Thursday 13 May 2021

आयर्न डोम सुरक्षाकवच... विनीत वर्तक ©

 आयर्न डोम सुरक्षाकवच... विनीत वर्तक ©

महाभारतात अर्जुनाच्या बाणापेक्षा कर्णाच सुरक्षाकवच अभेद्य आहे याची कल्पना श्रीकृष्णाला होती. जोवर कर्णाच्या अंगावर सुरक्षाकवच आहे तोवर अर्जुनाचे बाण कर्णाला काहीच इजा पोहचवू शकणार नाहीत हे श्रीकृष्ण ओळखून होता. हा झाला महाभारतातला भाग पण तो आजही तितकाच लागू होतो. फरक इतकाच की त्या बाणाची जागा आज मिसाईल घेतली आहे तर त्या कवचाची जागा आर्यन डोम ने. आयर्न डोम समजून घेण्यासाठी त्याची तुलना कर्णाच्या कवचाशी केली तर पटकन समजून येईल. तर अश्या सुरक्षा करणाऱ्या कवचाची निर्मिती इस्राईल च्या राफेल एडवांस डिफेन्स सिस्टीम ने केली आहे. गेल्या एक-दोन दिवसात गाझा पट्टीत वातावरण पुन्हा पेटलं आहे. पॅलेस्टाईच्या हमास या अतिरेकी संघटनेकडून हजारो क्षेपणास्त्रांचा मारा इस्राईल च्या दिशेने केला गेला. ही रॉकेट इस्राईल च्या दिशेने आली तर खरी पण ती आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचू शकली नाही. कारण त्या आधीच इस्राईल च्या आयर्न डोम ने त्यांना आधीच निष्प्रभ केलं होतं. तर नक्की काय आहे ही इस्राईल ची आयर्न डोम सिस्टीम? भारताला याचा फायदा होऊ शकेल का? हे आपण समजून घ्यायला हवं. 

आयर्न डोम ही एक एअर डिफेन्स सिस्टीम आहे. वर सांगितलं तसं हवेतून येणार कोणतही क्षेपणास्त्र, ड्रोन, लढाऊ विमान, रॉकेट याचा मागोवा घेऊन शत्रूचं आहे हे लक्षात आल्यास त्यावर आपल्याकडील क्षेपणास्त्राने हल्ला करून निष्प्रभ करू शकते. आयर्न डोम ही इस्राईल बनवत असलेल्या मल्टी लेअर एअर डिफेन्स प्रणालीचा भाग आहे. इस्राईल आपल्या संपूर्ण प्रदेशावर असं सुरक्षा कवच तयार करतो आहे की  ज्यातून कोणीच इस्राईलवर हवेतून हल्ला करू शकत नाही. ह्या प्रणाली मध्ये एरो २, एरो ३, बराक ८, आयर्न बीम आणि डेव्हिड स्लिंग अश्या वेगवेगळे थर आहेत. तर आयर्न डोम प्रणाली कशी काम करते तर इस्राईल च्या आकाशात येणारं कोणतही रॉकेट, मिसाईल, विमान ही प्रणाली पहिल्यांदा शोधून काढते. त्या नंतर त्याच लक्ष्य आणि मार्ग ठरवते. जर का ते शत्रूचं असल्याचं नक्की झालं तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकते. आता वाचताना हे सोपे  वाटले तरी प्रत्यक्षात या सगळ्या प्रक्रिया १-२ सेकंदात करायच्या असतात. कारण येणाऱ्या रॉकेट किंवा कोणत्याही वस्तूचा वेग इतका असतो की त्याला निष्प्रभ करण्यासाठी १-२ सेकंद मिळतात. 

