Tuesday 4 May 2021

आयुष्य देणाऱ्या एका सैनिकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

आयुष्य देणाऱ्या एका सैनिकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

कर्नल (डॉक्टर) दिवाकरन पद्मकुमार पिल्लई म्हणजेच डी.पी.के.पिल्लई हे नाव भारतीयांना माहित असण्याची अगदी दूर दूर पर्यंत माहित असण्याची शक्यता नाही. १९८८ साली एन.डी.ए. मधून भारतीय सैन्यात ऑफिसर झालेले त्याकाळी कॅप्टन असलेले डी.पी.के.पिल्लई २५ जानेवारी १९९४ साली एक ऑपरेशन लीड करत होते. National Socialist Council of Nagaland (Isak-Muivah) चे चार बंडखोर लोंगडी परभन या भागात लपून बसले होते. तिथल्या एका ब्रिज आणि संपर्क करणाऱ्या टॉवर ला उध्वस्थ करण्याची त्यांची योजना असल्याची गुप्त माहिती मिळालेली होती. या बंडखोरांना नेस्तनाबूत करण्याची जबाबदारी कॅप्टन डी.पी.के.पिल्लई यांच्या टीमकडे होती. त्यांच्या टीम ने बंडखोर लपून बसलेल्या घराला चारी बाजूने घेरलं. अनेकवेळा घरातून बाहेर येण्याची विनंती करून सुद्धा दरवाजा न उघडल्याने कॅप्टन नी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

आत प्रवेश करताच आत दबून बसलेल्या बंडखोरांनी एके ४७ मधुन गोळ्यांचा पाऊस पाडायला सुरवात केली. बंडखोर आणि भारतीय सेनेच्या मधे तब्बल दीड  तास धुमश्चक्री सुरु होती. शेवटी रॉकेट लॉंचर ने संपूर्ण घर उडवून देण्याचा शेवटचा इशारा भारतीय सेनेने दिल्यावर बंडखोरांनी आपली शस्त्र खाली ठेवली. पण तोवर कॅप्टन डी.पी.के.पिल्लई गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या दंडामध्ये तीन तर छातीत एक गोळी घुसलेली होती. बंडखोऱ्यानी टाकलेल्या बॉम्ब च्या स्फोटात उजवा पाय सोलून निघाला होता. पण अजूनही ते अश्या अवस्थेत आपल्या टीम च नेतृत्व करत होते. या सगळ्या कारवाईत ते जखमी झाल्याची बातमी भारतीय सेनेच्या मुख्यालयात पोहचली होती. त्यांना तातडीने हॉस्पिटल मधे  नेण्यासाठी भारतीय सेनेचं हेलिकॉप्टर कारवाईच्या ठिकाणी पाठवण्यात आलं. 

या कारवाईत बंडखोरांचा मोहरक्या मारला गेला तर इतरांनी शरणागती पत्कारली. बंडखोर आपली हत्यार टाकून बाहेर येत असताना त्यांच्यामागून दोन मुलं जखमी अवस्थेत बाहेर आली. बंडखोरांसोबत मुलं जोडीला आहेत याबद्दल कॅप्टन डी.पी.के.पिल्लई पूर्णतः अनभिज्ञ होते. त्यात त्या ६ वर्षाच्या मुलाच्या पायात गोळी लागली होती आणि १३ वर्षाच्या मुलीच्या पोटात गोळी लागली होती. भाऊ-बहीण असणाऱ्या त्या दोघांचा जीव धोक्यात होता. जवळ असणार हॉस्पिटल ६ तासाच्या अंतरावर होत. त्यांचा जीव तिथवर जाईपर्यंत वाचणं अशक्य होतं. भारतीय सेनेचं हेलिकॉप्टर कॅप्टन डी.पी.के.पिल्लई यांना हॉस्पिटल मधे घेऊन जाण्यासाठी तयार होतं. जखमी झालेली ती दोन मुलं भारतीय सेनेने केलेल्या गोळीबारात जखमी झाली होती. कॅप्टन डी.पी.के.पिल्लई यांच्यापुढे दोन पर्याय होते. एकतर स्वतःचा जीव वाचवणं किंवा त्या दोन मुलांचा जीव वाचवणं. भारतीय सेनेच्या ट्रेनिंग मधलं वाक्य त्यांच्या डोक्यात होतं , 

“Our weapons are meant to kill our enemies and not our own people".... 

