम्ही आजही कारकून बनवतो, जे की सर्वांत स्वस्त, मस्त आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम देतात, ते घडवण्यात आम्ही धन्यता मानत आहोत. ८०%, ९०%, ९९% इथवर पोचलेली आमची कारकुनांची पिढी लवकरच १००% ला गवसणी घालेल असं चित्र आहे. पण हे कारकून खरंच विज्ञानाची कास धरणारे आहेत की विज्ञानाच्या मागे धावणारे आहेत ह्याचा विचार करण्याची गरज नक्कीच आहे.
मुळात पाय (π) म्हणजे काय? पाय-ची किंमत ३.१४२ का? प्रकाशात ७ रंगच का? असे अनेक साधे प्रश्न ह्या कारकुनांना विचारले, तर चेहऱ्यावर प्रश्न उभे राहतील. कारण विज्ञानात उत्तरं शोधावी लागतात, ती पाठ करून विज्ञान येत नसते. पण आजही आपण एकतर अश्या प्रश्नांना फालतू मानतो, किंवा इतक्या सोप्प्या गोष्टींची कास धरावी असं आपल्याला वाटत नाही, पण इथेच खरा घोळ आहे. '३ इडियटस्' चित्रपट आपण सगळेच बघतो, पण आपला पाल्य त्यातला एक नसावा असं सगळ्यांना वाटतं. कारण शेवट चांगला असला, तरी 'एका दिवसात यश मिळविण्यासाठी हजारो रात्रींचा त्रास माझ्या पाल्याने सहन का करावा?' हा प्रश्न प्रत्येक पालकाला पडलेला असतो. म्हणूनच आपण अजून त्या सुवर्णकाळापासून कोसो मैल लांब आहोत, हे पुन्हा एकदा उघडपणे मान्य करावं.
आमच्याच सुवर्णकाळाच्या साक्षीदार असणाऱ्या गोष्टींबद्दल आम्हालाच माहिती नाही, इतकी आपली पातळी खालची आहे. 'अंगकोर वाट' हे आपलं मंदिर आहे? ते कुठे आहे? असा प्रश्न असतो. 'कैलास लेणी' बघितली का? तर, हो बघितली असं उत्तर सगळे देतात. पण तिकडे असणारा दगडी पूल कसा बांधला? किंवा साधारण किती टन खडक त्यातून काढला असेल? किंवा त्याच जागी मंदिर का बांधलं गेलं? असले प्रश्न आम्हाला पडत नाहीत. आधी कळस आणि मग पाया बांधताना कोणत्या गोष्टींचा विचार केला गेला असेल? त्यात कोणत्या अडचणी आल्या असतील? अश्या अनेक प्रश्नांचा मागोवा घेणं आमच्या रक्तात नाही, हे सत्य आहे. कारण त्याचा विचार करून काय मिळणार? असे आपले विचार असतात. आपण उत्तरं शोधत नाही, म्हणून आपलं उत्तर ठरलेलं असतं, 'दैवी शक्ती'. जिकडे सगळेच प्रश्न सोडवले जातात नाही का?
जगातील अनेक देश प्रगत झाले, कारण त्यांनी विज्ञानाची कास धरली. देव किंवा अद्भुत शक्तीची नाही. त्या शक्तीचं आस्तित्व आजही आहे. काही गोष्टींची उत्तरं विज्ञान नाही देऊ शकत, यावर श्रद्धा असणं, त्यात काही चुकीचं नाही. पण सगळ्याच उत्तरांसाठी त्या शक्तीपुढे शरण जाणं हेही तितकंच चुकीचं आहे. उद्याचा भारत जर पुन्हा एकदा सुवर्णकाळ दाखवणारा बनवायचा असेल, तर विज्ञान आणि श्रद्धा ह्या दोघांची कास असल्याशिवाय हे शक्य नाही. श्रद्धा तर आपली असतेच, गरज आहे ती विज्ञान समजून घेण्याची, सुरूवात आपल्या स्वतःपासून करण्याची, पडलेल्या प्रत्येक “का” ला उत्तरं शोधायला सुरूवात करण्याची. आपल्या पुढल्या पिढीला ह्या “का”च्या पाठीमागे धावण्याची सवय लावली, तर पुन्हा एकदा भारत संपूर्ण विश्वात सुखीसंपन्न देश असेल ह्याविषयी शंका नाही.
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

4 comments:

  1. अनंत बापट24 May 2021 at 07:04

    अतिशय संतुलित आणि वस्तुनिष्ठ विचार.

    ReplyDelete
  2. डोळ्यावरील झापड उघडवणारा लेख, धन्यवाद विनीत जी

    ReplyDelete
  3. "विज्ञानाची कास सोडून कर्मकांडांत वळलेली संस्कृती ह्या सगळ्यामुळे आपण जास्ती मागे पडलो" मलासुद्धा असेच वाटते.

    ReplyDelete