आयर्न डोम प्रणाली मध्ये तीन वेगवेगळ्या प्रणाली एकत्र काम करतात. त्यात पहिली म्हणजे डिटेक्शन एन्ड ट्रॅकिंग प्रणाली जीच काम इस्राईल च्या आकाशात असणाऱ्या सगळ्या वस्तुंना शोधून काढणे. दुसरी प्रणाली आहे बॅटल मॅनॅजमेन्ट एन्ड वेपन कंट्रोल सिस्टीम ह्या प्रणालीकडे रडार कडून आलेल्या माहितीचं आकलन केलं जाते आणि आपला शत्रू कोण हे ठरवल्यावर त्याला निष्प्रभ करण्यासाठी डागता येणाऱ्या यंत्रणेला आदेश दिला जातो. तिसरी यंत्रणा आहे मिसाईल फायरिंग युनिट ज्यातून प्रतिहल्ला केला जातो. या तिन्ही प्रणाली एखाद्या भागात विशिष्ठ पद्धतीने बसवल्या जातात. ज्यायोगे त्या शत्रूच्या नजरेत येऊ नयेत. बॅटल मॅनॅजमेन्ट एन्ड वेपन  कंट्रोल सिस्टीम (बी.एम.सी.) ही गुप्त नेटवर्क द्वारे सेंट्रल प्रणालीशी जोडलेली असते. अश्या तीन प्रणाली मिळून एक बॅटरी बनते. अशी एक बॅटरी किंवा युनिट साधारण ७० किलोमीटर च्या प्रदेशाचं संरक्षण करू शकते. अश्या अनेक बॅटरी च जाळ इस्राईल ने आपल्या गाझा पट्टी जवळच्या भागात विणलेलं आहे. अश्या प्रत्येक बॅटरीची कमांड ही सेंट्रल प्रणालीकडे असते. जी त्यांच्यामध्ये समन्वय साधते. 

गेल्या १-२ दिवसात पॅलेस्टाईन कडून झालेल्या १००० पेक्षा जास्ती रॉकेट हल्यामधील ९०% पेक्षा जास्त रॉकेट ही हवेतल्या हवेत आयर्न डोम प्रणालीने नष्ट केली. इस्राईल च्या नागरिकांना या रॉकेट हल्ल्यापासून वाचवलं. हजार रॉकेट सोडल्यानंतर फक्त ४ इस्राईल लोकांचा त्यात मृत्यू झाला. इस्राईल ने केलेल्या प्रतिउत्तरात मात्र ५० पेक्षा जास्ती पॅलेस्टाईन लोक मारले गेले आहेत. आयर्न डोम प्रणाली जशी चांगली आहे तशी ती महागडी पण आहे. पॅलेस्टाईन कडून डागल्या गेलेल्या रॉकेट ची किंमत साधारण १००० डॉलर च्या घरात आहे. तर आयर्न डोम प्रणालीने निष्प्रभ करण्यासाठी मारा केलेल्या रॉकेट ची किंमत तब्बल ८०,००० अमेरिकन डॉलर (४०,००० डॉलर प्रत्येकी. एक रॉकेट नष्ट करण्यासाठी दोन क्षेपणास्त्र डागावी  लागतात.) च्या घरात आहे. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की शत्रूने सोडलेली रॉकेट ही फक्त आणि फक्त इस्राईल च्या दिशेने विध्वंस करण्यासाठी सोडली गेली होती. त्यामुळे अचूकता किंवा लक्ष्य यांचा काही ताळमेळ असण्याची गरज नव्हती. त्यामुळे ती अतिशय स्वस्त होती. पण इस्राईल च्या आयर्न डोम प्रणाली मधील प्रत्येक रॉकेट हे स्मार्ट रॉकेट होतं. यातील प्रत्येक रॉकेट हवेतून येणाऱ्या लक्ष्याला समोरून, बाजूने आणि मागून अश्या कोणत्याही दिशेने निष्प्रभ करण्यास सक्षम होतं. त्यासाठी त्यावर ऑप्टिकल-इन्फ्रारेड कॅमेरे बसवलेले असतात. एकदा डागल्यावर हे क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्याचा पाठलाग करून त्याचा वेध घेण्यास सक्षम असणारं स्मार्ट रॉकेट ते आहे.  