हेलिकॉप्टर मधे बसून स्वतःचा जीव वाचवला तर त्या दोन मुलांचा जीव घेण्याचं शल्य आयुष्यभर टोचत राहिलं असतं आणि या अपराधी पणाच्या भावनेतून आपण स्वतःला कधीच माफ करू शकत नाही हे त्यांना समजून चुकलं. स्वतःचा मृत्यू समोर दिसत असताना आपला जीव वाचवण्यापेक्षा त्यांनी त्या दोन मुलांच्या जीवाला भारतीय नागरीक असल्याने त्यांच्या जीवाचं रक्षण हे आपल्या जिवापेक्षा महत्वाचं आहे हे आपलं कर्तव्य त्यांनी स्वीकारलं. त्यांना नेण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टर च्या पायलट ला त्या दोन मुलांना आधी सुरक्षित स्थळी नेण्यासाठी सांगितलं. त्या हेलिकॉप्टर चा पायलट हा त्यांचा चांगला मित्र होता. त्याने कॅप्टन डी.पी.के.पिल्लई यांना उद्देशून म्हंटल, 

“Don’t play Mother Teresa, Pillay. I need to… what will I tell your mum?” 

त्याला उत्तर देताना कॅप्टन डी.पी.के.पिल्लई म्हणाले, 

 “Just tell her that I saved two children.” 

त्यांच्या उत्तरावर हेलिकॉप्टर च्या पायलट ला त्यांचा आदेश मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. हेलिकॉप्टर मधून त्या दोन मुलांना बटालियन च्या हेडक्वार्टर मधे  नेण्यात आलं आणि मग त्यांना Regional Institute of Medical Sciences (RIMS) इंफाळ इकडे हलवण्यात आलं. तब्बल दोन तासानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कॅप्टन डी.पी.के.पिल्लई यांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं. आपण जगलो नाही तरी आपण आपलं कर्तव्य पूर्ण केल्याचं समाधान त्या यमासोबत जाताना असेल याची पूर्ण कल्पना त्यांना होती. त्यांना या पराक्रमासाठी शांततेच्या काळात देण्यात येणाऱ्या सर्वोच्च सन्मान शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलं. पण गोष्ट इकडे संपत नाही तर सुरु होते. 

१६ वर्ष मधे गेली. त्या मुलांच काय झालं? याची कल्पना न कॅप्टन डी.पी.के.पिल्लई यांना होती न त्या मुलांना ज्यांचा जीव त्यांच्यामुळे वाचला होता. आपला एक सहकारी मणिपूर मधे असताना कर्नल डी.पी.के.पिल्लई यांनी त्या गावाशी संपर्क साधला. त्यांना भेटण्यासाठी त्यांनी मणिपूर ला भेट दिली. ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या गावातील मुलांचे प्राण वाचवले त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव जमा झाला होता. संपूर्ण गावातील जमातीने कर्नल डी.पी.के.पिल्लई यांना आपल्या जमातीत स्थान दिलं. त्यांना  ‘Pillay Pamei’ अशी उपाधी दिली. याशिवाय सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांना त्यांच्या गावात घर बांधण्यासाठी १०० एकर जमीन भेट दिली. अर्थात माणुसकी आणि भारतीय सैन्याचा आदर्श जपणाऱ्या कर्नल डी.पी.के.पिल्लई यांनी नम्रपणे ही भेट तर नाकारली पण गावाच्या विकासासाठी जे काही करता येईल ते करण्याचं आश्वासन दिलं. नुसतं आश्वासन न देता त्यांनी गावात रस्ता बांधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर पाठपुरावा केला. २०१६ मधे Tamenglong to Peren via Longdi Pabram या रस्त्यासाठी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने मंजुरी दिली. त्यांनी ज्या ६ वर्षाच्या मुलाचा त्यांनी जीव वाचवला तो आज शिकून बँकेत नोकरीला लागला आहे. याच वर्षी २१ जानेवारीला त्याने लग्न केलं. त्याच्या लग्नाचं ट्विट कर्नल डी.पी.के.पिल्लई यांनी शेअर केलं होतं. लग्नाला जाऊ न शकल्याची खंत व्यक्त केली आहे. 

आपलं आयुष्य भारतासाठी समर्पित करून आपलं मरण समोर दिसत असताना आपल्या कर्तव्यापुढे आपल्या मरणाला झुकायला लावणाऱ्या शौर्य चक्र सन्मानित कर्नल डी.पी.के.पिल्लई यांना माझा कडक सॅल्यूट. सर आज मला माझ्या आयुष्यातले हिरो आणि आदर्श कोण विचारले तर त्यातले तुम्ही एक असाल.  आपल्या आयुष्याचा विचार न करता दुसऱ्यांना  आयुष्य देणाऱ्या तुमच्या सारख्या सैनिकांमुळेच आजचा भारत अस्तित्वात आहे. तुमच्या कार्यास माझा साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  





No comments:

Post a Comment