'लाय टू मी' ... विनीत वर्तक ©
गेले अनेक दिवस “लाय टू मी” नावाची अमेरिकन सिरीज बघतो आहे. अमेरिकन सिरीज नेहमीच एक वेगळाच विषय घेऊन समोर येतात. त्याच पठडीतील चुकवू नये अशी ही सिरीज आहे. जगातील नावाजलेले सायकॉलॉजीस्ट पॉल एकमन यांच्या 'ह्युमन एक्स्प्रेशन'च्या अभ्यासावर ही सिरीज बेतलेली आहे. अप्लाइड सायकोलॉजी, मायक्रोएक्स्प्रेशन, फेशियल कोडींग सिस्टीम, बॉडी लँग्वेज या सगळ्यांचा अभ्यास करून गुन्ह्यांची उकल करण्यावर ही संपूर्ण सिरीज प्रकाशझोत टाकते.
ह्यातील प्रत्येक एका विषयात एक स्वतंत्र पी. एच. डी. होऊ शकेल. ह्यामुळेच माणसाला समजणे किती अवघड आहे, हे सिद्ध होते. खरे तर 'एक्स्प्रेशन' हे मानवाला इतर प्राण्यांपेक्षा लाभलेलं वरदान आहे. म्हणून तर प्रेमाचीही इतक्या वेगवेगळ्या लेव्हलवर आपण अनुभूती घेऊ शकतो. न बोलता सुद्धा भावनांची अनेक आंदोलनं जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचवू शकतो. अजूनही आपण या शक्तीबद्दल पूर्णतः अनभिज्ञ आहोत. ह्याचा वापर आपण करू शकलो, तर अनेक गोष्टींचं आकलन आपल्याला खूप आधी तर होईलच, पण एकमेकांना न बोलता, न सांगता समजून घेण्यासाठीसुद्धा ते वरदान ठरेल.
“लाय टू मी” एक क्राईम इनव्हेस्टीगेशन सिरीज आहे. ज्यात एका डॉक्टरचा उपयोग गुन्हेगारांच्या ह्याच एक्स्प्रेशनस् चा अभ्यास करण्यासाठी केला जातो. आपल्या अभ्यासातून हा डॉक्टर पोलीस, गुप्तहेर यंत्रणा ह्यांना अनेक गुन्ह्यांची उकल करण्यास मदत करतो. सिरीज जरी आभासी असली, तरी त्यात अंतर्भूत केलेला अभ्यास मात्र वास्तववादी आहे. आपले मत मांडताना कोणत्या गोष्टीवरून हे मत झालं, हे सांगायला डॉक्टर विसरत नाही. तसेच ते बळकट करण्यासाठी आधी घडून गेलेल्या काही गोष्टींचा आधारही घेतो. म्हणजे खोटं समोर आल्यावर माणसाच्या चेहऱ्याची बदलणारी ठेवण, मग त्यात सगळं आलं. डोळे, भुवया, ओठ, तोंड, कान, कपाळ त्यासोबत हाताच्या हालचाली, उभं राहण्याच्या पद्धतीपासून ते आवाजातील बदलांपर्यंत सगळं.
इतका प्रचंड मोठा हा अभ्यास आहे, की प्रत्येक नवीन एपिसोड आपल्याला वेगळं काहीतरी शिकवून जातो. अनेक वेळा हे ठोकताळे बरोबर येतीलच असं नाही, पण हे गणित नाही. दोन अधिक दोन नेहमीच चारच होतील असे नाही. कारण प्रत्येक वेळेला परिस्थितीचे अनेक कंगोरे त्याला चिकटलेले असतात. त्यामुळे मांडलेला ठोकताळा नेहमीच अपेक्षित उत्तरच असेल असं नाही. पण हे सगळं असतानाही माणसांना अनेक वेगळ्या पद्धतीने ओळखायला, समजून घ्यायला मात्र आपण नक्की शिकतो.
'मायक्रोएक्स्प्रेशन' म्हणजे अनेकदा कळत नकळत आपल्या चेहऱ्यात छोटे छोटे बदल अगदी पटकन होतात, जसं भुवई वरती जाणं. हे घडलेल्या घटनांवर अवलंबून असतं. या आणि अश्या अनेक असंख्य बदलांचा केलेला अभ्यास हा आपल्याला अनेक न बोलल्या गेलेल्या गोष्टीही सांगू शकतो. काही एक्स्प्रेशन असे असतात, की ते सगळ्यांत आढळून येतात, म्हणजे खोटं बोलताना. मग अश्या एक्स्प्रेशनस्-चा अभ्यास करून काही न सांगितलेल्या गोष्टी मनातून काढता येतात. ह्याचा अभ्यास म्हणजेच 'फेशिअल कोडींग सिस्टीम', शेवटचा पण अतिशय महत्वाचा भाग म्हणजे 'बॉडी लँग्वेज'. याबद्दल खूपदा लिहीलं गेलं आहे. कारण ह्यावरून पूर्ण व्यक्तिमत्वाचं रिफ्लेक्शन समोरच्या व्यक्तीवर पडत असते. ही त्रिसूत्री म्हणजे माणसाला ओळखण्याचा डी.एन.ए. आहे.
डॉक्टर पॉल एकमन यांनी अश्या १०,००० पेक्षा जास्ती 'फेशियल एक्स्प्रेशनस्-चा' अभ्यास करून अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे.
"The best human lie detector in the world"
अशी बिरुदावली मिळवणारे डॉक्टर आणि त्यांच्या अभ्यासावर बसलेली "लाय टू मी" ही सिरीज बघावी अशीच आहे.
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
खूप छान माहिती, धन्यवाद विनीत जी
ReplyDelete