आयर्न डोम ची किंमतीवरून त्यावर अनेकदा आक्षेप घेतले जातात. पण इस्राईल च्या ह्याच यंत्रणेने गेल्या १० वर्षात २५०० पेक्षा जास्त रॉकेट, क्षेपणास्त्र, ड्रोन  इंटरसेप्ट करून त्यांचा वेध घेतला आहे. २५०० रॉकेट नी किती इस्राईल लोकांचा बळी घेतला असता याचा विचार केला तर आयर्न डोम ची किंमत त्यापुढे काहीच नाही. भारताने ही प्रणाली घेण्यासाठी खूप वर्षाआधीच रस दाखवला होता. पण भारताच्या दृष्टीने काही गोष्टी अतिशय वेगळ्या होत्या. इस्राईल वर होणारे हल्ले हे त्यांच्या देशाच्या सीमेच्या अगदी हाकेच्या अंतरावरून होतात. त्यामुळे आयर्न डोम ची मारा करण्याची असलेली ७० किलोमीटर ची क्षमता त्यांच्यासाठी पुरेशी आहे. भारताला जरी दोन्ही बाजूने शत्रू असले तरी भारताच्या सिमांवर रॉकेट हल्ले होत नाहीत. दुसरं म्हणजे होणारे हल्ले हे काही शेकडो किलोमीटर वरून होण्याची शक्यता जास्ती आहे. तसेच भारताची शेकडो किलोमीटर ची सिमा संरक्षित करण्यासाठी शेकडो आयर्न डोम सिस्टीम लावाव्या लागतील. तब्बल ५० मिलियन अमेरिकन डॉलर प्रत्येक बॅटरी ची किंमत असणारी सिस्टीम त्यामुळे भारताला परवडणारी नाही. त्यासाठीच भारताने जगातील दुसरी सर्वोत्तम असणारी एस ४०० ही एअर डिफेन्स प्रणाली रशिया कडून विकत घेतली आहे. जिची क्षमता तब्बल ६०० किलोमीटर ची आहे. त्याशिवाय भारत भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम तयार करत आहे. रशियाची एस ४००, अमेरिकेची National Advanced Surface to Air Missile-II (NASAMS-II) सोबत भारताची Ballistic Missile Defence (BMD), Prithvi Air Defence (PAD),  Advanced Air Defence (AAD), and Akash Air Defence System. अश्या वेगवेगळ्या पद्धतीने भारताच्या आकाशातील संरक्षणासाठी सज्ज आहेत. या वर्षी एस ४०० तैनात झाल्यावर भारताचं हवेतील सुरक्षा कवच प्रचंड मजबूत होणार आहे. ज्याला भेदणं शत्रू राष्ट्रांना जवळपास अशक्य असणार आहे.   

इस्राईल आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षा करतो आणि आपल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवाच्या बदल्यात निदान १० तरी शत्रुंना ढगात पाठवतो. 'हमास' या अतिरेकी संघटनेने जर अतिरेकी हल्ले असेच चालू ठेवले तर होणाऱ्या परिणामांसाठी पॅलेस्टाईन ने तयार राहण्याचा इशारा कालच इस्राईल च्या पंतप्रधानांनी दिला आहे. त्यासाठी घरात घुसून तर मारूच पण त्यानंतर ते घर आणि ती जमीन पण आमचीच असेल  इशारा देण्यात ते घाबरलेले नाहीत. इतर देश काय विचार करतील?, त्यांना ते आवडेल का नाही? याचा विचार इस्राईल देश कधीच करत नाही. आपल्या नागरिकांचं संरक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याला कोणी इजा पोहचवली तर त्याला त्याच्या घरात घुसून मारण्याची क्षमता इस्राईल आज ठेवून आहे ती अश्याच आधुनिक प्रणालींमुळे. गेल्या काही दिवसात आयर्न डोम ने हजारो इस्राईल नागरिकांचे प्राण वाचवून पुन्हा एकदा आपली अचूकता आणि क्षमता सिद्ध केली आहे. जोवर इस्राईल वर आयर्न डोम आणि पुढे येणाऱ्या मल्टी लेअर एअर डिफेन्स च कवच आहे तोवर जगातील कोणतही क्षेपणास्त्र आणि रॉकेट इस्राईल ला जखमी करू शकणार नाही. येत्या काळात ज्या पद्धतीने इस्राईल स्वतःला सुरक्षित करतो आहे ते बघता हे अभेद्य कवच भेदणं अशक्य होणार आहे. इस्राईल आणि भारत एकत्र येऊन भारतासाठी बराक ८ या कवचाची निर्मिती करत आहेत. इस्राईल ने भारताला संपूर्णपणे अश्या कवच निर्मितीचे तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यासाठी ही मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या काळात भारताच्या सुरक्षितेत आयर्न डोम सारख्या प्रणालींचा मोठा वाटा असणार आहे. 

 फोटो स्रोत :- गुगल ( फोटो मध्ये कश्या पद्धतीने आयर्न डोम प्रणाली ने क्षेपणास्त्रांना नष्ट केलं ते बघू शकतो. आयर्न डोम प्रणाली कडून निघालेली रॉकेट.) 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment