चुकलेला जमाखर्च... विनीत वर्तक ©
काल एका प्रतिथयश पेपरात बॉलिवूड मधे करणाऱ्या मॉडेल च मनोगत वाचत होतो. कोरोना ने कश्या पद्धतीने आयुष्य होत्याच नव्हतं केलं. गेली अनेक वर्ष आपल्या सौंदर्याने आणि अदांनी अनेकांना घायाळ करत पैश्याच्या राशीवर लोळणारी तिला आज कुठेतरी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. कोरोना च वाढलेलं संक्रमण आणि त्यामुळे शासनाने केलेल्या लॉकडाऊन मुळे संपूर्ण चित्रपट सृष्टी आणि त्याच्याशी संल्गन असणाऱ्या उद्योगांचा बोजवारा उडालेला आहे. किंबहुना अनेक उद्योगांची आज तीच दशा आहे. हे झालं उद्योगांच पण स्वतःच्या जमाखर्चाचा ताळमेळ ठेवायला ही आजकाल अनेक लोकांना कठीण जात आहे. वरच्या मॉडेल च उदाहरण त्याचेच एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.
'अंथरूण पाहून पाय पसरावे' अशी एक म्हण जुन्या काळात प्रचिलित होती. पण पॉझिटिव्ह थिंकिंग ची दुकान चालवणाऱ्यांनी आजच्या काळात तीच स्वरूप बदलून 'आपलं अंथरूण मोठं करावं' असं एक नवीन स्वरूप सगळ्यांसमोर सादर केलं. अर्थात ते किती चूक आणि बरोबर याचा अर्थ यातील अभ्यासक लोकं काढतील पण ते अंथरूण मोठं करण्याच्या नादात आपल्या पायांची आपण किती दमछाक करतो आहोत याचा विचार कोणीच केला नाही. पायाची लांबी काय प्रत्येक वर्षी वाढत नाही मग स्थिर असणाऱ्या पायांना अंथरूण तरी किती मोठं लागणार? आपल्या दैनंदिन गरजा खरे तर किती लहान असतात पण अंथरूण मोठं करणाच्या नादात आपण त्या इतक्या वाढवून ठेवतो की त्याच वाढलेलं स्वरूप आपल्याला भारी पडते.
कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण जगाचे ठोकताळे बदललेले आहेत आणि त्यात अजूनही बदल होत आहेत. नक्कीच त्याचा फटका आर्थिक पातळीवर आपल्यापैकी प्रत्येकाला बसलेला आहे किंवा बसणार आहे. अचानक आलेली मंदी, आटत चाललेली पैश्यांची आवक, बंद पडलेला धंदा, नोकरी टिकवण्याची धडपड ते महिन्या अखेरीला मिळणाऱ्या पगारावर अस्थिरतेचे घोंघावणारे वादळ अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर पैश्याचा विनिमय ही सगळ्यात मोठी समस्या बनत चाललेली आहे. कारण अश्या कोणत्याच परिस्थितीचा आपण कधी विचार केला होता न आपली काही तयारी होती. एकेकाळी प्रत्येक आठवड्याला माणसांनी भरून वाहणारे मॉल, चित्रपटगृह, बीच, आणि विकेंड डेस्टिनेशन आज पूर्णपणे बंद पडलेले आहेत. पुन्हा ते कधी चालू होतील आणि त्याच स्वरूप पूर्वी सारखं असेल का? या बद्दल आज कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे अश्या अनेक गोष्टींशी निगडित असणारे आपण कळत नकळत या अस्थिरतेच्या चक्रात ओढले गेलो आहोत.
आज भलीमोठी कर्ज घेऊन उभारलेली घर फक्त स्वप्नात उरली आहेत. पण कर्जाचे हप्ते मात्र डोईजड व्हायला लागले आहेत. दुसऱ्या घराची स्वप्न बघताना पहिल्या घराच्या खर्चाच्या शिलकीतून सगळे पैसे अंथरूण मोठं करण्यात गुंतवल्याने आता त्या मोठ्या अंथरुणाचा भार पेलवेना झाला आहे. एकतर ते स्वप्नात कुठेतरी राहिलं आहे किंवा प्रत्यक्षात उतरलं तरी तिथे जायचे वांदे आहेत. स्टेटस, श्रीमंती आणि उच्च राहणीमान जगणाच्या आणि दाखवण्याच्या नादात आपण आपल्या ठेवणीतल्या रकमेला कात्री लावली आहे. आज अचानक जेव्हा काही महिन्यांसाठी किंवा काही आठवड्यांसाठी आपल्या नियमित मिळकतीला कात्री लागते तेव्हा आपण त्यातून सावरू शकत नाही हे वास्तव आज सगळीकडे प्रखरतेने दिसत आहे.
ही परिस्थिती का आली? याचा विचार केला तर त्याच उत्तर आपल्या पसरवलेल्या अंथरुणात आहे असं माझं स्पष्ट मत आहे. उद्या जर का माझी नोकरी किंवा व्यवसाय मला पुढले काही महिने अपेक्षित उत्पन्न देऊ शकला नाही तर मी अश्या परिस्थितीत किती आठवडे अथवा महिने एक चांगल राहणीमान जगू शकतो? हा विचार आपण आपल्या जमाखर्चात करणं बंद केलेलं आहे. माझ्यावर अडचणीची परिस्थिती आली की जिकडे हॉस्पिटल सारखे खर्च अश्या अनपेक्षित खर्चाला आपल्याला सामोरं जावं लागलं तर त्याची काय तजवीज आपण केली आहे? याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. नुसतं मेडिक्लेम आहे म्हणून पुढे जाण खूप भारी पडू शकते. कारण मेडिक्लेम चा क्लेम दिसतो तितका सरळ नसतो हे वास्तव आपण कधी स्विकारणार आहोत? माझ्याकडे १ आणि २ कोटींचा मेडिक्लेम आहे असं म्हणणारे प्रत्यक्षात त्याच्या १०% रक्कम तरी खात्रीने पॉलिसी विकणाऱ्या कंपन्यांकडून मिळेल याची खात्री देऊ शकतात का? अपवाद असतील पण अनेकदा या न त्या कारणाने क्लेम ची रक्कम मिळत नाही हे वास्तव आहे. मग अश्या परिस्थिती मधे आपण काय करणार आहोत? आपल्याकडे काही प्लॅन बी आहे का?
आजवर जमाखर्चाच्या रकान्यात आपण आपल्या स्वप्नानसाठी जागा ठेवत आलो. पण स्वप्नांच्या मृगजळात आपण वास्तवापासून कधी लांब गेलो याच भान आपल्याला राहिलं नाही. कोरोनाने ती जाणीव आपल्याला करून दिली आहे. आज नाइके चे शूज, गुची ची बॅग, लिव्हाइस ची पॅन्ट, रोलेक्स च घड्याळ किंवा ऍपल चा फोन सगळं निपचित घरात पडलेलं आहे. लग्नात दाखवण्यासाठी मानपानासाठी खर्च केलेले करोडो रुपयांची आठवण आज घरातले लोकं पण काढत नाहीत तिकडे बाकीच्यांच सोडून द्या. आज स्वप्नातलं घर, गाडी, स्टेटस सगळं तिथल्या तिथे पसरलेलं आहे. पण त्या पसरलेल्या अंथरुणाच्या खाली विसावणारे पाय मात्र दोन वेळच्या जेवणासाठी वणवण करत आहेत. नक्की आपल्याला काय हवं हे लक्षात आलं की मिळालेल्या अंथरुणात पण अश्या अडचणीच्या काळात सुखाने पाय पसरता येतात फक्त आपल्याला जमा खर्चाचा हिशोब जमवता यायला हवा.
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
विनीत जी वास्तव मांडलेत आपण, आपल्या आजूबाजूला पाहिलं तर सध्या या वास्तवाला सामोरे जाण ही कठीण झालेलं दिसतंय
ReplyDelete